Thursday, May 18, 2017

कोटातला बालाजी ( Balaji Temple in Fort,Mumbai)



   
  आज बऱ्याच दिवसांनी सीएसटीला उतरलो. पाउस मस्त पडत होता. गरमागरम सांबाराने गळा शेकायचा विचार होता . देशपांडेना घाई असल्याने ते सरळ ऑफीसला गेले. मी आपल्या नेहमीच्या गर्दीच्या बोराबाजार स्ट्रीटने चालायला सुरुवात केली . उजव्या बाजुला पंचम पुरीवाला आहे. त्या गल्लीत सहज लक्ष गेल. तिथे एक मंदिर आणि त्यासमोर चारा घेउन बसलेली गायवाली अस नेहमीच दृश्य होते . मंदिरावर व्यंकटेश मंदिर अशी पाटी होती. वाचून पुढे गेलो आणि एकदम मुंबईचे वर्णन हे १८६३ साली गोविंद नारायण  माडगावकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाची आठवण झाली. त्यात कोटातला व्यंकटेश म्हणून एका मंदिराच वर्णन आहे. ते हेच मंदिर आहे का हे पाहाण्यासाठी परत फिरलो. एका एक मजली बसक्या इमारतीच्या तळमजल्यावर मंदिर आहे . पुजाऱ्याशी बोलल्यावर कळल की मंदिर जुनच आहे. (किती ते त्याला माहिती नव्हत)  २००१ मधे नविन मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे . बालाजीच्या पायाशी हनुमान आणि गणपतीची जुनी मुर्ती आहे .

    घरी जाऊन गुगल भाऊना साद घातली आणि रंजक इतिहास समोर आला . इसवीसन १६५० ते १७२८ याकाळात रामजी कामती (हे नाव कामत असाव कारण इंग्रजी कागदपत्रात याच वर्णन पंचा शेणवी ब्राम्हण अस केलेय म्हणजेच जीएसबी गौड सारस्वत ब्राह्मण) हा हरहुन्नरी माणूस ईस्ट इंडीया  कंपनीच्या ताब्यात असलेल्या मुंबई बेटावर राहात होता. व्यापारी , दर्यावदी आणि योध्दा होता. इंग्रजांबरोबर बऱ्याच युध्दात त्याने भाग घेतला होता. त्यामुळे तो इंग्रजांच्या गळ्यातला ताईत होता . सुरतहून १६९० मध्ये मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रातही  कामत यांचा इंग्रजांचा विश्वासार्ह साथीदार म्हणून गौरव केला होता . इंग्रजानी मलबार हिल ही टेकडी  कामतांना वार्षिक १५/- रुपयाने भाडे तत्वावर दिली  होती  . त्यावेळी त्यानी वाळकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानी  केलेल्या दानातूनच कोटात व्यंकटेशाचे मंदिर बांधले गेेले होते.



     या माणसाच्या यशामुळे त्याचे अनेक शत्रूही तयार झाले होते. त्याच शत्रूनी एकत्र येउन खोटी कागदपत्रे तयार केली आणि कामत हे  कान्होजी आंग्रेना मिळालेले आहेतअसे दाखवले. त्यानुसार कामतांवर खटला दाखल करण्यात आला . त्यांच्या वर करण्यात आलेला आरोप सिध्द झाल्यामुळे कामतांची सर्व मालमत्ता जप्त करुन  त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला .

      इसवीसन १७४३ मध्ये ही केस चीफ जस्टीस पुढे पुन्हा आली तेंव्हा कोर्टात सादर केलेली कागदपत्र खोटी असल्याचे समोर आले. त्यामुळे इंग्रजांनी त्याच्या वारसाना रुपये ४०००/- भरपाई आणि ३०/- मासिक पेंशन चालू केले होते. 



       मुंबईच्या न्यायालयीन इतिहासात कामतांच्या केसला महत्व आहे . चुकीच्या पुराव्यामुळे आणि त्यावर घेतलेल्या निर्णामुळे एका निरपराध माणसाला शिक्षा झाली. या केसवर गुगलवर काही पानही आहेत.

तर कोटातल्या व्यंकटेश मंदिरापासून सुरु झालेली ही काहाणी कामतांचा मला माहित नसलेला इतिहास समजल्यामुळे सुफळ संपूर्ण झाली .