Saturday, January 23, 2021

फ़ुलपाखरांच्या रानात (congregation of Butterflies)


Butterfly
congregation of Butterflies

जंगलात शिरलो तेंव्हा नुकतेच झुंजूमुंज होत होते. जंगलातल्या शांततेत झाडांच्या पानांवरुन खाली पाचोळ्यावर पडणार्‍या दवा़च्या थेंबांचा आवाज येत होता. मध्येच दिवस थार्‍याकडे परतणार्‍या पिंगळ्य़ाचा आवाज जंगलातली शांतता भेदून गेला. हवेतील गारवा, जमिनीवर पडणार्‍या दवाच्या सुगंधात, अपरिचित फ़ुलांच्या सुगंध मिसळुन तयार झालेल्या धुंद वातावरणात, अनेक चढ - उतार, आडवे येणारे ओहोळ पार करत जंगलात बरेच आत शिरलो. 


पायवाट सोडून खाली दिसणार्‍या ओढ्याच्या कोरड्या पात्राकडे उतरायला सुरुवात केली. सूर्य उगवला असला तरी या खोलगट भागात अजून प्रकाश पोहोचला नव्हता. या उतारावर मोठे मोठे वृक्ष होते.  त्यांनी जमिनीवर त्यांच्या फ़ांद्यांची छत्री धरलेली होती. फ़ांद्यांवरुन सरळसोट खाली आलेल्या वेलींवर मातकट रंगाची अनेक पाने लगडलेली होती .  जमिनी पासून अंदाजे ५ ते ६ फुटावर भरपूर पाने दिसत होती आणि त्याखाली जमिनी पर्यंत  पाने विरळ झालेली होती.  ज्या तज्ञ मित्रासोबत इथपर्यंत आलो होतो . त्याने जवळ जाउन पाहायला सांगितले .  जवळ गेल्यावर जे दिसले त्याने हरखुन गेलो . त्या  वेलीवर  Striped Tiger (Danaus genutia Cramer) "ढाण्या कवडा" जातीची असंख्य फुलपाखरे बसलेली होती . आजूबाजूला निरखून  पाहायला सुरुवात केल्यावर आजूबाजूच्या वेलींवर, झाडांवर झुपक्यानी फुलपाखरे लगडलेली होती .  त्या परिसरात अशी शेकडो फुलपाखरे झाडांवर वेलींवर बसलेली होती. याला फुलपाखरांचे "congregation" (संमेलन/ एकत्रीकरण) म्हणतात.



व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणवर टिचकी मारा
(सावली सोडून, उन अंगावर येईल अशी बसलेली फ़ुलपाखरे)

Striped Tiger  Butterfly (Danaus genutia Cramer)
Striped Tiger (Danaus genutia Cramer) 

दरवर्षी हिवाळ्याच्या महिन्यात स्थलांतरासाठी फ़ुलपाखरे येथे जमा होतात. फ़ुलपाखरांचे आयुष्य पाहाता दरवर्षी या ठिकाणी जमा होणारी पिढी नवीन (पुढची पिढी) असते. मग या जागेचा पत्ता या फ़ुलपाखरांना कसा मिळतो ? स्थलांतर करुन कुठे जायचे हे त्यांना कसे समजते?  दिशांचे ज्ञान कसे होते ? असे अनेक प्रश्न पडत होते.

"ढाण्या कवडा"

फुलपाखरांचे असे संमेलन (congregation) दोन कारणांसाठी भरते . १) स्थलांतरासाठी :-  यात एकाच जातीची फुलपाखरे स्थलांतर करण्यापूर्वी एका जागी जमा होतात . काही दिवस तेथे राहातात आणि मग एकत्र स्थलांतर करतात . याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे "मोनार्क" फुलपाखरे. कॅनडा आणि अमेरीकेच्या उत्तर भागातून ३००० किलोमीटरचे अंतर कापून ही फुलपाखरे मॅक्सिकोत जातात. दररोज ८० किलोमीटर अंतर कापत, दोन महिन्यांनी ही फ़ुलपाखरे ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. त्यासाठी सुर्याचे स्थान, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र यांचा फ़ुलपाखरांना उपयोग होतो.  हलक्या वजनाचे, एवढ्या कमी इंधनात चालणारे इंजिन बनवणे अजून विज्ञानाला सुध्दा शक्य झालेले नाही ( डिस्कव्हरी , नॅशनल जिओग्राफि इत्यादी चॅनलवर मोनार्क फुलपाखरांच्या स्थलांतरावर  डॉक्युमेंटरीज आहेत.) . अती थंडी , पाउस,  इत्यादी कारणांसाठी फुलपाखरे स्थलांतर करतात .

२) मड पडलिंग (Mud puddling)  :- फुलपाखरांना क्षारांची, खनिजांची आवश्यकता असते . बऱ्याचदा चिखलात फुलपाखरे मोठ्या प्रमाणावर एकत्र बसलेली दिसतात. याला मड पडलिंग (Mud puddling) म्हणतात.  फ़ुलपाखरे जमिनीतून कॅल्शियम, फ़ॉस्फ़ेट, सोडीयम, नायट्रोजन इत्यादी खनिजे (Minerals) शोषून घेतात आणि मिलनाच्या वेळी मादीला भेट देतात. मड पडलिंगसाठी अनेक जातींची फुलपाखरे एकाच ठिकाणी जमलेली पाहायला मिळतात.

Mud puddling

याशिवाय फ़ुलपाखरे एकत्र येऊन स्थलांतर (Aggression of butterflies) करण्याचे कारण म्हणजे दुष्काळ, खाण्याची अनुपलब्धता. फ़ुलपाखरांच्या अळ्यांनी मोठ्या संख्येने, मोठ्या प्रमाणावर अन्न फ़स्त केल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे अन्नाची अनुपलब्धता झाल्यास अळ्यांपासून जन्माला आलेली एकाच जातीची फ़ुलपाखरे एकत्र स्थलांतर करतात.    



फुलपाखरू थंड रक्ताचे असल्याने सुर्याची उष्णता मिळाल्या शिवाय त्याचे चलनवलन चालू होणार नव्हते . त्यामुळे आमच्या समोरची सर्व फुलपाखरे निश्चल होती आणि त्यामुळेच ती त्या वेलींशी , झाडाशी आणि वातावरणाशी समरुप झाली होती . तज्ञ मार्गदर्शक सोबत नसता तर या झाडांच्या बाजूने जाऊनही आम्हाला ती दिसली नसती .


फुलपाखरां प्रमाणे आम्हीही सूर्यप्रकाश जंगलाच्या त्या खोलगट भागात यायची वाट बघत होतो . हळूहळू सूर्य किरणे वृक्षांच्या पानामधील फटीतून वेलींवर पडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फुलपाखरे जिथे जिथे बसली होती त्याच भागात बरोबर सूर्याची किरणे पहिल्यांदा पोहोचली . वेलीवरच्या ज्या भागात सावली होती तेथे एकही फुलपाखरू बसलेले नव्हते, ती मधली जागा रिकामी ठेवलेली होती आणि जेथे थेट सूर्यप्रकाश येत होता त्या भागात फुलपाखरांची दाटी होती. जेथे पानातून गाळून आलेले उन्हाचे कवडसे पडले होते त्या भागात एखाद दुसरे फ़ुलपाखरु बसलेले होते.  दुसरी लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे सगळी फुलपाखरे झाडाच्या, वेलींच्या पूर्वेकडील भागांवरच बसली होती. जेणेकरून सूर्यापासून लवकरात लवकर उर्जा मिळेल आणि त्यांचे भक्षक सजग होण्या आधी त्यांना अन्न गोळा करण्यासाठी उडून जाता येइल .

congregation of Butterflies

सुर्यप्रकाश पडल्यावर काही काळाने वाळक्या पानांसारख्या दिसणाऱ्या फुलपाखरांमध्ये "जान" आली. त्यांनी हळूहळू पंख उलगडायला सुरुवात केली . त्यामुळे त्या झाडांना, वेलीना असंख्य रंगीबेरंगी पंख फुटल्यासारखे वाटायला लागले .... सुरुवातीला एक दोन फुलपाखरांनी आपला रातथारा सोडून हवेत गिरकी मारली आणि अचानक असंख्य फुलपाखरे आकाशात उडाली...... आकाशात अनेक रंगांची उधळण झाली.  एक अनुपम्य सोहळा याची देही याची डोळा पाहायला मिळाला .

congregation of Butterflies
congregation of Butterflies


जंगल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर फक्त  वाघ , बिबट्या , हत्ती असे मोठे प्राणी येतात . त्यांना पाहाण्यासाठी लोक जीवाचा आटापिटा करतात.  खरतर जंगलातील परिसंस्थेत किटकां पासून वाघांपर्यंत सर्वानाच सारखे महत्व असते . फुलपाखरू या परिसंस्थेमधील महत्वाचा घटक आहे . फुलांचे परागीभवन करण्यात फुलपाखरांचा मोठा वाटा आहे . पक्षांचे आणि काही सरपटणाऱ्या प्राण्यांचे ते भक्ष्यही आहे . वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलांचा , गवताळ कुरणांचा होणारा ऱ्हास , किटकनाशकाचा अनिर्बंध वापर  यामुळे निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचा घटक धोक्यात आलेला आहे .सह्याद्रीत फ़ुलपाखरे एकत्र जमण्याचा काळ हिवाळ्याचा असतो. हवामान बदलामुळे हल्ली त्यावेळीही पाऊस पडतो. या हवामान बदलाचाही फ़ुलपाखरांच्या एकत्रीकरणावर आणि स्थलांतरावर परिणाम होत असणार.



सरकारी पातळीवरही शिकारी प्राण्यांचा अधिवास टिकवण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जातात . पण दरवर्षी एकाच ठिकाणी जमून स्थलांतर करणार्‍या फ़ुलपाखरांचा अभ्यास अपवादानेच भारतात झालेला आहे. दक्षिण भारतातील फ़ुलपाखरांचा पश्चिम घाट ते पूर्वघाट स्थलांतर या विषयावर डॉ. कृष्णमेघ कुंटे यांचा शोध निबंध आणि मिलिंद दिगंबर पाटील यांचा सह्याद्रीतील (कोकणातील) फ़ुलपाखरांचे स्थलांतर यावरील शोधनिबंध आंतरजालावर उपलब्ध आहेत. अशा प्रकारे केलेले शास्त्रीय संशोधन आपल्याला फ़ुलपाखरांच्या अधिवासाबद्दल अजून माहिती देतील आणि ते अधिवास वाचवण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील.


फ़ुलपाखरांचे स्थलांतर


Photos by :- kaustubh & Amit Samant  © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900 

अदृश्य किटकांच्या जगात (Leaf Mining Worm, Bag Worm, Spittle bugs or Frog hopper) हा किटकांवरील ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा...