Showing posts with label Offbeat Kenya. Show all posts
Showing posts with label Offbeat Kenya. Show all posts

Monday, May 6, 2019

offbeat Kenya, Suswa Mountain , निद्रिस्त ज्वालामुखीच्या विवरात, सुस्वा माउंटन , केनिया

Baboon Parliament, Suswa Mountain, kenya

केनियात मसाई मारा अभयारण्यात जायचे ठरल्यावर आजूबाजूला अजून काही बघण्यासारखी आगळीवेगळी ठिकाणे आहेत का याचा शोध घेत होतो. गुगल मॅप बघताना सुस्वा माउंटन हे ठिकाण सापडले. रुढार्थाने हे पर्यटनस्थळ नाही. मुळात इथे जायला रस्ताच नाहीं. ऱस्ता म्हणून जे काही आहे ते पावसाळ्यात नसते. पण या सुस्वा माउंटनच्या पोटात अनेक रहस्य दडलेली आहेत. त्यामुळे सुस्वा माउंटनला जायचे नक्की केले.


Cave at Suswa Mountain, Kenya

नैरोबीतून मसाई माराला जाणारा महामार्ग ग्रेट रिफ्ट व्हॅलीतून जातो. ग्रेट रिफ्ट व्हॅली आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर ९६०० किलोमीटर पसरलेली आहे. खंडांच्या प्लेटसच्या सरकण्यामुळे ग्रेट रिफ्ट व्हॅली तयार झाली आहे, खंडांच्या या सरकण्यामुळे आजपासून अंदाजे ५० लाख वर्षांनी या व्हॅलीच्या जागी समुद्र असेल आणि ईस्ट अफ़्रिका हा अफ़्रिके पासून वेगळा झालेला नवीन खंड तयार होईल. रिफ़्ट व्हॅलीतून जातांना आजही आपल्याला लांबच्या लांब पसरलेले खंदक (Trenches) पाहायला मिळतात. "जमिन दुभंगली आणि आभळ फ़ाटल तर दाद मागायची कोणाकडे" या म्हणीचा प्रत्यय या व्हॅलीत राहाणार्‍या लोकांना नेहमीच येत असतो. खंडांच्या प्लेटच्या सरकण्याने या भागातील जमिन दुभंगते. या भागात अनेक सुप्त आणि जागृत ज्वालामुखी आहेत. जमिनीत त्यांच्या राखेचे थर आहेत. भरपूर पाऊस पडल्यावर ही राख हलकी असल्याने पाण्या बरोबर वाहून जाते आणि अचानक जमिन खचते. चीनेने नविनच बनवलेल्या महामार्गावर अशीच जमिन खचल्याने मोठा चर पडलेला आम्हाला पाहायला मिळाला. याच रिफ्ट व्हॅलीत सुस्वा माउंटन हे ज्वालामुखीमुळे तयार झालेले विवर आहे.या ठिकाणी ज्वालामुखीमुळे एकात एक अशी दोन विवरे तयार झालेली आहेत. अशा प्रकारे एकाच ठिकाणी एकात एक अशी दोन विवरे असणारे हे पृथ्वीवर एकमेव दुर्मिळ ठिकाण आहे .

Baboon's Parliament, Suswa Mountain , kenya 

मसाई माराहून नैरोबीला जाणाऱ्या महामार्गावर नारोख शहर आहे . या शहराच्यापुढे महामार्गाच्या उजव्या बाजूला सुस्वा माउंटन दिसतो. पण या डोंगरावर जाण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता लागते. आमचा मसाई वाटाड्या आमची महामार्गावर वाट पाहात उभा होता. मसाई पारंपारिक पेहराव केलेला रॉजर अस्खलित इंग्रजी बोलत होता. त्याच्या कमरेला मसाई सुरा लावलेला होता. तरस, बिबट्या यांच्याशी सुस्वातील मसाईंची अधूनमधून गाठ पडते. त्यांच्यापासून  संरक्षण करण्यासाठी ते हा मसाई सुरा वापरतात.   

महामार्ग सोडल्यावर एक कच्चा रस्ता सुस्वा माउंटनकडे जातो. या रस्त्यावर रिफ्ट व्हॅलीचे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या लांबच्या लांब पसरलेल्या जमिनीतील भेगा दिसत होत्या. या खडबडीत रस्त्यावरुन तासभराचा प्रवास केल्यावर आम्ही ज्वालामुखीच्या विवराच्या पायथ्याशी पोहोचलो. आता रस्ता असा नव्हताच रॉजर दाखवत होता त्यामार्गाने आमचा चालक गाडी डोंगरावर चढवत होता. केवळ अशा प्रदेशात चालवण्यासाठी बनवलेल्या ४ x ४ गाडी आणि गेली १५ वर्ष या भागात फिरणारा कसबी चालक असल्यामुळे आम्ही तासभरात विनासायास विवरात प्रवेश केला. हे ज्वालामुखीचे आतले विवर होते. दुरवर पसरलेला गवताळ माळ त्यावर चरणारी मसाईंची गुरे आणि हरणे दिसत होती. हे कुरण चारही बाजूनी विवराच्या कडेला तयार झालेल्या डोंगररांगेने वेढलेले होते. हे ज्वालामुखीचे आतील विवर होते. या आतल्या विवरात ऐंबेटिरा (Embetira) नावाच २०३१ फुट उंच शिखर आहे.  त्यावरून आतले आणि बाहेरचे अशी दोन्ही विवरे दिसतात. गाडी पुढे गेल्यावर चक्क एक शाळा दिसली . शाळेची पक्की बैठी इमारत होती. पण शाळा बाहेरच्या झाडाखाली भरली होती. आता मध्येमध्ये शेते आणि गाई गुर चारणारे मसाई गुराखी दिसायला लागले होते.


ऐंबेटिरा (Embetira) Highest Peak in Suswa Mountains, Kenya

 आतल्या विवरात मसाईंची तुरळक वस्ती आहे. आमची राहायची सोय ज्या मसाईच्या घरात केली होती तेथे आम्ही पोहोचलो. दोन कुडाची खोपट बाजूबाजूला होती. दोन्ही खोपट पत्र्याने आच्छादित केलेली होती. घरासमोर छोटेसे अंगण होते . त्याच्यापुढे थेट गवताचे कुरण चालू होते. घराला कंपाऊंड नव्हते. एका खोपटात त्या कुटुंबाचे स्वयंपाक घर होते. स्वयंपाक घरात जाण्याचा दरवाजा आपल्या दिंडी दरवाजा सारखा अरुंद आणि ३ फूट उंचीचा होता. त्यांच्या रोजच्या जेवणात मांसाचा वापर असल्याने त्याच्या वासाने जंगली जनावराने पटकन आत शिरु नये यासाठी अशाप्रकारे हा दरवाजा बनवलेला होता.  सुस्वा माउंटनला अजून वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे खोपटात सोलर दिवे होते.

आम्हाला दिलेले खोपटे शेणाने सारवलेले होते. ८ x ६ फूटच्या खोपटात दोन बेड कसेबसे बसवलेले होते. या दोन बेडवर आम्ही तीन जण कसे झोपणार हा प्रश्न होता. पण आमच्याकडे स्लीपिंग बॅग असल्याने एक जण जमिनीवर आरामात झोपू शकत होता. संडास- बाथरुम नव्हते. प्रातर्विधीसाठी गवताळ कुरण मोकळ होते. सह्याद्रीत फ़िरण्यची आम्हाला तिघांनाही सवय असल्याने या गोष्टी आम्हाला अडचणीच्या वाटल्या नाहीत. आमच्या यजमानांनी चहा आणून दिला. आपल्या सारखाच दुधाचा चहा त्या अपरिचित ठिकाणी मिळाल्याने प्रवासाने आलेला शिण निघून गेला. खोपटात सामान टाकून आम्ही एटंबेरा या आतल्या विवरात असणाऱ्या सर्वोच्च शिखराकडे (ऐंबेटिरा (Embetira)) निघालो. या शिखरावर जाऊन येण्यासाठी ४ तासांचा ट्रेक करावा लागतो. तर आतील पूर्ण विवर डोंगरावरुन फिरण्यासाठी ८ तासांचा ट्रेक करावा लागतो. 

वाफेतून पाणी काढायची अप्रतिम कल्पना Suswa Mountain, kenya

वाफेतून पाणी काढायची अप्रतिम कल्पना Suswa Mountain, kenya

जमिनीतील वाफ़ेतून पाणी काढण्याची शक्कल

एटंबेरा शिखराकडे निघाल्यावर वाटेत एका ठिकाणी लाकडी कुंपण घातलेली एक जागा दिसली . त्या कुंपणाच्या आत एका कोपर्‍यात जमिनीतून काही पाईप्स वर आलेले होते. त्या पाईपंमधून वाफ़ येत होती. त्या पाईपांच्या खाली एक १०००० लीटरची सिंटेक्सची टाकी ठेवलेली होती. जमिनीतून आलेल्या पाईपातून पाणी या टाकीत ठिपकत होते. हा सुस्वा माऊंटनवरचा पाणवठा होता. सुस्वा माउंटन येथे पावसा व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. त्यावर उपाय म्हणून जमिनीतून निघणाऱ्या वाफेतून पाणी काढायची अप्रतिम कल्पना मसाईनी लढवली आहे. सुस्वा माऊंटन हा सुप्त ज्वालामुखी असल्यामुळे या भागात काही ठिकाणी जमिन खोदल्यावर जमिनीतून वाफ़ बाहेर येते. अशा जागंचे पारंपारीक ज्ञान या भागात राहाणार्‍या मसाई लोकांना आहे. या ठिकाणी जमिन खोदून त्यात ५ ते १० पाईप्स "L" आकारात बसवले जातात. जमिनीतील वाफ़ या पाईपामधून वर येते. रात्रीच्या वेळी वातावरण थंड असते. त्यामुळे या वाफ़ेचे पाणी होते आणि ते पाणी टाकीत साठवले जाते. हल्ली जमिनितून ५ ते १० पाईप्स आणण्यापेक्षा जमिनिवर आयताकृती सिमेंटचे चेंबर बांधून त्यावर एकच पाईप "L" आकारात बसवला जातो. अर्थात हे सिमेंटचे चेंबर बांधण्यासाठी शहरातून गवंडी बोलवावा लागतो. आम्ही ज्या अदभूत पाणवठ्याला भेट दिली तेथे दोन्ही प्रकारे जमिनीतील वाफ़ काढलेली होती. या पाणवठ्यावर सर्व मसाई पाड्याचा हक्क असतो. पण पाणी वापरण्याचे नियम सर्वजण पाळतात. कपडे भांडी कुंपणा बाहेरच धुतली जातात. आम्ही तेथे गेलो तेंव्हा दोन मसाई बायका कुंपणा बाहेर कपडे धुत होत्या. गाई गुरांना हे पाणी देत नाहीत. तसेच जनावर धुण्यासाठीही या पाण्याचा वापर केला जात नाही.

Entrance of cave at Suswa Mountain, kenya

सुस्वाचा माउंटन वरचा अदभूत पाणवठा पाहून आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. खुरट्या झुडूपातून, दाट झाडीतून जाणार्‍या मळलेल्या पायवाटेने २ तासात शिखरावर पोहोचलो. येथून ज्वालामुखीचे बाहेरील विवर आणि दोन विवरातील जंगलाचे दृश्य दिसते ते नजर खिळवून ठेवणारे आहे. इथे थोडावेळ थांबून आम्ही आल्या मार्गाने दिड तासात खाली उतरलो.

बिबट्याने खाऊन टाकलेल्या बबून माकडाचे अवशेष

गुहेतील बिबट्याची विष्ठा Suswa Mountain, Kenya

सुस्वा माऊंटन वरील दुसरी महत्वाची जागा (पाणवठा धरल्यास तिसरी महत्वाची जागा) म्हणजे "बबून्स पार्लमेंट". लाव्हा रसाच्या प्रवाहामुळे सुस्वा माउंटनवर काही गुहा तयार झालेल्या आहेत. त्यांना लाव्हा ट्युब्स (Lavha Tunnel) म्हणतात.  Baboon's Parliment ही ६ मैल लांबीची लाईम स्टोनची गुहा आहे.  गुहेच्या वरच्या बाजूला जंगल आहे. २० पायर्‍या उतरुन आपण गुहेच्या तोंडाशी पोहोचतो. उजव्या बाजूला एका गुहेच तोंड आहे तर डाव्या बाजूला दुसर्‍या गुहेचे तोंड आहे. आम्ही आमच्या वाटाड्या मागोमाग प्रथम उजव्या बाजूच्या गुहेत शिरलो. साधारणपणे २० फ़ूट उंच आणि २० फ़ूट रुंद गुहेचे तोंड होते. गुहा १०० फ़ूट लांब होती. आत गेल्यावर काळोख वाढल्याने जवळच्या विजेर्‍या पेटवाव्या लागल्या. गुहेच्या शेवटी जमिनीत एक खड्डा होता. त्यावर झाडाची मजबूत फ़ांदी आडावी टाकलेली. त्या फ़ांदीला एक जाड रस्सी बांधलेली होती. या रस्सीच्या सहाय्याने आत उतरता येते. या ठिकाणी वटवाघूळांचे वास्तव्य आहे. त्याचा अतिशय घाणेरडा आणि उग्र वास येत होता. त्यामुळे आम्ही गुहेत न उतरण्याचा निर्णय घेतला आणि परत फ़िरलो. गुहेच्या तोंडाशी पायर्‍यांवर २ हेरेक्स (अफ़्रिकन मोठे उंदीर) आमच्याकडे पाहात बसलेले होते. 


Suswa Mountain, Kenya

आता आम्ही दुसर्‍या बाजूच्या गुहेत शिरलो. इथे जमिन ओबड धोबड होती. मोठ मोठे खडक छतापासून सुटून खाली पडल्यामुळे चालतांना कधी या खडकांच्या बाजूने चिंचोळ्या जागेतून तर कधी खडक पार करुन पुढे जावे लागत होते. पाया खालून पाण्याचा प्रवाह वाहात होता. त्यामुळे त्या मिट्ट काळोखात वाटाड्याच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही पुढे जात होतो. एके ठिकाणी थांबून वाटाड्याने आम्हाला गुहेच्या कोपर्‍यात पडलेला विष्ठेचा ढिग दाखवला. ती बिबट्याची विष्ठा होती. बिबट्यांना एकाच जागी विष्ठा विसर्जीत करायची सवय असते. गुहेत जमा होणार्‍या बबून माकडांना खाण्यासाठी बिबट्यांचा या गुहेत वावर असतो. पुढे गुहा काटकोनात वळली आणि काळोख अजूनच दाट झाला. उजव्या - डाव्या बाजूला गुहेला फ़ाटे फ़ुटलेले होते. १० मिनिटे चालल्यावर दूरवर प्रकाश दिसायला लागला. याठिकाणी गुहेचे छत कोसळून झाडाची मुळ आत आली होती. छतापासून १० फुटाचा ओबड धोबड खडक छत कोसळल्यामुळे उघडा पडलेला आहे . या खडकात अनेक नैसर्गिक खाचा आहेत. दररोज संध्याकाळी सुस्वा माउंटन मधली सर्व बबुन माकडे या गुहेच्या वरच्या बाजूला जमा होतात. जसजशी रात्र होत जाते तसतशी ही माकडे जंगलातून गुहेतल्या कपारीत उतरायला सुरुवात करतात आणि आपल्या भक्षक बिबळ्यापासून वाचण्याकरिता जास्तीत जास्त अवघड जागी जाऊन बसतात आणि तिथेच संपूर्ण रात्र काढतात. शेकडो वर्षे या ठिकाणी माकडे येत आहेत. त्यामुळे या भागाला "बबुन्स पार्लमेंट" असे नाव पडले आहे.  बबून माकडांच्या वावरण्याने आणि मलमूत्रामुळे इथले दगड गुळगुळीत झालेले आहेत. त्या गुळगुळीत झालेल्या दगडावर हाताची पकड बसणे मुश्किल आहे. तरीही बिबट्यापासून वाचण्याकरिता जीव धोक्यात घालून माकडे या कपारीत उतरतात आणि अवघड जागी जाऊन बसून, झोपून रात्र काढतात. सगळ्यात अवघड जागा पकडण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. या प्रयत्नात एखादे माकड खाली पडले तर जगण्याची शक्यता फारच कमी असते अशी माकडे बिबट्याची शिकार होतात. बिबट्या चोरपावलाने गुहेत येऊन डरकाळी देतो. त्यामुळे एखादे बेसावध माकड घाबरुन खाली पडते आणि बिबट्याला त्याची शिकार करतो. बबून्स माकडांच्या काही कवट्या आणि हाड तिथे विखुरलेली पाहायला मिळाली. 
 
बबून माकडांच्या मलमूत्रामुळे गुळगुळीत झालेले दगड.


बबून माकडांच्या मलमूत्रामुळे गुळगुळीत झालेले दगड.

जास्तीत जास्त उंच्, निसरड्या आणि अडचणीच्या जागी बबून्स रात्री बसतात.
Lava Tunnel, Suswa Mountain, Kenya
गुहेत पुढे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला बिबळ्याची विष्ठा एकेजागी साठलेली दिसत होती. गुहेतला अंधार आणि त्याबरोबर वटवाघूळांचा येणारा घाणेरडा उग्र वास आता वाढत चालला होता. नाकावर रुमाल बांधून आम्ही पुढे निघालो. इथे छताला अक्षरश: हजारो वटवाघुळ (Giant Mastiffs bats) लटकत होती. मोठे कान आणि सुटी शेपूट असलेल्या या वटवाघूळांची ही जगातली सगळ्यात मोठी वसाहत आहे. या वटवाघूळांच्या वास्तव्यामुळे या गुहेच्या जमिनीवर वटवाघुळांच्या विष्ठेचा पांढर्‍या रंगाचा थर जमलेला आहे. या थरातही अनेक किटक आहेत. आजारी आणि लहान वटवाघूळ ज्यावेळी छतावरुन खाली पडतात तेंव्हा हे किटक त्यांचा फ़न्ना ऊडवतात. संध्याकाळच्या वेळी ही हजारो वटवाघूळे "बबून्स पार्लमेंट" पार करुन गुहेच्या छताला पडलेल्या भोकातून बाहेर पडतात त्यावेळी आकाश काही काळासाठी झोकाळून जाते. वटवाघळे बाहेर पडल्यावर बबुन्स, बिबटे आणि किटकांचा गुहेत वावर सुरु होतो. सकाळी बबुन्स माकडे गुहेच्या बाहेर पडली की, वटवाघळांची परतायची वेळ होते. शेकडो वर्षे हे चक्र अव्याहतपणे चालू आहे.

वटवाघळांच्या घाणेरड्या वासामुळे त्याठिकाणी जास्त वेळ उभे राहाणे शक्य नव्हते. आम्ही मागे फ़िरुन आल्या मार्गाने गुहेच्या बाहेर आलो. आता सूर्य अस्ताकडे चालला होता आणि बबून माकडांची एक टोळी "बबून्स पार्लमेंट्स"च्या दिशेने चालली होती.          
 
आमचा वाटाड्या
कसे जाल :- केनियाची राजधानी नैरोबी गाठावी लागते. नैरोबी ते सुस्वा माऊंटन हे अंतर १२५ किलोमीटर आहे. साधारणपणे चार तासात हे अंतर कापता येते. सुस्वा माऊंटनवर तंबू लावून किंवा स्थानिक मसाई मारांच्या घरात राहाण्याची आणि जेवणची सोय होते. नैरोबीहून पहाटे निघून एका दिवसात सुस्वा माऊंटन पाहून परत नैरोबीला पोहोचता येते. दुसरा पर्याय म्हणजे मसाई मारा पाहून नैरोबीला परतताना सुस्वा माऊंटनला जाता येते. सुस्वा माऊंटनचा हे ऑफ़बीट ठिकाण असल्याने केनिया सफ़ारीचे बुकींग करतानाच टूर ऑपरेटशी बोलून प्लान ठरवावा.


Baboon, Kenya
केनिया सफ़ारी त्याचे प्लानिंग आणि आजूबाजूची ऑफ़बीट ठिकाणे यावर ६ लेख लिहिलेले आहेत ते जरुर वाचावेत.

ब्लॉग वाचण्याकरीता लिंकवर टिचकी मारा

केनिया सफारी- 1 https://samantfort.blogspot.com/2018/08/1-kenya-safari-part-1.html
केनिया सफारी - २ ( सिहांच्या प्रदेशात ) https://samantfort.blogspot.com/2018/08/lion-masai-mara.html
केनियन सफारी -३ (मारा नदीच्या परिसरात) https://samantfort.blogspot.com/2018/08/blog-post_16.html
#OffbeatKenya#kenyasafari#kenya#suswamountainkenya#suswamountainoffbeattrek#watermanagement#

Monday, December 3, 2018

नदी पात्रातला थरारक प्रवास (ol njorowa gorge,Hell's Gate National Park., Kenya) Offbeat Kenya


Cycling in Hell's Gate National Park, Kenya

आपण कच्च्या रस्त्यावरुन सायकल चालवतो आहोत. रस्त्याच्या बाजूला पसरलेल्या हिरवळीवर झेब्रे, विविध प्रकारची हरणे , रानडुकर आरामात चरत आहेत. एखाद्या झाडामागून जिराफ़ांचा कळप डोकावून बघतोय अशा स्वप्नवत वातावरणाचा अनुभव हेल्स गेट नॅशनल पार्क मध्ये घेता येतो.

ol njorowa gorge, Hells Gate National Park, Kenya

केनियाची राजधानी असलेल्या नैरोबीपासून ९० किलोमीटरवर नैवाशा तलाव आहे. या तलावा जवळ हेल्स गेट नॅशनल पार्क आहे. ओल्कारीया आणि हॉब्लेज (Olkaria and Hobley's) या दोन जागृत ज्वालामुखींमुळे बनलेल्या विवरात हे अभयारण्य वसलेले आहे. ज्वालामुखीच्या विवरांच्या भिंतीच्या आत वसल्यामुळे अफ़्रिकेतल्या इतर अभयारण्यांच्या मानाने हे खूपच छोटे म्हणजे ६८ स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेले आहे. विवराच्या आत झेब्रे, जिराफ़, विविध प्रकारची हरणे, रान म्हैस, रान डुक्कर, बिबट्या इत्यादी प्राणी आणि असंख्य पक्ष्यांचा वावर आहे.


या अभयारण्यात फ़िरण्यासाठी अनेक रस्ते बनवलेले आहेत. गाडीने अथवा सायकलने या रस्त्यावरुन आपल्याला फ़िरता येते. या अभयारण्याच्या टोकाला "ओल्जोवारा गॉर्ज" (Olnjorowa Gorge) ही एका नदीने खोदून काढलेली दरी आहे. अभयारण्याच्या प्रवेशव्दारापासून साडेपाच किलोमीटरवर या दरीचे प्रवेशव्दार आहे. त्याला हेल्स गेट या नावाने ओळखले जाते. अभयारण्याच्या प्रवेशव्दारावर सायकली भाड्याने मिळतात, आपल्या सोबत एक वाटाड्याही असतो. प्रवेशव्दारापासून हेल्स गेट ते परत असे ११ किलोमीटरचे अंतर सायकलीने पार करावे लागते . तर ओल्जोवारा गॉर्जचा ट्रेक साधारणपणे ३ किलोमीटरचा आहे.

Fischer's Tower (volcanic plug),  Hell,s Gate National Park
volcanic plugs formation

प्रवेशव्दारातून अभयारण्यात शिरल्यावर थोड्या अंतरावर फ़िशर्स टॉवर (Fischer's Tower) नावाचा सुळका दिसतो. हा सुळका म्हणजे ज्वालामुखीच्या विवराच्या तोंडावरचे बुच (volcanic plugs) आहे. जिवंत ज्वालामुखीच्या विवराच्या मुखातील लाव्हारस थंड होऊन घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यावेळी आतील दाब वाढल्यामुळे स्फ़ोट होवून लाव्हारस बाहेर येतो परत थंड होतो. या प्रक्रीयेने विवरच्या तोंडावर या थंड झालेल्या लाव्हारसाचे बूच तयार होते. पावसाने आणि वार्‍याने त्याची झीज होवून वेगवेगळे आकार तयार होतात. फ़िशर्स टॉवर हा सुळका प्रस्तरारोहणाचे तंत्र आणि साहित्य वापरुन चढता येतो. याच बरोबर सेंट्रल टॉवर (Central Tower) नावाचा दंडगोल आकाराचा सुळका (volcanic plugs) या अभयारण्याच्या मध्यावर आहे. "ओल्जोवारा गॉर्ज" मधून सेंट्रल टॉवरच्या पायथ्या पर्यंत जाता येते. 
  
Entry in the ol njorowa gorge,  Kenya

ol njorowa gorge, Hell,s Gate National Park, Kenya
फ़िशर्स टॉवर पासून पुढे गेल्यावर आपण ज्वालामुखीच्या विवरात शिरतो. चारही बाजूला विवराच्या उंचावलेल्या कडा आणि त्यामध्ये पसरलेला गवताळ प्रदेश आणि झाड झुडप दिसायला लागतात. रस्त्या लगतच्या हिरवळीवर अनेक वन्यप्राणी आरामात चरत असतात. अफ़्रिकेतल्या इतर अभयारण्यात फ़िरतांना हेच प्राणी आपल्याला गाडीतून पाहावे लागतात. पण हेल्स गेट नॅशनल पार्क या एकमेव अभयारण्यात आपण त्यांच्या मधून सायकल वरुन फ़िरु शकतो. थांबून फ़ोटोग्राफ़ी करु शकतो. फ़क्त रस्ता सोडून बाहेर जाण्याची परवानगी नाही. प्राण्यांच्या नंदनवनातून आरामात सायकल चालवत, थांबत आम्ही अडीच किलोमीटरचा टप्पा पार केला. त्यानंतर एकदम तीव्र उतार चालू झाला सायकलचा वेग आवरणे मुश्किल होत होते. उतार संपल्यावर विवराच्या भिंती रस्त्याच्या जवळ आल्या. लाव्हा रसामुळे तयार झालेले विविध आकार पाहात पुढचा दोन किलोमीटरचा रस्ता कापला. पुढे एक वळण घेऊन हेल्स गेटपाशी पोहोचलो. या ठिकाणी सायकली ठेऊन पुढचा प्रवास पायी करायचा होता.


ol njorowa gorge, Hell,s Gate National Park, Kenya

ol njorowa gorge, Hell,s Gate National Park, Kenya
इसवीसन १८८३ मध्ये फ़िशर आणि थॉमसन यांनी "ओल्जोवारा गॉर्ज" (Olnjorowa Gorge) ही एका नदीने खोदून काढलेली दरी शोधून काढली. या खोल दरीत उतरणारा चिंचोळा मार्ग आहे त्याला हेल्स गेट असे नाव दिले आहे. या मार्गाने खाली उतरणे थोडे जिकरीचे आहे. खाली उतरल्यावर आपला थेट नदीपात्रात प्रवेश होतो. पायाखाली वाळू आणि त्यातून पाणी वाहात असते. पाऊस पडत असल्यास नदीपात्रात उतरु नका असे फ़लक जागोजागी लावलेले होते. काही ठिकाणी आप्तकालिन बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून कड्यांवरुन गाठी मारलेले मजबूत दोर खाली सोडलेले होते. बर्‍याचदा इथे पाऊस पडला नाही तरी दुसर्‍या भागात पडलेल्या पावसाच्या पाण्याचा लोंढा या चिंचोळ्या जागेत शिरतो असे आमच्या बरोबरच्या वाटाड्याने सांगितले. पुढे गेल्यावर नदी पात्र रुंद होत गेले. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने दोन्ही बाजूच्या भिंतींना दिलेले आकार आणि त्यावर चितारलेली नक्षी पाहात आम्ही पुढे चाललो होतो.  दरवर्षी पाण्याच्या प्रवाहामुळे माती मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे दरी अधिकाधिक खोल होतेय.  

Tough route, ol njorowa gorge, Kenya

साधारणपणे एक किलोमीटर चालल्यावर नदीच्या पात्राला डाव्या बाजूला एक फ़ाटा फ़ुटला होता. या भागाला डेव्हिल्स थ्रोट (Devil's Throat) म्हणतात. या ठिकाणी बाजूच्या भिंतीतून गरम पाणी पाझरत होते. गंधक मिश्रीत गरम पाण्यात पाय बुडवून आम्ही पुढे डेव्हिल्स बेडरुमकडे (Devil's Bedroom) निघालो. समोरुन एक अमेरीकन कुटूंब येतांना दिसले. पुढचा रस्ता कठीण असल्याने ते परत फ़िरले होते. थोडे अंतर चालून गेल्यावर रस्ता बंद झाला होता. डाव्या बाजूच्या भिंतीवर चढण्यासाठी एक मधे-मधे गाठी मारलेला मजबूत दोर लावलेला होता. त्या दोराला पकडून साधारणपणे १२ फ़ुटाचा टप्पा चढून गेलो. सह्याद्रीतील भटकंतीचा अनुभव या ठिकाणी कामी आला. वर चढून गेल्यावर एक जण कसाबसा चालू शकेल अशी चिंचोळी वाट होती. उजव्या बाजूला भिंत आणि डाव्या बाजूला दरी त्यामुळे जपून हा टप्पा पार केला. पुढे नदीचे पात्र अरुंद असले तरी चालायला व्यवस्थित जागा होती. नदीच्या दोन्ही काठाच्या भिंती आता एक फ़ूट अंतरावर आल्या होत्या. प्रवाहाने घेतलेल्या अवघड वळणानुसार दरी तयार झाली होती. वरच्या बाजूला असलेल्या जंगलातून झिरपणार्‍या प्रकाश दरीच्या शेवाळ्यामुळे हिरव्या झालेल्या भिंतींवरुन परावर्तीत झाल्याने गुढ वातावरण तयार झाले होते. थोडे अंतर चालल्यावर आम्ही सेंट्रल टॉवर (Central Tower) खाली आलो. याठिकाणीही आप्तकालिन मार्गासाठी एक दोर लावलेला होता.  सेंट्रल टॉवर हा हेल्स गेट नॅशनल पार्कच्या लोगोवर आहे. तो पार्कच्या सर्व भागातून दिसतो. या सेंट्रल टॉवर जवळ ओल्कारीया जिओ थर्मल पॉवर स्टेशन आहे. ज्वालामुखीतून बाहेर येणार्‍या वाफ़ेवर इथे १०५ मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते.
 
Central Tower from ol njorowa gorge, 

Devil's Bedroom, 

सेंट्रल टॉवरच्या पुढे चालत गेल्यावर आपण डेव्हिल्स बेडरुम मध्ये पोहोचतो. याठिकाणी १०० फ़ुटावरुन एक धबधबा खाली कोसळतो. पाणी खाली कोसळल्या नंतर पुढे जाण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा भोवरा तयार होतो. या भोवर्‍याने गेल्या अनेक शतकात या ठिकाणाचा मोठा भाग कोरुन काढलेला आहे. त्या भागाला डेव्हील्स बेडरुम म्हणतात. येथून पुढे जाण्याचा मार्ग नसल्याने आल्या वाटेने परत डेव्हिल्स थ्रोट या फ़ाट्यापर्यंत आलो. पुढे नदीचे पात्र चांगलेच रुंद होते. इथे पायाखाली थंड पाणी आणि बाजूच्या भिंतीतून पाझरणारे गरम पाणी असा गमतीशीर प्रकार होता. ज्वालामुखीमुळे तयार झालेले विविध दगड गोळा करत अर्धा किलोमीटर चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक्झिटची पाटी होती. 2०० फ़ुट वर चढून त्या सुंदर दरीच्या बाहेर आलो. एक आगळवेगळ ठिकाण पाहिल्याचा आनंद झाला.

ol njorowa gorge, Hell's Gate National Park, Kenya

ol njorowa gorge, Hell's Gate National Park, Kenya

Exit point , ol njorowa gorge

Central Tower,ol njorowa gorge, Hell's Gate National Park

केनियाला फ़िरायला जाणारे मसाई मारा आणि नकुशा लेक पाहातात. नकुशा लेक पासून नैरोबीला जातांना वाटेत नैवाशा लेक आहे. या ठिकाणी तलावाला लागून अनेक हॉटेल्स आणि कॅम्प साईट्स आहेत. नैवाशा लेक परिसरातही अभयारण्य असून अनेक प्राणी आणि पाणपक्षी तलावा काठच्या हॉटेलांमध्येही दिसतात. तलावात बोटीने सैरही करता येते. या नैवाशा लेक जवळच हेल्स गेट नॅशनल पार्क आहे, त्यामुळे मसाई मारा, नकुशा लेक पाहून एक दिवस नैवाशा लेकला मुक्काम करुन हेल्सगेट नॅशनल पार्क मधील सायकलींग आणि ओल्जोवारा गॉर्जचा ट्रेक करता येतो.

Hells Gate National Park, Kenya
Different Volcanic  rocks 

#OffbeatKenya#olnjorowagorge#Hell'sGateNationalPark#Kenya#cyclinginkenya#volcanicrocks#volcanicplug#cyclinginnationalpark#
          

Monday, September 10, 2018

Offbeat Kenya हत्तींचे अनाथालय (DSWT , Elephant Orphanage center , Nairobi, Kenya)

DSWT , Elephant Orphange center , Nairobi, Kenya

अफ्रीकन आणि भारतीय हत्ती त्यांच्या सुळ्यांसाठी कायम शिकार्‍यांचे लक्ष झालेले आहेत. जगभर अनेक देशानी कायदे करुनही हस्तिदंताची तस्करी अद्याप थांबलेली नाही आणि त्यामुळे हत्तींची शिकारही . मोठ्या हत्तींची शिकार झाल्यावर लहान हत्ती अनाथ होतात. बऱ्याचदा हत्तींच्या कळपावर हल्ला झाल्यास कळप विखूरतो आणि लहान पिल्ले कळपा पासून वेगळी होतात. तिसरे कारण म्हणजे दुष्काळ अफ्रीकेत दुष्काळ तर पाचवीला पुजलेला आहे . या दुष्काळात उपासमारीने हत्तीणींचा मृत्यू होतो आणि पिल्ल अनाथ होतात. 

अशा अनाथ पिल्लांना जंगलात परत जाऊन नैसर्गिक जीवन जगण्याची संधी मिळावी या करीता १९७७ मध्ये डॉ डेन शेड्रीक हिने आपल्या नवऱ्याच्या नावाने डेविड शेड्रीक वाईल्ड लाईफ ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्ट अंतर्गत त्यांनी जखमी, कळपापासून वेगळे झालेल्या हत्तींचे आणि पाणघोड्यांचे संरक्षण करायला सुरुवात केली. त्यांना हक्काचे घर मिळवून दिले आणि त्यांना नैसर्गिक वातावरणात वाढवून जंगलात सोडण्यात आले. ट्रस्टच्या स्थापनेपासून आजपर्यंत अशाप्रकारे १५० हत्तीना मुक्त करण्यात आले आहे .

DSWT , Elephant Orphange center , Nairobi, Kenya

नैरोबी ही केनियाची राजधानी आहे. या शहरात मध्यवर्ती ठिकाणी DSWT चे Elephant Orphange center आहे . रोज सकाळी ११ ते १२ यावेळात येथे अनाथ हत्तीच्या पिल्लांची आपल्याशी भेट घडवून देण्यात येते. जगभरातील  पर्यटकांची रोज इथे झुंबड उडते. एका मोकळ्या मैदानात आपल्याला आणले जाते. मैदानाच्या एका टोकाला एक छोटेसे तळे केलेले आहे. मैदानात ठराविक अंतरावर पाण्याने भरलेले ड्रम आणि त्याच्या बाजूला झाडाच्या फांद्या ठेवलेल्या दिसतात. काही ठिकाणी मोकळी केलेली माती ठेवलेली होती. मैदानाच्या एका भागात अर्धगोल सुतळी बांधलेली होती. सुतळीच्या दोरीच्या कडेने पर्यटक उभे राहील्यावर जंगलातून एका मागोमाग एक हत्तींची पिल्ले दुडूदुडू धावत यायला लागली. काही पिल्ल तर थेट प्रेक्षकांमध्ये घुसून दोरीतून आत झेपावली .  DSWT चे कार्यकर्ते हातात दुधाच्या बाटल्या घेउन उभे होते. ५ लीटरची एक दुधाची बाटली गटागटा प्यायल्यावर ती पिल्ले थोडीशी शांत झाली. मग दुसरी बाटली पिउन झाल्यावर त्यांनी समोर ठेवलेल्या डहाळ्या तोंडात धरुन चघळायला लागली, कोणी अंगावर माती उडवत होते. पाण्याच्या ड्रम मधल्या पाण्याशी खेळण्यात सगळ्यानाच स्वारस्य होते. त्यांनी ढकला ढकली करुन एक ड्रम उपडा केला.

DSWT , Elephant Orphange center , Nairobi, Kenya

एका कार्यकर्त्याने हत्तींच्या पिल्लांची माहिती सांगायला सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे १९ हत्तींची पिल्ले आहेत. ३ महिने ते २.५ वर्षांच्या ९ हत्तींचा एक गट आणि अडीच वर्षावरील ९ हत्तींचा एक गट केलेला आहे . एक ६ महिन्याचे पिल्लू मात्र त्यांच्यात नव्हते कारण शिकार्यानी कदाचित दुसऱ्या सावजासाठी मारलेली गोळी हत्तीच्या पिल्लाच्या पायाला लागून ते कायमच जायबंदी झाले होते.  आमच्या समोर असलेल्या एका अडीच वर्षाच्या हत्तीणीची सोंड सापळ्यात अडकून जवळ जवळ तुटलेलीच होती . त्यावर दोन शस्त्रक्रिया केल्यावर आज ती हत्तीण तिच नैसर्गिक जीवन जगू शकत होती. काही पिल्लांचे पालक उपासमारीने मेले होते . काही कळपापासून वेगळी होवून जंगलात एकटी फिरताना किंवा गावात सापडली होती. आदिवासी लोकांमध्ये आणि जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये हत्ती बद्दल लोक जागृती केल्यामुळे अशा हत्तींच्या पिल्लांची माहिती ट्रस्टला मिळते आणि ते त्या पिल्लांची सुटका करुन त्यांची त्यांच्या नैसर्गिक अधिवासात काळजी घेतात आणि योग्य वयात आल्यावर त्यांना कळपाने जंगलात सोडतात. त्यानंतरही त्यांचा माग ठेवला जातो. एका हत्तीच्या पिल्लाचा पालनपोषणाचा खर्च ९००$ आहे . ते देणाऱ्यास त्या हत्तीच्या पिल्लाचे पालकत्व दिले जाते . त्याच्या नावाने हत्तीचे बर्थ सर्टीफिकेट बनवतात. वर्षातून एक दोनदा त्यांना आपल्या पाल्याला भेटता येते. वर्षभराची प्रगती तसेच जंगलात सोडल्यानंतरही हत्तीची माहिती पालकांना दिली जाते .
DSWT , Elephant Orphange center , Nairobi, Kenya

पहिल्या गटातील हत्ती गेल्यावर दुसऱ्या गटातील हत्ती आले हे मोठे असल्याने अनेकांना सुळे फुटलेले होते . धसमुसळेपणाने दुध पिउन झाल्यावर ते आधीच्या हत्तींसारखे आपापल्या उद्योगात रममाण झाले. एवढ्या सुंदर निरागस प्राण्यांची हस्तीदंतासाठी शिकार कशी करावीशी वाटते हा तिथे जमलेल्या सर्वांच्या मनात प्रश्न पडला होता आणि हेच ही भेट घडवण्या मागचे ट्रस्टचे उद्दिष्ट होते .


मसाई मारा पाहाण्यासाठी बरेच जण हल्ली केनियात जातात. तेंव्हा नैरोबी एक दिवस मुक्काम करावा लागतो. त्या मुक्कामात हत्तींचे अनाथालय आणि जिराफांसाठी काम करणारे जिराफ सेंटर यांना आवर्जून भेट द्यावी. अर्ध्या दिवसात दोन्ही ठिकाणे पाहून होतात. 

African Elephant at Masai Mara

जिराफ़ सेंटरवर वेगळा लेख लिहिलेला आहे तो जरुर वाचावा.

African Elephant at Masai Mara

Monday, September 3, 2018

Offbeat Kenya जिराफ़ांचे घर (Giraffe Center, Nairobi, Kenya)


Giraffe
जिराफ हा सध्याच्या जगात वेगळ्याच ग्रहावरुन आलेला प्राणी भासतो. त्याची लांब मान, उंची यामुळे हा प्राणी सर्वांच्या कुतुहलाचा विषय आहे. कातडी आणि अंधश्रद्धा यामुळे या प्राण्यांची शिकार होते. नैरोबी शहरातल्या लॅगाटा भागात जॉक लेस्ली मेलवाईन आणि त्याची पत्नी बेट्टीज यांनी मिळून १९७९ मध्ये AFEW अफ्रीकन फंड फॉर इंडेजर्ड वाईल्ड लाईफ ही संस्था स्थापन करुन Rothschild's giraffe जिराफ या संकटात असलेल्या जातीच्या संवर्धनाची सुरुवात केली. त्यावेळी  फक्त १२० Rothschild's giraffe जिराफ उरले होते. जॉक आणि बेट्टीने ५ वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी त्यांचे संवर्धन आणि संरक्षण केले . त्यामुळे या जिराफांची संख्या वाढून आज १५०० झालेली आहे.

Giraffe at Masai Mara
नर जिराफ़ांची उंची साधारणपणे १८ फ़ूट (यात ६ ते ७ फ़ूट लांब मानच असते) तर मादी जिराफ़ांची उंची १४ फ़ूट असते. जिराफ़ांचे वजन ७०० ते १३०० किलोग्रॅम असते. अशा उंच आणि वजनदार प्राण्याच्या शरीराला रक्त पुरवठा करणारे ह्र्दय २ फ़ूट लांब आणि ११ किलोग्रॅम वजनाचे असते. जिराफ़ांच्या फ़ुफ़्फ़ुसांची क्षमता १२ गॅलन म्हणजेच ५५ लिटर असते. (माणसाच्या फ़ुफ़्फ़ुसांची क्षमता १.५९ गॅलन म्हणजेच ६ लिटर असते. एवढ्या अवाढव्य शरीराचा भार पेलणारी पावले फ़ूटभर लांबीची असतात. जिराफ़ाला दोन शिंग असतात. ती मांसल त्वचेने झाकलेली असतात. एवढा अवाढव्य प्राणी शाकाहारी आहे. झाडाझुडूपांची पान, गवत तोडून आपल्या २१ इंच लांब जीभेने तो अन्न पोटात ढकलतो. या अन्नातून मिळणार्‍या पाण्यामुळे तो आठवडाभर पाण्या शिवाय राहू शकतो. एका कळपात साधारणपणे १० ते २० जिराफ़ असतात. त्यांचा प्रदेश ठरलेला नसतो. चरत चरत ते पुढे जात राहातात. जिराफ़ाची मादी एकावेळी एकाच पिल्लाला जन्म देते. जन्म देतांना जिराफ़ाची मादी उभी असल्याने साधारणपणे पाच फ़ूटावरुन जिराफ़ाचे नवजात पिल्लू खाली पडते. पण थोड्याच वेळात ते उठून उभे राहाते आणि कळपाबरोबर चालायला लागते. जिराफ़ त्यांच्या शत्रूशी मारामारी करण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब पळणे पसंत करतात. जिराफ़ साधारणपणे ६० किलोमीटर/ तास वेगाने धावू शकते. जिराफ़ाची अचूक लाथ सिंहासारख्या प्राण्याला यमसदनाला पाठवू शकते. 

Rothschild's giraffe
जिराफांचे केवळ संरक्षण आणि संवर्धन करुन ते थांबले नाहीत तर जिराफा बद्दल केनियातील आणि जगभरातील मुलांना आणि मोठ्या माणसाना माहिती व्हावी. त्यांना जवळून पाहाण्याची , खाऊ घालण्याची संधी मिळावी या करीता त्यांनी त्यांच्या लॅगाटा मधील जागेत जिराफ सेंटरची स्थापना केली. दररोज सकाळी ९ वाजता जिराफ सेंटर उघडते. खास तयार केलेल्या लाकडी डेकवर आपल्याला नेले जाते. वाटेत बादल्या मधून जिराफाना खाण्यासाठी खास बनवलेल्या बोटाच्या आकाराच्या  काड्या  ठेवलेल्या असतात. त्या काड्या घेऊन त्या लाकडी डेकच्या गॅलरीत उभे राहील्यावर जंगलातून जिराफ येतात. मग आपल्या हातातील काड्या आपण जिराफाना भरवू शकतो. जिराफ़ांना भरवतांना काही काड्या खाली पडतात. त्या खाण्यासाठी तेथे रानटी डुककर (Warthog) आहेत. Warthog ना पाहीले की Lion King या प्रसिध्द Animation पटातील "हकुना मटाटा" हे प्रसिध्द गाण आठवते. "हकुना मटाटा" या स्वाहिली भाषेतील म्हणीचा अर्थ आहे. "No Problem, No worries". रानटी डुककर (Warthog) हे नेहमी इतर कुठल्या तरी प्राण्यांच्या कळपा बरोबर आढळ्तात. याचे कारण म्हणजे त्यांची स्मरणशक्ती. या रानडुकराचा मेंदू इतका लहान असतो की त्याला ३० सेकंदानंतर आपण आधी काय आणि कशासाठी करत होतो तेच आठवत नाही. म्हणजे समजा हे रानडुक्कर आपल्या मागे लागले आणि आपण सलग तीस सेकंदापेक्षा जास्त वेळ पळालो तर, नंतर रानडुकराला आठवत नाही आपण का धावतोय आणि ते त्याच्या नॅचरल इंस्टींगने ते अन्न शोधायला लागते. एखादा शिकारी प्राणी मागे लागल्यावर सुध्दा असे होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे रानडुक्कर इतर प्राण्यांच्या कळपा बरोबर राहातात. शिकार्‍याने पाठलाग केल्यावर सर्व कळप पळत सुटतो आणि त्याबरोबर रानडुक्कर धावत राहातात आणि त्यांचे प्राण वाचतात. 

रानटी डुककर (Warthog) 
Warthog & Rothschild's giraffe at Giraffe Center
आम्ही उभे होतो त्या ठिकाणी "सलमा" नावाची सात वर्षाची जिराफ आली. आपल्या लांब जीभेने ती आमच्या हातातल्या काड्या ओढून पोटात ढकलायला लागली. इतर तृणभक्षक प्राण्यांप्रमाणे जिराफही आधी पटापट खाऊन घेतो आणि नंतर रवंथ करतो. जिराफा सारखा उंच आणि मोठा प्राण्याच्या चेहऱ्यावरचे भाव, हालचाल पाहाण्याची संधी जिराफ सेंटरमुळे मिळाली. काही लोकांनी त्या काड्या आपल्या तोंडात धरुन जिराफाना भरवल्या त्याला " जिराफ किस"  म्हणतात. जिराफाला भरवताना खाली पडलेल्या काड्या खाण्यासाठी तिथे रानडुक्करे जमलेली होती. खाली पडलेल्या काड्या त्या पटापट संपवत होती.

Giraffe Feeding at Giraffe Center Nairobi

Giraffe Kiss at Giraffe Center Nairobi

गॅलरीच्या आतल्या बाजूला जिराफ इंफॉर्मेशन सेंटर होते. या ठिकाणी  जिराफा बद्दल इत्थंभूत माहिती मिळाली. अफ्रिका खंडात जिराफांचे ३ प्रकार आहेत. मसाई जिराफ, Rothschild जिराफ आणि रेटीक्युलेटेड जिराफ. यातील मसाई जिराफ आणि Rothschild जिराफ हे केनियाच्या दक्षिण भागात सापडतात. तर रेटीक्युलेटेड जिराफ वाळवंटी प्रदेशात आढळतात. त्यांच्या अंगावरच्या खुणांवरुन (पॅटर्न) वरुन त्यांना वेगवेगळे ओळखता येते. मसाई जिराफाच्या अंगावर चांदणी सारख्या आकाराच्या खुणा असतात तर इतर दोन प्रकारच्या जिराफांच्या अंगावर चौकोनी खुणा असतात. त्यातही Rothschild जिराफाच्या अंगावर ब्लड स्पॉट्स असतात. त्यामुळे ते वेगळे ओळखता येतात.
Giraffe leg bone ( Real fear for predators)

Worthog's skull

Giraffe's  jaw

Giraffe Information at Giraffe Center

 जिराफाच्या लांबलचक मानेत फक्त सात हाडे (मणके) असतात. त्यावर या लांबलचक मानेचा डोलारा उभा असतो. मानेपासून शेपटीपर्यंत एकूण पन्नास हाडे असतात. ही हाडे जिराफांच्या वेगवेगळ्या जातीत थोडी कमीजास्त असतात. जिराफाच्या पायाचे हाड तिथे ठेवलेले होते. या मजबूत आणि जड हाडाच्या धसका त्याच्यावर हल्ला करणाऱ्या प्राण्यांनी घेतलेला असतो. कारण जिराफाची एक अचूक लाथ त्या प्राण्याला कायमची जायबंदी करु शकते.



Souvenir Shop, Giraffe Center
जिराफ हा शांत प्राणी आहे. कळपातील श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी नरामध्ये जी मारामारी होते त्यात ते एकमेकांच्या मानेला विळखा घालून डोक्याने टक्कर देतात आणि यात हरलेला नर माघार घेतो. अशा शांत प्राण्याचीही कातडीसाठी शिकार केली जाते . काही आदिवासी जमातीत जिराफांची शिकार केल्यास स्वर्ग प्राप्त होतो अशी अंधश्रद्धा आहे . त्यामुळे आजच्या काळात अशा प्रकारच्या जिराफ सेंटरची आवश्यकता आहे. मसाई माराला हल्ली बरेच पर्यटक भारतातून जातात. त्यांना एक दिवस नैरोबीत मुक्काम करावा लागतो. त्यांनी जिराफ सेंटर आणि एलिफंट ऑर्फनेज सेंटर ही दोन्ही ठिकाणे आवर्जून पाहावीत. जिराफ़ सेंटर ठिक ९.०० वाजता उघडते आणि संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत पर्यटकंसाठी खुले असते. एलिफंट ऑर्फनेज सेंटर मात्र फ़क्त ११.०० ते १२.०० वाजेपर्यंत उघडे असते. त्यामुळे सकाळी लवकर जिराफ़ सेंटर पाहून एलिफंट ऑर्फनेज सेंटर पाहायला जावे.

Giraffe at Masai Mara
Elephant Orphanage Center , Nairobi यावर " हत्तींचे अनाथालय" हा लेख लिहीलेला आहे .