Monday, December 3, 2018

नदी पात्रातला थरारक प्रवास (ol njorowa gorge,Hell's Gate National Park., Kenya) Offbeat Kenya


Cycling in Hell's Gate National Park, Kenya

आपण कच्च्या रस्त्यावरुन सायकल चालवतो आहोत. रस्त्याच्या बाजूला पसरलेल्या हिरवळीवर झेब्रे, विविध प्रकारची हरणे , रानडुकर आरामात चरत आहेत. एखाद्या झाडामागून जिराफ़ांचा कळप डोकावून बघतोय अशा स्वप्नवत वातावरणाचा अनुभव हेल्स गेट नॅशनल पार्क मध्ये घेता येतो.

ol njorowa gorge, Hells Gate National Park, Kenya

केनियाची राजधानी असलेल्या नैरोबीपासून ९० किलोमीटरवर नैवाशा तलाव आहे. या तलावा जवळ हेल्स गेट नॅशनल पार्क आहे. ओल्कारीया आणि हॉब्लेज (Olkaria and Hobley's) या दोन जागृत ज्वालामुखींमुळे बनलेल्या विवरात हे अभयारण्य वसलेले आहे. ज्वालामुखीच्या विवरांच्या भिंतीच्या आत वसल्यामुळे अफ़्रिकेतल्या इतर अभयारण्यांच्या मानाने हे खूपच छोटे म्हणजे ६८ स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेले आहे. विवराच्या आत झेब्रे, जिराफ़, विविध प्रकारची हरणे, रान म्हैस, रान डुक्कर, बिबट्या इत्यादी प्राणी आणि असंख्य पक्ष्यांचा वावर आहे.


या अभयारण्यात फ़िरण्यासाठी अनेक रस्ते बनवलेले आहेत. गाडीने अथवा सायकलने या रस्त्यावरुन आपल्याला फ़िरता येते. या अभयारण्याच्या टोकाला "ओल्जोवारा गॉर्ज" (Olnjorowa Gorge) ही एका नदीने खोदून काढलेली दरी आहे. अभयारण्याच्या प्रवेशव्दारापासून साडेपाच किलोमीटरवर या दरीचे प्रवेशव्दार आहे. त्याला हेल्स गेट या नावाने ओळखले जाते. अभयारण्याच्या प्रवेशव्दारावर सायकली भाड्याने मिळतात, आपल्या सोबत एक वाटाड्याही असतो. प्रवेशव्दारापासून हेल्स गेट ते परत असे ११ किलोमीटरचे अंतर सायकलीने पार करावे लागते . तर ओल्जोवारा गॉर्जचा ट्रेक साधारणपणे ३ किलोमीटरचा आहे.

Fischer's Tower (volcanic plug),  Hell,s Gate National Park
volcanic plugs formation

प्रवेशव्दारातून अभयारण्यात शिरल्यावर थोड्या अंतरावर फ़िशर्स टॉवर (Fischer's Tower) नावाचा सुळका दिसतो. हा सुळका म्हणजे ज्वालामुखीच्या विवराच्या तोंडावरचे बुच (volcanic plugs) आहे. जिवंत ज्वालामुखीच्या विवराच्या मुखातील लाव्हारस थंड होऊन घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यावेळी आतील दाब वाढल्यामुळे स्फ़ोट होवून लाव्हारस बाहेर येतो परत थंड होतो. या प्रक्रीयेने विवरच्या तोंडावर या थंड झालेल्या लाव्हारसाचे बूच तयार होते. पावसाने आणि वार्‍याने त्याची झीज होवून वेगवेगळे आकार तयार होतात. फ़िशर्स टॉवर हा सुळका प्रस्तरारोहणाचे तंत्र आणि साहित्य वापरुन चढता येतो. याच बरोबर सेंट्रल टॉवर (Central Tower) नावाचा दंडगोल आकाराचा सुळका (volcanic plugs) या अभयारण्याच्या मध्यावर आहे. "ओल्जोवारा गॉर्ज" मधून सेंट्रल टॉवरच्या पायथ्या पर्यंत जाता येते. 
  
Entry in the ol njorowa gorge,  Kenya

ol njorowa gorge, Hell,s Gate National Park, Kenya
फ़िशर्स टॉवर पासून पुढे गेल्यावर आपण ज्वालामुखीच्या विवरात शिरतो. चारही बाजूला विवराच्या उंचावलेल्या कडा आणि त्यामध्ये पसरलेला गवताळ प्रदेश आणि झाड झुडप दिसायला लागतात. रस्त्या लगतच्या हिरवळीवर अनेक वन्यप्राणी आरामात चरत असतात. अफ़्रिकेतल्या इतर अभयारण्यात फ़िरतांना हेच प्राणी आपल्याला गाडीतून पाहावे लागतात. पण हेल्स गेट नॅशनल पार्क या एकमेव अभयारण्यात आपण त्यांच्या मधून सायकल वरुन फ़िरु शकतो. थांबून फ़ोटोग्राफ़ी करु शकतो. फ़क्त रस्ता सोडून बाहेर जाण्याची परवानगी नाही. प्राण्यांच्या नंदनवनातून आरामात सायकल चालवत, थांबत आम्ही अडीच किलोमीटरचा टप्पा पार केला. त्यानंतर एकदम तीव्र उतार चालू झाला सायकलचा वेग आवरणे मुश्किल होत होते. उतार संपल्यावर विवराच्या भिंती रस्त्याच्या जवळ आल्या. लाव्हा रसामुळे तयार झालेले विविध आकार पाहात पुढचा दोन किलोमीटरचा रस्ता कापला. पुढे एक वळण घेऊन हेल्स गेटपाशी पोहोचलो. या ठिकाणी सायकली ठेऊन पुढचा प्रवास पायी करायचा होता.


ol njorowa gorge, Hell,s Gate National Park, Kenya

ol njorowa gorge, Hell,s Gate National Park, Kenya
इसवीसन १८८३ मध्ये फ़िशर आणि थॉमसन यांनी "ओल्जोवारा गॉर्ज" (Olnjorowa Gorge) ही एका नदीने खोदून काढलेली दरी शोधून काढली. या खोल दरीत उतरणारा चिंचोळा मार्ग आहे त्याला हेल्स गेट असे नाव दिले आहे. या मार्गाने खाली उतरणे थोडे जिकरीचे आहे. खाली उतरल्यावर आपला थेट नदीपात्रात प्रवेश होतो. पायाखाली वाळू आणि त्यातून पाणी वाहात असते. पाऊस पडत असल्यास नदीपात्रात उतरु नका असे फ़लक जागोजागी लावलेले होते. काही ठिकाणी आप्तकालिन बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून कड्यांवरुन गाठी मारलेले मजबूत दोर खाली सोडलेले होते. बर्‍याचदा इथे पाऊस पडला नाही तरी दुसर्‍या भागात पडलेल्या पावसाच्या पाण्याचा लोंढा या चिंचोळ्या जागेत शिरतो असे आमच्या बरोबरच्या वाटाड्याने सांगितले. पुढे गेल्यावर नदी पात्र रुंद होत गेले. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने दोन्ही बाजूच्या भिंतींना दिलेले आकार आणि त्यावर चितारलेली नक्षी पाहात आम्ही पुढे चाललो होतो.  दरवर्षी पाण्याच्या प्रवाहामुळे माती मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे दरी अधिकाधिक खोल होतेय.  

Tough route, ol njorowa gorge, Kenya

साधारणपणे एक किलोमीटर चालल्यावर नदीच्या पात्राला डाव्या बाजूला एक फ़ाटा फ़ुटला होता. या भागाला डेव्हिल्स थ्रोट (Devil's Throat) म्हणतात. या ठिकाणी बाजूच्या भिंतीतून गरम पाणी पाझरत होते. गंधक मिश्रीत गरम पाण्यात पाय बुडवून आम्ही पुढे डेव्हिल्स बेडरुमकडे (Devil's Bedroom) निघालो. समोरुन एक अमेरीकन कुटूंब येतांना दिसले. पुढचा रस्ता कठीण असल्याने ते परत फ़िरले होते. थोडे अंतर चालून गेल्यावर रस्ता बंद झाला होता. डाव्या बाजूच्या भिंतीवर चढण्यासाठी एक मधे-मधे गाठी मारलेला मजबूत दोर लावलेला होता. त्या दोराला पकडून साधारणपणे १२ फ़ुटाचा टप्पा चढून गेलो. सह्याद्रीतील भटकंतीचा अनुभव या ठिकाणी कामी आला. वर चढून गेल्यावर एक जण कसाबसा चालू शकेल अशी चिंचोळी वाट होती. उजव्या बाजूला भिंत आणि डाव्या बाजूला दरी त्यामुळे जपून हा टप्पा पार केला. पुढे नदीचे पात्र अरुंद असले तरी चालायला व्यवस्थित जागा होती. नदीच्या दोन्ही काठाच्या भिंती आता एक फ़ूट अंतरावर आल्या होत्या. प्रवाहाने घेतलेल्या अवघड वळणानुसार दरी तयार झाली होती. वरच्या बाजूला असलेल्या जंगलातून झिरपणार्‍या प्रकाश दरीच्या शेवाळ्यामुळे हिरव्या झालेल्या भिंतींवरुन परावर्तीत झाल्याने गुढ वातावरण तयार झाले होते. थोडे अंतर चालल्यावर आम्ही सेंट्रल टॉवर (Central Tower) खाली आलो. याठिकाणीही आप्तकालिन मार्गासाठी एक दोर लावलेला होता.  सेंट्रल टॉवर हा हेल्स गेट नॅशनल पार्कच्या लोगोवर आहे. तो पार्कच्या सर्व भागातून दिसतो. या सेंट्रल टॉवर जवळ ओल्कारीया जिओ थर्मल पॉवर स्टेशन आहे. ज्वालामुखीतून बाहेर येणार्‍या वाफ़ेवर इथे १०५ मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते.
 
Central Tower from ol njorowa gorge, 

Devil's Bedroom, 

सेंट्रल टॉवरच्या पुढे चालत गेल्यावर आपण डेव्हिल्स बेडरुम मध्ये पोहोचतो. याठिकाणी १०० फ़ुटावरुन एक धबधबा खाली कोसळतो. पाणी खाली कोसळल्या नंतर पुढे जाण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा भोवरा तयार होतो. या भोवर्‍याने गेल्या अनेक शतकात या ठिकाणाचा मोठा भाग कोरुन काढलेला आहे. त्या भागाला डेव्हील्स बेडरुम म्हणतात. येथून पुढे जाण्याचा मार्ग नसल्याने आल्या वाटेने परत डेव्हिल्स थ्रोट या फ़ाट्यापर्यंत आलो. पुढे नदीचे पात्र चांगलेच रुंद होते. इथे पायाखाली थंड पाणी आणि बाजूच्या भिंतीतून पाझरणारे गरम पाणी असा गमतीशीर प्रकार होता. ज्वालामुखीमुळे तयार झालेले विविध दगड गोळा करत अर्धा किलोमीटर चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक्झिटची पाटी होती. 2०० फ़ुट वर चढून त्या सुंदर दरीच्या बाहेर आलो. एक आगळवेगळ ठिकाण पाहिल्याचा आनंद झाला.

ol njorowa gorge, Hell's Gate National Park, Kenya

ol njorowa gorge, Hell's Gate National Park, Kenya

Exit point , ol njorowa gorge

Central Tower,ol njorowa gorge, Hell's Gate National Park

केनियाला फ़िरायला जाणारे मसाई मारा आणि नकुशा लेक पाहातात. नकुशा लेक पासून नैरोबीला जातांना वाटेत नैवाशा लेक आहे. या ठिकाणी तलावाला लागून अनेक हॉटेल्स आणि कॅम्प साईट्स आहेत. नैवाशा लेक परिसरातही अभयारण्य असून अनेक प्राणी आणि पाणपक्षी तलावा काठच्या हॉटेलांमध्येही दिसतात. तलावात बोटीने सैरही करता येते. या नैवाशा लेक जवळच हेल्स गेट नॅशनल पार्क आहे, त्यामुळे मसाई मारा, नकुशा लेक पाहून एक दिवस नैवाशा लेकला मुक्काम करुन हेल्सगेट नॅशनल पार्क मधील सायकलींग आणि ओल्जोवारा गॉर्जचा ट्रेक करता येतो.

Hells Gate National Park, Kenya
Different Volcanic  rocks 

#OffbeatKenya#olnjorowagorge#Hell'sGateNationalPark#Kenya#cyclinginkenya#volcanicrocks#volcanicplug#cyclinginnationalpark#
          

24 comments:

  1. मस्त, हटके भ्रमंती आहे. संधान व्हॅली ची आठवण आली की नाही😊

    ReplyDelete
    Replies
    1. सह्याद्री तर सगळीकडेच भेटतो.

      Delete
    2. Khup chan varnan kela ahe. Vachun ni photo baghun tithe pratyaksh gelyasarakha vatala. Khup chan

      Delete
  2. छान माहिती मिळाली.. निसर्ग आपल्या परीने वेगळीच गंमत करुन स्वतःला आणखीनच सुंदर, प्रदर्शनीय बनवतो.

    ReplyDelete
  3. Wawwwwwwwww वाचत असताना तुम्ही दिलेल्या फोटोवरुन आणि imagination वरून Hell's gate national park फिरून आल्याचा आंनद झाला, ख़ुपच सूंदर वर्णन😍😍😍😎😎

    ReplyDelete
  4. अप्रतिम,सुंदर प्रवास वर्णन आहे,सोबत फिरल्यासरखे वाटते.

    ReplyDelete
  5. सुंदर अनुभव खुप छान माहिती

    ReplyDelete
  6. सुंदर अनुभव खुप छान माहिती

    ReplyDelete
  7. सुंदर अनुभव खुप छान माहिती

    ReplyDelete
  8. सुंदर माहिती एक वेगला अनुभव

    ReplyDelete
  9. दादा तुझ्या लिखाणातून त्या जागेची सैर होते.

    ReplyDelete
  10. छान माहिती आणि उत्कृष्ट फोटो आमच्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल इतिहास संशोधक अमित सामंत यांचे शतशः आभार!आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!����

    ReplyDelete
  11. ✍👌
    छान लेख.
    अप्रतिम छायाचित्र.
    वा....
    प्रत्यक्षात सफर केल्यासारखे वाटले.

    ReplyDelete
  12. दादा अप्रतिम लेख.. मजा आली वाचताना..सगळे फोटो मस्त..खरच चित्तथरारक,Devil's Bedroom 1 नं फोटो..मी तर वाचताना तिथेच उभी होते.. :-)

    ReplyDelete
  13. साहेब छान लेख

    ReplyDelete
  14. छान आणि वेगळा अनुभव. 👌

    ReplyDelete
  15. अप्रतिम लेख, लिखाण मांडणी उत्तम, फोटोंमुळे त्या ठिकाणच्या वैशिष्ट्यांचे चित्र अजून स्पष्ट होते.

    ReplyDelete
  16. छान साहेब

    ReplyDelete