Saturday, October 4, 2014

Offbeat Chhattisgarh कुटुमसर गुहा (Kutumsar, Limestone Caves in Chhattisgad)

नोव्हेंबर महिन्यातील थंड सकाळ. छत्तीसगड राज्यातील जगदालपूर पासून ४० किमीवरील कांगेर व्हॅली नॅशनल पार्कच्या गेटवर प्रवेश शुल्क भरण्यासाठी उतरलो तेंव्हा तेथे शुकशुकाट होता. तिकीट खिडकी वरील माणसाने दिलेल्या माहितीनुसार येथून २० किमीवर नक्षलवाद्यांनी आठवड्यापूर्वी बॉम्बस्फोट केल्यामुळे कुटुमसर गुहा सोडून अभयारण्यातील इतर गुहा पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. तिकीट घेऊन साशंक मनाने गाडीत बसलो पुढचा १० किमीचा प्रवास दाट जंगलातून कच्च्या रस्त्यावरून होता. समोरचा रस्ता कच्चा असल्यामुळे गाडीचा वेग पण कमी झाला होता. १० किमीच अंतर संपता संपत नव्हत. गाडीतल्या इतर कोणाला याची कल्पना नसल्याने सर्वजण मस्त गप्पा मारत होते. मी मात्र जीव मुठीत धरून आजूबाजूच्या दाट झाडीत काही दिसतय का ते पाहात होता. 

कांगेर व्हॅली नॅशनल पार्क


आदल्या दिवशी विशाखापट्टणमहून निघून आंध्रप्रदेश, ओरीसा ही राज्य पार करून आम्ही छत्तीसगड राज्यात प्रवेश केला तेंव्हा संध्याकाळ होत आली होती. प्रवासाने आंबलेल्या शरीराला आणि मनाला एका कडक चहाची गरज होती, पण आमचा वाहान चालक थांबायला तयार नव्हता. पोलिसांचा त्रास टाळण्यासाठी त्याला जगदाळपूरमध्ये अंधार पडण्यापूर्वी पोहोचायच होत. जगदाळपूर मधे राहाण्यासाठी हॉटेल शोधण्याच्या मोहीमेत आमच्या चालकाच्या स्थानिक मित्राची आम्ही मदत घेतली. त्याने नक्षलवादी कसा ओळखावा यावर आमच बौध्दिक घेतल. तुम्ही शहरातील कुठल्याही हॉटेलात राहिलात तरी तुम्ही "अपहरणयोग्य" आहात की नाही याची माहिती खबर्‍यां मार्फत त्यांच्या पर्यंत पोहोचते हे सांगून वर "मजेत राहा" हे सांगायलाही तो विसरला नाही. त्याने सांगितलेल्या गोष्टी अतिशयोक्तीच्या आहेत अस वाटत होत, तरी पण मनावर नकळत दडपण आल होत. हॉटेलात सामान टाकून रात्री ७.३० च्या सुमारास बाहेर पडलो. बाहेर सामसूम झाले होते. लाकडावर कोरीवकाम करणारी तुरळक दुकानच उघडी होती. हॉटेलात जेवणासाठी परत आलो तर १०-१२ स्थानिक तरुणींचा ग्रुप वाढदिवस आजरा करण्यासाठी आला होता. त्यांच्या हसण्या बोलण्याने मगाशी आलेल मनावरच दडपण काहीस दूर झाल. ठिक ९.०० च्या ठोक्याला जेवण आटपून त्या तरूणी लगबगीने निघून गेल्या होत्या.



आमची जीप कच्च्या रत्यावरून संथगतीने जंगलातल्या एका आदिवासीपाड्यात पोहोचली. येथे १०-१२ तरूण एकाच रंगाचे कपडे घालून उभे होते. स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने गुहा दाखवण्यासाठी गाईड म्हणून त्यांना खास प्रशिक्षण दिले होते. आमची पावती पाहून गाडीची नोंद करून एक तरूण आमच्या बरोबर आला. त्याच्याशी गप्पा मारतांना समजल की, नक्षलवादाकडे गावातले तरूण वळू नयेत म्हणून सरकारतर्फे त्यांना गाईडचे ट्रेनिंग देण्यात आले. प्रत्येक गाडीमागे त्यांना १००/- रुपये रोजगार मिळतो. नक्षलवाद्यांच्या भितीमुळे सुट्ट्या चालू असूनही दिवसाला फारतर १० गाड्या येतात. त्यामुळे प्रयेकाला रोज रोजगार मिळतोच असे नाही , त्यामुळे त्या दिवसाचा मिळणारा रोजगार सर्व २५ जण मिळून वाटून घेतात. सरकार आणि नक्षलवाद्यांच्या भाडंणात शांतपणे जीवन जगू पाहाणार्‍या या तरूणांची नाहक फरफट होतेय. 

कुटुमसर गुहेच्या तोंडाकडे जाणारा निमुळता रस्ता   

कुटुमसर गुहेच तोंड   
गुहेत उतरण्याचा मार्ग   


गुहेसमोरच्या मोकळ्या पटांगणात गाडी थांबली. आसपास दाट जंगल होत. पण गुहेचा कुठे मागामुस नव्हता. फरसबंदी पायवाटेवरून आम्ही दोन उंचवट्यांमध्ये असलेल्या दरडीत पोहोचलो. त्यातील डाव्या बाजूच्या उंचवट्या खाली गुहेच प्रवेशव्दार होते. एकावेळी एकच माणूस बसून प्रवेश करू शकेल अशा दारातून आम्ही गुहेत प्रवेश केला. आत उतरण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या त्यावरूनही बसूनच उतरता येईल अशी चिंचोळी जागा होती. शेवटची पायरी उतरल्यावर चक्क उभे राहाण्या एवढी जागा होती. समोरच लवणस्तंभांमुळे तयार झालेलं प्रवेशव्दार आमच स्वागत करत होत.

लवणस्तंभांनी तयार झालेल प्रवेशव्दार

करोडो वर्षापूर्वी झालेल्या उलथापालथीत समुद्र तळाची जमिन वर आली. अशा प्रकारे तयार झालेल्या जमिनीत वेगवेगळ्या प्रकारचे थर असतात. त्यातील चूनखडीचा (calcium carbonate) थर पावसाच्या जमिनीत मुरणार्‍या पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहात जातो. हजारो वर्षे ही प्रकीया चालू असते. त्यातूनच जमिनीखाली गुहा तयार होतात. या गुहांची निर्मिती आजही चालू आहे, पण त्याचा वेग फरच कमी असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही. या गुहांची तोंड आडवी (Horizontal) किंवा उभी (Vertical) असतात. या गुहा तयार होतांना / झाल्यावरही गुहेच्या छतावरून झिरपणारे पाणी आपल्या बरोबर विरघळलेले क्षार घेऊन येत. हे क्षार छतालाच चिकटून राहातात आणि पाण्याचा थेंब खाली पडतो. त्यात असलेला क्षाराचा अंश जमिनीवर जमा होतो. अशाप्रकारे क्षाराचे थर छ्तापासून जमिनीकडे जमा होतात त्याला Stalactites म्हणतात व जमिनीकडून वरच्या दिशेला जमा होणार्‍या क्षारांना Stalagmite म्हणतात. कालांतराने ही दोन्ही टोक जोडली जाऊन लवण स्तंभ (Column) तयार होतो. अनेक वर्ष चालणारी प्रक्रीया असल्यामुळे गुहेत वेगवेगळ्या अवस्थेतील लवणस्तंभ पाहायला मिळतात. भारतात मेघालय, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यात चुनखडीच्या गुहा (Lime stone caves) आहेत. Krem Liat Prah ही मेघालयातील गुहा भारतातील सर्वात लांब गुहा असून तीची लांबी ३१ किमी आहे. इ.स. १९५८ ला डॉ. तिवारींनी शोधलेल्या कुटुमसर गुहेची लांबी ५०० मीटर आहे.



एका बाजूला वाहात पाणी 

कुटुमसर गुहेतील लवण स्तंभाच्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर गुहेची उंची एकदम २० ते २५ फूट (३ मजल्या एवढी) वाढली. पाणाच्या प्रवाहामुळे गुहेच्या भिंतीवर अनेक प्रकारची नक्षी, आकार तयार झाले होते. आमचा वाटाड्या त्यात आम्हाला विविध प्राणी, पक्षी, डायनासोर यांचे आकार दाखवत होता. काही ठिकाणी दोन्ही बाजूच्या भिंतींवर वेगवेगळ्या रंगांचे लाटांसारखे पट्टे तयार झाले होते. गुहेला अनेक फाटे फुटलेले होते. आत जाऊन कोणी हरवू नये यासाठीच गाईड्ची व्यवस्था केली होती. गुहेत फिरतांना बर्‍याच ठिकाणी पाया खालून पाण्याचा प्रवाह वाहात होता. निसर्गाचे गुहा खोदायच काम अविरतपणे चालू होतं. गुहेतील या पाण्यात दुर्मिळ "आंधळा मासा" (Albinic blind fish) पाहायला मिळतो. आपण शाळेत शिकलेला डार्विनचा उत्क्रांतीचा नियमाच हे जितजागत उदाहरण आहे. कधीकाळी बाहेरून गुहेत आलेल्या या माशाला गुहेतील मिट्ट अंधारात राहात असल्यामुळे डोळ्यांची गरज उरली नाही, त्यामुळे त्याचे डोळे विकसित न होता त्याऐवजी त्याला लांब मिशा आल्या. या संवेदनशील मिशांच्या सहाय्याने तो आपले भक्ष्य पकडू शकला आणि विपरीत नैसर्गिक परिस्थितीत टिकून राहीला. गुहेत आढळणारा दुसरा सजीव म्हणजे कोळी (crab spider or banana spider) त्याच्याही मिशा याच कारणासाठी त्याच्या आकाराच्या चौपट वाढलेल्या दिसत होत्या.

कोळी (crab spider or banana spider) 

दुर्मिळ  आंधळा मासा (Albinic blind fish) Add caption

गुहा पाहाण्यात किती वेळ गेला हे कळलच नाही. लवण स्तंभाच्या प्रवेशव्दाराशी आल्यावर सर्वांना बाहेर पाठवून दिले. गुहेच्या भिंतीला पाठ टेकवून बसलो. हातातील टॉर्च विझवला. मिट्ट आदिम काळोख सर्वत्र पसरला होता, डोळे उघडे आहेत की बंद हेच समजत नव्हते. गुहेतून वाहाणार्‍या आणि छ्तातून ठिबकणार्‍या पाण्याचा दुरवर अस्पष्ट आवाज येत होता. चित्तवृत्ती शांत होत होत्या. त्या गुहेचाच एक भाग झाल्यासारख वाटत होता. इतक्यात माने जवळ काही तरी हुळहुळल, माझी समाधी भंग झाली. हातातील टॉर्चचा प्रकाश भिंतीवर टाकला तर एक कोळी आपल्या लांब मिशांनी माझा अंदाज घेत होता. त्याला त्रास न देता शांतपणे त्याच्या राज्याच्या बाहेर पडलो.

गुहेतील रस्त्याला फ़ुटलेले फ़ाटे.

कोणी हरवू नये म्हणुन गुहेतील काही रस्ते बंद केलेत.

जाण्यासाठी :- कुटुमसर गुहा पाहाण्यासाठी छत्तीसगड राज्यातील जगदाळपूर हे जवळचे शहर आहे.
(१) मुंबई - नागपूर - रायपूर - जगदाळपूर या मार्गे जगदाळपूरला जाता येते.
(२) मुंबईहून ट्रेन / विमानाने विशाखापट्टणम गाठावे. विशाखापट्टणमहून सकाळी जगदाळपूर साठी पॅसेंजर सुटते किंवा खाजगी वाहानाने बोरा केव्हज, त्याडा, कॉफी प्लांटेशन/ म्युझियम, अरकू व्हॅली पाहात जगदाळपूरला जाता येते.
पाहाण्यासाठी:-  जगदाळपूर जवळ कांगेर घाटी अभयारण्य, सहस्त्रधारा धबधबा, चित्रकुट धबधबा आणि जगदाळपूर मधील पॅलेस ही ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.    

झिरपणार्‍या पाण्यामुळे छतावर तयार झालेली नक्षी

झिरपणार्‍या पाण्यामुळे गुहेच्या भिंतीवर तयार झालेली नक्षी

झिरपणार्‍या पाण्यामुळे गुहेच्या भिंतीवर तयार झालेली नक्षी
     


Photos by :- Amit Samant  © Copy right



Offbeat Kenya, Suswa Mountain , निद्रिस्त ज्वालामुखीच्या विवरात, सुस्वा माउंटन , केनिया
हा लेख वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा.

Wednesday, October 1, 2014

माझा पावसाळी मित्र (Indian Bird -> Night Heron)



डोंबिबली शहरातल्या भर रस्त्यावरील तिसर्‍या मजल्या वरील माझ्या घराला हिरवीगार तटबंदी आहे. गॅलरीच्या दोन्ही बाजुला दोन आंब्यांची झाड पसरलेली आहेत. त्यांच्या मधे एक अशोकाच झाड आहे. आंब्यांच्या संगतीत राहून त्यालाही आपण आंबा आहोत अस वाटायला लागल असाव, त्यामुळे सरळसोट वाढायच सोडून तेही अजागळासारख पसरलय. या झाडांमध्ये वर्षभर विविध पक्षी, फुलपाखर, किटक यांची ये जा चालु असते. त्यामुळे घरात राहुनही आमच आपसुकच निसर्ग निरीक्षण चालू असत. 










साधारणत: ५ वर्षापूर्वी मे महिन्यात एका संध्याकाळी एक नविन पाहूणा समोरच्या आंब्याच्या झाडावर अवतरला. पुस्तकातून पाहून हा रातबगळा (Night Heron) माहित होता, पण त्याच वावरण रात्री असल्याने पाहाण्यात नव्हता. काही दिवसात आपल्या जोडीदारा बरोबर त्याने घरट बांधायला सुरुवात केली. आंब्याच्या, अशोकाच्या झाडाच्या सुक्या काड्या वापरुन त्यांनी शेंड्याखालच्या एका फ़ांदिच्या दुबेळ्यात घरट बांधायला सुरुवात केली. काटक्यांच हे घरट कावळ्याच्या घरट्या सारख अस्ताव्यस्त होत. पावसाळ्यात वहाणार्‍या सुसाट वार्‍यात हे घरट कस टिकून रहाणार याचा मला प्रश्न पडायचा. पण ते रातबगळे मात्र निर्धास्त होते. मादीने घरट्यात तीन - चार निळसर हिरव्या रंगाची अंडी घातली आणि ती त्यावर बसायला लागली. नर आणि मादी दिसायला सारखेच असल्यामुळे नक्की कोण किती वेळ अंड्यांवर बसतो/बसते हे सांगण कठीण आहे. पण याकाळात हे पक्षी एकमेकाला भरवतांना दिसले नाहीत म्हणजे ते आलटून पालटून अंडी उबवत असावेत.



रातबगळा हा निशाचर पाणपक्षी आहे. त्याचा रंग डोक्यापासून ते पाठ, शेपटी पर्यंत काळा असतो, तर पोट आणि पंख पांढर्‍या शुभ्र रंगाचे असतात. या रात्रींचर पक्ष्याला त्याच्या  काळ्या रंगाच्या पाठीमुळे त्याच्या भक्षकांपासून संरक्षण मिळत असेल. त्याची चोच मजबूत आणि टोकदार असते. खेकड्या सारखे कठीण पाठीचे प्राणी किंवा पक्ष्यांची अंडी फ़ोडून खातांना त्याला आपल्या चोचीचा उपयोग होतो. पाणवठे, खाडी किनारे, खाजण यावर जाऊन तो आपले खाद्य मिळवतो. त्याचे पाय लांबुडके आणि मजबूत असल्यामुळे तो उथळ पाण्यात उभा राहून शिकार करु शकतो. त्याच्या खाद्यात मासे, खेकडे, किटक, बेडुक, कासव, पाणकिटक यांचा समावेश आहे. याशिवाय पक्ष्यांची अंडी, पिल्ल, किटक, पाली, सरडे असा चौरस आहार हा पक्षी घेत असल्याची नोंदी उपलब्ध आहेत. वर्षाचे ८ महिने हे पक्षी पाणवठ्या जवळच्या आंबा, चिंच, पिंपळ, वड अशा झाडांवर राहातात. विणीसाठी मात्र हे पक्षी भर वस्तीतल डेरेदार झाड निवडतात. त्यामुळे मानवी वस्तीपासून दुर रहाणार्‍या शिकारी पक्ष्यांपासून त्यांच्या पिल्लांच रक्षण होतो. पण भोचक कावळा आणि संधीसाधू मांजर यांच्या पासून मात्र धोका कायम असतोच.  

पावसाळ्याच्या सुरुवातीला अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लांच्या चॅक चॅक  चॅक  चॅक या आवाजाने परीसर दुमदुमुन जायला लागला. तीन - चार पिल्लांतले उपाशी राहीलेले पिल्लु दिवस रात्र हा उच्च स्वरातला आवाज काढून त्याच्या पालकांना आणि झाडाच्या आजूबाजूला राहाणार्‍यांना सळो की पळो करुन सोडायला लागले. या काळात नर आणि मादी या दोघांची पिल्लांची भुक भागवतांना दमछाक होते होती. याकाळात डोंविवली आणि दिव्यामधल्या खाडीवर हे रातबगळे, इतर बगळ्यांच्या बरोबर बकध्यान लाऊन बसलेले दिसायला लागले. पिल्लांची वाढती भूक भागवण्यासाठी बर्‍याचदा हे रात्रिंचर पक्षी दिवसाही भक्ष्याच्या शोधात लांबवरच्या पाणवठ्याकडे उडत जातांना दिसत. तिथून पकडून आणलेले अर्धवट पचलेले खाद्य पोटातून बाहेर काढून चोचीतून पिल्लांना भरवत. अशावेळी पिल्लांच्या धसमुसळेपणामुळे त्यातील काही भाग खाली पडत असे. तो खाण्यासाठी दिवसभरात मांजराच्या एक दोन चकरा झाडाखाली होत. याकाळात त्या आंब्याच्या झाडाखाली पक्ष्यांच्या शिटेचा पांढरा सडा पडलेला असे. याचा झाडांना खत म्हणून नक्कीच उपयोग होत असणार. अशाप्रकारे रातबगळे झाडावर राहाण्याच भाडे देत असावेत. 




रातबगळ्याच्या पिल्लांचा रंग तपकीरी असतो, त्यामुळे ते त्या काटक्यांच्या घरटयात बेमालूमपणे मिसळून जात. पिल्लू लहान असतांना बर्‍याचदा कावळे घरट्याजवळ येत, तेंव्हा झाडाच्या शेंड्यांवर बसलेला रातबगळा आपले पंख उघडून कावळ्यावर धावून जाई. पंख उघडल्यावर त्याचा दिसणारा आकार, आवेश आणि त्याने काढलेला "व्कॉक" असा कर्कश आवाज ऎकून कावळे धुम ठोकत. रातबगळा कावळ्याचा पाठलाग न करता शांतपणे काहीच न घडल्यासारखा परत आंब्याच्या शेंड्यावर येऊन बसे. रातबगळे आणि कावळ्यातली ही लुटुपुटुची लढाई पिल्ल मोठी होई पर्यंत चालू राही. पिल्ल मोठी झाल्यावर आंब्याच्या फ़ांद्यांमधून फ़िरु लागत. हळूहळू आपल्या आई बाबांसारखी झाडाच्या शेंड्यांवर बसू लागत. आपले तपकीरी तुकतुकीत पंख पसरून या झाडावरून त्या झाडावर उडण्याचा सराव चालू होई. कधी कधी पंख पसरवून तोल सांभाळत झाडाच्या शेंड्यांवरुन उड्या मारत फ़िरतांना दिसत. ऑक्टोबरच्या सुमारास एखाद्या दिवस सकाळी उठून पाहाव तर पक्षी आपल्या पिल्लासह निघुन गेलेले असत.



पावसाळ्याच्या काळात रोज सकाळ संध्याकाळ दर्शन देणार्‍या या माझ्या मित्राची गेल्या ५ वर्षातील अनेक रुप मनावर कोरली गेली आहेत. पिल्लांच्या कल्लोळातही शांतपणे झाडाच्या शेंड्यावर बसलेला रातबगळा..., ३ दिवस सलग पडणार्‍या पावसामुळे चिंब भिजून विस्कटलेला रातबगळा...., पंखाखाली चोच घालून तेथील ग्रंथीतील तेल एकाग्रपणे पिसांवर पसरवत बसलेला रातबगळा....., वहाणार्‍या संथ वार्‍यावर डुलणार्‍या फ़ांदीवर पाय घट्ट रोऊन पंखात चोच खुपसून डुलकी घेणारा रातबगळा....

गेल्यावर्षी आंब्याच्या झाडावर मधमाशांनी एक छोट पोळ बनवल होत. तेंव्हापासून रातबगळ्यांनी त्यांच्या घरट्याची जागाही बदलली, ते आता माझ्या गॅलरीच्या विरुध्द बाजूला आपली घरटी करतात. घरट्यांची संख्या आता एक वरून पाच वर पोहोचलीय. त्यांच्या जोडीला बगळेही घरटी करू लागले आहेत. आता त्यांच्या घरट्याचे निरीक्षण करता येत नाही, पण त्याच्या पिल्लांचा येणारा चॅक चॅक आवाज आणि आंब्याच्या डुलणार्‍या शेंड्यांवर बसलेले रातबगळे मात्र पावसाळाभर सोबत असतात. एखाद्या मित्रासारखे........

Wednesday, August 6, 2014

Undiscovered Sindhudurg Fort अपरिचित किल्ले सिंधुदुर्ग

अपरिचित किल्ले सिंधुदुर्ग


Sindhudurg Fort Malvan

मालवण माझ गाव असल्याने सिंधुदुर्ग किल्ला हा माझा मातृकिल्ला (मातृभुमी सारख) आहे. सिंधुदुर्गावर आत्ता पर्यंत ३० फ़ेर्‍या झाल्यामुळे मला सर्व किल्ला माहिती आहे, अस मला उगाचच वाटायला लागल होत. माझ्या बरोबर किल्ल्यावर येणार्‍यां मित्रांना, नातेवाईकांना मी एखाद्या इतिहास तज्ञाच्या आवेशात मोरयाच्या धोंड्यापासून ते राणीच्या वेळा पर्यंत किल्ल्याची माहिती सांगायचो. त्यावेळी शिवराजेश्वर मंदिरातले महाराज आणि सिंधुदर्ग किल्ला माझ्याकडे बघून नक्कीच हसत असणार.

Scuba Diving behind Sindhudurg Fort, Malavan

      त्याच झाल अस की, मालवणला इतक्या वेळाजाऊनही मी स्कुबा डायव्हींग केल नव्हत. २०१३ साली स्कुबा डायव्हींगसाठी बोटीने किल्ल्याच्या मागच्या बाजुला गेलो आणि समोरच दृश्य पाहून हरखुन गेलो. सिंधुदुर्गाच्या तटबंदीत चक्क एक चोर दरवाजा दिसत होता. समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या थोडासा वर असलेला चोर दरवाजा, यातून निसटायच म्हणजे एकतर होडी पाहिजे किंवा समुद्राच्या पाण्यात झोकून द्यायच आणि पोहत मालवणचा किनारा गाठायचा.

एवढ्या वेळा किल्ल्याला भेट देऊनही हा चोर दरवाजा मला किल्ल्याच्या आतून दिसला नव्हता. कारण किल्ल्यात पाणी येऊ नये म्हणुन तो आतून बंद करण्यात आला आहे. तरीही आजही तिथुन समुद्राच पाणी किल्ल्यात येत. (समुद्राच पाणी चोर दरवाजातून किल्ल्यात येऊ नये म्हणुन ३०० वर्षापूर्वी काय योजना केली होती हा अभ्यासाचा विषय आहे).

चोर दरवाजा , सिधुदुर्ग किल्ला
         चोर दरवाजा पाहिल्या पासून मी अस्वस्थ झालो, इतक्या वेळा किल्ला पहिला पण अजून बरच काही बघायच राहीलय अस जाणवायला लागल. मग माझा शोध सुरु झाला किल्लाचा कोपरा न कोपरा माहित असलेल्या माणसाला शोधण्याचा.माझ्या सुदैवाने माझी भेट झाली गेली १२ वर्ष सिंधुदुर्ग किल्ल्याचे  संरक्षक असलेल्या पुरातत्व खात्यातल्या श्री हरीश गुजराथींशी

Shivrajeshwar Mandir, Sindhudurg Fort, Malvan



Shivrajeshwar Mandir, Sindhudurg Fort, Malvan

Sindhudurg Fort
      किल्ला समग्र पाहाण्यासाठी हनुमान जयंतींचा मुहुर्त निवडला होता. दरवर्षी मालवणची सिंधुदुर्ग सेवा समिती किल्ल्यावर जाउन हनुमान जयंती साजरी करते. त्यामुळे सकाळी ७.०० वाजताच किल्ल्यावर मी, कौस्तुभ आणि गुजराथी दाखल झालो. गुजराथींनी रुईच्या फ़ुलांचा स्वत: बनवलेला लांबलचक हार प्रवेशव्दारा जवळच्या हनुमंताला घातला. नारळ फ़ुटले गाराण घातल आणि सर्वजण शिवराजेश्वर मंदिरात पोहोचले. त्या मंदिरातही पूजा आणि गाराण झाल. महाराजांचा जयजयकार झाला. कोल्हापूरहून आलेल्या मुलांनी तलवारबाजीची उत्कृष्ठ प्रात्येक्षिक दाखवली.

     सकाळी ८.०० वाजता आम्ही गडफ़ेरीला सुरुवात केली. त्यात चुन्याचा घाणा, चुना साठवण्याचे हौद, तटबंदीतली खोली, बुरुजावर कोरलेला गणपती अशा बर्‍याच नविन गोष्टी पाहायला मिळाल्या. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पडझड झालेल्या बुरुजांचे व तटबंदीचे बांधकाम चालू होत. समुद्रात पडलेले दगड क्रेनच्या मदतीने बाहेर काढून रचण्याच काम चालू होत. आज इतक्या सोयी सुविधा असुनही खाली पडलेला दगड उचलून वर आणून बुरुजात योग्य जागी बसवण प्रचंड कठीण काम होत. तर ३४० वर्षापूर्वी हा किल्ला बांधताना समुद्राच्या पाण्याशी झुंज देत पायापासून  दगड कसे बसवले असतील हा विचार मनात आला. 

बुरुजातली खोली

चुना साठवण्याचा हौद

चुन्याचा घाणा

Ganpati on Buruj of Sindhudurg Fort
सकाळी ८.०० ला सुरु झालेली किल्ल्याची भटकंती दुपारी १.०० ला संपली. एप्रिलच उन आणि खारी हवा यांनी हैराण झालो होतो, पण किल्ला पूर्ण पाहिल्याचे समाधान काही औरच होते. एक स्वप्न तर पूर झाल . आता एकदा सिंधुदुर्ग किल्ला छोट्या होडीतून सर्व बाजूंनी फ़िरुन पाहायचाय. न जाणो अजून काही नविन हाती लागायच.


Bastion at Sindhudurg Fort before repairing
Bastion at Sindhudurg Fort after repairing
Shri Gujrathi & Me