Sunday, January 8, 2023

दक्षिणेचे प्रवेशव्दार असिरगड आणि बुर्‍हाणपूर , भाग - १ ( "key to the Deccan", Asirgarh Fort & Burhanpur , Part -1 )

 

Asirgarh Fort

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥

या श्लोकाचा अर्थ अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य और भगवान परशुराम असे सात चिरंजीव आहेत. हा श्लोक आठवण्याचे कारण म्हणजे अश्वत्थामा आणि असिरगड यांच्या भोवती गुंफ़लेली दंतकथा. असिरगडावर असिरेश्वराच मंदिर आहे. दररोज रामप्रहरी अश्वत्थामा मंदिरा समोर असलेल्या कुंडात आंघोळ करुन सुचिर्भूत होऊन असिरेश्वराची पूजा करतो. पूजेमध्ये तो पिंडीवर एक गुलाबाचे फ़ूल वाहातो. जे या भागात जवळपास कुठेही मिळत नाही. पूजा झाल्यावर अश्वत्थामा जंगलात निघून जातो. अनेक लोकांना तो किल्ल्याच्या परिसरात दिसल्याच्या काहाण्या सांगितल्या जातात. एका न्य़ुज चॅनलने पहाटे ५ वाजता जाऊन येथे शुटींग केले होते. त्यावेळीही त्यांना पिंडीवर गुलाबाचे ताजे फ़ुल आढळले होते.

बुर्‍हाणपूर - इंदुर रस्त्यावर असलेला असीरगड हा भारतातल्या अजिंक्य किल्ल्यांमधला एक किल्ला आहे. हा किल्ला लढून जिंकून घेता आला नाही फ़ंदफ़ितुरीने जिंकला गेला. मध्ययुगात बुर्‍हाणपूर ही राजधानी झाल्यावर तीचा पाठीराखा म्हणुन असिरगडला महत्व आले.  ‘बाब-ए-दक्खन’ (दक्षिणेचे प्रवेशव्दार ) और ‘कलोद-ए-दक्खन’ (दक्षिणेची किल्ली) म्हटले जात असे. असिरगड जिंकला की , तेथून दक्षिण भारतात मोहिमा काढणे सोपे पडत असे.

Asirgarh Maps Courtesy Google.com

असिरगड तीन भागात विभागलेला आहे. किल्ल्याच्या खालच्या डोंगराला "मलयगिरी" म्हणतात. त्याच्या वरच्या भागाला "कमरगड" म्हणतात. इंग्रजांच्या राजवटीत या दोन्ही भागाला मिळुन "Lower Fort"  या नावाने ओळखले जात होते. असिरगड गावातून पायर्‍यांच्या मार्गाने आणि गाडी रस्त्याने गडावर जाता येते.  गाडीने थेट किल्ल्यावर गेल्यास किल्ल्याच्या खालच्या भागात असलेले अवशेष पाहायचे राहून जातात. असिरगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍या चढायला सुरुवात केल्यावर १५ ते २० मिनिटात आपण किल्ल्याच्या भक्कम अशा पहिल्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराला लागून  बुरुज आणि तटबंदी आहे. तटबंदी व बुरुजाच्या वरच्या बाजूला चर्या आहेत. त्यामध्ये जंग्या ठेवलेल्या आहेत.  प्रवेशव्दाराच्या आतल्या बाजूला देवड्या आहेत. पुढे पायर्‍या चढून काटकोनात वळल्यावर डाव्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. त्यापुढे दुसरे प्रवेशव्दार आहे. पहिले आणि दुसरे प्रवेशव्दार तटबंदीने एकमेकाला इंग्रजी  'L" अक्षराच्या आकारात जोडलेले आहे. पहिले प्रवेशव्दार पडल्यावर शत्रूला लगेच किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये यासाठी अशी रचना केलेली आढळते. दुसर्‍या प्रवेशव्दारातून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला देवड्या आहेत.  दुसरा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या खालच्या भागात पसरलेली तटबंदी आणि बुरुज पाहायला मिळतात.  पुढे पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या बाजूला कमानी असलेली एक वास्तू आहे. परवाने तपासणारे अधिकारी आणि खालच्या किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी असणार्‍या अधिकार्‍यांचे हे कार्यालय असण्याची शक्यता  आहे.

 

Entrance gate , Kamargad

या कार्यालयापासून उजवीकडे जंगलात एक वाट "चौ बुरुजा" कडे जाते. वाटेत एक पाण्याचे टाक आणि उध्वस्त वास्तू आहे. किल्ल्याच्या या टोकावर चार बुरुज बांधून ही जागा संरक्षित करण्यात आलेली आहे. चौ बुरुज पाहून पुन्हा पायर्‍यांच्या वाटेवर येऊन चढून गेल्यावर पायर्‍यांच्या डाव्या बाजूला किल्ल्याचे तिसरे प्रवेशव्दार आहे. सध्याची वाट या दरवाजातून न जाता बाजूने जाते.  अजून पुढे चढून गेल्यावर किल्ल्याच्या चौथ्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराच्या आत देवड्या आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर किल्ल्यावर येणारा गाडी रस्ता लागतो. याच ठिकाणी पार्कींगही आहे. या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर मलयगिरी आणि कमरगड संपून असिरगड किल्ला Upper Fort सुरु होतो.

 हैहय ( यदु कुळातला, यादव वंशाचा) वंशाचा राजा आशा असिर याच्याकडे भरपूर पशुधन होते. त्यांच्या संरक्षणासाठी त्याने चौदाव्या शतकात हा किल्ला बांधला होता.  किल्ल्याची ख्याती ऐकुन फ़िरोजशहा तुघलकाचा सरदार नसीरखान फ़ारुखी याने आशा असिर राजाची भेट घेऊन त्याला किल्ल्यात आश्रय द्यायची विनंती केली. आशा असिरने त्याच्यावर विश्वास ठेऊन किल्ल्यात येण्याची परवानगी दिली. नसीरखानने पहिल्यांदा आपल्या बायकांना डोलीत बसवून किल्ल्यात पाठवले. आणि त्या मागोमाग हत्यारबंद शिपाई डोलीत बसून सहजासहजी किल्ल्यात शिरले. नसीरखानच्या परिवाराचे स्वागत करायला आलेल्या आशा असिर आणि त्याच्या पुत्रावर किल्ल्यात शिरलेल्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला करुन त्यांना मारुन टाकले. किल्ला नसीरखानाच्या ताब्यात केला. त्यानंतर बहादुरशहा फ़ारुखीच्या  काळात अकबराने हा किल्ला जिंकण्यासाठी १० वर्ष वेढा घातला. किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकण्याचे अनेक प्रयत्न विफ़ल झाल्यावर अकबराने बहादुरशहा फ़ारुखीला चर्चेसाठी बोलवले आणि कैद केले. १७ जानेवारी १६२१ रोजी असिरगडवर मुघलांचे निशाण फ़डकले. किल्ल्यावर मुघलांची टांकसाळ होती. असिरगड जिंकल्यावर अकबराने सोन्याची नाणी पाडली होती. त्यानंतर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. मराठ्यांकडून किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

 
Fortification at Main entrace gate, Asirgarh

असिरगड किल्ल्यापाशी आल्यावर तिथल्या सुरक्षा रक्षकाने आम्हाला सांगितले की, किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने किल्ला पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे किल्ल्यात जाता येणार नाही. आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत एवढ्या लांब येऊन किल्ला न पाहात कस जाणार वगैरे अनेक विनंत्या केल्या. मागच्या वेळीही जळगाव ते बुर्‍हाणपूर  किल्ले बघत बघत असिरगड बघण्याचा प्लान केला होता. त्यावेळी  जळगाव जिल्यातल्या चौगाव किल्ल्यावर आमच्यावर दोन तास मधमाशांचा हल्ला झाला. आम्हाला चोपडा येथिल सरकारी हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यावे लागलेले. एवढे झाल्यावरही सर्वानुमते पुढचे किल्ले पाहात आम्ही पुढे बुर्‍हाणपूर पर्यंत गेलो, पण वेळेचे गणित चुकल्यामुळे फ़क्त बुर्‍हाणपूर पाहून परताव लागले होते.  असिरगड पाहाण्यासाठी यावेळी अमरावती  ते बुर्‍हाणपूर  किल्ले बघत बघत जाण्याचा प्लान केलेला . त्याप्रमाणे पहिला दिवस व्यवस्थित पार पडलेला . आता असिरगड समोर दिसत होता पण त्यात जाता येत नव्हते.

Entrace gate , Asirgad

आमच्या नशिबाने कामावर देखरेख करण्यासाठी मध्यप्रदेश पुरातत्व खात्याची  काही माणस आली. त्यांना विनंती केल्यावर त्यांनीही तेच कारण सांगितले. आम्ही मात्र पिच्छा सोडायला तयार नाही पाहिल्यावर आमची दया येऊन त्याने त्याच्या साहेबाला फ़ोन लावला त्याने आमच्याकडून "स्वत:च्या जबाबदारीवर जात आहोत" असे लिहून देण्यास सांगितले. तसेच सिक्युरिटी गार्ड तुमच्या बरोबर असेल त्याच्या बरोबर फ़िरावे लागेल असे सांगितले. त्यांचे आभार मानून किल्ल्याच्या  पहिल्या पायरीला नमस्कार करुन किल्ल्याकडे निघालो. तितक्यात पुरातत्व खात्याच्या माणसाने सिक्युरीटी गार्डला असिरेश्वर मंदिराची चावी दिली आणि तेही दाखवायला सांगितले.  

Asirgarh Map by Mahendra Govekar© Copy right 

डोंगरावरच्या कातळकड्यावर तटबंदी बांधून किल्ला संरक्षित करण्यात आलेला आहे. किल्ल्याच्या पायर्‍या चढायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला चार फ़ारसी शिलालेख आहेत.  पुढे डाव्या बाजूला एक बुरुज अशा प्रकारे बांधलेला आहे की, त्यामुळे त्याच्या मागे असेलेल्या प्रवेशव्दारावर थेट हल्ला करता येणार नाही.  बुरुजा मागील प्रवेशव्दारातून पुढे पायर्‍या चढून गेल्यावर वाट कोटकोनात आणि समोर किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या बाजूला भव्य बुरुज आहेत. प्रवेशव्दारच्यावर ८ ते १० फ़ूट भिंत बांधलेली आहे.  प्रवेशव्दाराचे दरवाजे आणि त्यावरचे खिळे अजूनही शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर पायर्‍यांच्या वाटेने वर चढतानां डाव्या बाजूची १० फ़ूट उंच भिंत ढासळलेली होती. त्याच्या पूनर्बांधणीचे काम चालू होते. त्यासाठी किल्ला बंद ठेवण्यात आला होता.

 

राणी महाल,असिरगड

गडमाथ्यावर आल्यावर समोर दिसणार्‍या पायवाटेने चालण्यास सुरुवात केली. डाव्या बाजूला एक उध्वस्त वास्तू आहे. त्याच्या दरवाजावर खिळे ठोकलेले आहेत.  पुढे उजव्या बाजूला राणी महाल आहे. राणी महालाच्या पुढच्या आणि मागच्या बाजुस पहारेकर्‍यांसाठी खोल्या आहेत. किल्ल्यात बराच काळ इंग्रजांची वसाहत होती त्यामुळे किल्ल्यातील मुळ वास्तूंमध्ये त्याकाळात त्यांच्या सोयी प्रमाणे बदल करण्यात आले. नवीन वास्तू बांधल्या त्यामुळे नक्की वास्तू कशासाठी असावी हे त्याच्या बांधकाम शैली वरुन अंदाज करावा लागतो. राणी महालाच्या मागच्या बाजूला वीटांनी बांधलेल्या काही वास्तू आहेत. त्याचा आकार बघता कोठार म्हणून त्याचा उपयोग झाला असावा. या कोठारांच्या पुढे मामा भांजा तलाव आहेत . त्यापैकी एका तलावात विहिर आहे. इथे सांगितल्या जाणार्‍या दंतकथेनुसार तलावचे खोदकाम करतांना मामा आणि भाचे अंगावर भिंत पडून दगावले. त्यामुळे या तलावाला मामा भांजा तलाव म्हणतात. तलाव पाहून पुन्हा पायवाटेवर आल्यावर आपण भव्य मशिदीपाशी पोहोचतो.    

 

Inscription on pillar, Asirgarh

Mosque, Asirgarh

मशिदीकडे जाण्यासाठी दगडाच्या सुंदर वळणदार पायाऱ्या बांधलेल्या आहेत. त्या चढून गेल्यावर तीन कमानी असलेल्या दरवाजातून मशिदीच्या आवारात प्रवेश होतो. आयताकृती आकारात बांधलेल्या या मशिदिला चारही बाजूला बांध्याकाम आणि मध्ये मोठा चौक आहे. आत शिराल्यावर डाव्या बाजूला वजू करण्यासाठी हौद आहे. हौद भरण्यासाठी मागाच्या बाजूला विहीर आहे.  नमाज  पढण्यासाठी असलेल्या सभागृहाला २७ कमानी आणि  ५० खांब आहेत. दर्शनी खाबावर फारसीत शिलालेख कोरलेला आहे. बाजूच्या दोन बाजूला ओवाऱ्या काढलेल्या आहेत. मशिदीला दोन मीनार आहेत.

 

Remains of church, Asirgarh

मशिदीच्या पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला ब्रिटीशांची वसाहत आणि त्यातील चर्चचे अवशेष पाहायला मिळतात.  तेथून किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत जातांना उजव्या बाजूला एक मोठा तलाव आहे. या तलावाला लागून असलेल्या तटबंदीत काही खोल्या आहेत. किल्ल्याच्या पूर्व टोकावर अजून एका चर्चचे अवशेष आहेत.  चर्चपासून पुढे गेल्यावर आपण ३ विहिरींपाशी पोहोचतो. या विहिरी अतिशय खोल असून एका विहिरीत महाल आहे. उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी अशा प्रकारे पाण्याजवळ महाल बांधलेले बर्‍याच किल्ल्यांवर पाहायला मिळतात. या विहिरीला लागूनच असिरेश्वर महादेव मंदिर आहे.  विहिरीच्या बाजूचे कातळ कोरुन हे त्यात हे मंदिर बांधलेले आहे.  अश्वत्थामा दररोज रामप्रहरी सातपुड्याच्या जंगलातून किल्ल्यावर येतो. मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीत स्नान करुन , पिंडीवर अभिषेक करुन त्याला फ़ुल वाहातो अशी येथील लोकांची श्रध्दा आहे.

 

असिरेश्वर महादेव मंदिर

अश्वत्थामा पुजतो ती पिंड

विहिरीतील महाल 


आमच्या बरोबर आलेल्या सिक्युरिटी गार्डने मंदिराचे कुलूप उघडून आम्हाला आत नेले. गाभारा स्वच्छ होता. पिंडीवर भस्माचे पट्टे काढलेले होते. पिंडीवर फ़ूल नव्हते पण जंगलात मिळणारी दोन काटेरी फळे पिंडीवर वाहेलेली होती. सध्या किल्ला पर्यटकांसाठी बंद असल्याने किल्ल्यातील मंदिर कुलूपबंद असते असे सिक्युरीटी गार्डने सांगितले. त्याला इथे नोकरीला लागून आठवडाच झाला होता . त्यामुळे अश्वस्थामाची दंतकथा आणि एकूणच किल्ल्याबद्दल फ़ारशी माहिती नव्हती. या एकाच किल्ल्यावर मंदिर , मशिद आणि चर्च पाहायला मिळाले. 

 

तलाव, असिरगड 

तुरुंग, असिरगड 


मंदिराच्या बाजूला पूर्व टोकावरील किल्ल्याच्या आत बांधलेला टेहळणी  बुरुज आहे. बुरुजावर चढण्यासाठी पायर्‍या आहेत. बुरुज पाहून तलावाच्या दुसर्‍या बाजूने प्रवेशव्दाराकडे जातांना वाटेत, इंग्रजांनी बांधलेल्या अनेक उध्वस्त इमारती पाहायला मिळतात. यातील काही इमारतींचा वापर तुरुंग म्हणून केला होता. पंजाबातील कुका चळवळीचे नेते राम सिंह आणि त्यांच्या अनेक अनुयायांना इंग्रजांनी याठिकाणी इसवीसम १८७२ मध्ये कैदेत ठेवले होते.  इथुन पुढे गेल्यावर मामा- भांजे तलावाच्या पुढे इंग्रजांचे कब्रस्थान आहे. तेथून किल्ल्याच्या प्रवेशव्दारपाशी आल्यावर गडफ़ेरी पूर्ण होते.  पुरातत्व खात्याचे कार्यालय गावात असल्यामुळे गडावरुन खाली उतरल्यावर आम्ही ते शोधत  गावातील पूरातन शिव मंदिरात पोहोचलो. मंदिर सुंदर आहे. मंदिरातील नंदीने चक्क कणीस तोंडात धरल्याचे दाखवलेले आहे. मंदिरा मागे एक छान बारव आहे. पुरातत्व खात्याच्या कर्मचार्‍यांचे आभार मानून आम्ही बुर्‍हाणपूरकडे जायला निघालो.

 बुर्‍हाणपूर बद्दल पुढच्या भागात ..................................................

 

शिवमंदिर, असिरगड गाव

कणीस तोंडात धरलेला नंदी

जाण्यासाठी :- बुर्‍हाणपूर रेल्वेने आणि रस्त्याने महाराष्ट्राशी जोडलेले आहे. बुर्‍हाणपूर - इंदुर रस्त्यावर  बुर्‍हाणपूरपासून २३ किलोमीटरवर अशिरगड किल्ला आहे. 

किल्ल्यावर सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत प्रवेश दिला जातो.


बारव, असिरगड गाव 
 
Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5

Map :- Mahendra Govekar © Copy right


42 comments:

  1. श्रीनाथ कुलकर्णीJanuary 8, 2023 at 1:57 AM

    खूप छान माहिती. विहिरीत महाल ही कल्पनाच आश्चर्यकारक वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच छान माहिती
      उत्सुकता किल्ला पाहण्याची
      पण आम्ही ...
      फोटो आणि key plan
      Layouts खूप आकर्षक
      खूप आभार अपरिचित इतिहासा ची ओळख करून दिल्याबद्दल
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

      Delete
    2. खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद,

      Delete
  2. नेहमीप्रमाणेच मस्त वर्णन आहे.

    ReplyDelete
  3. नेहमीप्रमाणेच खूप छान आणि नाविन्यपूर्ण माहिती अमित...

    ReplyDelete
  4. अश्वत्थामा रोज येऊन या गडावरील शंकराची पूजा करून जातो ..
    L shape मधील दरवाजांची मांडणी...
    लिखाणा मधून सर्व स्थळांबद्दल खूप छान माहिती मिळाली. जणू काही आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जात आहोत असे वाटले..
    खूप छान अमित सर.... खूप खूप धन्यवाद.

    ReplyDelete
  5. Aapn delelya mahitit sampurn mahiti milai ki janu aamich firat shot gadavar.

    ReplyDelete
  6. Khup detail mahiti..n mast varnan...cchan lihilays

    ReplyDelete
  7. सुंदर माहिती

    ReplyDelete
  8. Wonderful info.... another gr8 creature of architecture!!! Such wonderful places we have and we don't even look after it properly..... that's a pity...

    ReplyDelete
  9. Very nice and detailed information 👏👌

    ReplyDelete
  10. खुप छान माहिती

    ReplyDelete
  11. Reading the blog was as if taking me to reality.

    ReplyDelete
  12. दिलीप खिस्तेJanuary 8, 2023 at 5:04 AM

    छान माहिती. सुंदर स्पष्ट फोटो. अगदी सुरेख.

    ReplyDelete
  13. खूपच छान माहिती

    ReplyDelete
  14. छान वर्णन केले आहे 👍
    वाचताना आपण गडावरच आहोत असे वाटतेय 😊

    ReplyDelete
  15. खुप छान वर्णन केले आहे.

    ReplyDelete
  16. छान माहिती

    ReplyDelete
  17. खूप छान अमीत 👌

    ReplyDelete
  18. छान माहिती मिळाली जी अजून पर्यंत कधीही माहित नव्हती किंवा वाचण्यात आली नव्हती.

    ReplyDelete
  19. खूप छान !

    ReplyDelete
  20. आशिष वैद्यJanuary 8, 2023 at 8:48 AM

    सुंदर वर्णन किल्ल्यात प्रत्यक्ष भटकंती करून आल्याचा प्रत्यय आला

    ReplyDelete
  21. खूप छान माहिती

    ReplyDelete
  22. Very detailed description and nice photos.

    ReplyDelete
  23. सुंदर माहिती दादा 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  24. Khoop chan mahiti

    ReplyDelete
  25. खूप खूप मस्त लेख आहे, वाचताना आपण प्रत्यक्ष गडावर आहोत की काय आसा भास होतो. ही एक चांगल्या लेखाची कसोटी आहे, त्यात हा लेख 200% ने खरा उतरतो. एका शब्दात सांगायचे झाले तर "जबरदस्त" अमित सर.

    ReplyDelete
  26. असीरगडचा ब्लॅाग एकदम असरदार आहे. मस्त 👍

    ReplyDelete
  27. खरोखरच ही माहितीपूर्ण लेखन वाचनीय आहे.खूप जुना इतिहास माहिती झाला वस्तूंची छायाचित्रे,किल्ल्याचे वर्णन अप्रतिमच.किल्ल्याचे महत्त्व मुघल,इंग्रज यांना सुद्धा वाटल्याने त्यांचं ही येथे वास्तव्य होते. सर्व ट्रेकर,गडप्रेमी यांनी भेट द्यावी असे ठिकाण आहे.अमित आणि अस्मिता आपले दोघांचे अशिर्गडा ची सुंदर ऐतिहासिक माहिती ब्लॉगवर लीहल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .

    ReplyDelete
  28. खूप छान माहिती ,, असे माहितीत नसलेले गड किल्ले आपल्या लिखाणातून आम्हाला माहीत होतात आणि त्याची इत्यंभूत माहिती अमितसर आपण नेमक्या शब्दात देतात हे आपलं वैशिष्ट्य,,, पुढील मोहिमे साठी शुभेच्छा,,,,

    ReplyDelete
  29. बराच मोठा किल्ला दिसतोय. विटांच बांधकाम अलीकडील कळतल असावं. असो अजून एक अलंकार अंगावर चढला. नशीबवान आहात 🙏🏻

    ReplyDelete
  30. अमित दादा, नेहमी प्रमाणेच किल्ल्याच्या प्रत्येक भागाचे व्यवस्थित वर्णन केले आहेस. तीनही प्रार्थनास्थळे क्वचितच एका वास्तूमध्ये पाहायला मिळतात. महेंद्र दादाने मॅप बारीकसारीक गोष्टी विचारात घेऊन काढला आहे. डोंगरभाऊच्या पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!!

    ReplyDelete
  31. अमित लेख इतिहासाच्या दाखल्यांमुळे रंजक आहे. गड बराच मोठा वाटला पण प्रत्येक ठिकाणचे बारकाईने वर्णन व त्या संदर्भातील फोटो बघून तुझ्या सोबत प्रत्यक्ष फिरतो आहोत असं वाटलं. तुझं किल्यांप्रती प्रेम (देशी विदेशी) जबरदस्त. लेख सुरेख व माहितीपूर्ण

    ReplyDelete
  32. In depth information which obviously has increased the curiosity to visit these sites!
    Superb exploring!

    ReplyDelete
  33. मस्त. ...... एकाच ठिकाणी यादव काळा पासून इंग्रज काळापर्यंत चे बांधकाम बघायला आहे अस लेखावरून कळते.

    ReplyDelete
  34. दादा लेख छान..photos मस्त.. किल्ल्यावरचे बांधकाम जबरदस्त..कणीस तोंडात धरलेला नंदी पहिल्यांदाच पाहिला..कणसाचे दाणे कोरीवकाम सुरेख आहे ना.. दुसर्‍या भागाच्या प्रतिक्षेत..
    - आरती दुगल

    ReplyDelete