Sunday, June 11, 2023

इटर्नल फ़्लेम (Eternal Flame) ट्रेक

 

Eternal Flame

अमेरीकेतल्या सुप्रसिध्द नायगारा फ़ॉल पासून ३७ किलोमीटर अंतरावर चेस्टनट रिज्ड पार्क (Chestnut Ridge Park) आहे.  नायगरा एकदा पाहुन झाला होता त्यामुळे यावेळी वेगळ काहीतरी बघुया म्हणून शोधाशोध करतांना "इटर्नल फ़्लेम" ची माहिती मिळाली.  हा तसा छोटा अप्रसिध्द ट्रेक आहे. अमेरीकेत प्रत्येक राज्यात अनेक स्टेट पार्क (राखीव जंगल) आहेत आणि त्या राखीव जंगलांमध्ये अनेक आखीव रेखीव ट्रेल्स असतात. जागोजागी लावलेले दिशादर्शक फलक, धोक्याच्या सूचना , जिथे पायवाट धोकादायक असेल तिथे लावलेले संरक्षक कठडे, लाकडाच्या ओंडक्यांच्या पायर्‍या हे सगळ पाहिल की आपल्या सारख्या सह्याद्रीत फिरणार्‍यांना "पाणीकम" वाटत राहात. पण   "इटर्नल फ़्लेम"  चा ट्रेक चक्क याला अपवाद होता.

 


नुकतेच वसंत ऋतूचे आगमन झालेले असल्यामुळे, वेगवेगळ्या रंगाच्या फ़ुलांनी झाड गच्च भरलेली होती. ट्रेकच्या सुरवतीच्या टप्प्यात या झाडांनी स्वागत केल. झाडांवर पान अपवादानेच दिसत होती. अर्थात ही झाड खास इथे आणून लावलेली असावीत अस जंगलात शिरल्यावर लक्षात आले. जंगलात पाईन आणि ओकचे उंचच उंच वॄक्ष होते. त्याच्या दाट सावलीतून वाट जात होती. साधारणपणे १० मिनिटे चालल्यावर पायवाट तीव्र उतारावरुन खाली उतरायला लागली . वॄक्षांची आडव्या  पसरलेल्या एकामेकांत गुंतलेल्या मुळांमुळे काही ठिकाणी पायर्‍यांसारखी रचना तयार झाली होती. या नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या पायर्‍यांवरुन मुळांचा आधार घेत उतरल्यावर आम्ही एका ओढ्याच्या काठाने जाणार्‍या चिंचोळ्या पायवाटेवर पोहोचलो. 



दोन्ही बाजूला झाडी भरलेले डोंगर होते. या ओढ्याच्या प्रवाहाने दोन डोंगरांमधील दरी वर्षानुवर्ष खोदून काढलेली होती. आजही ती प्रक्रीया अतिशय संथ गतीने चालूच आहे. हिवाळ्यात दगडा मधील भेगांमधल्या पाण्याचे बर्फ झाल्याने ते प्रसरण पावते . त्यामुळे भेगा रुंद होऊन दगड फूटून खाली पडतात. उन्हाळ्यात बर्फ वितळून वाहाणार्‍या प्रवाहामुळे किनार्‍याची झीज होऊन ओढ्याचे पात्र रुंद आणि खोल होत जाते.  

 


ओढ्याच्या काठाने जाणार्‍या वळणा वळणाच्या सुंदर वाटेने जातांना आजूबाजूच्या झाडीत पक्ष्यांचा किलीबिलाट ऐकायला येत होता. अचानक एका झाडावरुन सुंदर निळा पक्षी उडाला आणि ओढ्या पलिकडच्या झाडावर जाऊन बसला. त्याची (Blue jay) सुंदर छायाचित्र मिळाली. त्यामुळे चाल मंदावली , आजूबाजूच्या झाडीत आवाजांचा वेध घेत पक्षी शोधायला सुरुवात केली. काही पक्षांची छायाचित्र मिळाली तर काहींच फक्त निरिक्षण करण्यातच आनंद मानावा लागला.


Blue Jay

 

Sparrow

Red winged black bird 


Eastern Blue Bird

पक्षी निरिक्षण करतांना पुढच्या पायवाटेवर लक्ष नव्हत , समोर आडव्या पडलेल्या वृक्षाच्या आड अचानक पायवाट लुप्त झाली . त्यामुळे ओढ्याच्या पात्रात उतरण्या शिवाय पर्याय राहीला नव्हता. ओढ्यातून नितळ पाणी वाहात होत. ओढ्याचा पृष्ठभाग छिन्नीनी तासल्यासारखा सपाट होता, हेही आता लक्षात आले. हिमयुगात बर्फाच्या लाद्यांच्या सरकण्यामुळे दगड अशाप्रकारे छिन्नीनी तासल्यासारखे सपाट होतात , तोच प्रकार इथे पाहायला मिळाला. ओढ्यातून चालतांना अनेक ठिकाणी झाडे पडलेली होती. त्यातून मार्ग काढत तर कधी बाजूच्या उतारावर चढून वळसा घालून पुढे जावे लागत होते. हे अमेरीकन लोकांच्या "सेफ़्टी"च्या कल्पनेच्या पलिकडचे होते. खरतर ही झाड बाजूला करुन मार्ग निर्धोक करेपर्यंत त्यांनी हा ट्रेक बंद कसा ठेवला नाही, याच आश्चर्य वाटल.

 


ओढ्याने एक छोट वळण घेतल, समोर साधारणपणे ७० फ़ुटावरुन ३ टप्प्यात पडणारा धबधबा दिसत होता, त्या धबधब्याच्या पाण्याच्या धारांमागे असलेल्या छोट्याश्या गुहेत पेटलेल्या ३ ज्योती दिसत होत्या , अतिशय सुंदर नजरबंदी करणार दृश्य होत . धबधब्याच्या सर्वात खालच्या टप्प्यात उजव्या कोपर्‍यात जमिनी पासून ६ फूट उंचीवर एक ३ फ़ूट लांब X २ फ़ूट रुंद  आणि १.५ फ़ूट उंच गुहा आहे.

Eternal Flame Water fall


 या गुहेत नैसर्गिक वायूमुळे पेटलेल्या तीन ज्योती आहेत. आजूबाजूला वाहाणारे पाणी गुहेत झिरपत असतांनाही या ज्य़ोती तेवत होत्या .आम्ही गेलो होतो तेंव्हा धबधब्याला पाणी कमी होते , पण धबधबा ऐन भरात वाहात असतांना किंवा हिवाळ्यात गोठला असतांनाही या ज्योती तेवत असतात.

 

Eternal flame water fall

नैसर्गिक वायूचे स्त्रोत कसे तयार होतात ? याबद्दल जिओलॉजीच्या अभ्यासक्रमात शिकलो होतो,

वारा, पाऊस, उष्णता इत्यादिंचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खडकांवर परिणाम होऊन त्याची झीज होते. हा झीज झालेला भाग पाण्या बरोबर वाहून जातो आणि ज्या ठिकाणी पाणी खोल आणि संथ असते अशा ठिकाणी हा गाळ साचतो. त्याबरोबरच पाण्याबरोबर वाहून आलेले जैविक घटकही इथे साचत जातात.  हा गाळ कालांतराने कठीण होतो आणि गाळाचे खडक (Sedimentary Rock) तयार होतात. सरोवर, नदीचं पात्र , नद्यांनी निर्माण केलेला त्रिभूज प्रदेश , समुद्र तळ इत्यादी ठिकाणी हे गाळाचे दगड तयार होतात. याठिकाणी खनीज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याचे आपण वाचलेले असते.

 


इटर्नल फ़्लेमचा (Eternal Flame) व्हिडीओ पाहाण्यासाठी प्ले बटणावर टिचकी मारा


पृथ्वीच्या पोटात होणार्‍या उलथापालथीमुळे हे गाळाचे दगड जमिनीत खोलवर दाबले जातात. या दगडावर पडणार्‍या दाब आणि उष्णतेमुळे जैविक घटकांचे रुपांतर खनिज तेलात आणि नैसर्गिक वायूत होते. भूगर्भात होणार्‍या हालचालींमुळे दगडांमध्ये पडलेल्या भेगांमधून नैसर्गिक वायू जमिनीवर येतो. बर्‍याचदा वीज पडल्यामुळे हा वायू पेट घेतो आणि जमिनीवर ज्योती पेटलेल्या दिसतात. जगभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे भूगर्भातून बाहेर पडणार्‍या नैसर्गिक वायुमुळे पेटलेल्या ज्योती पाहायला मिळतात. भारतातील हिमाचल प्रदेशात असलेल्या प्रसिध्द ज्वालाजी मंदिरातही अशाच प्रकारे जमिनीतून बाहेर येणारा नैसर्गिक वायू पेटल्यामुळे तयार झालेल्या ज्योती दिसतात.

 


इटर्नल फ़्लेमचा अभ्यास  Indiana University Bloomington आणि Italy's National Institute of Geophysics and Volcanology या दोन संस्थांच्या जिओलॉजिस्टनी २०१३ साली केला . त्यांना असे आढळुन आले की इटर्नल फ़्लेम  मध्ये  पाझरणार्‍या वायूत ईथेन (ethane) आणि प्रोफ़ेन (propane) वायूचे प्रमाण 35% आहे. हे प्रमाण जगातील इतर ज्ञात नैसर्गिक वायूच्या स्त्रोतां पेक्षा जास्त आहे. इतर ठिकाणी मिथेन वायू मोठ्या प्रमाणात आढळून येतो. 

 संशोधकांना या परिसरात असे अनेक छोटे छोटे नैसर्गिक वायूचे पाझर ('micro seeps') आढळून आले. या नैसर्गिक वायूचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले हा वायू जवळच असलेल्या Rhinestreet Shale मध्ये तयार झालेला आहे  अंदाजे ४०० मिटर्स (१३००फ़ूट ) खोल असलेल्या या नैसर्गिक वायूच्या साठ्यातील वायू भूगर्भातील हालचालींमुळे (Tectonic activity) तयार झालेल्या खडकां मधील  भेगां मधून जमिनीवर आला आहे. नैसर्गिक वायू तयार होण्यासाठी जमिनी खाली स्त्रोताचे (shale) तापमान  १०० °C च्या आसपास असावे लागते. या तापमानात कार्बन विघटन होऊन नैसर्गिक वायूचे रेणू तयार होतात. परंतू  Rhinestreet Shale मधील तापमान १०० °C पेक्षा कमी आहे तसेच इतर नैसर्गिक वायूच्या स्त्रोतांपेक्षा त्याची खोलीही कमी आहे तरीही तिथे नैसर्गिक वायू कसा तयार झाला ? असा प्रश्न संशोधकांना पडला आहे. त्यावर सध्या अभ्यास चालू आहे.

 


आपल्या इथे धबधब्याच्या खालच्या भागात डोह असतो. तो नसला तरी आजूबाजूचे खडक पडून धबधब्या पर्यंत जाण्याचा मार्ग दुष्कर झालेला असतो. पण या ठिकाणी बर्फाच्या लाद्या सरकण्यामुळे गुळगुळीत पॄष्ठभाग तयार झाला आहे. त्यामुळे ज्योती तेवत असलेल्या गुहेपर्यंत सहज जाता आले. गुहेच्या वरुन पाण्याच्या धारा पडत होत्या त्या धारांच्या पडद्या आड ज्योती तेवत होत्या. नैसर्गिक वायू जळल्यावर येणार टिपिकल वास त्या ठिकाणी येत होता. पृथ्वी, आप (पाणी),  तेज (अग्नी) , वायू आणि आकाश  ही पंचमहाभूत या निबिड अरण्यात एकाच वेळी पाहायला मिळत होती. आग आणि पाणी हे विरुध्द गुणधर्म असणारी महाभूत या ठिकाणी एकत्र नांदत होती. 

 


   या भारावलेल्या वातावरणात काही वेळ थांबून आलेल्या मार्गाने परत फ़िरलो. एक वेगळा छान ट्रेक झाला. मी आजवरच्या  भटकंतीत पाहीलेल अजून एक सुंदर ठिकाण म्हणून "इटर्नल फ्लेम" कायम आठवणीत राहील.

 


जाण्यासाठी :- अमेरीकेतल्या सुप्रसिध्द नायगारा फ़ॉल पासून ३७ किलोमीटर आणि बफेलो विमानतळापासून १७ किलोमीटर अंतरावर चेस्टनट रिज्ड पार्क (Chestnut Ridge Park) आहे. या पार्क मध्ये ३ ट्रेक आहेत. त्यातील मध्यम श्रेणीतला हा ट्रेक आहे. जाऊन येऊन साधारणपणे अंतर ३ किलोमीटर आहे. मे महिना ते ऑक्टोबर हा ट्रेक करता येतो. अमेरीकेत अनेक पार्क्स मध्ये जाण्यासाठी फी भरावी लागते. पण या ट्रेकसाठी कुठलीही फी भरावी लागत नाही.    

 


 Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5 


with Pradnyesh Samant



 1) Edison National Historical Park (एडीसन नॅशनल हिस्टॉरीकल पार्क) Offbeat USA हा ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा 


 २) Corning Glass Museum कॉर्निंग ग्लास म्युझियम Offbeat USA हा ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा