Saturday, September 25, 2021

रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी, कर्जत (Rambaug Point , Matheran to Pokharwadi, Karjat)

              कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेनंतर ट्रेकिंगला सुरुवात करायची होती. अनेक महिने ट्रेक न केल्यामुळे  सगळ्यांची कॉन्फिडन्स लेव्हल एकदम "हाय" होती. ट्रेकसाठी विचारल्यावर लोकांनी जी कारण सांगितली त्यावर "ट्रेकला न येण्याची १०१ कारणे" हे पुस्तकं लिहिता येईल. त्यामुळे जे उरले होते, त्यांच्याशी चर्चा करून त्यातल्या त्यात सोपा ट्रेक ठरवला. रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी, कर्जत.

 


माथेरानला जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. त्यातल्या कर्जत बाजूकडून येणाऱ्या वाटांपैकी खाटवणं ते अलेक्झांडर पॉईंट आणि बुरुजवाडी / दांडवाडी ते रामाबाग पॉईंट या वाटा गावाकऱ्यांच्या रोजच्या वापरातल्या असल्याने मळलेल्या आहेत. या गावातील लोकांची रोजंदारीसाठी रोज माथेरनला जा - ये चालू असते. यापैकी खाटवणं ते अलेक्झांडर पॉईंट ही वाट शेवटच्या टप्प्यात तीव्र चढाईची आहे, तर बुरुजवाडी / दांडवाडी ते रामाबाग पॉईंट ही वाट मध्यम चढाईची आणि फ़िरत फ़िरत जाणारी आहे. त्यामुळे भर पावसात रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी, कर्जत ही वाट उतरायची असे ठरवून आम्ही सकाळीच माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर पोहोचलो.

 


दस्तुरीपासून रामबाग पॉईंट ४ किलोमीटर अंतरावर आहे. माथेरानचा माथा पावसाळ्यात ढगात गुरफ़टलेला असतो. धुक्यात गुरफ़टलेल्या जंगलातील वाटेने पावसाळी कुंद वातावरणात लाल मातीची वाट तुडवत बाजारपेठ गाठली. नाश्त्यासाठी एकच केतकर हॉटेल उघडलेले होते. पर्यटकां ऐवजी स्थानिक लोकांचीच हॉटेलात वर्दळ होती. अशा ठिकाणी नेहमीच चांगले चविष्ट पदार्थ मिळतात. भरपेट नाश्ता करुन अलेक्झांडर पॉईंटकडे निघालो. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण शोधणार्‍या मॅलेटच्या जावयाचे (भाचीच्या नवर्‍याचे) नाव या पॉईंटला दिलेले आहे. मुख्य रस्ता सोडून आतल्या रस्त्यावर आल्यावर झाडांची दाटी अधिकच वाढली. सततच्या पावसामुळे झाडावर आलेले शेवाळं (मॉस) आणि बांडगुळ त्यांच्या रंगामुळे उठून दिसत होती. रस्त्याच्या कडेला असलेली वारुळं पावसात "पॅक बंद" केलेली दिसत होती. पॉईंट जवळ आल्यावर धुक्यातून एक कुटुंब समोर आले. त्यांच्या वेषावरुन ते खालच्या गावातून आलेले वाटत होते. थांबून त्यांच्याशी गप्पा मारल्या, ते सर्वजण खाटवण गावात राहातात आणि हॉटेलात काम करण्यासाठी रोज माथेरानला डोंगर चढून येतात. आम्ही रामबागेतून उतरणार आहे असे सांगितल्यावर त्यांच्यातल्या एकाने आम्हाला, "खाटवण पर्यंत वाट दाखवतो तुम्हाला जसे वाटतील तेवढे पैसे द्या असे सांगितले". पण आम्हाला त्या वाटेने उतरायचे नसल्याने आम्ही रामबाग पॉईंटकडे निघालो.

 



माथेरानच्या बहुतेक पॉइंटसना तो शोधणार्‍या साहेबांची, त्याच्या नातेवाईकांची किंवा खाली असणार्‍या गावांची नाव दिली आहेत. अलेक्झांडर पॉईंट पासून माथेरानच्या दक्षिण टोकावर असलेल्या चौक पॉईंट पर्यंत असलेल्या कड्या खाली सुंदर जंगल आहे. हे जंगल रामबाग किंवा रामाची बाग या स्थानिक नावाने ओळखले जाते. त्यावरुन या पॉइंट "रामबाग" हे नाव मिळाले. गॅझेटीअर मध्ये या पॉइंट्चा उल्लेख नाही. त्यामुळे हा नंतरच्या काळातला असावा. रामबाग पॉइंटच्या रेलिंगपाशी पोहोचलो . अजूनही आम्ही ढगात असल्याने आजूबाजूचा परिसर दिसणे शक्यच नव्हते. रेलिंगच्या उजवीकडून एक फ़रसबंदी वाट खालच्या जंगलात उतरत होती. त्या वाटेवरुन डोक्यावर हिरव्या गवताचा भारा घेउन दोघे जण चढून येत होते. आम्हाला बघून ते थांबले. बुरुजवाडीतून चारा घेउन ते माथेरानच्या घोडेवाल्यांना विकायला चालले होते. त्यांना वाट विचारुन घेतली. वाट ठळक आणि मळलेली आहे कुठेही चुकायची शक्यता नाही असे सांगून त्यांने आम्हाला वाटेला लावले.

 

फ़रसबंदी वाट

                                                                

उजव्या हाताला माथेरानच्या डोंगराचा कातळकडा आणि डाव्या हाताला दरी अशी ती वाट उतरत होती. वाटेवर दोन छोटे धबधबे लागले, पण पाऊस नसल्याने पाणी कातळाला चिकटून वहात होते. वाट वरच्या कड्याला समांतर पुढे जात होती. या वाटेने अंदाजे पंधरा मिनिटे उतरल्यावर लिटील चौक पॉइंटच्या खाली आलो. आता वाट कड्यापासून डावीकडे वळून दाट जंगलात शिरली. उंच वृक्षांच्या दाटीतून वळणा वळणाने जाणार्‍या वाटेवर छोटे छोटे ओढे लागत होते. आता आम्ही ढगांच्या बाहेर आलो असलो तरी झाडांचे माथे अजूनही ढगात होते. त्यातून झिरपणार्‍या हिरव्या ओल्या प्रकाशामुळे वातावरण गुढ झाले होते. या वातावरणाने भारल्या सारखे सर्वजण निशब्दपणे उतरत होतो. वृक्षांच्या पायथ्याशी मोकळ्या जागेत झुडपं वाढली होती. त्यावर सुंदर फ़ुलं उमलली होती. सुर्यप्रकाश अजून जंगलात न शिरल्यामुळे फ़ुलपाखरं मात्र दिसत नव्हती. अशा गुढरम्य वातावरणातून अर्धातास चालून जंगलाच्या बाहेर आल्यावर समोर एक छोट पठार पसरलेल होते. पठारावरुन समोर सोंडाई किल्ल्याचा डोंगर, डावीकडे माथेरानच्या गारबेट पॉईंटचा डोंगर दिसत होता. मागे वळून पाहिल्यावर आम्ही चालून आलो ते जंगल पठाराच्या सीमेवर उभे होते आणि त्यामागे माथेरानचा माथा ढगात लपलेला दिसत होता.                 

 

 


थोडी विश्रांती आणि छायाचित्रण करून पठरावरून उतरायला सुरुवात केली. आता उतार तीव्र झाला होता अशा वेळी सोबतीला असणारी कारवीची झुडुपं दोन्ही बाजूला होती. त्यातून चालत १० मिनिटात  कड्याच्या  टोकापाशी पोहोचलो. इथून दिसणारे दृश्य अप्रतिम होते. कड्याच्या बाजूने डोंगराची एक सोंड दरीत झेपावत होती. खाली दुरवर मोरबे धरणाचा जलाशय दिसत होता. त्यावर राखाडी करडे ढग ओथंबून आले होते. समोरच्या बाजूला सोंडाई किल्ल्याचा डोंगर आणि डावीकडे गारबेटचा डोंगर असा मस्त "पॅनोरमा व्हू" इथून  दिसत होता .

चौकी पॉईंट वरुन मोरबे धरण

कारवीतून वाट

पावसामुळे सगळीकडे हिरव्या रंगाची उधळण झाली  होती. त्यातही पोपटी ते गर्द हिरवा, अशा हिरव्या रंगाच्या अनेक छटा दिसत होत्या. इथे गावकऱ्यांनी दगड, वीटा आणि टाईल्सचे तुकडे वापरून बसण्याकरीता "L" आकारात ओटे बांधलेले आहेत. त्यावर "चौकी पॉईंट" माथेरान अशी अक्षरे कोरलेली आहेत. या वाटेवरून रोज प्रवास करणारे या जागी थोडा वेळ थांबून आपला शीण नक्कीच घालावत असतील, ही जागाच तशी होती . इथून खाली बुरुजवाडी, दांडवाडीतील घर, शेतं आणि त्यामधून धरणाच्या जलशयापर्यंत जाणारा डांबरी रस्ता दिसत होता. माथेरान कडून येणारा एक मोठा ओढा या जलाशयाला मिळत होता. ओढ्यावरच्या पुलाच्या पलीकडे पोखरवाडी गाव दिसत होते.

पठारावरुन सोंडाई किल्ला 


पोखरवाडी पर्यंत अजून मोठा टप्पा गाठायचा होता. त्यामुळे जागेचा मोह सोडून उतारायला सुरुवात  केली. तीव्र उताराचा टप्पा पार करून लांबलचक पठारावर आलो. आता माथेरानच्या  डोंगराच्या पाठून इरशाळ गड दिसायला लागला. पठार संपल्यावर पुन्हा उतरण सुरु झाली. समोरून गावातला एक तरुण  पिकावर फवारणी करण्यासाठी वापरतात तो स्प्रे पंप पाठीवर  घेऊन  चढत  होता. ऑक्टोबर महिन्यात पायवाटेच्या बाजूचे गवत उंच वाढते, त्यामुळे वाटेने जायला त्रास होतो. त्यासाठी गावकरी वर्गणी काढून ही फ़वारणी करतात. त्यामुळे पायवाटेच्या बाजूचे गवत जळून जाते. 

गावाच्या अलिकडे असलेल्या पठारावर एक नितळ पाण्याचा ओढा आडवा आला. त्यात डुंबून पुढे निघालो. बुरुजवाडी आणि दांडवाडी मधून पायवाट डांबरी रस्त्याला लागली. (पायवाटेची सुरुवात लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे रस्त्याच्या कडेला ट्रान्सफ़ॉर्मर आहे. त्याच्या बाजूने पायवाट सुरु होते.) इथे डांबरी रस्ता असूनही रिक्षावाल्याने पोखरवाडीच्या पुलापाशी का बोलवले हा प्रश्न आम्हाला पडला. दांडवाडी ओलांडल्यावर डांबरी रस्त्याच्या दुतर्फ़ा भात शेती होती. मागे माथेरानचा माथा अजूनही ढगात गुरफ़टलेला होता. रस्त्याने ५ मिनिटे चालल्यावर उतार सुरु झाला. या उतारावरचा रस्ता पूर्ण उखडलेला होता. हा रस्त्याचा उतार सुरु होतो तेथेच उजव्या बाजूला एक पायवाट खाली उतरत होती त्या पायवाटेने १० मिनिटात पोखरवाडीच्या पुला जवळ पोहोचलो आणि आमचा अर्ध्या दिवसाचा सुंदर ट्रेक संपला.



दांडवाडीतून माथेरान

दांडवाडी ते पोखरवाडी रस्ता

कर्जत - पेण रस्त्यावर  सोंडाई  किल्ल्याकडे जाणारा फाटा आहे. हा रस्ता मोरबे धरणाच्या काठाकाठाने जातो. या रस्त्यावर पोखरवाडी हे गाव आहे. कर्जतहून पोखरवाडीत जाण्यासाठी रिक्षा आणि मारुती व्हॅन मिळतात. पोखरवाडी गावातून सरळ जाणारा रस्ता सोंडाई वाडीकडे जातो तर डाव्या बाजूचा रस्ता दांड वाडी, बुरुजवाडी मार्गे खाटवण पर्यंत जातो. या रस्त्यावर धरणाचे बॅक वॉटर जिथे संपते तिथे माथेरानच्या डोंगरागेतून येणारा एक मोठा ओढा धरणाला मिळतो. या ओढ्यावर असलेला पूल ओलांडल्यावर लगेच उजव्या बाजूला एक पायावाट डोंगरावर जाते. या वाटेने आपण अर्ध्या तासात दांडवाडीत पोहोचतो. दांडवाडी आणि बुरुजवाडीच्या मध्ये डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला ट्रान्सफ़ॉर्मर आहे. त्याच्या बाजूने जाणारी पायवाट माथेरान पर्यंत जाते.

ओढा, पोखरवाडी

रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी हे अंतर उतरुन पार करायला आम्हाला २.३० तास लागले. पोखरवाडी ते रामबाग पॉईंट हे अंतर चढून जाण्यासाठी ३ ते ३.३० तास लागू शकतात. आम्ही केला तो ट्रेक अर्ध्या दिवसाचा होता. हा ट्रेक पूर्ण दिवसाचाही करता येतो. त्यासाठी बुरुजवाडीचा पुढे असलेले खाटवण गाव गाठून तेथून अलेक्झांडर पॉईंट पर्यंत चढाई करावी आणि उतरताना वर सांगितले त्याप्रमाणे रामबाग पॉईंट वरुन खाली उतरावे. 



बळवंतगडाचा वेढा हा लेख वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
                              https://samantfort.blogspot.com/2016/07/blog-post.html


Photos by :- Amit Samant  © Copy right