Sunday, June 7, 2015

Edison National Historical Park (एडीसन नॅशनल हिस्टॉरीकल पार्क)


इलेक्ट्रीक बल्बचा शोध कोणी लावला ? या प्रश्नाच उत्तर थॉमस अल्वा एडीसनने अस बिनदिक्कतपणे सर्वजण देतात. थॉमस एडीसन नॅशनल हिस्टोरीकल पार्क मधे जाईपर्यंत माझीही हीच धारणा होती. अमेरीकेत फिरायला जायच ठरल तेंव्हा एडीसनची लॅब बघुन यायच अस ठरवल होत. कारण आपल जीवन अमुलाग्र बदलून टाकणारे त्याने लावलेले शोध आणि केवळ शोध लावून न थांबता त्याने त्याआधारे उभ केलेल उद्योगविश्व या गोष्टींच कुतुहल होत.

Edison's Home

न्युयॉर्कहुन १० मैलावर अमेरीकेच्या न्युजर्सी प्रांततला वेस्ट ऑरेंज शहर आहे. याच शहरात थॉमस एडीसन नॅशनल हिस्टॉरीकल पार्क हे सर्वात मोठ म्युझियम आहे. या म्युझियम मधे एडीसनने बनवलेल्या ४ लाख वस्तू (artifacts) आहेत.  त्यात नमुन्या दाखल बनवलेल्या वस्तू (Proto type), अर्धवट राहीलेले प्रयोग, बाजारात विकण्यासाठी बनवलेल्या वस्तू (finished commercial products). या वस्तू बनवण्यासाठी लागणारी फ़ॅक्टरी, प्रयोगशाळा, एडीसनच्या रोजच्या वापरातल्या वस्तू. याशिवाय ४८ हजार ध्वनी मुद्रीका (Sound Recordings), एडीसनच १० हजार दुर्मिळ पुस्तकांच वाचनालय आणि एडीसनची ६० हजार फ़ोटो आणि चित्रफ़िती यांचा अंतर्भाव आहे.







थॉमस एडीसन नॅशनल हिस्टॉरीकल पार्क मधे असलेली एडीसनची लॅब (फॅक्टरी) आणि त्याच घर अशी दोन ठिकाण एकाच तिकीटात पाहाता येतात. अमेरीकन पध्दतीप्रमाणे माहिती कक्षात अनेक सोविनीयर ठेवलेली होती. माहिती कक्षाच्या मागिल दालनात एडीसनवर माहितीपट चालु होता. एडिसनच्या चित्रफ़िती व फ़ोटो यांचा वापर करुन बनवलेल्या माहितीपटामुळे त्याच चरीत्र आपल्या समोर उलगडत जात.

थॉमस अल्वा एडीसनचा जन्म ११ फ़ेब्रुवारी १८४७ मधे ओहियो प्रांतातल्या मिलान येथे झाला. सॅम्युअल आणि नॅन्सी दाम्पत्याच एडीसन हे सातव अपत्य होत. लहाणपणी आलेल्या तापामुळे एडीसनला बहीरेपण आलेला. त्यात शेंडेफ़ळ असल्याने तो आईचा लाडका होता. जेमतेम ३ महिने शाळेत गेलेल्या एडीसनला त्याच्या आईने घरीच शिकवल. कुमारवयात एडीसन ट्रेनमधे कॅंडी, वर्तमानपत्र, भाज्या इत्यादी गोष्टी विकुन तो आपला चरीतार्थ चालवत असे. त्याच ट्रेनच्या शेवटच्या डब्यात त्याने आपली केमिकल लॅब तयार केली होती फ़ावल्या वेळात तो तेथे प्रयोग करत असे. त्या लॅबमधे स्फोट होईपर्यंत त्याचे प्रयोग चालु होते. एडीसनने ३ वर्षाच्या जीमी मॅकेन्झी या धावत्या ट्रेन खाली येणार्‍या मुलाचा जीव वाचल्याबद्दल कृतज्ञता म्हणुन जीमीच्या वडीलांनी एडीसनला टेलिग्राफ़ ऑपरेटरचे प्रशिक्षण दिले. पुढे टेलिग्राफ़ ऑपरेटर म्हणुन नोकरी करतांना त्याने टेलिग्राफ़वर अनेक प्रयोग करुन त्यात सुधारणा केल्या. एडीसनला त्याच पहिल पेटंट वयाच्या २३ व्या वर्षी इलेक्ट्रीक वोट रेकॉर्डर मशिनसाठी मिळाल. १८७० साली एडीसनने त्याच्याच आस्थापनेत काम करणार्‍याअ मेरी स्टीलवेल या १६ वर्षाच्या युवतीशी लग्न केल. त्याच वर्षी एडीसनने संशोधक म्हणुन आपला व्यवसाय नेवार्क, न्युजर्सी येथे चालु केला. १८७६ साली त्याने जगातील पहिली इंडस्ट्रीयल रिसर्च लॅबोरोटरी, मेनलो पार्क, न्युजर्सी येथे चालु केली. पण त्याला प्रसिध्दी मिळवुन दिली ती १८७७ साली लावलेल्या फ़ोनोग्राफ़च्या शोधाने. एडीसनने म्हटलेली "Mary had a little lamb" ही पहिली रेकॉर्ड झालेली कविता. वृत्तपत्रांनी या शोधाला वारेमाप प्रसिध्दी दिली.

पुढील काळात एडीसनने अनेक महत्वाचे शोध लावले त्याने आपल जीवनच बदलुन टाकल. त्यात किंटोग्राफ़ हा मोशन पिक्चर कॅमेरा आणि किन्टोस्कोप हा मोशन पिक्चर दाखवणारा प्रोजेक्टर तयार केला. त्याने लावलेल्या कार्बन बटनच्या शोधामुळे टेलिफ़ोन तर कार्बन फ़िलॅमिंटच्या शोधामुळे दिर्घकाळ पेटणार्‍या इलेक्ट्रीक बल्बचा वापर सुरु झाला. इलेकट्रीकल जनरेटींग आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा शोध लावला. जनरल इलेक्ट्रीक ही कंपनी काढून न्युयॉर्कच्या मॅनहॅटन या भागाला विद्युत पुरवठा करायला सुरुवात केली. कार मधे वापरल्या जाणार्‍या निकेल आर्यन अल्कलाईन बॅटरीचा शोध लावला. पहिल्या इलेक्ट्रीकल रेल्वेचा शोध लावला. एडीसनच्या नावावर तब्बल १०९३ पेटंट रजिस्ट्रर झालेली आहेत.      
  माहितीपट पाहुन प्रथम एडीसनच्या घराकडे मोर्चा वळवला. ग्लेनमॉंट इस्टेट ही अमेरीकेतील पहिली स्वतंत्र घराची कॉलनी. इ.स. १८८६ मधे एडीसन आपली व्दितीय पत्नी  मायना आणि मुलांसह इथे राहायला आला आणि शेवटपर्यंत इथेच राहीला. गर्द झाडीत लपलेल एडीसनच लाकुड आणि दगड वापरुन बनवलेल, २९ खोल्यांच लाल रंगाच दुमजली घर पाहाताच आपण त्याच्या प्रेमात पडतो.बरोबर ११ च्या ठोक्याला एडीसनच्या घरातुन आमची गाईड मुलगी बाहेर आली. घरात शिरल्यावर प्रथम व्हिसिटर्स रुम होती. एडीसनला भेटायला येणार्‍या पाहुण्यांसाठी इथे बसायची व्यवस्था होती. त्याच्या बाजूला असलेल्या खोलीत एडीसनचे पाहुण्यांना भेटत असे. त्याच्या पुढची खोली अर्धवर्तुळाकार असुन तिला खालपासून वरपर्यंत काचा लावलेल्या होत्या. या खोलीला "सनरुम" अस नाव होत. उन्हाळ्याच्या दिवसात येथे पाहुण्यांसाठी आणि कुटुंबियांसाठी भोजन समारंभ आयोजित केले जात असत. पुढील काळात दिर्घकाळ चालणार्‍या दिव्यांचा शोध लावल्यावर एडीसनने या सन रुम मधे ५० दिवे बसवले. भोजनासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्याना या ५० दिव्यांच्या कृत्रीम प्रकाशात न्हायला घालुन एडीसन चकीत करत असे. या दिव्यामुळे एडीसन कडुन भोजनाच आमंत्रण येण ही प्रतिष्ठेची बाब समजली जाई.

याशिवाय  तळमजल्यावर किचन, ड्राय रुम व नोकरांच्या खोल्या होत्या. त्यांची रचना अशी करण्यात आली होती की एकाच घरात असुनही त्या सहज दृष्टीस पडत नाहीत. तळमजल्या वरुन पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी २ जीने आहेत. त्यातील मुख्य (दर्शनी) जीना घरातल्या लोकांसाठी, तर किचन मधुन येणारा जीना नोकरानी वापरायचा असा दंडक होता. नोकराना ये-जा करण्यासाठी मागच्या बाजुला दरवाजा ठेवलेला आहे. त्याना मुख्य दरवाजाने ये-जा करण्याची मुभा नव्हती. १९ व्या शतकातील उच्चवर्गीय अमेरीकन समाजातल्या घराची रचना आणि राहाणीमानाची यावरुन कल्पना येते.किचनला लागुन डायनिंग रुम होती. तिथे टेबलावर ताजी फुल भरलेल्या फुलदाण्या,  प्लेटस, काटे, चमचे , सुर्‍या , केक , पेस्ट्रीज, फळ , जाम , बटर अशा प्रकारे मांडुन ठेवल होत की अस वाटत होत सर्व तयारी झालीय आणि एडीसन व त्याचे कुटुंबिय थोड्याच वेळात नाश्त्याला हजर होणार आहेत. डायनिंग रुमच्या बाजुला असलेल्या मोठ्या हॉलमधे एडिसनचे खाजगी थियेटर होते. एडीसनच्या लॅब मधे बनलेल्या प्रोजेक्टरवर (किन्टोस्कोप) तिथे चित्रपट पाहीले जात. ते जुन प्रोजेक्टर जसच्या तस तिथे ठेवलेल आहे.

वरच्या मजल्यावर जाणार्‍या जिन्यावर एका मुलीचे भव्य पेंटीग लावलेल आहे. एडीसनने हे पेंटीग बनवुन घेतले पण ते त्याच्या पत्नी मायनाला आवडत नसे अस आमच्या गाइडने सांगितले. पण एडीसनच्या चरीत्रात डोकावल्यास एडीसनने घरात किंवा घराच्या सजावटीत कधीही लक्ष घातले नाही. मायना ही त्याकाळचा प्रसिध्द उद्योगपतीची मुलगी. लग्न झाल्यावर एडीसनने हे राहत घर पत्नीच्या नावावर केल. त्या घराची सजावट, दैनंदिन खर्च स्वत:च्या 3 आणि एडीसनच्या आधीच्या पत्नीपासुन झालेल्या ३ मुलांच संगोपन, पाहुण्यांची उठबस, सामाजिक काम (?) या सर्व गोष्टीत मायना भाग घेत असे. एडीसनच्या मृत्यु नंतर मायना तीच्या मृत्युपर्यंत त्याच घरात राहीली. तिने दुसरा विवाहही केला. पहिल्या मजल्यावर जीन्या समोर एडीसनची बेडरुम होती. त्याच्या बाजुला मायना आणि मुलांच्या बेडरुम होत्या. एक गमतीची गोष्ट म्हणजे एडीसनच्या पहील्या बायकोपासुन झालेल्या दोन मुलांची लाडाची नाव (निकनेम) डॅश आणि डॉट होती. एडीसन त्याकाळी तारयंत्रावर करत असलेल्या प्रयोगामुळे त्या मुलांना ही नाव ठेवली असावीत.

एडीसनच्या घराला प्रशस्त आवार आहे. त्यावरील लॉन, फुलझाड यांची उत्तम निगा राखलेली आहे. आवारात असलेल्या मोठ्या वृक्षांखाली सुंदर नक्षीकाम केलेले सुंदर बाकडे ठेवलेले आहेत. त्यावर बसुन त्या शांत वातावरणाचा आस्वाद घ्यायचा मोह आवरत नाही. एडीसनच्या घराजवळच वेगळ्या इमारतीत त्याच गॅरेज आहे. त्यात त्याने वापरलेल्या विविध गाड्या ठेवलेल्या आहेत. याशिवाय ग्रीन हाऊस व पॉटींग शेडही पाहायला मिळते. एडीसनच्या घरामागे त्याचे आणि मायनाचे थडगे आहे.एडीसनचे घर पाहातांना घराची सजावट करताना उच्च अभिरुची आणि सोय यांची योग्य सांगड घातल्याचे जाणवते.










एडीसनचे घर पाहुन झाल्यावर त्याची फॅक्टरी पाहाण्यासाठी परत माहिती केंद्रा जवळ आलो. एडीसनची फॅक्टरी म्हणजेच पहीली इंडस्ट्रीयल रिसर्च लॅबोरोटरी आहे. १९१४ साली लागलेल्या आगीत फ़ॅक्टरीच्या १३ इमारतींना आग लागली. त्यानंतर एडीसनने इथे होणारी तिथे होणारी निर्मिती (प्रोडक्शन) बंद करुन फ़क्त लॅबच्या इमारती बांधल्या.  लाकुड आणि विटा वापरुन बनवलेली दुमजली इमारत आजही आपल्याला पाहाता येते.



.






फॅक्टरीमधे शिरल्यावर समोरच पंचिग क्लॉक दिसते. त्यावरच एडीसन कार्ड पंच करतानाचा फोटो लावलेला आहे. एडीसन स्वत: कार्ड पंच करुन वेळेत कामावर हजर राहात असे. त्यामुळे त्याच्या हाताखाली काम करणार्‍यांनाही वेळेची शिस्त पाळावी लागत असे. पंचिंग क्लॉक समोरच एडीसनचे ऑफ़िस आहे. त्यात एक छोटी लायब्ररी आणि पलंग ठेवलेला आहे. कामावर वेळेत हजर राहणार्‍या एडीसनची घरी परत जाण्याची वेळ ठरलेली नसे. एखाद्या प्रयोगात कामात बुडून गेला की दोन दोन दिवस तो आपल्या फ़ॅक्टरीत राहात असे. त्यावेळी त्याला आराम करण्यासाठी ऑफ़िसातच पलंग ठेवलेला होता.  ऑफ़िसच्या बाजुला वर्कशॉप आहे. त्यात विविध वस्तु बनवायची सामुग्री आहे. एका कोपर्‍यात कामगारांचे त्याकाळचे कोट,टोपी, डबे ठेवलेले आहेत. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी एक लिफ़्ट आहे, त्यावर पाटी लटकवलेली आहे "For the use of Mr. Edison Only".पहिल्या मजल्यावर ड्राफ़्समन रुम, फ़ोटो रुम आहे. एडीसनने बनवलेल्या सर्व वस्तु ठेवलेल्या आहेत. पहिल्या मजल्यावर असलेल्या साऊंडरुममधे एडीसनने तयार केलेल्या फ़ोनोग्राफ़वर  कॅन सारख्या दिसणार्‍या त्याकाळच्या तबकडीवरची गाणी ऐकायला मिळतात.


फॅक्टरी समोर ३ बैठ्या इमारती आहेत. त्यापैकी दोन इमारतीत केमिकल लॅब आहे. १९२७ पासून एडीसनने या लॅबमधे रबरावर संशोधन सुरु केल होत. या इमारतींच्या मागे "Black Maria" हा पहिला मोशन पिक्चर स्टुडीओ आहे. ही काळ्या रंगाची विचित्र आकाराची चाक असलेली इमारत लाकडी रुळांवर बसवलेली आहे. या इमारती समोरच्या मोकळ्या जागेत एडीसनच्या चित्रपटांचे शुटिंग होत असे. संपुर्ण शुटींग सुर्यप्रकाशात होत असे. मोकळ्या जागेवर स्टुडीओची सावली पडल्यावर लाकडी रुळांवर बसवलेला स्टुडीओ पुढे मागे फ़िरवत आणि पुन्हा शुटींग चालु होई.

Chemical Lab

एडीसनला अनेक पदव्या आणि पारीतोषिकांनी सन्मानित करण्यात आल आहे. एडीसनचा मृत्यु १८ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. शेवट पर्यंत एडीसन कामात व्यग्र होता. एडीसनच्या नावाने अनेक पारीतोषिके आज दिली जातात. अमेरीकेत शहर, शाळा, कॉलेज, ब्रीज , तलाव आणि अंतराळात फ़िरणार्‍या अशनीलाही एडीसनचे नाव देऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे.

"Black Maria"

Also read blog on "Corning glass Museum, USA"


2) Eternal Flame Trek

No comments:

Post a Comment