Sunday, February 7, 2021

चोंढ्या घाट ते उंबरदरा (घाटघर परिसरातली भटकंती) One day trek near Mumbai, Nashik

उंबरदरा

अहमदनगर जिल्ह्यातील घाटघर हे घाटमाथ्यावरचे प्राचीन गाव. सध्याच्या ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले हे गाव प्राचीन व्यापारी मार्गावर आहे. या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या अलंग - मदन - कुलंग या दुर्ग त्रिकुटापैकी अलंगच्या कुशीत वसलेले मुळ गाव धरणामुळे आता विस्थापित झालेले आहे. पूर्वीच्या काळी व्यापा‍र्‍यांचे तांडे सह्याद्रीची डोंगररांग पार करुन घाटघर गावात विश्रांतीसाठी थांबत असत. त्यासाठी प्राचीन काळापासून आजपर्यंत चोंढ्या घाट (पायथ्याचे गाव :- चोंढ्या), घाटनदेवी घाट (पायथ्याचे गाव :- मेट), निसणीची वाट, नळीची वाट (पायथ्याचे गाव :- चोंढ्या), ऊंबरदरा (पायथ्याचे गाव :- चोंढ्या) या चार घाटवाटा अस्तित्वात आहेत. 

चोंढ्या घाट

आसनगाव मार्गे शहापूरहून देहेणे गाठले . देहेणे गावाच्या पुढे रस्त्याला दोन फाटे फुटतात. एक आजोबा डोंगराकडे जातो, तर दुसरा चोंढ्या धरणाकडे जातो. चोंढ्या गाव पार केले की घाट सुरु होतो. या रस्त्यालाही दोन फाटे फुटतात. एक धरणाच्या भिंतीकडे जातो, तर दुसरा रस्ता वर चढत स्वीच यार्डकडे जातो. नळीची वाट आणि उंबरदऱ्याची वाट या घाटघरला जाणार्‍या वाटा या स्वीच यार्डच्या आसपास उतरतात. देहेणे गावापासून धरणा पर्यंतचे अंतर ७ किलोमीटर आहे तर चोंढ्या गावापासून ५ किलोमीटर आहे. आम्ही आमची चढाई चोंढ्या घाटातून करणार होतो. त्याची नक्की सुरुवात कुठे होते हे आम्हाला माहिती नव्हते . धरणाच्या वरच्या बाजूला आल्यावर रस्त्याच्या बाजूला पार्कींगसाठी भरपूर मोकळी जागा ठेवलेली दिसली. येथून खाली धरणाची भिंत, त्या मागचा जलाशय आणि मागे आकाशात अंगठा उंचावलेले शिपनूर शिखर दिसत होते. शिपनूरपासून सुरु झालेल्या डोंगरांगेने जलाशयाला वेढा घातला होता. जलाशयाच्या स्तब्ध पाण्यावर या सगळ्याचे पडलेले प्रतिबिंब सकाळच्या कोवळ्या उन्हात एखाद्या सुंदर चित्रासारखेच दिसत होते .  आम्ही उभे असलेल्या या "डॅम व्ह्यू पॉईंट " (स्थानिक लोक याला एम (M) पॉईंट म्हणतात) पासून एक पायवाट धरणाच्या भिंतीपर्यंत गेली होती. या भिंतीपर्यंत जाऊन तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांना वाट विचारावी म्हणून खाली उतरुन गेलो. पण तेथे कोणी नव्हते. पुन्हा गाडी पाशी येउन डोंगराच्या दिशेला थोडी शोधाशोध केल्यावर एक पायऱ्याची वाट दिसली. हीच चोंढ्या घाटाची वाट होती. रितसर वाटेला लागलो. घाटवाटेच्या पहील्या १०० एक पायऱ्या व्यवस्थित सिमेंट मध्ये बांधून काढलेल्या आहेत. या भागात दोन धरण आहेत. घाट माथ्यावर घाटघर धरण आणि कोकणात चोंढ्या धरण. घाटघर धरणात साठलेले पाणी दिवसा पाईपां मार्फत चोंढ्या धरणात आणले जाते . त्यावर टर्बाईन्स फिरवून वीज निर्मिती केली जाते. रात्रीच्या वेळी वीजेची मागणी घटल्यावर, हिच तयार होणारी वीज वापरुन चोंढ्या धरणातील पाणी पंपाव्दारे पुन्हा घाटघर धरणात भरले जाते. अशाप्रकारे पाण्याचे एका धरणातून दुसऱ्या धरणात दिवस रात्र चक्र चालू असल्याने दोन्ही धरणांच्या पाणी साठ्याच्या पातळीत दिवसा व रात्री फरक पडतो .


भातखळा

पायऱ्या संपल्यानंतर आम्ही एका मोठ्या वीजेच्या टॉवर खाली आलो. धरणाच्या पाण्यावर तयार झालेली वीज ग्रीडशी जोडण्यासाठी हे टॉवर्स उभारलेले आहेत. टॉवरच्या पुढे पायवाट एका मोकळ्या पठारावर आली. समोरुन घाटवाट उतरुन एक गावकरी येत होता. त्याच्याकडून ही वाट बरोबर असल्याची खात्री केली. गावकरी या वाटेने तासभरात घाटघरला पोहोचतात असे त्याने सांगितले. आम्ही उभे होतो. त्या पठाराला  "भातखळा" म्हणतात असेही त्याने सांगितले . अशा घाटवाटांवर गावकऱ्यांचे नेहमीचे विश्रांतीचे टप्पे असतात आणि त्यांना स्थानिक नावही असतात. जिथे दम खाण्यासाठी, थोडा विसावा घेण्यासाठी थांबतात. अशा ठिकाणी बऱ्याचदा एखादा डेरेदार वृक्ष आणि बसण्याजोगा एखादा खडक तरी नक्कीच असतो.  चोंढ्या धरणाच्या जागी गाव असताना या भागात भात शेती केली जात होती म्हणून हा "भाताचा खळा" . याचा पुढचा स्टॉप "आंब्याचा मोढा" आणि त्यानंतरचा "म्हसोबा" हेही त्याच्याकडून कळले. तिथे फोनची रेंज होती. त्यामुळे घाटघर मधल्या एकनाथला फोन केला . दुपारचे जेवण त्याच्याकडे सांगितले होते आणि उंबरदर्‍याच्या वाटेने तोच आम्हाला खाली घेउन येणार होता. एकनाथ म्हसोबा जवळ भेटतो बोलला . 

Shipnur , Ajoba from Chondya ghaat
शिपनुर-आजोबा-चोंढ्या धरण

पठार पार करुन दाट झाडीत शिरलो. वाट मळलेली होती. गप्पा मारत, रमतगमत चढत होतो. आता शिपनूरच्या मागे आजोबाचे शिखर दिसत होते. तासाभरात म्हसोबापाशी पोहोचलो . येथे एका अनघड दगडाला शेंदूर लावलेला. त्या ठिकाणी उदबत्यांची पाकीटे. दिवे, माचीसचे बॉक्स पडलेले होते. म्हसोबाच्या मागच्या बाजूला असलेल्या खड्कावर एका झाडाच्या मनगट एवढ्या मुळाने वेटोळा घातलेला होता . त्यावर या उघड्या आभाळा खालच्या देवळाची घंटा बांधलेली होती. घाटवाटांवर प्रवास सुखकर आणि निर्धोक व्हावा यासाठी अशाप्रकारचे अनघड दगडांचे देवी देवता स्थापन केलेले पाहायला मिळतात. आधुनिक घाट रस्त्यांवरही छोटी देवळं पाहायला मिळतात.    

म्हसोबा 

एकनाथने म्हसोबासमोर अगरबत्ती लावली. म्हसोबा पासून तीन वाटा फ़ुटतात.  सरळ जाणारी वाट घाटघर गावात जात होती. उजवीकडे जाणारी वाट कोकणकड्याकडे जात होती आणि डावीकडे जाणारी वाट म्हसोबाच्या बाजूने पाण्याकडे जात होती. डावीकडच्या वाटेने थोडे उतरुन गेल्यावर समोर डोंगराचा कातळकडा उभा ठाकला होता. याठिकाणी कातळात चर खोदून एक छोटासा खड्डा बनवलेला होता. कातळातून झिरपणारे पाणी चरातून या खड्ड्यात जमा होईल अशी योजना होती. पण जानेवारीतही  याठिकाणी पाणी नव्हते, पण ठिकाण सुंदर होते.  


पुन्हा म्हसोबापाशी येऊन उजवीकडील प्रशस्त वाट पकडली या वाटेवर कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. आता धरणात बुडालेल्या मुळ घाटघर गावाकडे जाणारी ही प्राचीन वाट होती. यावाटेने पाच मिनिटे चढून गेल्यावर पठारावर पोहोचलो. याठिकाणी पाण्याची दोन टाकी आहेत. एक कड्या लगत आहे. दुसरे त्याच्या थोडे वऱच्या बाजूला आहे. याठिकाणाहून मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येत होता. पाठीवरच्या सॅक उतरवून सर्वजण समोरचा नजारा पाहात बसलो. कड्यावर काही गावकरी बायका आणि पुरुषही विखरुन बसले होते. त्यांनाही भर उन्हात हा नजारा बघत बसलेले बघून आश्चर्य वाटले. कारण डोंगर, दर्‍या, निसर्ग या त्यांच्या नेहमीच्या जगण्यातल्या गोष्टी असल्यामुळे त्यांना आपल्या शहरी लोकांसारखे अप्रुप नसते. या लोकांचे एकनाथकडे कौतुक केल्यावर तो बोलला काही नेटवर्कची रेंज इथेच मिळते त्यामुळे मोबाईलवर बोलायला गावातले लोक इथपर्यंत येतात.    

पाण्याची दोन टाकी 



पठारावरुन गावची वाट धरली. वाटेत सुंदर जांभळ्या, गुलाबी रंगांच्या छोट्या फ़ुलांच्या गुच्छांनी लगडलेली झाडं दिसत होती. त्या फ़ुलांचा सडा खालच्या कातळावर पडून तोही जांभळा झाला होता. गावकरी या झाडाला करप या नावाने ओळखतात. हे अंजनाचे (Memecylon umbellatum) झाडं होते. त्याची सुंदर फ़ुलं बघुन गोविंदाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवल्या.


अंजन 

ऱाकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा

नाजुक देशा, कोमल देशा , फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा

बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा !!


अंजनाच्या कळ्या 

Memecylon umbellatum


एक उंचवटा चढून झाडीतून बाहेर आलो. गावातल्या घरांच्या पार्श्वभूमीवर समोर अलंग - मदन - कुलंगचे दुर्ग त्रिकुट उठून दिसत होते. 

अलंग - मदन - कुलंग

एकनाथच्या सारवलेल्या अंगणात "सॅका" टाकून थेट जेवायला बसलो . भाकरी पिठले , चटणी , कांदा अशा गावरान मेन्यूवर यथेच्छ आडवा हात मारुन अंगणात आडवे झालो . अशा वेळी निघणाऱ्या जुन्या ट्रेकच्या आठवणी , पुढच्या अनेक ट्रेकचे हवेतल प्लानिंग त्यावर चर्चा झाली . भर दुपारी डांबरी सडकेवर येउन कोकणकड्याच्या दिशेने वाटचाल चालू केली . 


घाटघर धरणाच्या जलायशयाच्या बाजूने जाताना एकनाथने मुळ गावाची जागा दाखवली . रात्री पंपिंग करुन खालच्या धरणातले पाणी वरच्या धरणात कुठपर्यंत चढते तेही दाखवले. मुख्य रस्ता सोडून दाट झाडीतल्या पायवाटेने इरीगेशन डिपार्टमेंटच्या इमारतीना वळसा घालून कोकणकड्यावर पोहोचलो . तेथे कड्यावर सुरक्षेसाठी लांबच्या लांब उंच लोखंडी ग्रील बसवलेले आहे . त्यामुळे तेथून लगेच काढता पाय घेतला आणि पुढे उंबरदरा पॉइंटच्या दिशेने निघालो . वाट दाट झाडीतून होती . उंबरदरा पॉईंटच्या अगोदर वाट खाली एका छोट्याश्या घळीत उतरली.  तेथे एका खाचेत पाण्याचा झरा अचानक प्रकट झाला होता. त्या वाहात्या थंडगार पाण्याने  बाटल्या भरुन घेतल्या . 

झरा

एक चढ चढून गेल्यावर उंबरदरा पॉईंट पाशी पोहोचले येथे  लोखंडी पाईपांचे रेलिंग बसवलेले होते . तेथून डोंगराच्या बेलाग कड्यामधील घळीतून खालचे धरण दिसत होते. ऱेलींग ओलांडून पायवाटेला लागलो . उंबराच्या दाट झाडीतून बाहेर आलो आणि दोन्ही बाजूला सरसरुन आकाशाला भिडलेले सरळसोट कातळकडे . त्यावरुन वर्षानुवर्षे निखळलेल्या खडकांची खालपर्यंत परसलेली रास त्यातून खळखळाट करत वहाणारे पाणी आणि कड्यांच्या या रचनेमुळे वहाणारा भणाणणारा वारा . सगळच अचंबित करणार होते . कितीतरी वेळ आम्ही सह्याद्रीचे हे रुप अनुभवत तिथेच थांबलो होतो. सांदण, हरिशचंद्र गडाच्या नळीच्या वाटे  सोबत अशा अनेक वाटा फिरुन झाल्या होत्या, पण सह्याद्री प्रत्येक वेळी वेगळच पण विलोभनीय रुप दाखवत असतो . माझ्या मते तरी एका वाटेची तिथल्या रचनेची , तिथून दिसणाऱ्या दृश्याशी, तिथल्या हवेतल्या गंधाशी दुसऱ्या ठिकाणाशी तुलना करु नये . प्रत्येकाचा बाज वेगळाच असतो.

उंबरदरा 



आमची पावलं खिळली असली तरी एकनाथ पार खाली जाऊन आमची वाट बघत उभा होता . आम्हीही निघालो .दृश्य कितीही मोहक असले तरी या दगडातून उतरताना शेवटी शेवटी जीव मेटाकुटीला येतो हे अनुभवाने माहिती होते . उंबर दऱ्याच्या घळीतून उतरायला सुरुवात केल्यावर १० मिनिटात मोकळ्यावर आलो . कातळभिंती थोड्या दूर गेल्या . हलणारे दगड , त्या दगडातून वहाणारे पाणी , दगडांवर साठलेले शेवाळे या सगळ्यांना सांभाळत खाली उतरत होतो . आधाराला मधे मधे उगवलेली आणि तग धरून असलेली उंबराची झाड होती . या उंबरांच्या झाडांमुळे या ठिकाणाला उंबरदरा नाव मिळाले आहे .  खरतर ही  घाटवाट नसून ओढ्याची वाट होती.  त्यात २६ जुलै २००६ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे या वाटेवर अनेक दरडी कोसळल्या आणि गावातल्या लोकांनी ही वाट वापरणे बंद केले.
 
बिकट वाट

उतरायला सुरुवात केल्यावर साधारणपणे अर्ध्या तासात आम्ही अशाच एका मोठ्या खडकापाशी आलो . वरुन पडलेल्या या शिलाखंडाने पुढे जाणारी वाट अडवलेली होती . त्यावर चढून जाऊन विरुध्द बाजूने उतरणे जवळ जवळ अशक्य होते . पण या ठिकाणी खडकाच्या खाली जेमतेम एक माणूस उतरु शकेल एवढीच जागा होती . त्यातून पाणी वाहात होते . एकनाथने त्यावर पडलेले दगड बाजूला केले आणि त्याने त्या चिंचोळ्या तोंडाच्या छिद्रात उतरुन आम्हाला कुठे पाय ठेवायचा कसे उतरायचे याचे प्रात्येक्षिक दाखवले. वाहाते पाणी , शेवाळलेले दगड आणि जेमतेम एक माणूस जाऊ शकेल एवढी जागा यामुळे प्रत्येकाला कोणाचा आधार न घेता उतरायचे होते . साधारणपणे दिड पुरुष उंचीच्या या छिद्रात उतरुन आम्ही एक एक करुन दुसऱ्या बाजूने बाहेर आलो . 

छिद्राचे तोंड


दुसरी बाजू


व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणवर टिचकी मारा.

या थरारक अनुभवा नंतर  पुन्हा दगडांची वाट उतरायला सुरुवात केली . एके ठिकाणी  ओढ्याने उंचावरून उडी मारली होती . त्यामुळे पुन्हा पुढची वाट बंद झाली होती . मग ओढ्याच्या बाजूने जंगलातून जाणाऱ्या घसार्‍याच्या वाटेने उतरायला सुरुवात केली . काही वेळाने पुन्हा ओढ्यात उतरुन दगडगोट्यातून चालायला सुरुवात केली . उतरायला सुरुवात केल्यापासून साधारणपणे दिड तासाने ओढ्याची वाट सोडून उजव्या बाजूच्या डोंगरावर चढायला सुरुवात केली . उंबरदरा पासून येणारा हा ओढा पुढे चोंढ्या धरणाच्या जलाशयाला जाऊन मिळतो.

चोंढे धरण

डोंगरावर जाणारी पायवाट पकडून १०  मिनिटात स्वीच यार्ड पाशी पोहोचलो . येथे डोंगरात इरीगेशन डिपार्टमेंटने एक मोठा बोगदा खोदलेला आहे . हा बोगदा ग्रील लावून बंद केलेला असतो . तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी परवानगी दिली तरच बोगद्यातून जाता येते . अन्यथा बोगदा असलेला डोंगर चढून रस्त्यावर उतरावे लागते . बोगद्याच्या पुढे  डांबरी रस्त्याने १५ मिनिटे चालल्यावर आम्ही ट्रेक चालू केला त्या ठिकाणी  M पॉईंटवर पोहोचलो .  उंबरदरा उतरायला आम्हाला दोन तास लागले होते . एकनाथचा निरोप घेतला तो चोंढ्या घाटाने घाटघरला निघाला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो .


चोंढ्या घाट - उंबरदरा हा ट्रेक एक दिवसाचा ट्रेक आहे . चोंढ्या घाट ट्रेक वर्षभरात केंव्हाही करता येइल . उंबरदरा मात्र पाणी ओसरल्यावर डिसेंबर नंतर मे महिन्यापर्यंत करता येइल . उंबरदरा उतरण्यासाठी गाईडची आवश्यकता आहे .


चोंढ्या धरण - चोंढ्या घाट - घाटघर :- १ ते १.५ तास


घाटघर - उंबरदरा पॉइंट :- अर्धा तास


उंबरदरा पॉइंट - उबंरदरा घाट - चोंढ्या धरण :- २ ते २.५ तास

 

GPS ने रेकॉर्ड केलेली चोंढ्या घाट - घाटघर- उंबरदरा भटकंती, नकाशा  :- महेंद्र गोवेकर



शिपनुर

Photos by :- kaustubh & Amit Samant  © Copy right

Video by :- Pallavi 

Map :- Mahendra Govekar © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 


रडतोंडी घाट - पार घाट - प्रतापगड - मधुमकरंदगड - हातलोट घाट, जावळीच्या खोर्‍यातील भटकंती हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

https://samantfort.blogspot.com/2020/01/blog-post.html

Saturday, January 23, 2021

फ़ुलपाखरांच्या रानात (congregation of Butterflies)


Butterfly
congregation of Butterflies

जंगलात शिरलो तेंव्हा नुकतेच झुंजूमुंज होत होते. जंगलातल्या शांततेत झाडांच्या पानांवरुन खाली पाचोळ्यावर पडणार्‍या दवा़च्या थेंबांचा आवाज येत होता. मध्येच दिवस थार्‍याकडे परतणार्‍या पिंगळ्य़ाचा आवाज जंगलातली शांतता भेदून गेला. हवेतील गारवा, जमिनीवर पडणार्‍या दवाच्या सुगंधात, अपरिचित फ़ुलांच्या सुगंध मिसळुन तयार झालेल्या धुंद वातावरणात, अनेक चढ - उतार, आडवे येणारे ओहोळ पार करत जंगलात बरेच आत शिरलो. 


पायवाट सोडून खाली दिसणार्‍या ओढ्याच्या कोरड्या पात्राकडे उतरायला सुरुवात केली. सूर्य उगवला असला तरी या खोलगट भागात अजून प्रकाश पोहोचला नव्हता. या उतारावर मोठे मोठे वृक्ष होते.  त्यांनी जमिनीवर त्यांच्या फ़ांद्यांची छत्री धरलेली होती. फ़ांद्यांवरुन सरळसोट खाली आलेल्या वेलींवर मातकट रंगाची अनेक पाने लगडलेली होती .  जमिनी पासून अंदाजे ५ ते ६ फुटावर भरपूर पाने दिसत होती आणि त्याखाली जमिनी पर्यंत  पाने विरळ झालेली होती.  ज्या तज्ञ मित्रासोबत इथपर्यंत आलो होतो . त्याने जवळ जाउन पाहायला सांगितले .  जवळ गेल्यावर जे दिसले त्याने हरखुन गेलो . त्या  वेलीवर  Striped Tiger (Danaus genutia Cramer) "ढाण्या कवडा" जातीची असंख्य फुलपाखरे बसलेली होती . आजूबाजूला निरखून  पाहायला सुरुवात केल्यावर आजूबाजूच्या वेलींवर, झाडांवर झुपक्यानी फुलपाखरे लगडलेली होती .  त्या परिसरात अशी शेकडो फुलपाखरे झाडांवर वेलींवर बसलेली होती. याला फुलपाखरांचे "congregation" (संमेलन/ एकत्रीकरण) म्हणतात.



व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणवर टिचकी मारा
(सावली सोडून, उन अंगावर येईल अशी बसलेली फ़ुलपाखरे)

Striped Tiger  Butterfly (Danaus genutia Cramer)
Striped Tiger (Danaus genutia Cramer) 

दरवर्षी हिवाळ्याच्या महिन्यात स्थलांतरासाठी फ़ुलपाखरे येथे जमा होतात. फ़ुलपाखरांचे आयुष्य पाहाता दरवर्षी या ठिकाणी जमा होणारी पिढी नवीन (पुढची पिढी) असते. मग या जागेचा पत्ता या फ़ुलपाखरांना कसा मिळतो ? स्थलांतर करुन कुठे जायचे हे त्यांना कसे समजते?  दिशांचे ज्ञान कसे होते ? असे अनेक प्रश्न पडत होते.

"ढाण्या कवडा"

फुलपाखरांचे असे संमेलन (congregation) दोन कारणांसाठी भरते . १) स्थलांतरासाठी :-  यात एकाच जातीची फुलपाखरे स्थलांतर करण्यापूर्वी एका जागी जमा होतात . काही दिवस तेथे राहातात आणि मग एकत्र स्थलांतर करतात . याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे "मोनार्क" फुलपाखरे. कॅनडा आणि अमेरीकेच्या उत्तर भागातून ३००० किलोमीटरचे अंतर कापून ही फुलपाखरे मॅक्सिकोत जातात. दररोज ८० किलोमीटर अंतर कापत, दोन महिन्यांनी ही फ़ुलपाखरे ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. त्यासाठी सुर्याचे स्थान, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र यांचा फ़ुलपाखरांना उपयोग होतो.  हलक्या वजनाचे, एवढ्या कमी इंधनात चालणारे इंजिन बनवणे अजून विज्ञानाला सुध्दा शक्य झालेले नाही ( डिस्कव्हरी , नॅशनल जिओग्राफि इत्यादी चॅनलवर मोनार्क फुलपाखरांच्या स्थलांतरावर  डॉक्युमेंटरीज आहेत.) . अती थंडी , पाउस,  इत्यादी कारणांसाठी फुलपाखरे स्थलांतर करतात .

२) मड पडलिंग (Mud puddling)  :- फुलपाखरांना क्षारांची, खनिजांची आवश्यकता असते . बऱ्याचदा चिखलात फुलपाखरे मोठ्या प्रमाणावर एकत्र बसलेली दिसतात. याला मड पडलिंग (Mud puddling) म्हणतात.  फ़ुलपाखरे जमिनीतून कॅल्शियम, फ़ॉस्फ़ेट, सोडीयम, नायट्रोजन इत्यादी खनिजे (Minerals) शोषून घेतात आणि मिलनाच्या वेळी मादीला भेट देतात. मड पडलिंगसाठी अनेक जातींची फुलपाखरे एकाच ठिकाणी जमलेली पाहायला मिळतात.

Mud puddling

याशिवाय फ़ुलपाखरे एकत्र येऊन स्थलांतर (Aggression of butterflies) करण्याचे कारण म्हणजे दुष्काळ, खाण्याची अनुपलब्धता. फ़ुलपाखरांच्या अळ्यांनी मोठ्या संख्येने, मोठ्या प्रमाणावर अन्न फ़स्त केल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे अन्नाची अनुपलब्धता झाल्यास अळ्यांपासून जन्माला आलेली एकाच जातीची फ़ुलपाखरे एकत्र स्थलांतर करतात.    



फुलपाखरू थंड रक्ताचे असल्याने सुर्याची उष्णता मिळाल्या शिवाय त्याचे चलनवलन चालू होणार नव्हते . त्यामुळे आमच्या समोरची सर्व फुलपाखरे निश्चल होती आणि त्यामुळेच ती त्या वेलींशी , झाडाशी आणि वातावरणाशी समरुप झाली होती . तज्ञ मार्गदर्शक सोबत नसता तर या झाडांच्या बाजूने जाऊनही आम्हाला ती दिसली नसती .


फुलपाखरां प्रमाणे आम्हीही सूर्यप्रकाश जंगलाच्या त्या खोलगट भागात यायची वाट बघत होतो . हळूहळू सूर्य किरणे वृक्षांच्या पानामधील फटीतून वेलींवर पडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फुलपाखरे जिथे जिथे बसली होती त्याच भागात बरोबर सूर्याची किरणे पहिल्यांदा पोहोचली . वेलीवरच्या ज्या भागात सावली होती तेथे एकही फुलपाखरू बसलेले नव्हते, ती मधली जागा रिकामी ठेवलेली होती आणि जेथे थेट सूर्यप्रकाश येत होता त्या भागात फुलपाखरांची दाटी होती. जेथे पानातून गाळून आलेले उन्हाचे कवडसे पडले होते त्या भागात एखाद दुसरे फ़ुलपाखरु बसलेले होते.  दुसरी लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे सगळी फुलपाखरे झाडाच्या, वेलींच्या पूर्वेकडील भागांवरच बसली होती. जेणेकरून सूर्यापासून लवकरात लवकर उर्जा मिळेल आणि त्यांचे भक्षक सजग होण्या आधी त्यांना अन्न गोळा करण्यासाठी उडून जाता येइल .

congregation of Butterflies

सुर्यप्रकाश पडल्यावर काही काळाने वाळक्या पानांसारख्या दिसणाऱ्या फुलपाखरांमध्ये "जान" आली. त्यांनी हळूहळू पंख उलगडायला सुरुवात केली . त्यामुळे त्या झाडांना, वेलीना असंख्य रंगीबेरंगी पंख फुटल्यासारखे वाटायला लागले .... सुरुवातीला एक दोन फुलपाखरांनी आपला रातथारा सोडून हवेत गिरकी मारली आणि अचानक असंख्य फुलपाखरे आकाशात उडाली...... आकाशात अनेक रंगांची उधळण झाली.  एक अनुपम्य सोहळा याची देही याची डोळा पाहायला मिळाला .

congregation of Butterflies
congregation of Butterflies


जंगल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर फक्त  वाघ , बिबट्या , हत्ती असे मोठे प्राणी येतात . त्यांना पाहाण्यासाठी लोक जीवाचा आटापिटा करतात.  खरतर जंगलातील परिसंस्थेत किटकां पासून वाघांपर्यंत सर्वानाच सारखे महत्व असते . फुलपाखरू या परिसंस्थेमधील महत्वाचा घटक आहे . फुलांचे परागीभवन करण्यात फुलपाखरांचा मोठा वाटा आहे . पक्षांचे आणि काही सरपटणाऱ्या प्राण्यांचे ते भक्ष्यही आहे . वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलांचा , गवताळ कुरणांचा होणारा ऱ्हास , किटकनाशकाचा अनिर्बंध वापर  यामुळे निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचा घटक धोक्यात आलेला आहे .सह्याद्रीत फ़ुलपाखरे एकत्र जमण्याचा काळ हिवाळ्याचा असतो. हवामान बदलामुळे हल्ली त्यावेळीही पाऊस पडतो. या हवामान बदलाचाही फ़ुलपाखरांच्या एकत्रीकरणावर आणि स्थलांतरावर परिणाम होत असणार.



सरकारी पातळीवरही शिकारी प्राण्यांचा अधिवास टिकवण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जातात . पण दरवर्षी एकाच ठिकाणी जमून स्थलांतर करणार्‍या फ़ुलपाखरांचा अभ्यास अपवादानेच भारतात झालेला आहे. दक्षिण भारतातील फ़ुलपाखरांचा पश्चिम घाट ते पूर्वघाट स्थलांतर या विषयावर डॉ. कृष्णमेघ कुंटे यांचा शोध निबंध आणि मिलिंद दिगंबर पाटील यांचा सह्याद्रीतील (कोकणातील) फ़ुलपाखरांचे स्थलांतर यावरील शोधनिबंध आंतरजालावर उपलब्ध आहेत. अशा प्रकारे केलेले शास्त्रीय संशोधन आपल्याला फ़ुलपाखरांच्या अधिवासाबद्दल अजून माहिती देतील आणि ते अधिवास वाचवण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील.


फ़ुलपाखरांचे स्थलांतर


Photos by :- kaustubh & Amit Samant  © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900 

अदृश्य किटकांच्या जगात (Leaf Mining Worm, Bag Worm, Spittle bugs or Frog hopper) हा किटकांवरील ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा...


Tuesday, November 24, 2020

सिंधुदुर्गावरील चिन्हाचा मागोवा (अपरिचित सिंधुदुर्ग भाग -२) Undiscovered Sindhudurg Part-2

 गावाला गेलो की, सिंधुदुर्गावर एक चक्कर ठरलेली असते. कोव्हीडच्या दहशतीमुळे किल्ल्यावर जाण्यासाठी तुरळक माणसे बोटीत होती. किल्ला बघायला वेळेचेही बंधन नव्हते. किल्ल्याच्या धक्क्याला बोट लागल्यावर तडक शिवराजेश्वर मंदिर गाठले. महाराजांना वंदन करुन थेट उत्तरेकडील तलाव गाठला तेथून फ़ांजीवर चढून किल्ल्याच्या प्रवेशव्दारा पर्यंत रमतगमत निघालो. मध्यंतरी पूरातत्व खात्याने किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. पण या भागात तटबंदीची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे तटबंदीतले आतले दगड उघडे पडलेले आहेत.

दगडावरील चिन्ह, सिंधुदुर्ग

अशाच एका दगडावर एक क्रॉस आणि त्याखाली मासा कोरलेला दिसला. बाजूला एक सूटा दगड उलटा पडलेला होता त्यावर त्याच चिन्हाचा छाप उमटलेला होता . या क्रॉस आणि माशाचे कोरीव काम एकदम ढोबळ होते. यापूर्वी माझ्या पाहाण्यात तरी हा दगड आणि त्यावरील चिन्ह आले नव्हते. पण यात क्रॉस असल्याने या चिन्हाचा संबंध ख्रिश्चन धर्माशी असणार हे उघड होते. त्या दृष्टीने शोधाशोध केल्यावर ख्रिश्चन धर्माच्या सुरुवातीच्या काळात उदयास आलेले चिन्ह “ixoye” = या ग्रिक शब्दाचा उच्चार इक्फ़ीस आणि अर्थ (Fish) मासा असा सापाडला. 



“ixoye” हा ग्रिक शब्द पाच अक्षरांपासून बनलेला आहे. 

· I = Iesous (Iasoos) is Jesus.  The first letter is ‘iota’, Ιησους.  हेसुस - जीजस

· X = Xristos (Christos) is Christ.  The first letter is ‘chi’, Χριστóς. ख्रिस्टोस = ख्राईस्ट 

· Θ = Theou (Theou) is God.  The first letter is ‘theta’, Θεοῦ. ऑफ़ गॉड

· Y = Yios (Huios) is Son.  The first letter is ‘upsilon’, Υἱός. हुयॉस सन ऑफ़

· E = Sotare (Sotare) is Savior.  The first letter is sigma’, Σωτήρ. सोटर = सेव्हिअर

(जीजस ख्राईस्ट सन ऑफ़ गॉड इस अवर सेव्हिअर ) Jesus Christ, Son of God is our savior




खिश्चन धर्माच्या सुरुवातीच्या काळात रोमन राज्यकर्ते, ज्यू आणि धर्ममार्तंडांपासून ख्रिस्त धर्म पाळणार्‍यांना धोका होता, त्यांना शिक्षा होत असे. त्यामुळे अनोळखी माणुस ख्रिश्चन आहे की नाही हे ओळखण्यासाठी माशाचे चिन्ह वापरले जात असे. हे चिन्ह वापरण्यास सोपे आणि समजण्यासही सोपे होते. यासाठी एकजण हवेत बोटाने माशाचा अर्धा आकार काढत असे दुसरा माणूस जर ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारा असेल तर तो हवेत बोटाने माशाचा उरलेला अर्धा आकार काढत असे. त्यातून समान्धर्मियांची ओळख पटत असे. त्याचप्रमाणे ख्रिश्चन धर्मावर विश्वास असणार्‍या लोकांना एकत्र भेटण्याची जागा दर्शवण्यासाठी या माशाच्या चिन्हाचा उपयोग केला जात असे. ख्रिश्चन धर्म स्थिरावल्यावर या चिन्हाचा वापर चर्चेसच्या बांधकामातही केला गेला. या चिन्हात मासा उजवीकडे , डावीकडे किंवा वर तोंड केलेला चित्रित केला जातो, पण खाली तोंड असलेला मासा दाखवला जात नाही. माशाच्या आतल्या भागात क्रॉस किंवा ixoye किंवा दोन्हीही लिहीलेले असते. सिंधुदुर्ग किल्ल्यात असलेल्या चिन्हात क्रॉस आणि त्याखाली मासा वरच्या दिशेला तोंड करुन कोरलेला आहे.

क्रॉस आणि माशाचे चिन्ह कोणत्या काळात सिंधुदुर्ग किल्ल्यातील तटबंदीच्या दगडावर खोदले गेले असावे याचा विचार करतांना तीन शक्यता गृहीत धराव्या लागतील.

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास पाहीला तर, मार्गशीर्ष वद्य २ शके १५८६ (२५ नोव्हेंबर १६६४) रोजी सिंधुदुर्गची पायाभरणी झाली . १९ मार्च १६६७ रोजी सिंधुदुर्ग बांधून तयार झाला. सिंधुदुर्ग किल्ल्या बद्दल सर्वात जास्त माहिती चित्रगुप्ताची बखरीत आहे. त्यात किल्ला बांधून झाल्यानंतरचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. 

"... त्या कामावर नेहमी गोविंद विश्वनाथ प्रभू सुभेदार, कुंभारजुवे यात कुडाळकर पेशजीचे वतनदार शहाणे मनुष्य होते . त्यांसही नावाजून कामावर ठेउन महाराज राजगडास आले . तिसरे वर्षी जंजिरा मुस्तेद होत आला महाराजांस गोविंद विश्वनाथे खबर पाठविली . त्याजवरुन महाराज पनाळीयास येउन तेथून बावडे घाट उतरोन कोकणातून जंजिरा पाहावयास गेले सुमुहूर्त पाहुन आत प्रवेश केला . तोफा झाल्या . शर्करा वाटली . तदनंतर वास्तु करुन ब्राम्हण संतर्पण पाच हजारांचे करुन दान दक्षणा यथासांग संपादून पाथरुट यांचे नाईकास वस्त्रे व सोनियाची कडी दिधली आणि गोवेचे हुन्नरवंत फिरंगी यांस नावाजून कपतान जे होते त्यांस भरजरी वस्त्रे व सोनेची कडी देउन निरोप दिधला . तदुत्तर गोविंद विश्वनाथ प्रभू सुभेदार यास नावाजून प्रासादिक वस्त्रे , मंदिल जाबदी व चादर भरजरी व झगा मंदिलाचा व मोत्यांचा तुरा व चौकडा व सोनेची कंठी व खासा हुद्देतील फिरंगी जेनबी नवटाकी अतिउत्तम देउन बहुतप्रकारे नावाजिले आणि हे लोक शहाणे इतबारी परम युक्तीवान चतुर भरवंस्याचे म्हणोन जंजिरा पाहून आनंद जाहाला."



यात जरी गोव्याच्या फ़िरंग्यांचा उल्लेख आला असला तरी पोर्तुगिजांनी महाराजांना त्यांच्या उरावर किल्ला बांधण्याकरिता मदत केली असेल असे संभवत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधणीत एकही गोष्ट पोर्तुगिज धाटणीची दिसत नाही. जिंजीच्या किल्ल्याची पुनर्बांधणी करतांना चेन्नईच्या इंग्रज गव्हर्नर सर लँगहॉर्न यांना सुरुंग लावण्यासाठी आणि मोठ्या तोफ़ांचे गाडे बनवण्यासाठी कसबी इंग्रजांना पाठवण्याची पत्राव्दारे विनंती महाराजांनी केली होती पण इंग्रजांनीनी टाळाटाळ केली आणि शेवटपर्यंत एकही माणूस पाठवला नाही. त्यामुळे डच, पोर्तुगिज, इंग्रज हे समुद्रात किल्ला बांधण्यासाठी महाराजांना मदत करतील ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या कामावर असलेला जमादार प्रमुख गोविंद विश्वनाथ प्रभू सुभेदार, कुंभारजुवे या गोव्यातल्या गावातला असावा. त्याने किल्ला बांधणीसाठी आसपासच्या गावातून आणलेल्या लोकांचा "गोवेचे हुन्नरवंत फिरंगी" असा उल्लेख बखरीत आला असावा. (पण यात पुढे "कपतान" असा उल्लेखही आलेला आहे). त्र्य.शं.शेजवलकरांनी यांनी गोविंद विश्वनाथ प्रभू खारेपटण जवळाच्या कुंभारजुवे गावाचा असावा असे म्हटले आहे.   



इसवीसन १७६५ मध्ये मेजर गॉर्डन व कप्तान जॉन वॉटसन आरमार घेउन सिंधुदुर्गावर चाल करुन गेले. इंग्रजांनी सिंधुदुर्ग किल्ला कोल्हापूरकरांकडून जिंकून घेतला. किल्ल्याचे नाव फोर्ट ऑगस्टस ठेवले. त्यानंतर १२ जानेवारी १७६६ ला तह होईपर्यंत सिंधुदुर्ग किल्ला त्यांच्या ताब्यात होता तेंव्हा डागडूजी करतांना हे चिन्ह दगडावर कोरलेले असण्याची शक्यता आहे. 

त्यानंतर इसवीसन १८१२ मध्ये एल्फ़िस्टन आणि कोल्हापूरकर छत्रपती यांच्यात तह होवून सिंधुदुर्ग किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात आला . कर्नल लायोनल स्मिथ याने आरमार सोबत घेउन मालवणला गेला आणि किल्ला ताब्यात घेतला . हा मह्त्वाचा किल्ला ताब्यात आल्यावर डागडूजी करतांना हे चिन्ह दगडावर कोरलेले असण्याची शक्यता आहे. 

चिन्ह कोरलेला दगड तटबंदीच्या वरच्या थरात असल्याने हे चिन्ह किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर कोरलेले असावे. अर्थात मी लेखात व्यक्त केल्या आहेत त्या सर्व शक्यता आहेत त्याला ठोस पुरावा नाही. पण या चिन्हाच्या निमित्ताने भरपूर वाचन झाले अनेक नविन गोष्टी समजल्या आणि सिंधुदुर्गाच्या या भेटीनेही नेहमीप्रमाणे मला समृध्द केले.   


संदर्भ :- 

श्री शिवछत्रपति संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने - त्र्यंबक शंकर शेजवलकर

जिंजी :- महेश तेंडुलकर

सिंधुदुर्ग :- आप्पा परब


अपरिचित किल्ले सिंधुदुर्ग भाग-१, हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

https://samantfort.blogspot.com/2014/08/blog-post.html




Saturday, October 31, 2020

भटकंती प्राचीन सोपार्‍याची (शूर्पारकाची) (Ancient Sopara/Shurparaka)


Bramha, Chakreshwar Temple

या लेखाचे नाव नालासोपार्‍याची भटकंती असे ठेवले असते तर, किती लोकांनी हा लेख वाचायचे कष्ट घेतले असते. कारण आजचे नालासोपारा हे पश्चिम रेल्वेवरील गर्दीचे, उभ्या-आडव्या पसरलेल्या इमारती असलेले मुंबईचे उपनगर अशी ओळख आहे . पण एकेकाळी सोपारा उर्फ़ सुपारक उर्फ़ शूर्पार सुप्पारक उर्फ़ हे जगभर किर्ती मिळवलेले संपन्न बंदर, राजधानी आणि हिंदु, बौध्द आणि जैन धर्माचे गजबजलेले तिर्थक्षेत्र होते. इजिप्शियन, ग्रीक, रोमन, अरब, अफ्रीकी, इस्त्रायली व्यापारी, दर्यावदी, प्रवासी यांचा सोपारा बंदरात वावर होता . पेरिप्लस ऑफ़ दि एरिथ्रियन (Periplus of the Erythraean Sea) या इसवीसनाच्या पहिल्या शतकात एका ग्रीक खलाशाने लिहिलेल्या पुस्तकातही सोपारा बंदराचा उल्लेख आहे. सहाव्या शतकात ग्रीक व्यापारी कोसमास कल्याण जवळील "सिबोर" असा सोपार्‍याचा उल्लेख करतो. दहाव्या शतकातला अरब प्रवासी अल मसुदी ठाण्या जवळील "सुबारा" असा उल्लेख करतो.  याशिवाय चीनी प्रवासी ह्युएनत्संग (Huen Tsang), अरब अल इद्रिसी इत्यादी प्रवाशांनी सोपार्‍याला भेट दिल्याचे उल्लेख आहेत.  


गजलक्ष्मी (Gajalaxmi, Chakreshwar Temple)


सोपार्‍याची प्राचीन वस्ती उत्तरेला वैतरणा नदी आणि दक्षिणेला वसईची खाडी यामध्ये विखुरलेली होती. आजपर्यंतच्या उत्खननात मिळालेले प्राचीन अवशेष, खापरांचे तुकडे (Islamic Glazed Ware, Black and Red Ware)  या परिसरात सापडलेले आहेत. सध्याची नालासोपारा, वसई आणि परिसरातील निर्मळ, गास, नंदाखाल, नाला, रोजोडी, आगाशी इत्यादी अनेक गावे प्राचीन सोपार्‍याचा भाग होती. या भागात १३०० तलाव या परीसरात असल्याचा उल्लेख जैन पोथीत आहे. आजही या भागात असलेले तलाव आणि बुजवलेले तलाव काल्पनिक रेषेने जोडले तर साधारणपणे नालेच्या आकाराचा जलमार्ग तयार होतो. या जलमार्गाने बंदरात मोठ्या गलबतां मधून आलेला माल , छोट्या होड्यांमधून आतल्या भागापर्यंत आणता येत होता. गास गावात मिळालेल्या दगडी नांगरामुळे या जलमार्गाला पुष्टी मिळते.  या जलमार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मालाच्या वखारी (Ware houses) असण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी हा छोट्या होड्यातून आणलेला माल या वखारीं (गोदामां) मध्ये साठवला जात असावा. (मुंबईतही आजही दाणा बंदर , दारुखाना, कोळासा बंदर इत्यादी वेगवेगळ्या मालांची गोदामे असलेले भाग पाहायला मिळतात.) मागणी प्रमाणे विविध घाटमार्गांनी देशावरील  नाशिक, तेर, प्रतिष्ठाण इत्यादी शहरात, बाजारपेठेत पाठवला जात असे. या बाजरपेठांना जोडणार्‍या व्यापारी मार्गांवर लेणी खोदली गेली, या लेण्यां मध्येही सोपा‍र्‍याचा उल्लेख आढळातो.  इसवीसनाच्या पहिल्या शतकात खोदलेल्या कार्ले येथील लेण्यातील ब्राम्ही शिलालेखात "लेण्यातील विविध भागांची निर्मिती वैजयंती. धेनुकाकट, सोपारा इत्यादी नगरातील श्रेष्ठींनी केलेली आहे" असा उल्लेख आढळतो. सोपार्‍याला उतरल्यावर सर्वात जवळची लेणी म्हणजे कान्हेरीची लेणी, येथे "समिका याने/हिने पाण्याचे टाकं खोदून घेतल्याचा" शिलालेख कोरलेला आहे.नाणेघाट येथिल शिलालेखात येथिल पाण्याचे टाके बनवविण्यासाठी सोपार्‍याच्या गोविंददास याने दान दिल्याचे लिहिले आहे.  

Harihar, Chakreshwar Mandir

 अशा या प्राचीन सोपार्‍यात आपली भटकंती सुरु होते नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेपासून. पश्चिमेला रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या बस स्थानकवरुन चक्रेश्वर तलावाकडे जाणारी बस पकडावी. स्टेशन ते चक्रेश्वर मंदीर ३ किलोमीटरचे अंतर अर्ध्या तासात चालत गाठता येते. चक्रेश्वर या प्राचीन तलावाकाठी चक्रेश्वराचे दगडात बांधलेले मंदिर एकेकाळी अस्तित्वात होते. त्याचे मंदिराचे दगडी अधिष्ठान (पाया ) येथे पाहायला मिळतो. चक्रेश्वर तिर्थ या तलावाच्या भोवती बाग, जॉगिंग ट्रॅक आणि कुंपण घालून त्याच्या गळ्या भोवती फ़ास आवळलेला आहे. चक्रेश्वर मंदिराच्या बाजूला सध्या श्रीरामाचे मंदिर आहे.  हे मंदिर फ़ारसे जूने नाही. पण या मंदिर परिसरात असलेल्या पूरातन मुर्ती इथे नांदलेलेल्या हिंदु, जैन धर्मातील विविध पंथ, त्यांच्या पुजनीय देवता यांचे भांडार आपल्या पुढे उभे करतात. 

महाभारतातल्या शांतिपर्वात (४९, ६६-६७) विष्णूचा सहावा अवतार परशूरामाने समुद्र हटवून शूर्पारकाची निर्मिती केली असा उल्लेख आहे, " ततः शूर्पारकं देशं सागरस्तस्य निर्ममे, सहसा जामदग्नस्य सोऽपरान्तमहीतलम्।" त्यामुळे या ठिकाणाला परशूरामतीर्थ या नावानेही ओळखले जाते. महाभारताच्या वनपर्वात (१८८,८) पांडवांनी शूर्पारकची यात्रा केल्याचा उल्लेख आहे. सभापर्वात (३१,६५) सहदेवाने शूर्पार जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे. परशुरामाने १०८ तिर्थांचा उल्लेख केलेला आहे त्यातील काही तीर्थ सोपारा परिसरात आहे. अशाप्रकारे हिंदू धर्मातील महत्वाच्या तिर्थक्षेत्रार असलेल्या चक्रेश्वर मंदिरात सर्वात सुंदर मुर्ती ब्रह्मदेवाची आहे.  

ब्रह्मा हा सृष्टीचा निर्माता आहे. ब्रह्माच्या उत्त्पतीच्या अनेक कथा आहेत. कूर्म पुराणानुसार विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या कमळातून ब्रह्मा प्रकट झाला. दुसऱ्या कथेनुसार जल आणि आकाश तत्वापासून वराह रुपात ब्रह्मा प्रगट झाला. नंतर त्याने स्वतःपासून प्रजापती उत्पन्न केले. या प्रजापतींनी सृष्टी निर्माण केली. ब्रह्माच्या विचारातून सप्तर्षींची उत्पत्ती झाली. या सात ऋषींपैकी एकाला कश्यप नावाचा पुत्र होता . त्याच्या पत्नींपासून देव, दानव, मनू , साप , गरुड यांची उत्पत्ती झाली  म्हणून ब्रह्मब्रह्मदेवाला ‘पितामह’ या नावाने ओळखले जाते. 

ब्रह्मदेव हे रजोगुणांचे प्रतिक आहे. निर्मिती करणे हे मुख्य कार्य असल्यामुळे ब्रह्माने युध्द केल्याच्या, कोणाचा संहार केल्याच्या कथा ऐकायला मिळत नाहीत. देव आणि असुर या दोघांनाही ब्रम्हा वंदनीय होता. ब्रह्मा निर्मिती करतो, विष्णू संरक्षण करतो आणि शिव संहार करतो यामुळे हे तीनही देव पूजनीय आहेत. विष्णू आणि शंकर यांच्या जोडीने ब्रह्माची पूजा होत होती. परंतु ब्रह्मदेवाची स्तुती करणारा विशिष्ट संप्रदाय नसणे, असुरास प्रोत्साहन, असत्य कथन, सावित्रीचा शाप, स्वत:च्या कन्येची आसक्ती  इत्यादी कारणांमुळे मध्यकाळापर्यंत ब्रम्हपूजा अस्तंगत झाली. 



पुस्तक,  यज्ञपात्र

भारतात सध्या ब्रह्मदेवाची पुष्कर (राजस्थान) आणि खेडब्रह्म (गुजरात) ही दोन प्रमुख मंदिरे आहेत. याशिवाय महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात ठाणे (पूर्वीचे श्रीस्थानक), सोपारा (चक्रेश्वर मंदिर), या ठिकाणी ब्रम्हदेवाच्या मुर्ती सापडलेल्या आहेत, त्यामुळे या भागात त्याकाळी ब्रह्मदेवाची मंदिरे होती हे दिसुन येते. ठाणे परिसरावर इ.स. ८०० ते १२५० अशी साधारणपणे ४५० वर्षे शिलाहार राजघराण्याची राजवट होती. श्रीस्थानक ही त्यांची राजधानी होती. शिलाहार राजघराण्याने ठाणे आणि परिसरात अनेक सुंदर मंदिरे बांधली. ठाण्यातील तलावपाळी जवळील कौपिनेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शिवमंदिर, लोणाड येथील शिवमंदिर इ. मंदिरांचे बांधकाम शिलाहारकालात झाले. नालासोपारा आणि ठाणे येथे असलेल्या ब्रह्मदेवाच्या सुंदर आणि भव्य मूर्ती आणि मंदिरे याच काळात राजाश्रयाने निर्माण झाली असावीत. या मूर्तीची नित्यनेमाने पूजा होत असावी. काळाच्या ओघात ब्रह्मदेवाची मंदिरे नष्ट झाली.


सावित्री व गायत्री / गायत्री व सरस्वती 

घट (कमंडलू), हंस 

मूर्तिशास्त्रानुसार ब्रह्माला चार हात असतात. वाहन हंस असून तो कमळावर बसलेला असतो किंवा उभा असतो. हातात पुस्तक, माळा, कमंडलू, यज्ञपात्रे, वरदअभय मुद्रा असतात. ब्रह्मा संहारकर्ता नसल्यामुळे त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नसते.

वरदअभय मुद्रा

राममंदिरातील ब्रह्मदेवाची मूर्ती सुमारे ५ फुट उंच, समभंग अवस्थेत (समभंग म्हणजे दोन्ही पायावर सरळ उभी असणारी) उभी आहे. मूर्तीला दर्शनी भागात तीन डोकी असून, डोक्यावर कोरीवकाम केलेला मुकुट आहे. मूर्तीला कोरलेल्या भुवया एकमेकांना जोडलेल्या आहेत. ब्रह्मदेवाला दाढी आणि मिशी दाखवली आहे. कानात कुंडले, गळ्यात हार, यज्ञोपवीत (जानवे) आणि कटीसूत्र धारण केलेले आहे. अंगावर बाजूबंद, हातात कडं, कमरपट्टा इत्यादी वेगवेगळे अलंकार दाखवले आहेत. मूर्तीचे चारी हातात अनुक्रमे माळा व घट (कमंडलू), वेद, यज्ञपात्र आहेत, एक हात वरद मुद्रेत आहे. मुर्तीच्या पायाच्या दोन्ही बाजूला स्त्रिया दाखवल्या असून त्या सावित्री व गायत्री किंवा गायत्री व सरस्वती असाव्यात. पायाच्या डाव्या बाजूला हंस हे ब्रह्माचे वाहन कोरलेले आहे. तर उजव्या पायाजवळ ब्राम्हण कोरलेला आहे. मूर्ति शास्त्रानुसार ब्रह्माचे शरीर स्थूल आणि पोट थोडे सुटलेले असते. पण शिल्पकारांनी ही मूर्ती तयार करताना ब्रह्माला एकदम "फ़िट" दाखवलेला आहे.


Surya

महिषासूर मर्दीनी




Agni


ब्रह्मदेवाच्या मूर्ती शिवाय मंदिरात आणि मंदिर परिसरात इतर अनेक मूर्ती आहेत. त्यातील महत्वाची मूर्ती मेंढ्यावर बसलेल्या अग्निची आहे. अष्ट दिक्पालांपैकी आग्नेय दिशेचा देव अग्नी हा वेदकाळात पूजनीय होता. त्याच्या स्वाहा आणि स्वधा या दोन बायका आहेत. मूर्तीशास्त्राप्रमाणे अग्नीला दोन किंवा चार हात असतात तो मेंढ्यावर (मेषावर) बसलेला दाखवतात. त्याच्या हातात पंखा आणि तुपाचे भांडे दाखवतात. अग्नीची मुख्य खूण म्हणजे त्याच्या मागे असलेला ज्वालांचा पसारा. याशिवाय येथे सूर्याची सात घोडे असलेली मुर्ती, हरिहर , गणपती, महिषासूर मर्दीनी, उमा - महेश्वर , जैन अंबिका, गजलक्ष्मी, नंदी, सुरसुंदरी वेगवेगळ्या प्रकारचे वीरगळ/ समाधीचे दगड/ स्मृतीशिळा येथे पाहायला मिळातात.  यात साधूची आणि बौध्द दांपत्याची स्मृतीशिळा पाहायला मिळतात. 

(वीरगळींबद्दल अधिक माहिती वाचण्याकरीता "वीरगळ , सतीशिळा , गध्देगळ , धेनुगळ" हा लेख वाचा लेख वाचण्याकरिता लिंकवर टिचकी मारा  https://samantfort.blogspot.com/2019/04/blog-post_4.html) 

Stupa, Nalasopara

चक्रेश्वर मंदिरापासून अर्ध्या किलोमीटरवर सोपार्‍याचा प्रसिध्द स्तूप आहे. महाराष्ट्रात मोजकेच मैदानी आणि वीटांनी बांढलेले स्तूप आहेत, हा त्यापैकी एक आहे. या ठिकाणी रस्त्यावरच फ़ायबरचे गेट आणि बुध्दमूर्ती बसवलेली आहे. कंपाऊंडच्या आत मध्ये पूरातन बौध्द स्तुपाचे अवशेष आहेत. सोपारा हे बौध्द धर्मांचे महत्वाचे केंद्र आणि तिर्थक्षेत्र होते. गौतम बुध्दांनी त्यांच्या पूर्वजन्मात "बोधिसत्व सुप्पारक" या नावाने जन्म घेतला होता.  पूर्व जन्मात खुद्द बुध्दाचेच नाव सुप्पारक होते यावरुन त्याकाळच्या सोपारा या बंदराची भरभराट किती झाली होती आणि ते किती प्रसिध्द होते हे दिसून येते. याशिवाय बुध्द चरित्रानुसार  खुद्द गौतम बुध्द येथे बौध्द धर्माची दिक्षा देण्यासाठी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी वक्काली आणि ५०० विधवांना दिक्षा देउन आपली नखे आणि केस प्रसाद म्हणुन दिले. त्यावर हा स्तूप बांधला गेला म्हणून याला "विधवांचा स्तूप" असेही म्हणतात. सम्राट अशोकाच्या काळात सोपारा हे बौध्द धर्माचे महत्वाचे केंद्र होते, येथूनच बौध्द धर्माचा प्रसार पश्चिम किनार्‍यावर झाला.




मध्ययुगात बौध्द धर्मा बरोबर हा स्तूपही विस्मृतीत गेला. या भागात असलेल्या मातीच्या टेकाडाला " बुरुड राजाचा कोट" या नावाने ओळखले जात असे. इसवीसन १८८२ मध्ये श्री. भगवानलाल इंद्राजी या ऑर्कोलॉजिस्ट्नी याठिकाणी उत्खनन केले. त्यांना या ठिकाणी विटांचा स्तूप आढळला. या स्तूपात एका दगडी पेटीत मैत्रेय बुध्दाच्या पितळेच्या ८ मूर्ती सापडल्या. या स्तूपाचा काळ इसवीसनपूर्व तिसर्‍या शतकातल्या (3rd century BCE) असल्या तरी, याठिकाणी मिळालेल्या बुध्दमुर्ती इसवीसनाच्या आठव्या शतकातील आहेत. या मुर्तींबरोबर सोन्याची फ़ुले, भिक्षापात्राचा तुकडा, गौतमीपुत्र सातकर्णी (सातवाहन) काळातील चांदेची नाणी या गोष्टी सापडल्या. या सर्व वस्तू अशियाटीक सोसायटी, मुंबई येथे आहेत.


Remains of stupa

Votive Stupa

१९३९ - ४० मध्ये सर्व्हे ऑफ़ इंडीयाच्या एम एम कुरेशी यांनी केलेल्या उत्खननात मुख्य स्तुपाच्या दक्षिणेला दोन स्तूप सापडले. त्याच प्रमाणे दगडी खांब, तुळ्या, खापरांचे तुकडे (plain glazed ware of the Muslim period) सापडले. इसवीसन १९५६ मध्ये भूईगाव येथे सम्राट अशोकाचा नववा शिलालेख सापडला. आजपर्यंत भारतात १४ ठिकाणी अशोकाचे शिलालेख सापडलेले आहेत. त्यापैकी आठवा आणि नववा शिलालेख सोपारा येथे सापडलेले आहेत. हे ब्राम्ही लिपीतील शिलालेख आपल्याला छ्त्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, मुंबई येथे पाहायला मिळतात. स्तूप परिसरात मंदिराचे छत तोलणार्‍या भारवाहकांचे, किचकांचे कोरलेले दगडी स्तंभांचे तुकडे पाहायला मिळतात. त्यावरुन याठिकाणी नंतरच्या काळात मंदिर असावे. या ठिकाणी १० वोटीव स्तुप  (पूजेचे किंवा नवसाचे स्तूप ) मिळालेले आहेत. साधाराणपणे आठव्या शतकाच्या आसपास या स्तुपांना नवस बोलण्याची प्रथा होती. याशिवाय येथे मिळालेली बुध्द मुर्ती, मंदिराचे अवशेष एकत्र करुन ठेवलेले आहेत.



स्तूपापासून २ किलोमीटर अंतरावर गास गाव आहे. या गावातील टाकी पाडा येथे मंदिराचे दगडी अधिष्ठान (पाया) पाहायला मिळतो. याशिवाय किचक, भारवाहक, दगडी खांब, तुळया, कोरीव दगडांचे अवशेष पाहायला मिळातात. या गावात जैन मंदिराचे काही अवशेष मिळाले आहेत, ते सध्या मुंबई विद्यापिठ कलिना येथे आहेत. याशिवाय चौदाव्या- पंधराव्या शतकातली सूर्य मुर्ती आणि जैन तिर्थंकरांच्या ७ पितळी मुर्ती येथे मिळालेल्या आहेत. या सध्या आगाशी जैन टेम्पल ट्रस्टच्या ताब्यात आहेत. आधी उल्लेख केल्याप्रमाणे गास गावात दगडी नांगरही मिळालेला आहे. गास गावातील तलावा भोवती असलेल्या दगडी कठड्यावरील एका शिळेवरील मौर्यकालिन ब्राम्ही लिपीमध्ये "सतिमितस" हे नाव असलेला आलेख सर्वात प्राचिन असावा व अशोकाचा स्तूप बांधण्यात त्याने हातभार लावला असावा असे अनुमान आहे.   


Gay Vasaru Stone

हिंदू आणि बौध्द यांच्याप्रमाणे सोपारा हे जैन लोकांचेही तिर्थक्षेत्र होते. जैन पुराणांनुसार आदिनाथांचे जेष्ठ पूत्र चक्रवर्ती भारत यांनी पहिली "शत्रुंजय तलेटी"  (शत्रूंजय टेकडी)  सोपारा येथे स्थापन केली होती, तेथून ती वालभीपूरा गुजरात आणि त्यानंतर पलिताना येथे गेली. जैन रामायणानुसार लव - कुश यांनी सोपारा जिंकून घेतला होता. जैन साहित्यात इसवीसनाच्या पहिल्या शतकापासून सोपार्‍यात अनेक यात्रा, चातुर्मास, दिक्षा पार पडल्याचे उल्लेख आहेत.


गास गावात सध्या अस्तित्वात असलेले तलाव आणि त्याच्या आजूबाजूला तयार झालेली परिसंस्था निवांतपणे पाहाण्यासारखी आहे. गास गावानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे ४ किलोमीटरवरचे सुळेश्वर मंदिर,निर्मल. याठिकाणचे मुळ मंदिर काळाच्या ओघात नष्ट झालेले आहे. सध्या सिमेंटचे बेढब मंदिर बांधलेले आहे. पण मंदिरासमोर उघड्यावर दोन मुर्ती आहेत. त्यापैकी ब्रह्माची मुर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मुर्तीला पुढच्या बाजूला ३ आणि मागच्या बाजूला एक डोके अशी चार डोकी कोरलेली आहेत. ब्रह्मदेवाला पूर्वी पाच डोकी होती. पण ब्रह्माने शिवाचा विरोध केल्यामुळे भैरवाने त्यांचे डोके तोडले. पुढे ब्रह्मदेवाने शिवाचे स्तवन करून शिवास प्रसन्न करू घेतले. ब्रह्महत्येचे प्रायश्चित म्हणून भैरव ते कपाल घेऊन भिक्षा मागण्याकरिता निघून गेला. रुपमण्डण ग्रंथानुसार चार वेद, चार युगे आणि चार वर्ण यांचे प्रतिक म्हणजे ब्रह्माची चार मस्तके.


Bramha 3 heads
Bramha 4th head at back



Ambika
सुळेश्वर मंदिर,निर्मलहून पुढचा टप्पा म्हणजे नाला गावातील शंकर नागेश्वर मंदिर. या मंदिरात मागच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेली विष्णू मुर्ती पाहायला मिळते. प्राचीन सोपारा गावाचे हे अवशेष पाहून आपण ६ किलोमीटर वरील विरार किंवा नालासोपारा स्टेशन गाठू शकतो. 

Vishnu

आम्ही ही भटकंती भर पावसात एसटीने आणि मधले बरेचसे अंतर चालत केली. संपूर्ण दिवस तंगडतोड भटकंती झाली होती. स्वतं:चे वाहान असल्यास ही भटकंती कमी श्रमात होवू शकते. 

Harihar


संदर्भ :- ही भटकंती मी मुंबई विद्यापिठाच्या आर्कॉलॉजिच्या (Archeology) कोर्स दरम्यान अभ्यासाचा भाग म्हणून केली होती, यावेळी आम्हाला मार्गदर्शक म्हणून याच भागात राहाणारा, या भागाची खडानखडा माहिती असणारे श्री. सिध्दार्थ काळे मार्गदर्शक म्हणून होता. सिध्दार्थने या भागात अनेक नविन गोष्टी शोधल्या आहेत आणि त्यावर शोध निबंधही लिहिले आहेत. हा लेख लिहितांना त्यावेळी नोंद केलेली माहिती वापरली आहे.

भारतीय मूर्तिशास्त्र :-  डॉ. नी. पु. जोशी, 

लेणी महाराष्ट्राची :- डॉ दाऊद दळवी 

भारतीय नौकानयनाचा इतिहास :- डॉ.द.ग.केतकर 

विशेष आभार :- जॉन परेरा, नंदाखाल 

सम्राट अशोकाचा शिलालेख