Friday, December 8, 2017

अदृश्य किटकांच्या जगात Leaf Mining Worm, Bag Worm, Spittle bugs or Froghopper

किल्ल्यावर, निसर्गात भटकंती करतांना आजूबाजूला निरखायची सवय कधी लागली ते कळलच नाही. या सवयीमुळे अनेक नविन गोष्टी सापडल्या , अर्थात हजारो वर्ष निसर्गातच असलेल्या पण माझ्यासाठी मात्र नविन. त्याचा धांडोळा घेतांना अनेक पुस्तक वाचली, काही संग्रहात जमा झाली. या विषयातील तज्ञ मित्रांशी चर्चा केली त्यांना शंका समाधान होई पर्यंत छळल. हि सर्व प्रोसेस प्रत्येकवेळी नविन काही दिसल की चालू होते. 

किटकांची दुनिया तर एकदम वेगळी आहे. सगळ्यात जास्त संख्येने असलेले हे आपले सोबती आपल्याकडून तसे दुर्लक्षित आहेत. दिसला किटक की मार किंवा ठेच हा आपला बाणा राहीलेला आहे. पण मला मात्र माझ्या भटकंतीत किटकांच वेगळच जग दिसल. त्यातील ३ किटकां बद्दल........
 
लीफ़ मायनिंग वर्मने पानावर काढलेली रांगोळी . फ़ोटो सौजन्य गुगल

लीफ़ मायनिंग वर्म (Leaf Mining Worm):- हेळवाकची रामघळ ओलांडून भैरवगडच्या वाटेला लागलो होतो. वाट कोयनेच्या जंगलातून होती. कधी दाट जंगल तर कधी उघड्या बोडक्या पठारावरुन पायवाट पुढे पुढे जात होती. अंतर जास्त असल तरी हाताशी वेळ भरपूर असल्याने नेहमी प्रमाणे नवीन काही दिसतय का पाहात होते. पायवाटेला लागून असलेल्या मोठ्यामोठ्या वृक्षांच्या खाली झुडप वाढलेली होती. त्या झुडूपांच्या काही पानांवर पांढऱ्या वाकड्या तिकड्या जाड रेषा दिसत होत्या. पहिल्यांदा अस वाटल की कुठल्यातरी पक्षाची शीट पडून पानावर पांढरी नक्षी तयार झाली असेल. पण जवळ जाऊन पान नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आल की, पान कोणीतरी खाल्ल्यामुळे अशी पांढरी नक्षी तयार झाली आहे. सुदैवाने ट्रेकला आमचे एन्व्हॉर्मेंटलिस्ट प्राची चिन्मय होते. त्यांना ती पान दाखवल्यावर त्यांनी सांगितले की हे मायनिंग वर्मचे प्रताप आहेत. तो पानात शिरुन पान खात जातो. त्या ठिकाणचे हरीतद्रव्य त्याने खाल्ल्याने पानावर पांढरी नक्षी तयार होते. ही माहिती कुठेतरी डोक्यात होती. गेल्या महिन्यात वैतरणा काठच्या जंगलात फ़िरतांना एका झुडपाच्या सुकलेल्या पानावार परत ती चिरपरिचित नक्षी दिसली. मग मायनिंग वर्मने परत डोक वर काढल. 

Leaf Mining Worm

मायनिंग वर्म हा सहजासहजी न दिसणारा किडा आहे. Lepidoptera जातीचे पतंग (moths), sawflies (Symphyta, a type of wasp) आणि माशा flies (Diptera) यांची मादी योग्य झाड निवडून त्याच्या पानांवर जवळपास पारदर्शक, चमकणारी, अंडी घालतात. मादी ५ दिवसांत ३६ ते ५५ अंडी देते. त्यातुन ३ ते ५ दिवसांत अळ्या बाहेर येतात. अंड्यातून बाहेर येणारी अळी पानाला भोक पाडून पानात शिरते आणि पानाच्या आवरणात शिरुन पान खायला सुरुवात करते. पानातील सेल्युलोज टाळून इतर ऐवज खाते. पानाच्या आवरणाखाली लपल्यामुळे भक्षकांपासून अळीचे संरक्षण होते. पण पानात स्त्रवणार्या टॅनीन सारख्या विषारी रसायनांपासून अळीला धोका असतो. अळी पान खात जसजशी पुढे सरकत जाते तसतसा तिच्या विष्ठेमुळे पांढरा पडलेला पानाचा भाग दिसायला लागतो. या पांढऱ्या रेषेच्या पॅटर्नवरुन तज्ञांना पानात कोणती अळी आहे हे समजते. त्या ठिकाणचे क्लोरोफ़ील (chlorophyll) नष्ट झाल्याने पान सुर्यप्रकाशापासून अन्न तयार करु शकत नाही (photosynthesise). त्यामुळे अळी शिरलेले पान झाडाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरते. अशा रोगट पानांमुळे झाडाची वाढ खुंटते. पिकांचे उत्पादन कमी होते. महाराष्ट्रातील शेतकरी या अळीला नाग अळी या नावाने ओळखतात. पानावर नागमोडी नक्षी काढते म्हणून तीला नाग अळी म्हणातात.

डावीकडच्या फ़ोटोत अळीने पोखरलेले पान तर उजवीकडच्या फ़ोटोत पानाने केलेली नक्कल, फ़ोटो सौजन्य गुगल  

पानात लपून अळीने तर स्वत:चे तीच्या भक्षकांपासून संरक्षण केलेले पण झाडांचे काय ? त्यांची पान अळीच्या भक्षस्थानी पडून त्याच नुकसान होतच असत. आपली पान या अळीच्या भक्ष्यस्थानी पडू नयेत यासाठी झाडानेही स्वत:मध्ये बदल केल्याचे जर्मनीच्या बैरुट युनिव्हर्सिटीच्या बॉटोनिक्सना आढळून आले. इक्वेडोर देशातील जंगलात संशोधन करतांना Caladium steudneriifolium (आपल्या परस बागेत उगवणार्‍या अळूच्या जातीचे झाड ) जातीच्या झाडाच्या पानावर त्यांना लीफ़ मायनींग वर्मच्या अळीने बनवल्यासारखी पांढरी नक्षी आढळून आली. त्या झाडावर अंडी घालू नयेत यासाठी पानांनीच (झाडाने) केलेला तो देखावा होता. अंडी घालण्यासाठी योग्य पानाच्या शोधात असलेल्या पतंगाच्या किंवा माशीच्या मादीला त्या पानावरुन उडतांना पानावरील नक्षीमुळे पानात आधीच कोणत्यातरी अळीने घरोबा केल्यासारख दिसत असणार. अशा आधीच खाल्लेल्या पानावर पतंगाची किंवा माशीची मादी अंडी घालणार नाही. त्यासाठी ही नक्षीची आयडीया झाडाने केली होती. हे खर आहे की नाही हे पाहाण्यासाठी बॉटोनिक्सनी महिनाभर खपून त्या परीसरातील अळूच्या पानांची मोजणी केली. तेंव्हा एकूण हिरव्या पानांपैकी ८% पानात अळीने शिरकाव केला होता. तर पांढरी नक्षी असलेल्या पानांपैकी फ़क्त ०.४% पानातच अळीने शिरकाव केलेला होता, म्हणजे झाडाने केलेल्या नक्षीची आयडीया परफ़ेक्ट होती. अर्थात झाडाला स्वत: मध्ये असा बदल करण्यासाठी कित्येक वर्ष लागली असतील. या अळीमुळे होणारे पिकांचे आणि बागांचे नुकसान रोखण्यासाठी किटकनाशक शोधण्या आधीच निसर्गाने या अळीचा प्रादुर्भाव रोखण्याचा उपाय शोधला होता.

या पानावरची नक्षी सुध्दा मादीला फ़सवण्यासाठी असेल काय?
 आपल्या आजूबाजूला निसर्गात अशा अनेक घडामोडी चालू असतात. मालवण जवळचे माझे गाव घुमडे दाट जंगलात आहे. गावी गेलो की रात्री अंगणात उशिरापर्यंत पुस्तक वाचत बसायला मला आवडते. रात्रीच्या नीरव शांततेही जंगलात अनेक घडामोडी घडत असतात. त्या दिवशी मी असाच १२ -१ पर्यंत वचत बसलो आणि मग जाऊन झोपलो. सकाळी उठून चहा घेऊन अंगणात आलो तर अंगणाच्या एका टोका पासून दुसऱ्या टोका पर्यंत मुंग्यानी माती लिंपून बोगदा बनवला होता आणि त्या आतून त्यांची ये-जा चालू होती. जंगलातून अंगणातल्या स्वच्छ जागी आल्यावर ते अंतर शत्रूच्या दृष्टीस न पडता पार पाडण्यासाठी मुंग्यानी हा बोगदा बनवला असावा. मी टेपच्या सहाय्याने त्या बोगद्याची लांबी मोजली ती अंदाजे १० फ़ूट भरली. एवढ्या लहान किटकांनी कुठलीही अवाजार न वापरता, कुठलाही आवाज न करता हा लांबलचक बोगदा एका रात्रीत व्यवस्थित बांधला होता. बोगद्याचे फ़ोटो काढतांना एके ठिकाणी ढासळलेल्या बोगद्यात राणी मुंगी सारखी मोठी मुंगी दिसली. बहूतेक एखाद्या शत्रूमुळे, अन्न कमी झाल्यामुळे किंवा इतर कुठल्या तरी कारणामुळे जुने वारुळ सोडावे लागले असावे. टेहळ्या मुंग्यांनी वारूळासाठी नविन जागा शोधली असावी त्याठिकाणी वारुळाचे स्थलांतर चालले असावे.  


मुंग्यांनी एका रात्रीत बनवलेला लांबलचक बोगदा 

याच अंगणात साधारण १६ वर्षापूर्वी एका रात्री डोंगराच्या दिशेकडून अनेक काळे डोंगळे येतांना दिसले. एकामागोमाग एका रांगेत येणारे ते डोंगळे काळ्या प्रवाहासारखे दिसत होते. त्यातले काही डोंगळे रांग सोडून एकेकटे इकडे तिकडे हिंडत होते. त्यातलाच एक डोंगळा त्यावेळी माझ्या दिड वर्षाच्या मुलाच्या पायाला चावला आणि त्यातून रक्त आल होते. त्यामुळे हा प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला होता. त्यानंतर काही वर्षाने एका रात्री अंगणात वाचत बसलो असतांना पुन्हा हा डोंगळ्यांचा प्रवाह डोंगराच्या दिशेने आला आणि वहाळाच्या दिशेकडे चालला होता. मी टॉर्च घेऊन पायर्या चढून डोंगराच्या दिशेने गेलो . पालापाचोळ्यातून डोंगळ्यांची फ़ौज पुढे सरकत होती. त्यांचा उगम शोधण्याची इच्छा होती पण ऱात्रीच्या वेळी पुढे जायचे माझ धाडस झाल नाही. मधल्या काळात माझ्या वाचनात विजय देवधरांचे " अफ्रीकन जू जू" हे पुस्तक आले. १९ व्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रजानी अफ्रीकेच्या जंगलात भटकंती केली आणि आपले अनुभव लिहून ठेवले त्यावर हे पुस्तक आहे. या पुस्तकात दोन सैनिकांचा एक अनुभव दिला आहे. "जंगलातून जाताना रात्र झाली म्हणून त्यांनी मोकळ्या जागी तंबू ठोकला. रात्री निजानीज झाल्यावर अचानक एका सैनिकाला काहीतरी चावले आणि तो किंचाळत उठला. मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांना मोठ्या आकाराच्या दोन मुंग्या दिसल्या. त्याच प्रकाशात त्यांनी तंबूचे छत पाहील्यावर त्यांना त्यावरुन मुंग्याचा प्रवाह जात असल्याचे आढळले. त्यातल्याच दोन मुंग्या तंबूत शिरल्या होत्या. रात्रभर मुंग्यांचा तो प्रवाह तंबूवरुन जात होता. दुसऱ्या दिवशी पुढे जाताना आदल्या दिवशी मरुन पडलेल्या हत्तीच्या जागी त्यांना फक्त सापळा दिसला. मुंग्यांनी त्या हत्तीचा चट्टामट्टा केला होता. त्यांनी अस नमूद केल की, या मुंग्या जंगल सफाईच काम करतात. जंगलात मरुन पडलेले किडे-मकोडे ते हत्ती पर्यंतचे प्राणी खाऊन मुंग्या जंगल साफ करतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या छोट्या जिवंत प्राण्यानाही त्या सोडत नाहीत. त्या ठरलेल्या मार्गावरुन जंगलात फिरत असतात. पुन्हा काही दिवसांनी त्या परत त्याच जागी येतात" . हे सर्व वाचल्यावर माझ्या गावच्या डोंगळ्यांच्या फौजेच कोड सुटल्या सारख मला वाटल. आमच गाव वसून काही शतक झाली असतील. पण त्याआधी आणि आजही त्याठिकाणी जंगलच आहे. आज जंगल रोडावल्यामुळे, माणसाच्या हस्तक्षेपामुळे डोंगळ्यांची संख्या कमी झाली असेल पण ते डोंगळे हजारो वर्षे निसर्गाने त्यांना नेमून दिलेल साफसफाईच काम करत हिंडत आहेत. त्या जंगलातल्या माझ घर असलेल्या जागेवरुन ते शतकानुशतक जाताहेत, तसे आजही जातात. माझ घर त्यांच्या खिजगणतीतही नाही. या माझ्या निष्कर्षा बाबत किटकांचा अभ्यास असणाऱ्या काही मित्रांशी बोललो. त्यातला एकजण म्हणाला ते एका विशिष्ट तिथीला त्याचवेळी, त्याच ठिकाणाहून ते जात असतील. पुढच्यावेळी दिसल्यावर त्यांची वेळ आणि तिथीची नोंद करुन ठेव. आता मी ती डोंगळ्यांची वाहाती नदी परत दिसण्याची वाट बघतोय. 

मोळी किडा (Bag Worm)

मोळी किडा (Bag Worm) :- पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पूर गावात पोहोचलो. शेताच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडावर बाभळीचेच काटे वापरुन शंकुच्या आकारचे २ इंचाचे घरटे लटकलेले दिसले. ते घरटे फ़ांदीला घट्ट बांधलेले होते. लाकडाच्या मोळी सारखे दिसणारे हे घरटे Bag Worm चे होते. Psychidae फ़ॅमिलीतल्या हा पतंगाची अळी ज्या झाडावर असते त्या झाडाची पाने, साल, काटे वापरुन स्वत:साठी संरक्षक कवच बनवते आणि त्यात राहाते.  त्यामुळे ती झाडाशी एकरुप होते आणि अळीचे शत्रूंपासून संरक्षण होते.

मोळी किडा (Bag Worm)

या पतंगाची मादी आयुष्यभर तीने झाडापासून बनवलेल्या संरक्षक कवचातच राहाते. तिथेच ती अंडी देते आणि मरते. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या संरक्षक कवचाच्या मागील बाजूस असलेल्या छिद्रातून बाहेर येतात आणि आपल्या तोंडातून निघणार्या दोर्याने फ़ांदीला, पानाला लटकतात. वाहात्या वार्याने या अळ्या दूरवर फ़ेकल्या जातात. एकाच ठिकाणी अळ्यांची गर्दी होऊ नये आणि सर्वांना पुरेसे अन्न मिळावे यासाठी केलेली ही योजना आहे. एकदा योग्य ठिकाणी पोहोचल्यावर अळी झाडाचीच साधनसामुग्री वापरुन स्वत: भोवती सुरक्षा कवच बनवते. आणि त्यात राहूनच झाडाची पान खायला सुरुवात करते. योग्य वेळी अळी स्वत:भोवती कोष विणते आणि आपल घरट एखाद्या फ़ांदीच्या टोकाला घट्ट बांधते. या कोषातून नर पतंग बाहेर आला तर तो आपल्या पंखांच्या सहाय्याने उडून जातो. मादी मात्र आयुष्यभर आपल्या सुरक्षा कवचात राहाते, तिला पंख फ़ुटत नाहीत. नर आणि मादीचे मिलन झाल्यावर नर मरतो आणि त्या कवचातच अंडी घातल्यावर मादी प्राण सोडते. 

थुंकी किडा (Spittlebugs or Froghopper)

थुंकी किडा (Spittlebugs or Froghopper) :- पावसाळ्यात माझ्या गावात अनेक रान फ़ुल फ़ुलतात. काही वर्षापूर्वी त्यांच डॉक्युमेंटेशन करत होतो. या छोट्या रानफ़ुलांचे फ़ोटो काढायचे म्हणजे त्यांच्या एकदम जवळ जाऊन माय्क्रो मोडवर काढावे लागतात. असाच एका फ़ुलाचा फ़ोटो काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूच्या गचपणात घुसलो होतो. जमिनीवर बसून फ़ुलाचा फ़ोटो काढतांना बाजूच्याच झुडपाच्या बेचक्यात थुंकी दिसली. एवढ्या जवळ ती थुंकी पहिल्यावर पटकन बाजूला झालो. नंतर आजूबाजूला पाहिल तर अनेक झुडपांवर थुंकी दिसायला लागली. या सुनसान रस्त्यावर अशा अडगळीच्या ठिकाणी येउन कोण थुंकणार ? असा विचार माझ्या मनात आला. त्या थुंकी सारख्या दिसणार्‍या पदार्थाच नीट निरिक्षण केल्यावर लक्षाअत आल हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. बाजूला पडलेली काडी काडी घेऊन हालवल्यावर आतला किडा बाहेर आला.

थुंकी किडा (Spittlebugs or Froghopper)

आपल्या देशात थुंक संप्रादयातल्या लोकांची कमी नाही. कुठेही पचापच थुंकण यांना भुषणावह वाटत. स्वच्छता अभियानावर करोडो रुपये खर्च करुनही लोकांच्या काही घाणेरड्या सवयी सुटत नाहीत , कुठेही थुंकणे ही त्यापैकी एक सवय. याच सवयीचा या किड्याने आपल्या संरक्षणासाठी उपयोग करुन घेतला आहे. सिकाड्याच्या जातीचा (Prosapia bicincta) हा कीटक ऊंच आणि लांब उड्या मारतो म्हणून त्याला फ़्रॉग हॉपर (Froghopper) या नावानेही ओळखतात. हा किडा स्वत:च्या लांबीच्या शंभरपट लांब उडी मारु शकतो. थुंकी किडा झाडातील रस पिऊन हा आपली उपजिविका करतो. त्याच रसापासून तो आपल्या भोवती पांढर्‍या रंगाचे थुंकी सारखे दिसणारे कवच तयार करतो. थुंकी सारख्या दिसणार्‍या कवचामुळे या किड्याला थुंकी किडा (Spittlebug) या नावाने ओळखले जाते. थुंकी किडा स्वत: भोवती जो फ़ेस तयार करतो त्याला उग्र वास आणि कडवट चव (acrid taste) असते. त्यामुळे त्याचा उपयोग किड्याला शत्रू पासून संरक्षणासाठी होतो. त्याच बरोबर या फ़ेसामुळे त्याचे थंडी आणि उष्णतेपासून संरक्षण होते.

थुंकी किडा (Spittlebugs or Froghopper)


भटकंतीत हे किटक मला प्रत्यक्ष दिसले नाहीत पण त्यांचा पाठपुरावा केल्यावर माहितीचे भांडार माझ्यापुढे उघडल. त्यातून मला मिळालेला आनंद सर्वांबरोबर वाटायचा हा मी प्रयत्न केलाय. मी काही किटक विषयातला तज्ञ नाही त्यामुळे या माहितीत काही त्रुटीही असू शकतात. याबबत कोणी नविन माहिती शेअर केली तर मला नक्कीच आवडेल.

अमित सामंत



Parasa Lepida या किटका वरील ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा ....



""मृगाचा मखमली किडा"  हा  ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा ....


11 comments:

  1. मस्तच.....माझेही गाव कोकणात ( कणकवली) आहे..हे किडे कित्येकवेळा नजरेस पडले..पण आज तुझ्यामुळे त्याबद्दलची माहिती समजली...thanx

    ReplyDelete
  2. Leaf mining worm आणि spittlebug बघितले होते, पण ही माहिती आजच कळली.
    धन्यवाद ��

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती आहे, आजच्या पर्यावरण दिनानिमित्त जी माहिती उपलब्ध झाली ती वाचून आनंद झाला. महत्त्वाची गोष्ट, पर्यावरणाचा होणारा र्हास थांबवण्यासाठी झाडांची लागवड अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायला हवी पण आजच्या या बातमीतून हे समोर आलं की त्यांचं रक्षण आणि त्यांची वाढ तितकीच गरजेची आहे.

    ReplyDelete
  4. सुंदर लेखणी....

    ReplyDelete
  5. फारच सुंदर आहे

    ReplyDelete
  6. Majh pn gav koknatil khed gav aahe ase chote chote khup kide mungale me pahile aahet

    ReplyDelete
  7. दि. वा. वडनेरकरSeptember 27, 2020 at 8:59 PM

    नमस्कार. खुप सुंदर शास्त्रीय माहिती, साध्या सोप्या भाषेत मांडली. आभार ह्या गोष्टी अभ्यास क्रमात समाविष्ट व्हायला हव्यात.

    ReplyDelete
  8. खूप छान माहिती! नागअळी, मोळीकिडा, थुंकीकिडा हे जीव बघितलेत. पण त्यांची ही सगळी माहिती नवीनच.

    ReplyDelete