Monday, June 8, 2015

Tank Museum at Ahmednagar , Maharashtra

रणगाडा म्युझियम

Tank Museum Ahmednagar, Maharashtra
      
      पहिल्या महायुध्दात रणगाडा या अदभुत वहानाच्या शोधाने अनेक युध्दांचे निकाल बदलले. कुठल्याही पृष्ठभागावरुन आग ओकत जाणार्‍या या वहानाने पायदळात महत्वाचे स्थान पटकावले. भारतीय युध्द इतिहासातही रणगाड्यांनी महत्वाची भूमिका बजावलीय. एकेकाळी विदेषी बनावटीचे रणगाडे वापरणारा आपला देश आज स्वत: निर्माण केलेले रणगाडेही वापरतोय. जागतिक आणि भारतीय सैन्यातल्या रणगाड्यांचा चालता बोलता इतिहास आपल्याला आशियातील एकमेव नगर येथील "रणगाडा म्युझियम" मध्ये पाहाता येतो.

    इसवीसनाच्या १५ व्या शतकात अहमदशाह बादशहाने अहमदनगरचा किल्ला आणि राजधानीचे शहर वसविले. या शहराचे भौगोलिक स्थान आणि महत्व पाहून इंग्रजांनी आपला सैन्यतळ याच गावात उभारला. स्वातंत्र्या नंतरही भारतीय लष्कराचा तळ या भागात ठेवण्यात आला. लष्कराच्या ताब्यात असलेल्या दारुगोळ्याच्या डंपिंग ग्राऊंडच्या जमिनीवर आशियातील एकमेव "रणगाडा म्युझियमची" निर्मिती करण्यात आली. इ.स. १६ फ़ेब्रुवारी १९९४ ला जनरल बी.सी. जोशी यांच्या हस्ते या म्युझियमच उदघाटन करण्यात आले. या संग्रहालयाची उभारणी आणि देखभाल Armored Corps Center and School, अहमदनगर या लष्करी आस्थापने तर्फ़े केली जाते. 

      नगर एसटी स्थानकापासून साधारणपणे ४ किमी अंतरावर, नगर - सोलापूर रस्त्यावर भारतीय बनावटीचा "विजयंता" रणगाडा आपले लक्ष वेधून घेतो. या रणगाड्या जवळून रणगाडा म्युझियमकडे जातांना प्रथम आपल्या गाडीची नोंद व तपासणी होते. कमानीतून आत शिरल्यावर माळरानातून जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला ठेवलेला अमेरीकन बनावटीचा उध्वस्त "पॅटन रणगाडा" पाहायला मिळतो आणि आपली उत्सुकता चाळवली जाते. थोड्याच अंतरावर माळरानाचा कायापालट होऊन आपण गर्द झाडीने वेढलेल्या आणि नीटनेटक गवत राखलेल्या उद्यानापाशी पोहोचतो. येथे म्युझियम मधे प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्का बरोबरच राज्य किंवा भारत सरकारने दिलेले फोटो आयडेंटी कार्ड जवळ असणे आवश्यक आहे. (उदा. पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, आधार कार्ड, इत्यादी.) 

"रोल्स राईस सिल्व्हर घोस्ट" Rolls Royce, Silver Ghost
" सेंच्युरीयन टर्ट" Centurion Turt Tank  
      
रणगाडा म्युझियम मधे प्राथमिक अवस्थेतील रणगाड्यांपासून पहिल्या आणि दुसर्‍या महायुध्दात वापरलेले ५० च्या वर रणगाडे लष्करी शिस्तीत मांडून ठेवलेले आहेत. पहिल्या चिलखती गाडी पासून आजच्या अद्ययावत रणगाड्या पर्यंतचा प्रगतीचा इतिहास इथे पाहायला मिळतो. म्युझियम मधे शिरल्यावर दोनही बाजूंना " सेंच्युरीयन टर्ट" ठेवलेले आहेत. रणगाड्यावरचा हा तोफ़ असलेला फ़िरता भाग कासवा सारखा दिसतो म्हणुन याला "टर्ट"(ल) म्हणतात. जमिनी वरुन जमिनीवर व जमिनी वरुन आकाशात मारा करण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. रणगाड्यासारखी याला चाक किंवा पट्टे नसतात. त्यामुळे त्याला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी दुसर्‍या वहानाची मदत घ्यावी लागते. टर्टच्या पुढे रोल्स राईस कंपनीची पहिली चिलखती गाडी (Armoured Car) ठेवलेली आहे. रणगाड्याच्या शोधापूर्वी युध्दभुमीवर वापरण्यासाठी ब्रिटनच्या रॉयल नेव्हल एयर सर्व्हीसेसनी १९१४ साली रॉल्स राईस कंपनी बरोबर "रोल्स राईस सिल्व्हर घोस्ट" या पहिल्या चिलखती गाडीची निर्मिती केली. पहिल्या महायुध्दात या गाडीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला १९४१ मधे गाडीच उत्पादन बंद करे पर्यंत त्यात अनेक बदल केले गेल. भारतात जनरल डायरने जालियनवाला बाग मधे शिरण्यासाठी या चिलखती गाडीचा उपयोग केला होता. "रोल्स राईस सिल्व्हर घोस्टच्या मागे "Schmerer Panzersphah Wagen (8-RAD)" ही १९३४ मधे जर्मनीत वापरात असलेली चिलखती गाडी त्यावरील नाझींच्या उलट्या स्वस्तिकच्या चिन्हामुळे चटकन नजरेत भरते. 


"Schmerer Panzersphah Wagen (8-RAD)"
चिलखती गाडी मजबूत असली तरी तीची चाक हाच तीचा मोठा अडथळा होता. त्यामुळेच युध्दभुमीवर गाडीच्या वापराला मर्यादा पडत.  पहिल्या महायुध्दा दरम्यान सर्वच देश अशा एका वहानाच्या शोधात होते जे रस्ता नसलेल्या पृष्ठभागावरुन म्हणजेच खाच, खळगे, खंदक, तारा, कुंपणे, दलदल, खडक, वाळू, वाळवंट, टेकडी या सर्वांवरून मार्गक्रमण करु शकेल. त्याचवेळी शत्रुवर मारा सुध्दा करु शकेल. त्यातूनच १९१६ साली इंग्लंड आणि फ़्रान्स मधे जवळजवळ एकाच वेळी रणगाड्यांची निर्मिती झाली. सुरवातीच्या काळात हा शोध गुप्त ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी या प्रोजेक्टला "मोबाईल वॉटर टॅंक" अस नाव दिल. पुढील काळात रणगाड्यात अनेक बदल झाले, पण त्याला चिकटलेल "टॅंक" नाव आजही सर्वोतोमुखी आहे. 


"वॉटर बफ़ेलो" Water Buffalo Tank

 जमिनीवर आणि पाण्यात चालणारे रणगाडे Sea Lion Tank
"रोल्स राईस सिल्व्हर घोस्ट" समोरच अमेरीकन बनावटीची " M3 A1 Reconnassance Vehical" ही चिलखती गाडी ठेवलेली आहे. या गाडीचा उपयोग शत्रुच्या भागात सैन्य पोहोचवण्यासाठी होत असे. या गाडीत काळानुसार बदल होत गेले. आताच्या आखाती युध्दात "M3 A3" या अत्याधुनिक तंत्राने सज्ज असलेल्या गाडीचा वापर केला गेला. त्याच्या पुढे "LVTA(4)" हा पाण्यातून चालणारा अमेरिकन बनावटीचा "वॉटर बफ़ेलो" रणगाडा ठेवलेला आहे. युध्दनौकेवरील सामान किनार्‍यावर आणण्यासाठी या रणगाड्याची निर्मिती करण्यात आली होती. यातही काळानुसार बदल होत गेले आणि प्रत्यक्ष युध्दातही याचा वापार केला गेला. "Topas Ambiphious  आणि  Sherman"  हे जमिनीवर आणि पाण्यात चालणारे रणगाडेही येथे पाहायला मिळतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आराखडा पास झाला म्हणुन "व्हॅलेंटाईन" नाव दिलेला रणगाडा दुसर्‍या महायुध्दात वापरला गेला. शत्रूचा मारा झाल्यावर पातळ पत्र्यामुळे हा रणगाडा लगेच पेट घेत असे त्यामुळे "मॅच बॉक्स" या टोपण नावाने तो सैनिकांमधे ओळखला जात असे.

भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा "विजयंता" Vikyanta Tank

    पहिल्या व दुसर्‍या महायुध्दात वापरलेल्या रणगाड्यांच्या गर्दीत एकमेव तरूण रणगाडा येथे पाहायला मिळतो. तो म्हणजे भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा "विजयंता" . १९६६ मध्ये नगरला झालेल्या समारंभात "विजयंता" लष्करात दाखल झाला. भारत पाकिस्तान युध्दात मोलाची कामगिरी करणार्‍या या रणगाड्याच उत्पादन १९८३ पर्यंत चालु होते. एकुण २२०० विजयंता रणगाडे लष्करात दाखल झाले होते. २००४ साली नगर येथील फ़ायर रेंजवर या रणगाड्याला निरोप देण्यात आला होता. ब्रिटीशांनी दुसर्‍या महायुध्दात बनवलेला  विमान विरोधी तोफ़ा असणारा "मटिल्डा" रणगाडा आणि त्याचीच सुधारीत आवृत्ती असलेले चर्चिल रणगाडे इथे पाहायला मिळतात. 


१९७१ च्या लढाईत पाकीस्तान कडुन हस्तगत केलेला झेंडा.
Bulldog tank captured in India -Pakistan war

पाकीस्तान कडून जिंकलेले "चॅफ़ी" रणगाडे
दुसर्‍या जागतिक महायुध्दा नंतर १९६५ साली झालेल्या भारत पाकीस्तान युध्दात रणगाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. या रणगाडा युध्दात पाकीस्तानी सैन्याच पारड जड होत. त्यांच्या कडे अमेरीकन बनावटीचे पॅटन, चॅफ़ी, शेरमन असे अत्याधुनिक रणगाडे होते. भारतीय रणगाड्यांपेक्षा त्यांची संख्याही जास्त होती. परंतू सियालकोट सेक्टर आणि चिविंडा - खेमखेरा , पंजाब येथे झालेल्या लढाईत भारतीयांनी पाकिस्तानी रणगाड्यांना धुळ चारली. या युध्दात भारताने पाकीस्तानचे ४७१ तणगाडे नष्ट केले आणि ३८ रणगाडे ताब्यात घेतले. त्यातील शेरमन, M-24 चेफ़, वॉटर बुलडॉग आणि M-47 पॅटन रणगाडे या ठिकाणी पाहायला मिळतात. युध्दात जिंकलेल्या रणगाड्यांच्या तोफ़ा खालच्या बाजूला वळवलेल्या असतात , त्याप्रमाणे या रणगाड्यांच्या तोफ़ाही खाली वळवून ठेवलेल्या आहेत. या लढाईत "पॅटन किलर" किंवा "बहादुर" म्हणुन नावारुपाला आलेला ब्रिटीश बनावटीचा "सेंच्युरीयन" रणगाडा इथे पाहायला मिळतो. विमानातून नेता येण्यासाठी आकाराने छोटा आणि वजनाने हलका असा रशियन बनावटीचा PT-76 आणि फ्रेंच बनावटीचा  AMX-13  हे छोटे रणगाडे येथे पाहायला मिळतात. १९६५ च्या लढाईत वापरलेला AMX-13 हा भारतीय सैन्यात "जम्पिंग टॅंक किंवा बख्तावर" या नावाने ओळखला जातो. या १९४८ साली झालेल्या पहिल्या भारत पाकीस्तान युध्दात १२००० फ़ुटावरील झोजिला खिंडीत भारतीय सैन्याने चढवलेला "स्टुअर्ट " रणगाडा प्रदर्शनात ठेवलेला आहे.

"जम्पिंग टॅंक किंवा बख्तावर"
     याशिवाय अनेक रणगाडे काही विशिष्ट कामासाठी बनवण्यात आले होते, ते ही इथे पाहायला मिळतात. "शेरमन बीच आर्मर्ड रेकव्हरी व्हेईकल आणि सी लायन" हे दोन रणगाडे बीचवर वाळूत आणि पाण्यात चालवण्यासाठी बनवण्यात आले होते. नॉर्मेडीच्या लढाईत त्यांचा चांगला उपयोग झाला. "सेंटॉर डोझर" हा रस्ते बनवणारा रणगाडा, "चर्चिल ब्रीज", "व्हॅलेंटाईन ब्रीज" ,"शेरमन ब्रीज" हे पूल तयार करणारे रणगाडे ही इथे पाहायला मिळतात. रणगाड्याचा सर्वात नाजूक भाग म्हणजे त्याच्या चाकावरील पट्टा. त्याला लक्ष करण्यासाठी भूसुरूंग पेरले जातात. या भूसुरूंगाना नष्ट करणारा "शेरमन क्रॅब" हा काहीसा विचित्र दिसणारा रणगाडाही येथे पाहायला मिळतो. "हा-गो", "चि-हा" अशी विचित्र नाव असलेले जपानी बनावटीचे रणगाडे. रशियन बनावटीचा "T4" इत्यादी रणगाडे पाहायला मिळतात.

भू सुरूंगाना नष्ट करणारा "शेरमन क्रॅब" Sherman Crab Tank

Centaur Dozer Tank

 या म्युझियम मधे ३ हॉल बांधलेले आहेत. पहिल्या मेमरी हॉल मधे "इंडीयन आर्मीच्या आर्मर्ड कॉर्पचा " १९७१ पूर्वीचा इतिहास आणि दुसर्‍या मेमरी हॉल मधे १९७१ नंतरचा इतिहास फ़ोटो, दस्त ऎवज, पदक, मॉडेल्स, युध्दाच्या व्युहाचे नकाशे यांच्या व्दारे मांडलेला आहे. याशिवाय प्रत्येक रेजिमेंटची घोषवाक्य, झेंडे, चिन्ह आणि आजपर्यंत त्यांना मिळालेल्या पदकांची यादी येथे लावण्यात आलेली आहे. या मेमरी हॉलच आकर्षण म्हणजे १९७१ च्या लढाईत पाकीस्तान कडुन हस्तगत केलेला झेंडा. तिसरा हॉल म्हणजे "हिरोज गॅलेरी" आर्मर्ड कॉर्पमध्ये शौर्य गाजवलेल्या, शहीद जवानांची माहिती आणि फ़ोटो असलेला हॉल आहे.

रणगाडा म्युझियमचा परीसर गर्द वनराईने नटलेला आहे. जागोजागी फ़ुलझाड, कारंजे, लॉन्स ठेऊन परीसर रमणीय बनवलेला आहे. जगोजागी बसण्यासाठी बाक ठेवलेले आहेत. म्युझियम मधे कॅफ़ेटेरीयाची सोय आहे. म्युझियमचे आकर्षण असणारे रणगाडे सुस्थितीत ठेवलेले आहेत. त्यांच्या बाजूला माहिती फ़लक लावलेले आहेत. लष्कराच्या ताब्यात असूनही छायचित्रणास बंदी नाहीये. वर्षभर ९.०० ते ५.०० यावेळात, नाममात्र शुल्कात हे म्युझियम पाहाता येते. तरीही आशियातील या एकमेव रणगाडा म्युझियमला भेट देणार्‍यांची संख्या तशी कमीच आहे. रणगाड्याच आकर्षण लहान थोरांना सर्वांनाच असत. एखादा दिवस थोडीशी वाट वाकडी करुन नगरच्या रणगाडा म्युझियमला भेट द्यायला काहीच हरकत नाही.

"व्हॅलेंटाईन ब्रीज" Valentine Bridge Tank

"चर्चिल ब्रीज" Charchil Bridge Tank




6 comments:

  1. उपयुक्त अशी ऐतहासिक माहिती खुप छान

    ReplyDelete
  2. उपयुक्त ऐतैहासिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
    लेखक : अमित सामंत याना शुभेच्छा!

    ReplyDelete
  3. अप्रतिम

    ReplyDelete
  4. Nice information

    ReplyDelete