Thursday, May 31, 2018

सुरमयी ट्रेक (Musical Trek)

सह्याद्रीत भटकंती करतांना नित्य नविन अनुभव येत असतात. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अजमेरा हा तसा अपरीचित किल्ला आहे. सकाळीच पायथ्याच्या पहाडेश्वर मंदिरा जवळून गड चढायला सुरुवात केली पण, गडावर जाणारी पायवाट अशी नव्हतीच. गडाच्या वाटेवर दूरपर्यंत तुरळक झुडप वाढलेली होती. माती पकडून ठेवणारी झाडेच नसल्याने माती सैल झालेली होती. त्यामुळे जीव मुठीत घेऊन घसार्‍यावरून खाली सरकत - सरकत वर चढत होतो. 


गडाच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या पठाराजवळ आल्यावर वेगळेच सुंदर सूर ऐकू येउ लागले. त्या सुरांनी आमची उत्सुकता वाढली आणि झपाझप पावले टाकत आम्ही पटकन पठार गाठले. तिथे एक माणूस वेगळेच वाद्य वाजवत होता. हे वाद्य आदिवासी तारपा वाद्या सारखे दिसत असले तरी वेगळेच होते. त्या वादकाच नाव होत युवराज वाघ, महादेव कोळी समाजाचा हा तरुण मुळचा देवळाणे गावचा पण खंडाने शेती कसण्यासाठी तो पहाडेश्वरला राहायला आला होता. त्याच्या हातात जे वाद्य होते, ते वाद्य त्याने स्वत: बनवले होते त्याच नाव त्याने "पावरा" असे सांगितले. पावराचा पहिला फ़ुगिर भाग भोपळा कोरुन त्यापासून बनवलेला होता. त्या भोपळ्याला पुढे साधारण ६ इंचाच्या बांबूच्या दोन नळ्या बसवलेल्या होत्या. त्याला बासरीवर असतात तशी तीन भोक होती. त्या बांबूच्या नळ्यांच्या दुसर्‍या टोकाला बैलाच शिंग जोडलेल होते. त्या शिंगाच्या वर ॲल्युमिनियमचा (Aluminium) दोन इंचभर पत्रा गुंडाळलेला होता. हे वेगवेगळे भाग जोडण्यासाठी त्याने मधमाशांच्या पोळ्यातून मिळालेले मेण वापरलेले होते. भोपळ्याच्या जवळ अजून एक कमानदार भोपळा जोडलेल त्यावर झालर असलेले रंगीत कापड आणि गोंडे लावून वाद्य सजवण्यात आले होते. 




या वाद्याच्या जोरावर तो आजूबाजूच्या परिसरात लग्न, धार्मिक विधीत वाजवण्याच्या सुपार्‍या घेतो, असे त्याने सांगितले. वेगवेगळ्या कार्यात वाजवल्या जाणार्‍या सुरावटी त्याने आम्हाला ऐकवल्या. पावरा वाजवतांना त्या भोपळ्यात तोंड घालून पूर्ण ताकदीने फ़ूंकावे लागते. अशाप्रकारे फ़ुंकताना त्याचे गाल फ़ुगिर होत. जबड्याच्या नसा ताणल्या जात. त्याचवेळी त्याची बोट सराईतपणे बांबूच्या नळीवरील भोकावरुन फ़िरत होती आणि त्या वाद्यातून ती मधूर सुरावट निघत होती. एकूण काम ताकदीच होते. आम्ही त्यांना विनंती केल्यावर पुढची वाट दाखवायला ते तयार झाले. आपला पावरा वाजवत त्यांनी किल्ला चढायला सुरुवात केली. त्या सुरावटींवर पावल टाकत आमचा सुरमयी प्रवास चालू झाला.    


     ( युवराजने केलेले पावरा वादन ऐकण्यासाठी खालील व्हिडीओवर टिचकी मारा )





जो डोंगर आम्ही धापा टाकत चढत होतो, तोच डोंगर युवराज पावरा वाजवत आरामात चढत होते. किल्ला पाहून झाल्यावर किल्ल्याच्या विस्मृतीत गेलेल्या खिंडीतल्या मुळ वाटेने त्यांनी आम्हाला पायथ्याशी आणले. त्याच ठिकाणी त्याच खंडाने घेतलेल शेत आणि त्याच्या बाजूला त्याच खोपट होते. निरोप घेतांना त्याला पुन्हा पावरा वाजवायचा आग्रह केला, कुठलेही आढेवेढे न घेता त्याने सुंदर धुन आम्हाला ऐकवली. अजमेराचा सुरमयी ट्रेक  मनावर कायमचा कोरला गेलेला आहे.

अजमेरा किल्ल्या खालील रक्त कांचन       



आडवाटेवरचे किल्ले ( Offbeat forts & temples in Nasik. Aad, Dubera, Bajirao Peshwa Birth place,Siddheshwar Temple ,Gangadhareshwar Mandir, Akole) हा ब्लॉग वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा...




#MusicalTrek #offbeattrek #treksinmaharashtra 

Wednesday, May 9, 2018

कोकणातील निसर्ग चमत्कार :- बोंबडेश्वर मंदिर (Offbeat Kokan)

         



एकेकाळी मानवाला निसर्गातील अनेक आश्चर्यांचा उलगडा झाला नव्हता. त्यामागील विज्ञानही त्याला कळले नव्हते. त्यामुळे अशा ठिकाणांना दैवी चमत्कार समजून त्याठिकाणी त्याने मंदिरे उभारली. हिमाचल प्रदेशातील ज्वालाजी मंदिर, गरम पाण्याच्या कुंडांभोवती भारतभर बांधलेली मंदिरे, लोणार सारख्या विवरात आणि आजूबाजूला बांधलेली मंदिरे अशी अनेक उदाहरणे आपल्याला भारतात पाहाता येतात. 

         


मालवण पासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मठ गावात बोंबडेश्वर मंदिर आहे. कोकणी पध्दतीच्या साध्या कौलारू मंदिरा समोर चिर्‍याने बांधलेले दोन कुंड आहेत. या दोन्ही कुंडातील पाणी समपातळीत राहावे यासाठी मधल्या भिंतीत काही छिद्र ठेवलेली आहेत. यातील उजव्या बाजूच्या कुंडाता पाण्याचे झरे आहेत. या कुंडातील पाणी मधल्या भिंतीत केलेल्या छिद्रातून बाजूच्या कुंडात जाते आणि पुढे पाणी पाटामार्गे बागायतीत वळवलेले आहे. दोन तलावांपैकी उजवीकडील झरे असलेल्या कुंडातील पाण्यात अधूनमधून बुडबुडे येत असतात. " बोंबडेश्वर "अशी साद मोठ्या आवाजात घातल्यावर तळ्यातून येणाऱ्या बुडबुड्यांची संख्या वाढते. अर्थात बोंबडेश्वर हा उच्चार न करताही केवळ मोठ्या आवाजात उच्चारलेल्या शब्दांच्या कंपनानीही तलावातून बुडबुडे येतात. आम्ही तिथे असताना गावातल्या दोन बायका बाजूच्या कुंडात पाणी भरायला आल्या होत्या. त्यांच्या बोलण्यामुळेही कुंडातून बुडबुडे येण्यास सुरुवात झाली होती. मालवणी भाषेत बोंबाडे म्हणजे बुडबुडे तळ्यातून येणाऱ्या या बुडबुड्यांच्या चमत्कारावरुन याठिकाणी स्थापन झालेल्या पिंडीला (शंकराला) बोंबडेश्वर हे नाव प्राप्त झाले आहे.


यावरुन २००२ साली  उत्तरांचल मधील केदारेश्वरला पाहिलेल्या पुरातन शंकर मंदिराची आठवण आली. केदारेश्वर मंदिराजवळ असलेले मंदाकिनी नदीचे पात्र ओलांडल्यावर एक पडके मंदिर होते . त्या मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग पाण्यात पूर्णपणे बुडालेले होते . त्या ठिकाणीही "बम बोले" असे म्हटल्यावर पाण्यात बुडबुडे येत असत. २०१३ साली केदारनाथला झालेल्या उत्पाता नंतर ते मंदिर अस्तित्वात आहे की नाही याची कल्पना नाही . मुंबई गोवा मार्गावरील तरळा गावावरून वैभववाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर नाधवडे गावाच्या पुढे 'उमाड्याचा महादेव' मंदिर आहे. या मंदिरासमोर असलेल्या नदीच्या शांत प्रवाहात पाण्यातून सतत बुडबुडे येत असतात. 


(आवाज  केल्यावर  पाण्यातून निघणाऱ्या बुडाबुड्याचा व्हिडीओ पहाण्याकरीता प्ले बटण  दाबा )

गंधकामुळे अशा प्रकारचे बुडबुडे पाण्यातून येतात असे ऐकले होते. पण गंधकाचा येणारा विशिष्ट वासही या दोन्हीही ठिकाणी येत नव्हता . मग हे बुडबुडे कशामुळे येत होते . याचा उलगडा होण्यासाठी भूशास्त्राची थोडीशी माहिती करुन घेणे आवश्यक आहे. भूस्तराखाली जे अनेक दगड असतात त्यात सच्छिद्र दगडही असतात. या सच्छिद्र दगडात असलेल्या पोकळीत हवा असते. कोकण होणाऱ्या प्रचंड पावसामुळे बेसॉल्ट खडकातील क्षार वाहून जातात त्यामुळे जांभा दगडाची निर्मिती झालेली आहे . क्षार वाहून गेल्यामुळे हा दगड सच्छीद्र बनलेला असतो. या सच्छिद्र दगडातून वाहात येणार्‍या पाण्या बरोबर हवा दगडातील पोकळ्यांमध्ये अडकून राहाते.  मोठ्या आवाजामुळे पाण्यात कंपने निर्माण होतात. या कंपनांमुळे सच्छिद्र दगडातील पोकळीत अडकलेली हवा बाहेर येते आणि आपल्याला बुडबुड्यांच्या स्वरुपात पाहायला मिळते. 



बोंबडेश्वर मंदिर परिसरात काही सुंदर विरगळ ठेवलेल्या आहेत.  विरागळी बद्दल वाचण्याकरता खालील लिंक वर टिचकी मारा

निसर्गातील हा चमत्कार पाहाण्यासाठी बंबार्डेश्वर मंदिराला एकदा तरी जायला पाहीजे. या बरोबरच कुडोपी गावातील कातळशिल्प पाहाता येतील. (यावर "गुढरम्य कातळशिल्प" हा ब्लॉग लिहिलेला आहे.वाचण्याकरता खालील लिंक वर टिचकी मारा


जाण्यासाठी :- मालवणहून आचर्‍यामार्गे कणकवलीला जाणाऱ्या रस्त्यावर मालवण पासून २८ किलोमीटर अंतरावर बुधावळे गावाला जाणारा फाटा आहे. या रस्त्याने बुधावळेला जाताना ५ किलोमीटर अंतरावर मठ नावाचे गाव आहे. गावात रस्त्याला लागून बोंबडेश्वर मंदिर आहे. मठ ते कणकवली अंतर २० किलोमीटर आहे. मठ ते देवगड अंतर ३६ किलोमीटर आहे.



#Offbeatkokan