Sunday, July 14, 2019

डॅन्यूब संथ वाहातेच आहे ..... “Shoes on the Danube” Budapest

Shoes on the Danube


जगात कुठेही गेले तरी तिथल्या अनाम वीरांची , हुतात्म्यांची , स्वातंत्र्य सैनिकांची भव्यदिव्य  स्मारके आढळतात . या स्मारकांपासून पुढच्या पिढ्यानी प्रेरणा घ्यावी आणि  प्रसंगी देशासाठी राजासाठी बलिदान द्यावे यासाठी अगदी पूरातन काळापासून अशी स्मारके उभारली जाताहेत .


हंगेरीची राजधानी बुडापेस्ट मध्ये मात्र एक वेगळ्या प्रकारचे स्मारक पाहायला मिळाले . बुडापेस्ट शहराच्या मधून डॅन्यूब नदी वाहाते . या नदीने या शहराचे दोन भाग केलेले आहेत . नदीच्या एका किनाऱ्यावर बुडा वसलेले आहे तर दुसऱ्या किनाऱ्यावर पेस्ट वसलेले आहे . डॅन्यूब नदी ही युरोपातील महत्वाची नदी . जर्मनीत उगम पावून २८५० किलोमीटरचा प्रवास करुन ही नदी काळ्या समुद्राला जाऊन मिळते . आजपर्यंत अनेक संस्कृती या नदीच्या काठी नांदलेल्या आहेत त्यातलीच एक आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेली रोमन संस्कृतीही या नदीच्या काठाने फोफावली . आजच्या घडीला व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) , ब्राटीस्लावा (स्लोव्हाकिया) , बुडापेस्ट (हंगेरी) , बेलग्रेड (सर्बिया) या ४ देशांच्या राजधान्या या नदीच्या काठी वसलेल्या आहेत . 

Danube River from Buda Castle, Hungary 

बुडापेस्ट मध्ये डॅन्यूबच्या किनाऱ्यावर हंगेरियन पार्लमेंटची गॉथिक शैलीतील भव्य इमारत उभी आहे. या इमारतीपासून ५ मिनिटाच्या अंतरावर हे आगळेवेगळे स्मारक आहे . या ठिकाणी ३० बुटांच्या जोड्या नदीच्या काठावर ठेवलेल्या आहेत . ब्रॉंझ मध्ये बनवलेले हे स्त्री, पुरुषांचे , मुलांचे बूट वेगवेगळ्या मापाचे , डिझाईनचे आहेत. या बूटांच्या जोड्यांच्या मागे काळा इतिहास आहे.

दुसऱ्या महायुध्दाच्या शेवटच्या काळात (१५ ऑक्टोबर १९४४ ते २८ मार्च १९४५ ) हंगेरीत ॲरो क्रॉस पार्टीची सत्ता होती .Ferenc Szálasi हा त्यांचा नेता होता . या पार्टीची विचारसरणी नाझींशी जुळणारी होती . नाझींच्या सहकार्याने  त्यांनी हंगेरीत हाहाकार उडवून दिला . त्याकाळी लाखाच्यावर ज्यू हंगेरीत राहात होते .  केवळ ५ महिन्यातच त्यापैकी ८०००० ज्यूंना ॲरो क्रॉस पार्टीने कॉंस्ट्रेशन कॅंप मध्ये पाठवून दिले,  तर १०००० च्यावर लोकांची बुडापेस्ट मध्येच हत्या करण्यात आली .

याच काळात ज्यू स्त्री, पुरुष, मुलांना पकडून आणून डेन्यूबच्या काठावर त्यांना उभे केले जात असे . युध्दकाळात चामड्याचे बूट ही मौल्यवान वस्तू होती . त्यामुळे या पकडून आणलेल्या लोकांना बूट काढून डेन्यूबच्या काठावर नदीकडे तोंड करुन उभे केले जाई आणि त्यांना गोळ्या घातल्या जात . त्यांची कलेवर डेन्यूबच्या थंड पाण्याबरोबर वहात जात . मिळालेले बूट ते अधिकारी ,  सैनिक स्वतःसाठी ठेवत किंवा विकून टाकत .

ॲरो क्रॉस पार्टीच्या काळात झालेल्या या ज्यूंच्या शिरकाणाचे स्मारक म्हणून  “Shoes on the Danube” हे  स्मारक १६ एप्रिल २००५ रोजी उभारण्यात आले . या स्मारकाची कल्पना चित्रपट दिग्दर्शक  Can Togay यांनी मांडली आणि शिल्पकार  Gyula Pauer यांनी हे बुटांचे आगळेवेगळे शिल्प साकारले .

या स्मारकाला भेट देणारे पर्यटक या बूटांमध्ये फूले खोचून ठेवतात , काही जण रात्री या ठिकाणी मेणबत्त्या लावतात . या बळी गेलेल्या कोणाशीही रक्ताचे नाते नसतानाही केवळ माणूसकीच्या नात्याने आज हे सहज घडताना दिसत होते . काही वर्षापूर्वी याच माणूसकीचा दुसरा क्रूर चेहरा पाहीलेली डेन्यूब मात्र संथपणे पोटात थंड पाणी घेउन वहातेच आहे.....


Shoes on the Danube

Photos By :-  Amit Samant & Kaustubh Samant


1) "स्वस्तात मस्त सफ़र बुडापेस्टची" (भाग- १) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा. 
https://samantfort.blogspot.com/2019/08/budapest-in-two-days.html
2) "स्वस्तात मस्त सफ़र बुडापेस्टची" (भाग- 2) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा. 
https://samantfort.blogspot.com/2019/09/what-where-to-eat-buy-in-budapest.html