Thursday, September 20, 2018

बेळगांवच्या आसपासचे किल्ले . (Forts near Belgaum)



हडपीची विहिर, सडा किल्ला 

बेळगाव उर्फ वेणुग्राम हे शहर इसवीसनाच्या बाराव्या शतकात रट्ट सामराज्याच्या राजधानीचे शहर होते. त्यानंतर मध्ययुगापासून एक व्यापारी पेठ म्हणून बेळगाव प्रसिद्ध होते. गोवा, वेंगुर्ले इत्यादी बंदरात उतरणारा माल चोर्लेघाट, आंबोली घाट , खोकरल घाट इत्यादी घाटमार्गां व्दारे घाट माथ्यावरच्या बेळगांव या पेठेत येत असे. त्यामुळे हा व्यापारी मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी यामार्गावर वेगवेगळ्या राजवटीत किल्ले बांधले गेले . व्यापारीमार्गावरील या  किल्ल्यांची साखळी थेट बंदरापासून ते बाजारपेठे पर्यंत होती. अग्वाद, तेरेखोल , यशवंतगड असे किनाऱ्यावरचे किंवा खाडीच्या मुखावरचे किल्ले जलमार्ग आणि बंदरे सुरक्षित ठेवत असत . त्यानंतर  घाटमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी मनोहर मनसंतोषगड , नारायणगड , महादेवगड , सडा इत्यादी किल्ले बांधले होते. घाटमाथ्यावर पोहोचल्यावर तेथील मार्ग सुरक्षित राखण्यासाठी महिपालगड , गंधर्वगड , कलानिधीगड, राजहंसगड इत्यादी किल्ले बांधले गेले. खुद्द बाजारपेठेचे रक्षण करण्यासाठी बेळगावचा किल्ला बांधला होता.व्यापारीमार्ग हा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असल्यामुळे वेगवेगळ्या राजवटीत या किल्ल्यांची बांधणी , मजबूतीकरण झाले.   

विहिर, वल्लभगड
बेळगावच्या आसपासच्या किल्ल्यांच्या भटकंतीत आम्ही सध्याच्या बेळगाव जिल्ह्यातील ७ किल्ले दोन दिवसात पाहायचे ठरवले होते. सडा किल्ला, राजहंसगड (येल्लुरचा किल्ला), बेळगावचा किल्ला, काकती गड, होन्नुरगड, पाच्छापूर गड, वल्लभगड हे किल्ले पाहायचे असे नियोजन केले होते. बेळगाव जवळील महाराष्ट्रातील महिपालगड, गंधर्वगड, कलानिधीगड, सामनगड, रामतिर्थ, नेसरीचे स्मारक यापूर्वी पाहून पाहून झालेले होते. ते परत पाहायचे असल्यास अजुन एक दिवस हाताशी असणे आवश्यक होते. तो नसल्याने या न पाहीलेल्या किल्ल्यांवरच लक्ष केंद्रीत केले.

महाराष्ट्राच्या कानकोपर्‍यात भेटणारी लालपरी.

दरवेळी डोंबिवलीतून किल्ले पाहायला निघतो. यावेळी मालवणहून निघालो होतो. पहिला किल्ला होता सडा. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर हा किल्ला आहे. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे सडा किल्ल्याच्या महाराष्ट्राच्या बाजूच्या मांगेली गावातून एक कच्चा रस्ता झालेला आहे आणि त्या रस्त्याने गाडीने थेट सडा गावात जाता येते. त्यानुसार बांदा - दोडामार्ग मार्गे मांगेली घाटाने मांगेली गाव गाठले. या मार्गावर दोडामार्ग ते फ़णसवाडी या एसटीच्या बसेस दिवसातून तीन वेळा धावतात. मांगेलीचा धबधबा गोव्याच्या पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तेही शनिवार रविवार येथे भरपूर गर्दी असते. त्यामुळे इथे नाश्ता, चहा जेवण देणारी घरगुती हॉटेल्स उघडली आहेत. इथे पोहोचल्यावर कळले की, सडा गावाला जाणारा कच्चा रस्ता पावसाळ्यात ढासळलेला आहे. त्यामुळे गाडी सडाला जाऊ शकणार नाही. मग गाडी तिथेच ठेउन गावातल्या लोकांनी दाखवलेल्या पायवाटेने मांगेली गावा मागचा डोंगर चढायला सुरुवात केली. थोडी उंची गाठल्यावर तिलारी धरण आणि आजूबाजूचा दाट जंगलाचा प्रदेश दिसायला लागला. अर्ध्या तासात सडा गावात पोहोचलो. सडागावातील सडेकर काकांनी किल्ला आणि परिसर दाखवायला आमच्या बरोबर यायचे मान्य केले. गाव जरी कर्नाटकात असले तरी सर्व गावकरी अस्खलित मालवणी बोलत होते. गावत पाचवी पर्यंत एक कानडी आणि एक मराठी शाळा आहे. पण शाळेत विद्यार्थी नसल्याने त्या बंद आहेत. सडा गावतील मुलेमुली आम्ही आलो त्या पायवाटेने रोज डोंगर चढून - उतरुन महारष्ट्रातील मांगेली गावात शाळेत जातात. तिथे दहावी पर्यंत शाळा आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांची मुले गोव्याला शाळेत जातात. बेळगावशी त्यांचा संबंध केवळ शासकीय कामासंबंधी येतो. बेळगावहून सडाला थेट एसटीची सेवाही नाही. अशा प्रकारे मनाने आणि बोलीभाषेने महाराष्ट्रात आणि केवळ शरीराने कर्नाटकात असलेल्या सडेकर काकांनी आम्हाला संपूर्ण किल्ला आत्मियतेने दाखवला.

1)  सडा किल्ला (Sada Fort)

सडा किल्ला

वाडा , सडा किल्ला

सडा किल्ला :- सडा गावाची वस्ती किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. या वस्तीत देसाईच्या घराजवळ एक सुंदर पायऱ्यांची विहीर आहे. गावतले लोक हडपीची विहिर म्हणून या विहिरीला ओळखतात. विहीर चावीच्या आकाराची असून दोन स्तरात आहे . १८ पायऱ्या उतरुन गेल्यावर आपण विहीरीच्या पहील्या टप्प्यावर पोहोचतो.  याठिकाणी विहिरीच्या भिंतीत ठरावीक अंतरावर ३ फूट उंचीचे कमान असलेले (एक माणूस बसू शकेल इतक्या उंचीचे) कोनाडे आहेत . या भागातून विहिरीला संपूर्ण फ़ेरी मारता येते . पुन्हा पायऱ्यावर येउन खाली उतरल्यावर कमान असलेला दरवाजा आहे . त्यातून पाण्यापर्यंत जाता येते. ही सुंदर विहिर पाहून गावातील विठ्ठल मंदिर गाठाले. मुक्कामास हे मंदिर योग्य आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूची पायवाट राजवाड्याकडे जाते. या ठिकाणी एक पडका चौसोपी वाडा आहे. या वाड्यात पावणाई देवीचे ठाणे आहे. या वाड्याच्या बाजूला काही पडक्या वाड्यांचे अवशेष आहेत . वाडा पाहून पुढे गेल्यावर आपण होळीच्या माळावर पोहोचतो. याठिकाणी सडा गावातील लोक होळी पेटवतात. माळावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची पहिली तटबंदी लागते. तटबंदीतून आत आल्यावर उजव्या बाजूने चालत गेल्यावर एक बांधीव मार्ग दिसतो. हा मार्ग तटबंदी बाहेरील विहिरीकडे जातो. किल्ल्यावर पाण्याची सोय नसल्यामुळे किल्ल्या बाहेरून पाणी आणण्यासाठी हा बांधीव मार्ग बांधलेला होता. विहिर पाहून परत आल्या मार्गाने परत येउन किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ल्याच्या दरवाजाचे दगड या मार्गावर पडलेले आहेत. गोमुखी दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. त्या ओलांडून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला तटबंदीत एक कमानदार खिडकी आहे . त्यातून खालचे मांगेली गाव, तिलारी धरण आणि दूरवरचा प्रदेश दिसतो. टेहळणीसाठी या खिडकीची योजना केलेली आहे. या खिडकीच्या समोरच्या बाजूला असलेल्या दरवाजातून आपण गडमाथ्यावर पोहोचतो. येथून डाव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने पुढे चालत गेल्यावर दुसऱ्या बुरुजावर एक ओतीव तोफ आहे. किल्ल्याचा आवाका त्यामानाने छोटा आहे. अर्ध्या तासात किल्ला पाहून झाला. 

Cannon on Sada Fort

सडा किल्ल्यासमोरील डोंगरावर एक गुहा आहे. तसेच सडा गावापासून २ किलोमीटरवर एक धबधबा आहे. फक्त सडा किल्ला बघायचा असल्यास या दोन्ही गोष्टी पाहाणे शक्य होते पण आम्हाला आज राजहंसगड आणि बेळगावचा किल्ला पाहायचा होता. त्यात सडाला येणारा रस्ता कोसळला असल्याने आम्हाला मांगेली घाट उतरुन तिलारी घाट चढून बेळगाव मार्गे राजहंसगड गाठावा लागणार होता. (सडा ते राजहंसगड अंतर ६८ किलोमीटर आहे) सकाळी लवकर निघाल्याने वाटेत कुठे नाश्ता केला नव्हता. आता पोटात कावळे ओरडायला लागलेले. रस्त्यात भेडशी हे त्यातल्या त्यात मोठे गाव होते. तिथे एकमेव हॉटेल होते त्याने सांगितले जेवणाच्या वेळी  फक्त उसळपाव मिळेल. दुसरा पर्याय नसल्याने उसळ पाव खाऊन आणि लिंबू सोडा पिउन जठराग्नी तात्पुरता थंड केला. तिलारीघाट चढून बेळगावमार्गे १४ किलोमीटर वरील येल्लुर गाठले. येल्लूर गावाजवळ राजहंसगड आहे. किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत पक्का रस्ता आहे.


2) ऱाजहंसगड (येल्लुरचा किल्ला) (Rajhansgad , Yellur Fort)


Entrance Gate of Rajhansgad

Entrance Gate of Rajhansgad

Rajhansgad (Yellur Fort)

Siddheshwar Temple, Yellur fort
ऱाजहंसगड :- राहजंसगडाला त्याच्या पायथ्याच्या गावमुळे येल्लुरचा किल्ला म्हणून लोक ओळखतात. किल्ल्याचे प्रवेशव्दार गोमुखी आहे. प्रवेशव्दारातून आत प्रवेश केल्यावर समोर सिध्देश्वराचे जीर्णोद्धारीत मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला पाण्याची टाकी आहे . टाकीच्या आत कमानी आहेत. सध्या लोखंडी जाळी लावून ती टाकी झाकलेली आहे. टाकीच्या बाजूला एका वास्तूचे अवशेष आहेत ते दारु कोठार असावे. त्याच्या पुढे सध्या केवळ तळघरच शाबूत असलेली एक वास्तू आहे. या वास्तू जवळील तटबंदीत चोर दरवाजा आहे. सुधागड किल्ल्याच्या चोर दरवाजासारखी याची रचना आहे..चोर दरवाजा पाहून थोडे पुढे गेल्यावर तटबंदीत इंग्रजी L आकाराची खोली आहे. सिध्देश्वर मंदिराच्या बाजूला एक विहिर आहे. त्याच्या बाजूला पाणी साठवण्यासाठी दगडी धोणी आहे. फांजीवरुन किल्ल्याला संपूर्ण प्रदक्षिणा घालून आपण पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो. 
किल्ल्याच्या इतिहासात डोकावले तर रट्ट घराण्याने बेळगाव या आपल्या राजधानीला येणार्‍या मार्गाचे रक्षण करण्यासाठी राजहंसगड बांधला. त्यानंतर आदिलशाहीच्या काळात असाद खान लारी या पर्शियन सरदाराने त्याला आजचे स्वरुप दिले. हा किल्ला विजयनगर, बहामनी, आदिलशाही, मोगल, मराठे इत्यादी विविध राजवटींच्या अधिपत्याखाली होता. या किल्ल्यावर ३ लढाया झाल्या आहेत. पहीली लढाई पेशवे आणि सावनूरचे नवाब यांच्यात झाली . दुसरी लढाई पेशवे आणि टिपू सुलतान यांच्या मध्ये झाली . तिसरी लढाई भिवगड आणि राजहंसगडच्या सैन्यात झाली होती. किल्ला आजही उत्तम स्थितीत ठेवलेला आहे. त्यामुळे पाहून समाधान झाले. 

3) बेळगावचा किल्ला (Belgavi Fort)

Belgaum Fort entrance gate

Belgavi Fort

Kamal Basadi jain Temple, Belgavi Fort

Carving on ceiling of  Sabhamandapa in Kamalbasadi jain temple, Belgaum

Shiva Temple, Belgaum Fort

Shiva Temple at Belgavi Fort
बेळगावचा किल्ला :- आजच्या लांबलेल्या दिवसातला तिसरा किल्ला होता बेळगावचा किल्ला. बेळगाव शहराच्या मध्यभागे हा किल्ला आहे. किल्ला मिल्ट्रीच्या ताब्यात असल्याने उत्तम स्थितीत ठेवलेला आहे. किल्ल्याच्या बाहेरील बाजूस खंदक खोदलेला आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला अंबाबाई व गणपतीचे प्राचीन मंदिर लागते. या ठिकाणी पहारेकर्‍यांसाठी अनेक देवडया आहेत. किल्ल्याच्या अंर्तभागात अदिलशहाच्या काळात बांधलेल्या अनेक इमारती आहेत. प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या इमारतीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कचेर्‍या आहेत. तेथून पुढे गेल्यावर प्रवेशद्वारसदृश्य कमानीचे बांधकाम दिसते. यापुढील भागात मराठा लाइट इंन्फन्ट्रीचा कँप व लष्कराचे भरती केंद्र लागते. भरती केंद्राच्या बाजूला "कमल बसदी" नावाचे इसवीसन १२०४ मध्ये बांधलेले जैन मंदिर आहे. काळया ग्रॅनाइट दगडात बांधलेले हे मंदिर शिल्पकलेचा एक अजोड नमुना आहे. या मंदिरात नेमिनाथांची मुर्ती आहे. या मंदिरातील दगडी झुंबर पाहाण्यासारखे आहे. या झुंबरात कोरलेल्या कमळामुळे या मंदिराला कमल बसदी या नावाने ओलखले जाते. पुरातत्व विभागाने या मंदिराचा जिर्णोध्दार केलेला आहे. या मंदिराच्या बाजूला चालुक्य शैलीतील अनेक हिंदू मंदिरेही आहेत, परंतु या मंदिरातील मुर्ती गायब आहेत. किल्ल्यामध्ये अदिलशाही काळात बांधलेल्या साफा व जामिया या नावाच्या दोन मशीदी आहेत.

Donna Biryani , Belgavi

दिवसभर झालेली पायपीट आणि कुपोषणावर उपाय म्हणून बेळगावतल्या डोना बिर्याणीमध्ये बिर्याणीवर ताव मारला. याठिकाणी केळीच्या पानापासून बनवलेल्या भांड्यात बिर्यानी आणून देतात. जस्त तिखट, तेलकट नसलेल्या या बिर्यानी चव छान होती आणि भरपूरही होती.दुसऱ्या दिवशी चार किल्ले पाहायचे होते. सकाळी नाश्ता करुन काकती किल्ल्याकडे निघालो. 

4) काकती किल्ला (Kakati Fort)

Kakati Fort, Belgaum District

Steps to kakati Fort Belgavi

काकती किल्ला :- मुंबई बंगलोर महामार्गावर बेळगावच्या अलीकडे ११ किलोमीटर अंतरावर काकती गाव आहे. गावाच्या मागे किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायऱ्यांपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे.बेळगाव या महत्वाच्या शहरावर आणि शहराकडे जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी काकती किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. हा टेहळणीचा किल्ला असल्याने यावर फारसे बांधकाम नसावे. आज या किल्ल्याचा एकमेव बुरुज आणि त्याला लागून असलेली थोडीफार तटबंदी शिल्लक आहे. या बुरुजापर्यंत जाण्यासाठी सिमेंटमध्ये २५१ पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. किल्ल्यावर वनखात्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलेले आहे . पाणी अडवण्यासाठी जागोजागी चरही खोदलेले आहेत . त्यामुळे किल्ल्यावर फिरणे मुश्किल झालेले आहे. त्यामुळे किल्ल्यावर इतर काही अवशेष आढळत नाहीत. किल्ल्यावरुन बेळगाव शहर दिसते.

5) होन्नुर गड  (Honnur Fort)


Honnur Fort, Belgaum District

Entrance of Honnur Fort , Belgavi District

Hidkal Dam from entrance of Honnur Fort

Honnur Fort & Hidkal Dam

होन्नुर गड :- काकती किल्ल्याच्या पुढचा किल्ला होता होन्नुर गड. बेळगाव जिल्ह्या घटप्रभा नदीवर बांधलेल्या हिडकल धरणाच्या काठावर होन्नुर हा किल्ला आहे. धरणामुळे तीनही किल्ल्याच्या तीन बाजूला पाणी आहे . त्यामुळे लाल चिर्यामध्ये बांधलेला हा किल्ला एखाद्या चित्रासारखा सुंदर दिसतो. किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या विठ्ठल भवन नावाच्या सर्कीट हाउस पर्यंत पक्का रस्ता बनवलेला आहे. तेथून किल्ल्याच्या तटबंदी पर्यंत जाण्यास चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात. तटबंदी डावीकडे ठेवत दोन बुरुज पार केल्यावर किल्ल्याचा पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजा आहे. हा दरवाजा दोन भक्कम बुरुजांच्या मध्ये लपवलेला आहे. किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी लाल चिर्यात बांधलेली आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर किल्ल्याचा संपूर्ण पसारा दृष्टीपथात येतो. या किल्ल्याची निर्मिती टेहळणीसाठी केल्याने किल्ल्यावर मोठ्या वास्तू नसाव्यात त्यामुळे किल्ल्यावर फ़ारसे अवशेष आढळत नाहीत. तटबंदीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारतांना हिडकल डॅमचा पसारा लक्ष वेधून घेतो. किल्ल्याच्या पश्चिमेला होन्नुर गाव आहे. त्यावरुन किल्ल्याला होन्नुर नाव पडलेले आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला झेंडा बुरुज आहे. त्याच्या जवळ किल्ल्याचा होन्नुर गावाच्या दिशेला उतरणारी वाट आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी दरवाजा असावा. आज मात्र तो अस्तित्वात नाही . तटबंदीवरुन फिरुन प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. गडावर पाण्याचे टाक / तलाव आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था कशी होती याचा अंदाज येत नाही. किल्ला आणि त्याचे आजचे स्थान दोन्ही सुंदर असल्याने किल्ल्यावरुन पाय निघत नव्हता. पण अजून दोन किल्ले बाकी होते. उन चढायलाही सुरुवात झाली होती. होन्नुर किल्ल्याच्या पुढे १४ किलोमीटरवर पाच्छापूर किल्ला आहे. 

6) पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)

Pachhapur Fort, Belgavi Dist

Pachhapur Fort, Belgavi Dist

पाच्छापूर किल्ला :- पाच्छापूर म्हणजेच पातशहापूर या गावातील टेकडीवर एक किल्ला आहे. एकेकाळी सुंदर आणि बुलंद असलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था दयनीय आहे.  गावाच्या मधोमध असलेला हा किल्ला गावातल्या लोकांच्याच उपेक्षेचा धनी झालेला आहे. किल्ल्याच्या टेकडी भोवती दाट लोकवस्ती आहे. गावात शिरतानांच किल्ल्याचे बुरूज दिसायल लागतात. किल्ल्याच्या खाली गाव वसलेले आहे तेथेही तटबंदी आणि प्रवेशव्दार होती. किल्ल्यावर जाण्यासाठी गावाला वळसा घालून गावातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जातांना उत्तरेकडील प्रवेशद्वार लागते. गावात पोहोचल्यावर दाट वस्तीमुळे किल्ल्यावर जाणारा रस्ता मिळत नव्हता. शाळे समोर असलेल्या पुस्तकाच्या दुकानात चौकशी केल्यावर त्याने किल्ल्यावर काही नाही उगाच कशाला जात वगैरे नेहमीची पालुपद चालू केली. किल्ल्याचा रस्ता इंग्रजी शाळेतून जातो अस तिथे असलेल्या एका माणसाने सांगितले. पण रविवार असल्याने शाळेच्या गेटला कुलूप होते. मग चावी शोधण्याची मोहीम चालू झाली. आत्ता पर्यंत आम्ही मालवणहून किल्ला पाहायला आलोय ही गोष्ट कळल्यामुळे बरेच लोक शोध मोहीमेत सामिल झाले थोड्या वेळाने कळाले की ज्या मास्तरांकडे चावी आहे ते दुसर्‍या गावाला गेले आहेत. मग शाळेतल्या दोन मुलांनी पुढाकर घेऊन दुसरा रस्ता दाखवायला ते आमच्या बरोबर आले. शाळेच्या पुढे गेल्यावर एका दर्ग्याकडे जाणारा रस्ता आहे. हाच किल्ल्याला जाणारा राजमार्ग होता. याठिकाणी अतिशय रुंद पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. या पायऱ्यानी वर चढून गेल्यावर आपण थेट किल्ल्याचा भव्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दारावर दोन बाजूला दोन शरभ, दोन कमळ कोरलेली आहेत. प्रवेशव्दारा समोर वरच्या बाजूला एक बुरुज आहे. प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी त्याची योजना केलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर रस्ता काटकोनात वळतो . याठिकाणी दोन्ही बाजूला पाहारेकर्यांसाठी कमानदार देवड्या आहेत . या देवड्यांच्या बाजूला प्रवेशव्दाराच्या समोरच्या बाजूला एक छोटा दरवाजा आहे. मुख्य दरवाजा बंद असताना त्याचा दिंडी दरवाजा म्हणून वापर होत असावा. शाळेच्या मागून येणारी वाट या छोट्या दरवाजातून येते. राजमार्ग असतानांही गावातले लोक आम्हाला त्या अवघड वाटेने का जायला सांगत होते त्यांनाच माहिती. आमच्या बरोबर आलेल्या शाळेतल्या मुलांनाही शाळेमागे असलेला किल्ला माहित नव्हता. ते किल्ल्यावर कधी आलेही नव्हते. किल्ल्यावर बाभळीच्या झाडीचे रान माजलेले आहे त्यातून फिरणे मुश्किल झालेले आहे. त्यामुळे इच्छा असूनही किल्ल्यावरील इतर अवशेष पाहाता आले नाहीत. किल्ल्याची अवस्था आणि गावकर्‍यांची नकारत्मकता बघून बाईट वाटले.

7) वल्लभगड  (vallabhgad)

Vallabhgad Fort

Entrance of Vallabhgad Fort

वल्लभगड मी ट्रेक क्षितिज सोबत २००७ साली पाहिला होता. त्यानंतर त्या किल्ल्याची माहिती साईटवर लिहिल्यावर वल्लभगडचे संवर्धन करणार्‍या गजानन साळुंखेंशी ओळख झाली. अजून आमची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. त्यामुळे आज भेटता येईल आणि त्यांनी सातत्याने किल्ल्यावर केलेले काम पाहाता येईल म्हणून त्यांच्याशी सकाळीच संपर्क साधला. ते स्वत: तिथे नव्हते पण त्यांनी वल्लभगड किल्ल्यावर संवर्धन करणारे श्री महेश मिलगे यांना पाठवतो असे कळवले होते. किल्ल्याच्या पायथ्याशी भरदुपारी एक वाजता महेश आम्हाला भेटला. स्वत:चा व्यवसाय असलेला महेश गेली तीन वर्ष वल्लभगडावर खूप मेहनत घेतोय . आज जो वल्लभगडाचा चेहरामोहरा बदललाय त्याचे श्रेय महेश आणि टिमचे आहे . आदल्या दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन सकाळीच संकेश्वरला आला होता. केवळ किल्ल्यावरील प्रेमापोटी तो खास संकेशवरहून आला होता. गेल्या अनेक वर्षांच्या किल्ल्यांच्या भटकंतीत असे अनेक डोंगरभाऊ भेटलेत. किल्ल्यावरील प्रेम हाच आमच्यातला समान दुवा आहे आणि किल्ल्यासाठी काहीतरी करावे हिच माफ़क अपेक्षा आहे.

Well , Vallabhgad Fort

Separated bastion on Vallabhgad Fort 

Cave & Siddheshwar Temple at Vallabhgad Fort

महेशच्या मागून आम्ही निघालो किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर बुरुजाच्या बाजूला गावदेवी मरगुबाईचे मंदिर आहे. मंदिराच्या मागून पायवाटेने चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दार गोमुखी बांधणीचे आहे. दोन भव्य बुरुजांच्या आड प्रवेशव्दार लपवलेले आहे. मुख्य प्रवेशद्वाराची कमान उत्तम स्थितीत आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच मारुतीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागे विहिरीत उतरणारी पायर्‍यांची भव्य वाट कोरुन काढलेली आहे. पायर्‍या उतरुन आत गेल्यावर दगडात कोरलेल्या कमानीतून आपला बोगद्यात प्रवेश होतो. पुढे थोड्या पायर्‍या उतरल्यावर वरुन प्रकाश येण्यासाठी झरोका ठेवला आहे तिथपर्यंत पोहोचतो. पुढे  पहिली विहिर आहे. ही विहीर एका बोगद्याने दुसर्‍या मोठ्या विहिरीशी जोडलेली आहे. या दोन्ही विहीरी आणि भव्यता आणि खोली पाहाण्यासाठी आपल्याला पुन्हा पायर्‍या चढून वर यावे लागते. विहिरी पाहून पुढे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला एक मुख्य तटबंदीपासून सुटा असलेला बुरुज पाहायला मिळतो. हा बुरुज पूर्णपणे झाडीत झाकला गेला होता. वल्लभगडाचे संवर्धन करणार्‍या शिलेदारांनी त्याला मोकळा श्वास दिला. त्यामुळे आज हा बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचे दोन बुरुज या किल्ल्यावर आहेत. दुसरा बुरुज किल्ल्याच्या पूर्व टोकावर आहे. किल्ल्याच्या आतील आणि बाहेरील भागावर नजर ठेवण्यासाठी या सुट्या बुरुजांचा उपयोग होतो. किल्ल्याची तटबंदी ज्या ठिकाणी ढासळली आहे तेथे दुर्गवीर प्रतिष्ठानने त्याची डागडूजी केलेली आहे. फ़ांजीवरुन पुढे गेल्यावर तटबंदीतले दोन संडास पाहायला मिळतात. गडाच्या उत्तर टोकावर सुटा बुरुज आहे. तो पाहून माघारी फ़िरुन पूर्वेकडच्या तटबंदीच्या बाजुने पुढे गेल्यावर पेशवेकालिन शंकराचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ तटबंदीतून खाली उतरणारी पायवाट आहे. या वाटेने खाली उतरल्यावर सिध्देश्वराची मोठी गुहा आहे. तिच्यात सिध्देश्वराचा मुखवटा आणि पादुका आहेत. गुहा पाहून परत गडावर येऊन पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. ते पूर्णपणे मातीने बुजलेले होते. त्यातील माती काढून ते पूर्णपणे मोकळे केलेले आहे. किल्ल्याच्या संवर्धनाचे काम म्हणजे मेहनत, सातत्य आणि निष्ठा यांची परिक्षा पाहाणारे असते. तरीही अनेक संस्था स्वत:चे तन मन धन अर्पून हे काम करत असतात म्हणून आपल्याला आजही सुस्थितीतले किल्ले पाहायला मिळतात. वल्लभगड वेब पोर्टल आणि दुर्गवीर प्रतिष्ठान दरवर्षी किल्ल्यावर गुढीपाडवा आणि दसरा हे सण साजरे करते. दसर्‍याला रात्री किल्ल्यावर मशाली पेट्वून किल्ला उजळवून टाकतात. 

दसरा उत्सव, वल्लभगड, फ़ोटो सौजन्य:- गजानन साळुंखे

वल्लभगड संवर्धन, दुर्गवीर प्रतिष्ठान फ़ोटो, सौजन्य:- गजानन साळुंखे 

वल्लभगड पाहून झाल्यावर दोन दिवसात ७ किल्ले पाहाण्याचा आमचा संकल्प पूर्ण झाला. महेशचा निरोप घेऊन आम्ही मालवणच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. बेळगांवच्या आसपासचे हे सात किल्ले व्यवस्थित नियोजन केल्यास मुंबई आणि पुण्याहून दोन दिवसात पाहून होतात.

Honnur Village from Honnur Fort
Entrance Gate of Sada Fort.


Monday, September 10, 2018

Offbeat Kenya हत्तींचे अनाथालय (DSWT , Elephant Orphanage center , Nairobi, Kenya)

DSWT , Elephant Orphange center , Nairobi, Kenya

अफ्रीकन आणि भारतीय हत्ती त्यांच्या सुळ्यांसाठी कायम शिकार्‍यांचे लक्ष झालेले आहेत. जगभर अनेक देशानी कायदे करुनही हस्तिदंताची तस्करी अद्याप थांबलेली नाही आणि त्यामुळे हत्तींची शिकारही . मोठ्या हत्तींची शिकार झाल्यावर लहान हत्ती अनाथ होतात. बऱ्याचदा हत्तींच्या कळपावर हल्ला झाल्यास कळप विखूरतो आणि लहान पिल्ले कळपा पासून वेगळी होतात. तिसरे कारण म्हणजे दुष्काळ अफ्रीकेत दुष्काळ तर पाचवीला पुजलेला आहे . या दुष्काळात उपासमारीने हत्तीणींचा मृत्यू होतो आणि पिल्ल अनाथ होतात. 

अशा अनाथ पिल्लांना जंगलात परत जाऊन नैसर्गिक जीवन जगण्याची संधी मिळावी या करीता १९७७ मध्ये डॉ डेन शेड्रीक हिने आपल्या नवऱ्याच्या नावाने डेविड शेड्रीक वाईल्ड लाईफ ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्ट अंतर्गत त्यांनी जखमी, कळपापासून वेगळे झालेल्या हत्तींचे आणि पाणघोड्यांचे संरक्षण करायला सुरुवात केली. त्यांना हक्काचे घर मिळवून दिले आणि त्यांना नैसर्गिक वातावरणात वाढवून जंगलात सोडण्यात आले. ट्रस्टच्या स्थापनेपासून आजपर्यंत अशाप्रकारे १५० हत्तीना मुक्त करण्यात आले आहे .

DSWT , Elephant Orphange center , Nairobi, Kenya

नैरोबी ही केनियाची राजधानी आहे. या शहरात मध्यवर्ती ठिकाणी DSWT चे Elephant Orphange center आहे . रोज सकाळी ११ ते १२ यावेळात येथे अनाथ हत्तीच्या पिल्लांची आपल्याशी भेट घडवून देण्यात येते. जगभरातील  पर्यटकांची रोज इथे झुंबड उडते. एका मोकळ्या मैदानात आपल्याला आणले जाते. मैदानाच्या एका टोकाला एक छोटेसे तळे केलेले आहे. मैदानात ठराविक अंतरावर पाण्याने भरलेले ड्रम आणि त्याच्या बाजूला झाडाच्या फांद्या ठेवलेल्या दिसतात. काही ठिकाणी मोकळी केलेली माती ठेवलेली होती. मैदानाच्या एका भागात अर्धगोल सुतळी बांधलेली होती. सुतळीच्या दोरीच्या कडेने पर्यटक उभे राहील्यावर जंगलातून एका मागोमाग एक हत्तींची पिल्ले दुडूदुडू धावत यायला लागली. काही पिल्ल तर थेट प्रेक्षकांमध्ये घुसून दोरीतून आत झेपावली .  DSWT चे कार्यकर्ते हातात दुधाच्या बाटल्या घेउन उभे होते. ५ लीटरची एक दुधाची बाटली गटागटा प्यायल्यावर ती पिल्ले थोडीशी शांत झाली. मग दुसरी बाटली पिउन झाल्यावर त्यांनी समोर ठेवलेल्या डहाळ्या तोंडात धरुन चघळायला लागली, कोणी अंगावर माती उडवत होते. पाण्याच्या ड्रम मधल्या पाण्याशी खेळण्यात सगळ्यानाच स्वारस्य होते. त्यांनी ढकला ढकली करुन एक ड्रम उपडा केला.

DSWT , Elephant Orphange center , Nairobi, Kenya

एका कार्यकर्त्याने हत्तींच्या पिल्लांची माहिती सांगायला सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे १९ हत्तींची पिल्ले आहेत. ३ महिने ते २.५ वर्षांच्या ९ हत्तींचा एक गट आणि अडीच वर्षावरील ९ हत्तींचा एक गट केलेला आहे . एक ६ महिन्याचे पिल्लू मात्र त्यांच्यात नव्हते कारण शिकार्यानी कदाचित दुसऱ्या सावजासाठी मारलेली गोळी हत्तीच्या पिल्लाच्या पायाला लागून ते कायमच जायबंदी झाले होते.  आमच्या समोर असलेल्या एका अडीच वर्षाच्या हत्तीणीची सोंड सापळ्यात अडकून जवळ जवळ तुटलेलीच होती . त्यावर दोन शस्त्रक्रिया केल्यावर आज ती हत्तीण तिच नैसर्गिक जीवन जगू शकत होती. काही पिल्लांचे पालक उपासमारीने मेले होते . काही कळपापासून वेगळी होवून जंगलात एकटी फिरताना किंवा गावात सापडली होती. आदिवासी लोकांमध्ये आणि जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये हत्ती बद्दल लोक जागृती केल्यामुळे अशा हत्तींच्या पिल्लांची माहिती ट्रस्टला मिळते आणि ते त्या पिल्लांची सुटका करुन त्यांची त्यांच्या नैसर्गिक अधिवासात काळजी घेतात आणि योग्य वयात आल्यावर त्यांना कळपाने जंगलात सोडतात. त्यानंतरही त्यांचा माग ठेवला जातो. एका हत्तीच्या पिल्लाचा पालनपोषणाचा खर्च ९००$ आहे . ते देणाऱ्यास त्या हत्तीच्या पिल्लाचे पालकत्व दिले जाते . त्याच्या नावाने हत्तीचे बर्थ सर्टीफिकेट बनवतात. वर्षातून एक दोनदा त्यांना आपल्या पाल्याला भेटता येते. वर्षभराची प्रगती तसेच जंगलात सोडल्यानंतरही हत्तीची माहिती पालकांना दिली जाते .
DSWT , Elephant Orphange center , Nairobi, Kenya

पहिल्या गटातील हत्ती गेल्यावर दुसऱ्या गटातील हत्ती आले हे मोठे असल्याने अनेकांना सुळे फुटलेले होते . धसमुसळेपणाने दुध पिउन झाल्यावर ते आधीच्या हत्तींसारखे आपापल्या उद्योगात रममाण झाले. एवढ्या सुंदर निरागस प्राण्यांची हस्तीदंतासाठी शिकार कशी करावीशी वाटते हा तिथे जमलेल्या सर्वांच्या मनात प्रश्न पडला होता आणि हेच ही भेट घडवण्या मागचे ट्रस्टचे उद्दिष्ट होते .


मसाई मारा पाहाण्यासाठी बरेच जण हल्ली केनियात जातात. तेंव्हा नैरोबी एक दिवस मुक्काम करावा लागतो. त्या मुक्कामात हत्तींचे अनाथालय आणि जिराफांसाठी काम करणारे जिराफ सेंटर यांना आवर्जून भेट द्यावी. अर्ध्या दिवसात दोन्ही ठिकाणे पाहून होतात. 

African Elephant at Masai Mara

जिराफ़ सेंटरवर वेगळा लेख लिहिलेला आहे तो जरुर वाचावा.

African Elephant at Masai Mara

Monday, September 3, 2018

Offbeat Kenya जिराफ़ांचे घर (Giraffe Center, Nairobi, Kenya)


Giraffe
जिराफ हा सध्याच्या जगात वेगळ्याच ग्रहावरुन आलेला प्राणी भासतो. त्याची लांब मान, उंची यामुळे हा प्राणी सर्वांच्या कुतुहलाचा विषय आहे. कातडी आणि अंधश्रद्धा यामुळे या प्राण्यांची शिकार होते. नैरोबी शहरातल्या लॅगाटा भागात जॉक लेस्ली मेलवाईन आणि त्याची पत्नी बेट्टीज यांनी मिळून १९७९ मध्ये AFEW अफ्रीकन फंड फॉर इंडेजर्ड वाईल्ड लाईफ ही संस्था स्थापन करुन Rothschild's giraffe जिराफ या संकटात असलेल्या जातीच्या संवर्धनाची सुरुवात केली. त्यावेळी  फक्त १२० Rothschild's giraffe जिराफ उरले होते. जॉक आणि बेट्टीने ५ वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी त्यांचे संवर्धन आणि संरक्षण केले . त्यामुळे या जिराफांची संख्या वाढून आज १५०० झालेली आहे.

Giraffe at Masai Mara
नर जिराफ़ांची उंची साधारणपणे १८ फ़ूट (यात ६ ते ७ फ़ूट लांब मानच असते) तर मादी जिराफ़ांची उंची १४ फ़ूट असते. जिराफ़ांचे वजन ७०० ते १३०० किलोग्रॅम असते. अशा उंच आणि वजनदार प्राण्याच्या शरीराला रक्त पुरवठा करणारे ह्र्दय २ फ़ूट लांब आणि ११ किलोग्रॅम वजनाचे असते. जिराफ़ांच्या फ़ुफ़्फ़ुसांची क्षमता १२ गॅलन म्हणजेच ५५ लिटर असते. (माणसाच्या फ़ुफ़्फ़ुसांची क्षमता १.५९ गॅलन म्हणजेच ६ लिटर असते. एवढ्या अवाढव्य शरीराचा भार पेलणारी पावले फ़ूटभर लांबीची असतात. जिराफ़ाला दोन शिंग असतात. ती मांसल त्वचेने झाकलेली असतात. एवढा अवाढव्य प्राणी शाकाहारी आहे. झाडाझुडूपांची पान, गवत तोडून आपल्या २१ इंच लांब जीभेने तो अन्न पोटात ढकलतो. या अन्नातून मिळणार्‍या पाण्यामुळे तो आठवडाभर पाण्या शिवाय राहू शकतो. एका कळपात साधारणपणे १० ते २० जिराफ़ असतात. त्यांचा प्रदेश ठरलेला नसतो. चरत चरत ते पुढे जात राहातात. जिराफ़ाची मादी एकावेळी एकाच पिल्लाला जन्म देते. जन्म देतांना जिराफ़ाची मादी उभी असल्याने साधारणपणे पाच फ़ूटावरुन जिराफ़ाचे नवजात पिल्लू खाली पडते. पण थोड्याच वेळात ते उठून उभे राहाते आणि कळपाबरोबर चालायला लागते. जिराफ़ त्यांच्या शत्रूशी मारामारी करण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब पळणे पसंत करतात. जिराफ़ साधारणपणे ६० किलोमीटर/ तास वेगाने धावू शकते. जिराफ़ाची अचूक लाथ सिंहासारख्या प्राण्याला यमसदनाला पाठवू शकते. 

Rothschild's giraffe
जिराफांचे केवळ संरक्षण आणि संवर्धन करुन ते थांबले नाहीत तर जिराफा बद्दल केनियातील आणि जगभरातील मुलांना आणि मोठ्या माणसाना माहिती व्हावी. त्यांना जवळून पाहाण्याची , खाऊ घालण्याची संधी मिळावी या करीता त्यांनी त्यांच्या लॅगाटा मधील जागेत जिराफ सेंटरची स्थापना केली. दररोज सकाळी ९ वाजता जिराफ सेंटर उघडते. खास तयार केलेल्या लाकडी डेकवर आपल्याला नेले जाते. वाटेत बादल्या मधून जिराफाना खाण्यासाठी खास बनवलेल्या बोटाच्या आकाराच्या  काड्या  ठेवलेल्या असतात. त्या काड्या घेऊन त्या लाकडी डेकच्या गॅलरीत उभे राहील्यावर जंगलातून जिराफ येतात. मग आपल्या हातातील काड्या आपण जिराफाना भरवू शकतो. जिराफ़ांना भरवतांना काही काड्या खाली पडतात. त्या खाण्यासाठी तेथे रानटी डुककर (Warthog) आहेत. Warthog ना पाहीले की Lion King या प्रसिध्द Animation पटातील "हकुना मटाटा" हे प्रसिध्द गाण आठवते. "हकुना मटाटा" या स्वाहिली भाषेतील म्हणीचा अर्थ आहे. "No Problem, No worries". रानटी डुककर (Warthog) हे नेहमी इतर कुठल्या तरी प्राण्यांच्या कळपा बरोबर आढळ्तात. याचे कारण म्हणजे त्यांची स्मरणशक्ती. या रानडुकराचा मेंदू इतका लहान असतो की त्याला ३० सेकंदानंतर आपण आधी काय आणि कशासाठी करत होतो तेच आठवत नाही. म्हणजे समजा हे रानडुक्कर आपल्या मागे लागले आणि आपण सलग तीस सेकंदापेक्षा जास्त वेळ पळालो तर, नंतर रानडुकराला आठवत नाही आपण का धावतोय आणि ते त्याच्या नॅचरल इंस्टींगने ते अन्न शोधायला लागते. एखादा शिकारी प्राणी मागे लागल्यावर सुध्दा असे होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे रानडुक्कर इतर प्राण्यांच्या कळपा बरोबर राहातात. शिकार्‍याने पाठलाग केल्यावर सर्व कळप पळत सुटतो आणि त्याबरोबर रानडुक्कर धावत राहातात आणि त्यांचे प्राण वाचतात. 

रानटी डुककर (Warthog) 
Warthog & Rothschild's giraffe at Giraffe Center
आम्ही उभे होतो त्या ठिकाणी "सलमा" नावाची सात वर्षाची जिराफ आली. आपल्या लांब जीभेने ती आमच्या हातातल्या काड्या ओढून पोटात ढकलायला लागली. इतर तृणभक्षक प्राण्यांप्रमाणे जिराफही आधी पटापट खाऊन घेतो आणि नंतर रवंथ करतो. जिराफा सारखा उंच आणि मोठा प्राण्याच्या चेहऱ्यावरचे भाव, हालचाल पाहाण्याची संधी जिराफ सेंटरमुळे मिळाली. काही लोकांनी त्या काड्या आपल्या तोंडात धरुन जिराफाना भरवल्या त्याला " जिराफ किस"  म्हणतात. जिराफाला भरवताना खाली पडलेल्या काड्या खाण्यासाठी तिथे रानडुक्करे जमलेली होती. खाली पडलेल्या काड्या त्या पटापट संपवत होती.

Giraffe Feeding at Giraffe Center Nairobi

Giraffe Kiss at Giraffe Center Nairobi

गॅलरीच्या आतल्या बाजूला जिराफ इंफॉर्मेशन सेंटर होते. या ठिकाणी  जिराफा बद्दल इत्थंभूत माहिती मिळाली. अफ्रिका खंडात जिराफांचे ३ प्रकार आहेत. मसाई जिराफ, Rothschild जिराफ आणि रेटीक्युलेटेड जिराफ. यातील मसाई जिराफ आणि Rothschild जिराफ हे केनियाच्या दक्षिण भागात सापडतात. तर रेटीक्युलेटेड जिराफ वाळवंटी प्रदेशात आढळतात. त्यांच्या अंगावरच्या खुणांवरुन (पॅटर्न) वरुन त्यांना वेगवेगळे ओळखता येते. मसाई जिराफाच्या अंगावर चांदणी सारख्या आकाराच्या खुणा असतात तर इतर दोन प्रकारच्या जिराफांच्या अंगावर चौकोनी खुणा असतात. त्यातही Rothschild जिराफाच्या अंगावर ब्लड स्पॉट्स असतात. त्यामुळे ते वेगळे ओळखता येतात.
Giraffe leg bone ( Real fear for predators)

Worthog's skull

Giraffe's  jaw

Giraffe Information at Giraffe Center

 जिराफाच्या लांबलचक मानेत फक्त सात हाडे (मणके) असतात. त्यावर या लांबलचक मानेचा डोलारा उभा असतो. मानेपासून शेपटीपर्यंत एकूण पन्नास हाडे असतात. ही हाडे जिराफांच्या वेगवेगळ्या जातीत थोडी कमीजास्त असतात. जिराफाच्या पायाचे हाड तिथे ठेवलेले होते. या मजबूत आणि जड हाडाच्या धसका त्याच्यावर हल्ला करणाऱ्या प्राण्यांनी घेतलेला असतो. कारण जिराफाची एक अचूक लाथ त्या प्राण्याला कायमची जायबंदी करु शकते.



Souvenir Shop, Giraffe Center
जिराफ हा शांत प्राणी आहे. कळपातील श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी नरामध्ये जी मारामारी होते त्यात ते एकमेकांच्या मानेला विळखा घालून डोक्याने टक्कर देतात आणि यात हरलेला नर माघार घेतो. अशा शांत प्राण्याचीही कातडीसाठी शिकार केली जाते . काही आदिवासी जमातीत जिराफांची शिकार केल्यास स्वर्ग प्राप्त होतो अशी अंधश्रद्धा आहे . त्यामुळे आजच्या काळात अशा प्रकारच्या जिराफ सेंटरची आवश्यकता आहे. मसाई माराला हल्ली बरेच पर्यटक भारतातून जातात. त्यांना एक दिवस नैरोबीत मुक्काम करावा लागतो. त्यांनी जिराफ सेंटर आणि एलिफंट ऑर्फनेज सेंटर ही दोन्ही ठिकाणे आवर्जून पाहावीत. जिराफ़ सेंटर ठिक ९.०० वाजता उघडते आणि संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत पर्यटकंसाठी खुले असते. एलिफंट ऑर्फनेज सेंटर मात्र फ़क्त ११.०० ते १२.०० वाजेपर्यंत उघडे असते. त्यामुळे सकाळी लवकर जिराफ़ सेंटर पाहून एलिफंट ऑर्फनेज सेंटर पाहायला जावे.

Giraffe at Masai Mara
Elephant Orphanage Center , Nairobi यावर " हत्तींचे अनाथालय" हा लेख लिहीलेला आहे .

Thursday, August 16, 2018

केनियन सफारी -३ (मारा नदीच्या परिसरात) Kenya Safari - 3 (Mara River and How to plan budget Kenya Safari)

Hippopotamus at Mara River

आमचा गाईड कम ड्रायव्हर सायमन काल म्हणाला होता , उद्या आपण अर्ली मॉर्निंग सफारी करुया. नाश्ता करुन आम्ही ६ ३० ला निघालो. आज आम्ही मारा नदी पर्यंत जाणार होतो. मारा नदी ही टांझानिया आणि केनियातील अभयारण्यांची जीवनदायिनी आहे . मारा अभयारण्याच्या गेटपासून मुख्य रस्ता थेट मारा नदी पर्यंत गेलेला आहे . इथे एके ठिकाणी केनिया टांझानियाची बॉर्डर मिळते . काल रात्री भरपूर पाऊस पडल्यामुळे सगळीकडे चिखल असेल अस वाटले होते . पण पाण्याचा निचरा झालेला होता. रस्त्याच्या बाजूला पाणी जाण्यासाठी जो चर खोदला होता त्यावर अनेक प्राण्यांच्या आणि पक्षांच्या पायाचे ठसे उमटले होते. मसाई मारा अभयारण्यात केवळ प्राणीच नाही तर पक्षीही मोठ्या प्रमाणावर आढळतात. Ant eater Chat, African roller, Green bee eater, pigions, अनेक प्रकारचे Storks, Herons, Egrets, Robin, Vulturers, falcon, Grass hawk, swifts, Starlings  असे काही परिचित तर काही अपरिचित पक्षी दिसत होते .  

Egyptian Goose, Masai Mara



Superb Starling, Masai Mara

वायरलेसवर मेसेज आल्याने सर्व गाड्या एका आड रस्त्यावर वळल्या . समोरच्या गवताळ मैदानात सिंहाचे ८ छावे बसलेले होते. काल एकाच वेळी ५ छावे बघितले होते . आज एकदम आठ छावे बघून हरखून गेलो. त्यांचे निरीक्षण करताना काही गोष्टी लक्षात आल्या. सगळ्यात पुढे बसलेला छावा दूरवर नजर लावून बसलेला होता. थोडावेळ निरीक्षण करुन त्याने गवतातून चालायला सुरुवात केली. तो/ती  चालायला लागल्यावर इतरांनी चालायला सुरुवात केली. ठराविक अंतर चालल्यावर म्होरक्या थांबत होता आणि पुढील अंदाज घेत होता. सगळ्यात मागे असलेल्या दोघांना मात्र त्याच्याशी काही देणघेण नसावे . शाळेत शेवटच्या बेंचवर बसलेल्या मुलांसारखे ते एकमेकांशी लुटूपुटूची मारामारी करण्यात गढलेले होते. म्होरक्याने मुख्य रस्ता ओलांडला आणि तो परत कुरणात शिरला. आम्ही सुध्दा आमची गाडी त्यांच्या मागे घेतली. हळूहळू एक एक जण मुख्य रस्ता ओलांडून रस्त्या पल्याडच्या कुरणात शिरत होते. दोन मस्तीखोर छावे मात्र मागेच मस्ती करत होते. बऱ्याच वेळाने त्यांच्या लक्षात आले की, आपले इतर साथीदार पुढे गेले. मग ते आरामात रस्ता ओलांडून कुरुणात आले . दोघांनी परत मस्ती चालू केली. म्होरक्याने आता दिशा बदलली आणि तो पुढे चालायला लागला. त्या दिशेला एक ओढा होता. ओढ्याच्या पलिकडे एक हिरवे  कुरण आणि त्यामागे टेकडी होती. त्या कुरणात ४ टापी हरण चरत होती. म्होरक्या ओढ्यापाशी पोहोचल्यावर हरणांना त्यांचा वास आला असावा. कारण गवत उंच असल्याने छावे दिसणे शक्य नव्हते . हरणांनी चरणे सोडून टेकडीकडे धाव घेतली आणि अर्धी टेकडी चढल्यावरच त्यांनी दम घेतला . सुरक्षित अंतरावर गेल्यावर त्यांनी छावे होते त्या दिशेकडे पाहीले आणि परत पळायला सुरुवात केली. इकडे छाव्यानी एका मागोमाग एक ओढा ओलांडला . हरणं आपल्या टप्प्या बाहेर गेली आहेत हे म्होरक्याच्या लक्षात आल्यावर त्याने दिशा बदलली इतका वेळ सांभाळलेल गांभीर्य सोडून तोही इतरांबरोबर दंगा मस्ती करायला लागला. 

Lion Cubs , Masai Mara

Lion Cubs , Masai Mara

आम्ही पुढे निघालो. एका झाडाच्या बुंध्यावर एक निळ्या रंगाचा सुंदर सरडा (Agma Lezard male) सकाळच्या उन्हात अंग शेकत बसला होता. त्याची मादी तपकिरी रंगाची असते. गवतातून एक मुंगूस बाहेर आले आणि आमच्याकडे पाहून त्याने रस्ता ओलांडला. सकाळीच मुंगूस दिसल्यावर दिवस चांगला जातो म्हणतात. मसाई मारा सारख्या जंगलात रोजच चांगला दिवस असतो काहीना काही न पाहिलेल दिसत असते. वेगळ घडत असते. 
Masai Giraffe, Masai Mara

Masai Giraffe, Masai Mara

गाडी आता एका सुनसान रस्त्यावर धावायला लागली . सायमनही या भागात सहजा येत नाही अस म्हणाला. मसाई माराचा स्टॅंडर्ड प्रोग्राम दिड दिवसाच्या असल्याने मुख्य रस्त्याच्या आजूबाजूलाच सगळे फिरत असतात . अचानक बाजूच्या झुडूपातून एक जिराफ बाहेर आला आणि आमच्या समोर रस्ता ओलांडून निघून गेला. डाव्या बाजूला झुडपांच्या आड एक नव्हे तब्बल ९ जिराफ चरत होते. आमची गाडी रस्त्यात असल्याने रस्ता कसा ओलांडावा असा त्यांना प्रश्न पडला असावा. झुडूपांच्या वरुन डोकावून ते आमच्याकडे अधूनमधून पाहात चरत होते. आमच्या समोर रस्ता ओलांडून गेलेला जिराफ दरी उतरून समोरच्या टेकडीवर चढून गेला तरी बाकींच्यानी अजून रस्ता ओलांडला नव्हता. शेवटी मनाचा हिय्या करुन एक जिराफ आमच्या समोर रस्त्यावर उतरला आणि आपल्या लांबलांब ढांगा टाकत रस्ता ओलांडून गेला. त्याच्या मागोमाग एकेक करुन सगळे जिराफ रस्त्यावर उतरले आणि थोड्याच वेळात दरीत उतरुन गेले. जिराफ एवढ्या जवळून पाहायची ही पहिलीच वेळ होती .

Masai Giraffe, Masai Mara

वायरलेसवर अचानक गोंधळ चालू झाला सायमनने गाडी वळवली आणि सुसाट हाणली. काही वेळात आम्ही एका झाडापाशी पोहोचलो. झाड साधारण १२ फूट उंच होते.  त्या झाडावर बिबट्या एका हरणाची शिकार करून घेउन गेला होता. आम्ही पोहोचलो तेव्हा तो शिकार झाडाच्या फांद्यांच्या बेचक्यात नीट अडकवत होता. शिकार व्यवस्थित अडकल्यावर त्याने खायला सुरुवात केली पानांच्या मधून कधी त्याचा पंजा, तोंड, दिसत होते. त्याची शिकार पूर्ण खाऊन होइपर्यंत त्याचे पूर्ण दर्शन होणे कठीण होते. वाट बघण्या शिवाय पर्याय नव्हता कॅमेरा सरसावून आम्ही बसलो होतो तितक्यात बिबट्या खाली उतरला. मधल्या फांदीवर बसून त्याने आपले तोंड आणि पंजा साफ केला आता तो तिथेच बैठक मारणार असे वाटत असतानाच त्याने झाडावरून उतरायला सुरुवात केली . गवतात उतरल्यावर त्याने झाडापासून १५ फुटावर चरणार्‍या झेब्रा आणि वाईल्ड बीस्टच्या कळपाकडे पाहीले आणि संथपणे बाजूच्या झुडपात निघून  गेला. आम्हीही जेवणासाठी बसण्यासाठी झाड शोधायला निघालो. एका झाडाखाली पथारी पसरली आणि पॅक लंच खाउन पुढे निघालो.

(वर वर्णन केलेल्या बिबट्याचा (बिबळ्याचा) व्हिडीओ पाहाण्याकरिता खालील Youtube लिंकवर टिचकी मारा.)
https://www.youtube.com/watch?v=Y5ag5EaP3oo

Leopard, Masai Mar

मारा नदीच्या अलिकडे एक डोंगर आहे. त्यावर मारा व्ह्यु पॉईंट आहे. बरेच लोक इथूनच फोटो काढून माघारी फिरतात. आम्ही डोंगर उतरुन मारा नदीपाशी पोहोचलो. नदीच्या पात्रात वाळूवर ६ पाणघोडे झोपलेले होते. त्यांच्या अंगावर काही पक्षी उड्या मारत होते. तिथून थोड्या अंतरावर एक मगर उन खात पडली होती. नदीचा काठ पाण्यापासून १५ ते २० फूट उंचावर होता. त्यावर काही ठिकाणी पात्रात उतरायच्या वाटा होत्या. ऋतुचक्रा प्रमाणे टांझानिया आणि केनियात फिरणारे प्राण्यांचे कळप अशा वाटांनी नदी ओलांडतात. ती नदी ओलांडतानाही सर्वप्रथम कळपाचा नायक सुरक्षित मार्गाची चाचपणी करतो. पाण्यातल्या मगरींपासून त्यांना भय असते. असा सुरक्षित मार्ग सापडल्यावर नायक सर्वप्रथम पाण्यात उतरतो आणि त्यामागून हजारोंच्या संख्येने असलेले प्राणी नदीत उतरतात. केनियात एप्रिल-मे मध्ये पाउस पडून गेल्यावर, जून-जुलैत व्यवस्थित गवत वाढलेले असते. ते खाण्यासाठी हजारोंच्या संख्येने वाईल्ड बीस्ट , झेब्रे , हरण इत्यादी तृणभक्षी प्राणी केनियात येतात . त्यांच्या मागून त्यांना खाणारे प्राणी येतात. त्यामुळे जुलै ऑगस्ट हे केनियात स्थलांतराचे महिने मानले जातात आणि हे स्थलांतर बघण्यासाठी अनेक पर्यटक येतात. पण हे प्राणी नदी नक्की कोठे ओलांडतील हे कोणीच सांगू शकत नाही . आम्हालाही नदी ओलांडणारे कळप दिसले नाहीत . पण मारा नदीच्या जवळच एक मोठा वाईल्ड बीस्टचा कळप दिसला म्हणजे त्यांनी एखाद्या दिवसापूर्वी नदी ओलांडली असावी. नदीच्या काठाने पुढे गेल्यावर एका ठिकाणी एक दगड आहे. या ठिकाणी केनिया आणि टांझानियाच्या सीमा मिळतात. पुढे मारा नदीवर पूल आहे. पूलाच्या पलिकडे केनियन सैन्याचे ठाणे आहे . या पूलावरुनही नदीपात्रात असलेले पाणघोडे दिसत होते. 
Mara River & Migration Routes

Crocodile, Masai Mara

Hippopotamus at Mara River

आता परतीचा प्रवास चालू केला, एका ठिकाणी एका तिरक्या झाडावर Lappet-faced vulture,White-backed vulture, Rüppell's vulture, Egyptian Vulture, Hooded Vulture अनेक प्रकारची गिधाड बसलेली दिसली. त्याठिकाणी थोडावेळ थांबलो. तर अचानक एकामागोमाग एक गिधाड आमच्या समोरच रस्त्याच्या बाजूला उतरायला लागली . गवतामुळे कुठल्या प्राण्याचा फडशा पाडायला ती जमली आहेत हे कळत नव्हते. इथे खाण्याचा  पहिला मान असतो Lappet-faced vulture या गिधाडाला कारण त्याच्या बाकदार आणि मजबूत चोचीने तो प्राण्याची कातडी फाडू शकतो . त्याने फित कापल्यावर सगळी गिधाड मृत प्राण्यावर तुटून पडली. अजून आकाशातून गिधाड उतरच होती . त्यांच्या बरोबर दोन Marabou stork सुध्दा त्या गर्दीत उतरले . सकाळीच यांना एका पाणवठ्यावर पाहीले होते. हे इथे काय करतात हा प्रश्न होता. गिधाडांची खाण्यासाठी ढकलाढकली मारामारी चालू होती पण Marabou stork शांत होते. कारण सगळ्यात शेवटी खाण्याचा मान त्यांचा होता . आपल्या लांब आणि निमुळत्या चोचीमुळे ते प्राण्यांच्या हाडाला चिकटलेले मांस खाऊ शकतात. गिधाडांना तिथेच सोडून आम्ही पुढे निघालो . एक बबून्स माकडांचा कळप रस्ता ओलांडत होता. रस्त्याच्या मध्ये असलेल्या दिशादर्शक फलकावर बसून तो आपल्या कळपावर लक्ष ठेउन होता. आता दिवस उतरणीला लागल्याने आम्ही माराच्या गेटच्या दिशेने निघालो. आम्ही तिघेही छतावरुन निशब्दपणे माराचा परिसर न्याहळत होतो. अडीच दिवस चाललेली ही आमची गेम ड्राईव्ह आता संपणार याची हुरहूर मनात दाटून आलेली. 


Vultures in Masai Mara

Lappet-faced vulture, Masai Mara

Vultures in Masai Mara, please click on link

************** 

केनिया सफारीचे प्लानिंग.

केनिया सफारी असे गूगलवर सर्च केले की अनेक देशीविदेशी साईटस ओपन होतात. त्यावर ठराविक चित्ररुपी प्रश्न विचारलेले असतात १)किती दिवस , २)किती माणसे , ३)राहाण्याची सोय (बजेट (तंबू) , मिडीयम (रुम), लक्झरीयस) आणि ४) गाडीचा प्रकार (व्हॅन / ४ x ४ जीप) तुम्ही पर्याय निवडले की एक स्टॅंडर्ड प्रोग्राम आपल्याला मेल केला जातो. तो पुढीलप्रमाणे असतो . 
पहिला दिवस:- नैरोबीच्या हॉटेलातून पिक अप (६ तास प्रवास / किंवा विमानाने मसाई मारा (यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात.)) दुपारपर्यंत मसाई मारा अभयारण्य, संध्याकाळचा गेम ड्राईव्ह.
दुसरा दिवस :- पूर्ण दिवस मसाई मारा (गेम ड्राईव्ह) , 
तिसरा दिवस :- Lake Nakuru (६ तास प्रवास) पाणपक्षी, फ्लेमिंगो आणि गेंडे पाहाण्यासाठी, 
चौथा दिवस :-  Amboseli National Park (८ तास प्रवास) 
पाचवा दिवस:- Amboseli National Park गेम ड्राईव्ह, अफ्रीकन हत्ती पाहाण्यासाठी 
सहावा दिवस:- (५ तास प्रवास ) नैरोबी . 
या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च ६ माणसांच्या तंबू निवासासाठी" $ ९५० माणशी पासून सुरु होतो, मिडीयम (रुमसाठी) $१२५० माणशी पासून सुरु होतो तर लक्झरीअस साठी $१४५० माणशी पासून सुरु होतो. तुम्ही जे हॉटेल निवडाल त्याप्रमाणे आणि सिझनप्रमाणे रेट बदलतात. या पैशात नैरोबी ते नैरोबी सगळा खर्च, यात राहाणे, खाणे, प्रवास, पार्क एंट्री सर्व समाविष्ट असते. याशिवाय तुम्हाला वेगळे काही करायचे असल्यास त्याचा वेगळा चार्ज असतो. (उदा. मसाई गावाला भेट $ २५ प्रत्येकी, मसाई मारा बलून सफ़ारी $३०० प्रत्येकी इत्यादी) 

हा कार्यक्रम मला मिळाल्यावर मी आधी केनियाला जाऊन आलेल्या अनेकांशी बोललो, इंटरनेटवर शोधाशोध केली आणि आता स्वत:च जाऊन आल्यावर माझ असे मत आहे की, एक दिवस मसाई मारा पाहणे आणि इतर दिवशी अर्धा किंवा पूर्ण दिवस प्रवासात घालवून उरलेल्या वेळात जंगल पाहाणे हे टूर कंपन्यांच्या सोईचे असले तरी आपल्या (म्हणजे ज्यांना खरच जंगल पाहायचेय आणि छायाचित्रण करायचे आहे त्यांच्यासाठी) सोईचे नाही. त्यामुळे ३ दिवस तीन रात्र मसाई मारा, चौथा दिवस नकुरु लेक, पाचवा दिवस :- नैरोबी असा पाच दिवसाचा कार्यक्रम केल्यास साधारणपणे $ ६०० प्रत्येकी खर्च होतो. यात सर्व प्राणी, पक्षी पाहायला मिळण्याची शक्यता असते (याची खात्री कोणीच देऊ शकत नाही). अफ़ीकन हत्ती आणि किलिमांजरो पर्वत पाहाण्यासाठी Amboseli National Park ला जायचे की नाही हा प्रश्न प्रत्येकाने स्वत: सोडवायचा आहे. हत्ती मसाई माराला भरपूर दिसतात. अंबासोलीला गेल्यास त्याचे दोन दिवस वाढून पैसे वाढतात.

या $ ६०० व्यतिरिक्त, $ ५० प्रत्येकी व्हिसा फ़ी द्यावी लागते. व्हिसा तुम्ही ऑनलाईन काढू शकता किंवा केनियात पोहोचल्यावरही काढता येतो. केनियात इमिग्रेशनच्या वेळी व्हिसा काढणार असल्यास $ ५० कॅश द्यावी लागते. कार्डने पैसे घेत नाहीत. व्हिसा तीन महिन्यासाठी मिळतो. केनियात (अफ़्रिकेतील देशात) जाण्यासाठी आपल्याला पिवळ्या तापाचे इंजेक्शन आणि पोलिओ डोस किमान १५ दिवस आधी घ्यावे लागतात. पिवळ्या तापाचे इंजेक्शन ठराविक गव्हर्मेंट हॉस्पिटल मध्येच मिळते त्याची यादी आणि वेळ इंटरनेटवर उपलब्ध आहे. पोलिओ डोस सर्व महानगरपालिकेच्या दवाखान्यात मिळतो. पिवळ्या तापाचे इंजेक्शन आता एकदा घेतले की आयुष्यभर चालते. याला खर्च ३००/- रुपये येतो. या इंजेक्शन आणि डोस बद्दल आपल्याला भारतात परत येतांना इमिग्रेशनला विचारणा होते तेंव्हा त्यांना इंजेक्शन आणि डोस घेतल्याची कार्डस दाखवावी लागतात. 


एअर इंडीया आणि केनियन एअरवेजचे मुंबई ते नैरोबी डायरेक्ट फ़्लाईट आहे. इतर अनेक विमान कंपन्यांची १ स्टॉप असलेली फ़्लाईट्स आहेत. रिटर्न तिकिट लवकर काढल्यास साधारणपणे २२०००/- माणशी पासून सुरु होते. केनियात केनियन शिलिंग वापरतात. $ १ ला १०४ केनियन शिलिंग मिळतात ( जुलै २०१८ चा रेट). भारतीय रुपयेही येथे बदलून केलियन शिलिंग घेता येतात. केनियात पोहोचल्यावर विमानतळावर $ ५० ते $ १०० पर्यंतचे केनियन शिलिंग बदलून घ्यावे. किरकोळ खरेदीसाठी (पाणी, भेटवस्तू, सोवेनियर इत्यादी) त्याचा उपयोग होतो. (१ लिटरच्या १ पाण्याच्या बाटलीला १०० केनियन शिलिंग पडतात.) केनियात एअरटेलचे नेटवर्क आहे पण ते शहराबाहेर मिळत नाही. Saharacom हे स्थानिक नेटवर्क अगदी मसाई मारातही मिळते. त्याचे सिमकार्ड विमानतळावर मिळते. नैरोबीत उबर टॅक्सीज आहेत.

Migration Map

मसाई मारात जाण्याची योग्य वेळ :- केनियात वर्षभर गेले तरी सर्व प्राणी दिसण्याची शक्यता असते. कारण मसाई मारात स्थानिक प्राणी आहेतच. पण ऋतूचक्रा प्रमाणे त्यांची संख्या कमी जास्त होते. केनियात डिसेंबर ते मार्च उन्हाळा असतो, एप्रिल ते जुन पाऊस, जुलै - ऑगस्ट थंडी, सप्टेंबर - उन्हाळा, ऑक्टोबर, नोव्हेंबर - थोडा पाऊस असे साधारणपणे ऋतूमान असते. एप्रिल ते जुन पाऊस पडल्यावर मसाई मारात गवत उगवते, ते खाण्यासाठी जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टमध्ये सर्व तृणभक्षी प्राणी टांझानियाच्या सेरेंगेटी नॅशनल पार्क मधून मारा नदी ओलांडून केनियात येतात. त्यांच्या मागोमाग त्यांचे भक्षक येतात. त्यामुळे मसाई मारात मोठ्या प्रमाणावर प्राणी असतात. जसजसे गवत कमी होते, उन वाढत जाते तसतसे प्राणी टांझानियात जातात. त्यामुळे जुलै शेवटचा आठवडा ते ऑगस्ट संपूर्ण महिना हा काळ मसाई मारात जाण्यासाठी उत्तम काळ समजला जातो. त्यावेळी तेथे थंडी असल्याने दिवसाचे तापमान २० ते २२ डिग्री आणि रात्रीचे तापमान १२ ते १५ डिग्री सेल्सियस असते त्यामुळे दिवसभर फ़िरुनही उन्हामुळे होणारा त्रास जाणवत नाही.   

नैरोबीत एक दिवस मुक्काम केल्यास जिराफ़ सेंटर, एलिफ़ंट ऑरफ़नेज ( यावर दोन वेगळे लेख लिहिले आहेत) आणि नॅशनल म्युझियम ही ठिकाणे जरुर पाहावीत अशी आहे. त्यासाठी टूर ठरवतानाच ट्रॅव्हल कंपनीशी बोलून घ्यावे. अर्थात त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. कुठली ट्रॅव्हल कंपनी निवडावी, हे ज्याने त्याने ठरवावे. सगळ्यांकडून कोटेशन घेउन, त्यांच रेटींग आणि रिव्ह्यू वाचून ठरवावे. अर्थात हे सर्व लिहिले आहे ते कमीतकमी पैशात जास्तीत जास्त कसे पाहाता येईल त्यासाठी, अर्थात हा माझा दावा आहे असही नाही . ज्यांची पैसे खर्च करण्याची तयारी आहे त्यांना केनियात पाहाण्यासारखे आणि फ़िरण्यासारखे भरपूर आहे.

केनिया सफ़ारीवर तिथल्या Offbeat ठिकाणांवर ७ लेख लिहिलेले आहेत ते जरुर वाचावेत.

समाप्त

छायाचित्रण:-  © कौस्तुभ आणि अमित सामंत  (©Copy Right)
कॅमेरा :- Nikon, P900 

केनिया सफ़ारी आणि त्याचे प्लानिंग स्वत:च कसे करावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी 

केनिया सफारी- 1 (Kenya Safari - Part -1)

केनिया सफारी भाग - २ सिंहांच्या प्रदेशात

हे दोन भाग नक्की वाचा .