विराट नगर |
जयपुरला तिसर्यांदा जात होतो. त्यामुळे जयपुर मधील नेहमीची प्रसिध्द स्थळे पाहाण्या ऐवजी वेगळी ठिकाण शोधत असताना "विराट नगर" सापडल. महाभारतातील विराट पर्वात उल्लेख असलेले विराट नगर ते हेच असा येथिल लोकांचा दावा आहे. भारतात अनेक प्राचीन गावांशी रामायण , महाभारतातल्या कथा जोडलेल्या आहेत त्यापैकी हे एक गाव. जयपूरच्या आसपास फ़िरतांना महाभारतातल्या कथांशी संबंधित अनेक ठिकाण आढळली. त्यातही पाच पांडवां पैकी भीमाशी संबधित ठिकाण जास्त आढळली.
पांडू पोल, सरिस्का |
महाभारतातील दुसरी प्रसिध्द कथा म्हणजे भीमाचे हनुमंताने केलेले गर्वहरण. ही सुध्दा याभागात घडली असे मानले जाते. सरिस्का अभयारण्यात " पांडू पोल " नावाची जागा आहे . (पोल म्हणजे दरवाजा इथे खिंड या अर्थी ) या खिंडीत ही प्रसिध्द घटना घडली असे मानले जाते. याठिकाणी हनुमान मंदिर आणि त्या जवळून वाहाणारा बारमाही झरा आहे.
Remains of Stupa, Virat Nagar |
सध्याचे विराट नगर (बैराट) हे गाव हायवेच्या आसपास
वसलेल्या टिपिकल गावांसारखेच आहे. गावातील सर्व प्राचीन , मध्ययुगीन अवशेष मात्र गावापासून दूर असलेल्या टेकड्य़ांवर व
त्याच्या आसपास पसरलेले आहेत. प्राचीन मंदिर
आणि बौध्द स्तुप असलेली "बिजक की पहाडी" , गणपती मंदिर
आणि संग्रहालय, सम्राट अशोकाचा शिलालेख, भीम की डुंगरी, मुगल गेट आणि जैन मंदिर ही ऐतिहासिक ठिकाण आदिमानव काळापासून ते आज पर्यंत
या मोठ्या कालखंडाच्या खूणा बाळगून आहे.
बिजक की पहाडीची पायवाट |
विराट नगर भटकंतीची सुरुवात "बिजक की पहाडी" या स्थानिक नावाने ओळखल्या
जाणार्या टेकड्यांच्या रांगापासून झाली. गावाबाहेर असलेल्या या टेकड्यांच्या पायथ्याशी
जाण्याकरिता पक्का रस्ता बनवलेला आहे . रस्ता जिथे संपतो तिथे मोठ मोठ्या खडकांनी बनलेल्या
टेकडीच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. पायथ्यापासून
एक फ़रसबंदी चढणाचा रस्ता टेकडीवर जातो. पहिली टेकडी चढून गेल्यावर थोडी सपाटी लागते.
इथून चारही बाजूला अरवली पर्वताची डोंगर रांग दिसते. उजव्या बाजूला एका टेकडीवर भगवा ध्वज फ़डकताना दिसतो.
त्या दिशेने चढ चढतांना वाटेत अनेक वेगवेगळ्या आकाराचे खडक आजूबाजूला पाहायला मिळतात.
या भागात लोकांचा वावर नसल्याने पक्षीही भरपूर प्रमाणात आहेत आणि तेही जवळुन पाहायला
मिळतात. हे सर्व पाहात १५ ते २० मिनिटात मगरीच्या
तोंडा सारख्या दिसणार्या एका मोठ्या दगडापाशी पोहोचलो. मगरीने जबडा उघडावा तसा त्याचा
आकार होता. मगरीच्या नागपुड्याच्या भोकांसारख एक मोठा खड्डाही त्या दगडाला पडला आहे. या दगडाखाली असलेल्या गुहेत श्रीराम मंदिर आहे.
पांडवांनी अज्ञातवासात असतांना याची स्थापना केली अशी लोकांची श्रध्दा आहे. गुहेत जाऊन श्रीरामच दर्शन घेऊन थोडावेळ आजूबाजूचा
परिसर पाहात आणि शांतता अनुभवत बसून राहिलो.
श्रीराम मंदिर, बिजक की पहाडी |
Remains of Virat Nagar |
Water tank at Bijak ki Pahadi |
विराट नगरच्या इतिहासात डोकावल्यास , ख्रिस्तपूर्व पाचवे ते सहावे शतकातील घडामोडींनी प्राचीन भारत खंडाच्या इतिहासावर मोठा प्रभाव टाकलेला आहे. सिंधू संस्कृतीचा र्हास झाल्यावर तेथील लोक पूर्वेकडे यमुना आणि गंगेच्या खोर्यापर्यंत आणि दक्षिणेकडे पसरले. त्यांनी लहान वसाहती आणि खेडी तयार केली, त्या वसाहती किंवा गावांना 'जनपद' असे म्हणतात. कालांतराने ज्या जनपदांची अर्थव्यवस्था, व्यापार मजबूत होता. त्यांनी त्याच्या संरक्षणासाठी सैन्यदल उभारली.आणि शेजारील कमजोर व लहान जनपदे जिंकून आपल्या राज्यात सामील करून घेतली. अशी लहान लहान जनपदे मिळून तयार झालेल्या मोठ्या राज्यांना 'महाजनपदे' म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी छोटी छोटी १६ राज्ये स्थापन झाली . ती "१६ महाजनपद" या नावांने ओळखली जातात. बौध्द आणि जैन ग्रंथात १)अंग, २) अस्माक,३) अवंती, ४) चेडी, ५) गंधर्व, ६)काशी, ७) कंबोज, ८) कोसला, ९) कुरु , १०) मगध, ११) मल्ल , १२) मत्स्य , १३) पांचाल, १४)सुरसेना, १५) वाज्जी, १६) वत्स या १६ महाजनपदांचा उल्लेख येतो.
१६ महाजनपद, Courtesy google.com |
प्राचीन भारतात १६ महाजनपदे होती. त्यातील मत्स्य महाजनपद हे आजच्या जयपुर, अलवार , भरतपुर या भागात पसरलेले होते . विराट राजाने स्थापन केलेले विराट नगर ही
मत्स्य महाजनपदाची राजधानी होती. मौर्यांच्या
काळात विराट नगर हे भारतातले प्रमुख शहर आणि बौद्ध धर्माचे मोठे केंद्र होते. त्याच काळात या स्तुपाची निर्मिती करण्यात आली.
Cave temple, Virat Nagar |
स्तुपाचे अवशेष असलेल्या टेकडीच्या वर चढून गेल्यावर , एक गुहा मंदिर पाहायला मिळते. या परिसरात झालेल्या
उत्खननात विटांचे काही चौथरे पाहायला मिळतात. येथून खालच्या टेकडीवर दिसणार्या स्तूपाच्या अवशेषाकडे पाहिल्यावर (Arial View) काहीतरी गुढ चिन्ह ,आकार दिसायला लागतो. पुरातत्व खात्याने हा संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर , नीटनेटका आणि सुशोभित ठेवलेला आहे.
गणेश मंदिर, विराट नगर |
बिजक की पहाडी उतरुन संग्रहालय आणि गणपती मंदिर
पाहाण्यासाठी गावात शिरलो. गावातील अरुंद रस्त्यावरुन वाट काढत . एका टेकडीच्या पायथ्याशी
पोहोचलो . ही टेकडी पण मोठमोठ्या खडकांनी बनलेली होती. या टेकडीच्या पायथ्याशी एक तलाव
व संग्रहालय आहे. टेकडीच्या अर्ध्या उंचीवर स्वयंभु गणेश मंदिर आहे. इथले वातावरण बिजक
की पहाडीच्या एकदम विरुध्द होत. तिथे एवढ्या मोठ्या परिसरात आम्ही दोघच होतो. इथे मात्र
प्रचंड गर्दी होती, टेकडी खालचे पार्कींग
फ़ुल होते. प्रसाद, हार विकणारी दुकान आणि त्यामध्ये असलेली गर्दी यातून
वाट काढत गणपतीचे दर्शन घेतले . पायथ्याशी असलेल्या संग्रहालयात शिरलो. संग्रहालय अतिशय
सुंदर आहे. विराट नगरचा इतिहास वस्तू रुपात खूप चांगल्या प्रकारे मांडलेला आहे, सोबत पूरक माहितीही लिहिलेली आहे.
Clay Objects, Virat Nagar |
Punch Marked Coins, Virat Nagar |
Indo Greek Coins, Virat Nagar |
विराट नगरच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरांवर अनेक गुहा आहेत. या गुहांमधून आदिमानवाचे
वास्तव्य होते. इसवी सन १८७१ -७२ मध्ये कॅनिंग हॅम यांनी विराट नगर मधील अवशेष शोधून
काढले. या गुहांमध्ये आणि या परिसरात पुरातत्व
खात्याने केलेल्या उत्खननात मिळालेल्या अश्मयुगीन
दगडी हत्यारांवरून अश्मयुगीन मानवाचे वास्तव्य या ठिकाणी एक लाख ते पन्नास हजार वर्षांपूर्वी
पासून होते असे मत श्री एन.आर. बॅनर्जी यांनी मांडले आहे. त्यांनी कैलास नाध दीक्षित
यांच्याबरोबर या ठिकाणी १९६०-६२ मध्ये उत्खनन केले होते . विराट नगर येथे केलेल्या उत्खननात विविध काळातील
दगडी हत्यारे, मातीचे भांडी, मूर्ती, विटा, दागिने, लोखंडाची हत्यारे सापडली आहेत .
याशिवाय अनेक प्रकारची आणि वेगवेगळ्या काळातील नाणी सापडलेली आहेत. यात Punch Mark coins, Indo
Greek coins ( यावर ग्रीक आणि खरोष्टी लिपीत
मजकूर लिहिलेला आहे ), मुघलांची नाणी
इत्यादी आहेत. या सर्व गोष्टी या ठिकाणी
व्यवस्थित मांडून ठेवलेल्या आहेत इसवी सन ६३४ मध्ये चिनी प्रवासी ह्यूएनत्संग (युआनच्वांग)
विराट नगरला आला होता. त्याने त्याच्या प्रवास वर्णनात विराट नगरचा उल्लेख केलेला
आहे. संग्रहालय पाहाण्यसाठी शुल्क नाही , तरीही बाहेर एवढी गर्दी असूनही
संग्रहालय पहायला मात्र दोन चार जणच आले होते.
आपल्याच संस्कृती, इतिहासा बद्दल असलेली अनास्था दुसर काय ?
संग्रहालय बघितल्यावर पुढची तीन ठिकाण गावाच्या दुसऱ्या भागात होती. भीम डुंगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर "सम्राट अशोक शिलालेख" अशी दिशा दर्शक पाटी पाहून त्या दिशेने चालत निघालो. पुरातत्व खात्याने तिथे जाण्यासाठी पायावाट व्यवस्थित बांधून काढलेली आहे. ज्या दगडावर शिलालेख होता त्यावरही काँक्रीटची शेड बांधलेली आहे. पण शिलालेख मात्र त्या ठिकाणी नाही.
सम्राट अशोक शिलालेख, |
पुन्हा रस्त्यावर येऊन भीम डुंगरीच्या पायाथ्याशी आलो. या डोंगरावर भीमाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. डोंगराच्या पायथ्याशी गुहा आहे त्यात भीम वास्तव्य करत होता, पाऊलाच्या आकाराचे पाण्याचे कुंड आहे. भीमाने लाथ मारून ते कुंड निर्माण केले असे समजले जाते. डोंगराच्या मध्यावर एका गुहेत ११ मुखी शिवलिंग आहे. तिथेच भीमाचे आणि हनुमंताचे देऊळ आहे. भीम आणि हनुमंत हे दोघेही पवनपुत्र, त्यांचे एकत्र देऊळ भारतात केवळ या ठिकाणी आहे. या डोंगरावर अनेक गोलाकार मोठ्या आकाराचे खडक आहेत त्यांना भीम गट्टे म्हणतात. भीम याने खेळत असे . या दगडांना पडलेले खड्डे त्याच्या बोटांमुळे पडले आहेत असे स्थानिक लोक मानतात.
भीम डुंगरी उतरुन मुघल गेट म्हणजेच पंचमहाल जवळ पोहोचलो. हा पंच महाल आमेरच्या राजाने शाही यात्रींसाठी बांधला होता. अजमेरला जातांना आणि या परिसरात शिकारीला आल्यावर अकबर या ठिकाणी थांबत असे. या दुमजली महालात घुमटाकार छत असलेल्या खोल्या आहेत. छतांवर आणि भिंतींवर नक्षीकाम केलेले आहे. महाला समोर कारंजे आहे. मुघल स्थापत्य शैलीत बांधलेल्या या महालावर असलेल्या पाच छत्र्यांमुळे हा महाल पंचमहाल म्हणून ओळखला जातो.
मुघल गेट (पंचमहाल) |
जैन मुनी विमल सुरी यांनी विराट नगरच्या डोंगरात तपश्चर्या केली. विराट नगर मध्ये आजही भव्य जैन मंदिर आहे. विराट नगर मध्ये असलेले जैन नासिया मंदिर १६ व्या शतकात बांधले होते. मुघल गेट समोर असलेल्या या जैन मंदिराच्या बांधणीवर मुघल स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो.
Jain Temple , Virat Nagar |
Adinatha, Virat Nagar |
विराट नगर मधील हिंदू, बौध्द, जैन आणि मुस्लिम धर्माचे वेगवेगळ्या काळातील अवशेष, वास्तू पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो.
जाण्यासाठी :-
जयपूर - भानगड - विराट नगर हे पाहून एका दिवसात जयपूरला परत जाता येईल.
"सरीस्का व्याघ्र प्रकल्प" विराट नगर पासून १५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे सरिस्का जवळ राहुनही "विराट नगर" पाहाता येते.
1) "झपाटलेला (?) किल्ला, भानगढ (Bhangarh , the most haunted (?) fort)" हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
https://samantfort.blogspot.com/2022/11/bhangarh-haunted-fort.html
2) "भीम - बकासूर युध्द आणि विखुरलेले तांदूळ" हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
https://samantfort.blogspot.com/2024/07/blog-post.html
3) "राणाप्रतापांच्या पाऊलखुणांवर" हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
https://samantfort.blogspot.com/2017/06/blog-post_16.html
Shree Ram Mandir built by Pandava |
Photos by :-
Amit Samant, Asmita Samant © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5
अतिशय छान लेख
ReplyDeleteAwasome Amit
ReplyDeleteनेहमीप्रमाणे वास्तूंचे / मंदिरांचे सुंदर परीक्षण आणि सुंदर माहिती
ReplyDeleteफारच सुंदर वर्णन, शिवकाळ तून महाभारत, बुद्ध काळा विषयी पण. अमित तुझी इतिहास मांडणी खूप छान. आणि प्रवास वर्ण आणि इतिहास खूपच छान मेळ घातला आहेस. सिंपली ग्रेट. धन्यवाद एका नवीन स्थानाची माहिती करून दिल्या बद्दल.
ReplyDeleteNice description as usual
ReplyDeleteअमित, नितांत सुंदर लेख.तू केलेले स्थळ वर्णन आणि सोबत पूरक छायाचित्रं यामुळे ही जागा भेट देऊन कधी एकदाचे पहातोअसे झाले आहे.तुला पुढच्या ट्रिप साठी शुभेच्छा!
ReplyDeleteGood work Amit. Keep it up.
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख आहे. विस्तारपूर्वक लिखाण आहे. महाभारत याचे मला खूप औत्सुक्य आहे. तुझे निरीक्षण आणि लिखाण जबरदस्त आहे. खूप छान वाटले.
ReplyDeleteविराट नगर हस्तीनापुरच्या इतके जवळ होते. (त्या काळात खूप दूर वाटत असेल), पण तरीही दुर्योधन पांडवांना शोधू शकला नाहीं याचे आश्चर्य वाटते. एक तर त्याची गुप्तहेर संघटना दुर्बल असावी. कारण कुरुसम्राट या नात्याने तो त्या काळातील आर्यावर्तात एक सामर्थ्यशाली युवराज होता. असो.
अमित नेहमी प्रमाणे खूप छान आणि सखोल माहिती दिली आहे. महाभारतातील घटनांचा उल्लेख वाचनीय आहे.
ReplyDeleteकिती दिवस लागले हे सर्व फिरायला? जस्ट माहितीसाठी.
👍👍🙏🙏
अतिशय माहिती पूर्ण लेख, खूप छान
ReplyDeleteछान, अप्रतिम लेख. मांडणीही मस्त..
ReplyDeleteव्वा.. हे फारच इंटरेस्टिंग आहे..खूप छान माहिती आहे..मला अशा पुराणातल्या कथा आणि त्या ज्याच्याशी जोडल्यात ती ठिकाणे पाहायला खूप आवडते. मी त्याच्या सत्य असत्यात पडत नाही. बकेट list मध्ये ठेवते.. कधी योग आला तर नक्की जाईन.फोटोही मस्त..
ReplyDeleteछान, अप्रतिम लेख.
ReplyDeleteखूपच सुंदर लेखणी...
ReplyDeleteखूपच छान लेख
ReplyDeleteVery nice informative blog on such an offbeat place.... 👍
ReplyDeleteखूप छान लेख अमीत
ReplyDeleteखूप छान आणि माहितीपूर्ण लेख अमित.....
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDeleteजबरदस्त माहिती खजाना.
ReplyDeleteअतिशय बारीक बारीक खुणा व त्या बाबतची माहिती दिली आहेस. मस्तच लिहिलं आहेस
ReplyDeleteअप्रतिम लेख
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेखन.. वर्णन मस्त.. बसल्याजागी विराट नगर फिरून आले..
ReplyDelete- Aarti Dugal
अमित जी खूपच अभ्यास पूर्ण माहिती दिलीत.इतिहासात घेऊन गेलात. धन्यवाद
ReplyDeleteफार सुंदर .नवीन ठिकाण माहित झाले.
ReplyDeleteVery informative and interesting
ReplyDeleteVery nice information and clear pics
ReplyDeleteअभ्यास, निरीक्षण ,लिखाण ,मांडणी आणि वाचकांसमोर वास्तव चित्र कस उभाराव हे आपल्या कडून शिकतोय,,,, खूप छान माहिती ,,,,
ReplyDeleteसुंदर लेख. सौंदर्य लेखनातील. सौंदर्य मांडणीतील. पौराणिक कथा व इतिहास याची सांगड घालत असताना चौकस बुद्धी काहीतरी पुराव्याच्या शोधात असते. आपले लेख वाचताना ते सापडते. सिंधू संस्कृती व महाजनपदे यांचा संबंध, आदिमानवाच्या अस्तित्त्वाचा काल, हिंदु बौद्ध व जैन या भारतीय संस्कृतींचा परस्पर संबंध विशेषत्त्वाने एकत्रित भूतकालाची जाणीव करुन देतात. अप्रतिम माहिती. पुन्हा एकदा धन्यवाद डोंगरभाऊ.
ReplyDeleteमस्त झालाय लेख.
ReplyDeleteसुंदर लिखाण उत्कृष्ट छायाचित्रण महाभारतातील माहीत नसलेली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
ReplyDeleteसुंदर लिखाण आणि फोटोज डोंगरभाऊ, तुमचा प्रतेक फोटोच अनेक कथा सांगतोय, आम्हाला सैर करुन आणल्याबद्दल धन्यवाद!
ReplyDelete