Friday, August 16, 2013

किल्ल्यांवरील पाणी स्थिरीकरण योजना. (Water Stabilisation Systems on the Forts)

पेडका किल्ल्यावरील एका खाली एक असलेले तलाव

           किल्ल्यांवरील टाकी, तलाव , विहीरी या व इतर पाणी साठावण्याच्या पध्दती हा माझ्या आवडीचा विषय आहे. किल्ल्यावरील हे पाणी साठे किल्ल्याबद्दल बरीच माहिती सांगून जातात. किल्ल्यावर किती शिबंदी असावी, किल्ला बांधला त्यावेळेचे पडणार्‍या पावसाचे प्रमाण, किल्ल्याचे महत्व वाढल्यावर पाणी साठवण्यासाठी केले गेलेले नवे उपाय यांचा अंदाजही या पाणी साठ्यांवरून करता येतो. किल्ला लढता ठेवण्यासाठी सैनिक अन्नधान्या इतकेच किंवा त्याहून जास्तच पाणी साठ्याला महत्व होते. त्यामुळे हा पाणी साठा वाढवण्याचे,  त्या टाक्यात, तलावात जास्तीत जास्त पाणी साठवण्याच्या अनेक युक्त्या आपल्या पूर्वजांनी (त्याकाळच्या स्थापतींनीं) शोधून काढल्या होत्या.  

यावर्षी भर पावसाळ्यात चाळीसगाव - औरंगाबाद परीसरातील किल्ल्यांवर जाण्याचा योग आला. पावसाळ्यामुळे पेडका किल्ल्यावरील तलाव चांगले भरलेले होते. त्यामुळे किल्ल्यावर राबवण्यात आलेली पाणी स्थिरीकरणाची योजना नीटच पहाता आली. पाणी स्थिरीकरण म्हणजे काय? डोंगरावरून, जमिनी वरून वहात येणारे पाणी आपल्या बरोबर माती, गाळ, कचरा घेऊन येते. हा गाळ टाकी, तलावात साठत जातो. या गाळावर पडणार्‍या साठलेल्या पाण्याच्या दाब पडल्यामुळे मातीचा थर सिमेंटसारखा घट्ट होतो. अशाप्रकारे दरवर्षी साठत जाणार्‍या गाळामुळे अनेक तलाव व धरण भरून जातात किंवा कायमची बाद होतात. पाण्याच्या दाबामुळे घट्ट झालेला हा गाळ काढणे ही मोठी खर्चिक व वेळकाढू बाब होते. त्यामुळे पाण्याबरोबर येणारा गाळ खाली बसावा, मुख्य टाक्यात, तलावात येऊ नये यासाठी वहाते पाणी थोडावेळ थांबवून (स्थिरकरून) त्यातील गाळ खाली बसवण्यात येतो. यालाच पाण्याचे स्थिरीकरण म्हणतात. महाराष्ट्रातल्या बर्‍याच किल्ल्यांवर पाणी स्थिरीकरणासाठी अशा अनेक योजना राबवलेल्या पाहायला मिळतात.

पेडका किल्ल्यावर पाण्याचा मुख्य मोठा तलाव प्रवेशव्दाराच्या वरच्या अंगाला आहे. या तलावाच्या वर डोंगर पसरलेला आहे. या डोंगरावरून वहात येणारे पाणी थेट मोठ्या तलावात जाऊन तॊ गाळाने भरू नये यासाठी या तलावाच्या वर २ छोटे तलाव बनवलेले आहेत. सर्वात वरच्या पठारावर असलेल्या तलावात पठारावरून वाहाणारॆ पाणी व गाळ जमा होतो. तो तलाव भरला की वरचे पाणी बाजूच्या पन्हाळीतून खालच्या बाजूला असलेल्या बांधीव तलावात येते. इथे पाण्याला पुन्हा एकदा स्थिर करून त्यातील गाळ खाली बसवला जातो. या तलावाच्या बांधाच्या एका कडेला वरच्या बाजूस पाणी जाण्यासाठी पन्हाळी बनवलेली आहे. त्यातून पाणी खालच्या मोठ्या तलावात जमा होते. यामुळे मोठ्या तलावात फारच कमी प्रमाणात गाळ जमा होतो. याशिवाय २ अतिरीक्त पाणी साठे तयार होतात आणि दरवर्षी वरच्या २ छोट्या तलावातील गाळ कमी पैशात व मनुष्यबळात उपसता येतो.


मनोहर गडावरील पाणी जाण्यासाठी तटबंदीतील मोर्‍या
मनोहर गडावरील तलावाचे अवशेष
   
 मनोहर - मनसंतोषगड हे तळकोकणातले किल्ले, या भागात महामूर पाऊस पडतो. पावसाळ्यात मनोहर गडावरच्या वाड्यामागून एक ओढा वाहातो. आता गडाची तटबंदी जिथे कोसळलेली आहे तेथून या ओढ्याचे पाणी खालच्या दरीत पडते. किल्ला बांधतांना त्यावेळेच्या स्थापतींनी या ओढ्यातील पाण्याचा वेग कमी करण्यासाठी व पाणी साठवून त्याचा निचरा करण्यासाठी तटबंदी जवळ एक तलाव बांधला होता. तसेच तटबंदीत जागोजागी पाणी जाण्यासाठी मोर्‍या बांधल्या होत्या. आजही नीट पाहिले तर गाळात गाडल्या गेलेल्या तलावाचे अवशेष व ढासळलेल्या तटबंदीत पाणी जाण्यासाठी बांधलेल मोर्‍या पहायला मिळतात. ओढ्याचे पाणी आपल्या बरोबर भरपूर गाळ घेऊन असे. ते पाणी तलावात आणून त्याचा वेग कमी केले जाई व पाणी स्थिर केल्यामुळे त्यातील गाळ ही खाली बसत असे. तलावाच्या बांधावरून बाहेर पडणारे पाणी तटबंदीतील मोर्‍यांवाटे दरीत जात असे. अशा प्रकारच्या योजनेमुळे ओढ्याच्या पाण्याचा अतिरीक्त दाब पडून तट्बंदीला धोका होत नसे व गडावरील वापरासाठी अतिरीक्त पाणी साठा पण तयार होई.

पाण्याचे टाकं, असावा 


                                                                                                                                                
               ठाणे जिल्ह्यातील बोईसर जवळ असावा किल्ला आहे. या किल्ल्यावर एक प्रचंड मोठ पाण्यचं टाक आहे. या टाक्याच्या तीन बाजू कातळात कोरलेल्या असून एक बाजू दगडांनी बांधलेली आहे. डोंगरावरचे पाणी कातळ उतरावरून टाक्यात पडते. त्या पाण्याबरोबर येणारा गाळ टाक्यात जाऊ नये म्हणून येथे कातळात जागोजागी रूंद व खोल खळगे कोरलेले आहेत. त्यात वहात्या पाण्यातला गाळ साठून रहात असे व शुध्द पाणी तलावात जात असे . तसेच या खळग्यात साठणारा गाळ काढणे पण सोपे होते.

         याशिवाय बर्‍याच किल्ल्यांवर पाणी स्थिरीकरणासाठी उतारावर एकाखाली एक पाण्याची टाकी कोरलेली पहायला मिळतात. या रचनेमुळे डोंगर उतारावरून येणार गाळमिश्रीत पाणी सर्वात वरच्या टाक्यात पडत असे. ते टाक भरल्यावर पाणी पुढच्या टाक्यात जात असे. अशाप्रकारे सर्वात वरच्या टाक्यातच जास्तीत जास्त गाळ साठत असे. त्यामुळे गाळ कमी पैशात व मनुष्यबळात उपसता येत असे.

       किल्ला पाहिल्यावर अनेक जणांची तक्रार असते की, किल्ल्यावर पहाण्यासारख काही नव्हत. पण प्रत्येक किल्ल्याच स्वत:च अस एक वैशिष्ट्य असत, तो ते आपल्याला दाखवत असतो, पण गरज आहे ती त्याच्याकडे शोधक नजरेने पहाण्याची.
     

एका खाली एक कोरलेली पाण्याची टाकी