Saturday, November 12, 2022

झपाटलेला (?) किल्ला, भानगढ (Bhangarh , the most haunted (?) fort)

Bhangargh , Rajasthan
Hounted (?) Bhangarh

सह्याद्रीत किल्ले भटकताना रात्रीचा मुक्काम किल्ल्यावर असला की, जेवण झाल्यावर शेकोटी भोवती भुतांच्या गोष्टींचा फड जमतो. ग्रुप मध्ये भुतांच्या गोष्टी  रंगवून सांगणारा कोणतरी असतोच. खऱ्या खोट्याची शहानिशा नको म्हणून सहसा ही भूत दुसऱ्याला किंवा मित्राला दिसलेली असतात. रात्र चढत जाते  तशा या गोष्टी रंगत जातात. हळूहळू खूप दमलोय, उद्या ट्रेक करायचा आहे इत्यादी कारणे सांगून काही धीट (?) लोक झोपायला जातात. जे घाबरले नाहीत असं दाखवत असतात तेही हळूहळू शेकोटीच्या जवळ सरकतात किंवा जंगल आणि उघड्यावरचा भाग सोडून पाठीमागे मंदिर किंवा आडोसा असेल अशा जागी बसतात.

Bhangargh, Rajastan
बालेकिल्ला, भानगढ

 किल्ल्यावर रात्री  चालणाऱ्या भुतांच्या गोष्टी पुन्हा आठवण्याच कारण म्हणजे त्यावेळेस सरिस्का व्याघ्र प्रकल्पाला भेट देतांना आजुबाजूला कोणते  किल्ले पाहता येतील ते शोधत होतो.  त्यात भानगढ दिसला . भारतातला सगळ्यात जास्त "हॉंटेड" म्हणजेच "झपाटलेला" किल्ला. या किल्ल्याबद्दल जेवढं वाचायला लागलो , व्हिडिओज बघितले त्यात किल्ला कसा हॉंटेड आहे. अनेक लोकांना तिथे कसे अमानवीय शक्तीचे अनुभव आलेत यावरच भर देण्यात आला होता. किल्ल्याच्या इतिहासा बद्दल किंवा त्याच्या सद्यस्थिती बद्दल फ़ारच कमी माहिती होती.  त्यामुळे हा किल्ला प्रत्यक्ष जाऊन बघायण्यासाठी जयपुरहुन भानगढ गाठले.

जयपुर जवळील आमेर येथील कछवाह वंशाच्या राजा भगवंतदास (१५३७ - १५८९) यांनी भानगढ किल्ल्याची निर्मिती केली. राजा भगवंतदास मुघल सम्राट अकबराचे पंचहजारी मनसबदार होते. त्यांच्या पश्चात मुलांमधे वाटाण्या झाल्यावर मोठा भाऊ मानसिंह (अकबराच्या नवरत्नांतील एक) आमेरचा राजा बनले आणि धाकट्या माधोसिंहच्या वाटेला भानगढचा परिसर आला. त्यांनी या किल्ल्याला आपली राजधानी बनवली. भानगढ किल्ल्याची भरभराट झाली. किल्ल्यात आजही असलेल्या बाजारपेठेवरुन आणि किल्ल्यातील वास्तूंवरुन याची कल्पना येते. मग असा नांदता, भरभराटीला आलेला किल्ला अचानक ओस का पडला याचे कारण जनमानसात प्रचलित असलेल्या दंतकथां मध्ये सापडते.. 

Bhangargh Fort Rajasatan
टेहळणी चौकी (तांत्रिकाचा वाडा ? )

एका दंतकथे प्रमाणे आज भानगढ ज्या डोंगरावर आहे तेथे बाबा बालकनाथ नावाचे  एक तपस्वी साधू राहात होते.  किल्ला बांधण्यासाठी राजा त्यांचा आशिर्वाद आणि परवानगी मागण्यासाठी गेला. साधूने राजाला एका अटीवर किल्ला बांधण्याची परवानगी दिली ती म्हणजे , किल्ल्यावरील कुठल्याही वास्तूची सावली त्यांच्या कुटीवर पडता कमा नये. राजाने अट मान्य करुन भानगढ किल्ला बांधाला . पुढील काळात राजाचे वंशज साधूची अट विसरून राजमहालाची उंची वाढवत गेले.  त्याची सावली साधूच्या कुटीवर पडून अट मोडली . त्याक्षणी किल्ल्यात असलेल्या संपूर्ण शहराचा आणि पर्यायाने किल्ल्याचा विनाश झाला. साधूच्या शापामुळे ही जागा निर्जन झाली . किल्ला का ओस पडला याचे उत्तर या दंतकथेतून मिळत असले तरी , भानगढ किल्ला अघोरी शक्तीच्या सावटाखाली कसा आला हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

त्याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या दंतकथेत मिळतं. त्यानुसार सिंघा नावाचा एक वासनांध तांत्रिक होता. काही देणगी पदरी पाडून घेण्याच्या इराद्याने तो राजदरबारी गेला. तिथे त्याची नजर राणी रत्नावतीवर पडली. तिला बघून तांत्रिक वेडापिसा झाला आणि मग तिला मिळवण्यासाठी त्याने एक कारस्थान रचलं. मंत्राने भारलेली तेलाची कुपी त्याने राणीच्या दासीकडे दिली आणि निरोप पाठवला की हे तेल अंगास लावल्यास राणीला अलौकिक सौंदर्याचा लाभ होईल. दासी कुपी घेऊन राणीकडे गेली. तिने तांत्रिकाचा निरोप राणीला सांगितला.  कुपीतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे मंत्र, तंत्र जाणणाऱ्या राणीला शंका आली. तिने ती कुपी एका अजस्र शिळेवर आपटली. कुपी फुटली. त्यातील तेल शिळेवर सांडलं तत्क्षणी शिळा घरंगळत खाली गेली आणि नेमकी झुडूपामागे लपून राणीला बघणाऱ्या तांत्रिकाच्या अंगावर पडली. शिळे खाली दबलेल्या तांत्रिकाने मरण्याआधी शाप दिला. 'संपूर्ण भानगढ़ नष्ट होईल आणि या परिसरात यापुढे कोणीही मनुष्य जिवंत राहू शकणार नाही. असे म्हणतात की त्याचा शाप खरा ठरला आणि नंतर थोड्याच दिवसात किल्ल्यावर शत्रूने आक्रमण केलं. त्यात राजपरिवारातील मंडळीसह इथली सगळी रयत मारली गेली. एवढं होऊनही तांत्रिकाचा आत्मा मुक्त झाला नाही.  तो आजही किल्ल्यात भटक्त असतो आणी त्याला अटकाव करण्यासाठी राणी रत्नावतीचा आत्माही किल्ल्यात अजून आहे. 

जनमानसांत प्रचलित या दंतकथां पेक्षा इतिहास वेगळा आहे . माधो सिंहा नंतर त्याचा मुलगा छत्र सिंह भानगढचा राजा झाला. त्याच्या नंतर त्याचा मुलगा अजब सिंह ( जवळच असलेला अजबगढ किल्ला यानेच बांधला) आणि त्यानंतर हरीसिंह भानगढचे राजे झाले. औरंगजेबाच्या काळात हरीसिंहाची दोन्ही मुले मुसलमान झाली. त्याच काळात किल्ल्यात मशिद आणि किल्ल्याबाहेर मकबरा बांधण्यात आला.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता खिळखिळी झाली त्याचा फ़ायदा घेत महाराजा सवाई जयसिंहानी भानगढवर हल्ला करुन हरीसिंहाच्या दोम्ही मुलांना मारुन टाकले . युद्धात  भानगढची अपरिमित हानी झाली. राज्याची घडी विस्कटली, किल्ल्याचा राजधानीचा दर्जा गेल्याने व्यापार उदीम थंडावला , परिस्थिती हळूहळू खालावली. त्यात अठराव्या शतकात आलेल्या दुष्काळाची भर पडली. त्यामुळे किल्ल्यातील जनता हळूहळू जयपूर, अजबगढ. अलवार इत्यादी जवळपासच्या समृध्द राज्यात स्थलांतरीत झाली.

Haunted Bhangargh Fort
भानगढ किल्ला

आरवली पर्वताच्या पायथ्याला भानगढ किल्ला आहे. किल्ल्याला मागील बाजूने डोंगराचे संरक्षण आहे. भानगढ गावाच्या बाजूने किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी चार ठिकाणी वेगवेगळ्या उंचीवर किल्ल्याला तटबंदी बांधलेली आहे. किल्ल्याच्या सर्वात बाहेरील तटबंदीत चार दरवाजे आहेत. लाहोरी (पोल) दरवाजा, हनुमान पोल (दरवाजा) ,  फ़ुलवारी पोल  आणि दिल्ली पोल. सध्या आपण हनुमान (पोल) दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिरावरुन दरवाजाला हनुमान (पोल) दरवाजा हे नाव पडलेले आहे.  मुर्ती असलेले किल्ल्यातील हे एकमेव मंदिर आहे. तिथे आजही पूजाअर्चा चालते. किल्ल्यातील बाकीच्या चारही मंदिरात मुर्ती नाही. हनुमान गेट जवळ पूरातत्व खात्याचे कार्यालय आहे तिथून तिकिट घेऊन ( रोख रक्कम भरल्यास २५/- आणि ई पेमेंट केल्यास २०/- )  किल्ल्यात प्रवेश करता येतो.  येथे पूरातत्व खात्याने किल्ला बघण्याची वेळ सुर्योदय ते सुर्यास्त अशी लिहिलेली आहे . इतर ठिकाणी वेळ लिहिलेली असते पण याठिकाणी अशी पाटी का लावली असावी. किल्ला झपाटलेला आहे म्हणणार्‍यांचा पहिला मुद्दा हाच असतो. पूरातत्व खात्याने  किल्ला अतिशय सुंदर ठेवला आहे. परिसराची साफ़सफ़ाई , राखलेले गवत (लॉन), फ़ुलझाडं,  ठिकठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक हे प्रसन्न वातावरण पाहून पहिल्या नजरेत  हा किल्ला  झपाटलेला आहे हे पटत नाही. 

Bhangarh Fort
भानगढ

किल्ल्याची अधिक माहिती मिळावी आणि मला पडलेले काही प्रश्न विचारता यावेत यासाठी सोबत  गाईड घेतला,  पण किल्ला किती भुताटकीने भारलेला आहे हे सांगण्याच्या नादात त्याने कथांचे जे  चर्‍हाट सुरु केले ते एकट्या दुकट्या माणसाच्या मरणाच्या कथेपासून शेवटी शेवटी (आम्ही घाबरत नाही बघुन) एकाच वेळी हजारो माणस मरण्यापर्यंत प्रमाण त्याने वाढवत नेले. किल्ल्याचा इतिहास , वास्तू याबद्दल थोडक्यात सांगून तो जो भूतकथांमध्ये शिरला तो बाहेरच येईना. त्याची गाडी किल्ल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अनेक वेळा करुन पाहीला पण तो अयशस्वी झाला.  अशा कथांमुळे Dark tourism आणि  Ghost tourism, Haunted Tourism उगम होतो आणि चालना मिळते. अमेरीका आणि युरोपात अशा प्रकारच्या  Dark tourism ची परंपरा आहे. जुन्या किल्ल्यात आणि पूरातन वाड्यांमधे भूतकथा सांगत गाईड फ़िरवून आणतात. रात्र असली तरी त्याठिकाणी पध्दतशीरपणे लाईटस वगैरे लावलेले असतात. लोकांना काहीतरी वेगळ, रोमांचक (Exciting) म्हणून अशा टूर आवडतात. भानगढ पण त्याच्या भोवती निर्माण झालेल्या गुढ वलयामुळे Dark tourism च्या पंक्तीत जाऊन बसलेला आहे. इथे येणारे बहुतांश पर्यटक त्याच साठी ( घाबरवून घेण्यासाठी) आलेले असतात. भानगढ किल्ल्याला राजस्थानी लोकांनंतर , बंगाली लोक मोठ्या प्रमाणावर भेट देतात असे गाईडने आम्हाला सांगितले. काळ्या जादू (तांत्रिक) इत्यादी गोष्टींची तिथे परंपरा असल्यामुळे असेल कदाचित.  युरोपातल्या आणि भानगढच्या गाईडना  एकदा सह्याद्रीतील किल्ल्यावर नेऊन एक रात्र भूतकथा ऐकवायचा मोह आम्हाला झाला होता.

Bhangargh Fort , Rajasthan
Bhangarh Fort

किल्ल्यात शिरल्यावर किंबहूना भानगढ गावात शिरल्यावर सर्वात प्रथम किल्ल्याच्या डोंगरावर असलेली एक सुंदर वास्तू आपले लक्ष वेधून घेते. त्याचे स्थान आणि आकार बघता आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणार्‍या टेहळ्यांसाठी ती बांधली होती हे स्पष्ट्पणे कळते . पण गाईडच्या कथेतील तांत्रिक तिथे राहात होता, आजही त्याचा आत्मा तिथे राहातो आणि किल्ल्यातील भूताटकीच्या घटना घडवून आणतो . त्याला राणी रत्नावतीचा आत्मा अडवत का नाही ? असे विचारल्यावर गाईडने बाजारपेठ दाखवायला सुरुवात केली.  हनुमान दरवाजाने किल्ल्यात प्रवेश केल्यावर वाटेच्या दोन्ही बाजूला एक मजली इमारती दिसतात. याला  'जौहरी बाजार.'  या नावाने ओळखतात. इथे आपल्याला रायगडाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. अर्थात इथे दुकानांची/ पेढ्यांची संख्या जास्त आहे. बाजारपेठेच्या आकारमाना वरुन भानगढच्या एकेकाळच्या संपन्नतेचा आणि समृद्धतेचा सहजगत्या अंदाज बांधता येतो. सर्व दुकानांना तळ मजल्यावरुन पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी अरुंद जीने आहेत. या पेठेतील एकाच दुकानाची सुंदर कमान अजूनही शाबूत आहे. एकाही दुकानांचे छ्त मात्र शाबूत नाही आहे.  बाजारपेठेच्या मागच्या बाजूला व्यापार्‍यांचे वाडे आहेत. त्यात " मोडो की हवेली "  ही त्याकाळच्या बड्या व्यापार्‍याची हवेली आहे . 

Johari Market , Bhangargh
बाजारपेठ , भानगढ

दंतकथेतील साधूच्या शापामुळे भानगढ मध्ये मंदिरा व्यतिरिक्त कुठल्याही वास्तूंवर छत टिकत नाही असे गाईडने सांगितले. खरतर अठराव्या शतकात इंग्रजांनी किल्ले ताब्यात घेतल्या नंतर किल्ले ओस पडायला लागले . किल्ल्याना कोणी वाली राहीला नाही .त्यामुळे किल्ल्यावर राहाणार्‍या लोकांनी गावात घरे बांधण्यासाठी किल्ल्यातील वाड्यांचे वासे , दरवाजे  इत्यादी सामान वापरले . त्यामुळे महारष्ट्रातील किल्ल्यावरच्या वास्तू उघड्या बोकड्या बिन छताच्या पाहायला मिळतात. या उलट राजस्थानात इंग्रज आले त्यावेळी तिथले राजे संस्थानिक बनले त्यामुळे राजस्थानात बहुतांश किल्ले आजही व्यवस्थित राहीलेले पाहायला मिळतात. त्यामुळे तिथल्या लोकांना असे छत नसलेल्या उघड्या बोडक्या वास्तू पाहायची सवय नाही . भानगड मध्ये अशा बिन छताच्या वास्तूंना पाहून साधूच्या  दंतकथेचा उगम झाला असावा. 

तीन पोल आणि वड , भानगढ

बाजारपेठ जिथे संपते तिथे किल्ला आणि बाजारपेठ यांना वेगळे करण्यासाठी दुसरी तटबंदी आहे. याठिकाणी या तटबंदीत दरवाजा असावा . तटबंदीतून आत शिरल्यावर दुतर्फ़ा वास्तूंच्या अवशेषावर उगवलेली वडाची मोठमोठी झाड आहेत. वास्तूच्या भिंतीवर चढणारी मुळ आणि लोंबणार्‍या पारंब्या आणि साक्षात वडाचे झाड यामुळे इथे भूतांचे वास्तव्य असलेच पाहीजे. आमच्या गाईडने सुरुवात केली , सर आप जयपूरसे यहा तक आहे आपको रस्ते के बाजूमे एक भी ये पेड दिखा ? ये पिछे पहाडी है लेकीन उधर भी ये पेड नही है ,सिर्फ़ इधर ही क्यू ? मग त्याने "झाशी की रानी " या सिरियलची गोष्ट सांगितली त्याच्या शुटींगच्या वेळी कस इथे एका मुलीला भूत दिसल आणि तिला थेट जयपूरला नेऊन हॉस्पिटलमध्ये भरती कराव लागले इत्यादी. इत्यादी.  गाईड सांगत होता त्यातला अर्धा भाग खरा आहे. याभागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने वडासारखी झाड तुरळक आहेत . मागच्या डोंगरावरही खुरटी झुडप दिसत होती . वडाची झाडे मोठ्या प्रमाणावर याच भागात होती. त्याच कारण म्हणजे बांधकामासाठी वापरलेला चुना. वड - पिंपळ इत्यादी झाडांना चुनखडी पोषक असते. त्यामुळे ती झाड आपल्याला कंपाऊंड वॉलवर , पडक्या वाड्यांवर रुजलेली आणि फ़ोफ़ावलेली दिसतात. त्यांचा आकार, दाट  सावली, लोंबणार्‍या पारंब्या, पानांची सळसळ ही भूतकथेसाठी योग्य वातावरण निर्मिती असल्यामुळे ही झाड भुतांशी जोडलेली आहेत. भानगढच्या भूतांसाठी ही वडांची झाड म्हणजे नंदनवनच.

Gopinath Temple , Bhangargh
Gopinath Temple Bhangargh


हे गाईडला समजवण्याच्या भानगडीत न पडता पुढे तिसर्‍या तटबंदीत असलेला तीन कमानीचा दरवाजा (तीन पोल) ओलांडून आत गेलो. येथे उजव्या बाजूला उंच जोत्यावर बांधलेले नागर शैलीतील गोपीनाथ मंदिर आहे. मंदिराच्या  भिंतींवर , खांबांवर,  छतांवर अप्रतिम कोरीव काम  केलेले आहे. मंदिरात मुर्ती मात्र नाही आहे. याठिकाणी "करण अर्जून" सिनेमातल्या एका प्रसंगाचे शुटींग झाल्य़ामुळे ते प्रसिध्द आहे.  याशिवाय किल्ल्यात सोमेश्वर मंदिर, गणेश मंदिर, मंगलादेवी मंदिर, केशवराय मंदिर ही मंदिर आहेत पण मंदिरात मुर्ती नाहीत. " त्यामुळे किल्ल्यातल्या भूतांवर देवाचा वचक नाही”, इती गाईड. "अरे, पण किल्ल्याच्या प्रवेशव्दारातच हनुमानाचे मंदिर आहे, हनुमान स्तोत्रात तो "’भूत प्रेत समंधादी ..." चा बंदोबस्त करतो असे म्हटले आहे. त्यावर अर्थात त्याच्याकडे उत्तर नव्हते.  याभागात लॉन , केवड्याची बाग इत्यादी लावून  परिसर सुंदर ठेवला होता.  एका वडाच्या झाडाखाली गणेश मंदिर मंदिर आहे. त्याच्या पुढे पुरोहिताच्या हवेलीचे अवशेष आणि आणि सोमेश्वर मंदिर आहे. सोमेश्वर मंदिरा जवळ पाण्याचा बांधीव कुंड आहे. किल्ल्यात मला आढळलेला हा एकमेव पाण्याचा स्त्रोत होता. 

कोरीवकाम , राजवाडा

Bhangarh Fort

हा परिसर पाहून चौथी तटबंदी ओलंडल्यावर वळणावळणाच्या, चढाच्या, फ़रसबंदी रस्त्याने आपण बालेकिल्ल्याचा बुलंद दरवाजापाशी पोहोचतो. बालेकिल्ल्यात राजवाड्याचे अवशेष आहेत. त्याच्या दरवाजांवर आणि खिडक्यांवर कोरीवकाम केलेले आहे. याठिकाणी पाण्याचा कोरडा हौद होता. मागेच असलेल्या डोंगरातून पाणी आणण्यासाठी कुठलीही सोय केलेली इथे आढळली नाही. राजघराण्यातील लोक , त्यांच्या दास दासी . अधिकारी यांच्यासाठी खालून पाणी आणले जात होते असे गाईडने सांगितले. 


राजवाडा, भूत उतरवण्याची जागा 

राजवाड्याच्या खालच्या मजल्यावर छत असल्याने त्या खोल्या अंधार्‍या आहेत. कमानदार लांबलचक बोळ त्यांच्या टोकाशी असलेल्या खोल्या , त्यात वटवाघुळांचा वावर असल्यामुळे येणारा दर्प, पंखांच्या फ़डफ़डण्याचे आवाज यामुळे गुढ वातावरण निर्माण होते. त्यातल्या दोन खोल्यात नेऊन गाईडने तळघरात जाणारा जीना दाखवला आणि "यहा दस हजार के उपर लोक आज तक मरे है" अस सांगितले . एकावेळी एक माणुस आत जायची  मारामारी असलेल्या अरुंद जीन्याने तळघरात जाऊन तिथे "दस हजार लोग मरे है" म्हटल्यावर आम्हाला हसू आवरेना. राजवाड्याच्या सज्जातून किल्ल्याचा परिसर, टेहळणीची चौकी , मागचा डोंगर आणि भानगड गाव दिसत होते.

Bhangarh Fort
तळघर, भानगढ

 किल्ल्यात फ़िरायला येणारे पर्यटक इथे पर्यंत येतात आणि परत जातात . आम्हाला बाहेरच्या तटबंदीत असलेले तीन दरवाजे आणि दोन मंदिर पण पाहायची होती. त्यासाठी वेगळा चार्ज लागेल असे गाईडने सांगितल्यावर त्याचा निरोप घेतला. जाण्यापूर्वी त्याने एक भूतकथा आम्हाला सांगितलीच. शुटिंगच्या युनिट बरोबर आलेल्या कलाकारांपैकी एक कलाकार एकटाच तिथे गेला तो मेला त्याच्या भूताने तिथे नंतर गेलेल्या एका माणसाला पछाडल, तो म्हणायला लागला "मै शहारुख हू, मै सलमान हू" कारण काय तर, त्याची अभिनेता बनण्याची इच्छा अपूर्ण राहीली. मग त्याला राजवाड्यात आणण्यात आले . तिथे भूत उतरवल. आजही राजवाड्यात भूत उतरवल जात . त्यामुळे तुम्ही तिथे जाऊ नका, असे निक्षुन सांगितले.

Bhangarh Fort
सोमनाथ मंदिर, भानगढ

सह्याद्रीत वेळी अवेळी फ़िरण्याची सवय असल्याने आम्ही केशवराय मंदिराकडे निघालो, पायवाट व्यवस्थित होती. आजूबाजूला गुढघ्या एवढी वाढलेली खुरटी झुडप होती. लख्ख उन पडलेल होत. त्यामुळे भूतांसाठी एकदम "अयोग्य" वातावरण होत.  हे मंदिरही नागरशैलीतील आहे. मंदिरात मुर्ती नव्हती. पुढे तटबंदीतल्या लाहोरी प्रवेशव्दाराजवळ पोहोचलो. त्या प्रवेशव्दाराच्या नावाचा आणि लाहोरचा संबंध नसून लोहाराशी संबंध आहे. याठिकाणी लोहारांची वस्ती असावी. उन खूप असल्याने एका झाडाखाली पाणी प्यायला बसलो. बाजूला एका वडाच्या झाडाखाली माकडांची एक टोळी बसली होती. अचानक त्यांच्या म्होरक्याने " खॅक " असा आवाज काढून इतरांना इशारा दिला आणि सगळी माकड सरसर झाडावर चढली.  त्याचवेळी राजवाड्यातून  झांजांचा आवाज आणि धूर यायला लागला . " माकडाला हजारो आत्म्यांपैकी एखादा आत्मा दिसला की काय ’? गाईडने सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम असेल आम्ही दोघे ताडकन जागेवरुन उठलो . उठल्यावर दिसले, झुडपातून एक कुत्रा तोंडात टिटवी घेऊन पळत आमच्या दिशेने येत होता. माकडाने ते आधीच पाहिल्यामुळे त्याने आपल्या कळपाला सावध केले होते. किल्ल्यात आल्या पासून अंगावर काही क्षणांपुरते रोमांच आणणारा हा एकच प्रसंग होता ....आणि तो ही भूतावीना. 

या जागा खरच झपाटलेल्या असतात की, आपल्याला आधीच मिळालेल्या माहितीमुळे आपणच झपाटलेलो असतो.

Bhangarh Fort
राजवाड्यातून भानगढ

फ़ुलवारी आणि दिल्ली पोल पाहून किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी आलो , आमचा गाईड तिथेच बसला होता. त्याला झांजांच्या आवाजा बद्दल विचारल, तो म्हणाला काही वेळापूर्वी भूत उतरवण्यासाठी एकाला घेऊन लोक आली आहेत. त्यांचा आवाज आहे. किल्ला पूरातत्व खात्याच्या ताब्यात असताना, एवढे पहारेकरी व बंदोबस्त असताना किल्ल्यात भूत उतरवण्याचे प्रकार असे राजरोस पणे चालत असतील तर किल्ला भूताच्या विळख्यातून कधीच सुटणार नाही.

किल्ला फ़िरुन झाला होता. भूक लागली होती गावात हॉटेलची चौकशी करण्यासाठी एके ठिकाणी थांबलो. तिथे काही बुजूर्ग लोक पण बसलेले होते. कुठून आलात वगैरे चौकशी झाली. मी भूताचा विषय न काढता त्यांना विचारल तुम्ही रात्री किल्ल्यात जाता का ? ते बोलले गावातल्या लोकांना जावच लागत. त्यांची गुर ढोर तिथे चरायला जातात एखाद चुकल आणि संध्याकाळी परत आल नाही तर काय, दुसर्‍या दिवशी पर्यंत वाट बघणार ? आम्ही रात्रीच जाऊन शोधून आणतो. हे उत्तर मिळाल्यावर अजून काही विचारण्याची गरज पडली नाही. 

सोमनाथ मंदिर, भानगढ
पाण्याचे कुंड, भानगढ

किल्ला पाहिल्यावर अस म्हणता येईल की ,तो ओस पडण्याचे एक कारण पाणी हे असू शकते. या भागात पाऊस तसाही कमीच पडतो. त्यात या किल्ल्यावर पाणी साठवण्यासाठी जागो जागी सोय केलेली मला तरी दिसली नाही. किल्ल्याच्या आत राहाणार्‍या लोकांना पाण्याचा तुटवडा भासू लागल्यामुळे त्यांनी स्थलांतर केले असावे.  अकबरालाही त्याने वसवलेली नवीन राजधानी फ़त्तेपूर सिक्री ही पाण्याच्या तुटवड्यामुळे सोडून पुन्हा आग्र्य़ाला परतावे लागले होते. 

भानगढ किल्ल्याच्या भोवती असलेल्या भूतकथा सोडल्या तर किल्ला खरच सुंदर आणि एकदा तरी जाऊन पाहाण्यासारखा नक्कीच आहे.   


Bhangarh Fort , Rajasthan

जाण्यासाठी :- 

भानगढ किल्ल्यावर जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट जयपुर येथे आहे. जयपुर ते भानगढ हे अंतर  ८५ किलोमीटर आहे.  याभागात  बसेस कमी आणि अनियमित चालत असल्यामुळे खाजगी गाडी करून जावे.

जयपूर - भानगड - अजबगड - टेहलागड  - निळकंठ महादेव मंदिर - राजुरी फोर्ट हे पाहून एका दिवसात जयपूरला परत जाता येईल.

आम्ही हे सर्व पाहून दोन दिवस "सरीस्का व्याघ्र प्रकल्पा" जवळ मुक्काम केला होता. परतीच्या प्रवासात "विराट नगर"   (विराट नगरवर वेगळा ब्लॉग लिहिला आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे )  पाहून जयपुर गाठले होते .

Bhangarh Fort

Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5 

महाभारतातील विराट नगर ( Virat Nagar , the Ancient city in Mahabharat ) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.


स्वराज्याची तिसरी राजधानी :- जिंजी Ginjee Fort (Rajagiri, Krishnagiri, Chandrayan Durg) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.






68 comments:

  1. Informative post…. Also all fear abolished of so called Haunted place…. Thanks a lot dear !

    ReplyDelete
  2. हा लेख वाचून भानगड किल्ल्याविषयीचे मनात असलेले गैरसमज दूर झाले . ओघवत्या लेखनशैली मुळे आंम्ही स्वतःच तिथे असल्याचा अनुभव आला. बऱ्याच न्यूज चॅनेल्स नि त्या परिसरात रात्री राहणे धोकादायक आहे आणि तिथे अदृश्य शक्तींचा वावर आहे वगैरे गोष्टी दाखवल्या होत्या पण आज तिथे असे काहीही नाही हा समज लेखकाच्या स्वानुभवामुळे पक्का झाला. अजून नवीन लेखांची प्रतीक्षा आणि खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  3. Really detail information shared with pics,haunted story was thrilling

    ReplyDelete
  4. Very Nice information sir .

    ReplyDelete
  5. Very detailed explaination giving minute details of everything. Helps clear lot of misunderstandings. Thank you

    ReplyDelete
  6. Horror movies cha feel aala

    ReplyDelete
  7. Khupch sunder mahiti...kharach jaun alyasarkh vatal...Rajasthan trip chya veli nkki bhet dein blog chi madam gheun..Mast lekh

    ReplyDelete
  8. मला वाटले तुझा व भुताचा सामना वाचायला मिळेल पण जाउदे पुढ्व्हा वेळी आपण रात्री जाऊया म्हणजे भुतानाही कळेल की त्यांच्यापेक्षा बहाद्दर जमत या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे खुप छान लिहले आहेस प्रत्यक्ष जाऊन आल्यासारखे वाटले

    ReplyDelete
  9. खूप छान व उपयुक्त अशी माहिती पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  10. खुप सुंदर माहिती

    ReplyDelete
  11. मस्त लेख आहे. आवडला. माहितीपूर्ण आणि रोचक.

    ReplyDelete
  12. खुप सुंदर लेखणी....

    ReplyDelete
  13. मस्त,👍. राजस्थानात haunted tourism हा एक प्रस्थापित उद्योग आहे असेच वाटते. तेथील Jhalawar fort (झालावार) बद्दल सुध्दा अशाच अतिरंजित गोष्टी सांगितल्या जातात. At times, it is said that it's even more dangerous than Bhangarh.

    ReplyDelete
  14. अमित नेहमी प्रमाणे सुंदर सुरेख आणि माहितीपूर्ण लेख.तुम्ही जयपूर ला पोहोचले तेव्हाच भानगढ च्या भुतांना खबर मिळाली मग त्यांची कुठे ऐवढी हिम्मत कि आमच्या डोंगरभाऊ समोर येणार

    ReplyDelete
  15. खूप छान आणि सविस्तर माहिती सदर ब्लॉग मध्ये केले आहे. भुताचा किल्ला हे स्थानिक लोकांचे पारंपरिक दंतकथा सांगुन आजपर्यंत जतन केला व. हे सुध्दा काही कमी नाही.
    असो एकंदरीत धान माहितीपूर्ण लेख आहे

    ReplyDelete
  16. Very informative post written in very simple yet interesting manner.

    ReplyDelete
  17. दंतकथा, इतिहास आणि प्रत्यक्ष किल्ला वर्णन असा सहज बहाव लेखाला आला आहे. भयकथांमागिल तार्किक कारणमीमांसाही पटेल अशी! भानगढबद्दल वाचलेल्या अनेक वर्णनात सर्वात Authentic one असे ह्या लेखाबद्दल म्हणता येईल.

    ReplyDelete
  18. खूपच छान आणि विस्तृत माहिती दिली सर. आजपर्यंत मी या किल्ल्याचे अनेक व्हिडिओ बघितले पण सगळे फक्त भुताटकी ने भरलेले होते. एवढी सविस्तर माहिती पहिल्यांदा भेटली.
    धन्यवाद

    ReplyDelete
  19. खूपच छान माहिती.

    ReplyDelete
  20. Very informative,Amit

    ReplyDelete
  21. नरेंद्र बाळकृष्ण कुलकर्णीNovember 13, 2022 at 3:39 AM

    अमित लेख हा माहितीपूर्ण तर आहेच पण त्याचबरोबर जे फोटो आहेत ते सुद्धा खूप छान आणि बोलके आहेत. एक फोटो सुद्धा बरेच काही सांगून जातो आणि लेखाला पूर्णत्व येते. त्याच बरोबर तुझी मेहनत आणि सुक्ष्म निरीक्षण यामुळे लेखन खूप उत्तम झाले आहे.
    खूप धन्यवाद . यापुढे ही आम्हाला असंच वाचायला मिळेल अशी खात्री आहे.

    नमस्कार

    ReplyDelete
  22. खूप छान माहिती व अंधश्रद्धा/गैरसमज दूर करणारा लेख!

    ReplyDelete
  23. खूपच छान माहिती

    ReplyDelete
  24. अमित खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  25. गोविंदा पिसे, गोरेगांव,मुंबईNovember 13, 2022 at 5:02 AM

    भानगडाची सुंदर ऐतिहासिक माहिती खूपच मस्त मनोरंजक लिहली आहे.स्थळाचे शेअर केलेले फोटो पण छान आहेत. बहुतेक अश्या ठिकाणी गावकरी भूत प्रेत या विषयी अधिक बोलताना आढळतात.तुम्हाला ते जाऊ नका असेच सांगतात.इथे ओसाड,जीर्ण अवशेष असलेल्या वस्तूंचे भग्न अवशेष यामुळेसुधा वातावरण भयावह वाटू शकते.
    आपले अतिशय सुंदर आणि सहज रित्या लिखाण करण्याची शैली आवडली.
    पुन्हा एकदा आपणा दोहोंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक सदिच्छा.

    ReplyDelete
  26. राजा महाशब्देNovember 13, 2022 at 5:27 AM

    चांगली अभ्यासपूर्ण माहिती....

    ReplyDelete
  27. ऐतिहासिक वास्तूबद्दल असलेले गैरसमज दूर करून
    भानगढ किल्ल्याबद्दल वास्तव मांडण्याचा प्रयत्न अप्रतिम ! लेखनशैली मुळे प्रत्यक्षात भानगढ किल्ल्याला भेट दिल्याचा भास झाला. अभिनंदन व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

    ReplyDelete
  28. छान लेख अमित

    ReplyDelete
  29. विजय पारकरNovember 13, 2022 at 7:16 AM

    लेख आवड़ला, आम्ही पन राजस्थान ट्रिप मधे कुलधारा गाव बघायला गेलो होतो. ते hounted विलेज आहे. गावात रात्री कोणच राहत नाही. गाइड बरयाच दंतकथा sangato

    ReplyDelete
  30. छान माहिती

    ReplyDelete
  31. Interesting Information..

    ReplyDelete
  32. खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण लेख

    ReplyDelete
  33. खूप चांगली माहिती, छान फोटो, भुताटकी च्या भानगडीवरच्या टिपणी तार्किक, नेहमीप्रमाणे उ त्त म

    ReplyDelete
  34. Wowwwwww..... मज्जा आली वाचून..

    ReplyDelete
  35. किल्ल्याचा परिसर, त्याचा इतिहास याबद्दल अगदी सविस्तर लिहिलयस तू..मस्तच..

    ReplyDelete
  36. सुंदर, अभ्यासपूर्ण माहिती.

    ReplyDelete
  37. नेहेमीप्रमाणेच माहितीपूर्ण पोस्ट. 'भारतातला सगळ्यात पछाडलेला किल्ला' एवढंच भानगढविषयी ऐकलेलं होतं. तेवढ्यासाठी ही 'भानगड' बघायला जाण्याची काहीच शक्यता नव्हती. 😁 पण किल्ला म्हणूनही बघण्यासारखा आहे हे वाचून उत्सुकता जागी झाली.

    ReplyDelete
  38. खूप छान माहिती

    ReplyDelete
  39. खूप सुंदर 👌👌

    ReplyDelete
  40. अतिशय अभ्यासपूर्ण लेख!
    गाईडच्या ट्रॅपमधे न सापडता अशी माहीती संकलन करण्यासाठी खूप अभ्यास, धाडस, इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा लागतो. अमितकडे हे सर्व आहे, म्हणूनच असे प्रकल्प तो राबवू शकतो.

    खरचं, मनःपूर्वक अभिनंदन.

    असेच नाविन्यपूर्ण लेख वाचावयास मिळत.
    धन्यवाद!

    ReplyDelete
  41. खूप छान दादा तुझ्या मुळे घर बसल्या काही किल्ल्यांची सफर होते आणि इतिहास माहिती पडतो 👌👍 खूप छान

    ReplyDelete
  42. श्रीनाथ कुलकर्णीNovember 14, 2022 at 5:56 AM

    इतकं छान लिहिले आहेस की वाटते लिहिताना तू पण "पछाडलेला" असावास. गड किल्ले पहणाऱ्यांसाठी खूप छान माहिती.

    ReplyDelete
  43. सुंदर लेख आवडला आपल्याला

    ReplyDelete
  44. Super. Looking for next

    ReplyDelete
  45. Nice fort.👌Nice description....Place initially did look a bit Haunted while seeing the photos of the fort...

    ReplyDelete
  46. Mast lihilayas..mage mi jaipur la gelo hoto Teva ..hech sangnyat aale hote ki ..waha pe raat ko koi nahi rehta...

    ReplyDelete
  47. मस्त वर्णन

    ReplyDelete
  48. खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण लेख,
    Keep it up

    ReplyDelete
  49. श्री अमितभाऊ, जीवनात एका विशिष्ठ ध्येयाने पछाडलेला कर्मयोगीच सामान्यांना कठीणतम भासणारी अचाट कर्मे करत असतो. आपण त्या ध्येय वेडया व्यक्तीमत्वात निश्चितच फार मानाचे स्थान निर्माण केले आहे. त्या बद्दल आपले त्रिवार अभिनंदन!! सह्यखोऱ्यात रात्री -बेरात्री, ऊन-पावसाची तमा न बाळगता भटकंती करणाऱ्या आपल्या सारख्या निडर,जिद्दी भटकंत्याला भानगड सारख्या haunted किल्ल्याने न बोलाविले तरच नवल! या भुताटकीच्या प्रकाराचा आपण जो पर्दाफाश केला आहे त्याला तोड नाही.
    ब्लॉग खूप छान लिहिला आहे अगदी बारीक सारीक तपशिलासह!!
    फोटो सुद्धा मस्तच, खूपच बोलके,
    आपली ध्येय मार्गावरील वाटचाल निरंतर चालत राहो,आपल्याला निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना!
    आपल्याबरोबर अभ्यासपूर्ण ट्रेक करायचा मानस आहे, ज्या योगे आमच्याही जीवनाला काही तरी
    अर्थ लाभेल,
    राजेंद्र सुधाकर वैशंपायन
    कर्जत

    ReplyDelete
  50. पक्व लेखकाचे परिपूर्ण पर्यटन.

    ReplyDelete
  51. तुमच्या लेखन शैलीचे वैशिष्ट म्हणजे वाचक स्वतः
    तेथे वावरत असल्यासारखी प्रचिती येते. बाकी गाईडही तुम्हाला "भानगडबाज" मिळाला. बऱ्याच
    ठिकाणचे गाईड हे किल्ल्याच्या स्थापत्या बद्दल न
    बोलता दंतकथाच सांगत असतात हा माझा अनुभव आहे. कदाचित त्याबद्दलचे योग्य शिक्षण
    त्यांनी घेतलेच नसते, मग असे थातूर मातूर सांगून
    वेळ मारून नेतात. बाकी तुमच्या कडून भानगडचे
    नीट आकलन झाले. पुढील लेख वाचण्याची उत्सुकता!
    रामनाथ रघुनाथ आंबेरकर

    ReplyDelete
  52. मस्त दादा..मज्जा आली वाचून .. बसल्याजागी अनुभवला..
    - Aarti Dugal

    ReplyDelete
  53. खूप छान.. मस्त.. अभ्यासपूर्ण लिखाण..किल्यावरील वास्तूंबाद्दल सविस्तर माहिती आणि इतिहास नव्याने समजला.. मी हा किल्ला पूर्वी पाहिला, त्याच्या आठवणी म्हणजे खूप जुनी मोठ्ठाल्ली वडाची झाडें, मोठ्ठा परिसर,गडावरील पडक्या इमारती, जीने, तटबंदी आणि भुताटकीच्या कथा.. आता सर्व वाचून असें वाटतेय हा किल्ला परत पाहायला हवा..

    ReplyDelete
  54. . सुंदर माहिती आहे...

    ReplyDelete
  55. अप्रतिम वर्णन गडकिल्ले यांना भेट देणाऱ्यांसाठी अतिउत्तम आणि मार्गदर्शक लेख आहे

    ReplyDelete
  56. सुंदर माहिती. हा रहस्यमय गड बघण्याची इच्छा आहे. दिलेली माहिती उपयुक्त ठरेल

    ReplyDelete
  57. Very nicely written.. Liked analysis of the situation and stories.

    ReplyDelete
  58. खूप छान सर माहिती दिले ..धन्यवाद 👏

    ReplyDelete
  59. नेहमीप्रमाणे उत्तम माहितीपूर्ण ब्लॉग आणि त्याला साजेसे फोटो 👌👍

    ReplyDelete
  60. माहितीपूर्ण लेख. भानगडच्या भानगडीची पोलखोल. त्यांना सह्याद्रीत आणून घाबरवण्याची कल्पना फारच आवडली. मला वाटते जयपूरला पर्यटनाला जाणारे इकडेच जास्त जाणार. लोकांना याचीच (घाबरण्याची) मजा वाटते. मजा आहे या डार्क टुरिझमवाल्यांची. डोंगरभाऊ स्वत: इंजिनिअर असल्यामुळे त्यांनी याची चिरफाड केली हे उत्तम. शेवटी प्रॅक्टिकली केलेली चाचणी (गावकरी आणि हरवलेली गुरे ) उत्तम. पुन्हा एकदा सायंटिफिक माहितीपूर्ण लेखाबद्द्ल धन्यवाद.

    ReplyDelete
  61. Khup chan mahiti ahe sir thank you

    ReplyDelete