Monday, July 13, 2015

Dady long leg on Sudhagad Fort

सुधागड वरचा डॅडी लॉंग लेग


रायगड जिल्ह्यातील अष्टविनायका पैकी पाली जवळ सुधागड नावाचा पूरातन किल्ला आहे. या किल्ल्याला विस्तिर्ण पठार लाभलेल आहे. त्यावर आजही अनेक वास्तु, दरवाजे, बुरुज, तटबंद्या काळाचे घाव सोसत उभ्या आहेत. त्यातच किल्ल्याच्या पश्चिमेला तटबंदीत लपवलेला गुप्त दरवाजा आहे. या गुप्त दरवाजात " डॅडी लॉंग लेगच "(Dady long leg) वास्तव्य आहे.


गुप्त दरवाजात उतरणारा जीना


किल्ल्याचा गुप्त दरवाजा हा अजब प्रकार असतो. गुप्त दरवाजाचा उपयोग लढाईच्या काळात गुप्तपणे निसटून जाण्यासाठी होतो. त्याचबरोबर तो किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही नाजूक भाग असतो. त्यामुळे दरवाजाचे स्थान ठरवणे अतिशय कौशल्याने असते. दरवाजा बनवतांना त्यातून एकावेळी एकच माणूस वाकून जाऊ शकेल एवढाच उंच व रुंद ठेवलेला असतो. गुप्त दरवाजाच्या आतल्या बाजूस असलेल्या पायर्‍या वेगवेगळ्या उंचीच्या असतात. त्यामुळे शत्रू गुप्त दरवाजाने आत शिरला तरी आतल्या काळोखामुळे व पायर्‍यांच्या वेगवेगळ्या उंचीमुळे त्याला सहज चढून जाता येत नाही. गुप्त दरवाजा तटबंदीत चिणून टाकलेला असतो. त्यामुळे तो तटबंदीत वेगळा ओळखता येत नाही. पूर्वीच्याकाळी किल्ल्यावरील फ़ार थोड्याच महत्वाच्या व्यक्तींना गुप्त दरवाजाचा ठावठिकाणा माहित असे. 


गुप्त दरवाजाच्या आतला काळोखी जीना


            सुधागडच्या गुप्त दरवाजातून आत शिरल्यावर खाली उतरायला पायर्‍या आहेत. या पायर्‍या उतरुन आपण तटबंदीच्या तळाला असलेल्या गुप्त दरवाजाच्या दुसर्‍या तोंडाने बाहेर पडतो. या तटबंदीमधे असलेल्या जीन्यात त्यामुळे थोडा काळोख असतो. जीन्याने उतरायला सुरुवात केल्यावर काळोखामुळे आपण साहाजिकपणे भिंतीचा आधार घेतो. त्यावेळी आपल लक्ष जर  छताकडे गेल तर आपल्याला छातावर लटकलेला काळ्या रंगांच्या कोळ्यांचा मोठा थवा दिसतो. प्रतिक्षिप्त क्रियेने आपण मान खाली घालून, आक्रसून पटापट खाली उतरायला सुरुवात करतो. अशी काळोखी ,दमट जागा हे "डॅडी लॉंग लेगच" आवडत वास्तव्याच ठिकाण आहे.


Daddy long legs/ harvestman at Sudhagad


        "डॅडी लॉंग लेग" किंवा "हार्वेस्टमन" या नावाने ओळखले जाणार्‍या कोळ्यांची गणना Opiliones (Arachnid Family) कुटुंबात होते. हे कोळी इतर कोळ्यांसारखे दिसत असले तरी कोळी (Spider) आणि यांच्यात एक मुलभूत फरक आहे. कोळ्याला डोक, धड आणि ८ पाय असतात. तर Opiliones किटकांना डोक आणि धड असे दोन वेगळे भाग नसतात तर एकाच अंडाकृती भागा भोवती 8 पाय असतात. त्याला पुढच्या बाजूस दोन डोळे असतात, पण त्याची दृष्टी विकसित झाली नसल्याने तो आपल्या पायाच्या दुसर्‍या जोडीचा ऍंटेना म्हणुन उपयोग करतो. 

"डॅडी लॉंग लेग" किंवा "हार्वेस्टमन"

        Opiliones च्या ज्ञात जाती ६५०० असुन अगदी ४१ कोटी वर्षापूर्वीच्या फॉसिलमधेही यांच्या भाउबंधांचे अवशेष सापडलेले आहेत. अंटार्टिका सोडून संपूर्ण पृथ्वीवर हे आढळतात. बुरशी, शेवाळ, वनस्पती, छोटे किटक, मेलेल्या किटकांचे/प्राण्यांचे/वनस्पतींचे अवशेष, पक्ष्यांची विष्ठा अस प्रचंड विविधता असलेल खाण खात असल्यामुळे निसर्गाच्या उलथापालथीतही Opiliones इतकी वर्ष टिकुन राहीले असावेत. आपल्या भक्षकांपासुन रक्षण होण्यासाठी हे सर्वजण एकत्र राहातात. भक्षकाची चाहुल लागतात हे पायावर ताठ उभ राहुन शरीराचा भाग एखाद्या स्प्रिंगप्रमाणे खालीवर हलवायला सुरुवात करतात.त्यामुळे त्यांचा भक्षक गोंधळून जातो.

       "डॅडी लॉंग लेग" बद्दल पाश्चात्य जगात अनेक अंधश्रध्दा/ गैरसमज आहेत. याचा दंश विषारी असुन हा कोळी चावला तर माणूस मरतो असाही समज आहे. त्यावर झालेल्या संशोधनात अस आढळून आल की या सोंड (Jaws) एवढे छोटे असतात की ते माणसाच्या कातडीत शीरु शकत नाहीत.कारण ते मुळात माणसाला दंश करण्यासाठी बनलेलेच नाहीत. त्यामुळे या कोळ्यापासून विषबाधा होत नाही.

या कोळ्यांचा फ़ारच कमी शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. त्यामुळे पुढच्या वेळी सुधागडला जाल तेंव्हा ""डॅडी लॉंग लेग" च निरीक्षण करायला विसरू नका.


गुप्त दरवाजा बाहेरच्या बाजूने