Friday, November 15, 2019

निसर्गाचा अविष्कार चेमेदेव डोंगर आणि बितनगड Offbeat trek to Chemdev & Bitangad

चेमेदेव 

Chemdev


महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगांवर ऊन, वारा, पाऊस आणि वाहाते पाणी यांच्या वर्षानूवर्ष होणार्‍या मार्‍यामुळे त्यांची झीज होऊन अनेक भौमित्तीक आकार आणि रचना तयार झालेल्या आहेत. नेढ ही रचना त्यापैकीच एक आहे. नेढ या शब्दाचा अर्थ सुईच्या टोकाला दोरा ओवण्यासाठी असलेले भोक. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यांना नैसर्गिकरित्या पडलेल्या अशा आरपार भोकांना नेढ म्हणतात. सह्याद्रीत अशी अनेक नेढी आहेत . महाबळेश्वरच्या एलिफंट पॉईंटवरुन दिसणारे नेढे . सप्तश्रुंगी गडावरून दिसणारे नेढे ही सर्वसामान्यांना माहिती असणारी सह्याद्रीतील नेढी आहेत.  सप्तशृंगी गडावरच्या नेढ्या बाबत आणि साल्हेर वरुन दिसणार्‍या नेढ्याबाबत दंतकथाही प्रचलित आहेत. सप्तशृंगी देवी आणि महिषासूर यांच्या लढाईत देवीने केलेल्या प्रहारामुळे महिषासूर डोंगरातून आरपार फ़ेकला गेला आणि नेढ तयार झाले. दुसर्‍या कथेत देवीचा अंगठ्याच्या प्रहारामुळे नेढे तयार झाले. सप्तशृंगी गडावरुन दिसणारे नेढे मोहनदर (शिडका किल्ला) किल्ल्याच्या डोंगरात आहे. साल्हेर किल्ल्यावर परशुरमांचे वास्तव्य होते. किल्ल्यावर त्यांच्या पादुकाही आहेत. परशुरामाने कोकणाची निर्मिती करण्यासाठी मारलेल्या बाणामुळे साल्हेर समोरच्या डोंगराला आरपार भोक पडून नेढ निर्माण झाले अशी दंतकथा आहे.    

सप्तश्रृंगी देवीच्या कथेतील नेढे, मोहनदर किल्ला

पिंपळा (कंडाणा) सर्वात मोठे नेढे 

याशिवाय सह्याद्रीत भटकणाऱ्यांना राजगड, मदनगड,  मोहनदर (शिडका किल्ला) , पिंपळा (कंडाणा) सोनगड,   इत्यादी  गडावरील नेढीही माहीती असतात . त्यात ते उतरलेले असतात किंवा पार करुनही गेलेले असतात . पिंपळा (कंडाणा) गडावर दोन नेढी आहेत. त्यापैकी एक नेढ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेढे आहे.


करोडो वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सह्याद्रीची निर्मिती झालेली आहे.  त्याकाळी जमिनीतून लाव्हारस बाहेर येऊन जमिनीवर पसरत असे. काही काळाने  हा थर थंड होऊन पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक होई . अशाप्रकारे लाव्हारसाचे थर एकावर एक  बसून सह्याद्रीची निर्मिती झालेली आहे . यातील काही भाग / थर ठिसूळ  असल्याने ऊन , वारा, पाऊस यांच्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर झीज होत असते. वेगाने वाहाणारा वारा ठिसूळ थरातील माती वाहून नेतो. पावसाचे पाणी या भागात शिरून आपल्याबरोबर माती वाहून नेते . फटीमध्ये साचून राहीलेल्या पाण्याची उष्णतेने वाफ होते . वाफ़ेच्या दाबाने दगडांना भेगा पडतात.  उन्हाळ्यात तापलेल्या दगडावर पाणी पडून भेगा पडतात . अशा प्रकारे  सतत बदलणाऱ्या वातावरणाचा, तापमानाचा परीणाम होवून या ठिसूळ भागाची झीज होत जाते .  अशाप्रकारे डोंगराला भोक पडले की वारा , पाणी आत आत कोरत जाते आणि डोंगराच्या आरपार भोक पडले तर नेढे तयार होते.  अन्यथा गुहा तयार होते. या प्रक्रीयेचा वेग अनेक घटकांवर अवलंबून असल्याने अतिशय मंद असतो (वर्षाला एक सेंटीमीटर इतकी कमी झीजही होवू शकते.)  त्यामुळे अशाप्रकारे नेढे बनण्यासाठी हजारो वर्षे लागू शकतात. 

Chemdev

नेढ्या व्यतिरीक्त लाव्हा ट्युबज / टनेल लाव्हाचे बोगदे महाराष्ट्रात पाहाता येतात. जमिनीतून बाहेर येणारा लाव्हा वाहात असतांना बाहेरचा भाग हवेच्या संपर्कात आल्यामुळे थंड होतो आणि बोगद्या सारखा भाग तयार होतो. तप्त लाव्हा या बोगद्यातून वाहातो. कालांतराने लाव्हा वाहाणे बंद झाल्यावर उरलेला बोगदा मागे राहातो. अशा प्रकारचा लाव्हामुळे तयार झालेला बोगदा चेमदेव डोंगरावर पाहायला मिळतो.   

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अवंधा (औंढ्या), पट्टा (विश्रामगड), बितनगड हे किल्ले आहेत. याच भागात चार दिशांना चार तोंडे असलेल्या लाव्हा बोगद्याचा (ट्यूबचा) चेमदेव डोंगर आहे ही माहिती मिळाली होती. अवंधा, पट्टा, बितनगड पाहून झाले असल्यामुळे केवळ चेमदेव पाहाण्यासाठी याभागात जाणे होत नव्हते. यावर्षी पावसाळ्यात ठरवलेला चेमदेवचा प्लान ऑक्टोबर झाला तरी प्रत्यक्षात येत नव्हता. शेवटी दिवाळीच्या आदल्या रविवारी जाण्याचे ठरले. शनिवारपासूनच पाऊस चालू झाला होता. रस्ते खराब असल्याने रविवारी पहाटेच निघालो त्यावेळीही पाऊस पडतच होता. कसारा घाटापाशी पोहोचलो तेंव्हा उजाडले होते. छोट्या गाड्यांसाठी घाट चालू आहे हे कळल. तिथल्याच एका हॉटेलात नाश्ता करुन घाट चढायला सुरुवात केली. कसारा घाटातून नाशिककडे जाताना घाट संपता संपता ही इग्लु सारखी दिसणारी गोष्ट बर्‍याचदा आपले लक्ष वेधुन घेते. थळ घाट (कसारा घाट ) हा प्राचिन घाट आहे. वर्षानुवर्ष या घाटातुन प्रवासी, व्यापारी यांची पायी किंवा बैलावरुन / घोड्यावरुन ये-जा चालु असे. अहिल्याबाई होळकरानी देशभर अनेक घाट, पाणपोया बांधल्या . त्यातच या विहिरीचीही गणना होते. मजबुत दगडी बांधणी असलेल्या या विहिरीत केरकचरा जाउ नये , त्यातील पाण्याचे बाष्पिभवन होउ नये यासाठी त्यावर दगडी घुमट बांधलेला आहे. या घुमटाला चार खिडक्या ठेवलेल्या आहेत. त्यातुन दोरीच्या सहाय्याने आजही पाणी काढता येत. 

विहीर, कसारा घाट 

ही विहिर पाहून पुढचा प्रवास चालू केला. घोटी वरुन जटायू मंदिरसाठी प्रसिध्द असलेले टाकेद गाठले. पुढे म्हैसघाट चढून गेल्यावर सर्वत्र पवनचक्क्या दिसायला लागल्या या भागात  बाराही महिने वारा वाहात असतो. त्यामुळे या भागात सर्व डोंगरंवर पवनचक्क्या दिसतात. म्हैसघाट चढून गेल्यावर कोकणवाडी, एकदरा या गावांना जाणारा रस्ता आहे. एकदरा गावातून एक रस्ता बितनगडच्या पायथ्याच्या बितका गावात जातो. दुसरा रस्ता पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पट्टावाडीत जातो. तर सरळ जाणारा रस्ता खिरवीरे गावात जातो.   


Waghdev in route to Chemdev

Samadi ,Chemdev Dongar

Water Tank on Chemdev

चेमदेवला पोहोचण्यासाठी खिरवीरे गाव गाठावे लागते. हे गाव छोटेसे आहे. गाव पार केल्यावर एक कच्चा रस्ता धारवाडीत जातो. धारवाडीच्या मागे चेमेदेवचा डोंगर उभा आहे. पण चेमदेववर जाणारी पायवाट चेमदेवच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगरावरुन आहे. चेमदेवचा डोंगर आणि त्याच्या बाजूच्या डोंगराच्या पायथ्याशी दाट झाडीचा पट्टा आहे. या झाडीतून चढत पायवाट दोन डोंगरांमधील खिंडीत पोहोचते. खिंडीत लाकडी फ़ळ्यांवर कोरलेले वाघदेव आहेत. शेंदूर फ़ासल्यामुळे आणि झीज झाल्यामुळे ते ओळखण्या पलिकडे गेलेले आहेत. वाघदेव पाहून खिंडीतल्या वार्‍याचा आनंद घेऊन चेमदेव डोंगरावर चढायला सुरुवात करावी. साधारणपणे १० मिनिटात आपण शेंदुर लावलेल्या दगडांपाशी येतो. येथून एक पायवाट माथ्याकडे तर उजवीकडे जाणारी पायवाट डोंगराला वळसा घालून पाण्याच्या खोदीव टाक्याकडे जाते. या टाक्यावरुन या डोंगराचा उपयोग टेहळणीची चौकी म्हणून होत असावा असे वाटते. या डोंगरावरुन उत्तरेला अवंधा, पट्टा आणि पूर्वेला बितनगड हे किल्ले आणि मोठा परीसर दृष्टीपथात येतो.

                                             चेमदेव लाव्हाचा बोगदा (ट्यूब) पाहाण्यासाठी व्हिडीओ प्ले करा

पाण्याचे टाके पाहून डोंगरमाथ्यावर असलेल्या कातळकड्यापाशी पोहोचल्यावर लाव्हाच्या बोगद्याचे उत्तरे कडील तोंड दिसते. यात चढून जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायर्‍या आहेत.  लाव्हाच्या बोगद्याचे तोंड ५ फ़ूट उंच आणि ३ फ़ूट रुंद आहे. येथून विरुध्द बाजूला असलेल्या दक्षिणेकडील बोगद्याच्या तोंडातून येणारा प्रकाश दिसत असतो. या प्रकाशाच्या रोखाने जाण्यासाठी आपल्याला गुढग्यावर रांगत जावे लागते. कारण बोगद्याच्या आतील भागाची उंची जेमतेम अडीच ते तीन फ़ूट आहे. साधारण पाच फूट गेल्यावर उजव्या (पूर्व) आणि डाव्या (पश्चिम) बाजूला बोगद्याची दोन तोंड आहेत.  या चार तोंड असलेल्या लाव्हा बोगद्याची रचना साधारणपणे (+) अधिक चिन्हासारखी आहे . या अधिक चिन्हाची चारही टोक मध्यभागी जिथे मिळतात तेथे गुहेची उंची ५ फूट आहे . त्यामुळे येथे वाकून उभे राहाता येते . उजव्या बाजूला चेमदेवची अनघड मूर्ती आहे . दगड एकमेकांवर रचून त्यावर शेंदूर लावलेला आहे . त्यामुळे पूर्वेकडील तोंड झाकले गेलेले आहे.  उरलेली दोन तोंडे (दक्षिण आणि पश्चिम) अडीच ते तीन फूट उंचीची आणि निमुळती आहेत . त्यामुळे सडपातळ माणूस किंवा लहान मुलेच या तोंडापर्यंत पोहोचू शकतात . लाव्हा  ट्यूब पाहून झाल्यावर जवळ असणार्‍या टेपने त्याची माप घेतली. कच्चा नकाशा काढला. बोगद्यातून बाहेर आल्यावर नेढ्याच्या तोंडा जवळच या डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी पायवाट आहे . या वाटेने ५ मिनिटात चेमदेव डोंगरच्या सर्वोच्च माथ्यावर जाता येते

West & South face of Lava Tube 

Chemdev

चेमदेव डोंगर उतरुन पुन्हा खिरवीरे गाठले . पाऊस अजूनही चालू होता. त्यामुळे ट्रेकर्स लोकांचे अमृत म्हणजे चहा पिण्याची तल्लफ़ आली होती. पण खिरवीरे गावात चहा मिळाला नाही. एव्हाना १२ वाजून गेले होते. एकदरा मार्गे  बितका हे बितनगडाच्या पायथ्याचे गाव गाठले. वाटेत दोन ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या त्यामुळे रस्त्यावर राडारोडा पसरला होता. गावात गेल्यावर कळले की जुलैला झालेल्या पावसात दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे गावात एसटी येत नाही. जुलै पासून प्रशासनाने किंवा गावकरी दोघेही उदासिन असल्याने ज्यांच्याकडे मोटारसायकली आहेत. ते त्या चिखलातून राडारोड्यातून गाड्या चालवत होते आणि बाकीचे गावकरी डोंगर चढून आपले गाव गाठत होते.

Bitangad

बितनवाडीतली दोन मुले आमच्या बरोबर गडावर यायला तयार झाडी. गावाच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर रस्त्यात दरड कोसळली होती. त्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग बंद झाला होता. गाडी तिथेच उभी करुन चालायला सुरुवात केली. याभागात वाहाणारा जोरदार वारा आणि पाऊस यामुळे हुडहुडी भरत होती. समोर पिरॅमिडच्या आकाराचा बितनगडाचा ताशिव डोंगर दिसत होता. थोड्यावेळात चढण सुरु झाली आम्ही किल्ल्या खालच्या जंगलात पोहोचलो आणि वारा थांबला. या ठिकाणी शेंदुर लावलेले काही दगड आहेत. यांना स्थानिक लोक माऊली या नावाने ओळखतात. पुढे पायवाट खडी चढण चढत कातळ टप्प्यापाशी पोहोचते. वाटेत वनखात्याने खड्डे खोदून लावलेली झाडे होती. आमच्या बरोबर आलेल्या मुलांनी उन्हाळ्यात हे खड्डे वनखात्यासाठी खोदले होते आणि पावसाळ्यात झाडे लावली होती. त्यामुळे त्यांना प्रत्येक झाडाचे नाव माहिती होते. वाटेतल्या झुडूपात हात घालून ते तोंडली सारखी दिसणारी फ़ळ काढून खात होते. त्या फ़ळाला ते मेका म्हणतात. त्या जंगली तोंडल्यांवर बारीक काटेरी लव होती. आम्हालाही मेका खायचा सतत आग्रह चालू होता. पण किल्ला चढतांना सहसा अनोळखी गोष्टी खाऊ नयेत असा नियम पाळत असल्याने आम्ही त्यांना किल्ला उतरल्यावर मेका खाऊ असे सांगितले. 

मेका 
Rock cut steps , Bitangad

कातळ टप्प्याच्या खाली पायवाटेच्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. कातळात कोरलेल्या पायर्‍या अरुंद आहेत. पायर्‍या चढण्या उतरण्यासाठी कातळात जागोजागी खोबण्या केलेल्या आहेत. त्याच्या आधार घेऊन पायर्‍या चढता येतात. पण दरीची बाजू संपूर्ण उघडी (Expose) असल्याने काळजीपूर्वक पायर्‍या चढाव्या - उतरव्या लागतात. पायर्‍या संपल्यावर काही अंतर चढून गेल्यावर एक दोन खांबांवर तोललेली प्रशस्त गुहा आहे. गुहा पाहून पुढे गेल्यावर एक पाण्याचे फ़ुटलेले टाके आहे. टाक्यापुढे कारवीची दाट झाडी आहे. कारवी साधारणपणे ८ वर्षांनी एकदाच फ़ुलते , तिच्या बीया जमिनीवर पडतात आणि मग मरण पावते. पुढच्या पावसाळ्यात जमिनीवर पडलेल्या बियांपासून नवीन कारवी तयार होते. सुकलेल्या कारव्यांचे दांडे घराच्या भिंती बांधण्यासाठी, छत शाकारण्यासाठी वापरले जातात. २०१९ च्या ऑक्टोबर मध्ये इथली कारवी फ़ुलली होती. सगळीकडे टपोर्‍या कळ्या दिसत होत्या. थोडीच फ़ुले फ़ुलली होती. एक दोन दिवसात कारवीचे हे रान जांभळ्या रंगाने फ़ुलणार होते. कारवीच्या राना मधून पायवाटेने चढत किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. किल्ल्याचा माथा लहान आहे. किल्ल्यावरुन भरपूर मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरुन आपण चढलो त्याच्या विरुध्द दिशेला खाली उतरुन गेल्यावर पाण्याचे कोरडे टाक आहे. ते पाहून परत माथ्यावर येऊन गड उतरण्यास सुरुवात केली. गावात आमच्या वाटाड्या मित्रांना सोडले आणि परतीचा प्रवास चालू केला.

कारवी 


Rock cut cave Bitangad


चेमदेव डोंगर हा मुंबईहून अर्ध्या दिवसाचा ट्रेक असल्याने उरलेल्या अर्ध्या दिवसात पट्टा किल्ला किंवा बितनगडला भेट देता येते .

Chemdev Measurements

AutoCAD Drawing by Deepali Sabnis

जाण्यासाठी :- 

मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायुने रावणाशी युध्द करुन इथेच प्राण सोडला अशी येथिल लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे. जवळच रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून म्हैसघाट चढून कोकणवाडी, एकदरा या गावांना जाणारा रस्ता आहे. एकदरा गावातून एक रस्ता बितनगडच्या पायथ्याच्या बितका गावात जातो. दुसरा रस्ता पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पट्टावाडीत जातो. तर सरळ जाणारा रस्ता खिरवीरे गावात जातो. खिरवीरे पासून १.५ किमी मुख्य रस्त्यावरून गेल्यावर डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता ३.५ किमीवरील  धारवाडी कडे जातो . (खिरवीरे ते धारवाडी अंतर ५ किमी ) धारवाडीतून चेमदेव डोंगर आणि त्याच्या डाव्या बाजूचा डोंगर यांच्या मधील खिंडीत जाणारी पायवाट आहे. या पायवाटेने १५ मिनिटे चढत गेल्यावर आपण खिंडीत पोहोचतो.





केनियातील सुस्वा माऊंटन या लाव्हा ट्यूब्जमुळे झालेल्या गुहेत केलेल्या  Off beat ट्रेक बद्दल वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा....   



#Offbeattrek#chemdev#needleholeinmoutain#bitangad#offbeattrekinahmednagar#akoletaluka#

14 comments:

  1. निसर्गाची किमया. अमित छान माहिती

    ReplyDelete
  2. खुपच छान दादा.....

    ReplyDelete
  3. खूप वर्षापूर्वी साधारण त सन १९९० या वर्षी,रात्री ताकेद फाट्यावरून जटायू मंदिरात भोजन आटोपून थोडी विश्रांती घेऊन सकाळी अडसरे गांवांतील एका आसनगांव लोकल सकाळी ६.०५ गाडी तील सहप्रवासी होता तो,घरी चहा पोहे घेऊन सदर गावातील पूर्ववेकडिल एक पर्वत रांग पार करून कोकणवाडी मार्गाने पट्टावाडी पार करून पट्टा डोंगर ाावर पोहोचलो. वरील विस्तीर्ण पठारावर हिंडलो. वर एक देवीच्या छोट्या मंदिरात दर्शन घेतले. एक रात्री मुक्काम करून ट्रेकचा आनंद घेतला. पूरवेस आड पर्वत तर उजवीकडे बितनगडाचे दर्शन होत होते. वेळे अभावी परत भंडारदरा घोटि रस्त्यावर उतरून पुन्हा कल्याण ला ट्रेन पकडून परतलो.आपल्या लिखाण ाामुळे नवीन गोष्टी लक्षात आल्या. सुंदर वर्णन केलेले आहे.

    ReplyDelete
  4. एकदम मस्त आणि सविस्तर लेख लिहिला आहेस. खुप माहिती मिळते...

    ReplyDelete
  5. Very informative about unknown fort
    Photos are nice

    ReplyDelete
  6. अमित छान माहिती निसर्गाच्या विविध रूपाची, मुख्यत्वे नेढे म्हणजे काय ही माहिती कोणालाही नसते फक्त नेढे एवढंच शब्द माहिती असतो पण त्याची नैसर्गिकरित्या कशी निर्मिती होते
    फारच छान

    ReplyDelete
  7. हेमंत सावंत -- छान प्रवासवर्णन व माहिती चांगली मिळाली.

    ReplyDelete
  8. Nice info. Especially the early paragraphs.

    ReplyDelete
  9. अमित, नेढे व कसारा विहीर तसेच चेमदेव या काहीश्या अनोळखी जागंबद्दलचा ई-लेख फार सुंदर लिहिला आहे.सोबत फोटो आणि विडिओ यांचा समावेश झाल्यामुळे हा अभ्यासपूर्ण लेख फार माहितीपूर्ण तसेच रंजक झाला आहे.हाती नकाशा बद्दल आभार.गिरिप्रेमीसांठी तो एक मार्गदर्शक ठरेल या बद्दल शंका नाही.सह्याद्री तसेच नेढे निर्मितीची भूशास्त्रीय माहिती फारच सुलभ मांडलीय.पौराणिक संदर्भ बद्दल आभार.तुला
    आगामी ट्रेक साठी शुभेच्छा तसेच त्यांच्या बद्दल ई-लेखाची या ब्लॉगवर प्रतिक्षा करीत आहोत.

    ReplyDelete
  10. नेहमीप्रमाणे प्रत्यक्ष ट्रेकला गेल्याचा फिल येणारी भाषा, जरुर तेथे विस्तॄत व शास्त्रीय माहीती, दंतकथांचे संदर्भ, documentation चा आग्रह आणि जोडीला पुरक व आकर्षक फोटो ... काय नाही ह्या लेखात!

    ReplyDelete
  11. नितीन - आवड आणि सखोल अभ्यास असल्यानेच आपण आपल्या लेखणीतून हुबेहुब निसर्ग डोळ्या समोर उभा केलात.खूपच छान माहिती .खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सर.....

    ReplyDelete
  12. दादा नेहमीप्रमाणे लेख वाचला की प्रत्यक्षात त्या जागी फिरवून आणतोस.

    ReplyDelete
  13. वा छान अनूभव लिहिला आहेस।. आठवण ताजी झाली.
    ता क : मेका फळं आपल्या जवाबदारी वार खावं😉

    ReplyDelete
  14. खूप छान माहिती

    ReplyDelete