Sunday, September 27, 2015

सह्याद्रीतील रानफ़ुले (Sahyadri the valley of flowers)


Fkowers on slopes of sahyadri

कौंडल


Harishchandra gad 

पावसाळा सुरु झाला की सह्याद्रीच्या पठारावर डोंगर उतारांवर छोटी छोटी रानफुले फुलायला लागतात. विविध जातीची ,रंगांची, आकाराची ही फुल आपल लक्ष वेधुन घेतात. सप्टेंबर अखेर पर्यंत त्या फुलांची चादर सर्वदुर पसरलेली दिसायला लागते. काही तासांच ते दिवसांच आयुष्य असलेली ही फुल डोंगर भटके आणि अभ्यासकांपुढे आपल भांडार उघड करतात. सह्याद्रीतील फुल म्हटली की सर्वांच्या नजरेसमोर पहिल्यांदा येत ते कासच पठार. कास पुष्प पठारावर पाउस पडायला लागला की दर महिन्यात वेगवेगळी फ़ुल फ़ुलायला लागतात. पण कासच्या पठारावर मोठ्या प्रमाणात असलेली टोपली कारवी सात ते बारा वर्षात एकाच वेळेस फ़ुलते तेंव्हाचे कास पठाराच दृष्य अवर्णनीय असत. विविध साईटवर, वृत्तपत्रां मधुन येणारे सात ते बारा वर्षात एकदाच फ़ुलणार्‍या कारवीने खच्चुन बरलेल्या कासच्या पठाराचे फोटो पाहून त्याठिकाणी जाणार्‍या पर्यटकांचा लोंढा इतका वाढायला लागला की शनिवार, रविवार सातार्‍यात ट्रॅफिक जाम व्हायला लागला. त्याच्या प्रदुषणाने, लोकांच्या बॉलिवुड टाईप बागडण्याने त्या पठारावरच्या फ़ुलांनाही धोका उत्पन्न झाला. त्यामुळे वनखात्याने कास पठारालाच कुंपण घालुन टाकले. हिंदी सिनेमात दिसते तशी ऑर्कीडची एकाच प्रकारची फ़ुल पाहाण्याच्या अपेक्षेने आलेल्या पर्यटकांचा भ्रमनिरास व्हायला लागला. या सर्व गोष्टींमुळे पुण्या - मुंबईहुन प्रवास करुन पोहोचणार्‍या लोकांनी कासला पाहायला काही नाही म्हणुन मग ठोसेघर, बारामोटेची विहिर या जवळपासाच्या ठिकाणांची महती वाढायला लागली.

Kas Platu

कास पठार इतकी पुष्प वैविध्यता सह्याद्रीत इतर ठिकाणी नाही हे मान्य केल तरी, कास हे रानफुले पाहाण्यासाठी एकमेव ठिकाण नाही. सहज पाहाता येण्यासारखी अनेक ठिकाण सह्याद्रीत आहेत. अर्थात तिथे जाउन काय पाहायच ? हे मात्र माहित पाहिजे.

पाऊस पडायला सुरुवात झाली की जमिनीवर पडलेल्या बियांना, जमिनीतल्या कंदांना धुमारे फ़ुटायला लागतात. जमिन हिरवीगार दिसायला लागते. पाउस पडल्या - पडल्या सर्वप्रथम हजेरी लावतात ती पाण कुसुमची फ़ुल. त्यानंतर काळी मुसळीची चांदणी सारखी दिसणारी पिवळी फ़ुल हजेरी लावतात. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे ती मुळासकट उपटली जातेय. मग येते आषाढ आमरी, आमरी म्हणजे इंग्रजीत ऑर्किड. ती येते तेंव्हा गवत जास्त वाढलेल नसते त्यामुळे त्याची पांढरी सुंदर फ़ुल त्या हिरव्या गालिच्यावर उठुन दिसतात. एकदा एका पावसाळी संध्याकाळी एका पठारावर विसावलेलो. पावसामुळे वातावरण कुंद होत. संध्याकाळच्या कमी होत जाणार्‍या प्रकाशात गवताच्या वर डोलवणार्‍या दांड्यांमधुन आषाढ आमरीची फ़ुल फ़ुलायला लागली आणि काही वेळातच ते पठार त्या पांढर्‍या फ़ुलांनी चमकायला लागल. या फ़ुलांमधे पण गमती जमती असतात. पाउस पडल्यावर "हबे आमरीच्या" कंदातुन एक दांडा बाहेर येतो त्यावर पांढरी फ़ुल येतात. त्यानंतर त्याला जमिनी लगत एकच मोठ पान येत. परागीभवन झाल की फ़ुल गळुन पडतात. पानात तयार झालेल अन्न कंदात साठवल जाते ते पुढच्या पावसाळ्यासाठी. ऑगस्ट, सप्टेंबर मधे तेरड्याची फ़ुल आणि सोनकीने सह्याद्रीची पठार झाकली जातात, रस्त्यांच्या कडेला, दाट झाडीत जागा मिळेल तिथे पेवची बेट फ़ुलायला लागतात. हा पुष्प सोहळा सह्याद्रीत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत चालु असतो.  




  काही तासांचे आयुष्य ते काही दिवसांचे आयुष्य असलेली, काही मिलीमीटर ते काही सेंटीमीटर आकाराची फ़ुल आपल्या रंगाने, सुवासाने किटकांना आकर्षित करायला लागतात. स्वत: अचल असल्याने पराग वाहुन नेण्यासाठी त्यांना किटकांची आवश्यकता असते. त्यामुळे किटकांच्या पटकन नजरेत भरतील असे रंग, त्यांना परागांपर्यंत जाण्याच्या वाटा दाखावण्यासाठी बनवलेले वेगळ्या रंगाचे बाण हे प्रत्येक फ़ुलात असतात आणि त्याची रचना पाहाण्यासारखी असते. पराग वहनाच्या मोबदल्यात दिला जाणारा मकरंद ही अशा ठिकाणी साठवलेला असतो की तिथे पोहोचेपर्यंत त्या किटकाला जास्तीत जास्त परागकण चिकटले पाहिजेत. अर्थात यातही काही उस्ताद फ़ुल असतात. काही न देता किटकांकडुन परागीभवन करुन घेतात. तर काही ठिकाणी फ़ुलांचा आणि किटकांचा सुंदर सहजीवन दिसुन येत.

पावसाळ्यात फ़ुटणार्‍या पेवच्या बेटाकडे आपल लक्ष वेधले जाते ते हिरव्या बेटावर डोलणार्‍या त्याच्या नरसाळ्या सारख्या दिसणार्‍या पांढर्‍या फुलांमुळे. या फुलांच्या खालच्या बाजूस किरमिजी -लाल रंगाची रुपांतरीत पाने पाहायला मिळतात. पूर्ण फुललेल फुलाचं तोंड खालच्या बाजूला झुकलेल असत. फुल पांढर्‍या रंगाच असून आतल्या बाजूस मध्यभागी पिवळा रंग असतो. यामुळे परागीभवनासाठी येणार्‍या किटकांना मध कुठल्या दिशेला आहे त्याचे मार्गदर्शन होते. या लांब दांड्याच्या फुलातील मध खाण्यासाठी/ परागीभवनासाठी लांब सोंड असलेल ग्रास डेमन (Grass Demon ,family -Skipper/Hesperiidae) हे फुलपाखरू पेवच्या बेटातून उडतांना दिसत. हे कृष्णधवल रंगाचे फुलपाखरू असून पंखांवर पांढरे ठिपके असतात. या फुलपाखराला सावलीत, जमिनीलगत उडायला आवडते. त्याची सोंड त्याच्या आकाराच्या दुप्पट असते. उडतांना फुलपाखराची सोंड (Probosis) कॉईल सारखी गुंडाळलेली असते. पेवसारख्या लांब दांड्याच्या फुलावर बसल्यावर हे फुलपाखरू आपली सोंड उलगडून फुलातील मध पिते. निसर्गातील हे परस्परावलंबन आश्चर्यचकीत करणारे आहे.पावसाळ्यात भटकंती करतानांना रानफ़ुलां बरोबर किटक, फ़ुलपाखरे अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. 

काळी मुसळी

विंचवी

निळी चिराईत
साप कांदा


रानफ़ुले ओळखायची कशी ? हा प्रश्न बर्‍याच जणांना पडतो. रानफ़ुले बघायला फ़ारसा प्रयास पडत नाही, ती भटकंती करतांना सहज दिसतात. साध्या मायक्रो मोड असलेल्या कॅमेराने  फ़ुलांचे मस्त फ़ोटो काढावेत. फ़ोटो काढताना फ़ुलांचा क्लोजप आणि एक फ़ोटो पानासकट काढावा. कारण बर्‍याचदा फ़ुल एक सारखी दिसल्याने ओळखण्यात चुक होते. त्यावेळी पानांवरुन अचुक ओळखता येते. फ़ोटो काढुन झाले की ती फ़ुल ओळखण्यासाठी अनेक पुस्तक आणि साईटस उपलब्ध आहेत. या रानफ़ुलांची तीन नाव असतात, एक शास्त्रिय, दुसरे त्याच्या फ़ॅमिलीच नाव आणि तिसरे मराठी नाव. तेरड्याच शास्त्रिय नाव आहे Impatiens balsamina तेरड्याच्याच जातीतच एक मोठ फ़ुल आहे त्याला मराठीत "ढाल तेरडा" (Impatiens phulcherima)  म्हणतात. Balsaminaceae हे त्यांच्या फ़ॅमिलीच नाव आहे या नावातल Impatiens म्हणजे उतावीळ, अजिबात धीर नसलेला, हा शब्द तेरड्यांच्या फ़ळापासून आलाय. तेरड्याच फ़ळ सुकायला लागले की त्यांना अजिबात धीर नसतो. वार्‍याच्या झोताने, भुंग्याच्या धक्क्यानेही ते फ़ळ फ़ुटते आणि बिया विखुरतात.

 रानफ़ुलांची मराठी नावही फ़ार सुंदर आहेत. गिरीपुष्प, कुमुद, विष्णुकांत, आभाळी इत्यादी नाव लक्षात ठेवायला पण सोपी आहेत. एकदा हा छंद लागला, तुम्ही त्याबद्दल वाचत गेलात की फ़ुलांच्या अनेक गमती जमती कळत जातात. जमल्यास एखादा ट्रेक फ़क्त रानफ़ुल पाहाण्यासाठी काढावा. त्या ट्रेकला आपल्या बरोबर  बॉटनीतला माहितगार घेऊन जावा. आमच्या ट्रेक क्षितिज संस्थे तर्फ़े आम्ही फ़क्त रानफ़ुल पाहाण्यासाठी ट्रेक घेऊन जातो. २०१३ साली पुरंदरवर आमच्या सोबत प्र.के.घाणेकर सर आले होते. त्या दिवसात आम्ही ८४ जातीची फ़ुल नोंदवली. गेल्यावर्षी त्रिंगलवाडी किल्ल्यावर ४६ जातींच्या फ़ुलांची नोंद केली. जर तज्ञ व्यक्तीं बरोबर जर तुम्ही रानफ़ुले एकदा तरी पाहीलीत तरी तुम्हाला बर्‍याच नव्या आणि रंजक गोष्टी कळतील.

बुरुंडी


आभाळी



घाणेरी
ढाल तेरडा

कास प्रमाणेच पुष्प वैविध्य असलेला किल्ला म्हणजे पुरंदर किल्ला. १५०० मीटर उंची असलेल्या या किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील केदारेश्वर मंदिराकडे जाणारी पायवाट सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस फ़ुलांनी भरुन जाते. सोनकीच्या पिवळ्या फ़ुलांनी डोंगर जरी झाकलेला असला तरी पुरंदरवर अनेक प्रकारची फ़ुल पाहायला मिळतात. त्यात निळ्या जांभळ्या रंगाची निलांबरी, आकाश तुळस, इत्यादी दुर्मिळ फ़ुलही पाहायला मिळतात. त्रिंगलवाडी किल्ल्याला नाशिकच कासच पठार म्हणतात. या किल्ल्याच्या पठारावर रानफ़ुलांचे अनेक प्रकार विखुरलेले पाहायला मिळतात. हरिश्चंद्रगडावरचा गुहेसमोरचा आणि मंदिराच्या आजुबाजूचा प्रदेश सोनकीच्या चादरीने झाकलेला असतो. यावरून एक किस्सा आठवला, मध्यंतरी हरीशचंद्रगड उतरतांना काही गावकरी एका रानफूलाच्या बिया ओरबाडून पोत्यात भरत होते. विशिष्ट उंचीवरच दिसणार्‍या या रानफूलांची मोजकीच झुडपं या परीसरात आहेत. आमचं कुतूहल चाळवल्यामुळे आम्ही गावकर्‍यांकडे चौकशी केली. त्यांनी दिलेली माहिती रंजक होती. या रानफूलाच्या बिया लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीच्या औषधात वापरतात. व्यापरी १ किलोला १००/- रुपये भाव देतात. त्यामुळे या दिवसात गावातील सर्व लोक या बिया गोळा करण्याच काम करतात. त्यांनी पोत्यातून काढून थोड्या- थोड्या बिया सर्वांच्या हातावर ठेवल्या आणि म्हणाले खाऊन बघा, काही होत नाही. अख्खा गड उतरायचा असल्याने आम्ही काही बिया खाल्या नाहीत. थोड्या  तरी बिया झुडपांवर ठेवा म्हणजे पुढच्या वर्षी सुध्दा झाडे येतील असा (फूकटचा) सल्ला देऊन आम्ही निघालो. पण त्यांच्या पाचवीला पुजलेलं अठराविश्व दारीद्र्य व या झुडपांपासून मिळणारे पैसे याचा विचार केला तर काही वर्षांनी ही वनस्पती सह्याद्रीत नक्कीच दुर्मिळ होत जाणार आहे.  

निलांबरी , पुरंदर 


रानभेंडी


कानपेट




 कळलावी


सीतेची आसव

ताग

रतनगडाचा परीसरही उतरत्या पावसात रानफ़ुलांनी बहरुन जातो. प्रतापगड, शिवनेरी, राजगड, रायगड, सिंहगड, तोरणा या किल्ल्यांवरही या दिवसात पुष्पोत्सव चालु असतो. कोकण आणि सह्याद्रीला जोडणारे घाट वरंधा, कुंभार्ली, आंबा ,राधानगरी आंबोली हे रानफ़ुलांनी बहरलेले असतात. मुंबईकर आरे कॉलनी, संजय गांधी उद्यानात जाऊन रानफ़ुलांचा आनंद घेऊ शकतात. एकदा का तुम्ही रानफ़ुल ओळखायला लागलात की आपल्या गावा - शहरांबाहेरच्या टेकड्यांवरची रानफ़ुल तुम्हाला साद घालायला लागतात.

कुर्डु, कोंबडा

दुधाळी

गोलगुंडा

पिवळा धोत्रा

चवर

वनराणी

सोनकी

Purandar 

Photos by :- Amit Samant  © Copy right


  अमित सामंत

Sunday, August 23, 2015

वाघदेव


अशेरीगड, जिल्हा ठाणे 


डोंगर दर्‍या फ़िरताना आदिवासी पाड्याजवळ , किल्ल्यांवर लाकडी फ़ळीवर किंवा दगडावर कोरलेल्या वाघदेवाच्या प्रतिमा पाहायला मिळतात. साधारणपणे या शिल्पाच्या वरच्या बाजूला सुर्य - चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली  वाघाची प्रतिमा कोरलेली पाहायला मिळते. याला आदिवासी लोक "वाघदेव" म्हणतात. लाल, पिवळा, केशरी या नैसर्गिक रंगात वाघदेवाची प्रतिमा रंगवलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी वाघाच्या खाली सापाची प्रतिमाही कोरलेली आढळते. जंगलातील हिंस्त्र श्वापदांपासून आदिवासींचे त्यांच्या गाईगुरांचे रक्षण वाघदेव करतो अशी आदिवासींची श्रध्दा आहे. जंगलाशी नेहमीच संबंध येणार्‍या आदिवासींना वाघ, बिबटे इत्यादी मार्जारवंशीय प्राण्यांकडुन होणार्‍या प्राणघातक हल्ल्याची भिती मनात ठेउनच जंगलात जावे लागते. या भितीतूनच " वाघदेव " या कल्पनेचा जन्म झाला असावा.

न्हावीगड - बागलाण


लाकडी फ़ळीवर कोरलेली वाघदेवाची प्रतिमा असलेले काष्ठशिल्प आदिवासी आदिम काळापासून बनवत असावेत. जंगलात सहजपणे उपलब्ध होण्यार्‍या लाकडावर कोरीवकाम करुन त्याला नैसर्गिक रंगात रंगवून "वाघदेव" तयार केला जातो. त्यानतंरच्या काळात वाघदेवाचे शिल्प दगडात कोरले जाऊ लागले.  (हरिशचंद्र गडावर जातांना टोलार खिंडीत, तुंगी(कर्जत) किल्ल्यावर तुंग मातेच्या मंदिरात वाघाचे (वाघ देवाचे) शिल्प आहे.)






लाकडावर कोरले जाणारे हे वाघदेव उन पावसाच्या मार्‍याने खराब होतात. त्यावर उपाय म्हणुन आताच्या काळात वाघदेवाची सिमेंटची बेढभ आणि भडक रंगात रंगवलेली मुर्ती पाहायला मिळते. काही ठिकाणी अशी वाघ देवांची मंदिरेही पाहायला मिळतात. काळाबरोबर होणार्‍या सिमेंटच्या या आक्रमणामुळे  लाकडावर वाघदेव कोरण्याची ही कला आणि पध्दत लुप्त होत जाईल.

सिमेंटचे वाघदेव. म्हैसघाट


भारतभर पसरलेल्या वाघदेवांची पूजा दरवर्षी "वाघबारसीला" म्हणजेच अश्विन वद्य व्दादशीला होते.

 


वीरगळ, गधेगळ, धेनुगाळ  (Hero Stone, Sati Stone, Gadhhegal, Dhenu (Cow) Stone) यावरील ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा
https://samantfort.blogspot.com/2019/04/blog-post_4.html




Monday, August 3, 2015

टाहाकारीचे मंदिर Tahakari Temple , Offbeat Maharashtra

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अनेक छोट्या गावात  कलाकुसर केलेली प्राचिन मंदिर आहेत. त्याकाळच्या व्यापारी मार्गावर बांधलेली ही मंदिर आज आडबाजूला पडली आहेत. प्राचिन काळी घाटवाटांचे/ व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे किल्ले बांधले गेले तशीच त्याकाळच्या राज्यकर्त्यांनी या मार्गांवर मंदिरांचीही निर्मिती केली. या मार्गांवरुन प्रवास करणार्‍या व्यापारी तांड्यांची, पांथस्थांची विश्रांतीची राहाण्याची सोय या मंदिरात होत असे. व्यापार्‍यांनी केलेल्या दानामुळे या मंदिरांचा दैनंदिन खर्च आणि डागडुजीची कामे होत असत अशी परस्पर पूरक रचना होती. मंदिराच्या बाहेर असलेल्या शिलालेखावर शक ११५० अशी नोंद आढळते. त्यावरुन या मंदिराची निर्मिती इसवी सनाच्या बाराव्या शतकात झालेली असावी. 



सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांग इगतपुरी परिसरातून थळ (कसारा) घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला “कळसूबाई रांग” म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पूरातन अवंध व पट्टा किल्ल्य़ांच्या परीसराचा उल्लेख आढळतो.
रावणाचा छेदिला आंगोठा
तेथे झाला औंढापट्टा
त्रिंबकीच्या बिकटघाटा
अवंढा-पट्टा प्रसिध्द !!
 या पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणार्‍या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे. अहमदनगर जिल्हयातील, अकोले तालुक्यात येणार्‍या टाहाकारी गावात शाक्त संप्रदायाचा प्रभाव असलेले  "जगदंबेचे " प्राचिन मंदिर आहे. मंदिर म्हटल की दंतकथा आलीच. नाशिक परीसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडीत आहे. प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. त्याचवेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रा॔ना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्राची परिक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेच्या रुपातील पार्वती मातेला ओळखले आणि तीला वंदन केले. तेव्हा माता पार्वती खजील होऊन येथेच अंतर्धन पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली. तेथेच आता जगदंबेचे मंदिर बांधलेले आहे.

हेन्री कझिन्स यांनी १८८० मधे काढलेला मंदिराचा फ़ोटो.

टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे सिमेंटचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिरा जवळ पोहोचल्यावर मंदिरा भोवती असलेली सात फ़ूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याचे तोंड उत्तरेला म्हणजेच आढळा नदीकडे आहे. टाहाकारी मंदिराची बांधणी भूमीज शैलीत केलेली आहे. मुख्य गर्भगृहावर एकेकाळी विटांनी बांधलेले "कर्नाट द्रविड" शैलीतील शिखर होते. इतर दोन गर्भगृहावर "भूमीज शैलीतील" शिखरे होती कझिन्स या इंग्रज अधिकार्‍याने १८८० मध्ये काढलेल्या छायाचित्रामुळे संशोधकांना हे कळू शकले.  मंदिराचे मुळचे तीनही  कळस काळाच्या ओघात कोसळलेले असुन त्याजागी सिमेंटचे अतिशय बेढभ कळस बांधलेले आहेत. तसेच मंदिराच्या समोर सिमेंटचा सभामंडप बांधुन मंदिराची शोभा घालवायाचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. आपले नशिब म्हणजे दगडी बांधणीचे मंदिर अजुनही जसेच्या तसे ठेवलेले आहे.

सूरसुंदरी


टाहाकारीच मंदिर भूमीज पध्दतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, गुढ मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चारफ़ूट उंच दगडी जोत्यावर  उभ आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मुर्ती दिसतात. त्यातील एक शंकर पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराच छत  खांबांवर तोललेल आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्प, किर्तीमुख, भौमित्तीक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या वितानावर (छतावरचे) वर्तूळाकार नक्षीकाम केलेले आहे.  या वर्तूळाकार कोरीवकामात फ़ुल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. अशा वितानाला नाभीछंद वितान असे म्हटले जाते. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजुस तीन गर्भगृह आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.




    
  









नाभीछंद वितान


मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशव्दारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भूजा असलेली काष्ठमुर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुर मर्दीनीच्या’ अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजुस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मुर्तीं आहेत.



मंदिराचा अंतर्भाग पाहुन मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनात दुमडलेला बाह्यभाग समोर येतो. मंदिराचा तलविन्यास (Ground Plan ) पंचांग प्रासाद प्रकाराचा आहे.  भद्र, उपरथ, कर्ण या रचनेमुळे निर्माण झालेल्या कोनाड्यांमधे सुरसुंदरींच्या मुर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारीका, नृत्य करणारी, वादन करणारी, शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मुर्ती आहेत. मंदिर प्रदक्षिणा सुरु केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गणेशाची मुर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहा मागिल देवकोष्टात  चामुंडेची अप्रतिम मुर्ती आहे. चामुंडा हे देवीच क्रुर रुप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचु, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मुर्ती आपल लक्ष वेधुन घेते. या देवकोष्टका खाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी पन्हाळी आहे. तिथे नेहमी प्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख (मकर प्रणाल) कोरलेल आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे


मकर प्रणाल

मुख्य गर्भगृहा मागिल देवकोष्टात नृत्य करणार्‍या शंकराची मुर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी ताल वाद्य वाजवणारा गण आहे, तर डाव्या कोपर्‍यात बासरी वाजवणार गण कोरलेला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रम्हा, विष्णु, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागिल देवकोष्टात डमरु, तलवार आणि त्रिशुळ घेतलेल्या शंकराची मुर्ती कोरण्यात आलेली आहे. मुर्तीचा एक हात तुटलेला आहे.



मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करुन मंदिरा समोर येउन नदीवरील घाटाच्या पायर्‍यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही.  पण या लेखाचे वाचन इंग्रज अधिकारी किलहॉर्न याने केलेले आहे. त्यात शक ११५० असा मंदिर बांधलेल्या काळाचा उल्लेख आलेला आहे, या खांबाच्या बाजुला शेषनागाचे मंदिर आहे. मंदिरा बाहेर काही वैशिष्ट्यपूर्ण समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फुट उंचीचे हे दगड अष्टकोनी असुन त्याच्या वर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत.

समाधी


शिलालेख

मंदिर परीसरात भक्तांसाठी बांधलेला नविन हॉल आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मंदिर परीसरातील झाडी, जवळून वाहाणारी नदी यामुळे हा परीसर रम्य झालेला आहे. या रम्य परीसराला आणि उन, वारा, पाउस यांचा मारा सहन करत गेली अनेक शतक उभ असलेल हे मंदिराच दगडी शिल्प पाहाण्यासाठी एकदा वाट वाकडी करायला काहीच हरकत नाही.




मुंबईकर, नाशिककर स्वत:च वाहान असल्यास एका दिवसात "टाहाकारीच जगदंबा मंदिर", "टाकेदच जटायु मंदिर" पाहु शकतात. जर वेळेच व्यवस्थित नियोजन केल तर शिवरायांच्या चरण स्पर्शाने पावन झालेला "पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड" ही पाहाता येइल आणि एका दिवसात त्रिस्थळी यात्रा घडेल.

जाण्यासाठी:- १) मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहुन टाहाकारीला जाणारा रस्ता आहे. इगतपुरी ते टाहाकारी अंतर ५८ किमी आहे.

२) पट्टा किल्ला मार्गे टाहाकारी :- मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायुने रावणाशी युध्द करुन इथेच प्राण सोडला अशी येथिल लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे. जवळच रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणार्‍या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अर्ध्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पट्टावाडी पासुन ठाणगाव मार्गे २५ किलोमीटर वर टाहाकारी गाव आहे.



1) ओसियॉ (Temples of Osian) आणि मंदोर दुर्ग (Mandore Fort) Offbeat Places near Jodhpur,Rajasthan
हा लेख वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

2) Ancient Temples in Maharashtra (महाराष्ट्रातील मंदिरे आणि त्यांचे स्थापत्य)
महाराष्ट्रातील मंदिरे आणि त्यांचे स्थापत्य हा लेख वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.



#ancienttemplesinmaharashtra#offbeattemplesinmaharashtra#