Hira Gate , Dabhoi |
गुजरात मधील सरदार सरोवर धरण पाहाण्यासाठी हल्ली बरेच पर्यटक जातात . बडोद्याहून सरदार सरोवराकडे जाताना ३० किलोमीटरवर डभोई नावाचे तालुक्याचे गाव लागते . गुजरात मधल्या डभोईचा महाराष्ट्राशी संबंध म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी लढाई डभोई किल्ल्याच्या साक्षीने झाली होती. १ एप्रिल १७३१ रोजी छत्रपती शाहूंचे पेशवे बाजीराव यांची सेनापती त्रिंबकराव दाभाडे, पिलाजी गायकवाड, पवार, निजाम यांच्या सयुक्त सैन्याशी लढाई झाली होती.
या लढाईची पार्श्वभूमी थोडक्यात अशी होती. गुजरात आणि माळव्याच्या चौथाई वरुन बाजीराव आणि दाभाडे यांच्यात बेबनाव झाला होता. त्याचवेळी माळव्याची चौथाई वसूलीचे हक्क बाजीरावाने शिंदे, होळकर यांना दिले. त्यामुळे धारचे पवार नाराज झाले. चिमाजी आप्पांनी मुघला विरूध्द गुजरातेत आघाडी उघडलेली होती त्यामुळे पिलाजी गायकवाड नाराज झाले होते. बाजीरावाच्या वाढत्या प्रस्थामुळे अनेक जण नाराज झाले होते. या नाराजाना एकत्र करुन त्रिंबकरावांनी बाजीरावा विरूध्द आघाडी उघडली. त्यासाठी त्यांनी मराठ्यांचा शत्रू असलेल्या निजाम उल हकशी पण संधान साधले. निजामालाही बाजीरावाचा सत्ता विस्तार खुपत होता त्यामुळे तोही असंतुष्टाना सामिल झाला. महम्मदखान बंगश या मुघल सरदाराकडे माळवा प्रांताची सुभेदारी होती. बाजीराव, शिंदे, होळकर यांनी माळवा काबिज केल्याने बंगशही असंतुष्टाना मिळाला.
खरे पाहायला गेले तर हा शाहू महाराजांच्या पेशव्या आणि सेनापती मधला तंटा होता. तो त्यांनी शाहू महाराजांच्या दरबारात सोडवणे आवश्यक होते. पण बाजीराव उत्तरेच्या मोहीमेत गर्क असल्याचे पाहून दाभाडेनी निजाम आणि इतर असंतुष्टांशी संधान बांधले. हा सरळसरळ राजद्रोह होता. छत्रपती शाहूंनी दाभाड्यांना पत्र लिहून समज दिली. पण दाभाडॆंनी त्याकडे दुर्लक्ष करुन ऑक्टोबर १७३० मध्ये गुजरातकडे कुच केली आणि बडोद्याच्या अलिकडे नर्मदा आणि ओरसंग नद्यांच्या संगमावर असलेल्या कर्नाली गावात त्यांने सैन्याचा तळ ठोकला.
हैद्राबादहून निघालेला निजाम गुजरातमध्ये थेट न येता माळव्याचा मुघल सुभेदार बंगश याला भेटायला माळव्यात गेला. तेथे नर्मदा नदीकाठी अकबरपूर येथे त्याची आणि बंगशची २६ मार्च १७३१ ला भेट झाली.
बाजीराव दसर्या नंतर पुण्याहून निघाले. ते खानदेश मार्गे थेट अहमदाबादला पोहोचले. मुगल बादशहाने अभयसिंहला गुजरात प्रांताची सुभेदारी दिलेली होती. बाजीरावांनी अभयसिंहाची भेट घेऊन त्याच्याशी तह करुन आपली उत्तरेची बाजू निर्धोक केली. त्याआधी चिमाजी आप्पानेही सुरतच्या मोगल सुभेदार सरबुलंद खान याच्याशी करार करुन गुजरात मधून महाराष्ट्रात जाण्याचा मार्ग निर्धोक केला होता.
बाजीरावाच्या सैन्य मोक्याच्या जागी कसे विखुरलेले होते ते पाहू. चिमाजी आप्पा बडोद्याला आपले सैन्य घेउन होते. शिंदे आणि होळकर धार, मंडू उर्फ मांडवगड परिसरात होते. बंगश आणि निजामाच्या सैन्याला ते काही काळ रोखून धरु शकले असते. पिलाजी जाधवांचे सैन्य खानदेशात होते. गुजरात मधून महाराष्ट्रात जाण्याचा मार्ग त्यामुळे निर्धोक होता. अशा प्रकारे आघाडी आणि पिछाडी दोन्ही सुरक्षित करुन निजाम - बंगशचे सैन्य आणि दाभाड्यांचे सैन्य एकत्र येण्यापूर्वी दाभाड्यांच्या सैन्यावर हल्ला करणे आवश्यक होते.
Battle of Dabhoi |
त्यासाठी बाजीरावांनी जलद हालचाली केल्या. अहमदाबादहून बाजीराव निघाले ते बडोद्याला पोहोचले. तेथे त्यांना चिमाजी आप्पांचे सैन्य येऊन मिळाले. दाभाड्यांचे सैन्य ४०००० जणांचे होते तर बाजीरावांचे सैन्य त्याच्या निम्मे होते. बाजीरावांनी दाभाडे यांना सला करण्यासाठी निरोप पाठवला. पण दाभाडे युध्द सज्ज झाल्याचे पाहून बाजीराव डभोई जवळ पोहोचले. डभोईला किल्ला होता पण ती जागा युध्दासाठी योग्य नसल्याने बाजीरावांनी डभोई बडोदा रस्त्यावर डभोई पासून ९ किमीवरील थुवाई गावाकडे मोर्चा वळवला. १ एप्रिलला दोन्ही सैन्यात लढाई झाली. ९ तास चाललेल्या या युध्दात दाभाडे गोळी लागून मारले गेले. उदाजी पवार, गायकवाड पकडले गेले. बाजीरावांनी त्यांना मानाची वस्त्रे देऊन बडोदा आणि धारच्या चौथाईचे हक्क दिले. निजाम आणि बंगश नर्मदेकाठी अकबरपूरा गावात असतानांच त्यांना बाजीरावने युध्द जिंकल्याचे कळले. त्यामुळे निजाम आल्यापावली परत हैद्राबादला गेला. युध्दा नंतर बाजीरावनेही जलद हालचाली करत पुणे गाठले. तेथे थोडा काळ थांबुन छत्रपती शाहूंची भेट घेतली. निजाम आणि मोगल या मराठ्यांच्या शत्रूशी युती केल्याने सहानुभूती गमावलेल्या दाभाडे यांच्या मुलांना छ. शाहू महाराजांनी सेनापती पद दिले. पण त्यानंतरच्या काळात मराठ्यांच्या सेनापतींचे महत्व उत्तरोत्तर कमी होत गेले आणि त्याचवेळी पेशव्यांचे प्रस्थ वाढत गेले. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला डभोई किल्ला १ तासात पाहाता आरामात येतो.
नांदोडी भागोल (Nandodi Bhagol, Dabhoi) |
सहाव्या शतकात बांधलेल्या डभोई उर्फ दर्भावती हा किल्ला वेगवेगळ्या काळात सोलंकी वाघेला , मुगल , मराठे यांच्या अधिपत्याखाली होता हा नगर कोट असल्याने भारतातल्या सगळ्या नगरकोटांची जी अवस्था झाली आहे तशीच डभोईची अवस्था झाली आहे . किल्ल्यात असलेल्या नगराने वाढता वाढता किल्ल्यालाच गिळून टाकलेले आहे . किल्ल्याचेच सामान वापरुन यातील अनेक घर बांधलेली आहेत . इतर नगर कोटात उरतात त्याप्रमाणे येथेही किल्ल्याचे चार दिशांना असणारे चार दरवाजे उरलेले आहेत . पण हे दरवाजेच या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहेत. १२ व्या शतकात बांधलेले, अप्रतिम कोरीवकाम असलेले हे दरवाजे पाहाण्यासाठी डभोईला वाट वाकडी करुन जायला हरकत नाही.गुजरात पुरातत्व खात्याने हे दरवाजे अतिशय सुंदरपणे जतन केले आहेत . त्यांच्या संरक्षणासाठी केवळ संरक्षित स्मारकाचा निळा फलक न लावता त्याठिकाणी रक्षक नेमलेले आहेत .
बडोद्याकडून गावात शिरतानाच डाव्या बाजूला किल्ल्याचा एक बुरुज त्याच्या बाजूची तटबंदी आणि पाण्याने भरलेला खंदक आणि तलाव पाहायला मिळतो. गावात शिरल्यावर आपल्या समोर येते किल्ल्याचे भव्य असे पश्चिम व्दार याला वडोदरा भागोल (प्रवेशद्वार) या नावाने ओळखले जाते. २० फुट उंच असलेला दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी पिवळ्या दगडात (सॅंडस्टोन) मध्ये बांधलेली आहे . या दरवाजाला ६ कमानी असून त्या लाल दगडात बनवलेल्या आहेत. या कमानींवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. त्यात पक्षी, फुल , वेलबुट्टी , व्याल , किर्तीमुख यासारखे काल्पनिक प्राणी कोरलेले आहेत . दोन कमानींच्या मधल्या भागात विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या डाव्या बाजूला २० खांब असलेले एक सुंदर दालन आहे . हा दरवाजा पाहून थोडे पुढे गेल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो. त्याला उत्तर दरवाजा , माहुडी भागोल या नावाने ओळखले जाते . या दरवाजातून जाणाऱ्या रस्त्याने रहदारी चालू असते . दरवाजा ५ कमानींवर तोललेला असून कमानींवर कोरीवकाम केलेले आहे . दोन कमानींच्या मध्ये मुर्ती आहेत . यापुढील दरवाजा पूर्व दिशेला आहे . या दरवाजाला हिरा भागोल या नावाने ओळखले जाते. किल्ल्याचा हा सर्वात सुंदर दरवाजा असून या दरवाजाच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला असलेल्या तटबंदीत १०० मीटर अंतरापर्यंत अप्रतिम कोरीवकाम केलेले आहे . यात अनेक गवाक्षे , देवकोष्टके आहेत. त्यात शंकर , विष्णू, लक्ष्मी , चामुंडा अशा अनेक देवदेवतान्च्या मुर्ती आहेत . समुद्रमंथना पासून अनेक पौराणिक प्रसंग कोरलेले या ठिकाणी पाहाता येतात. घोड्यावर बसलेले योध्दे , हत्ती , हंस , व्याल फुले , वेलबुट्टी याने हा दरवाजा सजवलेला आहे . दरवाजा ६ कमानींवर तोललेला असून कमानींवर कोरीवकाम केलेले आहे . या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस एक दरवाजा असून त्याची कमान ढासळलेली आहे पण उरलेल्या भागावरील कोरीवकाम सुंदर आहे .
Carving on Hira Bhagol, Dabhoi |
Carving on Hira Bhagol, Dabhoi |
Carving on Hira Bhagol, Dabhoi |
Carving on Hira Bhagol, Dabhoi |
१२ व्या शतकात बांधलेल्या या दरवाजा बद्दल एक दंतकथा या भागात प्रचलित आहे . या दरवाजाचे बांधकाम करणारा स्थापिती हरीधर याने या दरवाजासाठी आणलेले दगड चोरुन आणि इथलेच मजूर वापरुन आपल्या बायकोसाठी तेन तलाव नावाचा तलाव डभोई पासून ३ किमीवर बांधला . हा अपहार राजाला कळल्यावर हरीधरला या दरवाजातच चिणून मारण्यात आले . त्यामुळे या दरवाजाचे नाव हिरा भागोल पडले आहे .किल्ल्याचा शेवटचा दरवाजा म्हणजे दक्षिण दरवाजा हा दरवाजा नांदोडी भागोल या नावने ओळखला जातो. सहा कमानी असलेल्या या दरवाजाच्या कमानींवर आणि दरवाजाच्या वरही कोरीवकाम केलेले आहे. या दरवाजाच्या संरक्षणासाठी बाहेरच्या बाजूस अजून एक दरवाजा बांधलेला आहे .
Vadodara Bhagol, Dabhoi |
Vadodara Bhagol, Dabhoi |
माहुडी भागोल (Mahudi Bhagol, Dabhoi) |
Hira Bhagol second gate |
जाण्यासाठी :- बडोदा - डभोई राज्य मार्ग १६१ ने बडोद्यापासुन ३० किमीवर डभोई गाव आहे .
मुंबईहून बडोद्याकडे येताना बडोद्याच्या अलिकडे करजन गाव आहे . करजन गावातून राज्यमार्ग १११ ने डभोईला जाता येते . अंतर ३० किमी आहे .
दक्षिण गुजरात मधील किल्ले हा लेख वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा
https://samantfort.blogspot.com/2018/12/blog-post.html?m=1
Second gate of Nandodi Bhagol, Dabhoi |
Informative as usual
ReplyDeleteक्या बात है! मस्त!
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteसुंदर माहिती 👌👌 अमितजी 🙏
ReplyDeleteमी बडोद्याचा असल्याने मी बऱ्याच वेळा डभोई इथे गेलो आहे. यात दिलेली माहिती मला माझ्या वडिलांकडून आणि आजी कडून मिळाली होती. पण हे वाचताना मला खूप छान वाटले.
ReplyDeleteसुंदर माहिती
ReplyDeleteछान लेख! दरवाज्याच्या कोरिवकामाचे फोटो पाहता एखादे मंदिरच पाहतो आहोत असा भास होतो.
ReplyDeleteखुपच छान लेख.
ReplyDeleteछान माहितीपूर्ण लेख आहे. फोटोग्राफी तर नितांत सुंदर आहे.
ReplyDeleteअतिशय माहितीपूर्ण लेख, फोटो देखील मस्त,पाहताच किल्ला पाहण्याची इच्छा होते
ReplyDeleteजबरदस्त लेख आहे. वाचून खूप सारी माहिती मिळते व सर्व चित्र डोळ्यासमोर येत हा लिखाण व फोटोचा एकत्रित परिणाम आहे.
ReplyDeleteमाहिती आणि इतिहासाची सुंदर सांगड घालून लेख वाचनीय झाला आहे. आपापसात वैर आणि अवज्वावी महत्वाकांक्षा आपल्या विनाशाला कारणीभूत झाल्या ह्याच दुःख होत.
ReplyDeleteखूपच छान, इतिहास आणि भूगोल याचा चां मेळ घातला आहे.
ReplyDelete