Wednesday, October 1, 2014

माझा पावसाळी मित्र (Indian Bird -> Night Heron)



डोंबिबली शहरातल्या भर रस्त्यावरील तिसर्‍या मजल्या वरील माझ्या घराला हिरवीगार तटबंदी आहे. गॅलरीच्या दोन्ही बाजुला दोन आंब्यांची झाड पसरलेली आहेत. त्यांच्या मधे एक अशोकाच झाड आहे. आंब्यांच्या संगतीत राहून त्यालाही आपण आंबा आहोत अस वाटायला लागल असाव, त्यामुळे सरळसोट वाढायच सोडून तेही अजागळासारख पसरलय. या झाडांमध्ये वर्षभर विविध पक्षी, फुलपाखर, किटक यांची ये जा चालु असते. त्यामुळे घरात राहुनही आमच आपसुकच निसर्ग निरीक्षण चालू असत. 










साधारणत: ५ वर्षापूर्वी मे महिन्यात एका संध्याकाळी एक नविन पाहूणा समोरच्या आंब्याच्या झाडावर अवतरला. पुस्तकातून पाहून हा रातबगळा (Night Heron) माहित होता, पण त्याच वावरण रात्री असल्याने पाहाण्यात नव्हता. काही दिवसात आपल्या जोडीदारा बरोबर त्याने घरट बांधायला सुरुवात केली. आंब्याच्या, अशोकाच्या झाडाच्या सुक्या काड्या वापरुन त्यांनी शेंड्याखालच्या एका फ़ांदिच्या दुबेळ्यात घरट बांधायला सुरुवात केली. काटक्यांच हे घरट कावळ्याच्या घरट्या सारख अस्ताव्यस्त होत. पावसाळ्यात वहाणार्‍या सुसाट वार्‍यात हे घरट कस टिकून रहाणार याचा मला प्रश्न पडायचा. पण ते रातबगळे मात्र निर्धास्त होते. मादीने घरट्यात तीन - चार निळसर हिरव्या रंगाची अंडी घातली आणि ती त्यावर बसायला लागली. नर आणि मादी दिसायला सारखेच असल्यामुळे नक्की कोण किती वेळ अंड्यांवर बसतो/बसते हे सांगण कठीण आहे. पण याकाळात हे पक्षी एकमेकाला भरवतांना दिसले नाहीत म्हणजे ते आलटून पालटून अंडी उबवत असावेत.



रातबगळा हा निशाचर पाणपक्षी आहे. त्याचा रंग डोक्यापासून ते पाठ, शेपटी पर्यंत काळा असतो, तर पोट आणि पंख पांढर्‍या शुभ्र रंगाचे असतात. या रात्रींचर पक्ष्याला त्याच्या  काळ्या रंगाच्या पाठीमुळे त्याच्या भक्षकांपासून संरक्षण मिळत असेल. त्याची चोच मजबूत आणि टोकदार असते. खेकड्या सारखे कठीण पाठीचे प्राणी किंवा पक्ष्यांची अंडी फ़ोडून खातांना त्याला आपल्या चोचीचा उपयोग होतो. पाणवठे, खाडी किनारे, खाजण यावर जाऊन तो आपले खाद्य मिळवतो. त्याचे पाय लांबुडके आणि मजबूत असल्यामुळे तो उथळ पाण्यात उभा राहून शिकार करु शकतो. त्याच्या खाद्यात मासे, खेकडे, किटक, बेडुक, कासव, पाणकिटक यांचा समावेश आहे. याशिवाय पक्ष्यांची अंडी, पिल्ल, किटक, पाली, सरडे असा चौरस आहार हा पक्षी घेत असल्याची नोंदी उपलब्ध आहेत. वर्षाचे ८ महिने हे पक्षी पाणवठ्या जवळच्या आंबा, चिंच, पिंपळ, वड अशा झाडांवर राहातात. विणीसाठी मात्र हे पक्षी भर वस्तीतल डेरेदार झाड निवडतात. त्यामुळे मानवी वस्तीपासून दुर रहाणार्‍या शिकारी पक्ष्यांपासून त्यांच्या पिल्लांच रक्षण होतो. पण भोचक कावळा आणि संधीसाधू मांजर यांच्या पासून मात्र धोका कायम असतोच.  

पावसाळ्याच्या सुरुवातीला अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लांच्या चॅक चॅक  चॅक  चॅक या आवाजाने परीसर दुमदुमुन जायला लागला. तीन - चार पिल्लांतले उपाशी राहीलेले पिल्लु दिवस रात्र हा उच्च स्वरातला आवाज काढून त्याच्या पालकांना आणि झाडाच्या आजूबाजूला राहाणार्‍यांना सळो की पळो करुन सोडायला लागले. या काळात नर आणि मादी या दोघांची पिल्लांची भुक भागवतांना दमछाक होते होती. याकाळात डोंविवली आणि दिव्यामधल्या खाडीवर हे रातबगळे, इतर बगळ्यांच्या बरोबर बकध्यान लाऊन बसलेले दिसायला लागले. पिल्लांची वाढती भूक भागवण्यासाठी बर्‍याचदा हे रात्रिंचर पक्षी दिवसाही भक्ष्याच्या शोधात लांबवरच्या पाणवठ्याकडे उडत जातांना दिसत. तिथून पकडून आणलेले अर्धवट पचलेले खाद्य पोटातून बाहेर काढून चोचीतून पिल्लांना भरवत. अशावेळी पिल्लांच्या धसमुसळेपणामुळे त्यातील काही भाग खाली पडत असे. तो खाण्यासाठी दिवसभरात मांजराच्या एक दोन चकरा झाडाखाली होत. याकाळात त्या आंब्याच्या झाडाखाली पक्ष्यांच्या शिटेचा पांढरा सडा पडलेला असे. याचा झाडांना खत म्हणून नक्कीच उपयोग होत असणार. अशाप्रकारे रातबगळे झाडावर राहाण्याच भाडे देत असावेत. 




रातबगळ्याच्या पिल्लांचा रंग तपकीरी असतो, त्यामुळे ते त्या काटक्यांच्या घरटयात बेमालूमपणे मिसळून जात. पिल्लू लहान असतांना बर्‍याचदा कावळे घरट्याजवळ येत, तेंव्हा झाडाच्या शेंड्यांवर बसलेला रातबगळा आपले पंख उघडून कावळ्यावर धावून जाई. पंख उघडल्यावर त्याचा दिसणारा आकार, आवेश आणि त्याने काढलेला "व्कॉक" असा कर्कश आवाज ऎकून कावळे धुम ठोकत. रातबगळा कावळ्याचा पाठलाग न करता शांतपणे काहीच न घडल्यासारखा परत आंब्याच्या शेंड्यावर येऊन बसे. रातबगळे आणि कावळ्यातली ही लुटुपुटुची लढाई पिल्ल मोठी होई पर्यंत चालू राही. पिल्ल मोठी झाल्यावर आंब्याच्या फ़ांद्यांमधून फ़िरु लागत. हळूहळू आपल्या आई बाबांसारखी झाडाच्या शेंड्यांवर बसू लागत. आपले तपकीरी तुकतुकीत पंख पसरून या झाडावरून त्या झाडावर उडण्याचा सराव चालू होई. कधी कधी पंख पसरवून तोल सांभाळत झाडाच्या शेंड्यांवरुन उड्या मारत फ़िरतांना दिसत. ऑक्टोबरच्या सुमारास एखाद्या दिवस सकाळी उठून पाहाव तर पक्षी आपल्या पिल्लासह निघुन गेलेले असत.



पावसाळ्याच्या काळात रोज सकाळ संध्याकाळ दर्शन देणार्‍या या माझ्या मित्राची गेल्या ५ वर्षातील अनेक रुप मनावर कोरली गेली आहेत. पिल्लांच्या कल्लोळातही शांतपणे झाडाच्या शेंड्यावर बसलेला रातबगळा..., ३ दिवस सलग पडणार्‍या पावसामुळे चिंब भिजून विस्कटलेला रातबगळा...., पंखाखाली चोच घालून तेथील ग्रंथीतील तेल एकाग्रपणे पिसांवर पसरवत बसलेला रातबगळा....., वहाणार्‍या संथ वार्‍यावर डुलणार्‍या फ़ांदीवर पाय घट्ट रोऊन पंखात चोच खुपसून डुलकी घेणारा रातबगळा....

गेल्यावर्षी आंब्याच्या झाडावर मधमाशांनी एक छोट पोळ बनवल होत. तेंव्हापासून रातबगळ्यांनी त्यांच्या घरट्याची जागाही बदलली, ते आता माझ्या गॅलरीच्या विरुध्द बाजूला आपली घरटी करतात. घरट्यांची संख्या आता एक वरून पाच वर पोहोचलीय. त्यांच्या जोडीला बगळेही घरटी करू लागले आहेत. आता त्यांच्या घरट्याचे निरीक्षण करता येत नाही, पण त्याच्या पिल्लांचा येणारा चॅक चॅक आवाज आणि आंब्याच्या डुलणार्‍या शेंड्यांवर बसलेले रातबगळे मात्र पावसाळाभर सोबत असतात. एखाद्या मित्रासारखे........

19 comments:

  1. Dada apratim lihile aahes.....mast

    ReplyDelete
  2. Khupach sunder agadi lahan mulanpasun mothyana saglyanna vachayla avdel asa lekh...

    ReplyDelete
  3. Khup khup mast.....

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिलय... नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे..

    ReplyDelete
  5. रात बगळयाचे निरीक्षण उत्तम आणि त्याची माहिती अप्रतिमरीत्या शब्दातून मांडली आहेस.... सुंदर

    ReplyDelete
  6. अत्यंत सुंदर निरिक्षण
    अमित असेच चालू ठेव
    ह्यातून खूप काही साध्य होईल
    मुख्य म्हणजे जन जागृती

    ReplyDelete
  7. मस्त लेख आहे ...खुप माहिती मिळाली.

    ReplyDelete
  8. Rat baglyache dinkramache nirikshan aani tyachi sakhol mahiti uttam aahe.

    ReplyDelete
  9. दादा मस्त अनुभव आहे हा...
    आणि तु छान शब्दंकित केलयस...

    माझा घराशेजारी पण असे मित्र होते..
    पण वाड्याची बिल्डिंग झाली आणि असे शेजारी पण दुरावले.....
    तुझ्या ह्या शेअरिंग मुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या...

    ReplyDelete
  10. Mastt..thanks..good information..!!!

    ReplyDelete
  11. अमित .. तुझ निरीक्षण , शब्दांकन आणि
    फोटो .. मस्तच ..

    ReplyDelete
  12. अप्रतिम, नेमके, अचुक

    ReplyDelete
  13. मस्त आणि भरपूर माहिति मिळाली रातबगळ्या बद्दल, सुंदर अनुभूती…

    ReplyDelete
  14. दादा, सखोल निरीक्षण, त्यातून मिळालेली माहिती अणि त्याची मांडणी, सगळंच अप्रतिम.

    ReplyDelete
  15. आशिष राणेOctober 7, 2017 at 9:37 AM

    सुंदर लिहिलयस रे.. मजा आली.. पक्षी, घरटी आणि लिखाण असच वाढत राहो..

    ReplyDelete
  16. खूप छान explain केलं आहेस, मस्त

    ReplyDelete
  17. आमच्या येथे पण खूप पक्षी असतात आणि पांढ-या शिटेचा सडा पडलेला असतो...व्काँक व्काँक सुरू असते रात्रभर....आपण केलेल्या वर्णनावरून तोच पक्षी असावा असे वाटते..... छान माहिती..

    ReplyDelete
  18. 👌👌सुंदर निरीक्षण आणि माहिती. वाचताना उत्सुकता वाटत होती.

    ReplyDelete