Saturday, August 24, 2019

स्वस्तात मस्त सफ़र बुडापेस्टची भाग- १ (Budapest in two days)



Pest Side view from Buda Side , Budapest
मध्यपूर्व युरोपातील हंगेरी, स्लोव्हाकिया आणि ऑस्ट्रीया हे तीन देश फिरायचे ठरल्यावर सर्वप्रथम अनेक वेबसाईट, ब्लॉगज वाचून, गुगल मॅपचा आधार घेऊन नेहमीची प्रसिध्द ठिकाणे आणि काही ऑफ़बीट ठिकाणे पहाण्यासाठी प्लान बनवला. मग विमानाची तिकीटे बुक करुन टाकली. सहा महिने आधी तिकिटे काढल्यामुळे स्वस्तात मिळाली. 

एअर फ्रांसच्या विमानाने पॅरीसला उतरलो. पॅरीसहून बुडापेस्टला जाणारे विमान १ तासाने होते. युरोप मधील २७ देशांसाठी एकच व्हिसा (Shengen Visa) काढावा लागतो. त्यासाठी जगभर VSF Center या संस्थेची नियुक्ती केलेली आहे. ती संस्था तुमच्याकडून सर्व कागदपत्रे आणि पासपोर्ट घेउन तुम्ही जाणार त्या देशाच्या दुतावासाला (Embassy) पाठवतात. शेंगेन व्हिसाच्या नियमांनुसार तुम्ही  ज्या देशात जास्त दिवस राहाणार त्या देशाच्या दुतावासाला व्हिसासाठी (Shengen Visa) अर्ज करावा लागतो. आमचा मुक्काम ऑस्ट्रीयात पाच दिवस असल्याने आम्ही ऑस्ट्रीयाच्या दूतावासाला अर्ज केला होता. पण आम्ही युरोपात हंगेरीत प्रवेश करणार होतो. त्यामुळे हंगेरीत इमिग्रेशन होइल असे आम्ही गृहीत धरले होते. झाले वेगळेच युरोपात उतरल्यामुळे पॅरिसलाच आम्हाला इमिग्रेशन करावे लागले . पॅरीसच्या विमानतळावरील गर्दीमुळे अर्धातास गेला. पुढच्या विमानाला केवळ १५ मिनिटे उरली होती. मग अवाढव्य पसरलेल्या विमानतळावर सकाळी सकाळी जॉगिंग करत धापा टाकत विमानात पोहोचलो. आम्हाला घेतल्यावर विमानाचे दार बंद झाले. हंगेरीत उतरलो एअर फ्रांसची कनेक्टेड फ्लाईटस असूनही आमच सामान आले नव्हते. त्याचा तक्रार अर्ज दिला. हंगेरीत युरो चालतात, पण स्थानिक करंसी हंगेरियन फोरींट (Hungerian forint (HUF)) आहे, ती जवळ असली की सर्व व्यवहार सुरळीत होतात, वस्तू स्वस्तात मिळतात. हंगेरीत फ़िरतांना सर्वत्र वस्तूंचे, तिकिटांचे, खाण्याच्या पदार्थांचे दर इत्यादी हंगेरियन फोरींट मध्ये लिहिलेले असतात. त्यामुळे स्थानिक करंसी जवळ असली की युरोचे हंगेरियन फोरींट करण्यासाठी आकडेमोड करत बसावी लागत नाही.  विमानतळावर चक्क भारतीय रुपये देउन स्थानिक करंसी विकत घेतली. (०.२४ रुपये = १ HUF जुलै २०१९ चा भाव)   

Hungarian Currency (HUF)


100 E & 200 E Bus to Pest from Budapest Air port 

विमानतळापासून शहर २३ किलोमीटरवर आहे . शहरात जाण्यासाठी टॅक्सी, बस आणि ट्रेन असे पर्याय आहेत . टॅक्सी आणि बस विमानतळा बाहेरच मिळतात. 100E आणि 200 E आणि या बस शहरात वेगवेगळ्या मार्गाने जातात. या बसचे तिकीट काढण्यासाठी स्टॉपजवळच तिकीट व्हेंडींग मशिन आहे . त्यात क्रेडीट / डेबिट कार्ड किंवा पैसे टाकून तिकिट  काढता येते. आम्ही बसने ३० मिनिटात पेस्ट मधल्या ॲस्टोरीया या भागात पोहोचलो. येथून चालत १० मिनिटावर Air BNB ची आमची अपार्टमेंट असलेल्या बिल्डींगपाशी पोहोचलो. इथे प्रत्येक बिल्डींगला अवाढव्य दार असते आणि ते इलेक्ट्रॉनिकली लॉक होते . तुमच्याकडे पासवर्ड किंवा चावी असेल तरच उघडू शकता . आम्ही तिथे असलेल्या डोअर फोनवरून आमच्या होस्टला फोन केला . ती लगबगीने खाली आलीआमचे स्वागत करुन ती एक मिनिटात येते सांगून गेली आणि एक हंगेरियन वाईनची बॉटल घेउन आली. आम्हाला सर्व सूचना देउन गायब झाली ती पुन्हा भेटली नाही . (इथे अपार्टमेंट सोडताना चावी लेटर बॉक्स मध्ये टाकून जायची असते.) आम्ही  राहात होतो या भागातल्या इमारती रशियन राजवटीच्या काळात बांधलेल्या असाव्यात. इमारतीतली लिफ्ट बाबा आजमच्या जमान्यातली होती. त्यातून प्रवास करण्यात वेगळच थ्रील होते .

आवरुन लगेच फिरायला बाहेर पडलो. अस्टोरिया चौकात ऱेड बस, बिग बस इत्यादी केवळ पर्यटकांसाठी असलेल्या "हॉप इन हॉप ऑफ" बसचे एजंट हाका मारुन बोलवत होते. बस मधून फिरण्यासाठी २४ तास, ३६ तास, ७२ तास असे पास मिळतात . बुडा आणि पेस्ट ही दोन ठिकाणे व्यवस्थित पाहायला दोन दिवस पूरतात. त्यामुळे आम्ही ४८ तासाचा पास काढला. या पासवर अनेक म्युझियम्स मधे एंट्री फ़्री असते, रेस्टॉरंट, बोटींग, हमामखाने (Baths) याठिकाणी ५ ते १० % डिस्काऊंट असते. सोबत पर्यटनस्थळांचा नकाशा आणि माहिती दिली होती .

Hop in Hop Out bud, Budapest

बुडापेस्ट शहराच्या मधून डॅन्यूब नदी वाहाते . या नदीने या शहराचे दोन भाग केलेले आहेत . नदीच्या एका किनाऱ्यावर बुडा वसलेले आहे तर दुसऱ्या किनाऱ्यावर पेस्ट वसलेले आहे . डॅन्यूब नदी ही युरोपातील महत्वाची नदी . जर्मनीत उगम पावून २८५० किलोमीटरचा प्रवास करुन ही नदी काळ्या समुद्राला जाऊन मिळते . आजपर्यंत अनेक संस्कृती या नदीच्या काठी नांदलेल्या आहेत त्यातलीच एक  आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेली रोमन संस्कृतीही या नदीच्या काठाने फोफावली . आजच्या घडीला व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) , ब्राटीस्लावा (स्लोव्हाकिया) , बुडापेस्ट (हंगेरी) , बेलग्रेड (सर्बिया) या देशांच्या राजधान्या या नदीच्या काठी वसलेल्या आहेत .

बुडापेस्टच्या बुडा भागात किल्ले आणि गरम पाण्याचे झरे , हमामखाने आहेत . तर पेस्ट भागात पार्लमेंट हाउस , हिरो स्क्वेअर, सिनेगॉग , रुइन बार इत्यादी महत्वाची ठिकाणे आहेत .

आम्ही पेस्ट भागात राहात असल्याने आज पेस्ट फिरायचे ठरवले . पेस्ट असे लिहिलेल्या बस मध्ये चढलो . बस मध्ये चढल्यावर पास व्हॅलिडेट केला, त्या वेळेपासून पुढचे २४ , ४८ , ७२ तास, जसा पास असेल त्याप्रमाणे आपल्याला बस मधून प्रवास करता येतो. बसमध्ये एक इअर फोन दिला जातो . तो आपल्या सीटच्या बाजूच्या सॉकेट मध्ये लावल्यावर आपल्याला बस जात असलेल्या परिसराची आणि पर्यटनस्थळाची माहिती दिली जाते. या दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर छत नसते . त्यामुळे समोरचा आणि आजूबाजूचा परिसर व्यवस्थित पाहाता येतो.

 Hero Square (Hősök tere) (Millennium Monument )


1)    Hero Square  

हिरो स्क्वेअर या भव्य चौकात आठव्या - नवव्या शतकात हंगेरीत असलेल्या सात टोळ्यांच्या प्रमुखांचे (Seven chieftains of the Magyars) भव्य पुतळे आहेत. टोळ्यांचे पारांपारीक वेष, शिरस्त्राण, हत्यारे घेतलेले हे पुतळे शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेत. प्रत्येक पुतळ्या खाली त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा प्रसंग चित्रीत केलेले पॅनल आहे. या ठिकाणी हौतात्म्य पत्करलेल्या  सैंनिकांचे स्मारक "हिरो स्टोन " आहे. अठराव्या शतकात बनवलेल्या या स्मारकाला "मिलेनियम स्मारक" या नावानेही ओळखले जाते.

Museum of Fine Arts


2)  Museum of Fine Arts
या चौकाच्या एका बाजूला फ़ाईन आर्ट म्युझियम आणि दुसर्‍या बाजूला पॅलेस ऑफ़ आर्ट आहे.  फ़ाईन आर्ट म्युझियम (Museum of Fine Arts) पाहाण्यासारखे आहे. हे म्युझियम पाहाण्यासाठी वेगळे तिकिट काढावे लागते. म्युझियम पाहून हिरो स्क्वेअरच्या मागच्या बाजूला गेल्यावर सिटी पार्क आहे. पार्क मध्ये बोटॉनिकल गार्डन, प्राणी संग्रहालय, तलाव आणि अनेक रेस्टॉरंट आहेत. शनिवार रविवार या ठिकाणी स्थानिकांची गर्दी असते.

Vajdahunyad Castle, Budapest

Anonymvs, Vajdahunyad Castle, Budapest

Vajdahunyad Castle, Budapest
3)  Vajdahunyad Castle & City Park

सिटी पार्क मध्ये वाज्दाहुन्याड (Vajdahunyad Castle)  कॅसल आहे. या कॅसलच्या तटबंदीला लागून तलाव आहे. तलावात बोटींग करता येते. या तलावातले पाणी किल्ल्या भोवतीच्या खंदकात फ़िरवलेले आहे. किल्ल्याच्या भव्य प्रवेशव्दारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला एक ४० मीटर उंच टॉवर आहे. त्यावर जाऊन आजूबाजूचे दृश्य पाहाण्यासाठी ६०० HUF  भरावे लागतात. किल्ल्यातील महालाचे म्युझियम मध्ये रुपांतर करण्यात आलेले आहे. या शिवाय किल्ल्यात एक चर्च आणि दोन सुंदर पुतळे आहेत. त्यातील  Anonymvs हा एका लेखकाचा पुतळा पाहाण्या सारखा आहे.

Széchenyi Thermal Bath, Budapest . PC szechenyispabaths.com
4)  Széchenyi Thermal Bath

सिटी पार्क जवळच Széchenyi Thermal Bath हा युरोपातील सर्वात मोठा हमामखाना आहे. या ठिकाणी पर्यटकांची भरपूर गर्दी असते. http://szechenyispabaths.com या साईटवर जाऊन सशुक्ल तुम्ही वेळ बुक करु शकता. या शिवाय बुडापेस्ट मध्ये अनेक हमामखाने आहेत http://www.bathsbudapest.com या साईटवर त्यांची माहिती, रेट, पॅकेजेस आणि वेळा मिळतात. यात रुडास सारखा सगळ्यात जूना हमामखाना आहे. बुडापेस्ट पासवर लुकास बाथ मध्ये फ़्री एंट्री आहे. दुसर्‍या दिवशी आम्ही त्याचा अनुभव घेणार होतो. त्यामुळे पुन्हा हिरो स्क्वेअर जवळील बस स्टॉपवर येऊन बस पकडली. 

Hungarian parliament building from Buda side

Hungarian parliament building

5)  Hungarian parliament building & Shoes on Denube

पुढचे ठिकाण होते. हंगेरीयन पार्लमेंट. या ठिकाणे बस जात जात नाही त्यामुळे जवळच्या स्टॉपवर उतरुन चालत पार्लमेंच्या भव्य इमारतीपाशी पोहोचलो. १९०२ मध्ये बांधलेली गॉथिक शैलीतली ही भव्य इमारत डॅन्यूब नदीच्या काठी आहे. सिक्युरीटीचा जाच नसल्यामुळे ही इमारत जवळून व्यवस्थित पाहाता येते. पार्लमेंट आतून पाहाण्यासाठी गाईडेड टूर्स आहेत. त्यासाठी ऑनलाईन बुकीग करावे लागते.  


Shoes on Danube, Budapest

पार्लमेंट पासून ५ मिनिटाच्या अंतरावर हे आगळेवेगळे स्मारक आहे . या ठिकाणी ३० बुटांच्या जोड्या नदीच्या काठावर ठेवलेल्या आहेत . ब्रॉंझ मध्ये बनवलेले हे स्त्री, पुरुषांचे , मुलांचे बूट वेगवेगळ्या मापाचे , डिझाईनचे आहेत. या बूटांच्या जोड्यांच्या मागे काळा इतिहास आहे. (यावर वेगळा ब्लॉग, "डॅन्यूब संथ वाहातेच आहेलिहिलेला आहे, https://samantfort.blogspot.com/2019/07/blog-post.html ब्लॉग वाचण्याकरिता लिंकवर टिचकी मारा). येथुनच डेन्यूब सफ़रीसाठी बोटी सुटतात. यातील डिनर क्रूझ प्रसिध्द आहेत. या भव्य बोटींवर फ़क्त डिनर, डिनर आणि ५ स्थानिक वाईन्स, डिनर आणि ५ स्थानिक बियर इत्यादी अनेक पॅकेजेस असतात. त्यांचे बुकींग ऑनलाईन करता येते. या एक तासाच्या सफ़ारीत जेवणाचा आस्वाद घेता घेता डेन्यूबच्या काठी असलेल्या सगळ्या मोठ्या इमारती, किल्ले पाहायला मिळतात.

Dohany street synagogue

Dohany street synagogue

Dohany street synagogue

Dohany street synagogue
Holocaust tree of life memorial, Budapest

Holocaust tree of life memorial, Budapest

6)  Dohany street synagogue
आमचा पुढचा स्टॉप होता डोहानी स्ट्रीट सिनेगॉग. हे जगातले दुसर्‍या क्रमांचे सर्वात मोठे ज्यूंचे प्राथना स्थळ आहे. १८५४-५९ मध्ये इस्लामिक आणि गॉथिक स्थापत्य शैलीच्या मिश्रणातून हे सिनेगॉग बांधण्यात आले. या सिनेगॉगच्या दोन्ही बाजूस दोन ४३ मीटर उंचीचे मिनार आहेत,. त्यावर घुमट आहेत. या सिनेगॉग कॉम्प्लेक्स मध्ये प्रार्थना स्थळ, ज्युईश म्युझियम, ज्युईश सिमेट्री आणि हिरो टेंपल यांचा समावेश आहे. तिकिट काढून सिनगॉग मध्ये शिरल्यावर ज्युईश पध्दतीची टोपी घालावी लागते. याठिकाणी सर्व भाषेतील गाईडेड टूर्स आहेत. आमच्या ईंग्रजी गाईडने सिनेगॉग आणि परिसराची उत्तम माहिती दिली. सिनेगॉगच्या मागच्या प्रांगणात एक स्टीलचे झाड बनवलेले आहे. त्याला "होलोकॉस्ट ट्री ऑफ़ लाईफ़" म्हणतात. त्या झाडाचे प्रत्येक पानावर नाझी अत्याचाराला बळी पडलेल्या ज्यू व्यक्तींची नावे कोरलेली आहेत. सिनेगॉग शनिवारी बंद असते.



Szimpla Kert Ruined Bars, Budapest

7)  Szimpla Kert Ruined Bars.
सिनेगॉग मधुन बाहेर पडल्यावर त्याच रस्त्याने १० मिनिटे चालत जाऊन मुख्य रस्ता सोडून गल्लीत शिरल्यावर दुतर्फ़ा जुन्या इमारती दिसतात. त्यातील एका इमारतीत Szimpla Kert हा प्रसिध्द रुईन पब आहे. हॉलोकास्ट्पूर्वी लाखाच्यावर ज्यू हंगेरीत राहात होते. केवळ ५ महिन्यातच त्यापैकी ८०००० ज्यूंना ॲरो क्रॉस पार्टीने कॉंस्ट्रेशन कॅंप मध्ये पाठवून दिले,  तर १०००० च्यावर लोकांची बुडापेस्ट मध्येच हत्या करण्यात आली. बुडापेस्टच्या ज्यू डिस्ट्रीक्ट मधील या लोकांची राहाती घरे अनेक वर्षे तशीच पडून होती. कुठलीही देखभाल नसल्याने घरांची पडझड झाली होती. अशा प्रकारे मोडकळीस आलेली एक इमारत आणि स्टोव्हची फ़ॅक्टरी पाडून टाकण्याचा निर्णय इसवीसन २००२ मध्ये प्रशासनाने घेतला. त्यावेळी काही ज्यू तरुणांनी एकत्र येऊन ती जागा विकत घेतली आणि त्या ठिकाणी Szimpla Kert हा पहिला रुईन पब चालू केला. बार आणि पबच्या ठराविक साचातल्या सजावटीला आणि नेहमीच्या वातावरणाला छेद देणारा हा पब अल्पावधीतच लोकप्रिय झाला. त्यानंतर त्या भागातील पडक्या इमारतीत अनेक रुईन पब उघडले. देशोदेशीच्या पर्यटकांसाठी हे पब्स आता मुख्य आकर्षण बनलेले आहेत.

Szimpla Kert Ruined Bars, Budapest
संध्याकाळी ४ वाजता हे बार उघडता आणि पहाटे पर्यंत चालू असतात. मुख्य रस्ता सोडून गल्लीत शिरल्यावर दुतर्फ़ा जुन्या इमारती दिसतात. त्यातील एका इमारतीत Szimpla Kert हा प्रसिध्द रुईन बार आहे. इमारतीच्या बोळातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला खोल्या आहेत. पडझड झालेल्या या खोल्यांमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे. खोलीत असलेल्या जुन्या टब मध्ये, कमोडवर बसूनही काही पर्यटक बियरचा आस्वाद घेत होते.  पुढे जातांना बोळातही काही बाकडे मांडून ठेवलेले आहेत. इमारतीच्या मधल्या चौकातील छत कोसळल्यामुळे थेट आभाळाखाली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. लोखंडी जीने लावून वरच्या मजल्यावर जाण्याची आणि बसण्याची सोय केलेली आहे. या ठिकाणी बुडापेस्ट मधील ड्राफ़्ट बियर्स, वाईन्स यांना सर्वात जास्त मागणी असते. त्याबरोबर उत्कृष्ट खाद्यपदार्थही या ठिकाणी मिळतात. रात्र जशी चढत जाते तसा देशोदेशीच्या पर्यटकांनी रुईन बार्स फ़ुलून जातात. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते.

Szimpla Kert Ruined Bars, Budapest

रुईन बार मध्ये लाईव्ह म्युझिक, मुव्ही स्क्रीनिंग, आर्ट गॅलरी, फ़ार्मर्स मार्केट इत्यादी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. Szimpla Kert नंतर या भागात अनेक रुईन बार आणि पब्स सुरु झाले. त्यापैकी प्रत्येक रुईन बारचे आपले वैशिष्य़्य आणि वेगळेपण आहे. डोबोझ हा रुईन बार तिथल्या सात डान्स फ़्लोअरसाठी प्रसिध्द आहे. या बारचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या बारच्या इमारतीच्या मधल्या चौकात असलेले २५० वर्ष वयाचे झाड आहे. हे बुडापेस्ट मधील सगळ्यात जूने झाड आहे. चौकातल्या झाडावर चढणारा लाकडी किंगकॉंग बनवलेला आहे. याशिवाय या रुईन बार मध्ये अनेक काष्ठ शिल्प आहेत. भिंतीवरील ग्राफ़ीटी पाहाण्यासारखी आहे.

दुसर्‍या महायुध्दा नंतर इतर अनेक पूर्व युरोपातील देशांप्रमाणे हंगेरीतही कम्युनिस्ट राजवट होती. कम्युनिस्ट या थीमला वाहीलेला रेड रुईन बार आहे. या बार मध्ये जगभरातल्या कम्युनीस्ट नेत्यांची कॅरीकेचर्स आणि कम्युनीस्ट काळातल्या स्लोगन्सची खिल्ली उडवणारी ग्राफ़ीटी येथे पाहायला मिळते. रॉक आणि मेटल म्युझिक ही इथली खासियत आहे.  

Szimpla Kert Ruined Bars, Budapest
 
या शिवाय अजूनही काही रुईन बार्स याठिकाणी आहेत. बुडापेस्ट मध्ये फ़िरायला गेल्यावर एक संध्याकाळ या रुईन पब्जचे वेगळे वातावरण अनुभवण्यासाठी राखून ठेवली पाहीजे. रुईन बार मधील जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही आमचा पेस्ट मधला पहिला दिवस संपवला.


पहिल्या दिवसाचा खर्च (बुडापेस्ट :- पेस्ट साईड)
राहाण्याचा खर्च :- ४५००/-
विमानतळ ते बुडापेस्ट :- २५०/- (माणशी)
बुडापेस्ट कार्ड (पास) :- १७५०/- (४८ तासासाठी)
दुपारचे जेवण (चिकन, व्हेज पिझा, ड्रिंकस) :- ८५०/- (३ जणांसाठी)
सिनेगॉग एंट्री फ़ी :- ३५०/- (माणशी)
Szimpla Kert रुईन पब (डिनर, ड्रिक्स) :- २५००/- (३ जणांसाठी)




पुढच्या भागात इतिहास, खाद्यसंस्कृती आणि बुडा भागातल्या पर्यटन स्थळांबद्दल वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.. 
https://samantfort.blogspot.com/2019/09/what-where-to-eat-buy-in-budapest.html

Photos by :- Amit & Kaustubh Samant , copyright

#howtoplanbudgettriptobudapest#budapest#szimplaKert#ruinedBars#synagagueinbudapest#heroSquare#hosoktere#millenniummonument#hungery#whattoseeinbudapest#