Saturday, October 14, 2017

ऑफ़बीट मराठवाडा (धाराशिव (उस्मानाबाद), लातुर) Offbeat Maratwada (Ausa, Udgir, Nilangeshwar Mandir, Ter, Dharashiv Caves & Kharosa Caves )

पर्यटनासाठी घराबाहेर पडायचे म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर पुण्या मुंबई जवळची नेहमीचीच ठिकाणे येतात. पर्यटनासाठी धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, धारुर, नांदेड असा फ़ारसे ग्लॅमर नसलेल्या जिल्ह्यात जायचे म्हटल्यावर अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. डोक्याला फारच ताण दिला तर धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर आणि नळदुर्ग ही ठिकाण आठवतात, पण धाराशिव (उस्मानाबाद), तुळजापूर जवळ असलेले तेर गाव मात्र आठवत नाही. जगभराच्या पुरातत्वीय अभ्यासक, इतिहासकार, कला अभ्यासक यांना तेर पूर्वीपासूनच सुपरिचित आहे ते तेर येथील रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालयामुळे. याशिवाय तेरणा नदीकाठी असलेले संत गोरा कुंभार (गोरोबाकाका) यांचे मंदिर त्याच्या बाजूलाच असलेले चालुक्यकालिन शिवमंदिर, पूर्णपणे वीटांनी बांधलेले महाराष्ट्रातील एकमेव उत्तरेश्वर मंदिर व एखाद्या चैत्याप्रमाणे प्रमाणे रचना असलेले महाराष्ट्रातील एकमेव त्रिविक्रम मंदिर, नृसिंह मंदिर ही ठिकाणे अर्ध्या दिवसात पाहून होतात. त्याच बरोबर धाराशिव लेणी उस्मानाबाद जवळ आहेत तीही पाहाता येतात. अशा प्रकारे पहिला दिवस सत्कारणी लावल्यावर दुसर्‍या दिवशी औसा किल्ला, खरोसा लेणी, निलंगेश्वर मंदिर आणि उदगिर किल्ला ही ठिकाणे पाहाता येतात. 
नळदुर्ग किल्ला पाहाण्यासाठी पूर्ण एक दिवस लागतो. त्यामुळे नळदुर्ग किल्ला तिसर्‍या दिवशी पाहून सोलापूर मार्गे परतीचा प्रवास करता येतो.
 तेर (TER)



तेरणा नदीच्या तीरावर वसलेल्या तेर उर्फ़ तगर येथे इसवीसन पूर्व चौथ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडतात. इसवीसनाच्या दुसर्‍या शतकात सातवाहन काळात तेर हे महाराष्ट्रातील व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र म्हणुन उदयाला आले. येथुन भडोच या बंदरा मार्गे रोमन साम्राज्याशी व्यापार चालत असे. याप्रदेशात पिकणार्‍या कापसा पासून बनवलेले सुती तलम कापड, लाकूड, शंखाच्या बांगड्या, इत्यादी वस्तूंना रोमन साम्राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी होती. या व्यापारामुळे तगर नगराची भरभराट झाली. परदेशी प्रवासी टॉलेमी आणि ग्रीक खलाश्याने लिहिलेल्या "पेरिप्लस ऑफ़ दि एरिथ्रियन सी" या प्रवास वर्णनात तगर नगराचा उल्लेख सापडतो. त्याच कलावधीत बौध्द धर्मियांनी तगर येथे धार्मिक केंद्र उभारले. सातवाहनांनंतर आलेल्या गुप्त चाकुक्यांपासून ते यादवांपर्यंत सर्व राजवटींनी या नगरात अनेक मंदिरे बांधली. मध्ययुगीन कालखंडात इतर व्यापारी केंद्रे उदयास आल्याने तगर विस्मृतीत गेले. इसवीसन १९०१ मध्ये हेन्री कझिन यांनी तेर येथे सविस्तर पाहाणी करून वृत्त्तांत प्रसिध्द केला. त्यानंतर तेर येथे वेगवेगळ्या कालखंडात पुरातत्वीय उत्खनन करण्यात आले.   

रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालय (Ramlinga Khandappa Lamture Museum)


तेर गावात शिरल्यावर प्रथम लागते ते रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालय. आपल्या गावात परदेशी प्रवासी येतात आणि इथल्या पांढरीच्या टेकाडावरून जून्या पुराण्या वस्तू घेऊन जातात हे पाहून लहान रामलिंगप्पाच कुतुहल चाळवल. त्याने हेडमास्तरांना याबद्दल विचारल्यावर त्यांनी तेर गावच्या इतिहासाबद्दल आणि इथे मिळणार्‍या वस्तूंच्या ऐतिहासिक महत्वाबद्दल रामलिंगप्पला माहिती सांगितली. त्यानंतर रामलिंगप्पांनी अशा वस्तू जमवायला सुरुवात केली. हळूहळू गावकर्‍यांनीही आपल्याला सापडलेल्या वस्तू त्यांना आणुन द्यायला सुरुवात केली. अशाप्रकारे रामलिंगप्पांचा संग्रह वाढत गेला. आयुष्यभर जमवलेला संग्रह त्यांनी १९७२ मध्ये शासनाच्या हवाली केला. तोच २२८९२ वस्तूंचा संग्रह आपल्याला रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालयात पाहायला मिळतो. यामध्ये सातवाहन, चालुक्य कालिन नाणी, मातीची भांडी, दगडात, मातीत बनलेल्या मुर्ती, प्राणी प्रतिमा, पदक, दगडात कोरलेले शिलालेख, गध्देगाळ, नक्षीकाम, शंखाच्या बांगड्या, वस्तू, हस्तीदंती वस्तू, पाण्यावर तरंगणारी वीट इत्यादी अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या संग्रहालयातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सहाव्या सातव्या शतकातील उत्तरेश्वर मंदिराची लाकडी चौकट. मंदिराच्या गर्भगृहाची ही चौकट चिखलात पडून राहील्याने इतक्या वर्षानंतरही तशीच्या तशी होती. पुरातत्व खात्याने त्यावर काम करुन ती संग्रहालयात ठेवलेली आहे. त्यावरील मुर्ती, नक्षीकाम, कोरीवकाम पाहाण्य़ासारखे आहे.  (वस्तुसंग्रहालयात छायाचित्रण करण्यास मनाई आहे.) 

काळेश्वर मंदिर 

संत गोरोबा मंदिर आणि काळेश्वर मंदिर  (Goroba Mandir & Kaleshwar Mandir)


    वस्तू संग्रहालय पाहून त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण गोरोबाकाकांच्या मंदिराजवळ पोहोचतो. या ठिकाणी वारकरी आणि भक्तांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. गोरोबा काकांच्या मंदिराच्या बाजूला चालुक्य काळातले काळेश्वर मंदिर आहे. या मंदिरात दोन सुंदर वीरगळ पाहायला मिळतात. मंदिराचा कळस आणि गर्भगॄह ढासळलेला आहे त्याची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. पण त्याभोवती सिमेंटचा विचित्र कट्टा बांधून सध्या कळसाला आधार दिलेला आहे. पण त्यामुळे कळसाची शोभा गेलेली आहे. मंदिर परीसरात अनेक पिंडी, सतीशिळा आणि समाधी पाहायला मिळतात.

उत्तरेश्वर मंदिर  (Uttareshwar Mandir,Ter)

उत्तरेश्वर मंदिर


गोरोबाकाका मंदिर पाहून तेरणा नदी ओलांडून गेल्यावर दाट वस्तीत असलेल्या उत्तरेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. ६-७ व्या शतकात कलचुरी राजवटीत संपूर्णपणे वींटांमध्ये बांधलेले हे एकमेव मंदिर आज महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. मंदिराच्या बांधकामात शोभा आणण्यासाठी विविध प्रकारच्या नक्षीकाम, मकरशिल्प असलेल्या वीटा खास बनवून वापरलेल्या आहेत. मंदिराच्या पाया व भिंतींसाठी भरीव आणि जड वीटा वापरलेल्या असून कळसासाठी मात्र हलक्या वीटा वापरलेल्या आहेत. जेणेकरून कळसाचे वजन कमी होईल. कळसासाठी ज्या वीटा बनवल्या आहेत त्या इतक्या हलक्या (त्याचवेळी शिखराचे वजन पेलण्या इतक्या मजबूत) आहेत की त्या पाण्यावर तरंगतात. वस्तूसंग्रहालयात आपल्याला अशाप्रकारची वीट पाण्यावर तरंगणारी वीट पाहायला मिळते.  वजनाने हल्की आणि तरीही मजबूत अशी वीट बनवण्यासाठी मातीत मोठ्या प्रमाणावर तुस मिसळले जाते. ही वीट उच्च तापमानाला भाजल्यावर त्यातील तूस जळून जाते आणि सच्छिद्र पोकळ्या तयार होतात. अशाप्रकारे हलकी आणी मजबूत वीट बनवली जात असे. उत्तरेश्वर मंदिराच्या बाहेर काही वीरगळ पाहायला मिळतात. 


उत्तरेश्वर मंदिर










त्रिविक्रम मंदिर
त्रिविक्रम मंदिर (Trivikram Mandir,Ter)

उत्तरेश्वर मंदिरापासून ५ मिनिटाच्या अंतरावर चैत्य गृहासारखी गजपृष्ठाकार रचना असलेले त्रिविक्रमाचे मंदिर पाहायला मिळते. हे मंदिरही पूर्ण वीटांध्ये बांधलेले असून मंदिरात श्री विष्णूची त्रिविक्रम मुर्ती आहे. मुर्तीच्या पायाशी बळी, शुक्राचार्य आणि बळीच्या पत्नीची मुर्ती असून बाजूला भैरवाची मुर्ती आहे. मंदिरातील कानडी शिलालेखानुसार शके १००० मध्ये कळचुर्य घराण्यातील महामंडळेश्वर जोगम्रस याचा उल्लेख आहे. मंदिरा समोर असलेल्या मंडपात गरुडाची मुर्ती आहे. 

त्रिविक्रम मंदिर


जाण्यासाठी :- धाराशिव (उस्मानाबाद) रस्त्याने आणि रेल्वेने इतर शहरां जोडलेले आहे. धाराशिव (उस्मानाबाद) हून २५ किमी आणि तुळजापूरहून ५० किमी अंतरावर तेर गाव आहे. गावात खाण्या पिण्याची सोय आहे.

तेर गावाची सफ़र करुन धाराशिव (उस्मानाबाद) कडे मोर्चा वळवावा. उस्मानाबाद म्हणजेच पूर्वीचे धाराशिव. या नगराकडे येणार्‍या मार्गावर धाराशिव लेणी आहेत.

धाराशिव लेणी  Dharashiv Caves, Osmanabad)

धाराशिव लेणी


      लेणी आणि संपन्न व्यापारीमार्ग यांच एकदम घट्ट नात आहे. प्राचीनकाळी पैठण, तेर या शहरांमधून विविध प्रकारचा माल पश्चिम किनार्‍या वरील भडोच, शुर्पारक(सोपारा), कल्याण, चौल इत्यादी बंदरात  व्यापारी मार्गाने जात असे. पश्चिम किनार्‍यावरील बंदरा मार्फत परदेशाशी होणार्‍या या व्यापारामुळे व्यापार्‍यांची भरभराट होत होती. त्यांनी दिलेल्या देणग्यांमधून व राजाश्रयामुळे महाराष्ट्रात अनेक लेणी खोदली गेली. त्यामुळे संपन्न बंदरे, व्यापारी मार्ग, बाजारपेठा, राजधान्या यांच्या आसमंतात ही लेणी मुख्यत्वे करुन आढळतात. या लेण्यांचा धार्मिक कार्यासाठी आणि व्यापारी मार्गावरील विश्रांती स्थाने म्हणुन उपयोग होऊ लागला. व्यापार्‍यांनी दिलेल्या दानातून या लेण्यंचा दैनिक खर्च चालत असे, अशी परस्पर पूरक व्यवस्था समाजातल्या या दोन्ही घटकांच्या सोयीची होती. 


 पैठण , तेर (तगर) नगरांपासून जाणार व्यापारी मार्ग धाराशिव (म्हणजे आजचे उस्मानाबाद) या प्राचीन शहरातून जात असे. या व्यापारी मार्गावर धाराशिव शहरा नजिक सहाव्या शतकात बालाघाट डोंगररांगेत लेणी खोदण्यात आली. ती लेणी धाराशिव लेणी म्हणुन आजही प्रसिध्द आहेत. बौध्द, हिंदू, जैन अशी एकूण ११ लेणी या परिसरात आहेत. याशिवाय येथे एक समाधी मंदिर आहे. त्याच्या बांधकाम शैली वरुन ते सतराव्या शतकात बांधले असावे.



 उस्मानाबाद शहरापासून ७ किमी वर धाराशिव लेणी आहेत. जेथे रस्ता संपतो तेथून लेण्यांपर्यंत खाली उतरण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍या उतरायला सुरुवात केल्यावर डाव्या बजूला एक ठळक पायवाट दिसते. या पायवाटेने पुढे गेल्यावर ठराविक अंतरावर ३ हिंदू लेणी पाहायला मिळतात. त्यातील दुसर्‍या लेण्यात रामायण महाभारत आणि हिंदू पुराणातल्या कथांवर आधारीत शिल्पपट कोरलेले पाहायला मिळतात. हिंदू लेणी पाहून परत पायर्‍यांपाशी येऊन खाली उतरल्यावर आपण बौध्द लेण्यांपाषी पोहोचतो. यातील दुसरे लेणे भव्य असून त्याला दगडात कोरलेले कमानदार प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूस व्दारपाल कोरलेले आहेत. आत गेल्यावर उजव्या बाजूला दगडात कोरलेल्या स्तूपाचे अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणी सुरुवातीची काळात बौध्द लेणे होते. त्या लेण्यात मुचलिंड बुध्दाची मुर्ती होती. या मुर्तीत आणि पार्श्वनाथांच्या मुर्तीत असलेल्या साम्यामुळे नंतरच्या काळात ही लेणी जैन लेणी म्हणुन ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लेण्यातल्या मुळ मुर्तींना आज वेगळ्याच देवतेचे नावाने पुजलेल्या पाहायला मिळतात.

स्तुपाचे अवशेष पाहून पायऱ्या चढून लेण्यात प्रवेश करतांना ओवरीच्या खालच्या बाजूस भार्गव कोरलेले पाहायला मिळतात. लेण्याची रचना ओवरी , सभामंडप त्याच्या दोन्ही बाजूला असलेले विहार आणि गर्भगृह अशी आहे. आजच्या तारखेला ओवरी नष्ट झालेली आहे. सभामंडप २० खांबांवर तोललेला आहे. या खांबावर खूप सुंदर नक्षीकाम होते . लेण्याची दुरुस्ती करतांना ते नष्ट झाले . आता फक्त उजव्या बाहेरच्या कोपऱ्यातल्या खांबावर नक्षीकाम पाहायला मिळते . सभामंडपाच्या दोन्ही बाजूला ७ खोल्या आहेत. गर्भगृहात पार्श्वनाथाची मुर्ती आहे .

समाधी मंदिर 


या लेण्या समोरच मराठा सरदाराची समाधी मंदिर आहे . त्याची रचना मराठेशाहीतील वाड्याप्रमाणे आहे . गाभाऱ्यात शिवपिंडीची स्थापना केलेली आहे . गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस कमानदार ओवऱ्या आहेत. गाभाऱ्या समोर असलेल्या दारातून आणि कळसातून फक्त पिंडीवर प्रकाश पडेल अशी योजना केलेली आहे . मंदिरासमोर वीरगळ आणि ३ समाध्या आहेत.

समाधी मंदिर 


या नेहमीच्या गडबडीपासून लांब असलेल्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात लेणी आणि मंदिर पाहाता पाहातांना आपला काही शतकांचा कालप्रवास होतो.



तुळजापूर , धाराशिव लेणी आणि तेर ही तीनही ठिकाण खाजगी वहानाने एका दिवसात पाहून होतात.

जाण्यासाठी :- धाराशिव (उस्मानाबाद) रेल्वेने आणि रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. उस्मानाबाद पासून ७ किमीवर धाराशिव लेणी आहेत. ती आडबाजूला असल्याने खाजगी वाहानाने लेण्यांपर्यंत जाता येते.

औसा किल्ला  (Ausa Fort)


लातूर जिल्ह्यातील उदगीर व औसा हे दोन सुंदर भूईकोट किल्ले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे किल्ले निजामाच्या संस्थानात असल्यामुळे नांदते होते. संस्थानाची सरकारी कार्यालये या किल्ल्यात असल्याने या किल्ल्यांवरील बहुतेक इमारतींचा वापर बदलला तरी त्या शाबूत आहेत. तसेच हे किल्ले पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून त्यांनी डगडूजी केल्याने किल्ल्यांची शान अजूनही टिकून आहे. भूईकोट किल्ल्यांची सर्व वैशिष्ट्ये या किल्ल्यांमध्ये पहायला मिळतात. औसा किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आढळणारे मोर. किल्ल्यावरील झाडी, आजूबाजूची शेती व कमी माणसांचा वावर यामुळे या किल्ल्यात अनेक मोर पहायला मिळतात. स्वत:चे वहान असल्यास औसा किल्ल्याबरोबर खरोसा येथील लेणी, निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर व उदगीरचा किल्ला ही ठिकाणे एका दिवसात पहाता येतात.



औसा गावातून गाडीने आपण थेट किल्ल्याच्या लोहबंदी दरवाजा पर्यंत जाऊ शकतो. औसा गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामूळे  किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी ४० फूट खोल व २० फूट रूंद खंदक खोदलेला आहे. हा खंदक दोनही बाजूनी बांधून काढलेला आहे. पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे व प्रवेशव्दारासमोर खंदकावर उचलता येणारा पूल ठेवलेला असे. हा पूल सूर्यास्तानंतर व युध्द प्रसंगी उचलून (काढून) घेतला जात असे. आज गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजलेला असल्यामुळे थेट किल्ल्यात प्रवेश करता येतो. लोहबंदी दरवाजातून आत शिरल्यावर खंदकात काही घर (वस्ती) आहेत व इतर बाजूच्या खंदकात सध्या शेती केली जाते.


औसा किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. बाहेरील तटबंदीची उंची ७० फूट असून त्यात १२ बुरुज आहेत. बाहेरील तटबंदीवर २ फूट रुंद व ३ फूट उंच चर्या आहेत. आतील तटबंदी १०० फूट उंच असून त्यात १२ बुरुज आहेत. चर्या, तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. खंदक ओलांडून जातांना खंदकात पायर्‍या असलेल्या दोन विहिरी आहेत. किल्ल्याला एकामागोमाग एक असे ४ दरवाजे आहेत. किल्ल्यात चांद विहिर, तवा विहीर, कटोरी विहिर अशा तीन विहिरी आहेत. किल्ल्यात अनेक वैशिष्य़्पूर्ण तोफ़ा आहेत. त्यात एक  ७ फूट ४ इंच लांब व २ फूट ४ इंच व्यासाची पंचधातूची तोफ आहे.या तोफेवर फारसीतील शिलालेख आहे व मागच्या बाजूला सूर्यमुख कोरलेल आहे.


औसा किल्ल्यावरील अजून एक वेगळी वास्तू म्हणजे "जलमहाल". एका बांधीव तलावाच्या खाली हा महाल आहे . महालात उतरण्यासाठी तलावाच्या एका बाजूला जीना आहे. विजेरी घेऊन यात उतरावे लागते. खाली उतरल्यावर आतमध्ये अनेक कमानी असलेला महाल पहायला मिळतो. या महालात हवा आणि प्रकाश आत येण्यासाठी छ्तामध्ये झरोके अशाप्रकारे बांधलेले आहेत की त्यांचे तोंड तलावाच्या पाण्याच्या पातळीच्या वर उघडेल. यामुळे तलावात पाणी भरले तरी महालाच्या  छ्तामध्ये असलेल्या झरोक्यातून पाणी खाली येत नसे. या महालाचा उपयोग उन्हाळ्याच्या दिवसात रहाण्यासाठी केला जात असे. जमिनी खाली बांधलेला महाल व वर असलेले तलावातील पाणी यामुळे महालात गारवा असे. या महालाचा उपयोग खलबतखाना म्हणूनही होत असावा.

औसा किल्ल्यापासून २३ किमी अंतरावर खरोसा लेणी आहेत.

 खरोसा लेणी  (Karosa Caves)




लेणी म्हटल की आपल्या डोळ्यासमोर अजिंठा, वेरुळ आणि सह्याद्रीच्या कानाकोपर्‍यात काळ्या बेसॉल्ट मध्ये खोदलेली सुबक लेणी येतात. बेसॉल्ट व्यतिरीक्त महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात आढळणारा दुसरा दगड म्हणजे जांभा दगड. हा दगड सच्छिद्र आणि ठिसूळ असल्याने लेणी खोदण्यासाठी हा दगड निकृष्ठ प्रतीचा  समजला जातो. त्यामुळे जांभा दगडात सहसा लेणी खोदलेली पाहायला मिळत नाहीत. कोकणापासून काहीशे मैल दुर असलेल्या लातूर जिल्ह्यातील खरोसा गावाजवळ एक चक्क जांभा दगडाचा डोंगर आहे. लाखो वर्षापूर्वी पृथ्वीच्या पोटात झालेल्या उलथापालथीमुळे याठिकाणी या जांभ्या दगडाच्या डोंगराची निर्मिती झाली. ती का आणि कशी झाली ह्यावर भूगर्भशास्त्रज्ञांची अनेक मत आहेत. ती आपण बाजूल ठेऊया. पण याभागात असलेल्या या वेगळ्याच प्रकारच्या लालसर रंगाच्या दगडाचे त्यावेळच्या लेणी खोदणार्‍या कलाकारांना आकर्षण वाटल असेल आणि त्यातूनच या ठिसूळ दगडात त्यांनी लेणी कोरायचे आव्हान स्विकारल असेल. इसवीसनाच्या सातव्या आठव्या शतकात चालुक्य राजवटीत या लेण्यांची निर्मिती झाली असे मानले जाते.



लातूर निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावाच्या पुढे रस्त्याला लागून असलेल्या छोट्या डोंगरावर १२ लेणी आहेत. महामार्गावरून थेट लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. पहिले लेणे बौध्द लेणे असून लेण्याच्या बाहेर स्तुपाचा उरलेला भाग पाहायला मिळतो. लेण्यात बुध्दाची मुर्ती आहे. दुसरे लेणे हे ब्राम्हणी (हिंदु) लेणे असून ते दोन मजली आहे. लेण्याच्या खालच्या आणि वरच्या मजल्यावर सभामंडप आणि गर्भगृह, प्रदक्षिणापथ अशी रचना पाहायला मिळते. लेण्याच्या भिंतीवर शिव, विष्णू, ब्रम्हा, व्दारपाल, शिवलिंग कोरलेली आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी अरुंद जीना आहे. जीन्याने वर गेल्यावर खांबांवर तोललेला भव्य सभामंडप आणि गाभार्‍यात शिवलिंग पाहायला मिळते. तिसरे लेणे महादेव लेणे हे महत्वाचे लेणे आहे. येथे शैव आणि वैष्णव पंथांचा मिलाप झालेला पाहायला मिळतो. लेण्याच्या बाहेरच्या भिंतीवर डाव्या बाजूला शंकर आणि उजव्या बाजूला कोदंडधारी राम आणि लेणी बांधण्यासाठी दान देणार्‍या दांपत्याच शिल्प कोरलेल आहे. आतल्या बाजूला सभामंडपाच्या डाव्या भिंतेवर शिवाची गजासूरवध, उमामहेश्वर, रावणानुग्रह इत्यादी शिल्प कोरलेली आहेत. तर उजव्या बाजूच्या भिंतीवर विष्णु अवतारातील गोवर्धन पर्वत उच्लणारा कृष्ण, वराह, नृसिंह, वामन यांची शिल्प कोरलेली आहेत. गाभार्‍यात शिवलिंग आहे. गाभार्‍याच्या दारावर व्दारपाल व नाग कोरलेले आहेत. गाभार्‍याच्या भिंतीवर राम रावण युध्द आणि अमृतमंथनाचे शिल्प कोरलेले आहे. पुढचे महत्वाचे लेणे म्हणजे लाकोले लेणे यात महिषासूरमर्दिनी, गणेश यांची शिल्पे आहेत आणि गाभार्‍यात विष्णुची मुर्ती आहे. याशिवाय सहाव्या - सातव्या लेण्यासमोर ठळकपणे दिसणारे हत्ती आपले लक्ष वेधून घेतात. लेण्यांच्या वरच्या बाजूला डोंगर माथ्यावर रेणुकादेवीच मंदिर आणि सीता न्हाणी नावचा पाण्याचा साठा आहे. खाजगी वहानाने औसा किल्ला, खरोसा लेणी आणि निलंगा गावातील प्राचीन नीलकंठेश्वराचे मंदिर एका दिवसात पाहुन होते. 


जाण्यासाठी :-
लातूर - निलंगा - बिदर रस्त्यावर लातूर पासून ४३ किमीवर व औसा पासून २३ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावापुढे असलेल्या डोण्गरावर लेणी आहेत. एक पक्का रस्ता थेट डोंगरावरील लेण्यांपर्यंत जातो. 

खरोसापासून १० किमीवर निलंगा गाव आहे.

निलंगेश्वर मंदिर  (Nilangeshwar Mandir, Nilanga)




लातूर - उदगिर रस्त्यावर लातूर पासून ६३ किमीवर निलंगा गाव आहे. तेरणा नदीच्या तीरावर वसलेल्या या गावात भर वस्तीत निलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे सभामंडप अंतराळ आणि तीन गर्भगृह अशी रचना आहे. मंदिराचे छत २८ स्तंभ आणि २२ अर्ध स्तंभांवर तोललेले आहे. मंदिराचे शिखर अस्तित्वात नाही. मंदिरातील स्तंभांवर आणि छतावर कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर सुरसुंदरींच्या विविध प्रकारच्या मुर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात. बाह्य भिंतींवरील देव कोष्टकात महिषासूर मर्दीनी,शिव,वराह, विष्णू नरसिंह यांच्या मुर्ती आहेत. मंदिराला राखाडी रंगाच्या ऑईलपेंटने रंगवून दगडाचा नैसर्गिक काळा रंग झाकून टाकलेला आहे. 

                                                                                   
























उदगिर (Udgir Fort)



लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला प्राचीन इतिहास आहे. बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेल्या उदगीरचे प्राचीन नाव "उदयगिरी" होते. काही ठिकाणी याचा उल्लेख "उदकगिरी" या नावानेही येतो. या डोंगररांगेत लेंडी नदीचा उगम होत असल्यामुळे या परीसराला हे नाव मिळाले असावे. अगदी पुराण काळापासून या नगरीचे उल्लेख सापडतात त्यामुळे या शहराला  ऎतिहासिक व आध्यात्मिक मह्त्व आहे. सदाशिवराव (भाऊ) पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे.


उदगिर किल्ल्याचा उल्लेख ११ शतकातील शिलालेखांमध्ये येत असला तरीही या नगरीचा उल्लेख पूराण कथांमध्येही आढळतो. करबसवेश्वर ग्रंथ या पोथीतील कथे नुसार उदलिंग ॠषींनी शंकराची तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन ॠषींनी आशिर्वाद दिला,"मी या ठिकाणी लिंग रुपाने येथे प्रगट होईन." त्यानुसार काही काळाने जमिनीतून एक लिंग हळूहळू वर आले. पुढील काळात याठिकाणी वस्ती वाढून नगर वसले त्याला उदलिंग ॠषींच्या नावावरून उदगीर हे नाव पडले. आजही किल्ल्यात उदगिर महाराजांचा मठ व शिवलिंग आहे.

उदगीर हा भूईकोट किल्ला आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. त्यामूळे त्यातील अवशेष आजही अस्तित्वात आहेत. किल्ल्याला चार भक्कम दरवाजे आहेत. दिवाने आम, दिवाने खास, नर्तकी महाल, हवा महाल इत्यादी महाल आहेत. किल्ल्यात अनेक फ़ारसी शिलालेख आहेत.


धाराशिव (उस्मानाबाद) परिसरातील अपरिचित काटीच्या मशिदीची माहीती वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा.
https://samantfort.blogspot.com/2019/12/blog-post_18.html

Monday, August 21, 2017

डभोईची लढाई आणि किल्ला (Battle of Dabhoi & Dabhoi Fort , Offbeat Gujrat)

Hira Gate , Dabhoi



         गुजरात मधील सरदार सरोवर धरण पाहाण्यासाठी हल्ली बरेच पर्यटक जातात . बडोद्याहून सरदार सरोवराकडे जाताना ३० किलोमीटरवर डभोई नावाचे तालुक्याचे गाव लागते . गुजरात मधल्या डभोईचा महाराष्ट्राशी संबंध म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी लढाई डभोई किल्ल्याच्या साक्षीने झाली होती. १ एप्रिल १७३१ रोजी छत्रपती शाहूंचे पेशवे बाजीराव यांची सेनापती त्रिंबकराव दाभाडे, पिलाजी गायकवाड, पवार,  निजाम यांच्या सयुक्त सैन्याशी लढाई झाली होती.



या लढाईची पार्श्वभूमी थोडक्यात अशी होती. गुजरात आणि माळव्याच्या चौथाई वरुन बाजीराव आणि दाभाडे यांच्यात बेबनाव झाला होता. त्याचवेळी माळव्याची चौथाई वसूलीचे हक्क बाजीरावाने शिंदे, होळकर यांना दिले. त्यामुळे धारचे पवार नाराज झाले. चिमाजी आप्पांनी मुघला विरूध्द गुजरातेत आघाडी उघडलेली होती त्यामुळे पिलाजी गायकवाड नाराज झाले होते. बाजीरावाच्या वाढत्या प्रस्थामुळे अनेक जण नाराज झाले होते. या नाराजाना एकत्र करुन त्रिंबकरावांनी बाजीरावा विरूध्द आघाडी उघडली. त्यासाठी त्यांनी मराठ्यांचा शत्रू असलेल्या निजाम उल हकशी पण संधान साधले. निजामालाही बाजीरावाचा सत्ता विस्तार खुपत होता त्यामुळे तोही असंतुष्टाना सामिल झाला. महम्मदखान बंगश या मुघल सरदाराकडे माळवा प्रांताची सुभेदारी होती. बाजीराव, शिंदे, होळकर यांनी माळवा काबिज केल्याने बंगशही असंतुष्टाना मिळाला. 

खरे पाहायला गेले तर हा शाहू महाराजांच्या पेशव्या आणि सेनापती मधला तंटा होता. तो त्यांनी शाहू महाराजांच्या दरबारात सोडवणे आवश्यक होते. पण बाजीराव उत्तरेच्या मोहीमेत गर्क असल्याचे पाहून दाभाडेनी निजाम आणि इतर असंतुष्टांशी संधान बांधले. हा सरळसरळ राजद्रोह होता. छत्रपती शाहूंनी दाभाड्यांना पत्र लिहून समज दिली. पण दाभाडॆंनी त्याकडे दुर्लक्ष करुन ऑक्टोबर १७३० मध्ये गुजरातकडे कुच केली आणि बडोद्याच्या अलिकडे नर्मदा आणि ओरसंग नद्यांच्या संगमावर असलेल्या कर्नाली गावात त्यांने सैन्याचा तळ ठोकला.

हैद्राबादहून निघालेला निजाम गुजरातमध्ये थेट न येता माळव्याचा मुघल सुभेदार बंगश याला भेटायला माळव्यात गेला. तेथे नर्मदा नदीकाठी अकबरपूर येथे त्याची आणि बंगशची २६ मार्च १७३१ ला भेट झाली. 

बाजीराव दसर्‍या नंतर पुण्याहून निघाले. ते खानदेश मार्गे थेट अहमदाबादला पोहोचले. मुगल बादशहाने अभयसिंहला गुजरात प्रांताची सुभेदारी दिलेली होती. बाजीरावांनी अभयसिंहाची भेट घेऊन त्याच्याशी तह करुन आपली उत्तरेची बाजू निर्धोक केली. त्याआधी चिमाजी आप्पानेही सुरतच्या मोगल सुभेदार सरबुलंद खान याच्याशी करार करुन गुजरात मधून महाराष्ट्रात जाण्याचा मार्ग निर्धोक केला होता.  


बाजीरावाच्या सैन्य मोक्याच्या जागी कसे विखुरलेले होते ते पाहू. चिमाजी आप्पा बडोद्याला आपले सैन्य घेउन होते. शिंदे आणि होळकर धार, मंडू उर्फ मांडवगड परिसरात होते. बंगश आणि निजामाच्या सैन्याला ते काही काळ रोखून धरु शकले असते. पिलाजी जाधवांचे सैन्य खानदेशात होते. गुजरात मधून महाराष्ट्रात जाण्याचा मार्ग त्यामुळे निर्धोक होता. अशा प्रकारे आघाडी आणि पिछाडी दोन्ही सुरक्षित करुन निजाम - बंगशचे सैन्य आणि दाभाड्यांचे सैन्य एकत्र येण्यापूर्वी दाभाड्यांच्या सैन्यावर हल्ला करणे आवश्यक होते.  

Battle of  Dabhoi 

       त्यासाठी बाजीरावांनी जलद हालचाली केल्या. अहमदाबादहून बाजीराव निघाले ते बडोद्याला पोहोचले. तेथे त्यांना चिमाजी आप्पांचे सैन्य येऊन मिळाले. दाभाड्यांचे सैन्य ४०००० जणांचे होते तर बाजीरावांचे सैन्य त्याच्या निम्मे होते. बाजीरावांनी दाभाडे यांना सला करण्यासाठी निरोप पाठवला. पण दाभाडे युध्द सज्ज झाल्याचे पाहून बाजीराव डभोई जवळ पोहोचले. डभोईला किल्ला होता पण ती जागा युध्दासाठी योग्य नसल्याने बाजीरावांनी डभोई बडोदा रस्त्यावर डभोई पासून ९ किमीवरील थुवाई गावाकडे मोर्चा वळवला. १ एप्रिलला दोन्ही सैन्यात लढाई झाली. ९ तास चाललेल्या या युध्दात दाभाडे गोळी लागून मारले गेले. उदाजी पवार, गायकवाड पकडले गेले. बाजीरावांनी त्यांना मानाची वस्त्रे देऊन बडोदा आणि धारच्या चौथाईचे हक्क दिले. निजाम आणि बंगश नर्मदेकाठी अकबरपूरा गावात असतानांच त्यांना बाजीरावने युध्द जिंकल्याचे कळले. त्यामुळे निजाम आल्यापावली परत हैद्राबादला गेला. युध्दा नंतर बाजीरावनेही जलद हालचाली करत पुणे गाठले. तेथे थोडा काळ थांबुन छत्रपती शाहूंची भेट घेतली. निजाम आणि मोगल या मराठ्यांच्या शत्रूशी युती केल्याने सहानुभूती गमावलेल्या दाभाडे यांच्या मुलांना छ. शाहू महाराजांनी सेनापती पद दिले. पण त्यानंतरच्या काळात मराठ्यांच्या सेनापतींचे महत्व उत्तरोत्तर कमी होत गेले आणि त्याचवेळी पेशव्यांचे प्रस्थ वाढत गेले. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला डभोई किल्ला १ तासात पाहाता आरामात येतो.

नांदोडी भागोल (Nandodi Bhagol, Dabhoi)


सहाव्या शतकात बांधलेल्या डभोई उर्फ दर्भावती हा किल्ला वेगवेगळ्या काळात  सोलंकी वाघेला , मुगल , मराठे यांच्या अधिपत्याखाली होता हा नगर कोट असल्याने  भारतातल्या सगळ्या नगरकोटांची जी अवस्था झाली आहे तशीच डभोईची अवस्था झाली आहे . किल्ल्यात असलेल्या नगराने वाढता वाढता किल्ल्यालाच गिळून टाकलेले आहे . किल्ल्याचेच सामान वापरुन  यातील अनेक घर बांधलेली आहेत . इतर नगर कोटात उरतात त्याप्रमाणे येथेही किल्ल्याचे चार दिशांना असणारे चार दरवाजे उरलेले आहेत . पण हे दरवाजेच या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहेत. १२ व्या शतकात बांधलेले, अप्रतिम कोरीवकाम असलेले हे दरवाजे पाहाण्यासाठी डभोईला वाट वाकडी करुन जायला हरकत नाही.गुजरात पुरातत्व खात्याने हे दरवाजे अतिशय सुंदरपणे जतन केले आहेत . त्यांच्या संरक्षणासाठी केवळ संरक्षित स्मारकाचा निळा फलक  न लावता त्याठिकाणी रक्षक नेमलेले आहेत .





















बडोद्याकडून गावात शिरतानाच डाव्या बाजूला किल्ल्याचा एक बुरुज त्याच्या बाजूची तटबंदी आणि पाण्याने भरलेला खंदक आणि तलाव पाहायला मिळतो. गावात शिरल्यावर आपल्या समोर येते किल्ल्याचे भव्य असे पश्चिम व्दार याला वडोदरा भागोल (प्रवेशद्वार) या नावाने ओळखले जाते. २० फुट उंच असलेला दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी पिवळ्या दगडात  (सॅंडस्टोन) मध्ये बांधलेली आहे . या दरवाजाला ६ कमानी असून त्या लाल दगडात बनवलेल्या आहेत. या कमानींवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. त्यात पक्षी, फुल , वेलबुट्टी , व्याल , किर्तीमुख यासारखे काल्पनिक प्राणी कोरलेले आहेत . दोन कमानींच्या मधल्या भागात विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या डाव्या बाजूला २० खांब असलेले एक सुंदर दालन आहे . हा दरवाजा पाहून थोडे पुढे गेल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो. त्याला उत्तर दरवाजा , माहुडी भागोल या नावाने ओळखले जाते . या दरवाजातून जाणाऱ्या रस्त्याने रहदारी चालू असते . दरवाजा ५ कमानींवर तोललेला असून कमानींवर कोरीवकाम केलेले आहे . दोन कमानींच्या मध्ये मुर्ती आहेत . यापुढील दरवाजा पूर्व दिशेला आहे . या दरवाजाला हिरा भागोल या नावाने ओळखले जाते. किल्ल्याचा हा सर्वात सुंदर दरवाजा असून या दरवाजाच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला असलेल्या तटबंदीत १०० मीटर अंतरापर्यंत अप्रतिम कोरीवकाम केलेले आहे . यात अनेक गवाक्षे , देवकोष्टके आहेत. त्यात शंकर , विष्णू, लक्ष्मी , चामुंडा अशा अनेक देवदेवतान्च्या मुर्ती आहेत . समुद्रमंथना पासून अनेक पौराणिक प्रसंग कोरलेले या ठिकाणी पाहाता येतात. घोड्यावर बसलेले योध्दे , हत्ती , हंस , व्याल फुले , वेलबुट्टी याने हा दरवाजा सजवलेला आहे . दरवाजा ६ कमानींवर तोललेला असून कमानींवर कोरीवकाम केलेले आहे . या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस एक दरवाजा असून त्याची कमान ढासळलेली आहे पण उरलेल्या भागावरील कोरीवकाम सुंदर आहे .

Carving on Hira Bhagol, Dabhoi

Carving on Hira Bhagol, Dabhoi

Carving on Hira Bhagol, Dabhoi

Carving on Hira Bhagol, Dabhoi

१२ व्या शतकात बांधलेल्या या दरवाजा बद्दल एक दंतकथा या भागात प्रचलित आहे . या दरवाजाचे बांधकाम करणारा स्थापिती हरीधर याने या दरवाजासाठी आणलेले दगड चोरुन आणि इथलेच मजूर वापरुन आपल्या बायकोसाठी तेन तलाव नावाचा तलाव डभोई पासून ३ किमीवर बांधला . हा अपहार राजाला कळल्यावर हरीधरला या दरवाजातच चिणून मारण्यात आले . त्यामुळे या दरवाजाचे नाव हिरा भागोल पडले आहे .किल्ल्याचा शेवटचा दरवाजा म्हणजे दक्षिण दरवाजा हा दरवाजा नांदोडी भागोल या नावने ओळखला जातो. सहा कमानी असलेल्या या दरवाजाच्या कमानींवर आणि दरवाजाच्या वरही कोरीवकाम केलेले आहे. या दरवाजाच्या संरक्षणासाठी बाहेरच्या बाजूस अजून एक दरवाजा बांधलेला आहे . 

Vadodara Bhagol, Dabhoi

Vadodara Bhagol, Dabhoi

माहुडी भागोल (Mahudi Bhagol, Dabhoi)

Hira Bhagol second gate


जाण्यासाठी :- बडोदा - डभोई राज्य मार्ग १६१ ने बडोद्यापासुन ३० किमीवर डभोई गाव आहे .

मुंबईहून बडोद्याकडे येताना बडोद्याच्या अलिकडे करजन गाव आहे . करजन गावातून राज्यमार्ग १११ ने डभोईला जाता येते . अंतर ३० किमी आहे .





दक्षिण गुजरात मधील किल्ले हा लेख वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा 
https://samantfort.blogspot.com/2018/12/blog-post.html?m=1


Second gate of Nandodi Bhagol, Dabhoi

#Bajiraopeshawa#battleofdabhoi#offbeatgujrat#offbeatplacesnearbaroda#

Friday, August 11, 2017

Parasa Lepida



आपलं शहरी जीवन एवढं व्यस्त झालयं की, आपल्या आजूबाजूला निसर्गात घडणार्‍या छोट्या गोष्टींकडे आपले पटकन लक्ष जात नाही. माझ्या घराला लागून आंब्याचा डेरेदार वृक्ष आहे. त्यावर ऋतुमानाप्रमाणे येणारे विविध पक्षी आणि फ़ुलपाखरे यांची आता माहिती झालेली आहे. त्यात नविन कोणी दिसला तर आमची घरतल्यांची चर्चा होते. दरवर्षी घरटी करणारे रातबगळे, गाय बगळे, कावळे, नाचण, शिंपी, पोपट, वटवाघूळ, विविध प्रकारचे पतंग आमच्या परिचयाचे झालेले आहेत. ( त्यावर "माझा पावसाळी मित्र" हा ब्लॉग लिहिलेला आहे. ब्लॉग वाचण्याकरीता लिंकवर टिचकी मारा https://samantfort.blogspot.com/2014/10/indian-bird-night-heron.html)



आज सकाळी नेहमीप्रमाणे ऑफ़ीसला जायच्या घाईत होतो. पु.ल.नी म्हटल्या प्रमाणे मुंबईकर असल्यामुळे माझ्या आयुष्याचे ७.४७ वाजलेले आहेत. नेहमीप्रमणे वेळेच गणित चुकले होते. सकाळीचे ७.४७ ची फ़ास्ट लोकल पकडायची म्हणून घाईघाईने जीना उतरुन फ़ुटपाथवर आलो. आमच्या सोसायटीचे कंपाऊंड आणि फ़ुटपाथ यांच्या मध्ये आंब्याच झाड आहे, या झाडाखाली पोपटी रंगांचे पुंजके पडलेले दिसले. पावसाळ्यात झाडाच्या फ़ांद्यावर , बुंध्यांवर शेवाळे येते, काही बांडगुळे वस्तीला असतात त्यापैकी एक असेल म्हणून दुर्लक्ष केले आणि रिक्षा पकडायला पुढे निघालो. मग एकदम लक्षात आले की, शहरातल्या झाडवर प्रदुषणामुळे सहसा शेवाळे (मॉस) येत नाही. जंगलात मात्र पावसाळ्यात आपल्याला झाडावर शेवाळे हमखास बघायला मिळते. पुन्हा मागे वळलो आणि नीट पाहिल्यावर कळले की पोपटी रंगांचे अनेक सुरवंट झाडाच्या बुंध्यापाशी पडलेले आहेत. पोपटी रंगाचे गवतासारखे पुंजके त्याच्या अंगावर होते. पाठीवर मध्यभागी डोक्यापासून शेपटी पर्यंत निळ्या रंगाचा पट्टा दिसत होता. सुरवंट कितीही गोंडस दिसत असला तरी त्याला हात लावणे मुर्खपणाचे होते. कारण त्यांच्या गवताच्या पुंजक्या सारख्या दिसणार्‍या भागात सौम्य विष असणार त्यामुळे सुरवंटाला हात लावाला तर खाज येणे,पूरळ उठणे असे प्रकार होतात. आपल्या शत्रूंपासून बचाव करण्यासाठी निसर्गानेच ही योजना केलेली असते. जवळ पडलेल्या काडीने सुरवंट उलटा करुन पाहिल्यावर लक्षात आले की, त्याच्या दोन्ही बाजूलाही निळ्या रंगाच्या रेषा आहेत. अशा प्रकारचे सुरवंट मी याठिकाणी पहिल्यांदाच पाहात होतो. त्यामुळे त्यांची ओळख पटणे (कुठल्या फ़ुलपाखराचे आहेत) शक्य नव्हते. त्यामुळे स्मार्ट फ़ोन काढून त्यावर फ़ोटो घेतेले आणि ट्रेन पकडायला पळालो.

आंब्याच्या झाडाखाली पडलेले सुरवंट


आजकाल अनेक साईट, कम्युनिटी उपलब्ध आहेत ज्यावर जाऊन आपल्याला सुरवंट, फ़ुलपाखरे, पतंग यांची ओळख पटवता येते. त्यापैकी एखाद्या साईटवर जाऊन शोधावे असा विचार केलेला. पण नेहमीप्रमाणे ट्रेनला तुडूंब गर्दी होती. आपलेच हातपाय गोळा करुन एकत्र आणून सरळ (ताठ नव्हे) उभे राहाण्याची मारामारी असतांना, डोंबिवलीत ट्रेन मध्ये चढून त्या गर्दीत व्हॉट्साप करणारे, इतरांना धक्के देत गेम खेळणारे यांच्या बद्दल मला प्रचंड आदर आहे. लोकांना आपला त्रास होतो याची अजिबात पर्वा न करण्याचा निर्लज्ज कोडगेपणा यांच्यात कुठून येतो हे मला अजून समजलेले नाही. दिवसभराच्या रगाड्यात सुरवंट विसरुन जाउ नयेत म्हणून मी आमचे एन्व्हॉर्मेंट सायन्सची प्रोफ़ेसर प्रणॊतीला फ़ोटो पाठवून दिले. १० मिनिटात तिचा रिप्लाय आला "Parasa Lepida" Catterpillar. प्रणोती आणि चिन्मय खानोलकर हे दोघे एन्व्हॉर्मेंट सायन्सचे प्राध्यापक माझ्या अशा अनेक शंकांची न कंटाळता उत्तर देत आले आहेत. त्यांच्या बरोबर ट्रेकला गेले की निसर्गातली अनेक गुपित ते आपल्या समोर साध्या सोप्या भाषेत उलगडतात. प्रणोतीने सुरवंटाचे नाव सांगितल्यावर त्याने पान कुरतडायचे सोडून माझा मेंदू कुरतडायला सुरुवात केली.
सुरवंटानी आंब्याच्या पानांची केलेली चाळणी  

 
गुगलवर त्याबद्द्ल भरपूर माहिती आणि काही व्हिडीओज उपलब्ध आहेत. त्याचे कारण म्हणजे या सुरवंटाचे उपद्रव मुल्य. आंबा, रबर, नारळ, पाम, चहा, कॉफ़ी, केळी इत्यादी नगदी पिक देणार्‍या झाडांवर हे खादाड सुरवंट वाढतात आणि त्यांची पाने खाऊन त्याचे अपरिमित नुकसान करतात. या सुरवंटानी हल्ला केलेल्या नारळाच्या किंवा पामच्या झाडाची पाने खाल्यामुळे हिराच्या झाडू सारखे दिसायला लागतात. त्यानंतर झाडाला पहिले ६ महिने कमी फ़ळे येतात. त्यापुढील २० महिने फ़ळेच येत नाहीत. झाडाला पहिल्या सारखी फ़ळे येण्यासाठी ४० महिन्यांचा कालावधी जावा लागतो. म्हणजे जवळजवळ चार वर्ष त्या बागायतदाराला किती नुकसान होत असेल याचा अंदाज करता येईल. कदाचित त्याच्या या उपद्रवमुल्यामुळे त्याला  Parasa - Pasasite म्हणत असावेत. 

 या सुरवंटा पासून Limacodidae कुळातला Parasa Lepida हा पतंग तयार होतो. पतंग (Moth) आणि फ़ुलपाखरु (Butteerfly) यात अनेक मुलभूत फ़रक आहेत. पण आपण सरसकट सर्वांनाच फ़ुलपाखरु म्हणतो. दिवसा आपल्याला रंगीबेरंगी फ़ुलपाखरे उडताना दिसतात. तर पतंग रात्रीच्या वेळी उडतात . त्यांचे रंगही मातकट असतात. फ़ुलपाखरांचे पंख नाजूक असतात. तर पतंगांचे पंख जाडेभरडे असतात. फ़ुलपाखरांच्या मिशा (Antennae) नाजूक असतात आणि त्याच्या टोकाला बटणांसारखा गोल भाग असतो. पतंगांच्या टोकाला बटणांसारखे गोल भाग नसतात. फ़ुलपाखरु बसतांना पंख मिटून बसते तर पतंग आपले पंख पसरुन बसतात.


Parasa Lepida Moth


Limacodidae या कुळातला पतंग (Moth) पानांच्या टोकावर खालच्या बाजूला अंडी घालतो. फ़ुलपाखरांच्या/ पतंगाच्या पायाला असलेल्या सेंसर्सनी पानातल्या रस तपासला जातो. पतंगाची मादी योग्य वनस्पतीचे पानं मिळेपर्यंत या झाडा वरुन त्या झाडावर उडत राहाते. योग्य झाडाचे कोवळे पानं मिळाल्यावर त्यावर अंडी घातली जातात.  सहा दिवसांनी अंड्यातून सुरवंट बाहेर येतो. बाहेर आल्यावर कोशात जाई पर्यंत ४० दिवस तो खादाडी सुरु ठेवतो. पानाच्या टोकापासून सुरुवात करुन देठा पर्यंत पान खात खात हा सुरवंट पुढे सरकतो. तो पानाच्या शिरा खात नसल्याने शेवटी देठ आणि पानांच्या शिरांचे फ़राटेच उरतात. पक्षी आणि cuckoo wasp जातीच्या निळ्या किंवा हिरव्या मेटॅलीक रंगाची माशी हे या सुरवंटाचे नैसर्गिक शत्रू आहेत. कुकू वास्प माशीची पण गंमत आहे. ती पाना आड दडलेल्या या सुरवंटाला शोधत असते. एकदा का सुरवंट सापडला की ती त्याच्या अंगावर आपली अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या त्या सुरवंटावर वाढतात. त्याचा फ़न्ना उडवून टाकतात. सुरवंटांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी निसर्गाने योजलेले हे उपाय आहेत. "जीवो जीवस्य जिवनम्". अशा प्रकारच्या संकटा मधून वाचलेले सुरवंट स्वत: भोवती तपकिरी रंगाचा कोश तयार करतात. २२ दिवस कोशात राहिल्यावर त्यातून पतंग बाहेर पडतो. मातकट रंगाच्या या पतंगावर डोक्यापासून पंखांपर्यंत पोपटी पट्टा असतो. अशाप्रकारे अंड्यापासून सुरवंट- कोश - पतंग असे जीवनचक्र चालू राहाते.



२०१७ साली सुरवंट मी आंब्याच्या झाडावर प्रथम पाहिले त्यानंतर त्यांनी या झाडावर बस्तान बनवले सुरवंटांची भूक राक्षसी असते. त्यामुळे झाडाची पान मोठ्या प्रमाणावर त्यांनी फ़स्त केली . त्यामुळे २०१८, २०१९ या दोन वर्षात झाडावर फ़ार कमी आंबे लागले. आंबा सदाहरीत वृक्ष आहे पण २०२० च्या जानेवारीत या आंब्याच्या झाडाची पान झडायला सुरुवात झाली आणि एकवेळ अशी आली की झाडाच्या एका भागावर एकही पान नव्हते.  झाड भुंडे झाले होते. आंब्याच्या झाडावर असे मी पहिल्यांदाच पाहात होतो. मला वाटले सुरवंटांमुळे झाडाचा एक भाग नष्ट झाला .प्ण आठवड्या भरात फ़ांद्यांवर लालसर पालवी दिसायला लागली.. आणि त्यानंतर झाड पुन्हा तजेलदार पानांनी बहरल. २०२० मध्येही मोहोर यायचा महत्वाचा काळ पाने झडवण्यात गेल्याने आंबे कमीच आले आहे. कदाचित सुरवंटाचा नायनाट करण्यासाठी या सदाहरीत झाडाने असे केले असेल का ? याबाबतीत या विषयातल्या तज्ञांना विचारले. त्यांनी सांगितले स्वसंरक्षणासाठी झाडे अशा प्रकारे वागतात. झाडाची ही आयडीया किती प्रमाणात सफ़ल झाली ते येणार्‍या काळात कळेलच. 

अदृश्य किटकांवरील ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा....