Friday, August 11, 2017

Parasa Lepida



आपलं शहरी जीवन एवढं व्यस्त झालयं की, आपल्या आजूबाजूला निसर्गात घडणार्‍या छोट्या गोष्टींकडे आपले पटकन लक्ष जात नाही. माझ्या घराला लागून आंब्याचा डेरेदार वृक्ष आहे. त्यावर ऋतुमानाप्रमाणे येणारे विविध पक्षी आणि फ़ुलपाखरे यांची आता माहिती झालेली आहे. त्यात नविन कोणी दिसला तर आमची घरतल्यांची चर्चा होते. दरवर्षी घरटी करणारे रातबगळे, गाय बगळे, कावळे, नाचण, शिंपी, पोपट, वटवाघूळ, विविध प्रकारचे पतंग आमच्या परिचयाचे झालेले आहेत. ( त्यावर "माझा पावसाळी मित्र" हा ब्लॉग लिहिलेला आहे. ब्लॉग वाचण्याकरीता लिंकवर टिचकी मारा https://samantfort.blogspot.com/2014/10/indian-bird-night-heron.html)



आज सकाळी नेहमीप्रमाणे ऑफ़ीसला जायच्या घाईत होतो. पु.ल.नी म्हटल्या प्रमाणे मुंबईकर असल्यामुळे माझ्या आयुष्याचे ७.४७ वाजलेले आहेत. नेहमीप्रमणे वेळेच गणित चुकले होते. सकाळीचे ७.४७ ची फ़ास्ट लोकल पकडायची म्हणून घाईघाईने जीना उतरुन फ़ुटपाथवर आलो. आमच्या सोसायटीचे कंपाऊंड आणि फ़ुटपाथ यांच्या मध्ये आंब्याच झाड आहे, या झाडाखाली पोपटी रंगांचे पुंजके पडलेले दिसले. पावसाळ्यात झाडाच्या फ़ांद्यावर , बुंध्यांवर शेवाळे येते, काही बांडगुळे वस्तीला असतात त्यापैकी एक असेल म्हणून दुर्लक्ष केले आणि रिक्षा पकडायला पुढे निघालो. मग एकदम लक्षात आले की, शहरातल्या झाडवर प्रदुषणामुळे सहसा शेवाळे (मॉस) येत नाही. जंगलात मात्र पावसाळ्यात आपल्याला झाडावर शेवाळे हमखास बघायला मिळते. पुन्हा मागे वळलो आणि नीट पाहिल्यावर कळले की पोपटी रंगांचे अनेक सुरवंट झाडाच्या बुंध्यापाशी पडलेले आहेत. पोपटी रंगाचे गवतासारखे पुंजके त्याच्या अंगावर होते. पाठीवर मध्यभागी डोक्यापासून शेपटी पर्यंत निळ्या रंगाचा पट्टा दिसत होता. सुरवंट कितीही गोंडस दिसत असला तरी त्याला हात लावणे मुर्खपणाचे होते. कारण त्यांच्या गवताच्या पुंजक्या सारख्या दिसणार्‍या भागात सौम्य विष असणार त्यामुळे सुरवंटाला हात लावाला तर खाज येणे,पूरळ उठणे असे प्रकार होतात. आपल्या शत्रूंपासून बचाव करण्यासाठी निसर्गानेच ही योजना केलेली असते. जवळ पडलेल्या काडीने सुरवंट उलटा करुन पाहिल्यावर लक्षात आले की, त्याच्या दोन्ही बाजूलाही निळ्या रंगाच्या रेषा आहेत. अशा प्रकारचे सुरवंट मी याठिकाणी पहिल्यांदाच पाहात होतो. त्यामुळे त्यांची ओळख पटणे (कुठल्या फ़ुलपाखराचे आहेत) शक्य नव्हते. त्यामुळे स्मार्ट फ़ोन काढून त्यावर फ़ोटो घेतेले आणि ट्रेन पकडायला पळालो.

आंब्याच्या झाडाखाली पडलेले सुरवंट


आजकाल अनेक साईट, कम्युनिटी उपलब्ध आहेत ज्यावर जाऊन आपल्याला सुरवंट, फ़ुलपाखरे, पतंग यांची ओळख पटवता येते. त्यापैकी एखाद्या साईटवर जाऊन शोधावे असा विचार केलेला. पण नेहमीप्रमाणे ट्रेनला तुडूंब गर्दी होती. आपलेच हातपाय गोळा करुन एकत्र आणून सरळ (ताठ नव्हे) उभे राहाण्याची मारामारी असतांना, डोंबिवलीत ट्रेन मध्ये चढून त्या गर्दीत व्हॉट्साप करणारे, इतरांना धक्के देत गेम खेळणारे यांच्या बद्दल मला प्रचंड आदर आहे. लोकांना आपला त्रास होतो याची अजिबात पर्वा न करण्याचा निर्लज्ज कोडगेपणा यांच्यात कुठून येतो हे मला अजून समजलेले नाही. दिवसभराच्या रगाड्यात सुरवंट विसरुन जाउ नयेत म्हणून मी आमचे एन्व्हॉर्मेंट सायन्सची प्रोफ़ेसर प्रणॊतीला फ़ोटो पाठवून दिले. १० मिनिटात तिचा रिप्लाय आला "Parasa Lepida" Catterpillar. प्रणोती आणि चिन्मय खानोलकर हे दोघे एन्व्हॉर्मेंट सायन्सचे प्राध्यापक माझ्या अशा अनेक शंकांची न कंटाळता उत्तर देत आले आहेत. त्यांच्या बरोबर ट्रेकला गेले की निसर्गातली अनेक गुपित ते आपल्या समोर साध्या सोप्या भाषेत उलगडतात. प्रणोतीने सुरवंटाचे नाव सांगितल्यावर त्याने पान कुरतडायचे सोडून माझा मेंदू कुरतडायला सुरुवात केली.
सुरवंटानी आंब्याच्या पानांची केलेली चाळणी  

 
गुगलवर त्याबद्द्ल भरपूर माहिती आणि काही व्हिडीओज उपलब्ध आहेत. त्याचे कारण म्हणजे या सुरवंटाचे उपद्रव मुल्य. आंबा, रबर, नारळ, पाम, चहा, कॉफ़ी, केळी इत्यादी नगदी पिक देणार्‍या झाडांवर हे खादाड सुरवंट वाढतात आणि त्यांची पाने खाऊन त्याचे अपरिमित नुकसान करतात. या सुरवंटानी हल्ला केलेल्या नारळाच्या किंवा पामच्या झाडाची पाने खाल्यामुळे हिराच्या झाडू सारखे दिसायला लागतात. त्यानंतर झाडाला पहिले ६ महिने कमी फ़ळे येतात. त्यापुढील २० महिने फ़ळेच येत नाहीत. झाडाला पहिल्या सारखी फ़ळे येण्यासाठी ४० महिन्यांचा कालावधी जावा लागतो. म्हणजे जवळजवळ चार वर्ष त्या बागायतदाराला किती नुकसान होत असेल याचा अंदाज करता येईल. कदाचित त्याच्या या उपद्रवमुल्यामुळे त्याला  Parasa - Pasasite म्हणत असावेत. 

 या सुरवंटा पासून Limacodidae कुळातला Parasa Lepida हा पतंग तयार होतो. पतंग (Moth) आणि फ़ुलपाखरु (Butteerfly) यात अनेक मुलभूत फ़रक आहेत. पण आपण सरसकट सर्वांनाच फ़ुलपाखरु म्हणतो. दिवसा आपल्याला रंगीबेरंगी फ़ुलपाखरे उडताना दिसतात. तर पतंग रात्रीच्या वेळी उडतात . त्यांचे रंगही मातकट असतात. फ़ुलपाखरांचे पंख नाजूक असतात. तर पतंगांचे पंख जाडेभरडे असतात. फ़ुलपाखरांच्या मिशा (Antennae) नाजूक असतात आणि त्याच्या टोकाला बटणांसारखा गोल भाग असतो. पतंगांच्या टोकाला बटणांसारखे गोल भाग नसतात. फ़ुलपाखरु बसतांना पंख मिटून बसते तर पतंग आपले पंख पसरुन बसतात.


Parasa Lepida Moth


Limacodidae या कुळातला पतंग (Moth) पानांच्या टोकावर खालच्या बाजूला अंडी घालतो. फ़ुलपाखरांच्या/ पतंगाच्या पायाला असलेल्या सेंसर्सनी पानातल्या रस तपासला जातो. पतंगाची मादी योग्य वनस्पतीचे पानं मिळेपर्यंत या झाडा वरुन त्या झाडावर उडत राहाते. योग्य झाडाचे कोवळे पानं मिळाल्यावर त्यावर अंडी घातली जातात.  सहा दिवसांनी अंड्यातून सुरवंट बाहेर येतो. बाहेर आल्यावर कोशात जाई पर्यंत ४० दिवस तो खादाडी सुरु ठेवतो. पानाच्या टोकापासून सुरुवात करुन देठा पर्यंत पान खात खात हा सुरवंट पुढे सरकतो. तो पानाच्या शिरा खात नसल्याने शेवटी देठ आणि पानांच्या शिरांचे फ़राटेच उरतात. पक्षी आणि cuckoo wasp जातीच्या निळ्या किंवा हिरव्या मेटॅलीक रंगाची माशी हे या सुरवंटाचे नैसर्गिक शत्रू आहेत. कुकू वास्प माशीची पण गंमत आहे. ती पाना आड दडलेल्या या सुरवंटाला शोधत असते. एकदा का सुरवंट सापडला की ती त्याच्या अंगावर आपली अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या त्या सुरवंटावर वाढतात. त्याचा फ़न्ना उडवून टाकतात. सुरवंटांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी निसर्गाने योजलेले हे उपाय आहेत. "जीवो जीवस्य जिवनम्". अशा प्रकारच्या संकटा मधून वाचलेले सुरवंट स्वत: भोवती तपकिरी रंगाचा कोश तयार करतात. २२ दिवस कोशात राहिल्यावर त्यातून पतंग बाहेर पडतो. मातकट रंगाच्या या पतंगावर डोक्यापासून पंखांपर्यंत पोपटी पट्टा असतो. अशाप्रकारे अंड्यापासून सुरवंट- कोश - पतंग असे जीवनचक्र चालू राहाते.



२०१७ साली सुरवंट मी आंब्याच्या झाडावर प्रथम पाहिले त्यानंतर त्यांनी या झाडावर बस्तान बनवले सुरवंटांची भूक राक्षसी असते. त्यामुळे झाडाची पान मोठ्या प्रमाणावर त्यांनी फ़स्त केली . त्यामुळे २०१८, २०१९ या दोन वर्षात झाडावर फ़ार कमी आंबे लागले. आंबा सदाहरीत वृक्ष आहे पण २०२० च्या जानेवारीत या आंब्याच्या झाडाची पान झडायला सुरुवात झाली आणि एकवेळ अशी आली की झाडाच्या एका भागावर एकही पान नव्हते.  झाड भुंडे झाले होते. आंब्याच्या झाडावर असे मी पहिल्यांदाच पाहात होतो. मला वाटले सुरवंटांमुळे झाडाचा एक भाग नष्ट झाला .प्ण आठवड्या भरात फ़ांद्यांवर लालसर पालवी दिसायला लागली.. आणि त्यानंतर झाड पुन्हा तजेलदार पानांनी बहरल. २०२० मध्येही मोहोर यायचा महत्वाचा काळ पाने झडवण्यात गेल्याने आंबे कमीच आले आहे. कदाचित सुरवंटाचा नायनाट करण्यासाठी या सदाहरीत झाडाने असे केले असेल का ? याबाबतीत या विषयातल्या तज्ञांना विचारले. त्यांनी सांगितले स्वसंरक्षणासाठी झाडे अशा प्रकारे वागतात. झाडाची ही आयडीया किती प्रमाणात सफ़ल झाली ते येणार्‍या काळात कळेलच. 

अदृश्य किटकांवरील ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा....

8 comments:

  1. छान माहितीपूर्ण लेख. सुरवंटाबदूदल

    ReplyDelete
  2. सुरवंटरावांचा प्रवास, सुंदर लेख !

    ReplyDelete
  3. खूप अभ्यास करून लिहिला आहेस, अप्रतिम लेख
    मला ही अनेक गोष्टी नव्याने कळल्या त्यामुळे, त्यासाठी धन्यवाद

    ReplyDelete
  4. मस्तचं अमित!!! ��

    ReplyDelete
  5. मला आजच माझ्या फंणसाच्या झाडावर हे सुरवंट दिसले खुप आनंद झाला बघुन कारण वाटले यातुन सुंदर फुलपखरु बाहेर येणार पण गुगल सर्च केल्यावर माहिती मिळाली आता खुप काळजी वाटतिय या उपद्र्वापासून झाडाला कसे वाचवावे कृपया त्याची माहिती सांगावी.

    ReplyDelete
    Replies
    1. मी यातला तज्ञ नाही . पण या सुरवंटाचा त्रास सर्वत्र असल्यामुळे त्यावर वापरण्यासाठी किटकनाशक उपलब्ध आहेत . गूगलवर शोध घेतल्यास नावे मिळतील .

      Delete