Showing posts with label Ancient trade route. Show all posts
Showing posts with label Ancient trade route. Show all posts

Monday, December 2, 2024

"लँड ऑफ फायर" (Land of Fire )

 

लँड ऑफ फायर

अझरबैजान या देशाला "लँड ऑफ फायर" या नावाने ओळखलं जाते. तिथे असलेल्या नैसर्गिक वायुच्या आणि तेलाच्या साठ्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीतून बाहेर पडणाऱ्या ज्वाळा पाहायला मिळतात.  तसेच भूगर्भशास्त्रातील (Geology) अनेक आश्चर्य इथे पाहायला मिळतात. भूगर्भशास्त्र शिकताना यातील अनेक गोष्टी शिकल्या होत्या, पण प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या नव्हत्या. अझरबैजान मध्ये फिरायला जाण्याचे हे पण एक कारण होते.

अझरबैजानची राजधानी बाकू शहराच्या बाहेर पडले की मोकळा भाग सुरु होतो. याभागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमिनीतून तेल काढण्यासाठी करकोच्या सारख्या दिसणाऱ्या मशिन्स आणि क्रेन्स दिसायला लागतात. अगदी गावातल्या घरांच्या कुंपणाला लागून पण तेल काढणाऱ्या मशिन्स दिसत होत्या. त्यातून निघणार्‍या पाईप लाईन्स सर्वत्र दिसत होत्या. या भागात जमिनी खाली तेल आणि नैसर्गिक वायुचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. या भूगर्भातील साठ्यांमुळे याभागात अनेक नैसर्गिक आश्चर्य (Geological wonders) पाहायला मिळतात. 

Mud Volcano, Gobustan

जगभरात ९०० च्या वर चिखलाचे ज्वालामुखी (Mud Volcano) आहेत. त्यातील निम्मे ज्वालामुखी एकट्या अझरबैजान मध्ये आहेत.  बाकू पासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या  गोबूस्थानला आपल्या गाडीने पोहोचल्यावर पुढे ज्वालामुखी पर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. त्यावरून जाण्यासाठी १९६०-७० च्या जमान्यात बनवलेल्या जुन्या रशियन कार मधून प्रवास करावा लागतो. पूर्णपणे खिळखिळ्या झालेल्या गाड्यां मधून जीव मुठीत बसून प्रवास करावा लागतो. आमच्या  गाडीच्या चालकाला त्यांची स्थानिक भाषा सोडून इतर भाषाचा गंधही नव्हता त्यामुळे आम्ही त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावर त्याने गाडीतल्या गाण्याचा आवाज वाढवला आणि त्या उंच सखल कच्च्या रस्त्यावरुन गाडी बेफ़ाम वेगात चालवायला सुरुवात केली. समोरुन येणार्‍या गाड्याही त्याच वेगात येत होत्या. असा १० मिनिटाचा थरारक प्रवास संपवून आम्ही मढ व्हॉलकॅनोंच्या परिसरात पोहोचलो. 

Mud Volcano, Azerbaijan

लाव्हारस बाहेर पडणार्‍या ज्वालामुखीचे विवर आपण अनेकदा चित्रात, डॉक्युमेंट्रीज मध्ये पाहिलेले असतें, तसेच चिखलाच्या ज्वालामुखीचे विवर असते, विवराला गोलाकार तोंड असते, फक्त त्यातून लाव्हारसा ऐवजी पाणी, चिखल आणि नैसर्गिक वायू बाहेर पडत असतो. या विवारातून बाहेर पडणाऱ्या चिखलामुळे शंकूच्या आकारच्या ज्वालामुखीच्या टेकड्या तयार होतात. अशाच एका टेकडीवर चढताना चिखलाचे ताजे ओघळ टेकडीच्या उतारावर दिसत होते. टेकडी चढून गेल्यावर ज्वालामुखीच्या तोंडाजवळ चिखल मिश्रीत राखाडी रंगाचे पाणी दिसत होते. ठराविक काळाने त्यात हवेचे मोठे बुडबुडे येऊन फ़ुटत होते. त्या बुडबुड्यांच्या फ़ुटण्यामुळे चिखल खाली ओघळत होता. हे बुडबुडे फ़ुटल्यावर नैसर्गिक वायू बाहेर पडत होता. तिथे असलेल्या स्थानिक माणसाने आम्हाला तो त्याच्याकडील लायटरने पेटवून दाखवला. गेली २५००० वर्ष याभागात हे चिखलाचे ज्वालामुखी आहेत. 



चिखलाचे ज्वालामुखी (Mud Volcano) तयार होण्यासाठी जमिनीखाली नैसर्गिक वायूचे साठे, पाण्याचा स्त्रोत आणि अवसादी गाळाचा खडक (Sedimentory rock) हे मुख्य घटक असावे लागतात.  गाळाचा खडक पाण्यात विरघळून चिखल तयार होतो. त्या खाली असलेल्या नैसर्गिक वायूच्या दाबाने तो चिखल वरच्या दिशेला ढकलला जातो आणि जमिनीतून बाहेर पडतो. याठिकाणी जमिनीतून बाहेर पडणारा चिखल साठत जाऊन शंकूच्या आकाराच्या टेकड्या तयार होतात. चिखलाच्या ज्वालामुखीच्या परिसरात फ़िरताना अनेक छोट्या मोठ्या टेकड्या दिसत होता. काही ठिकाणी एकाच टेकडीवर वेगवेगळ्या ऊंचीवर ज्वालामुखीच्या विवराची तोंडे होती. ज्वालामुखीतून येणारा चिखल औषधी असून त्यात आंघोळ केल्यास (लोळल्यास) अनेक व्याधी बर्‍या होतात असा दावा काही ठिकाणी केला जातो, पण त्याला शास्त्रीय आधार नाही.

चिखलाचा ज्वालामुखीचा (Mud Volcano) व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणावर टिचकी मारा


चिखलाचे ज्वालामुखी (Mud Volcano) पाहून आम्ही पुढचे ठिकाण "यानार डाग" (Yanar Dag) गाठले. बाकूच्या उतरेला १६ किलोमीटरवर यानार डाग आहे. यानार डाग या शब्दाचा अर्थ "जळता पर्वत" (Burning Mountain) असा आहे. येथे एका टेकडीच्या पायथ्याशी अनेक ठिकाणाहून जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडतांना पाहायला मिळतात. याठिकाणी जमिनीखाली असलेला नैसर्गिक वायू गाळाच्या सच्छीद्र दगडातून बाहेर पडतो. अनेक वर्षापासून हा वायू पेटतो आहे. पाऊस , बर्फ़, वारा या नैसर्गिक गोष्टींनी ही आग विझत नाही. या आगीच्या ज्वाळा १ मीटर ते १० मीटर उंची पर्यंत जातात. अझरबैजान देशात अशा प्रकारे जमिनीतून येणारा नैसर्गिक वायू पेटल्यामुळे निर्माण झालेल्या आगी पूर्वी अनेक ठिकाणी होत्या. 

यानार डाग" (Yanar Dag)

तेराव्या शतकात सिल्क रुटवरुन प्रवास करणार्‍या मार्कोपोलोने अझरबैजान मध्ये अशा प्रकारे जमिनीतून पेटलेल्या आगी पाहील्याची नोंद केलेली आहे,  पण त्यामुळे नैसर्गिक वायूच्या साठ्याचे नुकसान होत असल्याने सरकारने त्या विझवल्या आता फ़क्त "यानर डाग" येथेच अशा प्रकारे पेटलेली आग पाहायला मिळते.  मुस्लिम धर्माचे आक्रमण होण्यापूर्वी झोराष्ट्रीयन धर्म हा अझरबैजानी लोकांचा मुळ धर्म होता. आजही नवरोज हा अझरबैजान मधला प्रमुख सण आहे. 


झोराष्ट्रीयन धर्मात आगीला शुध्द आणि पवित्र मानलेले आहे. झोराष्ट्रीयन अग्निपूजक आहेत. या प्रदेशात अशा नैसर्गिकरित्या पेटलेल्या आगी त्यांच्यासाठी पवित्र होत्या. त्या मागचे शास्त्रिय कारण त्यांना त्याकाळी माहिती नव्हते, पण या भागात सापडलेल्या दगडावर या आगीचे शिल्पांकन केलेले पाहायला मिळते. यानार डाग इथे पेटलेल्या आगीत अनेक नाणी टाकलेली पाहायला मिळतात. याचा पण धागा जून्या झोराष्ट्रीयन धर्मापर्यंत जातो. 


यानार डाग "जळता पर्वत" (Burning Mountain) चा व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणावर टिचकी मारा

 
बाकूच्या पासून ९० किलोमीटर अंतरावर खिजी जिल्ह्यात "कॅंडी केन माऊंटन" आहेत.  या डोंगरांवर असलेल्या पांढ‍र्‍या , गुलाबी आणि लाल मातीच्या पट्ट्यांमुळे हे डोंगर दुरुन "कॅंडी" सारखे दिसतात म्हणून यांना कॅंडी केन माऊंटन म्हटल जाते. या भागात शिरल्यावर अशा प्रकारचे अनेक डोंगर दिसतात. अशाच एका डोंगराच्या पायथ्याशी आमच्या चालकाने गाडी थांबवली. समोर लाल आणि पांढरे पट्टे असलेली निष्पर्ण डोंगररांग पसरलेली होती. आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली.

कॅंडी केन माऊंटन 

ही डोंगररांग शेल या एक प्रकारच्या गाळाच्या खडकापासून तयार झालेला आहे. या खडकात चिकणमाती आणि विविध प्रकारची खनिजे असतात. अशा प्रकारचा गाळाचा खडक अतिशय संथ गतीने तयार होतो. नद्यांनी आणलेला गाळ समुद्रतळाशी किंवा सरोवराच्या तळाशी संथ पाण्यात जमा होत जातो. या गाळात अनेक जीवश्मांचे अवशेषही असतात. या गाळाचे एकावर एक थर जमा होऊन गाळाचा खडक तयार होतो. कालांतराने जमिनीच्या हालचालीमुळे हा दगड जमिनीच्या वर येतो. या दगडात असलेल्या लोहाचा पाण्याशी संयोग होऊन तो ऑक्सिडाईज होते आणि डोंगरावर लाल आणि गुलाबी रंगाचे पट्टे दिसायला लागतात. तर उरलेल्या चिकणमातीचे पांढरे पट्टे तयार होतात.


डोंगरावर चढतांना पाया खालची जमिन भुसभुशीत लागत होती. अनेक ठिकाणी पाण्यामुळे वाहून गेलेल्या मातीमुळे विवर निर्माण झालेली होती. त्यांच्या जवळील भुसभुशीत मातीवरुन जपून चढत होतो. डोंगरावरचे लाल आणि पांढरे पट्टे ओलांडत एका अरुंद जागेवर पोहोचलो, दोन्ही बाजूला दरी होती. याठिकाणी भुसभुशीत जमिनीवर जेमतेम पाऊल मावेल एवढ्याच पायाऱ्या खोदलेल्या होत्या. त्या पार करून पठारावर आलो. इथून दिसणारे दृश्य नजरबंदी करणारे होते. पायाखाली आणि सभोंवर लाल - गुलाबी आणि पांढरे पट्टे असलेले, गवताचे एकही पाते नसलेले डोंगर  आणि समोरच्या बाजूला हिरव्या गवताच्या पात्याने आच्छादलेले करडे डोंगर दिसत होते. एखाद्या परीकथेतल्या डोंगरावर आल्यासारखा भास होत होता. पठारावर फिरून डोंगरमाथ्याकडे चढाई करायचा प्रयत्न केला पण भुसभुशीत माती आणि तीव्र चढ यामुळे गणित जमले नाही. त्यामुळे पुन्हा पठारावर येऊन समोर दिसणारे दृश्य मनात साठवत बसून राहिलो.

Candy cane mountain , Azerbaijan

रेशीम मार्गावरचे हिंदू मंदिर 


भारतापासून अंदाजे ४००० किलोमीटर दूर एक हिंदू मंदिर आहे आणि त्यात १४ संस्कृत (देवनागरी ) आणि २ गुरुमुखी लिपीतील शिलालेख आहेत हे मला कोणी सांगितले असतें तर मी विश्वास ठेवला नसता. याशिवाय एक शिलालेख पर्शियन (फारसी) लिपीत आहे. 

संस्कृत (देवनागरी) शिलालेख

या हिंदू मंदिराला अतेशगाह  या नावाने ओळखले जाते. स्थानिक भाषेत अतेश म्हणजे “आग”आणि “गाह” म्हणजे जागा, "आगीची जागा" या अर्थी “अतेशगाह” हा शब्द वापरला जातो. बाकू पासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरखानी या शहरात अतेशगाह हे हिंदू मंदिर आहे. या ठिकाणी जमिनीखाली असलेल्या नैसर्गिक वायुच्या स्रोतांमुळे एकेकाळी ७ ठिकाणी जमिनीवर आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्या ठिकाणी हे मंदिर आणि सराई (धर्मशाळा ) बांधलेली आहे. या ज्वाळांचा स्त्रोत शोधण्यासाठी इसवीसन १९६९ मध्ये सोव्हीएत सरकारने केलेल्या उत्खननामुळे या ज्वाळा विझल्या. त्यानंतरच्या काळात बाहेरुन पाईप व्दारे नैसर्गिक वायू आणून येथील मुख्य मंदिरातील ज्वाळा पेटत्या ठेवण्यात आलेल्या आहेत.


अतेशगाह Fire Temple

इसवीसनाच्या सुरुवाती पासून भारताचा युरोपाशी व्यापार होत असे.  माल घेऊन  भारतीय व्यापारी खुष्कीच्या (जमिनीच्या) आणि सागरी मार्गाने जात असत. हा एकच ठराविक रस्ता नव्हता, तर पूर्व आशियाला युरोपशी जोडणारे अनेक मार्ग त्यात अंतर्भूत होते. त्यात जमिनी मार्गे, तसेच जमिन आणि समुद्र मार्गे जाणारे अनेक रस्ते होते. या रस्त्यांनी मुख्यत्वे करुन रेशीम, नीळ, कापड,मसाले इत्यादी अनेक वस्तू युरोपात जात असत. साधारणपणे इसवीसनाच्या सहाव्या शतकापासून प्राचीन चिनच्या राजधानीचे शहर चांगआन (आताचे शिआन) येथून युरोपात मोठ्या प्रमाणावर रेशीम पाठवायला सुरुवात झाली. या व्यापारी मार्गांना रेशीम मार्ग (Silk Road)  हे नाव मात्र इसवीसनाच्या अठराव्या शतकातल्या इतिहासकारांनी दिले.

Natraj, Ateshgah Hindu Temple

भारतातून जमिनीवरुन आणि समुद्रातून जाणारे असे अनेक रेशीम मार्ग होते. त्यापैकी एक आपल्या मुंबई जवळील कान्हेरी (कृष्णगिरी) लेणी, शुर्पारक (सोपारा) बंदर हा मार्गही होता. या मार्गावर असलेल्या कान्हेरी लेण्यातील लेणी क्रमांक २ च्या बाहेरील भिंतीवर दोन वाशिंड असलेला उंट कोरलेला आहे. हा उंट तिबेट परिसरात आढळतो. तेथून भारतात प्रवास करणार्‍या व्यापार्‍यांनी/ कारागिरांनी तो प्रत्यक्ष पाहिला असल्याने कान्हेरीत कोरला आहे.

याशिवाय वायव्य भारतातून आजच्या काबूल (अफ़गाणिस्थान), तेहरान (इराण) मार्गे अझरबैजानला जाणारा रेशिम मार्ग होता. याच मार्गाने वायव्य भारतीय हिंदू, शिख व्यापारी अझरबैजानला जात असत. हिंदुकुश पर्वतातील टोळीवाले, तेथिल अतीथंड तापमान, इराणचे वाळवंट अशा विपरीत परिस्थितीला तोंड देत अंदाजे ४००० किलोमीटरचे अंतर कापून ते अझरबैजानला पोहोचत असत.

रेशीम मार्ग (Silk Road)

अतेशगाह अग्नि मंदिर आणि सराई परिसराला वेढणार्‍या दोन तटबंदी बांधलेल्या आहेत. बाहेरील तटबंदीत असलेल्या प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यावर "L" आकारात बांधलेली मोठी सराई पाहायला मिळते. या सराईत व्यापार्‍यांना राहाण्यासाठी तसेच सामान (माल) साठवून ठेवण्यासाठी अनेक दालन आहेत. त्याच बरोबर अनेक धर्माची प्रार्थना स्थळ सुध्दा याठिकाणी होती. त्या दालनांना जोडणारी लांबलचक आणि प्रशस्त ओवरी आहे. सध्या या दालनात तिकीटघर आणि स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू विकण्याची काही दुकान आहेत. या सराई समोर मोठे मोकळे आवार आहे. त्याकाळी व्यापारी माल जनावरांच्या पाठीवरुन घेऊन जात. त्या जनावरांना बांधण्यासाठी, गाडे उभे करण्यासाठी हे मोठे आवार बांधलेले होते. हे आवार ओलांडून मंदिराच्या दिशेने जातांना दुसरी तटबंदी लागते. या तटबंदीतही प्रवेशव्दार आहे. त्याच्या कमानीवर संस्कृत शिलालेख आहे. त्याच्या छायाचित्रावरुन त्याचे वाचन केले, काही शब्द अस्पष्ट असल्यामुळे त्यांचा अर्थ लागत नाही. 

Sarai, Ateshgah hindu temple

श्री गणेशाय नम: श्रीरामजी सतश्री
ज्वालाजी सहाय संवत १८०२ ॥ मतक
षवदी ७ बी रवार सा त नसानो जीजति
घातात पकोग्या नम: वसना गच्छतात च
त सफरधामत गनबना यप्म प्रपात:

या शिलालेखाची सुरुवात "श्री गणेशाय नम: श्रीरामजी सतश्री ज्वालाजी " .... अशा प्रकारे श्री गजाननाला , श्रीरामाला आणि ज्वालाजीला नमन करुन होते. या शिलालेखात सहाय संवत १८०२ म्हणजेच इसवीसन १७४५ मध्ये हे मंदिर व सराई बांधली असाही उल्लेख आहे. काही संस्कृत शिलालेखा शिवाला (शंकराला ) वंदन केलेले आहे.

Shilalekh (Inscription)


प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर तटबंदी युक्त पंचकोनी रचना दिसते. याच्या मध्यभागी अग्निमंदिर आहे. चार खांबांवर घुमटाकार छत तोललेले आहे.  मध्यभागी असलेल्या वेदीवर अग्नि प्रज्वलित केलेला पाहायला मिळतो. हे मंदिर चारही बाजूने उघडे आहे, त्याला भिंती नाहीत.  या मंदिराचे चारही खांब पोकळ असून त्यातून नैसर्गिक वायू वर नेऊन घुमटाच्या बाजूला चार ज्वाळा पेटत असत असे येथे सांगितले जाते. ते दर्शवणारी चित्रेही इथे आहेत, पण ती काल्पनिक असावित. या मुख्य ज्वाला मंदिराच्या आजूबजूला काही चौथरे आहेत. त्यांचा वापर धार्मिक विधी तसेच बळी देण्याकरीता केला जात असे. या परीसरात एक विहिर आहे. येथे केलेल्या उत्खननात दगडात कोरलेले पाईप सापडले आहेत. या पाईप मधून नैसर्गिक वायू दालनांमध्ये आणण्यात आला होता. त्याच्यावर पेटणार्‍या आगीचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी, उजेडासाठी आणि दालन गरम राखण्यासाठी केला जात होता. उत्खनन केलेल्या काही जागा काचेने बंद करुन ठेवलेल्या आहेत. 

येथे तटबंदीत असलेल्या दालनांच्या दरवाजावर संस्कृत (देवनागरी) आणि गुरुमुखी लिपीतील शिलालेख आहेत . या दालनांमध्ये कायमस्वरुपी प्रदर्शन आहे. त्यात या जागेचा इतिहास, इथे उत्खननात सापडलेल्या वस्तू , भांडी, शिल्प इत्यादी मांडून ठेवण्यात आलेल्या आहेत. यातील एका दालनात गणपतीची मुर्ती आणि दुसर्‍या दालनात नटराजाची मुर्ती ठेवलेली आहे. येथे झालेल्या उत्खननात पंधराव्या शतकातील गणपतीच्या मुर्तीचा काही भाग मिळालेला आहे. सध्याचे हिंदू मंदिर आणि सराईच्या यांच्या बांधकामावर इस्लामी स्थापत्यकलेचा प्रभाव दिसून येतो.  इथे झालेल्या उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरुन याठिकाणी पूर्वी झोरोस्ट्रियन धर्माचे मंदिर असावे.


अझरबैजानी इतिहासकार काझिम अझीमोव्ह यांच्या मते, येथे झोरोस्ट्रियन धर्म रुजला याची अनेक कारणे आहेत. अझरबैजान सिल्क रुटवर मोक्याच्या जागी असल्यामुळे झोरोस्ट्रियन व्यापाऱ्यांचा या भागात मोठ्या प्रमाणावर वावर होता. अझरबैजान मध्ये असलेल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यामुळे येथे अनेक ठिकाणी पेटलेल्या ज्वाळा पाहून झोरोस्ट्रियन धर्माच्या लोकांनी या पवित्र ज्वाळांभोवती मंदिरे बांधली. या ज्वाळांना नैसर्गिक वायूचा अखंडीत पुरवठा होत असल्यामुळे आग कायम प्रज्वलित ठेवण्यासाठी वेगळी सोय करण्याची आवश्यकता उरली नव्हती. हळूहळु या देशात झोरोस्ट्रियन लोक मोठ्या प्रमाणात राहू लागले. इसवीसनाच्या सहाव्या शतकात झोरोस्ट्रियन धर्माला अधिकृत राज्य धर्म म्हणुन याभागात मान्यता मिळली . सातव्या शतकात ससानियन साम्राज्याच्या अस्त होईपर्यंत पवित्र ज्वाळांचे संरक्षण करण्यासाठी हजारो अग्नि मंदिरे बांधली गेली. इसवी सनाच्या सातव्या शतकात इस्लामने या भागात जोर धरल्यावर त्यातील अनेक मंदिरे नष्ट झाली.  

अतेशगाह अग्नि मंदिराला १९९८ साली युनेस्कोचा वर्ल्ड हेरीटेज साईटचा दर्जा मिळाला. त्यानंतर सरकारनेही मंदिर परिसराचा विकास केला.

जाण्यासाठी :- अझरबैजानला भेट द्याल तेंव्हा चिखलाचे ज्वालामुखी (Mud volcano), यानार डाग (जळता पर्वत ) आणि अतेशगाह (अग्नी मंदिर) ही बाकूच्या जवळची ठिकाण एका दिवसात पाहाता येतात. त्यासाठी एका दिवसाच्या गाइडेड टूर्स आहेत.

कँडी केन माऊन्टेन्स वेगळ्या बाजूला असल्याने ते पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो. यासाठी सुध्दा गाइडेड टूर्स आहेत.


Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right
कॅमेरा :- Nikon P900 , Gopro Hero 5 , Google pixal 6A

Flame Towers , Baku


अलिंजा कॅसल, माचू पिचू ऑफ अझरबैजान Alinja Castle , Machu Pichu of Azerbaijan हा ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा 


Sunday, October 16, 2022

माळशेजची प्राचीन घाट वाट आणि काळूचा ओघ ( Malshej Ghat Ancient trade route & Kalucha (Waterfall) Ogh )

 

Malshej Ghat Ancient trade route 


कल्याण बंदराला जून्नरशी (जीर्ण नगर) जोडणारा माळशेज घाट ही  प्राचीन घाट वाट आहे.  या वाटेने कल्याण बंदरात उतरणारा माल  घाट माथ्यावरील जून्नरच्या बाजारपेठेत जात असे.  या परिसरात कल्याणला जुन्नरशी जोडणारे  नाणे घाट , दर्‍या घाट इत्यादी प्रसिध्द  घाटमार्ग  असतानाही माळशेज घाटाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असावा हे तिथे अजूनही तग धरुन असलेल्या अवशेषांवरुन दिसून येते.

 

Malshej Ghat

अनेक धबधबे, ओहोळ, रानफ़ुलं , धुक्याच्या पडद्या आडून अचानक दिसणार सह्य़ाद्रीचं रौद्र भीषण रुप यामुळे पावसाळ्यात माळशेज घाटाचे सौंदर्य खुलतं, त्यामुळे शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवसात  इथे पर्यटकांची रिघ लागलेली असते. अशा ठिकाणी येऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असतो हे बर्‍याच जणांच्या गावी नसल्याने दारु ढोसून  नाचगाणी, आरडाओरडा करण्यात धन्यता मानतात.  पण पाऊस ओसरल्यावर मात्र हे  पावसाळी पर्यटक गायब होतात. 

 

कारवीच्या झुडूपातून वाट

१ ऑक्टोबरला सकाळी  आम्ही माळशेज घाट ओलांडला तेंव्हा घाटात शांतता होती . आठवडाभर पाऊस नसल्याने धबधब्यांच्या भर ओसरला होता. हरिश्चंद्रगड आणि परिसर अजून धुक्याच्या  पडद्या आड लपला होता. बोगदा ओलांडून पुढे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या  (MTDC) कमानीतून आत शिरलो. कमानीच्या डाव्या बाजूला प्राचीन माळशेज घाट वाटेची सुरुवात होते आणि घाटा खाली असलेल्या थितबी गावात ही वाट उतरते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळचे रिसॉर्ट असलेले पठार माळशेजच्या मुख्य डोंगररांगेपासून सुटावल्या सारख दिसते. पठार आणि मुख्य डोंगररांग यांच्या मध्ये एक घळ आहे. या घळीतून वाहाणार्‍या ओढ्याच्या काठाने माळशेजची प्राचीन वाट जाते. त्या वाटेच्या सुरुवातीला असलेलेया कारवीच्या दाट झुडूपांमुळे वाटेचे तोंड सापडणे थोडे अवघड आहे. त्यासाठी  कमानीतून आत शिरुन डाव्या बाजूला  घळीच्या विरुध्द दिशेला डोंगर उतरायला सुरुवात करावी. पाच मिनिटात आपण  कारवीच्या दाट झुडूपांपाशी येतो. या झुडूपां मधूनच माळशेजची घडीव दगडात बनवलेली प्राचीन वाट आहे.

 

फरसबंदी वाट

मोठ मोठे दगड तासून, व्यवस्थित बसवून ही वाट बनवलेली आहे. वाटेत लागणार्‍या ओढ्यांच्या प्रवाहामुळे काही ठिकाणी उखडले आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतर ठिकाणी इतक्या वर्षानंतरही घडीव दगडांची वाट अजूनही टिकून आहे. कारवीच्या दाटीमुळे पायाखालची वाट दिसत नव्हती. दहा मिनिटे कारवीतून चालल्यावर वाट डावीकडे वळून घळीच्या दिशेने उतरायला लागली.  पाठीवर सामान असलेली दोन जनावर एकाच वेळी जातील एवढी रुंद आणि चढणार्‍या आणि उतरणार्‍या जनावरांना कमीत कमी श्रम होतील अशा प्रकारे घाट वाटेची रचना केलेली आहे.    पायर्‍यांची उंचीही त्याच बेताने ठेवलेली आहे. 

 

ओढ्यातला खडक

उतरायला सुरुवात केल्यापासून २० मिनिटात घळीत पोहोचलो. घळीतून वाहाणार्‍य़ा ओढ्याच्या बाजूने वाट जात होती.  पुढच्या पाच मिनिटात वाट   ओढ्याच्या पात्रात उतरली. या ठिकाणी ओढ्याच्या पात्रात मोठा खडक पडला होता त्याने ओढ्याचे पात्र अडवल्याने बाजूला चिंचोळी वाट होती. पावसाळ्यात हा भाग त्यामुळे धोकादायक आहे. पण आम्ही गेलो तेंव्हा आठवडाभर पाऊस नसल्याने पाणी कमी होते. ओढ्याच्या पात्रात असलेल्या  खडकाच्या मागे हरिशचंद्रगड दिसतो. पण धुक्यामुळे तो दिसत नव्हता. तरीही खडकावर उभ राहून छायाचित्र घेण्याचा मोह कोणाला आवरता आला नाही.  येथून चारही बाजूला झाडीं भरले डोंगर दिसत होते. माळाशेज घाटाचा बोगदा त्याच्या पुढे असलेली  MTDCचे पठार आणि मुख्य डोंगररांग  यांच्या मधली घळ दिसत होती. त्या घळी जवळूनच आम्ही उतरायला सुरुवात केली होती.

 


ओढ्याच्या बाजूने जाणार्‍या चिंचोळ्या वाटेने पुढे निघालो . ओढ्याने इथून अंदाजे ५० फ़ुट खाली उडी मारली होती. पायवाट मात्र डोंगराच्या कडेने जात होती. 



                                    व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणवर टिचकी मारा

या ठिकाणी कातळात रुंद पायर्‍या खोदलेल्या होत्या. पायर्‍यांच्या वरच्या बाजूला कातळात कोरलेली तीन पाण्याची टाकी दिसत होती. वर चढून बघितल्यावर दोन टाकी पाण्याने भरलेली होती आणि तिसर टाक वरचे दगड आत पडल्यामुळे बूजलेल होते. पहिल्या टाक्याच्या खाली कातळावर गणपती कोरलेला आहे. तिथेच उगवलेली सोनकीची फ़ुल गणपतीला वाहून पुढे चालायला सुरुवात केली . 

Ganesh, Malshej Ghat Ancient route

Water tank , Malshej Ghat

Water Tanks, Malshej Ghat

आता वाटेच्या दोन्ही बाजूला अनेक छोटी छोटी रानफ़ुल फ़ुलली होती. सोनकी, तेरडा, कानपेट, विंचवी, कर्डू, ताग, हिरवी अबोली इत्यादी फ़ुलांनी आणि त्यावर भिरभिरणार्‍या फ़ुलपाखरांनी वातावरण एकदम प्रसन्न केले.

 


ओढा पायवाटेपासून दूर गेला असला तरी रानातून येणारा त्याचा खळखळाट सोबतीला होता. आता मोकळा भाग संपून पुन्हा जंगलाचा पट्टा चालू झाला. एक मोठा खडक बघून नाश्त्याचे डबे बाहेर काढले. इतक्यात डाव्या बाजूच्या झाडीत एक खंड्या (किंगफ़िशर) चोचीत मासा धरुन आला. या उंचीवर आणि दाट झाडीत पहिल्यांदाच खंड्याचे दर्शन झाले. खंड्या उडून गेल्यावर आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. आता उतार संपून  जंगलातून जाणारी वळणावळणाची वाट होती. वाटेत  चार आडवे जाणारे ओढे लागले.  वनखात्याने ओढ्यांवर दगडांचे बांध घालून तो वाहून जाउ नये यासाठी त्यावर लोखंडी जाळी घातली होती. तरीही पाण्याच्या प्रवाहाने काही बांध फ़ोडलेले दिसले. पावसाळ्यातले कुंद वातावरण , ओलावा यामुळे जंगलात ठिकठिकाणी मोडून पडलेल्या  लाकडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या , आकाराच्या , रंगांच्या बुरशी (Fungi) ,कुत्र्याच्या छत्र्या (mushroom) वाढायला सुरुवात होते.  पावसाळा संपत आल्याने जोमाने वाढलेल्या रंगांच्या बुरशी (Fungi) ,कुत्र्याच्या छत्र्या (mushroom) वाटेत दिसत होत्या. 






वाटेत एका झाडा भोवती अळे केलेले असावे , तसे वारुळ पाहायला मिळाले. अळ्याच्या आत डेरेदार झाड होते. या अळ्याच्या आकाराच्या वारुळाच्या आत वाढलेल्या झाडाची वाढ इतर झाडांपेक्षा जास्त आणि चांगली होते असे  लक्षात आल्यामुळे मानवाला अळ्याची कल्पना सुचली असण्याची शक्यता आहे. मानव आजही निसर्गाकडून बर्‍याच गोष्टी शिकतोच आहे.

 

वारुळाचं अळं

सुरुवातीपासून साथ देणारा ओढा आता पुन्हा पायवाटेच्या बाजूला आला.  MTDC पासून उतरायला सुरुवात केल्यापासून २.५ तासात आम्ही एका फ़ाट्यापाशी पोहोचलो. येथून उजव्या बाजूला जाणारी ठळक वाट काळूच्या ओघाकडे जात होती. तर सरळ जाणारी वाट थितबी गावाकडे जात होती.   इथे गाड्यांचे आणि माणसांचे आवाज यायला लागले. अनेक यु ट्यूब व्हिडीओ आणि रिल्समुळे काळूचा ओघ अचानक प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. त्यातच थितबी गावातून इथे यायला बर्‍यापैकी कच्चा रस्ता असल्याने चार चाकी गाड्या आणि बाईक्स ओढ्या पर्यंत येतात. ओढ्यापासून ३ किलोमीटर चालत गेल्यावर "काळूचा ओघ" हा सह्याद्रीच्या माथ्यावरुन पाच टप्प्यात कोकणात पडणारा सुंदर धबधबा आहे.  यातील पहिला टप्पा जवळजवळ १२०० फ़ूटाचा आहे. त्या सरळसोट पाण्याच्या धारेमुळे धबधब्याचे नाव "काळूचा ओघ" असे पडले असावे.  भर पावसात हा धबधबा पूर्ण भरात असतो. या धबधब्याच्या उजव्या बाजूला एक धबधबा आहे. स्थानिक लोक त्याला "माहुली धबधबा" या नावाने ओळखतात. या धबधब्याचे पाणी काळू नदीला मिळते.

 

काळूचा ओघ


साधारण दोन किलोमीटर चालत गेल्यावर एका ठिकाणाहून काळूचा ओघ वर पासून खाल पर्यंत संपूर्ण दृष्टीपथात येतो. भर दुपारीही काळुच्या ओघाकडे अनेक पर्यटक जात होते. त्यामुळे धबधब्या जवळ न जाता लांबूनच त्याची छायाचित्र घेतली. सकाळ पासून ढगात गुरफ़टलेल्या काळभैरव, तारामती (हरिशचंद्रगड) या शिखरांनी दर्शन दिले. परत फ़िरुन ओढ्यापाशी आलो. इथे पाण्याचा एक डोह तयार झालेला आहे. ऑक्टोबर हिटमुळे घामाने अंग भिजले होते. त्यामुळे पाण्यात शिरुन आत्तापर्यंतच्या ट्रेकचा क्षीण घालवणे आवश्यक होते. अर्ध्या तासाने पाण्या बाहेर पडून पुढच्या रस्त्याला लागलो. रुंद कच्चा रस्ता थितबी गावापर्यंत जात होता. रस्त्याच्या बाजूला अनेक बाईक्स आणि कार्स उभ्या होत्या. उजव्या बाजूला "निसर्ग पर्यटन केंद्र" थितबी अशी पाटी होती . वन खात्याने तिथे ४ रुम्स आणि २ डॉर्मेट्री बांधून राहाण्याची सोय केलेली आहे. एक वॉच टॉवर उभारलेला आहे. त्यावर चढून गेल्यावर आजूबाजूचे अफ़ाट दृश्य दिसले. MTDC चे रेलिंग , आम्ही उतरुन आलेली घळ , माळशेज घाटाची डोंगररांग, कालभैरव, हरिशचंद्रगड, काळूचा ओघ असा पॅनोरमा व्हिव्यू इथून दिसत होता. रिव्हर कॉसिंग, आर्टिफ़िशिअल वॉलची इत्यादी साहासी खेळांची येथे सोय आहे. पण करोना पासून हे निसर्ग पर्यटन केंद्र बंद आहे.

 



टॉवर वरुन खाली उतरुन कच्च्या रस्त्याने थितबी गावाकडे चालायला सुरुवात केली. रस्ता माळरानावरुन होता आणि त्यात दुपारचे उन , वाटेत एके ठिकाणी रस्त्याच्या डाव्या बाजूला शेंदुर लावलेला दगड होता. ती वाघदेवाची मुर्ती होती . उन्हा पावसात राहिल्यामुळे आणि शेंदुराचे थर चढल्यामुळे वाघाची प्रतिमा जेमतेम दिसत होती. 
(वाघदेवाबद्दल माहिती वाचण्याकरिता या लिंकवर टिचकी मारा  https://samantfort.blogspot.com/2015/08/waghdev.html )

पुन्हा रस्त्यावर येऊन गाव गाठले. थितबी गावात जेवणाची आणि गाईडची सोय आहे. "निसर्ग पर्यटन केंद्र ते थितबी गावाचे अंतर  २.५ किलोमीटर आहे. थितबी गाव ते कल्याण - माळशेज रस्ता हे अंतरही २.५ किलोमीटर आहे. थितबी गावाच्या फ़ाट्यावर बस थांबत नाहीत. त्यामुळे मिळेल ते वाहन पकडून धसई फ़ाटा किंवा टोकवडे गाठावे . येथून मुरबाड , कल्याणला जाणार्‍या बसेस मिळतात.

 

वाघदेवाची मुर्ती

माळशेज MTDC - थितबी हा अर्ध्या दिवसाचा ट्रेक आहे. सप्टेंबर , ऑक्टोबरमध्ये पाणी ओसरल्यावर पुढे मे महिन्यापर्यंत हा ट्रेक करता येइल. पाऊस पूर्ण भरात असतांना हा ट्रेक करणे टाळावे.

माळशेज MTDC-  थितबी  :-  २.५ तास चाल.

GPS ने रेकॉर्ड केलेली प्राचीन माळशेज घाटाची भटकंती, नकाशा  :- महेंद्र गोवेकर

माळशेज MTDC - काळूचा ओघ - थितबी हा पूर्ण दिवसाचा ट्रेक आहे . सप्टेंबरऑक्टोबर हे महिने छायाचित्रणाच्या दृष्टीने योग्य आहेत.

 माळशेज MTDC -  काळूचा ओघ - थितबी  :- ४ ते  ५ तास चाल.

थितबी - माळशेज MTDC चढाई :- ४ ते  ५ तास चाल.

 


Photos by :- Amit Samant & Mahendra Govekar © Copy right

 Video by :- Amit Samant

 Map :- Mahendra Govekar © Copy right

 कॅमेरा :- Gopro Hero 5 

सोबत डोंगरभाऊ :- महेंद्र गोवेकर, मोहन शेट्टी, मंदार सारंग


काळू नदी

चोंढ्या घाट ते उंबरदरा (घाटघर परिसरातली भटकंती) हा ब्लॉग वाचण्याकरिता या लिंकवर टिचकी मारा
https://samantfort.blogspot.com/2021/02/blog-post.html





Tuesday, March 1, 2022

प्राचीन व्यापारी मार्गाचा मागोवा, पढारवाडी - नाखिंदा घाट - पेठचा किल्ला - आंबिवली लेणी - कोठिंब्याची बारव .

  

तासुबाई डोंगररांगेत असलेल्या वांद्रे, मळेवाडी, पढारवाडी (पदरवाडी) या घाटमाथ्यावरिल गावातून बैलदरा घाट, बैलदरा घाट (पायर्‍यांची वाट), खेतोबा, कौल्याची धार, नाखिंदा घाट अशा अनेक प्राचिन घाटवाटा पेठ किल्ल्यामार्गे कोकणात उतरतात. पेठ उर्फ़ कोथळीगडाची विस्तिर्ण माची ही कोकणातून आणि घाटावरुन येणार्‍या मालाची देवाण - घेवाण , खरेदी - विक्री करण्यासाठी बाजारपेठ होती. या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी कोथळीगडा सारखा सह्याद्रिच्या मुख्य रांगेपासून सुटावलेला, बेलाग किल्ला होता.

प्राचीन व्यापारी मार्ग म्हटला की, त्याचे संरक्षण करण्यासाठी किल्ला, व्यापारी, पांथस्त, जनावरं यांच्यासाठी मार्गावर केलेली पाण्याची सोय, विश्रांतीसाठी लेणी (शैल गृह), वस्तूंच्या देवाण घेवाणीसाठी बाजारपेठ या गोष्टी आवश्यक होत्या. आजच्या नाखिंदा घाटाच्या ट्रेक मध्ये यापैकी कुठल्या गोष्टी दिसतात ते पाहायचे होते व त्याचे GPS Mapping करुन नकाशा बनवायचा होता.

 

पवनचक्क्या, पढारवाडी 

खंडाळा घाटातल्या वाहातूक कोंडीमुळे पहाटे पढारवाडीत पोहोचलो. धरणाच्या सानिध्यात असल्याने थंडी भरपूर होती. स्लिपिंग बॅगमध्ये शिरुन स्थिरस्थावर होईपर्यंत उठायची वेळ झाली होती. नाश्ता करुन डोंगररांगेवर दिसणार्या पवनचक्क्यांच्या दिशेने चालायला सुरुवात केली. पढारवाडी गाव तीन बाजुंनी डोंगराने वेढलेले असून एका बाजूला धरण आहे. गावातून जाणार्या डांबरी रस्त्याने १० मिनिटे चालल्यावर उजव्या बाजूला पायवाट झाडीत शिरली.

मातृवृक्ष ?



डोंगर उतारावरील झाडीत मोठ मोठे वृक्ष होते. नुकतेच "Finding the Mother Tree: Discovering the Wisdom of the Forest" हे "Suzanne Simard" यांचे पुस्तक वाचले होते. अरण्यातील जुन्या जाणत्या विशाल वृक्षांना त्यांनी " मातृवृक्ष " असं नामकरण केले आणि अशा प्रकारचे अनेक वृक्ष अमेरिका आणि कॅनडात शोधून काढले. अनेक पावसाळे, दुष्काळ पाहिलेले हे पुराणवृक्ष म्हणजे जंगलाचा प्राण असतात. प्रकाशसंश्र्लेषणाची प्रचंड क्षमता असलेले हे मातृवृक्ष जमिनीतील कर्ब धरुन ठेवणे, नायट्रोजनचा पुरवठा करणे, पाणी प्रवाही ठेवणे इत्यादी महत्वाची कार्य करुन जंगल नांदत ठेवतात. या वृक्षांच्या मुळावर असलेल्या बुरुशीच्या जाळ्यांनी (Mycorrhizal network) तरुण आणि लहान झाडांशी संपर्क ठेवतात. त्यांना जीवनसत्व, पाणी इत्यादी पुरवतात. तसेच किडं, हवामान बदल इत्यादी संकटांची सूचना जमिनी खालील संपर्क यंत्रणे व्दारे (Wood Wide Web) देतात. (जंगलातील झाडांच्या संपर्क यंत्रणेवर "Fantastic Fungi" ही डॉक्युमेंटरी Netflix वर आहे.) मातृवृक्षांबद्दल सगळ्यांना माहिती दिल्यावर ट्रेक संपेपर्यंत दिसणारे वेगवेगळे वृक्ष पाहुन हे या जंगलातले मातृवृक्ष असतील का यावर आम्ही चर्चा करत होतो.

 

पाण्याची टाकी, पढारवाडी 

पायवाटेने जातांना मध्येच कच्चा रस्ता आडवा आला. पवनचक्क्यांपर्यंत जाण्यासाठी हा रस्ता बनवलेला आहे. इथवर गाडीने येता येत. रस्ता ओलांडल्यावर पायवाट पुन्हा झाडीत शिरली . चढ चढून आम्ही पवनचक्क्यांच्या जवळ पोहोचलो. पवनचक्क्या डोंगराच्या माथ्यावर आहेत. याच पवनचक्क्यांच्या बाजूला डोंगरात एक नेढ आहे, नेढ्याला नाखिंद असेही म्हणतात. या नेढ्यावरुन घाटाला "नाखिंदा घाट" नाव पडल आहे. या पवनचक्क्या आणि नेढ पेठच्या किल्ल्यावरुन स्पष्ट दिसतात.  

(नेढ्याबद्दल अधिक माहिती वाचण्याकरीता "निसर्गाचा अविष्कार चेमेदेव डोंगर आणि बितनगड Offbeat trek to Chemdev & Bitangad" हा लेख वाचा, लेख वाचण्याकरिता लिंकवर टिचकी मारा https://samantfort.blogspot.com/2019/11/blog-post.html)

 

  डोंगरमाथा ओलांडून पवनचक्कीच्या बाजूने खाली उतरल्यावर पाण्याची चार टाकी दिसली. टाक्यांमधल पाणी पिण्यायोग्य नव्हते. टाक्यांजवळ उभे राहिल्यावर खाली दूरवर असणार्‍या पेठ किल्ल्याचे पहिले दर्शन झाले. पायवाट कारवीच्या झुडूपांमधून उतरुन पठारावर आली. लांबलचक पसरलेल्या या पठारावरुन सह्याद्रि आणि कोकणाचा अफ़ाट नजारा दिसत होता. उजव्या बाजूला भिमाशंकर, पदरगड, तुंगी , खालच्या बाजूला खेतोबा दिसत होता. तर डाव्या बाजूला दूरवर ढाकची रांग दिसत होती. समोर खालच्या बाजूला सह्याद्रिच्या मुख्य डोंगररांगेपासून सुटावलेला तरिही मुख्य डोंगररांगेला धारेने जोडलेला पेठ उर्फ़ कोथळीगड किल्ला दिसत होता.

 

पेठ किल्ला

पठारावरुन डावीकडे चालायला सुरुवात केली . या भागात पठाराच्या खालच्या अंगाला एक टाकं आहे असे साईप्रकाश बेलसरे यांच्या ब्लॉगवर वाचले होते, पण ते टाकं काही आम्हाला सापडल नाही.

 

पेठ किल्ला, कौल्याची धार , भिमाशंकर डोंगररांग (उजवीकडे)

पठारावरुन १० मिनिटे चालल्यावर वाट थोडी खाली उतरुन जंगलात शिरली. या वाटेने साधारण पाच मिनिटे चालल्यावर वाटेला एक फ़ाटा फ़ुटला . तिथून सरळ जाणारी वाट कौल्याच्या धारेकडे जात होती, तर खाली उतरणारी वाट नाखिंदा घाटाची होती. कौल्याची धार आणि नाखिंदा घाट दोन्ही वाटा पेठवाडीत उतरतात.  आम्ही नाखिंदा घाटाने दाट जंगलातून खाली उतरायला सुरुवात केली. आमच्या डाव्या बाजूला कौल्याची धार आणि आणि त्याचे दोन्ही कातळ टप्पे दिसत होते. साधारणपणे अर्धातास उतरल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेले पाण्याचे एक टाकं दिसले. हे टाकं सध्या कोरडं पडलेल आहे. या मार्गावर सुरवाती पासून दिसणारी पाण्याची टाकी या व्यापारी मार्गाचे प्राचीनत्व सिध्द करत होती. पाण्याच्या टाक्याजवळ थोडावेळ विश्रांती घेऊन पुढचा टप्पा उतरायला सुरुवात केली

पाण्याची टाकी, नाखिंदा घाट


उतार संपून पेठच्या किल्ल्याच्या पदरात आल्यावर वाट छान वळसे घेत पेठवाडी जवळ आली. इथे शेताच्या बांधावर एक दगडी समाधी पाहायला मिळाली

(समाधी बद्दल अधिक माहिती वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा (https://samantfort.blogspot.com/2019/04/blog-post_4.html )

समाधी

थोड्यात वेळात पेठ माचीवर पोहोचलो. पढारवाडीतून पेठ माचीवर (पेठवाडीत) रमतगमत पोहोचायला आम्हाला दोन तास लागले. तिथल्या स्टॉलवर लिंबू सरबत पिऊन किल्ल्याच्या सर्वोच्च  माथ्याकडे निघालो. पहिल्या उध्वस्त दरवाजाच्या अलिकडे एक सुंदर व्ह्यु पॉईंट आहे. इथून फार सुंदर दृश्य दिसते. नाखिंद, पवनचक्क्या पासून ते भिमाशंकर रांग, पदरगड, तुंगी, मागे सिध्दगड आणि खालच्या बाजूला खेतोबा मंदिर दिसते .


कातळात कोरलेला पायर्‍या 


 














पेठ किल्ल्याचा माथा म्हणजे डोंगरावर असलेली कातळटोपी आहे. यात लेणी , पाण्याची टाकी आणि पेठच्या किल्ल्याचे वैशिष्ट्य असलेल्या, गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेला पायर्‍या आहेत. पायर्‍या चढून गडमाथ्यावर पोहोचण्या अगोदर कातळात कोरलेले एक प्रवेशव्दार आहे. किल्ल्याला या शिवाय दोन उध्वस्त प्रवेशव्दार आहेत. गडमाथ्यावर पाण्याच एक छोट तळ आहे. गडमाथ्यावरुन सर्व घाटवाटा आणि भिमाशंकर ते ढाक पर्यंतचा विस्तृत परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. यावरुन किल्ल्याचे स्थान किती मोक्याचे (महत्वाचे) आहे ते लक्षात येते. या कातळ टोपीला खालच्या बाजूने प्रदक्षिणा घालता येते . यामार्गावर पाण्याची टाकी आहेत. तसेच टेहळणीसाठी खोदेलेली एक गुहा पण आहे. पेठ माची वरुन गडमाथ्यावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.


        पायवाट, डुक्कर पाडा

 किल्ला पाहून पेठ माचीवर परत आलो. किल्ल्यावर येण्यासाठी मुख्य वाट आंबिवली गावातून आहे. याशिवाय डुक्कर पाडा उर्फ़ देवाचा पाडा (जामरुंग) येथून एक वाट किल्ल्यावर येते. या वाटेने यापूर्वी एकदा किल्ल्यावर आलो होतो. किल्ल्यावर कमीत कमी वेळात येणारी ही वाट आहे.  पेठवाडी बाहेर असणारी शेतं ओलांडून १० मिनिटात वाटेला लागलो आणि उतरायला सुरुवात केली. या वाटेवर दाट झाडी आहे. आंब्याचे मोठे मोठे वृक्ष या भागात आहे. त्यामुळे या वाटेला "आंब्याचे पान" असेही म्हणतात. वाट उतरताना डाव्या बाजूला एक ओढा आपली सोबत करत असतो. अर्ध्या तासात आम्ही डांबरी सडकेवर पोहोचलो. इथे "रिच फ़िल्ड" नावाची बंगल्यांची कॉलनी आहे. या कॉलीनीतून गडावर जाणारी पायवाट आहे. डुक्करपाड्यातून गाडीने ६ किलोमीटरवरील चिल्हार नदी काठी असलेल्या आंबिवलीच्या बौध्द लेण्यांपाशी पोहोचलो. चिल्हार नदी काठी असल्यामुळे या लेण्यांना "चिल्हार लेणी" या नावानेही ओळखतात. हा परिसर पुरातत्व खात्याने नितांत सुंदर ठेवला आहे. लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता, नदी पात्रात उतरण्यासाठी घाट बनवलेला आहे.     

चिल्हार नदी

शूर्पारक, कल्याण या बंदरातून आणि कान्हेरी सारख्या धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणावरून कार्ले - भाजे या ठिकाणी जाणाऱ्या व्यापारी मार्गावरील विश्रांतीचे ठिकाण म्हणून हे लेणे चौथ्या शतकाच्या सुमारास खोदण्यात आले होते. पेठ किल्ला आणि बाजारपेठही याच व्यापारी मार्गावर आहे.

आंबिवली लेणी

लेण्याचा परिसर फार सुंदर आहे लेण्या समोरून खालच्या बाजूला एक सुंदर वळण घेऊन चिल्हार नदी वाहते. त्यावर एक बंधारा असून तेथे नदीत उतरण्यासाठी प्रशस्त पायऱ्या ही बांधल्या आहेत. लेण्यांतून समोर भीमाशंकर डोंगररांग आणि त्यातील तुंगी, पदरगड हे किल्ले दिसतात. अशा रम्य ठिकाणी हे लेणे खोदलेले आहे. लेण्यासमोर मोठे प्रांगण आहे. लेण्याचे व्हरांडा आणि दालन असे दोन भाग आहेत. व्हरांडा चार खांबांवर तोललेला असून त्यातील दोन खांब अष्टकोनी आणि दोन खांब सोळा कोनी आहेत. या खांबांचे स्तंभशीर्ष उलट्या ठेवलेल्या घटा सारखे आहेत. त्यावर हर्मिके सारखी रचना आहे. व्हरांड्यात दोन बाजूला दोन दगडी बाकडे आहेत.


टाकं, आंबिवली लेणी

व्हरांड्यातून आतील दालनात जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत. पण त्यातील एक दरवाजा जाळी लावून बंद करण्यात आला आहे. आतील दालन प्रशस्त असून त्याच्या तीन बाजूंच्या भिंती प्रत्येकी चार खोल्या अशा एकूण बारा खोल्या खोदलेल्या आहेत. सध्या यापैकी काही खोल्यांमध्ये गणपती, श्रीकृष्ण इत्यादी देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. लेण्याच्या उजव्या बाजूला थोड्या वरच्या बाजूस पाण्याची दोन टाकी खोदलेली आहेत. त्यातील एका टाक्यात बारमाही पाणी असते.

 

बारव, कोठिंबे

दगडी ढोणी


आंबिवलीची बौध्द लेणी पाहून ८ किलोमीटर अंतरावर असणार्‍या कोठींबे गावात, रस्त्यालगत असलेल्या पुरातन बारव पाशी (Step Well) पोहोचलो. कर्जत मार्गावर रस्त्या लगत असलेल्या या आयताकृती विहिरीत उतरण्यासाठी पाय‌र्‍या आहेत. या विहिरीत बारमाहि पाणी असते. विहिरीच्या बाजूला एक दगडी ढोणी आहे.

 

GPS ने रेकॉर्ड केलेली व्यापारी मार्गाची भटकंती, नकाशा  :- महेंद्र गोवेकर


पढारवाडीच्या डोंगरावर असलेली पाण्याची टाकी  - नाखिंदा घाटातील पाण्याची टाकी -  व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी असलेला  पेठ किल्ला - आंबिवली लेणी (शैलगृह) व्यापार्‍यांसाठी असलेले विश्रांती स्थान - कोठिंब्याची बारव या प्राचीन व्यापारी मार्गावरील महत्वाच्या खुणांची नोंद घेत आजच्या ट्रेकची सांगता झाली.    


 जाण्यासाठी :-

पढारवाडी :- तळेगाव MIDC तून पढारवाडीला जाणारा रस्ता आहे. अंतर अंदाजे ५० किलोमीटर आहे

डुक्करपाडा (देवाचा पाडा) जामरुंग :- कर्जत रेल्वे स्टेशन ते डुक्करपाडा हे अंतर अंदाजे ३० किलोमीटर आहे. (आंबिवलीच्या पुढे किलोमीटर) कर्जतहून डुक्करपाड्याकरीता टॅक्सी मिळतात. डुककरपाड्यात "रिच फ़िल्ड" नावाची बंगल्यांची कॉलनी आहे. या कॉलनीतून गडावर जाणारी पायवाट आहे.

 


पढारवाडी ते पवचक्की - अर्धातास

पवनचक्की ते नाखिंदा घाट १५ मिनिटे

नाखिंदा घाट ते पेठ माची सव्वा तास

पेठ माची ते गडमाथा अर्धा तास

पेठ माची ते डुक्करपाडा पाऊण तास 

 


घाटवाटांवरिल इतर ब्लॉग :-

1) रडतोंडी घाट - पार घाट - प्रतापगड - मधुमकरंदगड - हातलोट घाट, जावळीच्या खोर्‍यातील भटकंती (Radtondi ghat, Par ghat, Pratapgad, Madhumakrandgad, Hatlot ghat) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा. 


2) चोंढ्या घाट ते उंबरदरा (घाटघर परिसरातली भटकंती, One day trek near Mumbai, Nashik) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.
डुक्करपाडा वाटेवरुन, पेठ किल्ला


Photos by :- Amit Samant, Mahendra Govekar, Ketaki Mahajan © Copy right

Map :- Mahendra Govekar © Copy right