Friday, June 16, 2017

ओसियॉ (Temples of Osian) आणि मंदोर दुर्ग (Mandore Fort) Offbeat Places near Jodhpur,Rajasthan

ओसिया


राजस्थानातील जोधपूरला पाहण्याच्या यादीत क्लॉक टॉवर, मेहरानगढ किल्ला, जसवंतथाडा, मंडोर इत्यादी ठिकाण होती. स्थानिक रिक्षावाले, हॉटेलवाल्यांशी गप्पा मारतंना ओसिया गावाच नाव समजले. त्या ठिकाणी सचिया मातेच मंदिर आहे आणि ओसिया पासून जवळच वाळूच्या टेकड्या आहेत आणि उंटावरुन किंवा जीप मधून तुम्ही त्यावर फ़िरु शकता असेही कळले. जोधपूर पासून ६० किमीवर अंतरावर ओसियॉ गाव आहे. बसने गावात पोहोचल्यावर गावाच्या बाहेरच रस्त्यालगत दगडात बांधलेली अप्रतिम मंदिर दिसली. बस मधून उतरुन थेट मंदिरे गाठली. नेहमी प्रमाणे पूरातत्व खात्याच्या निळ्या फ़लकाने स्वागत केले. स्मारक संरक्षित असले तरी त्याला काहीही संरक्षण नव्हते. शेळ्या मेंढ्यांचा मंदिरात मुक्त वावर होता आणि गावाची कचराकुंडीही तेथेच होती. रस्ताच्या एका बाजूला ३ आणि दुसर्‍या बाजूला एक मंदिर होते. रस्त्या लगत असलेल्या मंदिराचा कळस तुटलेला होता. पण त्याचा गजपृष्ठाकृती सभा मंडप वैशिष्ट्यपूर्ण आहे. दगडात केलेले हे काम पाहाण्यासारखे आहे. छतावर आणि खांबांवर कोरीवकाम आहे. गर्भगृहात मुर्ती नाही. त्याच्या बाजूचे हरीहरचे मंदिर हे शिल्पकामाचा अप्रतिम नमुना आहे. शेव आणि वैष्णव पंथातील वाद पराकोटीला पोहोचला होता तेंव्हा तो मिटवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर केला गेला. त्यातूनच मुर्तीशास्त्रात हरीहर या कल्पनेचा उदय झाला. यात एकाच मुर्तीत उजव्या बाजूला शिव आणि डाव्या बाजूला विष्णू त्याच्या आयुध, अलंकार आणि वाहानांसह कोरलेला असतो.उजवीकडे शंकराच्या जटा, गळ्यातील रुंडमाळा, हातात डमरु, त्रिशुळ, पायाषी गण आणि नंदी दाखवलेले असतात, तर डाव्या बाजूला विष्णूचा मुकुट, गळ्यात वैजयंती माळा, हातात शंख, चक्र आणि पायाशी गरुड दाखवलेला असतो. या मंदिराच्याही गर्भगृहात मुर्ती नाही. पण मंदिराच्या सभा मंडपातील खांब, छत यावर केलेले कोरीवकाम अप्रतिम आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला हरीहर, त्रिविक्रम अवतार, नरसिंहावतार, शंकराची केवलमुर्ती, गणपती, महिषासुर मर्दीनीची मुर्ती आणि इतर मुर्ती कोरलेल्या आहेत. मुर्तींच्या वरच्या शिल्प पटावर रामायण , महाभारत, पुराणातील कथा आणि काही मैथुन शिल्प कोरलेली आहेत. तिसरे मंदिर शंकराचे आहे ते सध्या पुजेत आहे. या मंदिराच्या पुढे एक सुंदर पुष्कर्णी बांधलेली आहे. सध्या मात्र ती कचर्‍याच्या विळख्यात सापडलेली आहे. 




ओसिया हे थर वाळवंटाच्या काठावर असलेले गाव प्राचीन काळापासून व्यापारी मार्गावरचे महत्वाचे स्थान होते. ८ व्या शतकात याठिकाणी प्रतिहार घराण्याची सत्ता होती. त्यांनी ८ ते १२ शतकाच्या दरम्यान याठिकाणी अनेक हिंदु आणि जैन मंदिरे बांधली. ओसवाल जैनांचे हे महत्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला सूर्य मंदिर आहे. त्यावरील कोरीवकामही सुंदर आहे. हि तीन मंदिर पाहून छोट्या टेकडीवर असलेल्या सचिया माता मंदिराकडे जातांना आजुबाजूला हाराची, प्रसादाची दुकान हॉटेल्स दिसतात. सचिया माता म्हणजे इंद्राची पत्नी इंद्राणी. याठिकाणी मुख्य मंदिरात सचिया माता व त्याच्या बाजूला चंडी देवी आणि अंबा मातेची मंदिरे आहेत. ही मुळ मंदिरे ८ व्या शतकात बांधली असली तरी आज असलेली मंदिरे १२ व्या शतकात बांधलेली आहेत. मंदिराच्या सभामंडपात आणि अंतराळाच्या छतावर केलेले कोरीवकाम सुंदर आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस दशावतारातले काही अवतार कोरलेले आहेत. येथे अनेक रुपात कोरलेले व्याल ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत.  ८ व्या शतकात बांधलेले महावीर मंदिर हे सुध्दा शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. ही दोन्ही मंदिरात सध्या पूजा होते.

 \


 


या भागात काही रिसॉर्ट आहेत. डेझर्ट सफ़ारी, तंबूतील निवास, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम अशी पॅकेजेस ते देतात, पण ती खूपच महागडी आहेत. अशा मुद्दाम (आर्टीफ़िशियली) तयार केलेल्या रिसॉर्ट मध्ये राहाण्यापेक्षा येथील गावात टिपिकल राजस्थानी घरात राहाण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. टेकड्यांपासून ५ किमीवर असलेल्या खेमसरगावातील सिवरों की ढाणी या वस्तीवर आमच्या जीपवाल्याचे घर होते. तेथे त्याने जेवणाची व्यवस्था केली होती. या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता. पुन्हा वाळूच्या टेकड्यांवरुन उड्या मारत जीप वस्तीत पोहोचली. रस्त्यात एक फ़ोर व्हील ड्राईव्ह जीप मुलांना घेऊन शाळेत जातांना दिसली, हिच येथल्या मुलांची स्कुल बस. पाच सहा घरांची वस्ती असलेल्या सीवरों की धानी वस्तीजवळ मोर, नीलगाय आणि हरणांनी दर्शन दिले. मातीच्या कंपाऊंडच्या आत तीन गोलकार, गवताने शाकारलेली घर होती. त्यातील एक स्वयंपाक घर, दुसरी राहाण्याची खोली आणि एक पाहूण्यांसाठी जेवणाची खोली होती. मध्यभागी अंगण होते. बाहेर काही उंट झाडाखाली बांधलेले होते. जीप नसल्यास प्रवासाचे हे दुसरे साधन होते. राजस्थानी पध्दतीचे गरमागरम जेवण जेऊन परत ओसिया गाठले. ओसियाहून जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या ९ किलोमीटर अलिकडे असलेल्या मंदोर गार्डनला जाता येते.






मंदोर दुर्ग (Mandore Fort)



जेवण झाल्यावर परत ओसियाला येऊन जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या  ९ किलोमीटर अलिकडे असलेल्या मंदोर गार्डनला उतरावे. या ठिकाणी ६ व्या शतकातला मंदोर दुर्ग, जोधपूरच्या राजांची समाधी मंदिरे आणि म्युझियम आहे. मांडव्य ऋषींच्या वास्तव्यामुळे टेकड्यांच्या सानिध्यात असलेल्या नगराला  मांडिव्यपूर असे नाव पडले. या नगरात मंदोदरी राहात होती. तीचे रावणाशी लग्न झाल्यामुळे मंदोर शहरातील लोक रावणाला आपला जावई मानतात. त्यांनी मंदोर मध्ये रावणाचे मंदिर बांधलेले आहे, दसर्‍याला देशभर रावणाला जाळण्याची प्रथा आहे, पण मंडोर मध्ये तो दिवस रावणाच्या श्राध्दाचा दिवस म्हणून पाळला जातो. 



       मंदोर दुर्ग दोन टेकड्यांवर वसलेला आहे. त्यामधील दरीतून जाणारा पाण्याचा प्रवाह वापरुन सुंदर जोधपूरच्या राजांनी सुंदर उद्यान बनवलेले आहे. स्थानिकांच्या अनास्थेमुळे या ठिकाणी अस्वच्छता आहे. जोधपूरच्या राजघराण्यातील राजांची येथे लाल दगडात बांधलेली समाधी मंदिरे आहेत. मंदोर गार्डन मधील समाधी मंदिरे पाहून व्यवस्थित बनवलेल्या पायर्‍यांच्या मार्गाने मंदोर दुर्गावर जाता येते. इसवीसनाच्या सहाव्या शतकापूर्वी या ठिकाणी दुर्ग होतो. ही प्रतिहार राजवंशाची राजधानी होती. इसवीसनाच्या १४ व्या शतकात प्रतिहारांनी हा किल्ला राठोडांना दिला.  १३९५ मध्ये गुजरातच्या सुतलानाने या किल्ल्याला वेढा घातला पण त्याला किल्ला जिंकता आला नाही. इसवीसन १४५३ मध्ये राव जोधा याने किल्ला जिंकून घेतला. त्याने आपली राजधानी मंदोर दुर्गावरुन जोधपूरच्या किल्ल्यावर हालवली. तेंव्हा पासून याकिल्ल्याचे महत्व कमी झाले. आज किल्ल्यावर एक मंदिर सोडल्यास बाकी सर्व वास्तू उध्वस्त झालेल्या आहेत. किल्या वरील वास्तूंच्या  अवशेषांवरुन या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर वस्ती होती. मंदोर दुर्ग पाहून जोधपूर सिटी बसने संध्याकाळी जोधपूरला परतता येते. 





 




 अमित सामंत

#OffbeatRajasthan

राजस्थानातील इतर अपरिचित ठिकाणांवरील ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

1) राणाप्रतापांच्या पाऊलखुणांवर.....(Ranapratap ....Chittorgad Fort, Ahar Museum, Haldighati Memorial & Chetak Smarak, Kumbhalgad, Ranakpur Temple)

2) जोधपूरची खाद्य भ्रमंती (what to eat & where to eat in Jodhpur)

राणाप्रतापांच्या पाऊलखुणांवर.....(Ranapratap ....Chittorgad Fort, Ahar Museum, Haldighati Memorial & Chetak Smarak, Kumbhalgad, Ranakpur Temple)

राणाप्रतापांच्या पाऊलखुणांवर.....



राजस्थान म्हटल की आपल्या डोळ्यासमोर येते ते दुरवर पसरलेल वाळवंट, कलात्मक आणि सुंदर हवेल्या, महाल आणि सुस्थितीत असलेले किल्ले. राजस्थानला फ़िरायला जायचे म्हटले अनेक जण जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, जयपूर आणि उदयपूर या परिचित शहरांना भेट देतात. या व्यतिरिक्त राजस्थानात अनेक ठिकाणे पाहाण्या सारखी आहेत. राजस्थान म्हणजे   अकबराच्या बलाढ्य फ़ौजेशी सामना करणारे वीर महाराणा प्रताप. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुजनीय आहेत,त्याप्रमाणेच राजस्थानात महाराणा प्रताप पुजनीय आहेत. ज्यावेळी राजस्थानचे इतर राजे मोघलांना शरण गेले होते. आपल्या मुली, बहिणी मोघलांच्या जनानखान्यात पाठवून त्यांचे मनसबदार बनले होते. त्यावेळी महाराणा प्रताप आपल्या छोट्याश्या मेवाड राज्याच्या स्वातंत्र्यासाठी मुठभर फ़ौजेसह लढत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या आरामदायी आणि विलासी जिवनाचा त्याग केला होता. मेवाडचे राजा असूनही त्यांचे जीवन आपल्या कुटुंबियांसह राना-वनात, डोंगर दर्‍यात भटकण्यात गेले. स्वधर्म आणि स्वातंत्र्यासाठी लढणारे महाराणा प्रताप अनेकांचे प्रेरणा स्थान आहेत. महाराणा प्रताप, त्यांचा बलिदान देणारा घोडा चेतक, हल्दीघाटीची लढाई यावर शेकडो काव्य रचलेली आहेत. महाराणा प्रतापांनी ज्या किल्ल्यात जन्मले तो कुंभलगड किल्ला, ज्या किल्ल्यात त्यांचा सर्वाधिक काळ गेला तो चित्तोडगड आणि ज्या भागात अकबराची सेना आणि महाराणा प्रतापांची सेना यांचे युध्द झाले ती हल्दीघाटी ही सर्व ठिकाणे उदयपूर पासून जवळ आहेत. उदयपूरला दोन दिवस मुक्काम करुन आपल्याला ही सर्व प्रेरणादायी ऐतिहासिक ठिकाणे पाहाता येतात. त्याबरोबर नाथव्दाराचे श्रीनाथजींचे मंदिर आणि रणकपूरचे जैन मंदिर संकुल पाहाता येते.

चितोडगड (Chittorgad Fort)




   उदयपुर हे राजस्थानातले महत्वाचे शहर आहे. याला तलावांचे शहर असेही म्हणतात. सिटी पॅलेस, जगदिश्वर मंदिर, पिचोला लेक, फ़तेह सागर लेक ही उदयपूर शहरतली महत्वाची ठिकाण एका दिवसात पाहून होतात. उदयपूर पाहून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी चितोडगड पाहाण्यासाठी सकाळीच निघावे. उदयपुरहून चितोडगड १०९ किमीवर आहे. ट्रेन, बस किंवा खाजगी गाडीने चितोडगडला जाता येते . चितोडगड किल्ला प्रचंड मोठा आहे. संपूर्ण किल्ला पाहायचा असेल तर किल्ल्याच्या आतमध्ये १३ किलोमीटर फिरावे लागते. त्यामुळे गाडी घेउनच फिरण योग्य ठरते. मेवाडच्या इतिहासात चितोडगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे . मेवाडच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना या किल्ल्यात घडल्या. अल्लाउद्दीन खिलजीच्या हाती पडू नये यासाठी राणी पद्मिनीने केलेला जोहार सर्वाना माहिती आहे. पण याकिल्ल्यावर एकूण ३ वेळा जोहार झाले आहेत. पन्नादाई या राजा उदयसिंहच्या दाईने स्वत:च्या मुलाचा बळी देउन भावी राजाला म्हणजे उदयसिंहाला याच किल्ल्यातून वाचवून कुंभलगडावर नेऊन ठेवले होते. या उदयसिंहाच्या पुत्राने म्हणजेच राणा प्रतापने अकबराशी लढा देऊन इतिहास घडवला. चितोडगड परत जिंकून घेता आला नाही हे शल्य उराशी घेउन राणाप्रतापने प्राण सोडले होते. असा हा चितोडगड नीट पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो. मैदानी भागात आडवा पसरलेला चितोडगडचा एकुलता एक डोंगर दुरवरुनच नजरेस पडतो. नैसर्गिक संरक्षण फ़ारसे नसल्यामुळे किल्ल्याला एकामागोमाग एक सात दरवाजे आहेत, दुहेरी तटबंदी आहे. या दरवाजांना पोल म्हणतात. पाडन पोल, भैरव पोल, हनुमान पोल, गणेश पोल, लक्श्मण पोल, राम पोल ७ ही दार पार करुन आपण किल्ल्यावर पोहोचल्यावर अनेक सुंदर मंदिरे, महाल, विजयस्तंभ, किर्तीस्तंभ हे मनोरे यांच्या साहाय्याने किल्ला आपल्या समोर उलगड जातो.




      चंद्रगुप्त मौर्याचा नातू अशोक उजैनचा प्रशासक होता त्याच्या क्षेत्रात चितोड येत असे. अशोकाच्या काळात ग्रीकांनी पश्चिम भारतावर आक्रमण केले त्यावेळी चितोड शहांच्या अधिपत्या खाली गेले. जवळजवळ ३ शतके चितोड शकांकडे होता. त्यानंतर आलेल्या गुलोहितांनी हा भाग जिंकून घेतला. त्यांनी स्वत:चे संवत सुरु केले, नाणी पाडली. पाचव्या शतकापासून ८ व्या शतका पर्यंत गुहील घराण्याच्या ताब्यात हा गड होता. इसवीसन ७३५ मध्ये मुहमद बीन कासिमने चितोडवर आक्रमण केले त्यावेळी बाप्पा रावळ यांनी त्याला पळवून लावले आणि गुहील राजा मानमौर्यापासून चितोड हिरावून घेतला.बाप्पांनी काबूल, कंधाहार, इराण, उजबेकीस्थान येथील राजांवर विजय मिळवला. शिवपूजक असलेले बाप्पा रावळ यांचे एकलिंगजी हे आराध्य दैवत होते. एकलिंगजी हे राजे आणि आपण त्याचे दिवाण असे ते मानत असत. बाप्पा रावळ आणि त्याच्या वंशजांनी पुढील काळात परकीय आक्रमकां विरुध्द कायम लढा दिला. बाप्पा रावळाचा वंश पुढील काळात भारतभर पसरला. बाराव्या शतकात राणा कर्णसिंहानंतर रावळ घराण्याचे दोन भाग झाले. त्याच्या दोन पुत्रांपासून रावळ घराणे आणि सिसोदिया घराणे अशा दोन शाखा तयार झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे याच सिसोदिया वंशाचे होते.  १३ व्या शतकात राणा रावक सिंह यांचा पुत्र कुंभकर्ण हा नेपाळला गेला. नेपाळच्या राजवंशाचा हा मुळ पुरुष आहे असे मानले जाते.








     किल्ल्यावरील मंदिरे, फ़तेह प्रकाश महाल, राणा कुंभ महाल, पाहात आपण मीरा मंदिरापाशी पोहोचतो. अप्रतिम कोरीवकाम असलेले भव्य कुंभशाम मंदिर आहे. मंदिरावर आतील आणि बाहेरील बाजूंनी दशवतारतील मुर्ती आहेत. मंदिराच्या आवारात मीरबाईचे मंदिर आहे. मीराबाई ही जोधपूरची राजकन्या होती. तिचा विवाह राणा संगाचा जेष्ठ पुत्र भोजराज ह्याच्याशी झाला होता. मीरा मंदिराच्या बाजूला विजय स्तंभ आहे. चितोडगडावरील हा विजयस्तंभ दुरवरुनही आपल्या नजरेस पडतो. इसवीसन १४४८ मध्ये राणा कुंभाने माळव्याचा सुभेदार मुहम्मद शहा खिलजी याचा पराभव केला. या विजया प्रित्यर्थ हा १२२ फ़ूट उंच आणि ३० फ़ूट रुंद विजयस्तंभ उभारण्यात आला. त्यावर आत आनि बाहेर दशवतार, रामायण , महाभारतातील प्रसंग दाखवणार्‍या अनेक मुर्ती कोरलेल्या आहेत. या विजय स्तंभाच्या बाजूला जी मोकळी जागा आहे तिला जोहार स्थळी म्हणतात. चितोडगडावर ३ जोहार झालेले आहेत. इसवीसन १३०२ मध्ये चितोडवर अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केले. त्यावेळी किल्ला शत्रूच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाल्यावर राजा रतनसिंहाची पत्नी राणी पद्मिनीसह दुर्गातल्या स्त्रियांनी जोहार केला आणि रतनसिंहाने केसरीया करुन प्राणार्पण केले."गढोमे गढ चितोडगढ बाकी सब गढीया, राणी मे राणी पद्मिनी महाराणी बाकी सब रणैय्या". इसवीसन १५३५ मध्ये बहादुरशहाने चितोडगडावर आक्रमण केले तेंव्हा राणी कर्णावतींने गडावरील स्त्रियांसह जोहार केला. इसवीसन १५६७ मध्ये अकबराने चितोडगडावर हल्ला केला तेंव्हा गडावरील स्त्रियांनी जोहार केला होता. विजयस्तंभाजवळ असलेले जोहर स्थान पाहून गलबलून येते.


Rani Padmini Mahal, Chittorgad Fort,



चितोडगडा वरील राणी पद्मिनीचा पाण्यातील महाल आहेत्याच्या पायऱ्यांवर बसलेल्या राणी पद्मिनीचे दर्शन तलावाच्या काठावर असलेल्या महालातील आरशातून अल्लाउद्दीन खिलजी झाले होते. आजही या ठिकाणी महालात आरसे लावलेले आहेत. त्यातुन राणी पद्मिनीच्या तलावातील महालाच्या पायर्‍या दिसतात. गडावर ठिकठिकाणी पाण्याचे तलाव आहेत. राजस्थाना सारख्या कमी पावसाच्या प्रदेशात गडावरील वस्तीला पाणी पुरावे यासाठी गडावर तलाव, कुंड खोदलेले होते. गडावरील दुसरा मनोरा म्हणजे किर्ती स्तंभ हा ७५ फ़ूट उंच आहे. त्यावरही अप्रतिम कोरीव काम असून चारही बाजूला भगवान आदिनाथाच्या मुर्ती आहेत. या जैन स्तंभाच्या बाजूला जैन मंदिर आहे. किल्ल्यावर फ़तेह प्रकाश पॅलेस जवळ असलेले सतबीस देवी हे जैन मंदिर १२व्या दगडात बांधलेले हे मंदिर शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. या मंदिरात आणि रणकपूरच्या जैन मंदिरात अनेक साम्य स्थळे आहेत. . चितोडगड वरील मंदिरे आणि त्यावरील कोरीवकाम हा वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो इतकी वैविध्यता मंदिरांमध्ये आहे.


आहार म्युझियम (Ahar Museum)



Ahar Museum





दिवसभर किल्ला पाहून झाल्यावर चितोडगड किल्ल्या खाली असलेल्या हॉटेलात पोटपूजा करुन १५ किमी वरील सावरीया गाठावे. येथे श्रीकृष्णाचे काळया पाषाणातील मंदिर आहे. मंदिर पाहून उदयपूरमध्ये शिरतांनाच आहार/अहाड म्युझियम दिसते. या ठिकाणी धुळाकोट नावाची टेकडी होती तिथे पूरातत्व खात्याने उत्खनन केल्यावर अंदाजे ४००० वर्षापूर्वी या ठिकाणी असलेल्या वस्तीचे (तांबावती नगरी) अवषेश मिळाले. त्याकाळी जी संस्कृती नांदत होती ती आता आहार/अहाड सभ्यता या नावाने ओळखली जाते. या ठिकाणी केलेल्या उत्खननात सापडलेल्या ताम्रपाषाण युगातील दैनंदिन वापराच्या वस्तू, लघु अश्म अस्त्रे (microliths) ,विविध भांडी, चुली, तांब्यांच्या कुर्‍हाडी, मासेमारीचे गळ, इत्यादी वस्तू, ऐतिहासिक, इतिहासपूर्व आणि ऐतिहासिक काळातील मुर्ती यांचे याठिकाणी कायम स्वरुपी प्रदर्शन पुरातत्त्व विभागाने मांडलेले आहे. म्युझियमच्या मागे धुळकोट ही टेकडी आहे. म्युझियमच्या रक्षकांना विनंती केल्यास ते कुलूपबंद असलेली ही उत्खनन केलेली जागा पाहायला देतात. येथे घरांच्या भिंती, सोक पिट इत्यादी गोष्टी पाहाता येतात.




अशाप्रकारे पहिला संपूर्ण दिवस इतिहासाच्या सानिध्यात घालवल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी हल्दीघाटी, नाथव्दारा आणि कुंभलगडासाठी निघावे. हि तीनही ठिकाणे एकाच दिवसात पाहायची असल्याने गाडी करणे आवश्यक आहे. रणकपूरचे जैन मंदिरही पाहायचे असल्यास अजून एक दिवस लागतो. त्यासाठी कुंभलगड येथे मुक्काम करावा लागतो. आपल्या लोणावळा खंडाळा सारखे कुंभलगड हे उदयपूरच्या लोकांचे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे अनेक हॉटेल्स आहेत. उदयपूरहून पुढे जोधपूरला जायचे असल्यास दुसर्‍या दिवशी रणकपूर पाहून राणी या गावामार्गे ४ तासात जोधपूरला जाता येते.   

हल्दीघाटी मेमोरीयल आणि चेतक स्मारक (Haldighati Memorial & Chetak Smarak)


Chetak Samadhi

१८ जुन १५७६ ला हल्दीघाटी येथे राणाप्रताप आणि अकबरच्या सैन्यात (जयपुरचा राजपुत्र मानसिंह याच्या नेतृत्वाखाली) एक दिवसाचे घनघोर युध्द झाल. जरी हे युध्द हल्दी घाटीचे युध्द म्हणून प्रसिध्द असले तरी ते युध्द हल्दीघाटाच्या जवळ असणार्‍या खणमोर गावा जवळील मैदानावर झाले. या युध्दात १८००० जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी तिथे पडलेल्या पावसामुळे तेथे रक्ताचे तळे तयार झाले तो भाग रक्ततलाई या नावाने ओळखला जातो. तिथे युध्दात कामी आलेल्या सैनिकांचे स्मारक बनवलेले आहे. खमणोर गावाजवळ मानसिंहाचा तळ होता तो भाग शाही बगीचा या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी सुंदर बाग बनवलेली आहे. दिवस मावळतांना युध्दाचे पारडे फिरल्याने राणाप्रताप आपल्या जखमी चेतक घोड्यावरून हल्दीघाटीत आला. तेथे पावसामुळे वाहाणार ओढा ओलांडताना अतिश्रमाने चेतक घोड्याचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी चेतक घोड्याने प्राण सोडला तेथे राणाप्रताप यांनी चेतक स्मारक आणि शिवमंदिर उभारले आहे.  उदयपूर पासून ५० किमीवर चेतक स्मारक आणि हल्दीघाटी म्युझियम आहे. चेतक स्मारकात छत्री आणि त्यात असलेली घोडेगळ पाहाता येते. हा परिसर सुंदर ठेवलेला आहे. चेतक स्मारकाच्या जवळ डॉं. श्रीमाली या माणसाने आयुष्यभर खपून, स्वतःचा पैसा खर्च करुन, देणग्या मिळवून हल्दीघाटी म्युझियम उभारलय. त्यात असलेल्या मिनी थेटर मध्ये हल्दीघाटीच्या लढाईवर दोन ध्वनीचित्रफिती दाखवण्यात येतात. चित्रफ़िती पाहून झाल्यावर एका गुहे सदृश्य भागातून आपल्याला पुढे नेत राणाप्रतापांच्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग, चितोड्गड आणि कुंभलगड या किल्ल्यांची माहीती प्रतिकृतींच्या व्दारे दिली जाते. त्याला निवेदनाची आणि छायाप्रकाशाची जोड देऊन प्रसंग उठावदार केले आहेत.





Ranapratap Memorial

  एकेकाळी रक्ताच्या रंगाने लाल झालेली हल्दीघाटी आजकाल गुलाबाच्या रंगाने लाल झालेली आहे. या भागात मोठ्याप्रमाणावर गुलाबाची शेती होते. हि गुलाब एक्सपोर्ट होतातच पण गुलाबापासून बनवलेल्या वस्तू गुलकंद, गुलाबपाणी इत्यादी वस्तू हल्दीघाटीत सगळीकडे तसेच म्युझियम मध्ये विकत मिळतात.  हल्दीघाटी म्युझियमच्या मागच्या बाजूस एका टेकडीवर राणाप्रतापांचा भव्य पुतळा उभारलेला आहे. याठिकाणाहून हल्दीघाटी परीसर दिसतो. त्याची दुर्गमता ध्यानात येते. हल्दीघाटी म्युझियम पासून नाथव्दारा २० किमीवर आहे. नाथव्दाराला जातांना रस्त्यात एक छोटासा घाट आणि खिंड लागते. या खिंडीतली माती हळदी सारख्या पिवळ्या रंगाची आहे. त्यामुळेच या घाटीला हल्दीघाटी या नावाने ओळखले जाते. या रस्त्याने पुढे जातांना शाही बगिचा, खमणोर आणि रक्त तलाई ही ठिकाणे लागतात. नाथव्दाराला श्रीनाजींचे दर्शन घेऊन आणि पोटपूजा करून ५० किमी वरील कुंभलगड किल्ला गाठावा. किल्ल्याच्या थेट दारपर्यंत गाडी जाते.     

कुंभलगड (Kumbhalgad)


Kumbhalgad

भारतातल्या सर्वात जुन्या अरवली पर्वतरांगेतला सर्वात उंच किल्ला (३७६६ फूट) म्हणजे कुंभलगड, चीनच्या भिंती नंतर सर्वात लांब मानव निर्मित तटबंदी ४४ किलोमीटर म्हणजे कुंभलगड. कुंभलगडाची अशी अनेक वैशिष्ट्य आपण ऐकलेली असतात. त्यामुळे किल्ला पाहाण्याची उत्सुकता वाढते. किल्ल्याचे भव्य बुरुज आणि दुहेरी तटबंदी आपले स्वागत करतात. कुंभलगडाचे प्राचीन काळी नाव होते मच्छिंद्रगड.  ८०० वर्ष अंधारत राहीलेल्या या किल्ल्याचे भाग्य राणा हमीरच्या काळात परत उदयाला आले. हमीरचे बालपण या किल्ल्यावर गेले होते. इसवीसन १४३३ मध्ये महाराणा कुंभाने हा किल्ला नव्याने बांधला. मेवाड मधल्या ८४ किंल्ल्यांपैकी ३२ किल्ले एकट्या राणा कुंभने बांधले आहेत. राणा कुंभाने कुंभलगडाला आपली दुसरी राजधानी बनवले. इसवीसन १५९७ ला जेष्ठ शुक्ल तृतीयेला 2 जून (९ मे १५४० इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे) महाराणा प्रतापसिंहाचा जन्म कुंभलगडावर झाला. 



Kumbhalgad

किल्ल्याच्या मुख्य डोंगरावर चढण्यासाठी व्यवस्थित मार्ग बनवलेला आहे. राम पोल, भैरव पोल, निंबू पोल, पगडा पोल हे दरवाजे ओलांडत आपला बाले किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याला याशिवाय आरेट पोल, हल्ला पोल, हनुमान पोल इत्यादी दरवाजे तटबंदीत आहेत. बालेकिल्ल्यावर राणाकुंभ महाल आहे. त्याच्या वरच्या बाजूला चढून गेल्यावर महाराणा प्रतापांचे जन्मस्थान आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च भागात फ़तेह प्रकाश नावाचा राजवाडा आहे. या राजवाड्याच्या गच्चीवरून संपूर्ण किल्ला, दूरवर पसरलेली तटबंदी आणि आजूबाजूचा दुर्गम परिसर दिसतो. किल्ल्यावर अनेक मंदिर आहेत. किल्ला उतरुन परत पहिल्या प्रवेशव्दारापाशी येऊन मंदिर पाहायला जाता येते. किल्ला आणि मंदिर पाहून होईपर्यंत दिवस मावळायला लागलेला असतो. याठिकाणी दररोज संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो असतो. यात किल्ल्याचा आणि मेवाडचा इतिहास सांगितला जातो. लाईट आणि साउंड शो संपल्यावर आपल्याला उदयपूरला जाता येते किंवा कुंभलगडला मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी रणकपूरचे जैन मंदिर पाहाण्यासाठी जाता येते.      


ऱणकपूरचे जैन मंदिर संकुल (Ranakpur Temple)

                                                                            

Jain Temple Ranakpur
                                                    
कुंभलगड ते रणकपूर हे अंतर ३३ किमी आहे. पण घाट रस्ता असल्यामुळे पोहोचायला साधारणपणे २ तास लागतात. रणकपूरचे जैन मंदिर पर्यटकांसाठी दुपारी १२ वाजता उघडते. घाट रस्त्याने  निसर्गाची शोभा पाहात आपण रणकपूरच्या सूर्य मंदिरापाशी पोहोचतो. रणकपूरच्या जैन मंदिर संकुला बाहेर हे मंदिर आहे. मंदिरावर अप्रतिम कोरीवकाम आहे. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूस गजपट्टी बरोबर अश्वपट्टी पण आहे. सूर्याच्या रथाचे घोडे यावर कोरलेले आहेत. सूर्यमंदिर पाहील्यावर आपली उत्सुकता वाढलेली असते तशात हिरव्यागार डोंगराच्या पार्श्वभूमीवर भव्य मंदिर आणि अनेक कळसांची रांग दिसायला लागते. मेवाडचा राजा कुंभ याच्या प्रधान संघवी धारनाथ पोरवाल याने १५ व्या शतकात हे सुंदर जैन मंदिर बांधले. अरवली पर्वत रांगेत मघई नदी काठी असलेले हे जैन मंदिर म्हणजे संगमरवराला पडलेल अप्रतिम स्वप्न आहे. या मंदिराच्या गर्भगृहाला चार प्रवेशव्दार असून या मंदिरात भगवान आदिनाथांच्या चार मुर्ती आहेत. त्यामुळे मंदिराला चतुर्मुख मंदिर या नावाने ओळाखले जाते. याशिवाय मंदिरात सर्व तिर्थंकरांच्या मुर्ती आहेत. मंदिराला मुख्य कळस आणि इतर ७६ छोटे कळस आहेत. मंदिराच्या आतल्या बाजूला संगमरावरावर जे कोरीव काम केले आहे त्याला तोड नाही. ८४ कोरीव खांब, ४ महामंडप, २० रंग मंडप यांच्या छतावर आतल्या बाजूने केलेले कोरीवकाम नाजूक आणि सुंदर आहे. रणकपूरचे मंदिर कलाकुसरीत ताजमहालापेक्षा काकणभर सरसच आहे. मुख्य मंदिरा बरोबर याठिकाणी पार्श्वनाथांचे मंदिर आहे. मंदिर पाहून आपण १७० किमीवरील जोधपूर गाठू शकता किंवा १६० किमीवरील उदयपूरला परत येऊ शकता.




तीन दिवसाची ही सहल आपल्याला राजस्थानचे एक वेगळे रुप दाखवते. या परिसरात फ़िरल्यावर अरवली पर्वत रांगा, त्यातील निबीड अरण्य यांच्या सहाय्याने महाराणा प्रताप यांनी कशाप्रकारे अकबराच्या बलाढ्य सैन्याशी आयुष्यभर सामना केला, हल्दीघाटीचे युध्द लढले याची आपल्याला कल्पना येते आणि त्यांच्या बद्दलचा आदर दुणावतो. 

जाण्यासाठी :- उदयपूर हे शहर रस्ता, रेल्वे आणि हवाईमार्गाने देशातील सर्व शहरांशी जोडलेले आहे. उदयपूरला राहाणाची आणि खाण्याची व्यवस्था आहे. उदयपूरला राहून ३ दिवसात अशाप्रकारे कार्यक्रम बनवता येईल.
दिवस १ :- उदयपूर दर्शन, मुक्काम उदयपूर
दिवस २ :- उदयपूर- चितोडगड -सावरीया - आहार/अहाड म्युझियम - उदयपूर (मुक्काम उदयपूर)
दिवस ३ :- उदयपूर- हल्दीघाटी- नाथव्दारा- कुंभलगड  (मुक्काम कुंभलगड)
दिवस ४ :- कुंभलगड - रणकपूर - उदयपूर किंवा जोधपूरला मुक्काम








अमित सामंत

ओसियॉ (Temples of Osian) आणि मंदोर दुर्ग (Mandore Fort) या जोधपूर जवळील Offbeat ठिकाणांची माहिती वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा 

#ranapratap#ranapratapmuseum#haldighati#haldighatimemorial#chetaksmarak#chittorgadh#chittodgadh#kumbhalgad#ranapratapbirthplace#ranakpurjaintemple#

Thursday, June 15, 2017

जोधपूरची खाद्य भ्रमंती (what to eat & where to eat in Jodhpur)

जोधपूरची खाद्य भ्रमंती





       राजस्थान मधील जोधपूर हे वाळवंटाच्या काठावरच महत्वाच ऐतिहासिक शहर आहे. उष्णते पासून दिलासा मिळावा यासाठी य शहरातली घर निळ्या रंगाने रंगवली जात असत. त्यामुळे मेहरानगड या किल्ल्यावरुन पाहिले असता निळ्या रंगाची घर दूरवर पसरलेली दिसतात. त्यामुळे या शहराला ब्ल्यू सिटी या नावानेही ओळखले जाते. या शहराचा इतिहास आणि पर्यटन हे मेहरानगड या किल्ल्याशी जोडलेले आहे. राठोड राजघराण्यातील राव जोधा यांनी इसवीसन १४५९ मध्ये मेहरानगड किल्ला बांधला आणि मंदोर दुर्गावरुन आपली राजधानी जोधपूरला हालवली. त्याबरोबर जोधपूर शहराची भरभराट सुरु झाली, बाजारपेठ वसली त्यात इतर दुकानांबरोबर खाण्या-पिण्याची दुकाने होती. त्यामुळे एक खाद्य संस्कृती तयार झाली. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची इथे रेलचेल आहे. मिठाई खाण्याकडे स्थानिक जनतेचा अधिक ओढा आहे.





      
जोधपूर शहरात मेहरानगड किल्ल्याकडे चालत जाण्यासाठी जो रस्ता आहे त्याच नाव आहे "नई सडक". हा रस्ता क्लॉक टॉवर मार्गे थेट मेहरानगड किल्ल्यापर्यंत जातो. या रस्त्यावर गेली १०० वर्ष जोधपूरची खाद्य संस्कृती जपणारी काही दुकाने आहेत. क्लॉक टॉवर महाराजा सरदारसिंहच्या काळात (इसवीसन १८८०-१९११) बांधला गेला. याच्या आसपास बाजार, हवेल्या आणि दाटीवाटीने वसलेली जुनी वस्ती आहे. क्लॉक टॉवरच्या गेटला लागुन "मिशरीलाल" हे मिठाईचे दुकान आहे. १९२७ साली स्थापन झालेल्या या दुकानात काळानुसार थोडे बदल करुन नवा साज चढवलेला आहे. या दुकानातली "माखनीया लस्सी" फ़ेमस आहे. अप्रतिम चवीच्या लस्सीवर मलईचा जो जाड तुकडा टाकलेला असतो त्यामुळे याची चव जीभेवर रेंगाळतच राहाते. एक ग्लास लस्सी पिउन समाधान होत नाही. लस्सीचा दुसरा ग्लास प्यायल्यावर इतर गोड पदार्थ चाखण्यासाठी जीभेवरची गोड चव घालवणे भाग असते. त्यासाठी या ठिकाणी तिखट पदार्थही (नमकीन) मिळतात. बेसनची वडी, गाजर हलवा, कलाकंद, मावा कचोरी हे गोड पदार्थ आणि तळलेले काजू ,शेव -चिवड्याचे विविध प्रकार, नमकीन कचोरी आणि मिरची वडा यातील आवडणारे पदार्थ खाऊन जड पोटाने आणि (अंतकरणाने) या जुन्या जाणत्या मिठाईवाल्याला निरोप देऊन किल्ल्याचा रस्ता पकडावा. किल्ला व्यवस्थित पाहून चालत किल्ल्यापासून १० मिनिटाच्या अंतरावर असलेल्या जसवंत थाडा या प्रेक्षणीय स्थळा पर्यंत यावे. किल्ला आणि जसवंत थाडा बघण्यात ३ तास खर्च झालेले असतात आणि चालत फ़िरल्याने सकाळचा हेवी नाश्ताही जिरलेला असतो. जसवंत थाडाला रिक्षा पकडून नई सडक गाठावी. नई सडक वरचे प्रिती रेस्टॉरंट हे व्हेज खाणार्‍यांसाठी चांगला पर्याय आहे. कैर सांग्री ही इथली स्थानिक भाजी , वाळवंटात उगवेणार्‍या खुरट्या काटेरी झुडूपांवर येणार्‍या शेंगा खुडून त्यापासून भाजी आणि लोणचे बनवले जाते. हि भाजी गोळा करण्यासाठी लागणार्‍या कष्टांमुळे ती अतिशय महाग आहे. प्रिया रेस्टॉरंट मध्ये ही भाजी खायला मिळते. प्रिया रेस्टॉरंटच्या समोर जनता स्वीट होम आहे. याच्या बर्‍याच शाखा जोधपूर मध्ये आहेत. इथे बंगाली मिठाईचे वेगवेगळे प्रकार अप्रतिम मिळतात. याशिवाय मावा कचोरी, इमरती, मावा लाडू हे प्रकार चांगले मिळतात. याठिकाणी सॉफ़्ट आईस्क्रीम हा वगवेगळ्या फ़्लेवरमध्ये स्मुदी सारखा घट्ट पदार्थ मिळतो. सकाळचा हेवी नाश्ता, त्यानंतरचे फ़िरणे, जेवण, आईस्क्रीम यानंतर वामकुक्षी आवश्यक आहे.


   



  वामकुक्षी नंतर उमेद भवन पॅलेस पाहाण्यासाठी बाहेर पडावे. संध्याकाळी फ़िरायला बाहेर पडतांना थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. गरमागरम चहा पिण्याची इच्छा होते. पण चहा न पिता गरमागरम दुध घ्यावे. त्यावर मलईचा पातळ स्लॅब घालून मिळ्तो. जोधपूर मध्ये अनेक ठिकाणी गरमागरम दुध विकणारी दुकान आहेत. चुलीवर दुध रटरटत असत, त्याच्या बाजूला कढईत मंद आचेवर गरम होणार्‍या दुधावरची मलई काढून त्याची व्यवस्थित घडी करुन बाजूच्या ट्रे मध्ये मांडून ठेवलेली पाहायला मिळते. दुध मागितल्यावर गरमागरम दुध ग्लासात भरुन वरुन ही मलईची घडी टाकली जाते.


      उमेद भवन पाहून झाल्यावर क्लॉक टॉवरकडे मोर्चा वळवावा. नई सडक आणि क्लॉक टॉवर जवळील बाजारात अनेक स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू, मोजडी इत्यादी मिळतात.त्यामुळे देशी, विदेशी पर्यटकांची येथे गर्दी असते. या नई सडकच्या टोकाला शाही समोसा नावाचे जोधपूर मधले समोसा आणि मसाला मिरचीचे फ़ेमस दुकान आहे . येथे दिवसरात्र गर्दी होती. गर्दीत शिरुन सामोसा आणि मिरची घेतली. त्या बरोबर चटणी नव्हती. आपल्या सवयी प्रमाणे चटणी मागितल्यावर दुकानदार म्हणाला,"उसकी जरुरत नही अंदरही है" मोठ्या अपेक्षेने सामोस खायला सुरुवात केली आणि पहिल्याच घासाला अपेक्षाभंग झाला. सामोश्याच्या सारणात चिंचेचा कोळ घातला होता. त्यामुळे सामोसा आम्बट लागत होता म्हणून त्याला चटणीची गरज नाही असे दुकानदाराने सांगितले असावे. सामोश्याने अपेक्षाभंग झाल्यावर मिरची खायला सुरुवात केली त्यातही ते आंबट सारण भरलेल होते. आम्हाला जरी हे पदार्थ आवडले नाहीत तरी स्थानिक लोक गर्दी करुन खात होते. रात्रीच्या दिव्यांनी उजळलेला क्लॉक टॉवर पार करुन पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एका दुकानासमोर बरीच गर्दी दिसली. आमलेट शॉप अस नाव असलेल्या दुकानात एक म्हातारे गृहस्थ आमलेट बनवत होते आणि बाहेर खायला विदेशी पर्यटकांची गर्दी होती. दुकानात जागा नसल्यामुळे सर्वजण रस्त्यावर बसूनच खात होते. लोन्ली प्लॅनेटसह अनेक परदेशी पुस्तकांनी गौरवलेल्या या दुकानात अंड्याचे विविध प्रकार मिळतात. उकडलेल्या अंड्या पासून, फ़्लपी आमलेट, टोस्ट आमलेट, पोटॅटो आमलेट पर्यंत असंख्य प्रकार इथे खायला मिळतात. किमान दोन प्रकार खाऊन पूढे जाणे म्हणजे फ़ाऊल आहे. शाही सामोसा खातांना झालेल्या अपेक्षाभंगाचे दु;ख आमलेट शॉपमुळे कमी झाले. 


दुसर्‍या दिवशी जोधपूरच्या पावटा सर्कलपासून सुटणार्‍या बसने ६० किमी वरील ओसिया गाठावे. ओसिया हे थर वाळवंटाच्या काठावर असलेले गाव प्राचीन काळापासून व्यापारी मार्गावरचे महत्वाचे स्थान होते. ८ व्या शतकात याठिकाणी प्रतिहार घराण्याची सत्ता होती. त्यांनी ८ ते १२ शतकाच्या दरम्यान याठिकाणी अनेक हिंदु आणि जैन मंदिरे बांधली. ओसवाल जैनांचे हे महत्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला सूर्य मंदिर आहे. त्यावरील कोरीवकामही सुंदर आहे. हि तीन मंदिर पाहून छोट्या टेकडीवर असलेल्या सचिया माता मंदिराकडे जातांना आजुबाजूला हाराची, प्रसादाची दुकान हॉटेल्स दिसतात. सचिया माता म्हणजे इंद्राची पत्नी इंद्राणी. याठिकाणी मुख्य मंदिरात सचिया माता व त्याच्या बाजूला चंडी देवी आणि अंबा मातेची मंदिरे आहेत. ही मुळ मदिरे ८ व्या शतकात बांधली असली तरी आज असलेली मंदिरे १२ व्या शतकात बांधलेली आहेत. मंदिराच्या सभामंडपात आणि अंतराळाच्या छतावर केलेले कोरीवकाम सुंदर आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस दशावतारातले काही अवतार कोरलेले आहेत. येथे अनेक रुपात कोरलेले व्याल ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत.  ८ व्या शतकात बांधलेले महावीर मंदिर हे सुध्दा शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. ही दोन्ही मंदिरात सध्या पूजा होते.


      ओसियातील मंदिरी पाहायला २ तास लागतात. त्यानंतर जीप भाड्याने घेऊन आपण १० किमीवर असलेल्या वाळूंच्या टेकड्यांवर जीपने जाऊ शकतो. मुख्य रस्ता सोडून जीप वाळूच्या रस्त्याला लागते आणि उंच सखल टेकड्यांवरून जातांना रोलर कोस्टरचे थ्रील अनुभवता येते. या ठिकाणी असलेल्या वाळूच्या सर्वात उंच टेकडीवर पोहोचल्यावर उंट सफ़ारीही करता येते. या भागात काही रिसॉर्ट आहेत. डेझर्ट सफ़ारी, तंबूतील निवास, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम अशी पॅकेजेस ते देतात, पण ती खूपच महागडी आहेत. अशा मुद्दाम (आर्टीफ़िशियली) तयार केलेल्या रिसॉर्ट मध्ये राहाण्यापेक्षा येथील गावात टिपिकल राजस्थानी घरात राहाण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. टेकड्यांपासून ५ किमीवर असलेल्या खेमसरगावातील सिवरों की ढाणी या वस्तीवर आमच्या जीपवाल्याचे घर होते. तेथे त्याने जेवणाची व्यवस्था केली होती. या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता. पुन्हा वाळूच्या टेकड्यांवरुन उड्या मारत जीप वस्तीत पोहोचली. रस्त्यात एक फ़ोर व्हील ड्राईव्ह जीप मुलांना घेऊन शाळेत जातांना दिसली, हिच येथल्या मुलांची स्कुल बस. पाच सहा घरांची वस्ती असलेल्या सीवरों की धानी वस्तीजवळ मोर, नीलगाय आणि हरणांनी दर्शन दिले. मातीच्या कंपाऊंडच्या आत तीन गोलकार, गवताने शाकारलेली घर होती. त्यातील एक स्वयंपाक घर, दुसरी राहाण्याची खोली आणि एक पाहूण्यांसाठी जेवणाची खोली होती. मध्यभागी अंगण होते. बाहेर काही उंट झाडाखाली बांधलेले होते. जीप नसल्यास प्रवासाचे हे दुसरे साधन होते. राजस्थानी पध्दतीचे गरमागरम जेवण जेऊन परत ओसिया गाठले. ओसियाहून जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या ९ किलोमीटर अलिकडे असलेल्या मंदोर गार्डनला जाता येते. ६ व्या शतकातला मंदोर दुर्ग ,जोधपूरच्या राजांची समाधी मंदिर आणि म्युझियम पाहून संध्याकाळी जोधपूरला परतता येते.


      सकाळी व्हेज जेवण झाल्यामुळे संध्याकाळी नॉनव्हेज खाऊया या उद्देशाने स्थानिक लोकांकडे चौकशी केली. त्यावेळी कलिंगा हॉटेलचे नाव कळले. स्टेशन जवळ असल्याने रिक्षा करुन कलिंगा गाठले. कलिंगा हे जरा महाग पण मुंबई सारख पॉश एसी रेस्टॉरंट आहे. जोधपूर रेल्वे  स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या हॉटेलात व्हेज आणि नॉनव्हेज खायला मिळते.राजस्थानी स्पेशल काय आहे विचारल्यावर लाल मास (म्हणजे बकर्‍याचे लाल मसाल्यात केलेले मटण) आहे असे सांगण्यात आले. रोटी बरोबर मटण खाल्ल्यावर जोधपूरकरांच्या सवयी प्रमाणे गोड खाणे आवश्यक होते. रिक्षा पकडून शाही सामोसाच्या मागच्या गल्लीत असलेले चतुर्भुजचे दुकान गाठले. एका चिंचोळ्या गल्लीत हे पुरातन दुकान आहे. दुकानात कुठल्याही प्रकारचा बडेजाव नाही. पण इथल्या माव्याच्या पदार्थांना तोड नाही. गुलाबजाम, कलाकंद तर तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळतात. जमिनीवर बसलेला मॅनेजर कम कॅशिअर आणि त्याच्या बाजूला बसलेला वजन करुन देणारा माणूस एवढाच स्टाफ़, गुलाबजाम आणि कलाकंद येथे थेट वर्तमान पत्राच्या तुकड्यावर देतात. खवय्ये गिर्‍हाईक रस्त्यावर उभ राहून रिक्षा चुकवत गुलाबजाम रिचवत असतात. गुलाबजाम खाऊन थोडे दुसर्‍या दिवशीच्या प्रवासासाठी बांधून घेऊन जोधपूरची खाद्य भ्रमंती आटोपती घेतली. 



अमित सामंत


Thursday, May 18, 2017

कोटातला बालाजी ( Balaji Temple in Fort,Mumbai)



   
  आज बऱ्याच दिवसांनी सीएसटीला उतरलो. पाउस मस्त पडत होता. गरमागरम सांबाराने गळा शेकायचा विचार होता . देशपांडेना घाई असल्याने ते सरळ ऑफीसला गेले. मी आपल्या नेहमीच्या गर्दीच्या बोराबाजार स्ट्रीटने चालायला सुरुवात केली . उजव्या बाजुला पंचम पुरीवाला आहे. त्या गल्लीत सहज लक्ष गेल. तिथे एक मंदिर आणि त्यासमोर चारा घेउन बसलेली गायवाली अस नेहमीच दृश्य होते . मंदिरावर व्यंकटेश मंदिर अशी पाटी होती. वाचून पुढे गेलो आणि एकदम मुंबईचे वर्णन हे १८६३ साली गोविंद नारायण  माडगावकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाची आठवण झाली. त्यात कोटातला व्यंकटेश म्हणून एका मंदिराच वर्णन आहे. ते हेच मंदिर आहे का हे पाहाण्यासाठी परत फिरलो. एका एक मजली बसक्या इमारतीच्या तळमजल्यावर मंदिर आहे . पुजाऱ्याशी बोलल्यावर कळल की मंदिर जुनच आहे. (किती ते त्याला माहिती नव्हत)  २००१ मधे नविन मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे . बालाजीच्या पायाशी हनुमान आणि गणपतीची जुनी मुर्ती आहे .

    घरी जाऊन गुगल भाऊना साद घातली आणि रंजक इतिहास समोर आला . इसवीसन १६५० ते १७२८ याकाळात रामजी कामती (हे नाव कामत असाव कारण इंग्रजी कागदपत्रात याच वर्णन पंचा शेणवी ब्राम्हण अस केलेय म्हणजेच जीएसबी गौड सारस्वत ब्राह्मण) हा हरहुन्नरी माणूस ईस्ट इंडीया  कंपनीच्या ताब्यात असलेल्या मुंबई बेटावर राहात होता. व्यापारी , दर्यावदी आणि योध्दा होता. इंग्रजांबरोबर बऱ्याच युध्दात त्याने भाग घेतला होता. त्यामुळे तो इंग्रजांच्या गळ्यातला ताईत होता . सुरतहून १६९० मध्ये मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रातही  कामत यांचा इंग्रजांचा विश्वासार्ह साथीदार म्हणून गौरव केला होता . इंग्रजानी मलबार हिल ही टेकडी  कामतांना वार्षिक १५/- रुपयाने भाडे तत्वावर दिली  होती  . त्यावेळी त्यानी वाळकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानी  केलेल्या दानातूनच कोटात व्यंकटेशाचे मंदिर बांधले गेेले होते.



     या माणसाच्या यशामुळे त्याचे अनेक शत्रूही तयार झाले होते. त्याच शत्रूनी एकत्र येउन खोटी कागदपत्रे तयार केली आणि कामत हे  कान्होजी आंग्रेना मिळालेले आहेतअसे दाखवले. त्यानुसार कामतांवर खटला दाखल करण्यात आला . त्यांच्या वर करण्यात आलेला आरोप सिध्द झाल्यामुळे कामतांची सर्व मालमत्ता जप्त करुन  त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला .

      इसवीसन १७४३ मध्ये ही केस चीफ जस्टीस पुढे पुन्हा आली तेंव्हा कोर्टात सादर केलेली कागदपत्र खोटी असल्याचे समोर आले. त्यामुळे इंग्रजांनी त्याच्या वारसाना रुपये ४०००/- भरपाई आणि ३०/- मासिक पेंशन चालू केले होते. 



       मुंबईच्या न्यायालयीन इतिहासात कामतांच्या केसला महत्व आहे . चुकीच्या पुराव्यामुळे आणि त्यावर घेतलेल्या निर्णामुळे एका निरपराध माणसाला शिक्षा झाली. या केसवर गुगलवर काही पानही आहेत.

तर कोटातल्या व्यंकटेश मंदिरापासून सुरु झालेली ही काहाणी कामतांचा मला माहित नसलेला इतिहास समजल्यामुळे सुफळ संपूर्ण झाली .