Tuesday, March 12, 2024

भोरवाडीचा किल्ला आणि भूवैज्ञानिक चमत्कार (geological wonders)

Lava flow, Bhorwadi Gad

जुलै संपता संपता पावसाने चांगलाच जोर पकडला होता. त्यामुळे भटकंतीसाठी बाहेर पडणे अपरिहार्य हो्ते. यावेळी नगर जिल्ह्यातील भोरवाडी गड आणि त्याच्या जवळची दोन "जिओलॉजीकल वंडर्स" बघायचे ठरवले होते. साधारणपणे ६५ दशलक्ष वर्षापूर्वी भारतीय उपखंड दक्षिणेला अंटार्टिका आणि इक्वेडोरच्या जवळ होता. त्याच्या उत्तरेकडे सरकण्यामुळे ज्वालामुखीचे स्फ़ोट होत राहीले आणि त्यातून हजारो वर्षे लाव्हा रस वाहत राहीला. त्यापासून बेसॉल्ट (Basalt) खडकापासून बनलेल्या दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली. अशाप्रकारे तयार झालेल्या दख्खनच्या पठारात अनेक "जिओलॉजीकल वंडर्स" पाहायला मिळतात.


माळशेज घाटात देमार पाऊस होता. धुकं, धबधबे यामधून वाट काढत पुढे निघालो, भोरवाडीला जाण्यासाठी कल्याण - नगर रस्ता सोडला आणि उजवीकडे वळलो तर एकदम वेगळ्याच विश्वात आल्यासारखं वाटायला लागलं. या भागात नुसता रखरखाट होता. ओहोळ सुकलेले होते, त्यात साधं पाण्याचं डबकंही दिसत नव्हत. पाऊसा अभावी पिकं सुकून गेलेली, पिकात शेतकर्‍यांनी चरायला गुर सोडली होती. हे दृश्य पाहात पाहात म्हसोबा झाप गावातील भोरवाडीला पोहोचलो. भोरवाडीच्या मागे असलेल्या डोंगरावर छोटासा किल्ला आहे. किल्ल्यावर माऊलाई देवीचे ठाणं आहे. दरवर्षी नागपंचमीला येथे देवीची यात्रा असते. भोरवाडीतून किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने किल्ल्याचा डोंगर व त्यालगत असलेला छोटा डोंगर यांच्या मधील खिंडीतून ५ मिनिटांची चढाई केल्यावर आपण दोन डोंगरांमधील खिंडीत पोहोचतो. खिंडीतून डाव्या बाजूच्या डोंगरावर थोडी चढाई केल्यावर कातळात खोदलेल्या लांब रुंद पायर्‍या दिसतात. कातळातील पायर्‍या चढून वर गेल्यावर गडमाथ्यावर जाण्यासाठी मातीत खोदलेल्या पायर्‍या दिसतात. गडमाथावर मोठे मोठे खडक आहेत. गड माथ्याच्या एका टोकाला माऊलाई देवीचे ठाणं आहे. किल्ल्याच्या डोंगरावर चकचकीत दगड (Quartz) सापडतात. त्यापैकी काही दगड येथे पुजण्यासाठी ठेवलेले आहेत. किल्ल्यावर कातळात खोदलेली तीन पाण्याची टाकी आहेत,  किल्ल्याच्या चारही बाजूला लांबलचक पसरलेले पठार असल्याने दूरवरचा प्रदेश दिसतो. किल्ल्याचे स्थान आणि त्याचा आकार पाहाता या किल्ल्याची निर्मिती टेहाळणीसाठी केलेली होती. 


 
किल्ल्यावरुन हे पठार पाहातांना हे सर्व आधी कुठेतरी पाहिल्या सारख वाटत होते. अचानक, आमच्या जिओलॉजीच्या लेक्चर मध्ये सरांनी "लाव्हा नदीचा (Lava river/Lava flow) " दाखवलेला फ़ोटो आठवला. आम्ही उभे होतो त्या ठिकाणाहून आजूबाजूचा प्रदेश तसाच दिसत होता. खिंडीच्या बाजूला असलेल्या डोंगरावरुन लाव्हा नदीचा प्रवाह खाली उतरत गेलेला दिसत होता. खात्री करण्यासाठी सरांना फ़ोन केला. त्यांना म्हसोबा झाप हे गावाचे नाव सांगितल्यावर त्यांनी तिथे लाव्हा नदीचा काही भाग आहे आणि त्याचा शोध डॉ. सुधा वडाडी यांनी लावला होता असे सांगितले. आजही आईस लॅंड आणि हवाई बेटावर असलेल्या जागृत ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या तप्त लाव्हा रसाची नदी वाहाताना पाहायला मिळते. ती पाहाण्यासाठी " लाव्हा रिव्हर टुरीझम" पण तिथे उदयाला आलेले आहे.

Lava flow, Iceland

 
ज्वालामुखीचे मुख्य दोन प्रकार असतात. १) विस्फ़ोटक आणि २) अस्फ़ोटक. स्फोटक उद्रेकामध्ये ज्वालामुखीचा स्फोट होतो आणि अस्फोटक उद्रेकामधून लाव्हा वाहत राहतो. याचे कारण म्हणजे स्फोटक उद्रेकामधील लाव्हा रसाचे तापमान सुमारे ६००० सेल्सियस ते ८००० सेल्सियस असते, त्यामुळे लाव्हा खूप दाट असतो व वाहू शकत नाही. अस्फोटक उद्रेकामध्ये हे तापमान सुमारे १,१००० सेल्सियस ते १,२५०० सेल्सियस असते. त्यामुळे हा लाव्हा प्रवाही असतो. हा लाव्हा रस वाहायला लागल्यावर हवेच्या संपर्कात येतो आणि त्याचा पृष्ठभाग थंड होऊन लाव्हाची नळी (Lava Tube) तयार होते. त्याच्या आतून लाव्हाचा प्रवाह दूरवर पसरत जातो. पृष्ठभागावर पसरणाऱ्या लाव्हाचा "बेसॉल्ट खडक" तयार होतो. 

Lava river/flow , Mhasoba Zap


एकेकाळी भोरवाडीच्या अस्फ़ोटक ज्वालामुखीचा लाव्हा रस असाच लाव्हाच्या नळीतून वाहात दूरवर गेला होता. इतक्या वर्षाचा काळ लोटल्यामुळे झीज आणि विदारण झाल्यमुळे लाव्हाची नळी आज नष्ट झालेली असली तरी लाव्हाच्या नदीचे अवशेष आजही येथे पाहायला मिळतात. टेकडीच्या बाजूने जाणारा लाव्हा फ़्लो पाहात थोडे अंतर खाली उतरलो. एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे वळण घेत तो खाली उतरत होता. त्या प्रवाहा बरोबर वाहून आलेले आणि त्यात अडकलेले मोठे लालसर रंगाचे दगड दिसत होते. आमच्या मुळ प्लान मध्ये ही लाव्हाची नदी नसल्यामुळे वेळेच्या अभावी जास्त अंतर जाता आले नाही. 

Lava Flow , Mhasoba Zap

घरी आल्यावर सॅटेलाईट इमेज वरुन लाव्हा नदीचा प्रवाह व्यवस्थित पाहाता आला. साधारणपणे प्रवाहाची रुंदी ३० ते ५० मीटर असून लांबी ८ किलोमीटर आहे. म्हसोबा झाप परिसर हा दुष्काळी भाग असल्याने या भागात फ़ारशी शेती आणि वस्ती नाही आहे. त्यामुळे या भागतील लाव्हा नदीचे अवशेष आजही पाहायला मिळतात. 


आमचे पुढचे ठिकाण होत बोरी गाव . कुकडी नदीच्या तीरावर वसलेल्या बोरी गावात, इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर ७५,००० वर्षांपूर्वी जागृत झालेल्या "टोबा" ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख (tephra Ash) पाहायला मिळते . बोरी आणि टोबा मधले अंतर अंदाजे ३००० किलोमीटर आहे. जगात हाताच्या बोटांवर मोजता येण्या इतके महाज्वालामुखीचे उद्रेक झालेले आहेत. महाज्वालामुखींचा उद्रेक साधारणतः लक्षावधी वर्षांतून एकदा होतो. इतिहासातील शेवटचा मोठा महाज्वालामुखी उद्रेक हा टोबा (Toba), इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर सुमारे ७५,००० वर्षांपूर्वी झाला होता . त्याला Young Toba Tuff (YTT) म्हणतात. त्यापूर्वी ८ लाख वर्षापूर्वी टोबा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता . त्याला Oldest Toba Tuff(OTT) म्हणतात. या महाउद्रेकाचा जोर इतका प्रचंड होता, की अख्खा टोबा पर्वतच कोसळून तेथे प्रचंड मोठे विवर तयार झाले. कालांतराने त्यात पाणी भरून तळे तयार झाले. हेच आता "लेक टोबा" या नावाने ओळखले जाते. टोबा कॅटेस्ट्रॉफी थिअरी (Toba Catastrophe Theory) नुसार या उद्रेकामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडली, की उद्रेकानंतर ६ ते १० वर्षे सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे हिमयुग आले. त्याचा परिणाम पुढील शेकडो वर्षे राहिला. अशा प्रकारच्या हिमयुगाला ज्वालामुखीय हिमयुग (Volcanic Ice Age) म्हणतात. टोबा ज्वालामुखीच्या उद्रेका नंतर त्याची राख आशिया, अफ्रिका आणि युरोप मध्ये पसरली. आपल्या महाराष्ट्रात ही राख आजही दोन ठिकाणी पाहाता येते. १) अहमदनगर जिल्ह्यातील "बोरी" या गावी कुकडी नदीच्या तीरावर आणि २) पुणे जिल्ह्यात अष्टविनायका पैकी "मोरगाव" जवळ कर्‍हा नदीच्या तीरावर पाहायला मिळते. या दोन्ही ठिकाणी एकाच ज्वालामुखीची राख असली तरी ती वेगवेगळ्या स्वरुपात पाहायला मिळते. 

Tefra Ash, Bori

बोरी गावातून कुकडी नदीवरील पूल पार केल्याबर नदीच्या कडेने एक छोटा रस्ता जात होता. रस्त्याच्या एका बाजूला ऊसाची शेती आणि दुसर्‍या बाजूला नदीच पात्र दिसत होते. एका शेतकर्‍याच्या घरा जवळून पाऊल वाटेने नदी काठचा उतार उतरून, नदी पात्रा लगत २ ते ३ मिनिटे चालल्यावर "टेफ्रा ॲशचे" (Tephra Ash) पिवळ्या मातकट रंगाचे चूनखडीच्या दगडासारखे काही पट्टे पाहायला मिळतात. टोबा ज्वालामुखीची राखेचे पट्टे नदीपात्रापासून पाच ते दहा मीटर आत आहेत. याठिकाणी साधारणपणे २० सेंटीमीटर ते ३ मीटर जाडीचे राखेचे थर विखुरलेले आहेत. ही राख चुन्याच्या दगडा सारखी घट्ट झालेली असून, तीचा रंग मातकट पिवळा झालेला आहे. नदी पात्रातल्या वाळूतील घटकांशी वर्षानुवर्ष  रासायनिक प्रतिक्रिया (Chemical reaction) झाल्यामुळे टोबा ज्वालामुखीची राख इथे मुळ स्वरुपात आढळत नाही.  

या ठिकाणी एक निळ्या रंगाचा फ़लक लावून त्यावर राखे संबंधी थोडीशी माहिती लिहिलेली आहे. नदी काठ असल्याने या ठिकाणी भरपूर झाडं झूडपं उगवलेली आहेत. त्यातच राखेचे अवशेष आहेत.  कुकडी नदीच्या काठावर ही राख पूर्वी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होती, पण वाळू उपस्यामुळे ही राख मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली. इसवीसन २०१६ मध्ये हायकोर्टाने वाळू उपश्यावर बंदी आणल्यावर बोरी गावातल्या लोकांनी उरल्या सुरल्या राखेच्या पट्ट्याचे संरक्षण आणि जतन करायला सुरुवात केली आहे. गावातील जून्या पिढीला या राखेचे महत्व माहिती नव्हते, पण आता गावतील लहान मुलांनाही याबद्दल माहिती आहे.  इथे येणार्‍या पर्यटकांची नोंद याठिकाणी एका वहीत केली जाते. ती पाहिले असता सुट्टीच्या दिवसात अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देतात , पण जिओ टुरीझमच्या (Geo Tourism) दॄष्टीने या परिसराचा काहीच विकास ग्रामपंचायतीने किंवा स्थानिक लोकांनी केलेला दिसत नाही.

Tefra Ash, Bori

बोरी गावात उत्खनन करतांना राखेच्या थराच्या वर Early Acheulian युगातली हत्यारं मिळाली होती. टोबा ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेचे वय माहिती असल्याने पुरातत्वशास्त्रात उत्खननात मिळालेल्या वस्तूंचे वय ठरवतांना ती वस्तू राखेच्या थराच्यावर की खाली थराच्या खाली मिळाली यावरुन निश्चित करता येते.

 
Tefra Ash, Morgaon


दोन वर्षापूर्वी आमच्या जिओलॉजीच्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासदौर्‍या दरम्यान श्री बोरकर सर आणि श्री अभिजीत घोरपडे सर यांच्या बरोबर मोरगाव येथील "टोबा" ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख पाहाण्याची संधी मिळाली  मोरगाव येथे कर्‍हा नदीच्या तीरावर (18° 27′ 82″N, 74° 32′ 39 E) असलेली टोबा ज्वालामुखीची राख, मातीच्या दोन थरांमध्ये पसरलेली पाहायला मिळते. राखेच्या या थराची कमाल उंची २० सेंटीमीटर पर्यंत आहे. या ठिकाणी टोबा ज्वालामुखीची राख मातीच्या दोन थरांमध्ये कशी राहिली असावी ? असा प्रश्न पडतो. यासाठी एक सिध्दांत (Theory) मांडला जातो की,  "ज्वालामुखीची राखेचा थर नदीच्या किनारी पसरलेला होता . त्याकाळात नदीला पूर येऊन गाळाचा थर त्यावर पसरला असावा." त्यामुळे ही राख मातीच्या दोन थरांमध्ये अडकून राहीली आणि आजही आपल्याला ती पाहायला मिळते. पांढर्‍या शुभ्र रंगाचा थर दोन मातीच्या थरांमध्ये पसरलेला दिसतो. ही राख हाताळली तर भुसभुशीत लागते.  

Tefra ash layer between sand layers


ज्वालामुखीतून राख बाहेर फ़ेकली जाण्यासाठी पुढील पैकी तीन गोष्टी घडाव्या लागतात.  १) मॅग्मावरील दाब कमी होऊन त्यात वायूचे बुड्बुडे तयार होण्याच प्रामण वाढत जाते. (magmatic), २) तप्त मॅग्मा आणि भूगर्भातील पाणी यांचा संपर्क येऊन स्फोटक मिश्रण तयार झाल्यास (hydrovolcanic) ३) ज्वालामुखीतील वाफेच्या दाबामुळे खडकांचे विखण्डन झाल्याने  (phreatic). या तिन्ही गोष्टी ज्वालामुखीतून बाहेर पडणार्‍या राखेतील घटक निश्चित करतात. या राखेतील मुख्य घटक असतो ज्वालामुखी जन्य काच . या काचेच्या गुणधर्मावरुन ती राख कुठल्या ज्वालामुखीची आहे हे ओळखता येते. बोरी व मोरगाव येथे सापडलेल्या राखेचा अभ्यास करुन त्याची तुलना इंडोनिशिया व  जगाच्या इतर भागात सापडलेल्या टोबा ज्वालामुखीच्या राखेशी केल्यावर ती राख ७५००० वर्षापूर्वी विस्फ़ोट झालेल्या ज्वालामुखीची आहे हे सिध्द झाले.

Natural Stone Bridge, Gulanchwadi


आमच आजच्या दिवसाचे शेवटचे ठिकाण गुळंचवाडीचा नैसर्गिक दगडी पूल होता. कल्याण- नगर रस्त्यावर असलेल्या अणे घाटाच्या खालच्या बाजूला गुळंचवाडी नावाचे गाव आहे. या गावातील ओढ्यावर बेसॉल्ट  खडकात बनलेला नैसर्गिक दगडी पूल आहे. आणे घाटातून नगरकडे जातांना डाव्या बाजूला मळगंगा देवस्थान लिहिलेली कमान दिसते. त्या कमानीतून १० मिनिटे उतरल्यावर आपण मळगंगा देवीच्या मंदिरापाशी पोहोचतो. याच ठिकाणी नैसर्गिक दगडी पूल आहे. या ठिकाणी असलेल्या बेसॉल्ट खडकात असलेल्या भेगांमधून वर्षानूवर्ष वाहाणा‍र्‍या पाण्यामुळे दगडाची झीज होऊन मोठे छिद्र तयार झाले. त्यात भेगांमधून निखळलेले दगड पडून कमानीचा आकार मोठा झाला. सध्या इथे असलेली दगडी पुलाची कमान १० ते १३ फ़ूट रुंद आणि २ ते ७ फूट उंच आहे. या कमानीतून वाहाणार्‍या ओढ्यामुळे या पुलाची झीज होणे अजुन चालूच आहे. 


Natural Stone Bridge, Gulanchwadi


भोरवाडीचा किल्ला आणि लाव्हाची नदी, बोरी गावातील ज्वालामुखीची राख आणि गुळंचवाडीच्या नैसर्गिक दगडी पूल ही ठिकाण एकमेकांपासून जवळ ( एकुण अंतर ३५ किलोमीटर) आहेत. त्यामुळे मुंबई पुण्याहून एका दिवसात आरामात पाहाता येतात.

जाण्यासाठी :- १) कल्याण - नगर आणि पुणे - नाशिक रस्त्यावरील आळेफ़ाट्या पासून १८ किलोमीटर अंतरावर अणेघाट आहे. अणे घाटातून पायवाटेने  गुळंचवाडीच्या नैसर्गिक दगडी पूलाकडे जाता येते.  
२) कल्याण - नगर आणि पुणे - नाशिक रस्त्यावरील आळेफ़ाट्यापासून ५१ किलोमीटर अंतरावर भोरवाडीचा किल्ला (म्हसोबा झाप) आहे.
३) कल्याण - नगर आणि पुणे - नाशिक रस्त्यावरील आळेफ़ाट्यापासून १२ किलोमीटर अंतरावर बोरी गावातील टेफ्रा ॲशचे पट्टे आहेत. 

Photos by :- Amit Samant,  © Copy right

Map :- Mahendra Govekar

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5 

Ref :-

1.Geochemical variability in distal and proximal glassfrom the Youngest Toba Tuff eruptionE. Gatti &I. M. Villa &H. Achyuthan &P. L. Gibbard &C. Oppenheimer

2. Morphology of the Volcanic Ash from the OCukadi River Section, Pune District, Maharashtra N.R. KARMALKAR*, S.N. GHATE, SHIELLA MrsHRA AND S.N. RAIAGURU * Department of Geology, University of Pune,  Pune-411  007. Deccan College,  Pune-411  006.

3. AGE OF THE BORI  VOLCANIC  ASH AND LOWER  PALAEOLITHIC CULTURE  OF THE  KUKDI  VALLEY,  MAHARASHTRA Korisettar R., Mishra Sheila, Rajaguru S. N., Gogte V. D., Ganjoo R. K., Venkatesan T. R., Tandon S. K., Somayajulu B.L.K., and Kale V. S.


या विषया संदर्भातले इतर ब्लॉगज :-


१) केनियातील निद्रिस्त ज्वालामुखी आणि लाव्हा टनलला भेट देऊन लिहिलेला लेख "offbeat Kenya, Suswa Mountain , निद्रिस्त )ज्वालामुखीच्या विवरात, सुस्वा माउंटन , केनिया" वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा 
 

२) महाराष्ट्रातील लाव्हा टनलला भेट देऊन लिहिलेला लेख, "निसर्गाचा अविष्कार चेमेदेव डोंगर आणि बितनगड Offbeat trek to Chemdev & Bitangad" वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा  


३) भोरवाडी गडाच्या आजूबाजूची इतर ऑफ़बिट ठिकाण :- "टाकळी ढोकेश्वरची लेणी, पळशीचा किल्ला आणि विठठल मंदिर, जामगावचा किल्ला आणि पारनेरचे सोमेश्वर मंदिर (Takali Dhokeshwar, Palashi Fort , Jamgaon Fort  & Someshwar Temple , Parner, Dist. Ahmednagar)" हा लेख वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा  

https://samantfort.blogspot.com/2017/11/kandhar-fort-siddheshwar-mandir-hottal.html




Sunday, June 11, 2023

इटर्नल फ़्लेम (Eternal Flame) ट्रेक

 

Eternal Flame

अमेरीकेतल्या सुप्रसिध्द नायगारा फ़ॉल पासून ३७ किलोमीटर अंतरावर चेस्टनट रिज्ड पार्क (Chestnut Ridge Park) आहे.  नायगरा एकदा पाहुन झाला होता त्यामुळे यावेळी वेगळ काहीतरी बघुया म्हणून शोधाशोध करतांना "इटर्नल फ़्लेम" ची माहिती मिळाली.  हा तसा छोटा अप्रसिध्द ट्रेक आहे. अमेरीकेत प्रत्येक राज्यात अनेक स्टेट पार्क (राखीव जंगल) आहेत आणि त्या राखीव जंगलांमध्ये अनेक आखीव रेखीव ट्रेल्स असतात. जागोजागी लावलेले दिशादर्शक फलक, धोक्याच्या सूचना , जिथे पायवाट धोकादायक असेल तिथे लावलेले संरक्षक कठडे, लाकडाच्या ओंडक्यांच्या पायर्‍या हे सगळ पाहिल की आपल्या सारख्या सह्याद्रीत फिरणार्‍यांना "पाणीकम" वाटत राहात. पण   "इटर्नल फ़्लेम"  चा ट्रेक चक्क याला अपवाद होता.

 


नुकतेच वसंत ऋतूचे आगमन झालेले असल्यामुळे, वेगवेगळ्या रंगाच्या फ़ुलांनी झाड गच्च भरलेली होती. ट्रेकच्या सुरवतीच्या टप्प्यात या झाडांनी स्वागत केल. झाडांवर पान अपवादानेच दिसत होती. अर्थात ही झाड खास इथे आणून लावलेली असावीत अस जंगलात शिरल्यावर लक्षात आले. जंगलात पाईन आणि ओकचे उंचच उंच वॄक्ष होते. त्याच्या दाट सावलीतून वाट जात होती. साधारणपणे १० मिनिटे चालल्यावर पायवाट तीव्र उतारावरुन खाली उतरायला लागली . वॄक्षांची आडव्या  पसरलेल्या एकामेकांत गुंतलेल्या मुळांमुळे काही ठिकाणी पायर्‍यांसारखी रचना तयार झाली होती. या नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या पायर्‍यांवरुन मुळांचा आधार घेत उतरल्यावर आम्ही एका ओढ्याच्या काठाने जाणार्‍या चिंचोळ्या पायवाटेवर पोहोचलो. 



दोन्ही बाजूला झाडी भरलेले डोंगर होते. या ओढ्याच्या प्रवाहाने दोन डोंगरांमधील दरी वर्षानुवर्ष खोदून काढलेली होती. आजही ती प्रक्रीया अतिशय संथ गतीने चालूच आहे. हिवाळ्यात दगडा मधील भेगांमधल्या पाण्याचे बर्फ झाल्याने ते प्रसरण पावते . त्यामुळे भेगा रुंद होऊन दगड फूटून खाली पडतात. उन्हाळ्यात बर्फ वितळून वाहाणार्‍या प्रवाहामुळे किनार्‍याची झीज होऊन ओढ्याचे पात्र रुंद आणि खोल होत जाते.  

 


ओढ्याच्या काठाने जाणार्‍या वळणा वळणाच्या सुंदर वाटेने जातांना आजूबाजूच्या झाडीत पक्ष्यांचा किलीबिलाट ऐकायला येत होता. अचानक एका झाडावरुन सुंदर निळा पक्षी उडाला आणि ओढ्या पलिकडच्या झाडावर जाऊन बसला. त्याची (Blue jay) सुंदर छायाचित्र मिळाली. त्यामुळे चाल मंदावली , आजूबाजूच्या झाडीत आवाजांचा वेध घेत पक्षी शोधायला सुरुवात केली. काही पक्षांची छायाचित्र मिळाली तर काहींच फक्त निरिक्षण करण्यातच आनंद मानावा लागला.


Blue Jay

 

Sparrow

Red winged black bird 


Eastern Blue Bird

पक्षी निरिक्षण करतांना पुढच्या पायवाटेवर लक्ष नव्हत , समोर आडव्या पडलेल्या वृक्षाच्या आड अचानक पायवाट लुप्त झाली . त्यामुळे ओढ्याच्या पात्रात उतरण्या शिवाय पर्याय राहीला नव्हता. ओढ्यातून नितळ पाणी वाहात होत. ओढ्याचा पृष्ठभाग छिन्नीनी तासल्यासारखा सपाट होता, हेही आता लक्षात आले. हिमयुगात बर्फाच्या लाद्यांच्या सरकण्यामुळे दगड अशाप्रकारे छिन्नीनी तासल्यासारखे सपाट होतात , तोच प्रकार इथे पाहायला मिळाला. ओढ्यातून चालतांना अनेक ठिकाणी झाडे पडलेली होती. त्यातून मार्ग काढत तर कधी बाजूच्या उतारावर चढून वळसा घालून पुढे जावे लागत होते. हे अमेरीकन लोकांच्या "सेफ़्टी"च्या कल्पनेच्या पलिकडचे होते. खरतर ही झाड बाजूला करुन मार्ग निर्धोक करेपर्यंत त्यांनी हा ट्रेक बंद कसा ठेवला नाही, याच आश्चर्य वाटल.

 


ओढ्याने एक छोट वळण घेतल, समोर साधारणपणे ७० फ़ुटावरुन ३ टप्प्यात पडणारा धबधबा दिसत होता, त्या धबधब्याच्या पाण्याच्या धारांमागे असलेल्या छोट्याश्या गुहेत पेटलेल्या ३ ज्योती दिसत होत्या , अतिशय सुंदर नजरबंदी करणार दृश्य होत . धबधब्याच्या सर्वात खालच्या टप्प्यात उजव्या कोपर्‍यात जमिनी पासून ६ फूट उंचीवर एक ३ फ़ूट लांब X २ फ़ूट रुंद  आणि १.५ फ़ूट उंच गुहा आहे.

Eternal Flame Water fall


 या गुहेत नैसर्गिक वायूमुळे पेटलेल्या तीन ज्योती आहेत. आजूबाजूला वाहाणारे पाणी गुहेत झिरपत असतांनाही या ज्य़ोती तेवत होत्या .आम्ही गेलो होतो तेंव्हा धबधब्याला पाणी कमी होते , पण धबधबा ऐन भरात वाहात असतांना किंवा हिवाळ्यात गोठला असतांनाही या ज्योती तेवत असतात.

 

Eternal flame water fall

नैसर्गिक वायूचे स्त्रोत कसे तयार होतात ? याबद्दल जिओलॉजीच्या अभ्यासक्रमात शिकलो होतो,

वारा, पाऊस, उष्णता इत्यादिंचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खडकांवर परिणाम होऊन त्याची झीज होते. हा झीज झालेला भाग पाण्या बरोबर वाहून जातो आणि ज्या ठिकाणी पाणी खोल आणि संथ असते अशा ठिकाणी हा गाळ साचतो. त्याबरोबरच पाण्याबरोबर वाहून आलेले जैविक घटकही इथे साचत जातात.  हा गाळ कालांतराने कठीण होतो आणि गाळाचे खडक (Sedimentary Rock) तयार होतात. सरोवर, नदीचं पात्र , नद्यांनी निर्माण केलेला त्रिभूज प्रदेश , समुद्र तळ इत्यादी ठिकाणी हे गाळाचे दगड तयार होतात. याठिकाणी खनीज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याचे आपण वाचलेले असते.

 


इटर्नल फ़्लेमचा (Eternal Flame) व्हिडीओ पाहाण्यासाठी प्ले बटणावर टिचकी मारा


पृथ्वीच्या पोटात होणार्‍या उलथापालथीमुळे हे गाळाचे दगड जमिनीत खोलवर दाबले जातात. या दगडावर पडणार्‍या दाब आणि उष्णतेमुळे जैविक घटकांचे रुपांतर खनिज तेलात आणि नैसर्गिक वायूत होते. भूगर्भात होणार्‍या हालचालींमुळे दगडांमध्ये पडलेल्या भेगांमधून नैसर्गिक वायू जमिनीवर येतो. बर्‍याचदा वीज पडल्यामुळे हा वायू पेट घेतो आणि जमिनीवर ज्योती पेटलेल्या दिसतात. जगभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे भूगर्भातून बाहेर पडणार्‍या नैसर्गिक वायुमुळे पेटलेल्या ज्योती पाहायला मिळतात. भारतातील हिमाचल प्रदेशात असलेल्या प्रसिध्द ज्वालाजी मंदिरातही अशाच प्रकारे जमिनीतून बाहेर येणारा नैसर्गिक वायू पेटल्यामुळे तयार झालेल्या ज्योती दिसतात.

 


इटर्नल फ़्लेमचा अभ्यास  Indiana University Bloomington आणि Italy's National Institute of Geophysics and Volcanology या दोन संस्थांच्या जिओलॉजिस्टनी २०१३ साली केला . त्यांना असे आढळुन आले की इटर्नल फ़्लेम  मध्ये  पाझरणार्‍या वायूत ईथेन (ethane) आणि प्रोफ़ेन (propane) वायूचे प्रमाण 35% आहे. हे प्रमाण जगातील इतर ज्ञात नैसर्गिक वायूच्या स्त्रोतां पेक्षा जास्त आहे. इतर ठिकाणी मिथेन वायू मोठ्या प्रमाणात आढळून येतो. 

 संशोधकांना या परिसरात असे अनेक छोटे छोटे नैसर्गिक वायूचे पाझर ('micro seeps') आढळून आले. या नैसर्गिक वायूचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले हा वायू जवळच असलेल्या Rhinestreet Shale मध्ये तयार झालेला आहे  अंदाजे ४०० मिटर्स (१३००फ़ूट ) खोल असलेल्या या नैसर्गिक वायूच्या साठ्यातील वायू भूगर्भातील हालचालींमुळे (Tectonic activity) तयार झालेल्या खडकां मधील  भेगां मधून जमिनीवर आला आहे. नैसर्गिक वायू तयार होण्यासाठी जमिनी खाली स्त्रोताचे (shale) तापमान  १०० °C च्या आसपास असावे लागते. या तापमानात कार्बन विघटन होऊन नैसर्गिक वायूचे रेणू तयार होतात. परंतू  Rhinestreet Shale मधील तापमान १०० °C पेक्षा कमी आहे तसेच इतर नैसर्गिक वायूच्या स्त्रोतांपेक्षा त्याची खोलीही कमी आहे तरीही तिथे नैसर्गिक वायू कसा तयार झाला ? असा प्रश्न संशोधकांना पडला आहे. त्यावर सध्या अभ्यास चालू आहे.

 


आपल्या इथे धबधब्याच्या खालच्या भागात डोह असतो. तो नसला तरी आजूबाजूचे खडक पडून धबधब्या पर्यंत जाण्याचा मार्ग दुष्कर झालेला असतो. पण या ठिकाणी बर्फाच्या लाद्या सरकण्यामुळे गुळगुळीत पॄष्ठभाग तयार झाला आहे. त्यामुळे ज्योती तेवत असलेल्या गुहेपर्यंत सहज जाता आले. गुहेच्या वरुन पाण्याच्या धारा पडत होत्या त्या धारांच्या पडद्या आड ज्योती तेवत होत्या. नैसर्गिक वायू जळल्यावर येणार टिपिकल वास त्या ठिकाणी येत होता. पृथ्वी, आप (पाणी),  तेज (अग्नी) , वायू आणि आकाश  ही पंचमहाभूत या निबिड अरण्यात एकाच वेळी पाहायला मिळत होती. आग आणि पाणी हे विरुध्द गुणधर्म असणारी महाभूत या ठिकाणी एकत्र नांदत होती. 

 


   या भारावलेल्या वातावरणात काही वेळ थांबून आलेल्या मार्गाने परत फ़िरलो. एक वेगळा छान ट्रेक झाला. मी आजवरच्या  भटकंतीत पाहीलेल अजून एक सुंदर ठिकाण म्हणून "इटर्नल फ्लेम" कायम आठवणीत राहील.

 


जाण्यासाठी :- अमेरीकेतल्या सुप्रसिध्द नायगारा फ़ॉल पासून ३७ किलोमीटर आणि बफेलो विमानतळापासून १७ किलोमीटर अंतरावर चेस्टनट रिज्ड पार्क (Chestnut Ridge Park) आहे. या पार्क मध्ये ३ ट्रेक आहेत. त्यातील मध्यम श्रेणीतला हा ट्रेक आहे. जाऊन येऊन साधारणपणे अंतर ३ किलोमीटर आहे. मे महिना ते ऑक्टोबर हा ट्रेक करता येतो. अमेरीकेत अनेक पार्क्स मध्ये जाण्यासाठी फी भरावी लागते. पण या ट्रेकसाठी कुठलीही फी भरावी लागत नाही.    

 


 Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5 


with Pradnyesh Samant



 1) Edison National Historical Park (एडीसन नॅशनल हिस्टॉरीकल पार्क) Offbeat USA हा ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा 


 २) Corning Glass Museum कॉर्निंग ग्लास म्युझियम Offbeat USA हा ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा 

 


 

 

Tuesday, January 31, 2023

९०,००० वर्षापूर्वी आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा, सुसरोंडी, पालशेत, तालुका :- गुहागर ( Acheulian cave at Susrondi, Palshet, Taluka Guhagar)

 

Acheulian cave at Susrondi

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पालशेत नावाचे प्राचीन गाव आहे. पेरिप्लस ऑफ़ दि एरिथ्रियन (Periplus of the Erythraean Sea) या इसवीसनाच्या पहिल्या शतकात एका ग्रीक खलाशाने लिहिलेल्या पुस्तकात कोकण किनारपट्टीतील काही बंदरांचा उल्लेख आहे. त्यात ‘पालमपट्टई’  नावाच्या बंदराचा उल्लेख आहे. हे बंदर म्हणजे आजचे पालशेत असावे असे काही तज्ञांचे मत आहे.  या बंदरातून ग्रीस आणि रोम यांच्याशी व्यापार तिसऱ्या शतका दरम्यान चालत होता. पालशेत गावतील लक्ष्मी नारायण मंदिराजवळ आजही मध्ययुगीन बंदराचे अवशेष पाहायला मिळतात.

आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा, पालशेत

पालशेत गावातील सुसरोंडी  भागात अंदाजे ९०, ००० वर्षापूर्वी आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा सापडलेली आहे. याशिवाय या भागात मांडवकरवाडी (पालशेत), चिंद्रावळे (हेदवी-नरवण) इत्यादी अनेक गुहा विखुरलेल्या आहेत. या गुहांमुळे या भागाला गुहागर ("गुहाचे आगार" या अर्थी ) असे नाव पडले असावे. भारताला लाभलेल्या ७५०० किलोमीटर समुद्र किनाऱ्यापैकी आत्तापर्यंत केवळ गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्या जवळच्या २५ ते ३० किलोमीटरच्या पट्ट्यात आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहा सापडलेल्या आहेत.  भारतात आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहा यापूर्वी डोंगरावर किंवा पठारी भागात सापडलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील गुहांचे महत्व अधोरेखित होते.

डेक्कन कॉलेजचे डॉ. अशोक मराठे यांनी २००१ मध्ये या गुहेमध्ये उत्खनन केले होते. त्यावेळी या गुहा त्यांना ज्यांनी दाखवल्या त्या ओक काकांनी आमच्या बरोबर गुहा दाखवायला यायचं मान्य केलं. ओक काका मुळचे पालशेत गावाचे.  लहानपणापासून त्यांनी पालशेतच्या आजूबाजूचे जंगल तुडवल आहे. आजही ते आपला व्यवसाय सांभळून जंगलातून भटकंती करत असतात. जंगलावर आणि इथल्या ऐतिहासिक गोष्टींवर त्यांचे नितांत प्रेम आहे. आम्हाला केवळ गुहा  दाखवायला आलेले ओक काका आमचे या विषयातील स्वारस्य बघून पालशेत आणि आजूबाजूच्या परिसरातील ऐतिहासिक वाटा, बारव, मंदिर या गोष्टी दाखवत दिवसभर फिरले.

Acheulian cave at Susrondi, Map by Mahendra Govekar

पालशेत गावातून एक रस्ता पोमेंडी गावाकडे जातो. या रस्त्यावर बौद्धवाडी (बारभाई) आहे. या बौद्धवाडीतून  एक प्राचीन वाट सुसरोंडीच्या सड्यावर जाते. चिर्‍यांनी बांधलेल्या चढाईच्या वाटेला कोकणात घाटी म्हणतात. दोन्ही बाजूला चिर्‍यांच्या गडग्यांचे कुंपण केलेल्या आंब्या-काजूच्या बागा होत्या. त्याच्या दाट सावलीतून चढत जाणाऱ्या वाटेने १५ मिनिटात एका फाट्यावर येतो. येथून उजव्या बाजूची वाट दाट जंगलातून जाते. जानेवारी महिना असल्याने या वाटेवर असलेल्या अनेक झाडांचे मोहोर फ़ुलले होते त्याचा गोडूस धुंद सुवास आसमंतात भरुन राहीला. खुरीची पांढरी फ़ुले आणि अंजनाची जांभळी फ़ुले घोसाने फ़ुलली होती. त्यांचा दरवळ वातावरण सुगंधित करत होता.  या वाटेने  १० मिनिटे चढाई केल्यावर आम्ही सुसरोंडीच्या सड्यावर पोहोचलो.  खाली दुरवर दाट झाडीत लपलेली मांडवकरवाडीतली लाल कौलांची घर दिसत होती. त्या वाडीतही आदिमानव कालिन गुहा आहेत.

खुरीची फुलं
अंजन

सुसरोंडीचा  सडा उभा आडवा पसरलेला आहे. सड्यावर  लक्षात ठेवण्यासारखी कुठलीही खूण नाही. लोकांचा वावर नसल्याने मळलेल्या वाटा नाहीत. त्यामुळे गुहा बघायला जायचे असेल तर  गावातून माहीतगार सोबत असणे आवश्यक आहे. आमच्या बरोबर आलेले ओक काका लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच इथे येत होते. त्यामुळे त्यांनाही थोडी शोधाशोध करावी लागली, पण ते येथे अनेकदा येऊन गेल्यामुळे त्यांना दिशेचा अंदाज होता. त्या दिशेने थोडी शोधाशोध केल्यावर वाट सापडली. या वाटने  खाली उतरताना जांभ्या दगडात कोरलेल्या काही  पायाऱ्या लागल्या. पायाऱ्या उतरल्यावर एक ओढा  लागला. हा ओढा पुढे सुंदरी नदीला जाउन मिळतो. ओढा ओलांडून  पलीकडे  जाऊन पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने थोडे चालून गेल्यावर प्रवाह एका कड्यावरून  १५ ते २० फूट खाली उडी मारतो. पावसाळ्यात या ठिकाणी ७ धारा असलेला धबधबा पडतो. पण पावसाळ्यांत पाण्याच्या प्रवाहामुळे या ठिकाणी येणे धोकादायक आहे.

धबधबा आणि उजवीकडे गुहा

धबधब्याच्या कड्यावरून उजव्या बाजूला गुहेच तोंड दिसत होतो. या भागात माणसांचा वावर नसल्यामुळे जंगली प्राणी गुहेत असण्याची शक्यता होती. ओक काकांनी जवळचे धोंडे उचलून गुहेच्या दिशेने  फेकायला सुरुवात केली. आम्हालाही हाकारे घालायला सांगितले. त्यानंतर पाच मिनिटे वाट बघितली. गुहेत एखाद जंगली जनावर असेल तर त्याला बाहेर जाण्याची संधी मिळावी हा त्यामागे हेतू होता. थोडा वेळ थांबूनही गुहे जवळ काही हालचाल जाणवली नाही.  मग आम्ही धबधब्याच्या बाजूने खाली उतरायला सुरुवात केली. याठिकाणीही जांभ्या दगडात  कोरलेल्या पायाऱ्या पाहायला मिळाल्या.  प्रवाह ओलांडून धबधब्या जवळ पोहोचलो. पाण्याच्या प्रवाहामुळे धबधब्याच्या खाली खोल डोह तयार झाला होता. आजूबाजूच्या वृक्षाची मुळे धबधब्याच्या कातळ भिंतीवरून खाली उतरलेली होती. डोहातल्या  गर्द हिरव्या पाण्यात  त्याचं प्रतिबिंब पडलं होत. बालकवींची औदुंबर कविता आठवली.


पाण्यात पाय सोडून बसलेली झाडं 

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन , निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे

पायवाट पांढरी तयातुन अडवीतिडवी पडे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे

झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवर, पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर

इथे पाण्यात पाय सोडून बसलेला औदुंबर नसला तरी बालकवींनी वर्णन केलेले निसर्गदृश्य पाहात पाहातच आम्ही गुहेपर्यंत पोहोचलो होतो.

आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहेचे तोंड 

         

ओक काका इसवीसन २००१ साली डॉ मराठे यांना इथे घेऊन आले तेंव्हा गुहेचे तोंड झाडी झूडूपांनी झाकलेले होते. गुहेत कोणी असेल तर बाहेर यावे यासाठी त्यांनी सोबत आणलेले फटाके गुहेच्या तोंडावर वरून टाकले. त्यांनतर सोबत आलेल्या एका कातकऱ्याला दोर बांधून गुहेच्या तोंडा जवळ उतरवले. त्याने झाडी झुडपे तोडून गुहेत प्रवेश केला. गुहेच्या भिंतींवर, छतावर त्यावेळी पाली आणि कोळ्यांचे राज्य होते. मशाली पेटवून आगीचा धाक दाखवून त्यांना पळवून लावण्यात आले. प्राथमिक शोध घेतांना या गुहेच्या जवळ अश्मयुगीन परशु / फ़रशी (Cleavers) सापडले. त्यामुळे त्यांनी सुसरोंडी येथे उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसात सध्या गुहेजवळ जाण्याचा मार्ग आहे तो बनवला. 

Entrance of Susrondi cave (from inside)

 जांभा दगडात बनलेल्या गुहेच्या तोंडातून आम्ही आत प्रवेश केला. कोकणात सर्वत्र दिसणारा लाल रंगाचा जांभा दगड हा ज्वालामुखीजन्य काळ्या पाषाणापासून म्हणजेच बेसॉल्ट पासून बनलेला आहे. लाखो वर्षे मंदगतीने बेसॉल्ट खडकाची झीज दोन प्रकारे होत असते.  १) भौतिक विच्छेदन (Physical disintegration) आणि २) रासायनिक विघटन (Chemical Decomposition). भौतिक विच्छेदनामुळे खडकाचे तुकडे  होतात  तर रासायनिक विघटनामुळे पाण्यात विरघळणारे आणि पाण्यात न विरघळणारे असे दोन प्रकारचे पदार्थ तयार होतात. पाण्यात विरघळणारे पदार्थ पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातात त्यामुळे दगड जाळीदार होतो आणि न विरघळणारे पदार्थ मागे राहातात. त्यातील लोहाच्या ऑक्साईडमुळे जांभा दगडाला तांबडा रंग येतो. कोकणात दिवस आणि रात्रीच्या तापमानात असलेला फ़रक आणि पावसाचे प्रमाण जास्त असल्याने काळ्या पाषाणाचे भौतिक विच्छेदन  आणि रासायनिक विघटन परिणामकारकरित्या होऊन जांभा दगड तयार झाला आहे.  सुसरोंडीच्या गुहेची निर्मिती अशाच प्रकारे जांभ्या दगडाचे भौतिक विच्छेदन  आणि रासायनिक विघटन होऊन झालेली आहे.

गुहेच तोंड १. मीटर रुंद आणि २.५ मीटर  उंच आहे. गुहेत प्रवेश केल्यावर आतील भाग ५ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद आहे. येथून गुहेत पूर्वेला आणि उत्तरेला जाणाऱ्या दोन वाटा फुटल्या आहेत . या वाटाची उंची जेमतेम २ मीटर आहे. त्यात सध्या वाटवाघुळांचे वास्तव्य असल्याने आत  जाता येत नाही. यातील उत्तरेकडील वाट लांबवर जाते असे स्थानिक लोक सांगतात. गुहेत आदिमानवाच्या अस्तित्वाच्या खुणा शोधाण्यासाठी डॉ मराठे यांनी गुहेच्या तोंडाजवळ ३ मीटर लांब    मीटर रुंद आणि ४.२ मीटर  खोल खड्डा (Trench) घेतला. या उत्खननात विविध स्तरावर (खोलीवर ) त्यांना आदिमानवाने वापरेली २२ दगडी हत्यारे सापडली. त्या हत्यारांच्या  जडणघडणी वरून त्याचा काळ निश्चित करता येतो. त्यावरून साधारणपणे ९0000 वर्षांपासून याठिकाणी मानवाचे वास्तव्य होते असे दिसून आले.

मानवाच्या इतिहासाचा लाखो  वर्षाचा काळ दोन भागात विभागला जातो . प्रागैतिहासिक काळ (Prehistory) आणि ऐतिहासिक काळ (History). माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली त्याच्या पुढच्या काळाला ऐतिहासिक काळ म्हणतात. हा जेमतेम ५००० वर्षाचा काळ आहे. त्या आधीचा लाखो वर्षाचा काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ. या काळात मानव समुहाने राहात होता. तो भटक्या होता तरी उन, वारा पाऊस यांच्या पासून संरक्षण मिळवण्यासाठी तो नैसर्गिक गुहांचा आश्रय घेत होता.  कंदमुळे, फ़ळे गोळा करणे, शिकार करणे इत्यादीसाठी त्याने निसर्गात उपलब्ध असलेल्या दगडाचाच हत्यार म्हणूम वापर केला. सुरुवातीच्या काळात दगडाचे मोठे कपचे काढून ओबडधोबड हत्यारे बनवली जात. त्यांना Abbevillian tools म्हणून ओळखले जाते. काळानुरुप हत्यारात सुधारणा होऊन  ती प्रमाणबध्द , सुबक, धारदार आणि आकाराने छोटी झाली. त्यांना Acheulean tools म्हणून ओळखले जाते. त्यापुढील काळात लाकडात किंवा हाडामध्ये दगडी पाती अडकवून त्याने हत्यारे बनवली अशा हत्यारांना  Composite tools म्हणून ओळखले जाते. 

Paleolithic Age

लाखो वर्षाचा प्रागैतिहासिक काळ ३ भागात विभागलेला आहे.

१) पुराश्मयुग (Paleolithic Age)

अ)पूर्व पुराश्मयुग - १० लाख ते १ लाख वर्षे  (Lower Paleolithic Age)

ब) मध्य पुराश्मयुग - १.२५ लाख ते २५ हजार वर्षे (Middle Paleolithic Age)

क) उत्तर पुराश्मयुग - ३५ हजार ते १० हजारवर्षे (Upper Paleolithic Age)

या काळात मानव मुख्यत: अन्न संकलन आणि भटके जीवन जगत होता.

) मध्याश्मयुग (Mesolithic Age) - १२ हजार ते ५ हजार वर्षे  , याकाळात पशुपालन व शेती करुन मानव अन्न उत्पादन करु लागला. 

) नवाश्मयुग (Neolithic Age) - ४ हजार ते २५०० वर्षे , याकाळात मानव स्थिर जीवन जगू लागला.

Paleolithic Tools

Acheulian Stone tools found in cave at Susrondi Courtesy :-Paper published by Dr Marathe 

सुसरोंडीच्या गुहेत केलेल्या उत्खननात सापडलेली दगडी हत्यारे बेसॉल्ट दगडापासून बनवलेली होती. यात ३ हातकुर्‍हाड (Hand Axe) २ अश्म परशु / फ़रशी (Cleavers) , ४ कुदळ (Picks), १४ चाकू (Choppers), २४ तासणी (सोलणी) (Scrappers) ही हत्यारे सापडली. ही हत्यारे बनवण्यासाठी वापरण्यात आलेले दगड (Cores) आणि त्या दगडापासून हत्यारे बनवताना उडालेल्या ढलप्या (Flakes) ही याठिकाणी सापडल्या आहेत. इथे आणि वेळणेश्वर येथे केलेल्या उत्खननात सापडलेल्या मातीच्या नमुन्यांवरुन काही हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्या पेक्षा बरीच वर होती. त्यामुळे कंदमुळे, शिकार करुन अन्नसंकलन करणार्‍या आदिमानवाला समुद्रातूनही अन्न मिळत होते. जवळपासच्या भागात असलेल्या अन्नाच्या उपलब्धतेमुळे आणि गुहे जवळच असलेल्या गोड्या पाण्याच्या ओढ्यामुळे आदिमानवाने या गुहेचा आश्रय घेतला होता.


आदिमानवाच्या गुहेत बसून पुरातत्वशास्त्राच्या (Archaeology) अभ्यासक्रमात शिकलेला लाखो वर्षाचा मानवी इतिहास मी सगळ्यांना सांगितल्यावर शांतता पसरली. गुहेतल्या आदिम शांततेत आमच्याच श्वासाचा आवाज आम्हाला ऐकू येत होता. गुहेतून बाहेर पडून ओढ्याच्या काठाने प्रवाहाच्या दिशेने पुढे गेल्यावर एक छोटा धबधबा आणि त्याखाली असलेला डोह पाहायला मिळतो.

गुहा पाहायला आलेल्या वाटेने न उतरता दुसर्‍या वाटेने खाली उतरुन गावातील लक्ष्मी नारायण मंदिर गाठले. मंदिरा जवळ एक जांभ्या दगडात बांधलेली इंग्रजी 'L" अक्षराच्या आकाराची बारव आहे.. याच आवारात असलेल्या शिवमंदिरातील काळ्या पाषाणातील गणपतीची आणि नंदीची मुर्ती सुंदर आहे. मंदिराच्या पुढे पालशेतच्या प्राचीन बंदराचे अवशेष आहेत. या ठिकाणी ४ बुरुज आणि खाली उतरण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. या ठिकाणी केलेल्या उत्खननात नांगर आणि बोटी बांधण्याचा लोखंडी कड्या सापडल्या होत्या. या बुरुजांच्या काटकोनात एक ४ फ़ूट उंच भिंत आहे. त्याला ठराविक अंतरावर कमान असलेले दरवाजे आहेत. भरती ओहोटीचे पाणी बंदरात नियंत्रित करण्यासाठी Lock gates असतात तशी योजना येथे केलेली असावी. या भागात आता जंगल आणि बागायती असल्याने संपूर्ण परिसर पाहाता येत नाही. याशिवाय गावात प्राचीन वाट आणि त्यावरील अंतर दाखवणारे कोसाचे (मैलाचे) दगड   हे प्राचीन अवशेष पाहायला मिळाले. 

Lock Gates in Ancient Palshet dock 

Mile stone on ancient route at Palshet

हिच प्राचीन वाट पुढे पालशेत - वेळणेश्वर रस्त्यावर असलेल्या अडूर गावाच्या सड्यावर जाते. त्यावर असलेले कोसाचे दगड , पांथस्थांसाठी बांधलेली बारव आणि विश्रांतीसाठी पुरातन वृक्षांच्या भोवती बांधलेले पार पाहून आजच्या दिवसाची ऐतिहासिक सफ़र पुर्ण केली.

Step well, Adur

जाण्यासाठी :-

चिपळूण पासून पालशेत गाव ४५ किलोमीटर अंतरावर आहे. चिपळूणहून थेट पालशेतला जाण्यासाठी फ़ार कमी एसटीच्या बसेस आहेत. त्यामुळे चिपळुहून दर अर्ध्या तासाला सुटणार्‍या चिपळूण - गुहागर एसटीने शॄंगारतळी किंवा मोडका आगार याठिकाणी उतरुन रिक्षा अथवा वडापने पालशेतला जाता येते.

पालशेत गावातून दोन मार्गांनी सुसरोंडीच्या गुहेत जाता येते.

१)  पालशेत गावातून एक रस्ता पोमेंडी गावाकडे जातो. या रस्त्यावर बौद्धवाडी, बारभाई आहे. या बौद्धवाडीतून  एक प्राचीन वाट सुसरोंडीच्या सड्यावर जाते. या चढाईच्या मार्गाने गुहेपर्यंत जाण्यास पाऊण ते एक तास लागतो.

२)  पालशेत गावातून पक्का रस्ता निवोशीला जातो . या रस्त्यावर एक मोबाईल टॉवर आहे त्याजवळून एक वाट सड्यारुन सुसरोंडीच्या गुहेजवळ जाते. या मार्गाने मोबाईल टॉवर ते गुहेपर्यंत जाण्यास अर्धा तास लागतो.

पालशेत गावातील पुरातन अवशेषांचा नकाशा, 
Map by Mahendra Govekar

Ref :- 1) Acheulian cave at Sursondi, Kokan Maharashtra, by Ashok Marathe , Paper published in ,Current Science Vol 90 No 11,  10 June 2006.

2) भारताची कुळकथा :- डॉ. मधुकर केशव ढवळीकर

3) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती :- डॉ. गो.ब. देगलूरकर


Water stream near cave, Susrondi

केनियातील सुस्वा माउंटन येथे लाव्हारसामुळे तयार झालेल्या गुहेतून केलेला थरारक प्रवास वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

छत्तीसगड मध्ये लाईमस्टोन मध्ये तयार झालेल्या गुहेतून केलेला थरारक प्रवास वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

Photos by :- Amit Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5

Map :- Mahendra Govekar © Copy right