Friday, May 20, 2016

बारा मोटांची विहिर (Bara Motachi Vihir, Satara)


मुंबई - बंगलोर महामार्गावर मुंबई पासुन १४९ किमी वर महामार्गा लगत लिंब नावाचे गाव आहे.  या गावात बारा मोटांची एक सुंदर विहिर आहे. गुजरात -राजस्थान भागात बांधल्या जाणार्‍या भव्य विहिरींसारखी या विहिरीची रचना आणि बांधणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात तरी अशा प्रकारची ही एकमेव विहिर आहे.



औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यावर शाहु महाराजांच वास्तव्य सातार्‍या मधे होत. सातार्‍या पासून १६ किमीवर असलेल्या शेरी लिंब गावात शाहु महाराजानी देशभरातून गोळा करुन आणलेल्या ३००० जातींच्या आंब्याची आमराई तयार केली होती. या आमराईला पाणी पुरवठा करण्यासाठी त्यानी या ठिकाणी एका सुंदर आणि भव्य विहिरीची निर्मिती केली. इसवी सन १७१९ ते १७२४ अशी तब्बल पाच वर्षं या विहिरीचं बांधकाम सुरू होतं. या विहिरीवर बसवलेल्या १२ मोटानी विहिरीच्या पाण्याचा उपसा करुन ते पाणी आमराईला पाटाने पुरवले जात असे. एकाच वेळी १२ मोटा या विहिरीवर चालवण्याची सोय होती म्हणुन ही विहिर "बारा मोटांची विहिर" या नावाने प्रसिध्द आहे.





बारा मोटांची विहिर गावामध्ये भर वस्तीत आहे. प्रथम दर्शनी विहिरीचा आकार पिंडी सारखा दिसतो. विहिर तीन भागात विभागलेली आहे. पहिल्या भागात विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या, प्रवेशव्दार व 3 अतिरीक्त मोटा आहेत. दुसर्‍या भागात छोटेखानी महाल आहे. तर तिसर्‍या भागात अष्टकोनी विहिर आहे.



पायर्‍या उतरुन विहिरीकडे जाताना प्रथम एक भव्य प्रवेशव्दार लागते. या प्रवेशव्दारावर दोन शिलालेख आहेत त्यावर या विहिरीची निर्मिती ,"शके १६४१ ते १६४६ (इसवी सन १७१९ ते १७२४) याकाळात केल्याचा उल्लेख आहे. प्रवेशव्दारावर दोन बाजुला फुल कोरलेली आहेत. कमानीवर पोपट कोरलेले आहेत. प्रवेशव्दार ओलांडून पलिकडे गेल्यावर दोन कमानींच्या मधे दगडी पुल बनवलेला आहे. पुलाच्या दोन बाजुला पाणी असते. या ठिकाणी विहिरीच्या वरच्या बाजुला मोटा लावण्यासाठी 3  दगडी खोबण्या बनवण्यात आल्या आहेत. विहिर जरी बारा मोटांची विहिर म्हणुन प्रसिध्द असली तरी याठिकाणी प्रत्यक्षात १५ मोटांसाठी दगडी खोबण्या बनवण्यात आल्या आहेत. त्यातील १२ खोबण्या मुख्य विहिरीवर बसवलेल्या आहेत तर 3 खोबण्या पहिले प्रवेशव्दार व महाल या दरम्यान बसवल्या आहेत. विहिरीवरील एखादी मोट काही कारणाने (दुरुस्ती इ. ) बंद असल्यास या ३ अतिरीक्त (Stand by) मोटांचा वापर केला जात असे.


विहिर बांधली त्याकाळी चामड्याच्या मोटा वापरुन बैलांच्या सहाय्याने विहिरीतील पाणी बाहेर काढले जात असे. त्यासाठी विहिरीवर बसवलेल्या खोबण्यांमधे कप्पी बसवुन त्यावरुन दोर सोडला जाई. या दोराला चामड्याची मोट बांधलेली असे. विहिरीच्या वरच्या बाजुला बैलजोडी बांधलेली असे त्यांच्या सहाय्याने मोट खेचली जाई.  बैलाना कमी श्रम व्हावेत यासाठी याठिकाणी उतार (slope) बनवलेला आहे. विहिर बनवताना किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे हे इथे पाहायला मिळते. 



 

या विहिरी संदर्भात एक दंतकथा सांगितली जाते. संभाजी महाराजांच्या हत्त्येनंतर औरंगजेबाने त्यांच्या पत्नी येसूबाई आणि पुत्र शाहू यांना कैद केलं. कैदेत असताना शाहू महाराजांचा विवाह झाला. औरंगजेबाने शाहूंच्या वधूचा चेहरा पाहाण्याची इच्छा व्यक्त केली. काही दगाफ़टका होऊ नये म्हणुन शाहुच्या पत्नी ऐवजी वीरूबाई या दासीला शाहूंची पत्नी म्हणून औरंगजेबासमोर हजर करण्यात आलं. औरंगजेबाच्या कैदेतून शाहूची सुटका झाल्यावर त्यांनी सातार्‍याहुन राज्यकारभार पाहायला सुरुवात केली. सातार्‍य़ा जवळील शेरी लिंब गावात या वीरूबाईंसाठी शाहूंनी वाडा बांधला आणि आमराई तयार केली. राज्यकारभारातून फ़ुरसत मिळाल्यावर शाहू महाराज याठिकाणी विश्रांतीसाठी येत. वीरुबाईचा वाडा विहिरीच्या मागच्या बाजूला होता. आता तिथे उध्वस्त वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.


विहिरीच्या दुसर्‍या भागात जाण्यासाठी जी प्रवेशव्दाराची कमान आहे त्यावर महाल बांधलेला आहे. या प्रवेशव्दारावर दोन बाजुला शरभ कोरलेले आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर महालात जाण्यासाठी २ बाजुला २ जीने आहेत. महालात खाशा व्यक्तींचा वावर असल्यामुळे संरक्षणाच्या दुष्टीने जिन्यांची रचना केलेली आहे. जिने अंधारे व चिंचोळे असून एकावेळी एकच माणुस जाऊ शकेल इतकी जागा आहे. जिना काटकोनात वळलेला असून ज्याठिकाणी तो वळला आहे तेथील पायरीची उंची आणि आकार इतर पायर्‍यांपेक्षा वेगळा आहे. या रचनेमुळे शत्रुने घातपात करण्याच्या हेतूने महाला पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्यास एकावेळी एकच माणुस जिन्याने वर जाऊ शकतो. नविन माणुस जिन्याच्या अंधारामुळे बावचळुन जातो. तसेच काटकोनात वळलेला जिना आणि वेगवेगळ्या उंचीच्या पायर्‍या आणि कामगिरीच मानसिक दडपण यामुळे तो अडखळतो. महालात खाशांच्या संरक्षणासाठी असलेल्या रक्षकांना सावध होण्यासाठी एवढा आवाज पुरेसा असतो. महालाला दोनही बाजुला (विहिरीच्या व प्रवेशव्दाराच्या) तीन कमानी असलेले सज्जे आहेत. महाल चार खांबांवर तोललेला असुन त्यावर फ़ुल, गणपती, मारुती, घोडेस्वार इत्यादी शिल्प कोरलेली आहेत. हा महाल जमिनीच्या खाली विहिरीच्या पाण्याच्या सानिध्यात असल्यामुळे येथे कायम गारवा असतो. महालात पूर्वी पडदे लावले जात. पडदे लावण्यासाठी असलेल्या लोखंडी रींगा अजूनही पाहायला मिळतात. या महालात छत्रपती शाहू महाराज आणि पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या गाठी भेटी झाल्या असाव्यात.


 महालातून वर (जमिनीवर) जाण्यासाठी एक जीना आहे. या जिन्याने वर गेल्यावर चार पायर्‍या असलेला प्रशस्त चौथरा आहे. या चौथर्‍यावर बसुन शाहू महाराज स्थानिकांची गार्‍हाणी ऐकत, न्यायनिवाडा करीत असावेत. 



बारामोटांची मुख्य विहिर अष्टकोनी आहे. विहिरीचा अंदाजे घेर ५० फ़ूट असून खोली ११० फूट आहे. विहिरीच्या प्रत्येक कोनाड्यात शरभ शिल्प आणि नागाच शिल्प बसवलेल आहे. विहिरीवर जनिमीच्या पातळीवर मोटा खाली सोडण्यासाठी १२ ठिकाणी खोबण्या केलेल्या आहेत. मोटांव्दारे वर आलेल पाणी वाहून नेण्यासाठी दगडाने बांधलेले पाट आहेत. पाटाच्या शेवटी छोटे (१ मीटर x  १ मीटर ) हौद बांधलेले आहेत. जेणेकरून उतारावर बांधलेल्या दगडी पाटातून येणारे पाणी हौदात आल्यावर त्याचा वेग कमी होईल व हौदातून बाहेर पडणारे पाणी पुढे असलेल्या मातीच्या पाटाचे नुकसान करणार नाही.


 शाहु महाराजांची आमराई आता राहिली नसली, तरी त्यावेळचा एक डेरेदार पिंपरी वृक्ष आजही विहिरी समोर रस्त्यापलिकडे पांथस्थांना सावली देत उभा आहे. या विहिरीच्या बांधकामातून उरलेल्या दगड चुन्यातून पिंपरी भोवती पार आणि पारवर कळस नसलेल शंभू महादेवाचं लहानसं मंदिर बांधण्यात आलेल आहे. 
महात्मा गांधींच्या हत्त्येबद्दल फाशी झालेले नारायण आपटे याच गावाचे. त्यामुळे गांधीहत्त्येनंतर या गावातील ब्राह्मण वस्तीवर हल्ले झाल्यामुळे ब्राह्मण समाज इथून परागंदा झाल्याचं सांगितलं जातं. 
लिंब गावात पाहाण्यासारख अजून एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे कृष्णा नदीच्या पात्रात असलेल्या उंचवट्यावर बांधलेले कोटेश्वर मंदिर.


जाण्यासाठी :- शेरी लिंब गाव मुंबई - बंगलोर महामार्गावर मुंबई पासुन २४० किमी अंतरावर लिंब गाव आहे. सातार्‍याच्या अलिकडचा टोल नाका ओलांडल्यावर (उजव्या बाजूला गौरीशंकर कॉलेजच्या इमारती दिसतात) पुढे साधारणपणे एक किमीवर नागेवाडीला जाणारा फ़ाटा आहे.  या फ़ाट्यावरून २ किमी आत गेल्यावर उजव्या बाजूला जाणारा रस्ता लिंब शेरी गावातील बारा मोटांच्या विहिरीकडे जातो. तर डाव्या बाजूचा रस्ता कोटेश्वर मंदिराकडे जातो. या दोनही ठिकाणी वाहानाने जाता येते. त्यामुळे एका तासात दोनही ठिकाणे पाहाता येतात.
सातारा - शेरी लिंब अंतर १६ किमी आहे.
सातार्‍याहुन सज्जनगड, बारा मोटांची विहिर आणि कोटेश्वर मंदिर एका दिवसात पाहाता येते.
किंवा
सातार्‍याहुन कासचे पठार, बारा मोटांची विहिर आणि कोटेश्वर मंदिर एका दिवसात पाहाता येते.
आजुबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- सज्जनगड, कासच पठार, पाटेश्वर, कल्याणगड (नांदगिरी)

अमित सामंत

Sunday, May 15, 2016

मालवणची खाद्य भटकंती (What & where to eat in Malvan & Tarkarli)

सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort), तारकर्ली बीच (Tarkarli), देवबाग बीच (Devbaug beach) यांच्यामुळे मालवण हे शांत गाव पर्यटनाच्या नकाशावर आलय. मालवण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग किल्ला, समुद्र, बीचेस आणि मासे असा अनेकांचा समज असतो. पण मालवणची भटकंती म्हणजे केवळ एवढच नसून एक सुंदर खाद्य भटकंती सुध्दा आहे.


Sindhudurg Fort


मालवण परिसर फिरायचे म्हणजे सामान्य पर्यटकसाठी कोकण रेल्वे हा सर्वात सोईस्कर पर्याय आहे. कोकण रेल्वेने कुडाळ स्थानकात उतरुन रिक्षा, जीप, एसटी ने २६ किलोमीटर वरील मालवणला तासाभरात पोहोचता येत. कोकण रेल्वेच्या "मांडवी आणि कोकणकन्या" ह्या दोन गाड्या त्यातली कॅटरींगसाठी प्रसिध्द आहेत. भारतातल्या काही मोजक्याच गाड्यांमधे असे विविध आणि दर्जेदार पदार्थ मिळतात. त्यामुळे आपली कोकणातल्या खाद्य भ्रमंतीची सुरुवात कोकण रेल्वे पासूनच होते. कोकण रेल्वेत सकाळच्या नाश्त्यात शिरा - उपमा, ब्रेड आम्लेट, इडली-वडा, कटलेट इत्यादी पासुन दुपारच्या/रात्रीच्या जेवणात सुप्स, चिकन लॉलिपॉप, फ्राइड राइस, बिर्याणी  ते आइस्क्रीम, गुलाबजाम पर्यंतचे ४५ वेगवेगळे पदार्थ मिळतात. हे लक्षात राहाण्याच कारण म्हणजे एकदा मालवणला जाताना दरड कोसळल्याने आम्ही तब्बल १९ तास प्रवास करत होतो. त्यावेळी मेन्युकार्ड मधल्या ४५ पदार्थातले ३२ पदार्थ आम्ही खाल्ले होते. तुम्ही जर "जनशताब्दीने" जात असाल तर मात्र तुमची खाण्याच्या बाबतीत हेळसांड होइल. कारण या गाडीला पॅंट्रीकार नाही आहे. पण निराश व्हायच काहीच कारण नाही. कुडाळला ही गाडी दुपारी साधारण १ वाजण्याच्या सुमारास पोहोचते. रेल्वेतून उतरल्यावर तुमच्या गाडीवाल्याला गाडी थेट "भावोजींच्या खानावळीत" घ्यायला सांगायची. कुडाळ स्टेशन पासुन १ किमी अंतरावर असलेल्या या घरगुती खानावळीत अस्सल मालवणी शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळत. खानावळीत जेवणावर आडवा हात मारला की तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने गाडीत बसायच. गाडीवाल्याला गाडी आरामात चालवायला सांगायच. याचे दोन फायदे आहेत. एक तर खिडकी बाहेर दिसणार्‍या कोकणाच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येइल आणि दुसरा म्हणजे कोकणातल्या वळणदार रस्त्यांचा पोटाला त्रास होणार नाही. कुडाळ -मालवण रस्त्यावर धामापूरचा तलाव हा प्राचिन तलाव आहे. तेथे थोडावेळ थांबुन मगच मालवणच्या दिशेने पुढे जावे.

मालवणला जाण्यासाठी आता मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) विमानाचा पर्यायही उपलब्ध आहे. सिंधुदुर्ग विमानतळ ते मालवण हे अंतर २१ किलोमीटर आहे. विमानतळा पासून मालवणला जाण्यासाठी वाहानाची आगाऊ सोय करणे आवश्यक आहे. 



मालवणात पोहोचल्यावर आपल्याकडे दोन पर्याय असतात. एक तर तारकर्लीला (Tarkarli) जाउन राहायच किंवा मालवण गावात मुक्काम करायचा. मालवण ते तारकर्ली अंतर ७ किमी आहे. जाण्या येण्यासाठी रिक्षा,एसटी असे पर्यायही आहेत. त्यामुळे कुठेही राहीलात तरी फारसा फरक पडत नाही. पण तारकर्लीत राहीलात तर खाण्याचे पर्याय मर्यादित आहेत. तुम्ही ज्या हॉटेलात राहाल तिथलच आणि जस मिळेल तेच खाव लागेल. पण मालवणात राहाल तर तुमच्याकडे खाण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतील.मालवण सिंधुदुर्ग , तारकर्ली , देवबाग परिसर पाहायचा असेल तर दोन दिवसांचा वेळ काढण आवश्यक आहे. मालवण - कुडाळ - वेंगुर्ला - सावंतवाडी - आंबोली घाट ही ठिकाण पाहायची असल्यास चार ते पाच दिवसांचा वेळ काढावा लागेल.


Shivaji Maharaj , Sindhudurg Fort
Shivrajeshwar Mandir, Sindhudurg Fort
मालवणच सगळ्यात मोठ आकर्षण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘‘कुरटे‘‘ बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी किल्ला बांधण्याची आज्ञा केली. दिनांक २५ नोव्हेंबर १६६४ रोजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी शिवाजी महाराज स्वत: हजर होते. गेली ३५0 वर्षे उन वारा पाउस आणि लाटांचे तडाखे झेलत उभ्या असलेला सिंधुदुर्ग किल्ला पाहाण्यासाठी मालवणला पोहोचल्यावर  दुपारी ३ वाजताच्या सुमारास निघावे. सिंधुदुर्ग किल्ला भर समुद्रातील बेटावर बांधलेला आहे. त्यामुळे तिथे आद्रता (ह्युमिडीटी) प्रचंड असते. सकाळच्या चढत्या उन्हात किल्ला पाहायला गेल्यास घामाने आणि तहानेने हैराण होण्याची शक्यता असते त्यामुळे संध्याकाळी कलत्या उन्हात किल्ला पाहाणे उत्तम . मालवण धक्क्यावरून बोटीने १० मिनिटात किल्ल्यावर जाता येते. किल्ला पाहाण्यासाठी एक तास मिळतो. किल्ल्याचा गोमुखी दरवाजा , महाराजांच्या हाताचा आणि पावलाचा ठसा, शिवराजेश्वर मंदिर, राणीची वेळा, भवानी मंदिर या महत्वाच्या गोष्टी पाहाण्यात एक तास पटकन निघुन जातो. सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरुन आलेला थकवा घालवण्यासाठी किल्ल्यातच मिळणार कोकम सरबत किंवा शहाळ प्यायल्या नंतर मिळणार सुख अनुभवण्यात मजा आहे. भर समुद्रात असलेल्या किल्ल्यातील दुधबाव, दहीबाव, साखरबाव या विहिरींच पाणी वापरल्यामुळे कदाचित या सरबताला  एक वेगळीच चव येत असावी.

Suvarn Ganesh (Golden Ganesh) ,Malvan
सिंधुदुर्ग किल्ला पाहुन झाल्यावर थेट "सुवर्ण गणेश" मंदिराकडे मोर्चा वळवावा. मालवण धक्क्यापासून चालत १५ ते २० मिनिटात मंदिरात पोहोचता येते. या साध्याश्या मंदिरातील स्वच्छता, प्रसन्न वातावरण आणि गणपतीची सोन्याची सुंदर मुर्ती आपल्या मनातील भक्तीभाव जागृत करते. आपले हात आपोआप जोडले जातात. 

राजकोट किल्ला


सुवर्ण गणेश मंदिरा पासुन दोन रस्ते फुटतात त्यातील एक रस्ता राजकोट किल्ल्याकडे जातो. सिंधुदुर्गावर लक्ष ठेवण्यासाठी मालवण समुद्रात राजकोट आणि पद्मगड हे दोन किल्ले बांधाण्यात आले होते. सुवर्ण मंदिरापासून ५ मिनिटात आपाण राजकोट किल्ल्यावर पोहोचतो. समुद्रात शिरलेल्या एका भूशिरावर हा किला बांधलेला होता. २०२३ मध्ये नौदल दिनाचे औचित्य साधून किल्ल्यात छ. शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. त्याच्या बाजूला बुरुज, तटबंदी, प्रवेशव्दार बांधून किल्ल्यासारखी रचना केलेली आहे. राजकोट जवळच  छ. शिवाजी महाराजांचे गुरु मौनी महाराजांचे मंदिर आहे.




राजकोट किल्ला पाहून जवळच असलेल्या "रॉक गार्डन" ला जावे.  या ठिकाणी खडकाळ किनार्‍यावर फुटणार्‍या लाटांची गाज ऐकत, अंगावर तुषार झेलत सूर्यास्त पाहाणे हा खुप सुंदर अनुभव आहे. आकाशात अनोख्या रंगांची उधळण पाहाताना तिथे मिळणार्‍या भेळपुरीला वेगळाच स्वाद येतो. लहान मुलांसाठी इथे टॉय ट्रेन आणि इतर खेळण्याचे साहित्य आहे. सूर्यास्ता नंतर रॉक गार्डनहुन निघुन मालवण बाजारात फेरफटका मारण्यासाठी दाखल व्हाव. बाजारातल्या "भाग्यश्री (पूर्वीच क्षुधाशांती)" तले गरमागरम बटाटेवडे खाणे आणि राणे कोल्ड्रींग मधे जाउन लिंबु सोडा, फालुदा आइस्क्रीम खाण ही  चाकरमान्यांची "पॅशन" आहे. गणपतीत किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत मालवण बाजारात खरेदीला आल्यावर इथले वडे खाल्ल्या शिवाय आणि घरच्यांसाठी बांधुन नेल्याशिवाय त्याची खरेदी पूर्ण होत नाही. त्यामुळे इथे कायम ताजे, गरमागरम वडे मिळतात आणि पटापट संपतातही. गरमागरम वडे खाउन झाल्यावर आईस्क्रीम खाण आलच.भाग्यश्री हॉटेलच्या समोरच आणि मच्छीमार्केट जवळ "राणे कोल्ड्रींग: आहे. येथे मिळणारे विविध प्रकारचे "फालुदा विथ आईस्क्रीम" चवीला अप्रतिम आहेत. याशिवाय टायटॅनिक, इत्यादी आईस्क्रीमही खाउन पाहायला हरकत नाही.

Faluda Ice cream


Titanic Ice Cream , Rane Cold drink Malvan

मालवणी खाद्यपदार्थ म्हणजेच आले युक्त गुळाचे खाजे , शेंगदाणा लाडु, शेवाचे लाडु (खटखटे लाडु) , कुळथाच पिठ, मालवणी मसाले, कोलंबीच लोणच, काजु आणि त्याचे विविध पदार्थ, फणसपोळी, आंब्याचे विविध पदार्थ इत्यादी एकाच ठिकाणी मिळणारी सिंधुदुर्गातली एकमेव बाजारपेठ मालवणात आहे. त्यामुळे मनसोक्त खरेदी करावी. त्यानंतर भूक लागण अपरीहार्यच आहे. रात्रीच्या जेवणसाठी मालवण बाजारातल "चैतन्य " किंवा " अतिथी बांबू " हे दोन चांगले पर्याय आहेत. मालवणात विविध प्रकारचे मासे उत्तम मिळतातच. पण मालवणत आल्यावर खायचा खास पदार्थ म्हणजे "मोरी मटण" आणि वडे किंवा भाकरी. मोरी म्हणजे शार्कची पिल्ल. येवढ्या खतरनाक माशाच नाव "मोरी" ठेवण फक्त मालवणी माणसालाच जमु शकत. तर या "मोरी माशाला" काटे नसतात. त्यामुळे नवखा माणुसही आरामात खाउ शकतो. याबरोबर तिसर्‍या मसाला (शिंपले), कर्ली फ़्राय (हा प्रचंड काटे असलेला पण खुप चविष्ट मासा असतो) , कोलंबी मसाला, आणि मालवण समुद्रात मिळणारा ताजा बांगडा यांची चव आवर्जुन घ्यावी. त्याच बरोबर जेवण झाल्यावर प्रत्येकाने आपापल्या वकुबा नुसार ताज्या सोलकढीचे ग्लास रिचवणे आवश्यक आहे. 




Scuba Diving , Malvan

दुसर्‍या दिवशी सकाळी तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत. देवबागला जाउन डॉल्फिन सफारी करायची आणि स्नॉर्केलींग, वॉटर स्पॉर्टची धमाल अनुभवायची किंवा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागे स्क्युबा डायव्हींग करायचे. कौटुंबिक सहलीला आलेल्यानी पहिला पर्याय निवडावा आणि साहासी पर्यटकानी दुसरा पर्याय.डॉल्फिन सफारीसाठी सकाळी लवकर देवबागला पोहोचाव लागत. एवढ्या सकाळी मालवण मधली हॉटेल उघडलेली नसतात. पण मालवण किनार्‍यावर सिंधु बाजार समोर असलेल "भगवान हॉटेल" उघलेल असत. समुद्रावर मासे पकडणारे कोळी बांधव, बोटवाले आदी मस्य व्यवसायातल्या लोकांचा इथे राबता असतो. इथली आसन व्यवस्था आणि स्वच्छता यथातथाच असली तरी इथे मिळणारी मिसळ, वडा उसळ , जिलबी आणि बंगाली खाज रांगड्या चवीच आहे. खाउन झाल्यावर काउंटरवर विकायला ठेवलेली चिवड्याची पाकीट बरोबर घ्यावित. हा स्वादिष्ट चिवडा पुढच्या दिवसात अधुन मधुन तोंडात टाकायला मस्त आहे.सकाळी ९ वाजल्या नंतर मालवणच बाजारातली हॉटेल्स उघडतात. मालवणची खासियत असलेली गरमागरम आंबोळी आणि चटणी खाण्यासाठी भंडारी हायस्कुल जवळच हॉटेल गाठाव. त्यानंतर "विजया बेकरीत" मिळणारा स्पॉंज केक आणि शुबेरी बिस्किट बरोबर घेउन भटकंतीसाठी बाहेर पडाव. तारकर्ली - देवबागला जातांना थोडीशी वाकडी वाट करुन न चुकता "मोरयाचा धोंडा" पाहावा. मालवण किनार्‍यावरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला होता. आजही कोळी लोक याची पुजा करतात.

Kunkeshwar Temple

सकाळचा वेळ समुद्राच्या सानिध्यात घातल्यावर तुमच्या समोर संध्याकाळसाठी दोन पर्याय उरतात. एक म्हणजे मालवण पासून १६ किमीवरील आंगणेवाडीच मंदिर पाहुन संध्याकाळी तारकर्ली बीचवर जाउन आराम करणे. दुसरा म्हणजे मालवणपासून ३५ किमीवरच प्राचिन कुणकेश्वर मंदिर पाहुन परत येण. कुणकेश्वर मंदिराला जाणारा रस्ता समुद्राच्या किनार्‍याने, खाड्यांवरचे छोटे मोठे पुल ओलांडत कुणकेश्वरला पोहोचतो. कुणकेश्वरला जातांना वाटेत मालवण पासुन ४ किमी अंतरावर रस्त्या लगत असणार्‍या ओझर येथिल नैसर्गिक गुहा आणि पाण्याची टाकी पाहाता येतात. कुणकेश्वर हे समुद्र किनार्‍याला लागून असलेले निवांत आणि सुंदर गाव आहे. या गावात इसवीसनाच्या अकराव्या शतकात यादवांनी कुणकेश्वरचे प्राचीन शिवमंदिर बांधले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी व संभाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला. मंदिर पाहुन येताना आचरा तिठ्यावर थांबाव. आजुबाजूच्या गावातून रोजंदारीवर, खरेदीसाठी आलेले लोक संध्याकाळी एसटीची वाट बघत तिठ्यावर थांबलेले असतात. त्यांच्यासाठी इथल्या हॉटेलात गरमागरम कांदाभजी काढल्या जातात. या हॉटेलात बनवलेली खमंग कांदाभजी खाउन मगच उरलेला प्रवास करावा. कांदाभजी आणि चहा देणारी टपरी वजा हॉटेल आणि खाडी यांच नात आहे. पूर्वीच्या काळी पूल नव्हते तेंव्हा   खाडी ओलांडण्यासाठी होड्या असायच्या. या होड्या पलिकडच्या किनार्‍या पासून अलिकडे येईपर्यंतचा वेळ या हॉटेलात कांदाभजी, चहा आणि गजाली (गप्पा) यात वेळ निघुन जात असे. पुल झाले आणि कांदाभजी देणारी अनेक हॉटेल्स काळा बरोबर नामशेष झाली. पण दोन तीन गावच्या तिठ्यांवर असलेली कांदाभजींची हॉटेल्स आजही एसटीमुळे टिकुन आहेत. तिथे  कांदाभजी मिळण्याची वेळ मात्र सकाळी आणि संध्याकाळी. कुणकेश्वरहुन येताना मालवणात शिरल्यावर त्याच रस्त्यावर लागणार्‍या "अतिथी बांबू" या हॉटेलात माशांचा यथेच्छ समाचार घेउन दिवस संपवावा.


माझा एक शाहाकारी मित्र बरीच वर्ष मालवणला जायला कचरत होता. मालवण म्हणजे सगळीकडे माशाचा वास, समिष आहार अस त्याना वाटत होत. त्याच्या मातोश्रीनीही हीच चिंता व्यक्त केली. मी त्याना म्हटल निर्धास्त जा. मालवण सर्वाना आपलस करत. (येवा मालवण आपलाच आसा) मालवण बाजारात "वझे खानावळ" ही अस्सल शाकाहारी खानावळ आहे आणि तिथे वरण,भात, भाजी, चटण्या, कोशिंबिर आणि तुपाची धार अस साग्रसंगित जेवण मिळत. याशिवाय बर्‍याच हॉटेलात समिष आहारा बरोबर मालवणची खासियत असलेल आंबोळी  आणि काळया वाटाण्याच सांबार (उसळ) मिळतेच. त्यामुळे शाकाहारी माणसांची कुठेही अडचण होत नाही.

दोन दिवस मालवण परिसर फिरुन झाल्यावर मालवणचा निरोप घेउन निघाल्यावर कुडाळ, सावंतवाडी मार्गे आंबोली गाठता येते आणि आंबोलीला मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी परतीचा प्रवास चालू करता येतो. मालवणहुन सकाळी निघाल्यावर मालवण - कसाल - मुंबई रस्त्याने मालवणपासून ५ किमी वरील कुंभारमाठला गाठावे. येथे कुंभारमाठ सबस्टेशन समोरुन घुमडे गावात जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने  १.५ किमी अंतर गेल्यावर दाट जंगलात लपलेल्या घुमडे गावातील अप्रतिम घुमडाईदेवी मंदिरापाशी आपण पोहोचतो. (मालवणहून केवळ १० मिनिटात आपण मंदिरापर्यंत पोहोचतो.) शांत, सुंदर मंदिर पाहून मन एकदम प्रसन्न होऊन जाते. याठिकाणी असलेली शांतता, पक्ष्यांचे मंजूळ आवाज आणि बाजूने वाहाणारा व्हाळ त्यावरील साकव अस परिपूर्ण कोकणी निसर्गचित्र येथे पाहायला मिळते. इथे भरपूर छायाचित्रण केल्या शिवाय इथली भेट पूर्णच होत नाही.

Ghumdai Devi Mandir
Ghumdai Devi
Casue nut fruit


सागरी महामार्गाने कुडाळकडे जाताना रस्त्यात कर्ली नदिवरचा प्रशस्त पुल लागतो. गाडी पुलाच्या दुसर्‍या टोकाला पाठवून वाहानांची तुरळक वर्दळ असलेल्या या पूलावरुन रमत गमत चालत, आजुबाजूचे निसर्ग सौंदर्य पाहात पुल ओलांडण्यात खरी मजा आहे. पुल ओलांडल्यावर चिपी विमानतळाच्या बाजुने रस्ता परुळे गावात उतरतो. या पुरातन गावात प्रथम आदिनारायण मंदिर आणि पुढे गेल्यावर वेतोबा मंदिर संकुल लागते. या दोनही मंदिरातील मुर्ती पाहाण्यासारख्या आहेत. वेतोबा मंदिर परिसरात अनेक विरगळी पडलेल्या आहेत.वेतोबा मंदिराच्या समोरचा रस्ता वालावल गावात जातो. या गावातील प्राचिन लक्ष्मी नारायण मंदिर आणि त्या मागचा जलाशय प्रसिध्द आहे. मंदिर पाहुन कुडाळ गावात शिराव. जेवणाची वेळ झाली असेल तर "कोचरेकरांच सन्मान हॉटेल" गाठाव. अन्यथा मुंबई गोवा महामार्गाने सावंतवाडी गाठावी. सावंतवाडी हे गाव तेथील लाकडी खेळण्यांसाठी प्रसिध्द आहे. तसच मोती तलाव, राजवाडा ही ठिकाण पाहुन घ्यावित. एव्हाना पोटात कावळे ओरडायला सुरुवात झालेली असते. मासे आणि कोंबडी वड्यांसाठी सावंतवाडी एसटी स्टॅंडच्या बाजुची गल्ली गाठावी. तेथील हॉटेलात अप्रतिम चवीच जेवण मिळत. शाकाहारींसाठी सावंतवाडीतली "साधले खानावळ" मस्त आहे. जेवणावर ताव मारुन झाल्यावर ३० किलोमीटरवरील आंबोली गाठावे. आंबोली हे थंड हवेच ठिकाण आहे. तसच सह्याद्रीतील जैव विविधतेने श्रीमंत असलेल जंगल येथे आहे. आंबोलीतील महादेव पॉइंट, कावळेसाद पॉईंट, नागरतास धबधबा, हिरण्यकेशी नदिचा उगम इत्यादी  फ़िरण्याच्या जागा त्या दिवशी संध्याकाळी आणि दुसर्‍या दिवशी पाहुन संध्याकाळी आंबोलीहुन सावंतवाडी स्टेशन गाठावे आणि कोकण रेल्वेने अथवा बसने परतीचा प्रवास चालु करावा.

Karli Creek

मालवण भागातला एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीच्या घरी राहाणार असाल तर तुमची खायची चंगळ होउ शकते. नाश्त्याला आंबोळी चटणी किंवा तांदळाच घावण आणि चटणी हे स्पेशल मालवणी पदार्थ खायला मिळतील. नारळ दुधाच्या गुळ घालुन केलेल्या रसात बुडवलेल्या शेवया हा खास प्रसंगी केला जाणारा पदार्थ तुम्ही खाऊ शकता. उकड्या तांदळाची पेज आणि नारळाची चटणी किंवा उसळ हे मालवणी माणसाच्या रोजच्या नाश्त्यातील पदार्थ आहे. तो ही ट्राय करायला हरकत नाही. "रेडी टू कुक" पदार्थांचा जमाना येण्यापूर्वी अनेक वर्षापासून मालवणी जेवणात दोन "रेडी टू कूक /सर्व्ह" पदार्थ आहेत. एक म्हणजे कुळथाची पिठी आणि दुसरी सोलकडी. कुळथाच्या पिठाच मिश्रण, हळकुंड, धणे, मिरची यांच्या बरोबर योग्य प्रमाणत करून कुळथाची पिठी बनवली जाते. कुळथाच्या पिठात लसणाच्या दोन तीन पाकळ्या ठेचून पाणी घालून उकळल की कुळथाची पिठी तयार होते. कुळथाची पिठी आणि गरमगरम भात आणि जोडीला चुलीत भाजलेला सुका मासा असला की इतर कशाची गरज लागत नाही. (तसच कुळथाची पिठी जाडसर केली तर तोंडी लावायलाही होते.) चुलीत भाजलेल्या सुक्या माशाचा वास नविन माणसाला सहन होणार नाही. पण निखार्‍यावर भाजलेल्या सुक्या माशाचे तुकडे घालून बनवलेली खोबर्‍याची चटणी आणि जोडीला नाचणीची भाकरी चवीला अप्रतिम लागते. मालवण परिसरात होणार्‍या मोठ्या काकडीला तवस म्हणतात. त्या तवसापासून बनविलेला धोंडास हा केकसारखा गोड पदार्थ बनवायला त्रासदायक असला तरी खायला मस्त लागतो. याशिवाय हळदीच्या पानात बनवलेल्या पातोळ्या, ओल्या खोबर्‍याची गुळ घालुन केलेली काप (वड्या) हे गोड पदार्थ घराघरात उत्तम बनतात. मालवणी माणुस फ़ार कमी वेळा हलवा, पापलेट, सुरमई या मोठ्या माशांच्या वाटेला जातो. मच्छी बाजारात तारली, मोदक, खवळी, पेडवे, बांगुर्ले इ.छोटे मासे मिळतात. या माश्यांच आमसुल आणि मालवणी मसाला घालुन केलेल तिखल (आंबट तिखट घट्ट कालवण) नाचणीच्या / तांदळाच्या भाकरी बरोबर खाण्याची मजा काही औरच. दुसर्‍या दिवशी हे तिखल उरल असेल तर आटवून पेजे बरोबरही खायला चांगल लागत. मालवणी माणसाच्या परसात होणार्‍या भाज्याही जेवणात आगळीच चव आणतात. शेवग्याच्या कोवळ्या पाल्याची ओल खोबर घालून केलेली भाजी, केळफ़ुलाची मोड आलेले वाटाणे घालुन केलेली भाजी, शेवर्‍याची छोटी कोलंबी घालून केलेली भाजी, अळंबीची भाजी, उन्हाळ्याच्या दिवसात गेलात तर फ़णसाची, विलायती फ़णसाची भाजी, विलायती फ़णसाची तेलावर परतलेली काप अशा विविध प्रकारच्या भाज्या खायला मिळतात.  


सुचना :- १) मालवण व आसपासचा परिसर फ़िरण्यासाठी जीप बुक केल्यास फ़िरणे सोईचे पडते. जीप कुडाळ स्थानकात बोलवून घ्यावी.
 २) स्क्युबा डायव्हींग आणि स्नोर्कलिंगसाठी उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फ़ेब्रुवारी त्यानंतर समुद्राच्या पाण्याची पारदर्शकता कमी कमी होत जाते.
 ३) स्क्युबा डायव्हींग केल्यावर त्याच बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येते.
   ४) मालवण समुद्र किनारा, कुणकेश्वरचा किनारा, निवतीचा समुद्र किनारा धोकादायक आहेत. त्यात पोहणे टाळावे.

Nivati Beach


अमित सामंत 




कोकणातील इतर अपरिचित स्थळांबद्दल लिहिलेले ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा 

1) सिंधुदुर्गावरील चिन्हाचा मागोवा (अपरिचित सिंधुदुर्ग भाग -२)

2) Undiscovered Sindhudurg Fort अपरिचित किल्ले सिंधुदुर्ग

3) Offbeat Kokan गुढरम्य कातळशिल्प (Rock art near Malvan, Dist. Sindhudurg)

4) कोकणातील निसर्ग चमत्कार :- बोंबडेश्वर मंदिर (Offbeat Kokan)