|
हडपीची विहिर, सडा किल्ला |
बेळगाव उर्फ वेणुग्राम हे शहर इसवीसनाच्या बाराव्या शतकात रट्ट सामराज्याच्या राजधानीचे शहर होते. त्यानंतर मध्ययुगापासून एक व्यापारी पेठ म्हणून बेळगाव प्रसिद्ध होते. गोवा, वेंगुर्ले इत्यादी बंदरात उतरणारा माल चोर्लेघाट, आंबोली घाट , खोकरल घाट इत्यादी घाटमार्गां व्दारे घाट माथ्यावरच्या बेळगांव या पेठेत येत असे. त्यामुळे हा व्यापारी मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी यामार्गावर वेगवेगळ्या राजवटीत किल्ले बांधले गेले . व्यापारीमार्गावरील या किल्ल्यांची साखळी थेट बंदरापासून ते बाजारपेठे पर्यंत होती. अग्वाद, तेरेखोल , यशवंतगड असे किनाऱ्यावरचे किंवा खाडीच्या मुखावरचे किल्ले जलमार्ग आणि बंदरे सुरक्षित ठेवत असत . त्यानंतर घाटमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी मनोहर मनसंतोषगड , नारायणगड , महादेवगड , सडा इत्यादी किल्ले बांधले होते. घाटमाथ्यावर पोहोचल्यावर तेथील मार्ग सुरक्षित राखण्यासाठी महिपालगड , गंधर्वगड , कलानिधीगड, राजहंसगड इत्यादी किल्ले बांधले गेले. खुद्द बाजारपेठेचे रक्षण करण्यासाठी बेळगावचा किल्ला बांधला होता.व्यापारीमार्ग हा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असल्यामुळे वेगवेगळ्या राजवटीत या किल्ल्यांची बांधणी , मजबूतीकरण झाले.
|
विहिर, वल्लभगड |
बेळगावच्या आसपासच्या किल्ल्यांच्या भटकंतीत आम्ही सध्याच्या बेळगाव जिल्ह्यातील ७ किल्ले दोन दिवसात पाहायचे ठरवले होते. सडा किल्ला, राजहंसगड (येल्लुरचा किल्ला), बेळगावचा किल्ला, काकती गड, होन्नुरगड, पाच्छापूर गड, वल्लभगड हे किल्ले पाहायचे असे नियोजन केले होते. बेळगाव जवळील महाराष्ट्रातील महिपालगड, गंधर्वगड, कलानिधीगड, सामनगड, रामतिर्थ, नेसरीचे स्मारक यापूर्वी पाहून पाहून झालेले होते. ते परत पाहायचे असल्यास अजुन एक दिवस हाताशी असणे आवश्यक होते. तो नसल्याने या न पाहीलेल्या किल्ल्यांवरच लक्ष केंद्रीत केले.
|
महाराष्ट्राच्या कानकोपर्यात भेटणारी लालपरी. |
दरवेळी डोंबिवलीतून किल्ले पाहायला निघतो. यावेळी मालवणहून निघालो होतो. पहिला किल्ला होता सडा. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर हा किल्ला आहे. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे सडा किल्ल्याच्या महाराष्ट्राच्या बाजूच्या मांगेली गावातून एक कच्चा रस्ता झालेला आहे आणि त्या रस्त्याने गाडीने थेट सडा गावात जाता येते. त्यानुसार बांदा - दोडामार्ग मार्गे मांगेली घाटाने मांगेली गाव गाठले. या मार्गावर दोडामार्ग ते फ़णसवाडी या एसटीच्या बसेस दिवसातून तीन वेळा धावतात. मांगेलीचा धबधबा गोव्याच्या पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तेही शनिवार रविवार येथे भरपूर गर्दी असते. त्यामुळे इथे नाश्ता, चहा जेवण देणारी घरगुती हॉटेल्स उघडली आहेत. इथे पोहोचल्यावर कळले की, सडा गावाला जाणारा कच्चा रस्ता पावसाळ्यात ढासळलेला आहे. त्यामुळे गाडी सडाला जाऊ शकणार नाही. मग गाडी तिथेच ठेउन गावातल्या लोकांनी दाखवलेल्या पायवाटेने मांगेली गावा मागचा डोंगर चढायला सुरुवात केली. थोडी उंची गाठल्यावर तिलारी धरण आणि आजूबाजूचा दाट जंगलाचा प्रदेश दिसायला लागला. अर्ध्या तासात सडा गावात पोहोचलो. सडागावातील सडेकर काकांनी किल्ला आणि परिसर दाखवायला आमच्या बरोबर यायचे मान्य केले. गाव जरी कर्नाटकात असले तरी सर्व गावकरी अस्खलित मालवणी बोलत होते. गावत पाचवी पर्यंत एक कानडी आणि एक मराठी शाळा आहे. पण शाळेत विद्यार्थी नसल्याने त्या बंद आहेत. सडा गावतील मुलेमुली आम्ही आलो त्या पायवाटेने रोज डोंगर चढून - उतरुन महारष्ट्रातील मांगेली गावात शाळेत जातात. तिथे दहावी पर्यंत शाळा आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांची मुले गोव्याला शाळेत जातात. बेळगावशी त्यांचा संबंध केवळ शासकीय कामासंबंधी येतो. बेळगावहून सडाला थेट एसटीची सेवाही नाही. अशा प्रकारे मनाने आणि बोलीभाषेने महाराष्ट्रात आणि केवळ शरीराने कर्नाटकात असलेल्या सडेकर काकांनी आम्हाला संपूर्ण किल्ला आत्मियतेने दाखवला.
1) सडा किल्ला (Sada Fort)
|
सडा किल्ला |
|
वाडा , सडा किल्ला |
सडा किल्ला :- सडा गावाची वस्ती किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. या वस्तीत देसाईच्या घराजवळ एक सुंदर पायऱ्यांची विहीर आहे. गावतले लोक हडपीची विहिर म्हणून या विहिरीला ओळखतात. विहीर चावीच्या आकाराची असून दोन स्तरात आहे . १८ पायऱ्या उतरुन गेल्यावर आपण विहीरीच्या पहील्या टप्प्यावर पोहोचतो. याठिकाणी विहिरीच्या भिंतीत ठरावीक अंतरावर ३ फूट उंचीचे कमान असलेले (एक माणूस बसू शकेल इतक्या उंचीचे) कोनाडे आहेत . या भागातून विहिरीला संपूर्ण फ़ेरी मारता येते . पुन्हा पायऱ्यावर येउन खाली उतरल्यावर कमान असलेला दरवाजा आहे . त्यातून पाण्यापर्यंत जाता येते. ही सुंदर विहिर पाहून गावातील विठ्ठल मंदिर गाठाले. मुक्कामास हे मंदिर योग्य आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूची पायवाट राजवाड्याकडे जाते. या ठिकाणी एक पडका चौसोपी वाडा आहे. या वाड्यात पावणाई देवीचे ठाणे आहे. या वाड्याच्या बाजूला काही पडक्या वाड्यांचे अवशेष आहेत . वाडा पाहून पुढे गेल्यावर आपण होळीच्या माळावर पोहोचतो. याठिकाणी सडा गावातील लोक होळी पेटवतात. माळावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची पहिली तटबंदी लागते. तटबंदीतून आत आल्यावर उजव्या बाजूने चालत गेल्यावर एक बांधीव मार्ग दिसतो. हा मार्ग तटबंदी बाहेरील विहिरीकडे जातो. किल्ल्यावर पाण्याची सोय नसल्यामुळे किल्ल्या बाहेरून पाणी आणण्यासाठी हा बांधीव मार्ग बांधलेला होता. विहिर पाहून परत आल्या मार्गाने परत येउन किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ल्याच्या दरवाजाचे दगड या मार्गावर पडलेले आहेत. गोमुखी दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. त्या ओलांडून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला तटबंदीत एक कमानदार खिडकी आहे . त्यातून खालचे मांगेली गाव, तिलारी धरण आणि दूरवरचा प्रदेश दिसतो. टेहळणीसाठी या खिडकीची योजना केलेली आहे. या खिडकीच्या समोरच्या बाजूला असलेल्या दरवाजातून आपण गडमाथ्यावर पोहोचतो. येथून डाव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने पुढे चालत गेल्यावर दुसऱ्या बुरुजावर एक ओतीव तोफ आहे. किल्ल्याचा आवाका त्यामानाने छोटा आहे. अर्ध्या तासात किल्ला पाहून झाला.
|
Cannon on Sada Fort |
सडा किल्ल्यासमोरील डोंगरावर एक गुहा आहे. तसेच सडा गावापासून २ किलोमीटरवर एक धबधबा आहे. फक्त सडा किल्ला बघायचा असल्यास या दोन्ही गोष्टी पाहाणे शक्य होते पण आम्हाला आज राजहंसगड आणि बेळगावचा किल्ला पाहायचा होता. त्यात सडाला येणारा रस्ता कोसळला असल्याने आम्हाला मांगेली घाट उतरुन तिलारी घाट चढून बेळगाव मार्गे राजहंसगड गाठावा लागणार होता. (सडा ते राजहंसगड अंतर ६८ किलोमीटर आहे) सकाळी लवकर निघाल्याने वाटेत कुठे नाश्ता केला नव्हता. आता पोटात कावळे ओरडायला लागलेले. रस्त्यात भेडशी हे त्यातल्या त्यात मोठे गाव होते. तिथे एकमेव हॉटेल होते त्याने सांगितले जेवणाच्या वेळी फक्त उसळपाव मिळेल. दुसरा पर्याय नसल्याने उसळ पाव खाऊन आणि लिंबू सोडा पिउन जठराग्नी तात्पुरता थंड केला. तिलारीघाट चढून बेळगावमार्गे १४ किलोमीटर वरील येल्लुर गाठले. येल्लूर गावाजवळ राजहंसगड आहे. किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत पक्का रस्ता आहे.
2) ऱाजहंसगड (येल्लुरचा किल्ला) (Rajhansgad , Yellur Fort)
|
Entrance Gate of Rajhansgad |
|
Entrance Gate of Rajhansgad |
|
Rajhansgad (Yellur Fort) |
|
Siddheshwar Temple, Yellur fort |
ऱाजहंसगड :- राहजंसगडाला त्याच्या पायथ्याच्या गावमुळे येल्लुरचा किल्ला म्हणून लोक ओळखतात. किल्ल्याचे प्रवेशव्दार गोमुखी आहे. प्रवेशव्दारातून आत प्रवेश केल्यावर समोर सिध्देश्वराचे जीर्णोद्धारीत मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला पाण्याची टाकी आहे . टाकीच्या आत कमानी आहेत. सध्या लोखंडी जाळी लावून ती टाकी झाकलेली आहे. टाकीच्या बाजूला एका वास्तूचे अवशेष आहेत ते दारु कोठार असावे. त्याच्या पुढे सध्या केवळ तळघरच शाबूत असलेली एक वास्तू आहे. या वास्तू जवळील तटबंदीत चोर दरवाजा आहे. सुधागड किल्ल्याच्या चोर दरवाजासारखी याची रचना आहे..चोर दरवाजा पाहून थोडे पुढे गेल्यावर तटबंदीत इंग्रजी L आकाराची खोली आहे. सिध्देश्वर मंदिराच्या बाजूला एक विहिर आहे. त्याच्या बाजूला पाणी साठवण्यासाठी दगडी धोणी आहे. फांजीवरुन किल्ल्याला संपूर्ण प्रदक्षिणा घालून आपण पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो.
किल्ल्याच्या इतिहासात डोकावले तर रट्ट घराण्याने बेळगाव या आपल्या राजधानीला येणार्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी राजहंसगड बांधला. त्यानंतर आदिलशाहीच्या काळात असाद खान लारी या पर्शियन सरदाराने त्याला आजचे स्वरुप दिले. हा किल्ला विजयनगर, बहामनी, आदिलशाही, मोगल, मराठे इत्यादी विविध राजवटींच्या अधिपत्याखाली होता. या किल्ल्यावर ३ लढाया झाल्या आहेत. पहीली लढाई पेशवे आणि सावनूरचे नवाब यांच्यात झाली . दुसरी लढाई पेशवे आणि टिपू सुलतान यांच्या मध्ये झाली . तिसरी लढाई भिवगड आणि राजहंसगडच्या सैन्यात झाली होती. किल्ला आजही उत्तम स्थितीत ठेवलेला आहे. त्यामुळे पाहून समाधान झाले.
|
Donna Biryani , Belgavi |
दिवसभर झालेली पायपीट आणि कुपोषणावर उपाय म्हणून बेळगावतल्या डोना बिर्याणीमध्ये बिर्याणीवर ताव मारला. याठिकाणी केळीच्या पानापासून बनवलेल्या भांड्यात बिर्यानी आणून देतात. जस्त तिखट, तेलकट नसलेल्या या बिर्यानी चव छान होती आणि भरपूरही होती.दुसऱ्या दिवशी चार किल्ले पाहायचे होते. सकाळी नाश्ता करुन काकती किल्ल्याकडे निघालो.
4) काकती किल्ला (Kakati Fort)
|
Kakati Fort, Belgaum District |
|
Steps to kakati Fort Belgavi |
काकती किल्ला :- मुंबई बंगलोर महामार्गावर बेळगावच्या अलीकडे ११ किलोमीटर अंतरावर काकती गाव आहे. गावाच्या मागे किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायऱ्यांपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे.बेळगाव या महत्वाच्या शहरावर आणि शहराकडे जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी काकती किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. हा टेहळणीचा किल्ला असल्याने यावर फारसे बांधकाम नसावे. आज या किल्ल्याचा एकमेव बुरुज आणि त्याला लागून असलेली थोडीफार तटबंदी शिल्लक आहे. या बुरुजापर्यंत जाण्यासाठी सिमेंटमध्ये २५१ पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. किल्ल्यावर वनखात्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलेले आहे . पाणी अडवण्यासाठी जागोजागी चरही खोदलेले आहेत . त्यामुळे किल्ल्यावर फिरणे मुश्किल झालेले आहे. त्यामुळे किल्ल्यावर इतर काही अवशेष आढळत नाहीत. किल्ल्यावरुन बेळगाव शहर दिसते.
5) होन्नुर गड (Honnur Fort)
|
Honnur Fort, Belgaum District |
|
Entrance of Honnur Fort , Belgavi District |
|
Hidkal Dam from entrance of Honnur Fort |
|
Honnur Fort & Hidkal Dam |
होन्नुर गड :- काकती किल्ल्याच्या पुढचा किल्ला होता होन्नुर गड. बेळगाव जिल्ह्या घटप्रभा नदीवर बांधलेल्या हिडकल धरणाच्या काठावर होन्नुर हा किल्ला आहे. धरणामुळे तीनही किल्ल्याच्या तीन बाजूला पाणी आहे . त्यामुळे लाल चिर्यामध्ये बांधलेला हा किल्ला एखाद्या चित्रासारखा सुंदर दिसतो. किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या विठ्ठल भवन नावाच्या सर्कीट हाउस पर्यंत पक्का रस्ता बनवलेला आहे. तेथून किल्ल्याच्या तटबंदी पर्यंत जाण्यास चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात. तटबंदी डावीकडे ठेवत दोन बुरुज पार केल्यावर किल्ल्याचा पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजा आहे. हा दरवाजा दोन भक्कम बुरुजांच्या मध्ये लपवलेला आहे. किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी लाल चिर्यात बांधलेली आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर किल्ल्याचा संपूर्ण पसारा दृष्टीपथात येतो. या किल्ल्याची निर्मिती टेहळणीसाठी केल्याने किल्ल्यावर मोठ्या वास्तू नसाव्यात त्यामुळे किल्ल्यावर फ़ारसे अवशेष आढळत नाहीत. तटबंदीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारतांना हिडकल डॅमचा पसारा लक्ष वेधून घेतो. किल्ल्याच्या पश्चिमेला होन्नुर गाव आहे. त्यावरुन किल्ल्याला होन्नुर नाव पडलेले आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला झेंडा बुरुज आहे. त्याच्या जवळ किल्ल्याचा होन्नुर गावाच्या दिशेला उतरणारी वाट आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी दरवाजा असावा. आज मात्र तो अस्तित्वात नाही . तटबंदीवरुन फिरुन प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. गडावर पाण्याचे टाक / तलाव आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था कशी होती याचा अंदाज येत नाही. किल्ला आणि त्याचे आजचे स्थान दोन्ही सुंदर असल्याने किल्ल्यावरुन पाय निघत नव्हता. पण अजून दोन किल्ले बाकी होते. उन चढायलाही सुरुवात झाली होती. होन्नुर किल्ल्याच्या पुढे १४ किलोमीटरवर पाच्छापूर किल्ला आहे.
6) पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)
|
Pachhapur Fort, Belgavi Dist |
|
Pachhapur Fort, Belgavi Dist |
पाच्छापूर किल्ला :- पाच्छापूर म्हणजेच पातशहापूर या गावातील टेकडीवर एक किल्ला आहे. एकेकाळी सुंदर आणि बुलंद असलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था दयनीय आहे. गावाच्या मधोमध असलेला हा किल्ला गावातल्या लोकांच्याच उपेक्षेचा धनी झालेला आहे. किल्ल्याच्या टेकडी भोवती दाट लोकवस्ती आहे. गावात शिरतानांच किल्ल्याचे बुरूज दिसायल लागतात. किल्ल्याच्या खाली गाव वसलेले आहे तेथेही तटबंदी आणि प्रवेशव्दार होती. किल्ल्यावर जाण्यासाठी गावाला वळसा घालून गावातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जातांना उत्तरेकडील प्रवेशद्वार लागते. गावात पोहोचल्यावर दाट वस्तीमुळे किल्ल्यावर जाणारा रस्ता मिळत नव्हता. शाळे समोर असलेल्या पुस्तकाच्या दुकानात चौकशी केल्यावर त्याने किल्ल्यावर काही नाही उगाच कशाला जात वगैरे नेहमीची पालुपद चालू केली. किल्ल्याचा रस्ता इंग्रजी शाळेतून जातो अस तिथे असलेल्या एका माणसाने सांगितले. पण रविवार असल्याने शाळेच्या गेटला कुलूप होते. मग चावी शोधण्याची मोहीम चालू झाली. आत्ता पर्यंत आम्ही मालवणहून किल्ला पाहायला आलोय ही गोष्ट कळल्यामुळे बरेच लोक शोध मोहीमेत सामिल झाले थोड्या वेळाने कळाले की ज्या मास्तरांकडे चावी आहे ते दुसर्या गावाला गेले आहेत. मग शाळेतल्या दोन मुलांनी पुढाकर घेऊन दुसरा रस्ता दाखवायला ते आमच्या बरोबर आले. शाळेच्या पुढे गेल्यावर एका दर्ग्याकडे जाणारा रस्ता आहे. हाच किल्ल्याला जाणारा राजमार्ग होता. याठिकाणी अतिशय रुंद पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. या पायऱ्यानी वर चढून गेल्यावर आपण थेट किल्ल्याचा भव्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दारावर दोन बाजूला दोन शरभ, दोन कमळ कोरलेली आहेत. प्रवेशव्दारा समोर वरच्या बाजूला एक बुरुज आहे. प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी त्याची योजना केलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर रस्ता काटकोनात वळतो . याठिकाणी दोन्ही बाजूला पाहारेकर्यांसाठी कमानदार देवड्या आहेत . या देवड्यांच्या बाजूला प्रवेशव्दाराच्या समोरच्या बाजूला एक छोटा दरवाजा आहे. मुख्य दरवाजा बंद असताना त्याचा दिंडी दरवाजा म्हणून वापर होत असावा. शाळेच्या मागून येणारी वाट या छोट्या दरवाजातून येते. राजमार्ग असतानांही गावातले लोक आम्हाला त्या अवघड वाटेने का जायला सांगत होते त्यांनाच माहिती. आमच्या बरोबर आलेल्या शाळेतल्या मुलांनाही शाळेमागे असलेला किल्ला माहित नव्हता. ते किल्ल्यावर कधी आलेही नव्हते. किल्ल्यावर बाभळीच्या झाडीचे रान माजलेले आहे त्यातून फिरणे मुश्किल झालेले आहे. त्यामुळे इच्छा असूनही किल्ल्यावरील इतर अवशेष पाहाता आले नाहीत. किल्ल्याची अवस्था आणि गावकर्यांची नकारत्मकता बघून बाईट वाटले.
7) वल्लभगड (vallabhgad)
|
Vallabhgad Fort |
|
Entrance of Vallabhgad Fort |
वल्लभगड मी ट्रेक क्षितिज सोबत २००७ साली पाहिला होता. त्यानंतर त्या किल्ल्याची माहिती साईटवर लिहिल्यावर वल्लभगडचे संवर्धन करणार्या गजानन साळुंखेंशी ओळख झाली. अजून आमची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. त्यामुळे आज भेटता येईल आणि त्यांनी सातत्याने किल्ल्यावर केलेले काम पाहाता येईल म्हणून त्यांच्याशी सकाळीच संपर्क साधला. ते स्वत: तिथे नव्हते पण त्यांनी वल्लभगड किल्ल्यावर संवर्धन करणारे श्री महेश मिलगे यांना पाठवतो असे कळवले होते. किल्ल्याच्या पायथ्याशी भरदुपारी एक वाजता महेश आम्हाला भेटला. स्वत:चा व्यवसाय असलेला महेश गेली तीन वर्ष वल्लभगडावर खूप मेहनत घेतोय . आज जो वल्लभगडाचा चेहरामोहरा बदललाय त्याचे श्रेय महेश आणि टिमचे आहे . आदल्या दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन सकाळीच संकेश्वरला आला होता. केवळ किल्ल्यावरील प्रेमापोटी तो खास संकेशवरहून आला होता. गेल्या अनेक वर्षांच्या किल्ल्यांच्या भटकंतीत असे अनेक डोंगरभाऊ भेटलेत. किल्ल्यावरील प्रेम हाच आमच्यातला समान दुवा आहे आणि किल्ल्यासाठी काहीतरी करावे हिच माफ़क अपेक्षा आहे.
|
Well , Vallabhgad Fort |
|
Separated bastion on Vallabhgad Fort |
|
Cave & Siddheshwar Temple at Vallabhgad Fort |
महेशच्या मागून आम्ही निघालो किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर बुरुजाच्या बाजूला गावदेवी मरगुबाईचे मंदिर आहे. मंदिराच्या मागून पायवाटेने चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दार गोमुखी बांधणीचे आहे. दोन भव्य बुरुजांच्या आड प्रवेशव्दार लपवलेले आहे. मुख्य प्रवेशद्वाराची कमान उत्तम स्थितीत आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच मारुतीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागे विहिरीत उतरणारी पायर्यांची भव्य वाट कोरुन काढलेली आहे. पायर्या उतरुन आत गेल्यावर दगडात कोरलेल्या कमानीतून आपला बोगद्यात प्रवेश होतो. पुढे थोड्या पायर्या उतरल्यावर वरुन प्रकाश येण्यासाठी झरोका ठेवला आहे तिथपर्यंत पोहोचतो. पुढे पहिली विहिर आहे. ही विहीर एका बोगद्याने दुसर्या मोठ्या विहिरीशी जोडलेली आहे. या दोन्ही विहीरी आणि भव्यता आणि खोली पाहाण्यासाठी आपल्याला पुन्हा पायर्या चढून वर यावे लागते. विहिरी पाहून पुढे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला एक मुख्य तटबंदीपासून सुटा असलेला बुरुज पाहायला मिळतो. हा बुरुज पूर्णपणे झाडीत झाकला गेला होता. वल्लभगडाचे संवर्धन करणार्या शिलेदारांनी त्याला मोकळा श्वास दिला. त्यामुळे आज हा बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचे दोन बुरुज या किल्ल्यावर आहेत. दुसरा बुरुज किल्ल्याच्या पूर्व टोकावर आहे. किल्ल्याच्या आतील आणि बाहेरील भागावर नजर ठेवण्यासाठी या सुट्या बुरुजांचा उपयोग होतो. किल्ल्याची तटबंदी ज्या ठिकाणी ढासळली आहे तेथे दुर्गवीर प्रतिष्ठानने त्याची डागडूजी केलेली आहे. फ़ांजीवरुन पुढे गेल्यावर तटबंदीतले दोन संडास पाहायला मिळतात. गडाच्या उत्तर टोकावर सुटा बुरुज आहे. तो पाहून माघारी फ़िरुन पूर्वेकडच्या तटबंदीच्या बाजुने पुढे गेल्यावर पेशवेकालिन शंकराचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ तटबंदीतून खाली उतरणारी पायवाट आहे. या वाटेने खाली उतरल्यावर सिध्देश्वराची मोठी गुहा आहे. तिच्यात सिध्देश्वराचा मुखवटा आणि पादुका आहेत. गुहा पाहून परत गडावर येऊन पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. ते पूर्णपणे मातीने बुजलेले होते. त्यातील माती काढून ते पूर्णपणे मोकळे केलेले आहे. किल्ल्याच्या संवर्धनाचे काम म्हणजे मेहनत, सातत्य आणि निष्ठा यांची परिक्षा पाहाणारे असते. तरीही अनेक संस्था स्वत:चे तन मन धन अर्पून हे काम करत असतात म्हणून आपल्याला आजही सुस्थितीतले किल्ले पाहायला मिळतात. वल्लभगड वेब पोर्टल आणि दुर्गवीर प्रतिष्ठान दरवर्षी किल्ल्यावर गुढीपाडवा आणि दसरा हे सण साजरे करते. दसर्याला रात्री किल्ल्यावर मशाली पेट्वून किल्ला उजळवून टाकतात.
|
दसरा उत्सव, वल्लभगड, फ़ोटो सौजन्य:- गजानन साळुंखे |
|
वल्लभगड संवर्धन, दुर्गवीर प्रतिष्ठान फ़ोटो, सौजन्य:- गजानन साळुंखे |
वल्लभगड पाहून झाल्यावर दोन दिवसात ७ किल्ले पाहाण्याचा आमचा संकल्प पूर्ण झाला. महेशचा निरोप घेऊन आम्ही मालवणच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. बेळगांवच्या आसपासचे हे सात किल्ले व्यवस्थित नियोजन केल्यास मुंबई आणि पुण्याहून दोन दिवसात पाहून होतात.
|
Honnur Village from Honnur Fort |
|
Entrance Gate of Sada Fort. |
दादा, नवीन काही किल्ल्यांची माहिती मिळाली .
ReplyDeleteसुंदर माहिती अमित
ReplyDeleteफोटो ही मस्त आले आहेत
सुंदर माहितीपुर्ण लेख आहे. आपले दारिद्र्य आपण हे गड किल्ले नीट संभाळून ठेवले नाहीत. आणखीन एक दुर्दैवी असे की गावातील जनतेलाच माहिती नसणे. पुन्हा कधी बेळगांवी जायचा योग आला तर भेट देता येईल.
ReplyDeleteअप्रतिम भटकंती आणि अनुभव. नक्की भेट देता येतील अशी ठिकाणे. पुरातत्व खात्याच्या नाकर्तेपनामुळे किल्ल्यांची झालेली दुरावस्था पाहवत नाही.
ReplyDeleteYes
Deleteछान लेख.✍
ReplyDeleteअप्रतिम छायाचित्र. 👌👍
Thanks, Raj
Deleteसुंदर लेखन आणि उत्तम माहिती 👌👍
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteदादा मस्त.. माहिती पूर्ण लेखन.. फोटो छान.. नवीन किल्ल्यांची माहिती मिळाली..
ReplyDelete- आरती दुगल
अत्यंत उपयुक्त माहिती आणि सुंदर लेखन।
ReplyDeletemast amit.....navin gadanchi mahiti milale.
ReplyDeletephoto hi khup Chan aahet-rahul padhye
Thanks Rahul
Deleteछान माहिती, धन्यवाद
ReplyDeleteKhup Chan mahiti Ani aubhav..
ReplyDeleteVery very nice
ReplyDeleteSanjay Patil belgaum
ReplyDeleteKhup khup cchan mahiti publish kelyabaddal dhanyawad
Dada shree kille Bhim Gad hya Gdachi Mahiti Dhyal Ka pn ha Killa Forest Department chya Tabayat aahe
ReplyDelete