Sunday, June 30, 2013

भामगिरी / भांबगिरी / भामचंद्र डोंगर (Bhamchandra Dongar near Talegaon)




तुकाराम महाराजांनी १५ दिवस भामगिरी डोंगरावर निर्वाणीचा संकल्प करून श्रीहरीवर ध्यान लावले. त्या काळात सर्प, विंचू, वाघ अंगाला झोंबू लागले, पण त्यांनी ध्यान सोडल नाही, आसन मोडल नाही. शेवटी दिव्याच्या ज्योती जवळ धरलेला कापूर ज्याप्रमाणे ज्योतीशी एकरूप होतो तसा तुकारामांचा देह श्रीहरीशी एकरूप झाला, त्यांना साक्षात्कार झाला. त्याच वर्णन तुकोबांनी अभंगातून केलेल आहे.



पंधरा दिसामाजी साक्षात्कार झाला !
विठोबा भेटला निराकार !!
भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली !
वृत्ति स्थिरावली परब्रम्ही !!
निर्वाण जाणोनी आसन घातिले !
ज्ञान आरंभिले देवाजीचे !!
सर्प, विंचू, व्याघ्र अंगासी झोंबिले!
पिडू जे लागले सकळीक !!
दिपकी कर्पूर कैसा तो विराला!
त्तैसा देह झाला तुका म्हणे !!

भामगिरी डोंगररांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. या डोंगर रांगेच्या पश्चिमेला गेलेल्या फाट्याला त्याच्या तळातील नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे नाव मिळालेले आहे. भामगिरी डोंगर दोन भागात विभागलेला आहे पायथ्यापासून अर्ध्या उंची पर्यंत गच्च झाडी आहे. त्यावरील भागात डोंगराने अंदाजे ८०० फूटी कातळ टोपी घातलेली आहे. या कातळात नैसर्गिक आणि कोरीव गुहा आहेत.


भामगिरीच्या पायथ्यापासून मळलेल्या वाटेने दाट झाडीतून अर्ध्या तासात आपण सपाटीवर येतो. येथे एक काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे. येथून १० मिनिटात आपण कातळ कड्यापाशी पोहोचतो. येथे थोड्याश्या उंचीवर कातळात खोदलेल टाक आहे. टाक्याच्या पुढे गुहा मंदिर आहे. कातळात कोरून काढलेल्या या मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग आहेत. सभामंडप चार दगडी खांबांवर तोललेला आहे. सभामंडपात नंदीची मूर्ती आहे. सभामंडपाला लागूनच पाण्याच टाक खोदलेल आहे. गाभार्‍याच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. गाभार्‍या शिवलींग व पार्वतीची मुर्ती आहे. छतावर नक्षीकाम केलेल आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर कातळात कोरलेल अजून एक टाक पहायला मिळत, टाक्याच्या वरच्या बाजूला गुहा आहे. या गुहेत वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी काही मुले रहातात.  गुहेच्या पुढे एका झाडाखाली काही मुर्त्या ठेवलेल्या आहेत. या झाडाजवळून एक  पायवाट खालच्या बाजूला जाते. येथे एक पाण्याच टाक व गुहा आहे. ती पाहून परत झाडाजवळ येऊन कातळ भिंतीत कोरलेल्या पायर्‍यांनी तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेकडे जावे. 

संसारात राहून, व्यापार सांभाळून विठ्ठल भक्ती करणार्‍या तुकाराम महाराजांना दैनंदिन व्यापातून ईश्वर भक्तीसाठी वेळ देता येत नसे. त्याची खंत त्यांनी अनेक अभंगांमधून व्यक्त केलेली आहे.






संसारतापे तापलो मी देवा !
करीता या सेवा कुटुंबाची!!
कसया गा मज घातिले संसारी!
चित्त पायावरी नाही तुझ्या !!

किंवा

मन माझे चपळ न राहे निश्चळ!!
घडी एक पळ स्थिर नाही !!


अशा मनाच्या अवस्थेत तुकोबारायांना भामगिरीवर जाऊन ध्यानधारणा करण्याची आज्ञा झाली.
 

तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेपाशी भामगिरी डोंगराचा कातळकडा काटकोनात वळलेला आहे. गुहेच्या पायथ्याशी शिलालेख कोरलेला दगड पडलेला आहे. त्याच्या बाजूला दगडात कोरलेली गणपतीची मुर्ती आहे. गुहेची अंदाजे उंची ६ फूट असून ती आतल्या बाजूस उतरती आहे. गुहेची लांबी अंदाजे १० फूट व रूंदी ६ फूट आहे. गुहेत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीवर तुकाराम महाराजांची मुर्ती कोरलेली आहे. त्यांच्या हातावर विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत. गुहेच्या टोकाशी विठ्ठल रखुमाईची मुर्ती आहे. या गुहेच्या बाजूला ३ फूट उंच व ६ फूट लांब गुहा आहे. या गुहेत एक माणूस आरामात झोपू शकेल अशी जागा आहे.


ज्ञानेश्वर माऊलींनी तपश्चर्य़ेच स्थान कस असावे याबद्दल अभंग लिहिले आहेत. भामगिरीच्या ध्यान गुंफेला हे वर्णन लागु पडत.

बहुत करोति निशब्द
दाट न रिगे श्वापद !
शुक अन षटपद
तेऊते नाही !!

तपश्चर्य़ेच्या ठिकाणी शांतता असावी , श्वापदांचे येणे जाणे, पक्षी (पोपट) , किटक (भुंगे) यांचा आवाज नसावा.

आणिकही एक पहावे
जे साधकही वसते होआवे !
आणि जनाचेनी पायरवे
मळेचिना !!

हे साधकांनी वसवलेले स्थान असावे येथे सामान्य जनांचा वावर नसावा.

 






गुहेत शिरल्यावर गुहेतल्या शांततेने आमच्यावर गारूड केलं. गुहेच्या दारातून आत झिरपणार्‍या प्रकाशामुळे ती गुहा एकाच वेळी गुढ आणि सुंदर भासू लागली. तुकाराम महाराजांच्या मुर्ती समोर बसून अलगद डोळे मिटून घेतले. नितांत शांतता सभोवती दाटली होती. मनही शांत होत गेले. मनात विचार आला याठिकाणी कित्येक साधक साधना करुन गेले असावेत. अशा पवित्र ठिकाणी ५ मिनिटे का होईना आपल्याला शांतपणे बसता आलं , अंतर्मुख होता आले याचा आनंद झाला.

 भामगिरीवर जाण्याचा मार्ग :-  पुणे - नगर रस्त्यावर तळेगाव पासून ११ किमी अंतरावर खालुंब्रे गाव आहे. या गावातून डाव्या बाजूचा रस्ता चाकण एम. आय. डी. सी. फेज - २ ला जातो. या रस्त्याने हुंडाईचा प्लांट - सावरदरी गाव यामार्गे ५ किमीवरील वसुली नाक्यावर पोहोचतो (वसुली हे गावाचे नाव आहे.). येथे डाव्या बाजूला शिंद, भांबुर्ले गावाकडे जाणारा रस्ता पकडावा. नाक्यापासून भांबुर्ले १.५ किमीवर आहे. भांबुर्ले गावातून उजव्या बाजूचा रस्त्याने १ किमीवरील भामचंद्र माध्यमिक विद्यालया पर्यंत जावे. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूच्या (विद्यालयाच्या बाजूने) कच्च्या रस्त्याने डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाता येते. डोंगराच्या पायथ्यापासून मळलेली वाट भामगिरीवर गेलेली आहे.


मुंबई - पुण्यापासून एका दिवसात  भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर व इंदुरीचा किल्ला ही तिनही ठिकाण पहाता येतात.



ज्ञानेश्वरीतील पक्षी ( Birds in Dnyaneshawari ) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.
https://samantfort.blogspot.com/2020/05/blog-post.html