Showing posts with label Offbeat USA. Show all posts
Showing posts with label Offbeat USA. Show all posts

Sunday, June 11, 2023

इटर्नल फ़्लेम (Eternal Flame) ट्रेक

 

Eternal Flame

अमेरीकेतल्या सुप्रसिध्द नायगारा फ़ॉल पासून ३७ किलोमीटर अंतरावर चेस्टनट रिज्ड पार्क (Chestnut Ridge Park) आहे.  नायगरा एकदा पाहुन झाला होता त्यामुळे यावेळी वेगळ काहीतरी बघुया म्हणून शोधाशोध करतांना "इटर्नल फ़्लेम" ची माहिती मिळाली.  हा तसा छोटा अप्रसिध्द ट्रेक आहे. अमेरीकेत प्रत्येक राज्यात अनेक स्टेट पार्क (राखीव जंगल) आहेत आणि त्या राखीव जंगलांमध्ये अनेक आखीव रेखीव ट्रेल्स असतात. जागोजागी लावलेले दिशादर्शक फलक, धोक्याच्या सूचना , जिथे पायवाट धोकादायक असेल तिथे लावलेले संरक्षक कठडे, लाकडाच्या ओंडक्यांच्या पायर्‍या हे सगळ पाहिल की आपल्या सारख्या सह्याद्रीत फिरणार्‍यांना "पाणीकम" वाटत राहात. पण   "इटर्नल फ़्लेम"  चा ट्रेक चक्क याला अपवाद होता.

 


नुकतेच वसंत ऋतूचे आगमन झालेले असल्यामुळे, वेगवेगळ्या रंगाच्या फ़ुलांनी झाड गच्च भरलेली होती. ट्रेकच्या सुरवतीच्या टप्प्यात या झाडांनी स्वागत केल. झाडांवर पान अपवादानेच दिसत होती. अर्थात ही झाड खास इथे आणून लावलेली असावीत अस जंगलात शिरल्यावर लक्षात आले. जंगलात पाईन आणि ओकचे उंचच उंच वॄक्ष होते. त्याच्या दाट सावलीतून वाट जात होती. साधारणपणे १० मिनिटे चालल्यावर पायवाट तीव्र उतारावरुन खाली उतरायला लागली . वॄक्षांची आडव्या  पसरलेल्या एकामेकांत गुंतलेल्या मुळांमुळे काही ठिकाणी पायर्‍यांसारखी रचना तयार झाली होती. या नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या पायर्‍यांवरुन मुळांचा आधार घेत उतरल्यावर आम्ही एका ओढ्याच्या काठाने जाणार्‍या चिंचोळ्या पायवाटेवर पोहोचलो. 



दोन्ही बाजूला झाडी भरलेले डोंगर होते. या ओढ्याच्या प्रवाहाने दोन डोंगरांमधील दरी वर्षानुवर्ष खोदून काढलेली होती. आजही ती प्रक्रीया अतिशय संथ गतीने चालूच आहे. हिवाळ्यात दगडा मधील भेगांमधल्या पाण्याचे बर्फ झाल्याने ते प्रसरण पावते . त्यामुळे भेगा रुंद होऊन दगड फूटून खाली पडतात. उन्हाळ्यात बर्फ वितळून वाहाणार्‍या प्रवाहामुळे किनार्‍याची झीज होऊन ओढ्याचे पात्र रुंद आणि खोल होत जाते.  

 


ओढ्याच्या काठाने जाणार्‍या वळणा वळणाच्या सुंदर वाटेने जातांना आजूबाजूच्या झाडीत पक्ष्यांचा किलीबिलाट ऐकायला येत होता. अचानक एका झाडावरुन सुंदर निळा पक्षी उडाला आणि ओढ्या पलिकडच्या झाडावर जाऊन बसला. त्याची (Blue jay) सुंदर छायाचित्र मिळाली. त्यामुळे चाल मंदावली , आजूबाजूच्या झाडीत आवाजांचा वेध घेत पक्षी शोधायला सुरुवात केली. काही पक्षांची छायाचित्र मिळाली तर काहींच फक्त निरिक्षण करण्यातच आनंद मानावा लागला.


Blue Jay

 

Sparrow

Red winged black bird 


Eastern Blue Bird

पक्षी निरिक्षण करतांना पुढच्या पायवाटेवर लक्ष नव्हत , समोर आडव्या पडलेल्या वृक्षाच्या आड अचानक पायवाट लुप्त झाली . त्यामुळे ओढ्याच्या पात्रात उतरण्या शिवाय पर्याय राहीला नव्हता. ओढ्यातून नितळ पाणी वाहात होत. ओढ्याचा पृष्ठभाग छिन्नीनी तासल्यासारखा सपाट होता, हेही आता लक्षात आले. हिमयुगात बर्फाच्या लाद्यांच्या सरकण्यामुळे दगड अशाप्रकारे छिन्नीनी तासल्यासारखे सपाट होतात , तोच प्रकार इथे पाहायला मिळाला. ओढ्यातून चालतांना अनेक ठिकाणी झाडे पडलेली होती. त्यातून मार्ग काढत तर कधी बाजूच्या उतारावर चढून वळसा घालून पुढे जावे लागत होते. हे अमेरीकन लोकांच्या "सेफ़्टी"च्या कल्पनेच्या पलिकडचे होते. खरतर ही झाड बाजूला करुन मार्ग निर्धोक करेपर्यंत त्यांनी हा ट्रेक बंद कसा ठेवला नाही, याच आश्चर्य वाटल.

 


ओढ्याने एक छोट वळण घेतल, समोर साधारणपणे ७० फ़ुटावरुन ३ टप्प्यात पडणारा धबधबा दिसत होता, त्या धबधब्याच्या पाण्याच्या धारांमागे असलेल्या छोट्याश्या गुहेत पेटलेल्या ३ ज्योती दिसत होत्या , अतिशय सुंदर नजरबंदी करणार दृश्य होत . धबधब्याच्या सर्वात खालच्या टप्प्यात उजव्या कोपर्‍यात जमिनी पासून ६ फूट उंचीवर एक ३ फ़ूट लांब X २ फ़ूट रुंद  आणि १.५ फ़ूट उंच गुहा आहे.

Eternal Flame Water fall


 या गुहेत नैसर्गिक वायूमुळे पेटलेल्या तीन ज्योती आहेत. आजूबाजूला वाहाणारे पाणी गुहेत झिरपत असतांनाही या ज्य़ोती तेवत होत्या .आम्ही गेलो होतो तेंव्हा धबधब्याला पाणी कमी होते , पण धबधबा ऐन भरात वाहात असतांना किंवा हिवाळ्यात गोठला असतांनाही या ज्योती तेवत असतात.

 

Eternal flame water fall

नैसर्गिक वायूचे स्त्रोत कसे तयार होतात ? याबद्दल जिओलॉजीच्या अभ्यासक्रमात शिकलो होतो,

वारा, पाऊस, उष्णता इत्यादिंचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खडकांवर परिणाम होऊन त्याची झीज होते. हा झीज झालेला भाग पाण्या बरोबर वाहून जातो आणि ज्या ठिकाणी पाणी खोल आणि संथ असते अशा ठिकाणी हा गाळ साचतो. त्याबरोबरच पाण्याबरोबर वाहून आलेले जैविक घटकही इथे साचत जातात.  हा गाळ कालांतराने कठीण होतो आणि गाळाचे खडक (Sedimentary Rock) तयार होतात. सरोवर, नदीचं पात्र , नद्यांनी निर्माण केलेला त्रिभूज प्रदेश , समुद्र तळ इत्यादी ठिकाणी हे गाळाचे दगड तयार होतात. याठिकाणी खनीज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याचे आपण वाचलेले असते.

 


इटर्नल फ़्लेमचा (Eternal Flame) व्हिडीओ पाहाण्यासाठी प्ले बटणावर टिचकी मारा


पृथ्वीच्या पोटात होणार्‍या उलथापालथीमुळे हे गाळाचे दगड जमिनीत खोलवर दाबले जातात. या दगडावर पडणार्‍या दाब आणि उष्णतेमुळे जैविक घटकांचे रुपांतर खनिज तेलात आणि नैसर्गिक वायूत होते. भूगर्भात होणार्‍या हालचालींमुळे दगडांमध्ये पडलेल्या भेगांमधून नैसर्गिक वायू जमिनीवर येतो. बर्‍याचदा वीज पडल्यामुळे हा वायू पेट घेतो आणि जमिनीवर ज्योती पेटलेल्या दिसतात. जगभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे भूगर्भातून बाहेर पडणार्‍या नैसर्गिक वायुमुळे पेटलेल्या ज्योती पाहायला मिळतात. भारतातील हिमाचल प्रदेशात असलेल्या प्रसिध्द ज्वालाजी मंदिरातही अशाच प्रकारे जमिनीतून बाहेर येणारा नैसर्गिक वायू पेटल्यामुळे तयार झालेल्या ज्योती दिसतात.

 


इटर्नल फ़्लेमचा अभ्यास  Indiana University Bloomington आणि Italy's National Institute of Geophysics and Volcanology या दोन संस्थांच्या जिओलॉजिस्टनी २०१३ साली केला . त्यांना असे आढळुन आले की इटर्नल फ़्लेम  मध्ये  पाझरणार्‍या वायूत ईथेन (ethane) आणि प्रोफ़ेन (propane) वायूचे प्रमाण 35% आहे. हे प्रमाण जगातील इतर ज्ञात नैसर्गिक वायूच्या स्त्रोतां पेक्षा जास्त आहे. इतर ठिकाणी मिथेन वायू मोठ्या प्रमाणात आढळून येतो. 

 संशोधकांना या परिसरात असे अनेक छोटे छोटे नैसर्गिक वायूचे पाझर ('micro seeps') आढळून आले. या नैसर्गिक वायूचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले हा वायू जवळच असलेल्या Rhinestreet Shale मध्ये तयार झालेला आहे  अंदाजे ४०० मिटर्स (१३००फ़ूट ) खोल असलेल्या या नैसर्गिक वायूच्या साठ्यातील वायू भूगर्भातील हालचालींमुळे (Tectonic activity) तयार झालेल्या खडकां मधील  भेगां मधून जमिनीवर आला आहे. नैसर्गिक वायू तयार होण्यासाठी जमिनी खाली स्त्रोताचे (shale) तापमान  १०० °C च्या आसपास असावे लागते. या तापमानात कार्बन विघटन होऊन नैसर्गिक वायूचे रेणू तयार होतात. परंतू  Rhinestreet Shale मधील तापमान १०० °C पेक्षा कमी आहे तसेच इतर नैसर्गिक वायूच्या स्त्रोतांपेक्षा त्याची खोलीही कमी आहे तरीही तिथे नैसर्गिक वायू कसा तयार झाला ? असा प्रश्न संशोधकांना पडला आहे. त्यावर सध्या अभ्यास चालू आहे.

 


आपल्या इथे धबधब्याच्या खालच्या भागात डोह असतो. तो नसला तरी आजूबाजूचे खडक पडून धबधब्या पर्यंत जाण्याचा मार्ग दुष्कर झालेला असतो. पण या ठिकाणी बर्फाच्या लाद्या सरकण्यामुळे गुळगुळीत पॄष्ठभाग तयार झाला आहे. त्यामुळे ज्योती तेवत असलेल्या गुहेपर्यंत सहज जाता आले. गुहेच्या वरुन पाण्याच्या धारा पडत होत्या त्या धारांच्या पडद्या आड ज्योती तेवत होत्या. नैसर्गिक वायू जळल्यावर येणार टिपिकल वास त्या ठिकाणी येत होता. पृथ्वी, आप (पाणी),  तेज (अग्नी) , वायू आणि आकाश  ही पंचमहाभूत या निबिड अरण्यात एकाच वेळी पाहायला मिळत होती. आग आणि पाणी हे विरुध्द गुणधर्म असणारी महाभूत या ठिकाणी एकत्र नांदत होती. 

 


   या भारावलेल्या वातावरणात काही वेळ थांबून आलेल्या मार्गाने परत फ़िरलो. एक वेगळा छान ट्रेक झाला. मी आजवरच्या  भटकंतीत पाहीलेल अजून एक सुंदर ठिकाण म्हणून "इटर्नल फ्लेम" कायम आठवणीत राहील.

 


जाण्यासाठी :- अमेरीकेतल्या सुप्रसिध्द नायगारा फ़ॉल पासून ३७ किलोमीटर आणि बफेलो विमानतळापासून १७ किलोमीटर अंतरावर चेस्टनट रिज्ड पार्क (Chestnut Ridge Park) आहे. या पार्क मध्ये ३ ट्रेक आहेत. त्यातील मध्यम श्रेणीतला हा ट्रेक आहे. जाऊन येऊन साधारणपणे अंतर ३ किलोमीटर आहे. मे महिना ते ऑक्टोबर हा ट्रेक करता येतो. अमेरीकेत अनेक पार्क्स मध्ये जाण्यासाठी फी भरावी लागते. पण या ट्रेकसाठी कुठलीही फी भरावी लागत नाही.    

 


 Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5 


with Pradnyesh Samant



 1) Edison National Historical Park (एडीसन नॅशनल हिस्टॉरीकल पार्क) Offbeat USA हा ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा 


 २) Corning Glass Museum कॉर्निंग ग्लास म्युझियम Offbeat USA हा ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा 

 


 

 

Monday, June 8, 2015

Corning Glass Museum कॉर्निंग ग्लास म्युझियम

काचेच गाव

      आजकाल मोबाईल विकत घ्यायला गेल्यावर विक्रेता आपल्याला आवर्जुन सांगतो. या मोबाईलची  स्क्रीन "कॉर्निंग गोरीला ग्लासने" बनवलेली आहे. या काचेवर गोरीलाने नखाने खरवडल तरीही यावर एकही चरा उमटणार नाही. मोबाईलच्या संदर्भात वापरला जाणारा हा शब्द सर्वसामान्यांच्या आता परीचयाचा झालाय. त्यातील "गोरीला ग्लास" म्हणजे काय ते पण नीटच कळलय, पण कॉर्निंग म्हणजे काय ? हा प्रश्न मला छळत होता. कॉर्निंग ग्लास म्युझियम पाहिल्यावर या प्रश्नाच उत्तर सापडल.


      अमेरीकेत गेल्यावर नायगारा धबधबा पाहायला जाणार होतो. न्युयॉर्क ते नायगरा हा 6 ते 8 तासाचा प्रवास सलग न करता मधे एखाद ठिकाण पाहाव अस ठरवल तेंव्हा माझ्या अमेरीकेत राहाणार्‍या बहिणीने "कॉर्निंग ग्लास म्युझियमचा" पर्याय सुचवला. अमेरीकेतील न्युयॉर्क राज्यात कॉर्निंग नावाच एक टुमदार खेड आहे. चारही बाजुनी हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल हे खेड एखाद्या बाऊलमधे ठेवल्यासारख दिसत होत. या शांत खेड्यात १८६८ मधे खळबळ उडाली. हे खेड झोपेतुन जाग झाल आणि एक औद्योगिक नगरी म्हणुन नावारुपाला आल. गेली १४६ वर्ष " कॉर्निंग ग्लास इन्कॉर्पोरेशनच" मुख्य कार्यालय आणि रिसर्च सेंटर कॉर्निंग गावातच आहे. इ.स.१८५१ आमोरी हॉगटन यांनी " कॉर्निंग ग्लास फ़ॅकटरीची" स्थापना केली. त्यानंतर आजपर्यंत कंपनीने अनेक चढ उतार पाहिले. पण गेली १५० हुन जास्त वर्ष टिकून राहिलेल्या या कंपनीच रहस्य त्यांच्या रिसर्च लॅबला जात. इ.स. १९०८ मधे कंपनीने रिसर्च लॅबची स्थापना केली. एडीसनच्या बल्बसाठी लागणारी काच बनविण्यापासून ते आजच्या टेलिव्हिजनची ट्युब, बोरोसिल ग्लास, ऑप्टिकल फ़ायबर, सिरॅमिक ग्लास, LCD ग्लास, कॉर्निंग गोरीला ग्लास पर्यंत आपल जीवनमान बदलून टाकणारे शोध या कंपनीच्या खात्यावर जमा आहेत. 

Fern Tower




       कॉर्निंग गावात शिरल्यावर मोठा पार्कींग तळ आहे. त्याच्या बाजुला असलेल्या बस स्टॉपवरुन कॉर्निन ग्लास म्युझियमसाठी मोफत एसी बस सेवा आहे. मोजुन दुसर्‍या मिनिटाला म्युझियमच्या दारात पोहोचलो. म्युझियम मधे  शिरताच समोरच काचेचा सुंदर "फ़र्न ग्रीन टॉवर" आपल लक्ष वेधुन घेतो. कोवळ्या पोपटी रंगात बनवलेल हे काच शिल्प साडे पंधरा फ़ूट उंचीच आहे. काचेला गरम करून, फ़ूंक नळीतून फ़ूंकर मारुन, विविध प्रकारे वाकवून, वळवून वेलीला फुटलेल्या धुमार्‍यांसारखे ७१२ विविध आकार बनवून हे काच शिल्प, डाले चिहुली या कलाकाराने तयार केलेल आहे. दिवसाच्या  विविध वेळी त्यावर पडणारा प्रकाश आणि रात्रीच्या वेळी त्यावर टाकला जाणारा कृत्रिम प्रकाश यामुळे हे शिल्प प्रत्येक वेळी वेगळच भासत. नंतर म्युझियम मधे काच तापवुन त्यात फुंकर मारुन विविध आकार निर्माण करण्याच प्रात्यक्षिक पाहिल तेंव्हा हे काम किती कठीण आहे आणि उच्च दर्जाच आहे याची जाणीव झाली.


     


 











    कॉर्निंग म्युझियम आठवड्याचे सातही दिवस चालू असत.एकदा काढलेल तिकीट दोन दिवसासाठी चालत आणि १९ वर्षाखालील मुलांना मोफ़त प्रवेश आहे. अमेरीकेतील जवळपासच्या शहरापासुन कॉर्निंगचे अंतर पाहाता तिथे पोहोचायला दुपार होतेच. त्यानंतर २ - ३ तासात म्युझियम बघुन होत नाही म्हणुन ही सोय केलीय. तिकीट काढुन आत शिरल्यावर समोरच एक अवाढव्य काच लावलीय. त्यावर काचे संबधी जागतिक साहित्यात आलेली अनेक वचन उधृत केलेली आहेत. त्यातील  "Don't throw stones at your neighboures if your own windows are Glass"  हे बेंजामिन फ़्रॅंकलिनने १७७४ साली लिहिलेल वचन वाचुन तर मी चाटच पडलो. हे वाक्य म्हणजे आपल्या हमराज चित्रपटातला राजकुमारचा प्रसिध्द डॉयलॉग "जिनके घर शिशे के होते है वो दुसरोंपर पत्थर नही फेका करते." हिंदी सिनेमाच्या उचलेगिरीला सलाम करुन पुढे पाहायला सुरुवात केली.

      
  





  








   काचेचे विविध प्रकार, त्यात होत गेलेला बदल आणि त्याचे दैनंदिन जीवनात होणारे उपयोग यावर प्रकाशझोत टाकणारे प्रदर्शन तेथे मांडलेले आहे. ते नीट समजावे म्हणुन त्याच्या बाजुला स्क्रीन लाउन त्यावर त्यासंबंधीची माहिती रंजक पध्दतीने सतत दाखवली जात होती. तिथे लावलेल्या पेरीस्कोप मधून कॉर्निंग गावातील विविध ठिकाण पाहाता येतात. या प्रदर्शनात एक काचेचा डोम बनवलेला आहे त्याच्या दोन टोकाला दोन जणानी उभ राहुन कुजबुज केली तरी एकमेकाच्या कानात बोलल्या सारखा स्पष्ट आवाज येतो. या मागिल शास्त्रही येथे उलगडुन दाखवलेले आहे. अशाच एका डिस्प्ले मधे दोन आरसे/भिंग बसवलेले आहेत. त्या आरशांच्या मधोमध आपण उभ राहुन पुढे पुढे चालत गेल्यावर आपली प्रतिमा मोठी मोठी होत जाते आणि एका बिंदुपाशी आपली प्रतिमा चक्क उलटी दिसायला लागते. अशा प्रकारचे अनेक प्रयोग मांडुन त्याव्दारे पाहाणार्‍यांची उत्कंठा वाढवुन त्याला त्यामागच शास्त्र जाणून घ्यायची इच्छा व्हावी अस वातावरण इथे निर्माण करण्यात आल आहे.


      याशिवाय दर तासाला इथे काचेशी संबंधीत विविध प्रात्यक्षिक दाखवली जातात. त्यासाठी वेगवेगळी दालन आहेत. "ब्रेकींग द ग्लास " या प्रात्यक्षिकात प्रेक्षकातल्या एखाद्याला बोलवुन त्याच्या कडुन वेगवेगळ्या प्रकारच्या काचा फोडुन घेतात. ती फोडण्यासाठी लागलेला जोर, त्याच्या तुकड्यांचा आकार, त्यामागिल कारण शास्त्र समजवुन दिली जातात. यातुन वेगवेगळ्या उपयोगांसाठी काचा बनवताना त्यात कसे बदल होत गेले याची माहिती देतात. "फ़्लेमवर्क डेमो" या शोमधील कलाकार काचेची छोटीशी कांडी तापवुन त्याच्या छोट्या वस्तु बनवतात. वस्तु बनवताना ते आपल्याला माहितीही देत असतात. आम्ही पाहिलेल्या प्रात्यक्षिकात त्याने ४ सेमी उंचीचा  पेग्विन बनवला होता. यातील कलाकार त्यामानाने नवखे म्हणजे ५ ते १० वर्षाचा अनुभव असलेले असतात. पण "हॉट ग्लास शो" या शो मधले कलाकार २५ ते ३० वर्षाचा अनुभव असलेले असतात. या शो साठी एक खास मिनी थेटर बनवलेल आहे. स्टेजवर काचेचा रस तापवण्यासाठीची भट्टी व इतर सामुग्री ठेवलेली असते. कलाकार स्टेजवर आल्यावर निवेदिका त्याची त्याच्या अनुभवाची आणि त्याला मिळालेल्या पारीतोषिकांची माहीती देते. त्यानंतर तो कलाकार भट्टीत तापत असलेल्या काचेच्या रसाचा गोळा एका धातुच्या नळीभोवती गुंडाळुन बाहेर काढतो. त्या नळीत फुंकर मारुन त्याला हवा तसा आकार देतो. त्याचवेळी तो नळी हवेत किंवा समोरच्या टेबलावर ठेवुन त्याला सर्व बाजुनी हवा तसा आकार देतो. हे करत असताना काचेच तापमान कमी होत, मग तो आकार आलेला गोळा पुन्हा भट्टीत टाकतात. काच मऊ झाली की आकारात सुबकता (फाइन टच) आणली जाते. मग वेगवेगळ्या रंगांची ऑक्साइडस वापरुन त्या काचेत रंग भरण्यासाठी परत भट्टीत टाकतात. या सर्व क्रिया तो कलाकार इतक्या सहजतेने करत होता की, अस वाटत होत हे सगळ करण किती सोप आहे. पण काचेची पारंपारिक पध्दतीने भांडी बनवण्याची कला अतिशय क्लिष्ट आहे. काचेचा रस योग्य प्रमाणात तापवण, त्याला आकार देण हे मातीची भांडी बनवण्यापेक्षाही कठीण काम आहे. हा सर्व निर्मिती सोहळा नीट पाहाता यावा यासाठी ठिकठिकाणी, अगदी भट्टीतही कॅमेरे लावलेले आहेत. थेटरमधे लावलेल्या स्क्रीन आणि निवेदीकने दिलेली त्या निर्मिती प्रक्रियेची शानदार माहिती यामुळे हा शो ठसा उमटवुन जातो. या कलाकारानी बनवलेल्या कलाकृती विकतही मिळतात. चौथा शो हा "ऑप्टिकल फायबरवर" आहे. कॉर्निंगने लावलेल्या या शोधामुळे दुरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली. हा शो मात्र खुपच टेक्निकल होता.



      
 

  










     म्युझियम मधला हा माहितीपुर्ण विभाग पाहुन झाल्यावर पुढच्या भागात देशोदेशीच्या काचेच्या वस्तुंचा संग्रह केलेला आहे. त्यात लाव्हा रस थंड होताना नैसर्गिकरीत्या तयार झालेली काच, निसर्गात विविध स्वरुपात सापडणारी काच सुरुवातीला ठेवली आहे.  काच बनविण्याच्या पारंपारीक पध्दतींची मातीची मॉडेल्स बनवलेली आहेत. त्यात कॉर्निंग कंपनीचे सुरवातीच्या काळातले मॉडेल पण आहे. याशिवाय रोमन, इस्लामिक काळातील काचेच्या विविध वापरातल्या वस्तू ते आजच्या कलावंतानी बनवलेल्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. या संग्रहात एक काचेची सुंदर बोट ठेवलेली आहे. तशीच दुसरी बोट राजस्थान मधल्या बिकानेरच्या लालगढ पॅलेस मधे ठेवलेली आहे. याशिवाय काचेचे कपडे, काचेच पिस्तुलही पाहाण्यासारखे आहे .
     

 


     









  

 म्युझियम पाहून झाल्यावर बाहेर पडण्या अगोदर डिझाईन आणि सजेशन रुम आहे. येथे कागद, विविध रंग, कॉम्प्युटर्स ठेवलेले आहे. म्युझियम पाहून जर एखाद्याला काही कल्पना सुचली तर त्याने ती येथील कागदावर/कॉम्प्युटर्स वर उतरवावी अस आवाहन तिथे केल जात. तसेच " Make your own Glass"  या कार्यशाळेत भाग घेऊन आपण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काचेची वस्तू बनवून घरी नेऊ शकतो. म्युझियम मधील शेवटच दालन हे विक्रीच दालन आहे. यात एक डॉलर पासुन लाखभर डॉलर्सच्या काचेच्या वस्तु ठेवलेल्या आहेत. त्यातील वस्तुंच वैविध्य पाहिल की पुन्हा एकदा जाणिव होते की काचेने आपल जीवन कस व्यापुन टाकलय.



जाण्यासाठी :- कॉर्निंग ग्लास म्युझियम, न्युयॉर्क पासून २५० किमीवर (४ तासांवर) आणि नायगरा पासून १५० किमीवर (४ तासांवर) आहे. कॉर्निंगमधे राहाण्यासाठी हॉटेल्स आहेत. जेवणासाठी चक्क एक भारतीय रेस्टॉरंट सुध्दा आहे. 










Also read the blog on Edison National History Park

Sunday, June 7, 2015

Edison National Historical Park (एडीसन नॅशनल हिस्टॉरीकल पार्क)


इलेक्ट्रीक बल्बचा शोध कोणी लावला ? या प्रश्नाच उत्तर थॉमस अल्वा एडीसनने अस बिनदिक्कतपणे सर्वजण देतात. थॉमस एडीसन नॅशनल हिस्टोरीकल पार्क मधे जाईपर्यंत माझीही हीच धारणा होती. अमेरीकेत फिरायला जायच ठरल तेंव्हा एडीसनची लॅब बघुन यायच अस ठरवल होत. कारण आपल जीवन अमुलाग्र बदलून टाकणारे त्याने लावलेले शोध आणि केवळ शोध लावून न थांबता त्याने त्याआधारे उभ केलेल उद्योगविश्व या गोष्टींच कुतुहल होत.

Edison's Home

न्युयॉर्कहुन १० मैलावर अमेरीकेच्या न्युजर्सी प्रांततला वेस्ट ऑरेंज शहर आहे. याच शहरात थॉमस एडीसन नॅशनल हिस्टॉरीकल पार्क हे सर्वात मोठ म्युझियम आहे. या म्युझियम मधे एडीसनने बनवलेल्या ४ लाख वस्तू (artifacts) आहेत.  त्यात नमुन्या दाखल बनवलेल्या वस्तू (Proto type), अर्धवट राहीलेले प्रयोग, बाजारात विकण्यासाठी बनवलेल्या वस्तू (finished commercial products). या वस्तू बनवण्यासाठी लागणारी फ़ॅक्टरी, प्रयोगशाळा, एडीसनच्या रोजच्या वापरातल्या वस्तू. याशिवाय ४८ हजार ध्वनी मुद्रीका (Sound Recordings), एडीसनच १० हजार दुर्मिळ पुस्तकांच वाचनालय आणि एडीसनची ६० हजार फ़ोटो आणि चित्रफ़िती यांचा अंतर्भाव आहे.







थॉमस एडीसन नॅशनल हिस्टॉरीकल पार्क मधे असलेली एडीसनची लॅब (फॅक्टरी) आणि त्याच घर अशी दोन ठिकाण एकाच तिकीटात पाहाता येतात. अमेरीकन पध्दतीप्रमाणे माहिती कक्षात अनेक सोविनीयर ठेवलेली होती. माहिती कक्षाच्या मागिल दालनात एडीसनवर माहितीपट चालु होता. एडिसनच्या चित्रफ़िती व फ़ोटो यांचा वापर करुन बनवलेल्या माहितीपटामुळे त्याच चरीत्र आपल्या समोर उलगडत जात.

थॉमस अल्वा एडीसनचा जन्म ११ फ़ेब्रुवारी १८४७ मधे ओहियो प्रांतातल्या मिलान येथे झाला. सॅम्युअल आणि नॅन्सी दाम्पत्याच एडीसन हे सातव अपत्य होत. लहाणपणी आलेल्या तापामुळे एडीसनला बहीरेपण आलेला. त्यात शेंडेफ़ळ असल्याने तो आईचा लाडका होता. जेमतेम ३ महिने शाळेत गेलेल्या एडीसनला त्याच्या आईने घरीच शिकवल. कुमारवयात एडीसन ट्रेनमधे कॅंडी, वर्तमानपत्र, भाज्या इत्यादी गोष्टी विकुन तो आपला चरीतार्थ चालवत असे. त्याच ट्रेनच्या शेवटच्या डब्यात त्याने आपली केमिकल लॅब तयार केली होती फ़ावल्या वेळात तो तेथे प्रयोग करत असे. त्या लॅबमधे स्फोट होईपर्यंत त्याचे प्रयोग चालु होते. एडीसनने ३ वर्षाच्या जीमी मॅकेन्झी या धावत्या ट्रेन खाली येणार्‍या मुलाचा जीव वाचल्याबद्दल कृतज्ञता म्हणुन जीमीच्या वडीलांनी एडीसनला टेलिग्राफ़ ऑपरेटरचे प्रशिक्षण दिले. पुढे टेलिग्राफ़ ऑपरेटर म्हणुन नोकरी करतांना त्याने टेलिग्राफ़वर अनेक प्रयोग करुन त्यात सुधारणा केल्या. एडीसनला त्याच पहिल पेटंट वयाच्या २३ व्या वर्षी इलेक्ट्रीक वोट रेकॉर्डर मशिनसाठी मिळाल. १८७० साली एडीसनने त्याच्याच आस्थापनेत काम करणार्‍याअ मेरी स्टीलवेल या १६ वर्षाच्या युवतीशी लग्न केल. त्याच वर्षी एडीसनने संशोधक म्हणुन आपला व्यवसाय नेवार्क, न्युजर्सी येथे चालु केला. १८७६ साली त्याने जगातील पहिली इंडस्ट्रीयल रिसर्च लॅबोरोटरी, मेनलो पार्क, न्युजर्सी येथे चालु केली. पण त्याला प्रसिध्दी मिळवुन दिली ती १८७७ साली लावलेल्या फ़ोनोग्राफ़च्या शोधाने. एडीसनने म्हटलेली "Mary had a little lamb" ही पहिली रेकॉर्ड झालेली कविता. वृत्तपत्रांनी या शोधाला वारेमाप प्रसिध्दी दिली.

पुढील काळात एडीसनने अनेक महत्वाचे शोध लावले त्याने आपल जीवनच बदलुन टाकल. त्यात किंटोग्राफ़ हा मोशन पिक्चर कॅमेरा आणि किन्टोस्कोप हा मोशन पिक्चर दाखवणारा प्रोजेक्टर तयार केला. त्याने लावलेल्या कार्बन बटनच्या शोधामुळे टेलिफ़ोन तर कार्बन फ़िलॅमिंटच्या शोधामुळे दिर्घकाळ पेटणार्‍या इलेक्ट्रीक बल्बचा वापर सुरु झाला. इलेकट्रीकल जनरेटींग आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा शोध लावला. जनरल इलेक्ट्रीक ही कंपनी काढून न्युयॉर्कच्या मॅनहॅटन या भागाला विद्युत पुरवठा करायला सुरुवात केली. कार मधे वापरल्या जाणार्‍या निकेल आर्यन अल्कलाईन बॅटरीचा शोध लावला. पहिल्या इलेक्ट्रीकल रेल्वेचा शोध लावला. एडीसनच्या नावावर तब्बल १०९३ पेटंट रजिस्ट्रर झालेली आहेत.      
  माहितीपट पाहुन प्रथम एडीसनच्या घराकडे मोर्चा वळवला. ग्लेनमॉंट इस्टेट ही अमेरीकेतील पहिली स्वतंत्र घराची कॉलनी. इ.स. १८८६ मधे एडीसन आपली व्दितीय पत्नी  मायना आणि मुलांसह इथे राहायला आला आणि शेवटपर्यंत इथेच राहीला. गर्द झाडीत लपलेल एडीसनच लाकुड आणि दगड वापरुन बनवलेल, २९ खोल्यांच लाल रंगाच दुमजली घर पाहाताच आपण त्याच्या प्रेमात पडतो.बरोबर ११ च्या ठोक्याला एडीसनच्या घरातुन आमची गाईड मुलगी बाहेर आली. घरात शिरल्यावर प्रथम व्हिसिटर्स रुम होती. एडीसनला भेटायला येणार्‍या पाहुण्यांसाठी इथे बसायची व्यवस्था होती. त्याच्या बाजूला असलेल्या खोलीत एडीसनचे पाहुण्यांना भेटत असे. त्याच्या पुढची खोली अर्धवर्तुळाकार असुन तिला खालपासून वरपर्यंत काचा लावलेल्या होत्या. या खोलीला "सनरुम" अस नाव होत. उन्हाळ्याच्या दिवसात येथे पाहुण्यांसाठी आणि कुटुंबियांसाठी भोजन समारंभ आयोजित केले जात असत. पुढील काळात दिर्घकाळ चालणार्‍या दिव्यांचा शोध लावल्यावर एडीसनने या सन रुम मधे ५० दिवे बसवले. भोजनासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्याना या ५० दिव्यांच्या कृत्रीम प्रकाशात न्हायला घालुन एडीसन चकीत करत असे. या दिव्यामुळे एडीसन कडुन भोजनाच आमंत्रण येण ही प्रतिष्ठेची बाब समजली जाई.

याशिवाय  तळमजल्यावर किचन, ड्राय रुम व नोकरांच्या खोल्या होत्या. त्यांची रचना अशी करण्यात आली होती की एकाच घरात असुनही त्या सहज दृष्टीस पडत नाहीत. तळमजल्या वरुन पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी २ जीने आहेत. त्यातील मुख्य (दर्शनी) जीना घरातल्या लोकांसाठी, तर किचन मधुन येणारा जीना नोकरानी वापरायचा असा दंडक होता. नोकराना ये-जा करण्यासाठी मागच्या बाजुला दरवाजा ठेवलेला आहे. त्याना मुख्य दरवाजाने ये-जा करण्याची मुभा नव्हती. १९ व्या शतकातील उच्चवर्गीय अमेरीकन समाजातल्या घराची रचना आणि राहाणीमानाची यावरुन कल्पना येते.किचनला लागुन डायनिंग रुम होती. तिथे टेबलावर ताजी फुल भरलेल्या फुलदाण्या,  प्लेटस, काटे, चमचे , सुर्‍या , केक , पेस्ट्रीज, फळ , जाम , बटर अशा प्रकारे मांडुन ठेवल होत की अस वाटत होत सर्व तयारी झालीय आणि एडीसन व त्याचे कुटुंबिय थोड्याच वेळात नाश्त्याला हजर होणार आहेत. डायनिंग रुमच्या बाजुला असलेल्या मोठ्या हॉलमधे एडिसनचे खाजगी थियेटर होते. एडीसनच्या लॅब मधे बनलेल्या प्रोजेक्टरवर (किन्टोस्कोप) तिथे चित्रपट पाहीले जात. ते जुन प्रोजेक्टर जसच्या तस तिथे ठेवलेल आहे.

वरच्या मजल्यावर जाणार्‍या जिन्यावर एका मुलीचे भव्य पेंटीग लावलेल आहे. एडीसनने हे पेंटीग बनवुन घेतले पण ते त्याच्या पत्नी मायनाला आवडत नसे अस आमच्या गाइडने सांगितले. पण एडीसनच्या चरीत्रात डोकावल्यास एडीसनने घरात किंवा घराच्या सजावटीत कधीही लक्ष घातले नाही. मायना ही त्याकाळचा प्रसिध्द उद्योगपतीची मुलगी. लग्न झाल्यावर एडीसनने हे राहत घर पत्नीच्या नावावर केल. त्या घराची सजावट, दैनंदिन खर्च स्वत:च्या 3 आणि एडीसनच्या आधीच्या पत्नीपासुन झालेल्या ३ मुलांच संगोपन, पाहुण्यांची उठबस, सामाजिक काम (?) या सर्व गोष्टीत मायना भाग घेत असे. एडीसनच्या मृत्यु नंतर मायना तीच्या मृत्युपर्यंत त्याच घरात राहीली. तिने दुसरा विवाहही केला. पहिल्या मजल्यावर जीन्या समोर एडीसनची बेडरुम होती. त्याच्या बाजुला मायना आणि मुलांच्या बेडरुम होत्या. एक गमतीची गोष्ट म्हणजे एडीसनच्या पहील्या बायकोपासुन झालेल्या दोन मुलांची लाडाची नाव (निकनेम) डॅश आणि डॉट होती. एडीसन त्याकाळी तारयंत्रावर करत असलेल्या प्रयोगामुळे त्या मुलांना ही नाव ठेवली असावीत.

एडीसनच्या घराला प्रशस्त आवार आहे. त्यावरील लॉन, फुलझाड यांची उत्तम निगा राखलेली आहे. आवारात असलेल्या मोठ्या वृक्षांखाली सुंदर नक्षीकाम केलेले सुंदर बाकडे ठेवलेले आहेत. त्यावर बसुन त्या शांत वातावरणाचा आस्वाद घ्यायचा मोह आवरत नाही. एडीसनच्या घराजवळच वेगळ्या इमारतीत त्याच गॅरेज आहे. त्यात त्याने वापरलेल्या विविध गाड्या ठेवलेल्या आहेत. याशिवाय ग्रीन हाऊस व पॉटींग शेडही पाहायला मिळते. एडीसनच्या घरामागे त्याचे आणि मायनाचे थडगे आहे.एडीसनचे घर पाहातांना घराची सजावट करताना उच्च अभिरुची आणि सोय यांची योग्य सांगड घातल्याचे जाणवते.










एडीसनचे घर पाहुन झाल्यावर त्याची फॅक्टरी पाहाण्यासाठी परत माहिती केंद्रा जवळ आलो. एडीसनची फॅक्टरी म्हणजेच पहीली इंडस्ट्रीयल रिसर्च लॅबोरोटरी आहे. १९१४ साली लागलेल्या आगीत फ़ॅक्टरीच्या १३ इमारतींना आग लागली. त्यानंतर एडीसनने इथे होणारी तिथे होणारी निर्मिती (प्रोडक्शन) बंद करुन फ़क्त लॅबच्या इमारती बांधल्या.  लाकुड आणि विटा वापरुन बनवलेली दुमजली इमारत आजही आपल्याला पाहाता येते.



.






फॅक्टरीमधे शिरल्यावर समोरच पंचिग क्लॉक दिसते. त्यावरच एडीसन कार्ड पंच करतानाचा फोटो लावलेला आहे. एडीसन स्वत: कार्ड पंच करुन वेळेत कामावर हजर राहात असे. त्यामुळे त्याच्या हाताखाली काम करणार्‍यांनाही वेळेची शिस्त पाळावी लागत असे. पंचिंग क्लॉक समोरच एडीसनचे ऑफ़िस आहे. त्यात एक छोटी लायब्ररी आणि पलंग ठेवलेला आहे. कामावर वेळेत हजर राहणार्‍या एडीसनची घरी परत जाण्याची वेळ ठरलेली नसे. एखाद्या प्रयोगात कामात बुडून गेला की दोन दोन दिवस तो आपल्या फ़ॅक्टरीत राहात असे. त्यावेळी त्याला आराम करण्यासाठी ऑफ़िसातच पलंग ठेवलेला होता.  ऑफ़िसच्या बाजुला वर्कशॉप आहे. त्यात विविध वस्तु बनवायची सामुग्री आहे. एका कोपर्‍यात कामगारांचे त्याकाळचे कोट,टोपी, डबे ठेवलेले आहेत. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी एक लिफ़्ट आहे, त्यावर पाटी लटकवलेली आहे "For the use of Mr. Edison Only".पहिल्या मजल्यावर ड्राफ़्समन रुम, फ़ोटो रुम आहे. एडीसनने बनवलेल्या सर्व वस्तु ठेवलेल्या आहेत. पहिल्या मजल्यावर असलेल्या साऊंडरुममधे एडीसनने तयार केलेल्या फ़ोनोग्राफ़वर  कॅन सारख्या दिसणार्‍या त्याकाळच्या तबकडीवरची गाणी ऐकायला मिळतात.


फॅक्टरी समोर ३ बैठ्या इमारती आहेत. त्यापैकी दोन इमारतीत केमिकल लॅब आहे. १९२७ पासून एडीसनने या लॅबमधे रबरावर संशोधन सुरु केल होत. या इमारतींच्या मागे "Black Maria" हा पहिला मोशन पिक्चर स्टुडीओ आहे. ही काळ्या रंगाची विचित्र आकाराची चाक असलेली इमारत लाकडी रुळांवर बसवलेली आहे. या इमारती समोरच्या मोकळ्या जागेत एडीसनच्या चित्रपटांचे शुटिंग होत असे. संपुर्ण शुटींग सुर्यप्रकाशात होत असे. मोकळ्या जागेवर स्टुडीओची सावली पडल्यावर लाकडी रुळांवर बसवलेला स्टुडीओ पुढे मागे फ़िरवत आणि पुन्हा शुटींग चालु होई.

Chemical Lab

एडीसनला अनेक पदव्या आणि पारीतोषिकांनी सन्मानित करण्यात आल आहे. एडीसनचा मृत्यु १८ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. शेवट पर्यंत एडीसन कामात व्यग्र होता. एडीसनच्या नावाने अनेक पारीतोषिके आज दिली जातात. अमेरीकेत शहर, शाळा, कॉलेज, ब्रीज , तलाव आणि अंतराळात फ़िरणार्‍या अशनीलाही एडीसनचे नाव देऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे.

"Black Maria"

Also read blog on "Corning glass Museum, USA"


2) Eternal Flame Trek