Sunday, July 14, 2019

डॅन्यूब संथ वाहातेच आहे .....

Shoes on the Danube


जगात कुठेही गेले तरी तिथल्या अनाम वीरांची , हुतात्म्यांची , स्वातंत्र्य सैनिकांची भव्यदिव्य  स्मारके आढळतात . या स्मारकांपासून पुढच्या पिढ्यानी प्रेरणा घ्यावी आणि  प्रसंगी देशासाठी/  राजासाठी बलिदान द्यावे यासाठी अगदी पूरातन काळापासून अशी स्मारके उभारली जाताहेत .


हंगेरीची राजधानी बुडापेस्ट मध्ये मात्र एक वेगळ्या प्रकारचे स्मारक पाहायला मिळाले . बुडापेस्ट शहराच्या मधून डॅन्यूब नदी वाहाते . या नदीने या शहराचे दोन भाग केलेले आहेत . नदीच्या एका किनाऱ्यावर बुडा वसलेले आहे तर दुसऱ्या किनाऱ्यावर पेस्ट वसलेले आहे . डॅन्यूब नदी ही युरोपातील महत्वाची नदी . जर्मनीत उगम पावून २८५० किलोमीटरचा प्रवास करुन ही नदी काळ्या समुद्राला जाऊन मिळते . आजपर्यंत अनेक संस्कृती या नदीच्या काठी नांदलेल्या आहेत त्यातलीच एक  आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेली रोमन संस्कृतीही या नदीच्या काठाने फोफावली . आजच्या घडीला व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) , ब्राटीस्लावा (स्लोव्हाकिया) , बुडापेस्ट (हंगेरी) , बेलग्रेड (सर्बिया) या ४ देशांच्या राजधान्या या नदीच्या काठी वसलेल्या आहेत . 
Danube River from Buda Castle 

बुडापेस्ट मध्ये डॅन्यूबच्या किनाऱ्यावर हंगेरियन पार्लमेंटची गॉथिक शैलीतील भव्य इमारत उभी आहे . या इमारतीपासून ५ मिनिटाच्या अंतरावर हे आगळेवेगळे स्मारक आहे . या ठिकाणी ३० बुटांच्या जोड्या नदीच्या काठावर ठेवलेल्या आहेत . ब्रॉंझ मध्ये बनवलेले हे स्त्री, पुरुषांचे ., मुलांचे बूट वेगवेगळ्या मापाचे , डिझाईनचे आहेत. या बूटांच्या जोड्यांच्या मागे काळा इतिहास आहे.

दुसऱ्या महायुध्दाच्या शेवटच्या काळात (१५ ऑक्टोबर १९४४ ते २८ मार्च १९४५ ) हंगेरीत ॲरो क्रॉस पार्टीची सत्ता होती .Ferenc Szálasi हा त्यांचा नेता होता . या पार्टीची विचारसरणी नाझींशी जुळणारी होती . नाझींच्या सहकार्याने  त्यांनी हंगेरीत हाहाकार उडवून दिला . त्याकाळी लाखाच्यावर ज्यू हंगेरीत राहात होते .  केवळ ५ महिन्यातच त्यापैकी ८०००० ज्यूंना ॲरो क्रॉस पार्टीने कॉंस्ट्रेशन कॅंप मध्ये पाठवून दिले,  तर १०००० च्यावर लोकांची बुडापेस्ट मध्येच हत्या करण्यात आली .

याच काळात ज्यूं स्त्री, पुरुष, मुलांना पकडून आणून डेन्यूबच्या काठावर त्यांना उभे केले जात असे . युध्दकाळात चामड्याचे बूट ही मौल्यवान वस्तू होती . त्यामुळे या पकडून आणलेल्या लोकांना बूट काढून डेन्यूबच्या काठावर नदीकडे तोंड करुन उभे केले जाई आणि त्यांना गोळ्या घातल्या जात . त्यांची कलेवर डेन्यूबच्या थंड पाण्याबरोबर वहात जात . मिळालेले बूट ते अधिकारी ,  सैनिक स्वतःसाठी ठेवत किंवा विकून टाकत .

ॲरो क्रॉस पार्टीच्या काळात झालेल्या या ज्यूंच्या शिरकाणाचे स्मारक म्हणून  “Shoes on the Danube” हे  स्मारक १६ एप्रिल २००५ रोजी उभारण्यात आले . या स्मारकाची कल्पना चित्रपट दिग्दर्शक  Can Togay यांनी मांडली आणि शिल्पकार  Gyula Pauer यांनी हे बुटांचे आगळेवेगळे शिल्प साकारले .
या स्मारकाला भेट देणारे पर्यटक या बूटांमध्ये फूले खोचून ठेवतात , काही जण रात्री या ठिकाणी मेणबत्त्या लावतात . या बळी गेलेल्या कोणाशीही रक्ताचे नाते नसतानाही केवळ माणूसकीच्या नात्याने आज हे सहज घडताना दिसत होते . काही वर्षापूर्वी याच माणूसकीचा दुसरा क्रूर चेहरा पाहीलेली डेन्यूब मात्र संथपणे पोटात थंड पाणी घेउन वहातेच आहे.....


Monday, May 6, 2019

निद्रिस्त ज्वालामुखीच्या विवरात, सुस्वा माउंटन , केनिया (Suswa Mountain , Kenya) offbeat Kenya

Baboon Parliament, Suswa Mountain, kenya

केनियात मसाई मारा अभयारण्यात जायचे ठरल्यावर आजूबाजूला अजून काही बघण्यासारखी आगळीवेगळी ठिकाणे आहेत का याचा शोध घेत होतो. गुगल मॅप बघताना सुस्वा माउंटन हे ठिकाण सापडले. रुढार्थाने हे पर्यटनस्थळ नाही. मुळात इथे जायला रस्ताच नाहीं. ऱस्ता म्हणून जे काही आहे ते पावसाळ्यात नसते. पण या सुस्वा माउंटनच्या पोटात अनेक रहस्य दडलेली आहेत. त्यामुळे सुस्वा माउंटनला जायचे नक्की केले.


Cave at Suswa Mountain, Kenya
नैरोबीतून मसाई माराला जाणारा महामार्ग ग्रेट रिफ्ट व्हॅलीतून जातो. ग्रेट रिफ्ट व्हॅली आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर ९६०० किलोमीटर पसरलेली आहे. खंडांच्या प्लेटसच्या सरकण्यामुळे ग्रेट रिफ्ट व्हॅली तयार झाली आहे, खंडांच्या या सरकण्यामुळे आजपासून अंदाजे ५० लाख वर्षांनी या व्हॅलीच्या जागी समुद्र असेल आणि ईस्ट अफ़्रिका हा अफ़्रिके पासून वेगळा झालेला नवीन खंड तयार होईल. रिफ़्ट व्हॅलीतून जातांना आजही आपल्याला लांबच्या लांब पसरलेले खंदक (Trenches) पाहायला मिळतात. "जमिन दुभंगली आणि आभळ फ़ाटल तर दाद मागायची कोणाकडे" या म्हणीचा प्रत्यय या व्हॅलीत राहाणार्‍या लोकांना नेहमीच येत असतो. खंडांच्या प्लेटच्या सरकण्याने या भागातील जमिन दुभंगते. या भागात अनेक सुप्त आणि जागृत ज्वालामुखी आहेत. जमिनीत त्यांच्या राखेचे थर आहेत. भरपूर पाऊस पडल्यावर ही राख हलकी असल्याने पाण्या बरोबर वाहून जाते आणि अचानक जमिन खचते. चीनेने नविनच बनवलेल्या महामार्गावर अशीच जमिन खचल्याने मोठा चर पडलेला आम्हाला पाहायला मिळाला. याच रिफ्ट व्हॅलीत सुस्वा माउंटन हे ज्वालामुखीमुळे तयार झालेले विवर आहे.या ठिकाणी ज्वालामुखीमुळे एकात एक अशी दोन विवरे तयार झालेली आहेत. अशा प्रकारे एकाच ठिकाणी एकात एक अशी दोन विवरे असणारे हे पृथ्वीवर एकमेव दुर्मिळ ठिकाण आहे .

Baboon's Parliament, Suswa Mountain , kenya 
मसाई माराहून नैरोबीला जाणाऱ्या महामार्गावर नारोख शहर आहे . या शहराच्यापुढे महामार्गाच्या उजव्या बाजूला सुस्वा माउंटन दिसतो. पण या डोंगरावर जाण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता लागते. आमचा मसाई वाटाड्या आमची महामार्गावर वाट पाहात उभा होता. मसाई पारंपारिक पेहराव केलेला रॉजर अस्खलित इंग्रजी बोलत होता. त्याच्या कमरेला मसाई सुरा लावलेला होता. तरस, बिबट्या यांच्याशी सुस्वातील मसाईंची अधूनमधून गाठ पडते. त्यांच्यापासून  संरक्षण करण्यासाठी ते हा मसाई सुरा वापरतात.   

महामार्ग सोडल्यावर एक कच्चा रस्ता सुस्वा माउंटनकडे जातो. या रस्त्यावर रिफ्ट व्हॅलीचे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या लांबच्या लांब पसरलेल्या जमिनीतील भेगा दिसत होत्या. या खडबडीत रस्त्यावरुन तासभराचा प्रवास केल्यावर आम्ही ज्वालामुखीच्या विवराच्या पायथ्याशी पोहोचलो. आता रस्ता असा नव्हताच रॉजर दाखवत होता त्यामार्गाने आमचा चालक गाडी डोंगरावर चढवत होता. केवळ अशा प्रदेशात चालवण्यासाठी बनवलेल्या ४ x ४ गाडी आणि गेली १५ वर्ष याभागात फिरणारा कसबी चालक असल्यामुळे आम्ही तासभरात विनासायास विवरात प्रवेश केला. हे ज्वालामुखीचे आतले विवर होते. दुरवर पसरलेला गवताळ माळ त्यावर चरणारी मसाईंची गुरे आणि हरणे दिसत होती. हे कुरण चारीबाजूनी विवराच्या कडेला तयार झालेल्या डोंगररांगेने वेढलेले होते. हे ज्वालामुखीचे आतील विवर होते. या आतल्या विवरात ऐंबेटिरा (Embetira) नावाच २०३१ फुट उंच शिखर आहे.  त्यावरून आतले आणि बाहेरचे अशी दोन्ही विवरे दिसतात. गाडी पुढे गेल्यावर चक्क एक शाळा दिसली . शाळेची पक्की बैठी इमारत होती. पण शाळा बाहेरच्या झाडाखाली भरली होती. आता मध्येमध्ये शेते आणि गाई गुर चारणारे मसाई गुराखी दिसायला लागले होते.


ऐंबेटिरा (Embetira) Highest Peak in Suswa Mountains, Kenya

 आतल्या विवरात मसाईंची तुरळक वस्ती आहे. आमची राहायची सोय ज्या मसाईच्या घरात केली होती तेथे आम्ही पोहोचलो. दोन कुडाची खोपट बाजूबाजूला होती. दोन्ही खोपट पत्र्याने आच्छादित केलेली होती. घरासमोर छोटेसे अंगण होते . त्याच्यापुढे थेट गवताचे कुरण चालू होते. घराला कंपाऊंड नव्हते. एका खोपटात त्या कुटुंबाचे स्वयंपाक घर होते. स्वयंपाक घरात जाण्याचा दरवाजा आपल्या दिंडी दरवाजा सारखा अरुंद आणि ३ फूट उंचीचा होता. त्यांच्या रोजच्या जेवणात मांसाचा वापर असल्याने त्याच्या वासाने जंगली जनावराने पटकन आत शिरु नये यासाठी अशाप्रकारे हा दरवाजा बनवलेला होता.  सुस्वा माउंटनला अजून वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे खोपटात सोलर दिवे होते.

आम्हाला दिलेले खोपटे शेणाने सारवलेले होते. ८ x ६ फूटच्या खोपटात दोन बेड कसेबसे बसवलेले होते. या दोन बेडवर आम्ही तीन जण कसे झोपणार हा प्रश्न होता. पण आमच्याकडे स्लीपिंग बॅग असल्याने एक जण जमिनीवर आरामात झोपू शकत होता. संडास- बाथरुम नव्हते. प्रातर्विधीसाठी गवताळ कुरण मोकळ होते. सह्याद्रीत फ़िरण्यची आम्हाला तिघांनाही सवय असल्याने या गोष्टी आम्हाला अडचणीच्या वाटल्या नाहीत. आमच्या यजमानांनी चहा आणून दिला. आपल्या सारखाच दुधाचा चहा त्या अपरिचित ठिकाणी मिळाल्याने प्रवासाने आलेला शिण निघून गेला. खोपटात सामान टाकून आम्ही एटंबेरा या आतल्या विवरात असणाऱ्या सर्वोच्च शिखराकडे (ऐंबेटिरा (Embetira)) निघालो. या शिखरावर जाऊन येण्यासाठी ४ तासांचा ट्रेक करावा लागतो. तर आतील पूर्ण विवर डोंगरावरुन फिरण्यासाठी ८ तासांचा ट्रेक करावा लागतो. 

वाफेतून पाणी काढायची अप्रतिम कल्पना Suswa Mountain, kenya

वाफेतून पाणी काढायची अप्रतिम कल्पना Suswa Mountain, kenya

जमिनीतील वाफ़ेतून पाणी काढण्याची शक्कल

एटंबेरा शिखराकडे निघाल्यावर वाटेत एका ठिकाणी लाकडी कुंपण घातलेली एक जागा दिसली . त्या कुंपणाच्या आत एका कोपर्‍यात जमिनीतून काही पाईप्स वर आलेले होते. त्या पाईपंमधून वाफ़ येत होती. त्या पाईपांच्या खाली एक १०००० लीटरची सिंटेक्सची टाकी ठेवलेली होती. जमिनीतून आलेल्या पाईपातून पाणी या टाकीत ठिपकत होते. हा सुस्वा माऊंटनवरचा पाणवठा होता. सुस्वा माउंटन येथे पावसा व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. त्यावर उपाय म्हणून जमिनीतून निघणाऱ्या वाफेतून पाणी काढायची अप्रतिम कल्पना मसाईनी लढवली आहे. सुस्वा माऊंटन हा सुप्त ज्वालामुखी असल्यामुळे या भागात काही ठिकाणी जमिन खोदल्यावर जमिनीतून वाफ़ बाहेर येते. अशा जागंचे पारंपारीक ज्ञान या भागात राहाणार्‍या मसाई लोकांना आहे. या ठिकाणी जमिन खोदून त्यात ५ ते १० पाईप्स "L" आकारात बसवले जातात. जमिनीतील वाफ़ या पाईपामधून वर येते. रात्रीच्या वेळी वातावरण थंड असते. त्यामुळे या वाफ़ेचे पाणी होते आणि ते पाणी टाकीत साठवले जाते. हल्ली जमिनितून ५ ते १० पईप्स आणण्यापेक्षा जमिनिवर आयताकृती सिमेंटचे चेंबर बांधून त्यावर एकच पाईप "L" आकारात बसवला जातो. अर्थात हे सिमेंटचे चेंबर बांधण्यासाठी शहरातून गवंडी बोलवावा लागतो. आंही ज्या अदभूत पाणवठ्याला भेट दिली तेथे दोन्ही प्रकारे जमिनीतील वाफ़ काढलेली होती. या पाणवठ्यावर सर्व मसाई पाड्याचा हक्क असतो. पण पाणी वापरण्याचे नियम सर्वजण पाळतात. कपडे भांडी कुंपणा बाहेरच धुतली जातात. आम्ही तेथे गेलो तेंव्हा दोन मसाई बायका कुंपणा बाहेर कपडे धुत होत्या. गाई गुरांना हे पाणी देत नाहीत. तसेच जनावर धुण्यासाठीही या पाण्याचा वापर केला जात नाही.

Entrance of cave at Suswa Mountain, kenya

सुस्वाचा माउंटन वरचा अदभूत पाणवठा पाहून आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. खुरट्या झुडूपातून, दाट झाडीतून जाणार्‍या मळलेल्या पायवाटेने २ तासात शिखरावर पोहोचलो. येथून ज्वालामुखीचे बाहेरील विवर आणि दोन विवरातील जंगलाचे दृश्य दिसते ते नजर खिळवून ठेवणारे आहे. इथे थोडावेळ थांबून आम्ही आल्या मार्गाने दिड तासात खाली उतरलो.

बिबट्याने खाऊन टाकलेल्या बबून माकडाचे अवशेष

गुहेतील बिबट्याची विष्ठा Suswa Mountain, Kenya

सुस्वा माऊंटन वरील दुसरी महत्वाची जागा (पाणवठा धरल्यास तिसरी महत्वाची जागा) म्हणजे "बबून्स पार्लमेंट". लाव्हा रसाच्या प्रवाहामुळे सुस्वा माउंटनवर काही गुहा तयार झालेल्या आहेत. त्यांना लाव्हा ट्युब्स (Lavha Tubes) म्हणतात.  Baboon's Parliment ही ६ मैल लांबीची लाईम स्टोनची गुहा आहे.  गुहेच्या वरच्या बाजूला जंगल आहे. २० पायर्‍या उतरुन आपण गुहेच्या तोंडाशी पोहोचतो. उजव्या बाजूला एका गुहेच तोंड आहे तर डाव्या बाजूला दुसर्‍या गुहेचे तोंड आहे. आम्ही आमच्या वाटाड्या मागोमाग प्रथम उजव्या बाजूच्या गुहेत शिरलो. साधारणपणे २० फ़ूट उंच आणि २० फ़ूट रुंद गुहेचे तोंड होते. गुहा १०० फ़ूट लांब होती. आत गेल्यावर काळोख वाढल्याने जवळच्या विजेर्‍या पेटवाव्या लागल्या. गुहेच्या शेवटी जमिनीत एक खड्डा होता. त्यावर झाडाची मजबूत फ़ांदी आडावी टाकलेली. त्या फ़ांदीला एक जाड रस्सी बांधलेली होती. या रस्सीच्या सहाय्याने आत उतरता येते. या ठिकाणी वटवाघूळांचे वास्तव्य आहे. त्याचा अतिशय घाणेरडा आणि उग्र वास येत होता. त्यामुळे आम्ही गुहेत न उतरण्याचा निर्णय घेतला आणि परत फ़िरलो. गुहेच्या तोंडाशी पायर्‍यांवर २ हेरेक्स (अफ़्रिकन मोठे उंदीर) आमच्याकडे पाहात बसलेले होते. 


Suswa Mountain, Kenya
आता आम्ही दुसर्‍या बाजूच्या गुहेत शिरलो. इथे जमिन ओबड धोबड होती. मोठ मोठे खडक छतापासून सुटून खाली पडल्यामुळे चालतांना कधी या खडकांच्या बाजूने चिंचोळ्या जागेतून तर कधी खडक पार करुन पुढे जावे लागत होते. पाया खालून पाण्याचा प्रवाह वाहात होता. त्यामुळे त्या मिट्ट काळोखात वाटाड्याच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही पुढे जात होतो. एके ठिकाणी थांबून वाटाड्याने आम्हाला गुहेच्या कोपर्‍यात पडलेला विष्ठेचा ढिग दाखवला. ती बिबट्याची विष्ठा होती. बिबट्यांना एकाच जागी विष्ठा विसर्जीत करायची सवय असते. गुहेत जमा होणार्‍या बबून माकडांना खाण्यासाठी बिबट्यांचा या गुहेत वावर असतो. पुढे गुहा काटकोनात वळली आणि काळोख अजूनच दाट झाला. उजव्या - डाव्या बाजूला गुहेला फ़ाटे फ़ुटलेले होते. १० मिनिटे चालल्यावर दूरवर प्रकाश दिसायला लागला. याठिकाणी गुहेचे छत कोसळून झाडाची मुळ आत आली होती. छतापासून १० फुटाचा ओबड धोबड खडक छत कोसळल्यामुळे उघडा पडलेला आहे . या खडकात अनेक नैसर्गिक खाचा आहेत. दररोज संध्याकाळी सुस्वा माउंटन मधली सर्व बबुन माकडे या गुहेच्या वरच्या बाजूला जमा होतात. जसजशी रात्र होत जाते तसतशी ही माकडे जंगलातून गुहेतल्या कपारीत उतरायला सुरुवात करतात आणि आपल्या भक्षक बिबळ्यापासून वाचण्याकरिता जास्तीत जास्त अवघड जागी जाऊन बसतात आणि तिथेच संपूर्ण रात्र काढतात. शेकडो वर्षे या ठिकाणी माकडे येत आहेत. त्यामुळे या भागाला "बबुन्स पार्लमेंट" असे नाव पडले आहे.  बबून माकडांच्या वावरण्याने आणि मलमूत्रामुळे इथले दगड गुळगुळीत झालेले आहेत. त्या गुळगुळीत झालेल्या दगडावर हाताची पकड बसणे मुश्किल आहे. तरीही बिबट्यापासून वाचण्याकरिता जीव धोक्यात घालून माकडे या कपारीत उतरतात आणि अवघड जागी जाऊन बसून, झोपून रात्र काढतात. सगळ्यात अवघड जागा पकडण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. या प्रयत्नात एखादे माकड खाली पडले तर जगण्याची शक्यता फारच कमी असते अशी माकडे बिबट्याची शिकार होतात. बिबट्या चोरपावलाने गुहेत येऊन डरकाळी देतो. त्यामुळे एखादे बेसावध माकड घाबरुन खाली पडते आणि बिबट्याची त्याची शिकार करतो. बबून्स माकडांच्या काही कवट्या आणि हाड तिथे विखुरलेली पाहायला मिळाली. 
 
बबून माकडांच्या मलमूत्रामुळे गुळगुळीत झालेले दगड.


बबून माकडांच्या मलमूत्रामुळे गुळगुळीत झालेले दगड.

जास्तीत जास्त उंच्, निसरड्या आणि अडचणीच्या जागी बबून्स रात्री बसतात.
Cave Suswa Mountain, Kenya
गुहेत पुढे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला बिबळ्याची विष्ठा एकेजागी साठलेली दिसत होती. गुहेतला अंधार आणि त्याबरोबर वटवाघूळांचा येणारा घाणेरडा उग्र वास आता वाढत चालला होता. नाकावर रुमाल बांधून आम्ही पुढे निघालो. इथे छताला अक्षरश: हजारो वटवाघुळ (Giant Mastiffs bats) लटकत होती. मोठे कान आणि सुटी शेपूट असलेल्या या वटवाघूळांची ही जगातली सगळ्यात मोठी वसाहत आहे. या वटवाघूळांच्या वास्तव्यामुळे या गुहेच्या जमिनीवर वटवाघुळांच्या विष्ठेचा पांढर्‍या रंगाचा थर जमलेला आहे. या थरातही अनेक किटक आहेत. आजारी आणि लहान वटवाघूळ ज्यावेळी छतावरुन खाली पडतात तेंव्हा हे किटक त्यांचा फ़न्ना ऊडवतात. संध्याकाळच्या वेळी ही हजारो वटवाघूळे "बबून्स पार्लमेंट" पार करुन गुहेच्या छताला पडलेल्या भोकातून बाहेर पडतात त्यावेळी आकाश काही काळासाठी झोकाळून जाते. वटवाघळे बाहेर पडल्यावर बबुन्स, बिबटे आणि किटकांचा गुहेत वावर सुरु होतो. सकाळी बबुन्स माकडे गुहेच्या बाहेर पडली की, वटवाघळांची परतायची वेळ होते. शेकडो वर्षे हे चक्र अव्याहतपणे चालू आहे.

वटवाघळांच्या घाणेरड्या वासामुळे त्याठिकाणी जास्त वेळ उभे राहाणे शक्य नव्हते. आम्ही मागे फ़िरुन आल्या मार्गाने गुहेच्या बाहेर आलो. आता सूर्य अस्ताकडे चालला होता आणि बबून माकडांची एक टोळी "बबून्स पार्लमेंट्स"च्या दिशेने चालली होती.          
 
आमचा वाटाड्या
कसे जाल :- केनियाची राजधानी नैरोबी गाठावी लागते. नैरोबी ते सुस्वा माऊंटन हे अंतर १२५ किलोमीटर आहे. साधारणपणे चार तासात हे अंतर कापता येते. सुस्वा माऊंटनवर तंबू लावून किंवा स्थानिक मसाई मारांच्या घरात राहाण्याचे आणि जेवणची सोय होते. नैरोबीहून पहाटे निघून एका दिवसात सुस्वा माऊंटन पाहून परत नैरोबीला पोहोचता येते. दुसरा पर्याय म्हणजे मसाई मारा पाहून नैरोबीला परतताना सुस्वा माऊंटनला जाता येते. सुस्वा माऊंटनचा हे ऑफ़बीट ठिकाण असल्याने केनिया सफ़ारीचे बुकींग करतानाच टूर ऑपरेटशी बोलून प्लान ठरवावा.


Baboon, Kenya
केनिया सफ़ारी त्याचे प्लानिंग आणि आजूबाजूची ऑफ़बीट ठिकाणे यावर ६ लेख लिहिलेले आहेत ते जरुर वाचावेत.

#OffbeatKenya

Thursday, April 4, 2019

वीरगळ , सतीशिळा , गध्देगळ , धेनुगळ (Hero Stone, Sati Stone, Gadhhegal, Dhenu (Cow) Stone)

Veergal (Hero Stone) at Bhairavgad (Shirpunje)

प्रत्यक्ष किल्ल्या बरोबर, किल्ल्या खालचे गाव, किल्ल्या पर्यंत जाणारे रस्ते यावर अनेक ऐतिहासिक खुणा, अवशेष विखुरलेले असतात . किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात देवळात किंवा पारावर अनेकदा वीरगळ, समाध्या, सतीचे हात, तुळशी वृंदावन, छत्री इतिहासाचे साक्षिदार इत्यादी पाहायला मिळतात. युध्दात कामी आलेल्या वीरांसाठी, गोरक्षण करतांना धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारके म्हणुन वीरगळ उभारले जात असत. या स्मारकांमुळे पुढील पिढीला प्रेरणा मिळत असे. त्या वीरांबरोबर सती गेलेल्या स्त्रीयांसाठी सतीचा हात उभारला जात असे. तर मातब्बर सरदार, राज घराण्यातील लोक यांच्या समाध्या व स्त्रीयांसाठी तुळशी वृंदावन उभारले जाई.

देवळाच्या आवारात दिसणारे वीरगळ

शेंदुर / रंग लावून विद्रुप केलेले वीरगळ 

वीरगळ :-

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गावात आढळ्णारे वीरगळ हा खरतर आपला ऐतिहासिक ठेवा आहे पण अती परिचयामुळे एकतर त्याचा शेंदुर फासून देव बनवलेला असतो किंवा दुसरे टोक म्हणजे पायरीचा, कपडे धुण्याचा दगड म्हणूनही वापर केलेला पाहायला मिळतो.  पूरातत्व खात्याने केलेल्या औसा, परांडा इत्यादी किल्ल्याच्या डागडूजीमध्ये वीरगळीचे तुकडे तटबंदीत वापरलेले पाहायला मिळतात. शिलाहार काळापासून साधारणपणे सतराव्या शतकापर्यंत वीरगळ बनवण्याची प्रथा चालू होती.  वीरगळ ही स्मृती शिळा आहे. युध्दात, गोधनाचे रक्षण करताना, एखाद्या पवित्र कार्यासाठी बलिदान करतांना जर एखाद्याला वीर मरण आले, तर त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ वीरगळ उभारला जात असे. त्यापासून पुढच्या पिढीलाही आपल्या धर्मासाठी, राजासाठी लढण्याची, बलिदान करण्याची प्रेरणा मिळत असे. 


Veergal (Hero stone), Eksar, Borivali

वीरगळ हा आयताकृती दगडावर कोरलेला असतो. या दगडावर १,२,३ किंवा ४ चित्र (शिल्प) चौकटी कोरलेल्या असतात. सर्वात खालच्या चौकटीत ज्या कारणामुळे योध्याला वीर मरण आले ते शिल्पांकीत केलेले असते. यात वीर युध्द करतांना, गोधनाचे रक्षण करतांना, हिंस्त्र प्राण्याशी लढतांना, शिकार करताना दाखवलेला असतो. दुसऱ्या चौकटीत तो अप्सरांबरोबर दाखवलेला असतो. याचा अर्थ अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत तो स्वर्गसुख उपभोगत आहे असा होतो. त्यापुढील तिसर्‍या चौकटीत ब्राम्हण/ साधू पूजा सांगत आहे आणि वीर एकटा किंवा सपत्नी शंकराच्या पिंडीची पूजा करतांना पाहायला मिळतो. याचा अर्थ त्याने केलेल्या पूण्य कर्मामुळे तो देवाशी एकरुप झालेला आहे. त्याला मोक्ष मिळालेला आहे. या चौकटीच्यावर पिंड, मंगल कलश आणि त्याच्या एका बाजूला चंद्र आणि दुसर्‍या बाजूला सूर्य कोरलेला असतो. याचा अर्थ सूर्य आणि चंद्र असे पर्यंत या वीराची किर्ती आसमंतात राहील. पण सत्य परीस्थिती अशी आहे की, वीरगळावर फ़ार कमी प्रमाणात शिलालेख आहेत. त्यामुळे वीरगळ पाहून त्यातील वीर कोण आहे, कुठल्या युध्दात तो कामी आला आणि वीरगळाचा निर्माता कोण आहे हे सांगता येत नाही. अर्थात याला काही अपवाद आहेत. बोरीवलीतील एकसार भागात असलेल्या वीरगळीवर शिलाहार राजा सोमेश्वर आणि यादव राजा महादेव यांच्यात झालेले नौकायुध्द कोरलेले आहे. अशाप्रकारे नौका युध्द कोरलेली महाराष्ट्रातील ही एकमेव वीरगळ आहे. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर असलेल्या मठ गावात असलेल्या सावंतांच्या वीरगळी आहेत त्यावर शिलालेखही कोरलेले आहेत. या शिलालेखात वीरगळींचा उल्लेख भडखांब म्हणून केलेला आहे.

नौकायुध्द, एकसार , बोरीवली

एकसार , बोरीवली

वीरगळी, मठ, सिंधुदुर्ग

Veergal with inscription at Math, Dist. Sindhudurg

वीरगळींच्या चित्र चौकटींच्या वरच्या भागात कलशा व्यतिरीक्त इतर अनेक गोष्टी पाहायला मिळतात. वीर कोणत्या धर्माचा (हिंदू, जैन बौध्द), कोणत्या पंथाचा (शैव, वैष्णव इत्यादी) उपपंथाचा असेल त्याप्रमाणे शिल्पांकन बदलत जाते.  वीर वैष्णव पंथी असल्यास विष्णू, गाणपत्य पंथीय असल्यास गणपती, बौध्द असल्यास स्तुप पाहायला मिळतो. वीरगळां सारख्याच काही ठिकाणी साधूशिळा पाहायला मिळतात. त्यात पहिल्या चौकटीत साधू ध्यान करत असलेला किंवा आडवा पडलेला दाखवलेला असतो. त्यावरील चौकटीत तो शिवलिंगाची पूजा करतांना दाखवलेला असतो. बहुतेक वीरगळी आयताकृती दगडाच्या एका बाजूला कोरलेल्या असतात. तशाच काही वीरगळी चारही बाजूला कोरलेल्या पाहायला मिळतात. चारी बाजूने कोरीवकाम करण्यासाठी नक्कीच जास्त खर्च येत असणार. त्यामुळे वीराच्या हुद्द्याप्रमाणे ऐपती प्रमाणे (वीर किती सधन आणि मातबर होता) त्याचे वंशज खर्च करुन वीरगळ तयार करत असणार. त्यामुळे काही वीरगळ एकाच बाजूला कोरलेल्या तर काही  चारही बाजूंनी कोरलेल्या पाहायला मिळतात. वीरगळीसाठी वापरला जाणारा दगड, त्यावरील कलाकुसर या गोष्टीही खर्चिक असल्याने जवळपास उपलब्ध होणारा दगड वापरुन कमीत कमी कलाकुसर केलेल्या वीरगळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याउलट एकसारच्या वीरगळी राजाने त्याच्या विजया निमित्त उभारल्यामुळे त्यासाठी बाहेरुन आणलेला उत्कृष्ट दगड, त्यावरील सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. 

Paliya Stone near Hatgad

Paliya Stone near Hatgad

किल्ले, डोंगर दर्‍या फ़िरतांना आदिवासी / वनवासी वस्ती, पाड्याजवळ एखाद्या उभ्या लाकडी फ़ळीवर कोरलेले चक्र/फ़ूल त्या खाली कोरलेल्या सुर्य - चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली कोरलेली घोड्यावर बसलेल्या किंवा युध्द करणार्‍या वीराची प्रतिमा पाहायला मिळते. या असतात आदिवासी वीरांच्या वीरगळी. याशिवाय दगडात कोरलेल्या वीरगळीत घोड्यावर बसलेला योध्दा दाखवलेला असतो. वरच्या बाजूला सूर्य चंद्र कोरलेले असतात. ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या सेगवा किल्ल्यावर अशी वीरगळ आपल्याला पाहायला मिळते. गंमतीचा भाग म्हणजे त्यावीराचा पोषाख काठेवाडी पध्दतीचा आहे. नगर जिल्ह्यातील भैरवगड (शिरपुंजे) किल्ल्यावर घोड्यावर बसलेल्या वीराची प्रतिमा कोरलेली आहे. नाशिक जिल्ह्याच्या गुजरात सीमेला लागून असलेल्या भागात आपल्याला ४ ते ५ फ़ूट उंच वीरगळी पाहायला मिळतात. गुजरातमध्ये अशा प्रकारच्या वीरगळी आहेत. त्यांना पलिया (paliya stone) नावाने ओळखतात. त्याच शैलीचा प्रभाव या नाशिक जिल्ह्याच्या गुजरात सीमेला लागून असलेल्या भागात असलेल्या वीरगळींवर दिसून येतो.

Hero stone Ballalgad Fort

बौध्द (स्तुप कोरलेली) वीरगळ, नालासोपारा

साधूची वीरगळ, नालासोपारा

वाघदेव :-

डोंगरवाटा धुंडाळतांना काही लाकडी फ़ळ्यांवर सुर्य - चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली कोरलेली वाघाची प्रतिमा पाहायला मिळते. याला आदिवासी लोक "वाघदेव" म्हणतात. लाल, पिवळा, केशरी या नैसर्गिक रंगात वाघदेवाची प्रतिमा रंगवलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी वाघाच्या खाली सापाची प्रतिमाही कोरलेली आढळते. जंगलातील हिंस्त्र श्वापदांपासून आदिवासींचे त्यांच्या गाईगुरांचे रक्षण वाघदेव करतो अशी आदिवासींची श्रध्दा आहे. जंगलाशी नेहमीच संबंध येणार्‍या आदिवासींना वाघ, बिबटे इत्यादी मार्जारवंशीय प्राण्यांकडुन होणार्‍या प्राणघातक हल्ल्याची भिती मनात ठेउनच जंगलात जावे लागते. या भितीतूनच " वाघदेव " या कल्पनेचा जन्म झाला असावा.लाकडी फ़ळीवर कोरलेली वाघदेवाची प्रतिमा असलेले काष्ठशिल्प आदिवासी आदिम काळापासून बनवत असावेत. जंगलात सहजपणे उपलब्ध होण्यार्‍या लाकडावर कोरीवकाम करुन त्याला नैसर्गिक रंगात रंगवून "वाघदेव" तयार केला जातो. त्यानतंरच्या काळात दगडात कोरलेल वाघाच शिल्प (हरिशचंद्र गडावर जातांना टोलार खिंडीत वाघाच शिल्प पाहायला मिळत.) . याशिवाय नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात असलेल्या न्हावीगडावर चढताना, ठाणे जिल्ह्यातील अशेरीगडावर वाघदेव पाहायला मिळतात.

Waghdev Asheri Fort

Waghdev , Nhavigad

Old wooden panels & new cement concrete idol

लाकडावर कोरले जाणारे हे वाघदेव उन पावसाच्या मार्‍याने खराब होत. त्यावर उपाय म्हणुन आताच्या आधुनिक काळात वाघदेवाची सिमेंटची बेढभ आणि भडक रंगात रंगवलेली मुर्ती पाहायला मिळते. काही ठिकाणी अशी वाघ देवांची मंदिरेही पाहायला मिळतात. काळाबरोबर होणार्‍या सिमेंटच्या या आक्रमणामुळे लाकडावर वाघदेव कोरण्याची ही कला आणि पध्दत लुप्त होईल. भारतभर पसरलेल्या जंगलात असलेल्या वाघदेवांची पूजा दरवर्षी "वाघबारसीला" म्हणजेच अश्विन वद्य व्दादशीला होते.

सतीशिळा :-

सतीचा हात Sati Stone
सतीगळ Sati Stone

वीर-सतीगळ
वीर-सतीगळ

वीरांबरोबर सती जाणार्‍या स्त्रियांच्या स्मरणार्थ सतीशिळा बनवल्या जात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळ्णार्‍या सतीशिळांमध्ये स्त्रीचा खांद्यापासून हात चित्रीत केलेला असतो. हा हात कोपरात काटकोनात वळलेला असतो. हातात बांगड्या असतात. हाताखाली दोन प्रतिमा कोरलेल्या असतात. त्या स्त्रीच्या मुलांच्या प्रतिमा असाव्यात. या हाताची रचना आशिर्वाद देणार्‍या हाताप्रमाणे असते. तसेच सतीशिळा देवळाच्या परिसरात उभारल्या जात असत . त्यामुळे सतीशिळेची शेंदुर लाऊन पूजा केल्याचे बर्‍याच ठिकाणी पाहायला मिळते. वीरगळी प्रमाणे एक, दोन किंवा तीन शिल्प चौकटीत सतीशिळा कोरलेली असते. त्यात खालच्या चौकटीत चितेवर बसलेली स्त्री, चितेच्या बाजूला उभी असलेली स्त्री किंवा नवर्‍याच डोक मांडीवर ठेऊन चितेवर बसलेली स्त्री, वाघावर , घोड्यावर बसलेली स्त्री कोरलेली असते. दुसर्‍या चौकटीत नवरा बायको हातात हात घालून उभे राहीलेले दाखवलेले असतात. पहिल्या किंवा दुसर्‍या चौकटीत उजव्या बाजूला सतीचा कोपरापासूनचा हात दाखवलेला असतो. तिसर्‍या चौकटीत नवरा बायको पिंडीची पूजा करतांना दाखवलेले असतात. त्यावर सूर्य चंद्र कोरलेले असतात. वीराबरोबर त्याच्या दोन किंवा तीन पत्नी सती जात असत. त्यांचे प्रतिक म्हणून कोपरात वाकवलेले दोन किंवा तीन हात दाखवलेले असतात. काही वीरगळामध्ये वीराची पत्नी आणि सतीचा हातही दाखवलेला असतो. त्याला वीरसतीगळ असे म्हणतात. ही वीराची आणि सती या दोघांची एकच स्मृतीशिळा असते. 

धेनूगळ :-


धेनूगळ, जि.नांदेड

धेनूगळ, दुंधा किल्ला, जि.नाशिक

धेनूगळ म्हणजे गाय वासरु दगड हे एक दानपत्र आहे. दान दिलेल्या गावाची, जमिनीची सीमा दाखवण्यासाठी धेनूगळ वापरला जात असे. या आयताकृती उभ्या दगडावर गाय आणि वासरू कोरलेले असते. वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात. गाय हे राजाचे प्रतिक असून वासरू हे प्रजेचे प्रतिक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो. या गाय वासरू दगडांवर काही ठिकाणी शिलालेखही कोरलेले पाहायला मिळतात.

गध्देगळ :-

Gadhegal, Karneshwar Temple, Sangmeshwar

Gadhegal, Paranda Fort

प्रजेचा प्रतिपाळ करणारा राजा प्रजेने राजाज्ञा मोडली तर त्याची गय करणार नाही हे दर्शविण्यासाठी गध्देगळ कोरले जात असत. गध्देगळ हे दानपत्र होते. शिलाहार राजांच्या काळात चालू झालेली ही प्रथा इस्लामी राजवटी पर्यंत असावी. कारण विजापूर येथिल गध्देगळांवर फ़ारसी शिलालेख आहे. गध्देगळ हा दगड आयताकृती असून यावर गाढव स्त्रीशी संभोग करतांना दाखवलेले असते. दिलेल्या दानाचा दुरुपयोग केल्यास, नियम मोडल्यास काय शिक्षा होईल हे सांगणारी ही शिल्पांकीत केलेली धमकी / शिवी असते. वरच्या बाजूस सूर्य चंद्र आणि मध्ये कलश कोरलेले असतात. हे अर्थात दान देणार्‍या राजाची किर्ती आसमंतात कायम राहील हे दर्शवणारी असतात. काही गध्देगाळांवर संस्कृत, मराठी, फ़ारसी भाषेत शिलालेख कोरलेले पाहायला मिळतात. त्यात कोणी  कोणाला दान दिले. त्याचा गैरवापर केल्यास काय शिक्षा होईल याचा उल्लेख केलेला असतो. डोंबिवलीतील गावदेवी मंदिराजवळ असा शिलालेख असलेला गध्देगाळ पाहायला मिळतो. कल्याण जवळ असलेल्या लोणाड गावात, मुंबईतही गध्देगाळ सापडलेले आहेत. परांडा किल्ल्यातील हमामखान्यातही एक गध्देगळ ठेवलेला आहे. याशिवाय मंदिर परिसरातही गध्देगाळ पाहायला मिळतात. संगमेश्वर जवळील कर्णेश्वर मंदिर, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले पूरचे नारायणेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळ्याचे वेतोबा मंदिर इत्यादी अनेक ठिकाणी गध्देगळ आहेत. गावात सापडलेले वीरगळ, मुर्ती देवळाच्या परीसरात आणून ठेवलेल्या असतात. तसेच हे शेतात, बांधावर सापडलेले वीरगळ मंदिरात आणून ठेवलेले आहेत. या दगडांचे ऐतिहासिक महत्व माहिती नसल्यामुळे आणि केवळ यावर अश्लील शिल्प आहे, या कारणास्तव गध्देगाळ नष्ट केला जातो. सध्या पूरचा गध्देगाळ जमिनीत पुरला आहे, तर परुळ्याचा विहिरीत फ़ेकलेला आहे.

विहिरीत फ़ेकलेला गध्देगळ 


समाधी :-

किल्ल्यांवर आणि गावांमध्ये आपल्याला अनेक समाध्या पाहायला मिळतात. सुधागड किल्ल्यावर भोराई देवी मंदिराच्या बाजूला असलेल्या माळावर अनेक समाध्या विखुरलेल्या पाहायला मिळतात. समाध्या साधारणपणे आयताकृती किंवा चौरस असतात. ज्याची समाधी आहे त्याच्या हुद्द्याप्रमाणे ऐपती प्रमाणे त्यावर नक्षीकाम केलेले असते किंवा स्थानिक दगडापेक्षा वेगळा दगड वापरलेला असतो. समाधीच्यावर पावले किंवा शिवलिंग कोरलेले असते .राजघराणातल्या व्यक्तींच्या समाध्या सहसा एकाच ठिकाणी कलात्मक पध्दतीने बांधलेल्या पाहायला मिळतात. इस्लामी स्थापत्य शैलीत खाशांच्या कबरींवर घुमट बांधले जात. धुळे  जिल्ह्यातील थाळनेर गावात फारुकी घराण्यातील राजांच्या व महत्त्वाच्या व्यक्तींच्या कबरी आहेत. त्या कबरीवर बांधलेले घुमट, कोरलेले शिलालेख पाहायला मिळतात. या घुमटावरुनच राजस्थानी शैलीतील छत्रीचा उगम झाला. महाराष्ट्रातही छत्री समाध्यांसाठी स्विकारली गेली. त्यामुळे पंधराव्या शतकानंतर बांधलेल्या समाध्यांवर याची छाप दिसते. फ़लटण येथील निंबाळकरांच्या समाध्या, शेगाव जवळच्या बाळापूर गावात जसवंतसिंहाने बांधलेली समाधी यावर राजस्थानी शैलीतील प्रभाव दिसून येतो.

वीरगळ , सतीशिळा , गध्देगाळ , गायवासरु दगड (धेनुगळ) हे काही अपवाद वगळले तर मुकं दगड आहेत. कारण त्यावर कुठलेही लिखाण नसल्यामुळे ते कुठल्या काळातले आहेत, कशा बद्दलचे आहेत हे कळत नाही . शिलालेखामुळे ही उणीव भरुन निघाली आणि दगड बोलके झाले. मौर्य सम्राट अशोकच्या काळात इसवीसन पूर्व तिसर्‍या शतकात शिलालेख कोरण्यास सुरुवात झाली.  आजमितीला महाराष्ट्रात लेण्यामध्ये, किल्ल्यात, मंदिरात, तोफ़ांवर संस्कृत, मराठी, उर्दु, फारसी, पोर्तुगीज, इंग्रजी भाषेतील तसेच ब्राम्ही, मोडी, देवनागरी इत्यादी लिपीतील शेकडो शिलालेख पाहायला मिळतात.

शिलालेख:-


तीन लिपीं मधील शिलालेख, धारुर

Inscription on gate of Narnala Fort

Inscription, Kandhar Fort

शिलालेख

धारुर किल्ल्यावर एकच शिलालेख संस्कृत, उर्दू आणि फारसी लिपींत कोरलेला आहे. शिलालेख विजय संपादन केल्यावर, किल्ला मंदिर, मंदिर, मस्जिद इत्यादींची बांधणी, पूर्न्बांधणीधणीदानपत्र म्हणून जो शिलालेख लिहीलेला असतो. त्यात ५ गोष्टींचा उल्लेख असतो . हे दानपत्र कोणी दिल , कोणाला दिल , कधी दिल , दानात काय दिल आणि त्यावेळी कोणकोण उपस्थित होते याची माहिती कोरलेली असते . किल्ल्याची बांधणी , पूनर्बांधणी केल्यावर करणाऱ्याचे नाव , तारीख , त्या बुरुजाचे, दरवाजाचे नाव कोरलेले असते.  इस्लामी काळात महालामध्ये, मशीदीत कुराणातील वचन, आयता कोरलेल्या पाहायला मिळतात. मंदिरातही अनेक शिलालेख पाहायला मिळतात. त्यात मंदिर बांधणार्‍याचा, त्याचा जिर्णोध्दार करणार्‍याचा उल्लेख केलेला असतो. लेण्यातही दान देणार्‍यांचा नावाचा शिलालेख कोरलेला असतो.

अंतुर किल्ल्या जवळील दिशादर्शक शिळा

याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील अंतुर किल्ल्यापासून नागापूरला जातांना रस्त्याच्या बाजूस डावीकडे एक पूरातन मैलाचा दगड पाहायला मिळतो. त्यावर फ़ारसी भाषेत चार शहरांना जाणारे मार्ग चार बाजूंना कोरलेले आहेत. वीरगळ , सतीशिळा , गध्देगाळ , धेनुगळ, शिलालेख यावर लिहीलेली माहिती बर्‍याचदा त्रोटक असते. त्याकाळाच्या संदर्भात त्यांचा अभ्यास केल्यास बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो, नविन संदर्भही मिळू शकतात.  इतिहासाचे असे अनेक मुक, बोलके साक्षिदार आपल्या आजूबाजूला विखुरलेले आहेत. त्यांच्याकडे डोळसपणे पाहिल तर काळाच्या ओघात इतिहासातील हरवलेले दुवे आपल्याला नक्कीच सापडू शकतात.

गाईंसाठी धारातीर्थी पडलेला वीर, टाकळी ढोकेश्वर