Sunday, June 11, 2023

इटर्नल फ़्लेम (Eternal Flame) ट्रेक

 

Eternal Flame

अमेरीकेतल्या सुप्रसिध्द नायगारा फ़ॉल पासून ३७ किलोमीटर अंतरावर चेस्टनट रिज्ड पार्क (Chestnut Ridge Park) आहे.  नायगरा एकदा पाहुन झाला होता त्यामुळे यावेळी वेगळ काहीतरी बघुया म्हणून शोधाशोध करतांना "इटर्नल फ़्लेम" ची माहिती मिळाली.  हा तसा छोटा अप्रसिध्द ट्रेक आहे. अमेरीकेत प्रत्येक राज्यात अनेक स्टेट पार्क (राखीव जंगल) आहेत आणि त्या राखीव जंगलांमध्ये अनेक आखीव रेखीव ट्रेल्स असतात. जागोजागी लावलेले दिशादर्शक फलक, धोक्याच्या सूचना , जिथे पायवाट धोकादायक असेल तिथे लावलेले संरक्षक कठडे, लाकडाच्या ओंडक्यांच्या पायर्‍या हे सगळ पाहिल की आपल्या सारख्या सह्याद्रीत फिरणार्‍यांना "पाणीकम" वाटत राहात. पण   "इटर्नल फ़्लेम"  चा ट्रेक चक्क याला अपवाद होता.

 


नुकतेच वसंत ऋतूचे आगमन झालेले असल्यामुळे, वेगवेगळ्या रंगाच्या फ़ुलांनी झाड गच्च भरलेली होती. ट्रेकच्या सुरवतीच्या टप्प्यात या झाडांनी स्वागत केल. झाडांवर पान अपवादानेच दिसत होती. अर्थात ही झाड खास इथे आणून लावलेली असावीत अस जंगलात शिरल्यावर लक्षात आले. जंगलात पाईन आणि ओकचे उंचच उंच वॄक्ष होते. त्याच्या दाट सावलीतून वाट जात होती. साधारणपणे १० मिनिटे चालल्यावर पायवाट तीव्र उतारावरुन खाली उतरायला लागली . वॄक्षांची आडव्या  पसरलेल्या एकामेकांत गुंतलेल्या मुळांमुळे काही ठिकाणी पायर्‍यांसारखी रचना तयार झाली होती. या नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या पायर्‍यांवरुन मुळांचा आधार घेत उतरल्यावर आम्ही एका ओढ्याच्या काठाने जाणार्‍या चिंचोळ्या पायवाटेवर पोहोचलो. 



दोन्ही बाजूला झाडी भरलेले डोंगर होते. या ओढ्याच्या प्रवाहाने दोन डोंगरांमधील दरी वर्षानुवर्ष खोदून काढलेली होती. आजही ती प्रक्रीया अतिशय संथ गतीने चालूच आहे. हिवाळ्यात दगडा मधील भेगांमधल्या पाण्याचे बर्फ झाल्याने ते प्रसरण पावते . त्यामुळे भेगा रुंद होऊन दगड फूटून खाली पडतात. उन्हाळ्यात बर्फ वितळून वाहाणार्‍या प्रवाहामुळे किनार्‍याची झीज होऊन ओढ्याचे पात्र रुंद आणि खोल होत जाते.  

 


ओढ्याच्या काठाने जाणार्‍या वळणा वळणाच्या सुंदर वाटेने जातांना आजूबाजूच्या झाडीत पक्ष्यांचा किलीबिलाट ऐकायला येत होता. अचानक एका झाडावरुन सुंदर निळा पक्षी उडाला आणि ओढ्या पलिकडच्या झाडावर जाऊन बसला. त्याची (Blue jay) सुंदर छायाचित्र मिळाली. त्यामुळे चाल मंदावली , आजूबाजूच्या झाडीत आवाजांचा वेध घेत पक्षी शोधायला सुरुवात केली. काही पक्षांची छायाचित्र मिळाली तर काहींच फक्त निरिक्षण करण्यातच आनंद मानावा लागला.


Blue Jay

 

Sparrow

Red winged black bird 


Eastern Blue Bird

पक्षी निरिक्षण करतांना पुढच्या पायवाटेवर लक्ष नव्हत , समोर आडव्या पडलेल्या वृक्षाच्या आड अचानक पायवाट लुप्त झाली . त्यामुळे ओढ्याच्या पात्रात उतरण्या शिवाय पर्याय राहीला नव्हता. ओढ्यातून नितळ पाणी वाहात होत. ओढ्याचा पृष्ठभाग छिन्नीनी तासल्यासारखा सपाट होता, हेही आता लक्षात आले. हिमयुगात बर्फाच्या लाद्यांच्या सरकण्यामुळे दगड अशाप्रकारे छिन्नीनी तासल्यासारखे सपाट होतात , तोच प्रकार इथे पाहायला मिळाला. ओढ्यातून चालतांना अनेक ठिकाणी झाडे पडलेली होती. त्यातून मार्ग काढत तर कधी बाजूच्या उतारावर चढून वळसा घालून पुढे जावे लागत होते. हे अमेरीकन लोकांच्या "सेफ़्टी"च्या कल्पनेच्या पलिकडचे होते. खरतर ही झाड बाजूला करुन मार्ग निर्धोक करेपर्यंत त्यांनी हा ट्रेक बंद कसा ठेवला नाही, याच आश्चर्य वाटल.

 


ओढ्याने एक छोट वळण घेतल, समोर साधारणपणे ७० फ़ुटावरुन ३ टप्प्यात पडणारा धबधबा दिसत होता, त्या धबधब्याच्या पाण्याच्या धारांमागे असलेल्या छोट्याश्या गुहेत पेटलेल्या ३ ज्योती दिसत होत्या , अतिशय सुंदर नजरबंदी करणार दृश्य होत . धबधब्याच्या सर्वात खालच्या टप्प्यात उजव्या कोपर्‍यात जमिनी पासून ६ फूट उंचीवर एक ३ फ़ूट लांब X २ फ़ूट रुंद  आणि १.५ फ़ूट उंच गुहा आहे.

Eternal Flame Water fall


 या गुहेत नैसर्गिक वायूमुळे पेटलेल्या तीन ज्योती आहेत. आजूबाजूला वाहाणारे पाणी गुहेत झिरपत असतांनाही या ज्य़ोती तेवत होत्या .आम्ही गेलो होतो तेंव्हा धबधब्याला पाणी कमी होते , पण धबधबा ऐन भरात वाहात असतांना किंवा हिवाळ्यात गोठला असतांनाही या ज्योती तेवत असतात.

 

Eternal flame water fall

नैसर्गिक वायूचे स्त्रोत कसे तयार होतात ? याबद्दल जिओलॉजीच्या अभ्यासक्रमात शिकलो होतो,

वारा, पाऊस, उष्णता इत्यादिंचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खडकांवर परिणाम होऊन त्याची झीज होते. हा झीज झालेला भाग पाण्या बरोबर वाहून जातो आणि ज्या ठिकाणी पाणी खोल आणि संथ असते अशा ठिकाणी हा गाळ साचतो. त्याबरोबरच पाण्याबरोबर वाहून आलेले जैविक घटकही इथे साचत जातात.  हा गाळ कालांतराने कठीण होतो आणि गाळाचे खडक (Sedimentary Rock) तयार होतात. सरोवर, नदीचं पात्र , नद्यांनी निर्माण केलेला त्रिभूज प्रदेश , समुद्र तळ इत्यादी ठिकाणी हे गाळाचे दगड तयार होतात. याठिकाणी खनीज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याचे आपण वाचलेले असते.

 


इटर्नल फ़्लेमचा (Eternal Flame) व्हिडीओ पाहाण्यासाठी प्ले बटणावर टिचकी मारा


पृथ्वीच्या पोटात होणार्‍या उलथापालथीमुळे हे गाळाचे दगड जमिनीत खोलवर दाबले जातात. या दगडावर पडणार्‍या दाब आणि उष्णतेमुळे जैविक घटकांचे रुपांतर खनिज तेलात आणि नैसर्गिक वायूत होते. भूगर्भात होणार्‍या हालचालींमुळे दगडांमध्ये पडलेल्या भेगांमधून नैसर्गिक वायू जमिनीवर येतो. बर्‍याचदा वीज पडल्यामुळे हा वायू पेट घेतो आणि जमिनीवर ज्योती पेटलेल्या दिसतात. जगभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे भूगर्भातून बाहेर पडणार्‍या नैसर्गिक वायुमुळे पेटलेल्या ज्योती पाहायला मिळतात. भारतातील हिमाचल प्रदेशात असलेल्या प्रसिध्द ज्वालाजी मंदिरातही अशाच प्रकारे जमिनीतून बाहेर येणारा नैसर्गिक वायू पेटल्यामुळे तयार झालेल्या ज्योती दिसतात.

 


इटर्नल फ़्लेमचा अभ्यास  Indiana University Bloomington आणि Italy's National Institute of Geophysics and Volcanology या दोन संस्थांच्या जिओलॉजिस्टनी २०१३ साली केला . त्यांना असे आढळुन आले की इटर्नल फ़्लेम  मध्ये  पाझरणार्‍या वायूत ईथेन (ethane) आणि प्रोफ़ेन (propane) वायूचे प्रमाण 35% आहे. हे प्रमाण जगातील इतर ज्ञात नैसर्गिक वायूच्या स्त्रोतां पेक्षा जास्त आहे. इतर ठिकाणी मिथेन वायू मोठ्या प्रमाणात आढळून येतो. 

 संशोधकांना या परिसरात असे अनेक छोटे छोटे नैसर्गिक वायूचे पाझर ('micro seeps') आढळून आले. या नैसर्गिक वायूचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले हा वायू जवळच असलेल्या Rhinestreet Shale मध्ये तयार झालेला आहे  अंदाजे ४०० मिटर्स (१३००फ़ूट ) खोल असलेल्या या नैसर्गिक वायूच्या साठ्यातील वायू भूगर्भातील हालचालींमुळे (Tectonic activity) तयार झालेल्या खडकां मधील  भेगां मधून जमिनीवर आला आहे. नैसर्गिक वायू तयार होण्यासाठी जमिनी खाली स्त्रोताचे (shale) तापमान  १०० °C च्या आसपास असावे लागते. या तापमानात कार्बन विघटन होऊन नैसर्गिक वायूचे रेणू तयार होतात. परंतू  Rhinestreet Shale मधील तापमान १०० °C पेक्षा कमी आहे तसेच इतर नैसर्गिक वायूच्या स्त्रोतांपेक्षा त्याची खोलीही कमी आहे तरीही तिथे नैसर्गिक वायू कसा तयार झाला ? असा प्रश्न संशोधकांना पडला आहे. त्यावर सध्या अभ्यास चालू आहे.

 


आपल्या इथे धबधब्याच्या खालच्या भागात डोह असतो. तो नसला तरी आजूबाजूचे खडक पडून धबधब्या पर्यंत जाण्याचा मार्ग दुष्कर झालेला असतो. पण या ठिकाणी बर्फाच्या लाद्या सरकण्यामुळे गुळगुळीत पॄष्ठभाग तयार झाला आहे. त्यामुळे ज्योती तेवत असलेल्या गुहेपर्यंत सहज जाता आले. गुहेच्या वरुन पाण्याच्या धारा पडत होत्या त्या धारांच्या पडद्या आड ज्योती तेवत होत्या. नैसर्गिक वायू जळल्यावर येणार टिपिकल वास त्या ठिकाणी येत होता. पृथ्वी, आप (पाणी),  तेज (अग्नी) , वायू आणि आकाश  ही पंचमहाभूत या निबिड अरण्यात एकाच वेळी पाहायला मिळत होती. आग आणि पाणी हे विरुध्द गुणधर्म असणारी महाभूत या ठिकाणी एकत्र नांदत होती. 

 


   या भारावलेल्या वातावरणात काही वेळ थांबून आलेल्या मार्गाने परत फ़िरलो. एक वेगळा छान ट्रेक झाला. मी आजवरच्या  भटकंतीत पाहीलेल अजून एक सुंदर ठिकाण म्हणून "इटर्नल फ्लेम" कायम आठवणीत राहील.

 


जाण्यासाठी :- अमेरीकेतल्या सुप्रसिध्द नायगारा फ़ॉल पासून ३७ किलोमीटर आणि बफेलो विमानतळापासून १७ किलोमीटर अंतरावर चेस्टनट रिज्ड पार्क (Chestnut Ridge Park) आहे. या पार्क मध्ये ३ ट्रेक आहेत. त्यातील मध्यम श्रेणीतला हा ट्रेक आहे. जाऊन येऊन साधारणपणे अंतर ३ किलोमीटर आहे. मे महिना ते ऑक्टोबर हा ट्रेक करता येतो. अमेरीकेत अनेक पार्क्स मध्ये जाण्यासाठी फी भरावी लागते. पण या ट्रेकसाठी कुठलीही फी भरावी लागत नाही.    

 


 Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5 


with Pradnyesh Samant



 1) Edison National Historical Park (एडीसन नॅशनल हिस्टॉरीकल पार्क) Offbeat USA हा ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा 


 २) Corning Glass Museum कॉर्निंग ग्लास म्युझियम Offbeat USA हा ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा 

 


 

 

Tuesday, January 31, 2023

९०,००० वर्षापूर्वी आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा, सुसरोंडी, पालशेत, तालुका :- गुहागर ( Acheulian cave at Susrondi, Palshet, Taluka Guhagar)

 

Acheulian cave at Susrondi

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पालशेत नावाचे प्राचीन गाव आहे. पेरिप्लस ऑफ़ दि एरिथ्रियन (Periplus of the Erythraean Sea) या इसवीसनाच्या पहिल्या शतकात एका ग्रीक खलाशाने लिहिलेल्या पुस्तकात कोकण किनारपट्टीतील काही बंदरांचा उल्लेख आहे. त्यात ‘पालमपट्टई’  नावाच्या बंदराचा उल्लेख आहे. हे बंदर म्हणजे आजचे पालशेत असावे असे काही तज्ञांचे मत आहे.  या बंदरातून ग्रीस आणि रोम यांच्याशी व्यापार तिसऱ्या शतका दरम्यान चालत होता. पालशेत गावतील लक्ष्मी नारायण मंदिराजवळ आजही मध्ययुगीन बंदराचे अवशेष पाहायला मिळतात.

आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा, पालशेत

पालशेत गावातील सुसरोंडी  भागात अंदाजे ९०, ००० वर्षापूर्वी आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा सापडलेली आहे. याशिवाय या भागात मांडवकरवाडी (पालशेत), चिंद्रावळे (हेदवी-नरवण) इत्यादी अनेक गुहा विखुरलेल्या आहेत. या गुहांमुळे या भागाला गुहागर ("गुहाचे आगार" या अर्थी ) असे नाव पडले असावे. भारताला लाभलेल्या ७५०० किलोमीटर समुद्र किनाऱ्यापैकी आत्तापर्यंत केवळ गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्या जवळच्या २५ ते ३० किलोमीटरच्या पट्ट्यात आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहा सापडलेल्या आहेत.  भारतात आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहा यापूर्वी डोंगरावर किंवा पठारी भागात सापडलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील गुहांचे महत्व अधोरेखित होते.

डेक्कन कॉलेजचे डॉ. अशोक मराठे यांनी २००१ मध्ये या गुहेमध्ये उत्खनन केले होते. त्यावेळी या गुहा त्यांना ज्यांनी दाखवल्या त्या ओक काकांनी आमच्या बरोबर गुहा दाखवायला यायचं मान्य केलं. ओक काका मुळचे पालशेत गावाचे.  लहानपणापासून त्यांनी पालशेतच्या आजूबाजूचे जंगल तुडवल आहे. आजही ते आपला व्यवसाय सांभळून जंगलातून भटकंती करत असतात. जंगलावर आणि इथल्या ऐतिहासिक गोष्टींवर त्यांचे नितांत प्रेम आहे. आम्हाला केवळ गुहा  दाखवायला आलेले ओक काका आमचे या विषयातील स्वारस्य बघून पालशेत आणि आजूबाजूच्या परिसरातील ऐतिहासिक वाटा, बारव, मंदिर या गोष्टी दाखवत दिवसभर फिरले.

Acheulian cave at Susrondi, Map by Mahendra Govekar

पालशेत गावातून एक रस्ता पोमेंडी गावाकडे जातो. या रस्त्यावर बौद्धवाडी (बारभाई) आहे. या बौद्धवाडीतून  एक प्राचीन वाट सुसरोंडीच्या सड्यावर जाते. चिर्‍यांनी बांधलेल्या चढाईच्या वाटेला कोकणात घाटी म्हणतात. दोन्ही बाजूला चिर्‍यांच्या गडग्यांचे कुंपण केलेल्या आंब्या-काजूच्या बागा होत्या. त्याच्या दाट सावलीतून चढत जाणाऱ्या वाटेने १५ मिनिटात एका फाट्यावर येतो. येथून उजव्या बाजूची वाट दाट जंगलातून जाते. जानेवारी महिना असल्याने या वाटेवर असलेल्या अनेक झाडांचे मोहोर फ़ुलले होते त्याचा गोडूस धुंद सुवास आसमंतात भरुन राहीला. खुरीची पांढरी फ़ुले आणि अंजनाची जांभळी फ़ुले घोसाने फ़ुलली होती. त्यांचा दरवळ वातावरण सुगंधित करत होता.  या वाटेने  १० मिनिटे चढाई केल्यावर आम्ही सुसरोंडीच्या सड्यावर पोहोचलो.  खाली दुरवर दाट झाडीत लपलेली मांडवकरवाडीतली लाल कौलांची घर दिसत होती. त्या वाडीतही आदिमानव कालिन गुहा आहेत.

खुरीची फुलं
अंजन

सुसरोंडीचा  सडा उभा आडवा पसरलेला आहे. सड्यावर  लक्षात ठेवण्यासारखी कुठलीही खूण नाही. लोकांचा वावर नसल्याने मळलेल्या वाटा नाहीत. त्यामुळे गुहा बघायला जायचे असेल तर  गावातून माहीतगार सोबत असणे आवश्यक आहे. आमच्या बरोबर आलेले ओक काका लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच इथे येत होते. त्यामुळे त्यांनाही थोडी शोधाशोध करावी लागली, पण ते येथे अनेकदा येऊन गेल्यामुळे त्यांना दिशेचा अंदाज होता. त्या दिशेने थोडी शोधाशोध केल्यावर वाट सापडली. या वाटने  खाली उतरताना जांभ्या दगडात कोरलेल्या काही  पायाऱ्या लागल्या. पायाऱ्या उतरल्यावर एक ओढा  लागला. हा ओढा पुढे सुंदरी नदीला जाउन मिळतो. ओढा ओलांडून  पलीकडे  जाऊन पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने थोडे चालून गेल्यावर प्रवाह एका कड्यावरून  १५ ते २० फूट खाली उडी मारतो. पावसाळ्यात या ठिकाणी ७ धारा असलेला धबधबा पडतो. पण पावसाळ्यांत पाण्याच्या प्रवाहामुळे या ठिकाणी येणे धोकादायक आहे.

धबधबा आणि उजवीकडे गुहा

धबधब्याच्या कड्यावरून उजव्या बाजूला गुहेच तोंड दिसत होतो. या भागात माणसांचा वावर नसल्यामुळे जंगली प्राणी गुहेत असण्याची शक्यता होती. ओक काकांनी जवळचे धोंडे उचलून गुहेच्या दिशेने  फेकायला सुरुवात केली. आम्हालाही हाकारे घालायला सांगितले. त्यानंतर पाच मिनिटे वाट बघितली. गुहेत एखाद जंगली जनावर असेल तर त्याला बाहेर जाण्याची संधी मिळावी हा त्यामागे हेतू होता. थोडा वेळ थांबूनही गुहे जवळ काही हालचाल जाणवली नाही.  मग आम्ही धबधब्याच्या बाजूने खाली उतरायला सुरुवात केली. याठिकाणीही जांभ्या दगडात  कोरलेल्या पायाऱ्या पाहायला मिळाल्या.  प्रवाह ओलांडून धबधब्या जवळ पोहोचलो. पाण्याच्या प्रवाहामुळे धबधब्याच्या खाली खोल डोह तयार झाला होता. आजूबाजूच्या वृक्षाची मुळे धबधब्याच्या कातळ भिंतीवरून खाली उतरलेली होती. डोहातल्या  गर्द हिरव्या पाण्यात  त्याचं प्रतिबिंब पडलं होत. बालकवींची औदुंबर कविता आठवली.


पाण्यात पाय सोडून बसलेली झाडं 

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन , निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे

पायवाट पांढरी तयातुन अडवीतिडवी पडे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे

झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवर, पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर

इथे पाण्यात पाय सोडून बसलेला औदुंबर नसला तरी बालकवींनी वर्णन केलेले निसर्गदृश्य पाहात पाहातच आम्ही गुहेपर्यंत पोहोचलो होतो.

आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहेचे तोंड 

         

ओक काका इसवीसन २००१ साली डॉ मराठे यांना इथे घेऊन आले तेंव्हा गुहेचे तोंड झाडी झूडूपांनी झाकलेले होते. गुहेत कोणी असेल तर बाहेर यावे यासाठी त्यांनी सोबत आणलेले फटाके गुहेच्या तोंडावर वरून टाकले. त्यांनतर सोबत आलेल्या एका कातकऱ्याला दोर बांधून गुहेच्या तोंडा जवळ उतरवले. त्याने झाडी झुडपे तोडून गुहेत प्रवेश केला. गुहेच्या भिंतींवर, छतावर त्यावेळी पाली आणि कोळ्यांचे राज्य होते. मशाली पेटवून आगीचा धाक दाखवून त्यांना पळवून लावण्यात आले. प्राथमिक शोध घेतांना या गुहेच्या जवळ अश्मयुगीन परशु / फ़रशी (Cleavers) सापडले. त्यामुळे त्यांनी सुसरोंडी येथे उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसात सध्या गुहेजवळ जाण्याचा मार्ग आहे तो बनवला. 

Entrance of Susrondi cave (from inside)

 जांभा दगडात बनलेल्या गुहेच्या तोंडातून आम्ही आत प्रवेश केला. कोकणात सर्वत्र दिसणारा लाल रंगाचा जांभा दगड हा ज्वालामुखीजन्य काळ्या पाषाणापासून म्हणजेच बेसॉल्ट पासून बनलेला आहे. लाखो वर्षे मंदगतीने बेसॉल्ट खडकाची झीज दोन प्रकारे होत असते.  १) भौतिक विच्छेदन (Physical disintegration) आणि २) रासायनिक विघटन (Chemical Decomposition). भौतिक विच्छेदनामुळे खडकाचे तुकडे  होतात  तर रासायनिक विघटनामुळे पाण्यात विरघळणारे आणि पाण्यात न विरघळणारे असे दोन प्रकारचे पदार्थ तयार होतात. पाण्यात विरघळणारे पदार्थ पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातात त्यामुळे दगड जाळीदार होतो आणि न विरघळणारे पदार्थ मागे राहातात. त्यातील लोहाच्या ऑक्साईडमुळे जांभा दगडाला तांबडा रंग येतो. कोकणात दिवस आणि रात्रीच्या तापमानात असलेला फ़रक आणि पावसाचे प्रमाण जास्त असल्याने काळ्या पाषाणाचे भौतिक विच्छेदन  आणि रासायनिक विघटन परिणामकारकरित्या होऊन जांभा दगड तयार झाला आहे.  सुसरोंडीच्या गुहेची निर्मिती अशाच प्रकारे जांभ्या दगडाचे भौतिक विच्छेदन  आणि रासायनिक विघटन होऊन झालेली आहे.

गुहेच तोंड १. मीटर रुंद आणि २.५ मीटर  उंच आहे. गुहेत प्रवेश केल्यावर आतील भाग ५ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद आहे. येथून गुहेत पूर्वेला आणि उत्तरेला जाणाऱ्या दोन वाटा फुटल्या आहेत . या वाटाची उंची जेमतेम २ मीटर आहे. त्यात सध्या वाटवाघुळांचे वास्तव्य असल्याने आत  जाता येत नाही. यातील उत्तरेकडील वाट लांबवर जाते असे स्थानिक लोक सांगतात. गुहेत आदिमानवाच्या अस्तित्वाच्या खुणा शोधाण्यासाठी डॉ मराठे यांनी गुहेच्या तोंडाजवळ ३ मीटर लांब    मीटर रुंद आणि ४.२ मीटर  खोल खड्डा (Trench) घेतला. या उत्खननात विविध स्तरावर (खोलीवर ) त्यांना आदिमानवाने वापरेली २२ दगडी हत्यारे सापडली. त्या हत्यारांच्या  जडणघडणी वरून त्याचा काळ निश्चित करता येतो. त्यावरून साधारणपणे ९0000 वर्षांपासून याठिकाणी मानवाचे वास्तव्य होते असे दिसून आले.

मानवाच्या इतिहासाचा लाखो  वर्षाचा काळ दोन भागात विभागला जातो . प्रागैतिहासिक काळ (Prehistory) आणि ऐतिहासिक काळ (History). माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली त्याच्या पुढच्या काळाला ऐतिहासिक काळ म्हणतात. हा जेमतेम ५००० वर्षाचा काळ आहे. त्या आधीचा लाखो वर्षाचा काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ. या काळात मानव समुहाने राहात होता. तो भटक्या होता तरी उन, वारा पाऊस यांच्या पासून संरक्षण मिळवण्यासाठी तो नैसर्गिक गुहांचा आश्रय घेत होता.  कंदमुळे, फ़ळे गोळा करणे, शिकार करणे इत्यादीसाठी त्याने निसर्गात उपलब्ध असलेल्या दगडाचाच हत्यार म्हणूम वापर केला. सुरुवातीच्या काळात दगडाचे मोठे कपचे काढून ओबडधोबड हत्यारे बनवली जात. त्यांना Abbevillian tools म्हणून ओळखले जाते. काळानुरुप हत्यारात सुधारणा होऊन  ती प्रमाणबध्द , सुबक, धारदार आणि आकाराने छोटी झाली. त्यांना Acheulean tools म्हणून ओळखले जाते. त्यापुढील काळात लाकडात किंवा हाडामध्ये दगडी पाती अडकवून त्याने हत्यारे बनवली अशा हत्यारांना  Composite tools म्हणून ओळखले जाते. 

Paleolithic Age

लाखो वर्षाचा प्रागैतिहासिक काळ ३ भागात विभागलेला आहे.

१) पुराश्मयुग (Paleolithic Age)

अ)पूर्व पुराश्मयुग - १० लाख ते १ लाख वर्षे  (Lower Paleolithic Age)

ब) मध्य पुराश्मयुग - १.२५ लाख ते २५ हजार वर्षे (Middle Paleolithic Age)

क) उत्तर पुराश्मयुग - ३५ हजार ते १० हजारवर्षे (Upper Paleolithic Age)

या काळात मानव मुख्यत: अन्न संकलन आणि भटके जीवन जगत होता.

) मध्याश्मयुग (Mesolithic Age) - १२ हजार ते ५ हजार वर्षे  , याकाळात पशुपालन व शेती करुन मानव अन्न उत्पादन करु लागला. 

) नवाश्मयुग (Neolithic Age) - ४ हजार ते २५०० वर्षे , याकाळात मानव स्थिर जीवन जगू लागला.

Paleolithic Tools

Acheulian Stone tools found in cave at Susrondi Courtesy :-Paper published by Dr Marathe 

सुसरोंडीच्या गुहेत केलेल्या उत्खननात सापडलेली दगडी हत्यारे बेसॉल्ट दगडापासून बनवलेली होती. यात ३ हातकुर्‍हाड (Hand Axe) २ अश्म परशु / फ़रशी (Cleavers) , ४ कुदळ (Picks), १४ चाकू (Choppers), २४ तासणी (सोलणी) (Scrappers) ही हत्यारे सापडली. ही हत्यारे बनवण्यासाठी वापरण्यात आलेले दगड (Cores) आणि त्या दगडापासून हत्यारे बनवताना उडालेल्या ढलप्या (Flakes) ही याठिकाणी सापडल्या आहेत. इथे आणि वेळणेश्वर येथे केलेल्या उत्खननात सापडलेल्या मातीच्या नमुन्यांवरुन काही हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्या पेक्षा बरीच वर होती. त्यामुळे कंदमुळे, शिकार करुन अन्नसंकलन करणार्‍या आदिमानवाला समुद्रातूनही अन्न मिळत होते. जवळपासच्या भागात असलेल्या अन्नाच्या उपलब्धतेमुळे आणि गुहे जवळच असलेल्या गोड्या पाण्याच्या ओढ्यामुळे आदिमानवाने या गुहेचा आश्रय घेतला होता.


आदिमानवाच्या गुहेत बसून पुरातत्वशास्त्राच्या (Archaeology) अभ्यासक्रमात शिकलेला लाखो वर्षाचा मानवी इतिहास मी सगळ्यांना सांगितल्यावर शांतता पसरली. गुहेतल्या आदिम शांततेत आमच्याच श्वासाचा आवाज आम्हाला ऐकू येत होता. गुहेतून बाहेर पडून ओढ्याच्या काठाने प्रवाहाच्या दिशेने पुढे गेल्यावर एक छोटा धबधबा आणि त्याखाली असलेला डोह पाहायला मिळतो.

गुहा पाहायला आलेल्या वाटेने न उतरता दुसर्‍या वाटेने खाली उतरुन गावातील लक्ष्मी नारायण मंदिर गाठले. मंदिरा जवळ एक जांभ्या दगडात बांधलेली इंग्रजी 'L" अक्षराच्या आकाराची बारव आहे.. याच आवारात असलेल्या शिवमंदिरातील काळ्या पाषाणातील गणपतीची आणि नंदीची मुर्ती सुंदर आहे. मंदिराच्या पुढे पालशेतच्या प्राचीन बंदराचे अवशेष आहेत. या ठिकाणी ४ बुरुज आणि खाली उतरण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. या ठिकाणी केलेल्या उत्खननात नांगर आणि बोटी बांधण्याचा लोखंडी कड्या सापडल्या होत्या. या बुरुजांच्या काटकोनात एक ४ फ़ूट उंच भिंत आहे. त्याला ठराविक अंतरावर कमान असलेले दरवाजे आहेत. भरती ओहोटीचे पाणी बंदरात नियंत्रित करण्यासाठी Lock gates असतात तशी योजना येथे केलेली असावी. या भागात आता जंगल आणि बागायती असल्याने संपूर्ण परिसर पाहाता येत नाही. याशिवाय गावात प्राचीन वाट आणि त्यावरील अंतर दाखवणारे कोसाचे (मैलाचे) दगड   हे प्राचीन अवशेष पाहायला मिळाले. 

Lock Gates in Ancient Palshet dock 

Mile stone on ancient route at Palshet

हिच प्राचीन वाट पुढे पालशेत - वेळणेश्वर रस्त्यावर असलेल्या अडूर गावाच्या सड्यावर जाते. त्यावर असलेले कोसाचे दगड , पांथस्थांसाठी बांधलेली बारव आणि विश्रांतीसाठी पुरातन वृक्षांच्या भोवती बांधलेले पार पाहून आजच्या दिवसाची ऐतिहासिक सफ़र पुर्ण केली.

Step well, Adur

जाण्यासाठी :-

चिपळूण पासून पालशेत गाव ४५ किलोमीटर अंतरावर आहे. चिपळूणहून थेट पालशेतला जाण्यासाठी फ़ार कमी एसटीच्या बसेस आहेत. त्यामुळे चिपळुहून दर अर्ध्या तासाला सुटणार्‍या चिपळूण - गुहागर एसटीने शॄंगारतळी किंवा मोडका आगार याठिकाणी उतरुन रिक्षा अथवा वडापने पालशेतला जाता येते.

पालशेत गावातून दोन मार्गांनी सुसरोंडीच्या गुहेत जाता येते.

१)  पालशेत गावातून एक रस्ता पोमेंडी गावाकडे जातो. या रस्त्यावर बौद्धवाडी, बारभाई आहे. या बौद्धवाडीतून  एक प्राचीन वाट सुसरोंडीच्या सड्यावर जाते. या चढाईच्या मार्गाने गुहेपर्यंत जाण्यास पाऊण ते एक तास लागतो.

२)  पालशेत गावातून पक्का रस्ता निवोशीला जातो . या रस्त्यावर एक मोबाईल टॉवर आहे त्याजवळून एक वाट सड्यारुन सुसरोंडीच्या गुहेजवळ जाते. या मार्गाने मोबाईल टॉवर ते गुहेपर्यंत जाण्यास अर्धा तास लागतो.

पालशेत गावातील पुरातन अवशेषांचा नकाशा, 
Map by Mahendra Govekar

Ref :- 1) Acheulian cave at Sursondi, Kokan Maharashtra, by Ashok Marathe , Paper published in ,Current Science Vol 90 No 11,  10 June 2006.

2) भारताची कुळकथा :- डॉ. मधुकर केशव ढवळीकर

3) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती :- डॉ. गो.ब. देगलूरकर


Water stream near cave, Susrondi

केनियातील सुस्वा माउंटन येथे लाव्हारसामुळे तयार झालेल्या गुहेतून केलेला थरारक प्रवास वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

छत्तीसगड मध्ये लाईमस्टोन मध्ये तयार झालेल्या गुहेतून केलेला थरारक प्रवास वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

Photos by :- Amit Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5

Map :- Mahendra Govekar © Copy right