![]() |
| Shukacharya Temple |
" यु रिच्ड टू युवर डेस्टीनेशन" अस गूगल मॅपवाल्या बाईने सांगितले पण आम्ही अशा जागी पोहोचलो होतो की, तिन्ही बाजूने डोंगर होते आणि रस्त्याचा "द एंड" झालेला. कोळादुर्ग, शुकाचार्य आणि बाणूरगड करुन दुपारी गोंदवल्याला प्रसादासाठी पोहोचायचे हा मुळ प्लान होता. त्यामुळे आज ट्रेक न करता थेट किल्ल्यावर गाडीने जाऊन किल्ला पाहायचा असा आरामाचा प्लान बनवलेला होता. भर मार्च मध्ये या दुष्काळी भागात ट्रेक करण तसही सुखावह नव्हते. पण आपण ठरवतो एक आणि गूगलच्या मनात वेगळच असते याची प्रचिती आली.
रस्ता संपला तेथे डाव्या बाजूला एक गोशाळा होती. सकाळी सकाळी आमची गाडी बघून गोशाळेतून भगवी वस्त्र परिधान केलेले साधू बाहेर आले. कोळदुर्गाबद्दल त्यांना विचारल्यावर समोरच्या डोंगराकडे त्यांनी बोट दाखवले. तिथून गडावर जायला पायवाट होती पण माझ्या बरोबर बायको आणि मुलाला पाहून तुम्हाला जमणार नाही असे सांगून त्यांनी जवळ असलेल्या शुकाचार्याचे दर्शन घेऊन मग गाडीने पूर्ण वळसा मारुन कोळदुर्गावर जा असा त्यांनी सल्ला दिला. इतकी भटकंती करतांना मी सहसा स्थानिकांनी दिलेला सल्ला धुडकावत नाही. एक तर त्या भागात आपण नविन असतो. तिथल्या खाचाखोचा त्यांना माहिती असतात आणि कधी मदतीची गरज पडली तर हिच लोक मदतीला येतात.
![]() |
| पायर्यांचा मार्ग ,शुकाचार्य |
गोशाळे जवळून सिमेंट मध्ये बांधलेल्या पायर्यांनी १० मिनिटात थेट शुकाचार्य समाधी मंदिरापाशी पोहोचलो. मंदिराचा परिसर दोन डोंगरांमधील घळीत गर्द झाडीत आहे .(या भागातील बरीच मंदिरे डोंगर माथ्यावर आहेत.) मंदिरा जवळ बारमाही वाहाणारा झरा आहे. या झर्याच्या पाण्याची संततधार गोमुखातून कुंडात जमा होते. शुकाचार्यांचे समाधी मंदिर दगडी बांधणीचे आहे. मंदिरात शंकराची पिंड आहे. हे शुकाचार्यांचे तपस्थान आहे. व्यास ऋषींचे पुत्र शुकाचार्य यांची ही तपोभुमी आहे. कार्तिकेय, मारुती, भिष्माचार्य आणि शुकाचार्य हे चार ब्रम्हवेत्ते मानले जातात. शुकाचार्यांनी याठिकाणी पांडवांचे पणतू राजा परिक्षित याला सदगती मिळावी याकरिता सात दिवसात श्रीमद भागवत सांगितले होते .
| गुहा, शुकाचार्य |
![]() |
| मंदिराचे अवशेष , शुकाचार्य |
![]() |
| गोमुख आणि कुंड , शुकाचार्य |
शुकाचार्य या ठिकाणी तपाला बसलेले असताना त्यांचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने अप्सरेला पाठवले. त्यावेळी शुकाचार्य या मंदिरात अंतर्धान पावले ,अशी आख्यायिका आहे. या मंदिराच्या डोंगराकडील बाजूच्या भिंतीत शुकाचार्यांची पाठमोरी प्रतिमा (आकॄती) दिसते. अशी भाविकांची श्रध्दा आहे. त्याची पूजा केली जाते. या मंदिराच्या बाजूला एका खडकात गुहा कोरलेली आहे. या गुहेतही एक पिंड आहे. गुहे समोर एक समाधी आहे, त्यावर पिंड कोरलेली आहे. मंदिराच्या समोरील पारावर जून्या देवळाचे अवशेष आणि तुटलेल्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यात गणपती, विष्णु, व्याल, सर्पशिल्प, मंदिराच्या कळसाचा भाग इत्यादी गोष्टी आहेत. पारासाठी वापरलेल्या एका दगडावर " श्री शुकदेव देवस्थान" अशी अक्षर कोरलेली आहेत.
अठराव्या शतकात नारायणगिरी व किसनगिरी यांचे याठिकाणी वास्तव्य होते. जंगलात सापडणार्या वन औषधींपासून त्यांनी विंचू दंशावर उतारा देणारे औषध शोधले. या भागातील स्थानिक आजही ते औषध वापरतात.
येथील गर्द झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट, गोमुखातून कुंडात पडणार्या पाण्याचा नाद यामुळे आपण हळूहळू अंतर्मुख होत जातो. या शांत आणि रम्य परिसरातून आमचा पाय निघत नव्हता. पण कोळदुर्ग गाठायचा असल्याने थोड्या वेळाने वरच्या बाजूला असलेल्या रस्त्याकडे जाणार्या पायर्या चढायला सुरुवात केली. १० पायर्या चढल्यावर दोन गावकरी भेटले. त्यांना कोळदुर्गावर जाण्याचा जवळाचा रस्ता विचारल्यावर त्यांनी पायर्यांजवळ असलेली पायवाट दाखवली . त्यांची आणि आमची योग्य जागी भेट झाली होती. पायवाटेने गर्द झाडीतून ५ मिनिटे चालल्यावर घळीच्या बाजूला असलेल्या डोंगरापाशी पोहोचलो. थोडे चढून गेल्यावर एक ६ फ़ूटी कातळटप्पा लागला. तो जपून चढून गेल्यावर मागे नजर टाकली. खाली गर्द झाडी आणि त्यातून डोकावणारे शुकाचार्याचे मंदिर सुंदर दिसत होते. आम्हाला वाट दाखवणारे गावकरी आम्ही कातळटप्पा चढून जाईपर्यंत आमच्यावर लक्ष ठेऊन पायर्यांवर उभे होते, त्यांचा हात हालवून निरोप घेतला आणि पाच मिनिटाची चढाई करुन पठारावर आलो. समोर दुरवर एक सिमेंट मध्ये बांधलेले मंदिर दिसत होते. मंदिरातील दत्त मुर्तीचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागिल पायवाटेने पुढे चालायला सुरुवात केल्यावर दोन पायवाटा लागल्या. सरळ जाणारी वाट कुसबावडे गावात जाते. तर उजव्या बाजूला जाणारी वाट कोळदुर्गकडे जाते.
![]() |
| कातळटप्पा, कोळदुर्ग |
![]() |
| पठारावरुन शुकाचार्य परिसर |
![]() |
| पठारावरील दत्तमंदिर |
उजव्या दिशेला चालायला सुरुवात केली . माण - खटाव तालुक्याचे व्यवच्छेदक लक्षण असलेला उघडा बोडका माळ आणि त्यावर पसरलेली खुरटी झुडप यातून वाट काढत निघालो. वाटेत अनेक मोरपिसं पडलेली मिळाली. याभागात मोरांचा वावर असावा. मगाशी भेटलेल्या गावकर्यांनी याभागात रात्रीच्या वेळी तरस फ़िरतात असे सांगितले. साधारणपणे १० मिनिटे चालल्यावर पठाराच्या टोकावर आलो. समोर किल्ल्याचे पठार दिसत होते. या दोन पठारांमध्ये २०० - ३०० फ़ूट लांबीचा दरी सारखा खोलगट भाग होता. त्यात शेती केलेली होती. खोलगट भागात उतरुन शेताच्या बांधावरुन तो पार केला. समोरचा चढ चढून गेल्यावर मोठ मोठाल्या खडकांची रचीव तटबंदी दिसली. तटबंदीच्या बाजूने गडावर प्रवेश केला.
![]() |
| पठारावरुन दिसणारा कोळदुर्ग |
![]() |
| दरी, कोळदुर्ग |
![]() |
| तटबंदी ,कोळदुर्ग |
गडावर दूरवर पसरलेले पठार आणि त्यावर दोन घरे दिसत होती. घराजवळ पोहोचे पर्यंत कुत्र्यांनी भुंकून भूंकून वात आणला होता. किल्ल्यावरची दोन्ही घर चव्हाणांची आहेत. या घरांच्या मागच्या बाजूला म्हणजेच कोळदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेले पठार पळशी - बाणूरगड रस्त्याला जोडलेले आहे. कोळदुर्गाच्या इतर तीन बाजूना मात्र कडे आहेत. रस्त्यापासून किल्ल्यापर्यंत चालत जायला १५ मिनिटे लागतात. या मार्गानेच गाडीने थेट किल्ल्यावर यायचा आमचा प्लान होता पण मधेच नेटवर्क गेल्याने गुगल गंडले आणि भिवघाट गावातून भिवगड - पळशी - कोळदुर्ग या राज रस्त्याने थेट गडावर जाण्याची वाट सोडून रिरुट करुन नेलकरंजी - गोमेवाडी मार्गे हिवतड गावातील गोशाळे जवळ म्हणजे कोळदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील पायथ्याशी आणून सोडले होते.
| अवशेष ,कोळदुर्ग |
पळशी - बाणूरगड मार्गाने आल्यास किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला गडावर प्रवेश होतो. याठिकाणी दोन बुरुजांचे व तटबंदीचे अवशेष आहेत. तेथून थेट चव्हाणांच्या वस्ती पर्यंत पोहोचता येते. या घरच्या समोरच्या बाजूला थोडे चालत गेल्यावर किल्ल्यावरील देवळाचे काही अवशेष, पिंड, तुटलेला नंदी, दोन वीरगळ आणि एक सतीगळ पाहायला मिळते. येथील इतर अवशेष, मुर्ती आणि वीरगळ ग्रामस्थांनी परळी येथील सिध्देशवर मंदिराच्या गाभार्याच्या भिंतीत बसवलेल्या आहेत. हे पुरातन अवशेष पाहून पुढे गेल्यावर खालच्या बाजूला तलाव आहे. तलावाचा बांध फ़ोडून तलावाच्या खोलगट जागी आता शेती केली जाते. या किल्ल्याच्या उत्तरेला कड्या लगत तुरळक तटबंदी आहे. किल्ल्याचा घेर फ़ार मोठा आहे पण किल्ल्यावर इतर काही अवशेष दृष्टीस पडत नाहीत. किल्ल्यावरुन उत्तरेला बाणूरगडावरील मंदिर दिसते.
![]() |
| कोळदुर्ग ते हिवतड वाट |
किल्ला पाहून झाल्यावर पुन्हा चव्हाणांच्या घरापाशी आलो. आमची गाडी गोशाळेपाशी आहे हे कळल्यावर त्यांच्यापैकी एकजण जवळची पायवाट दाखवायला आला. चव्हाणांच्या घरासमोर असलेल्या किल्ल्याच्या पूर्व टोकावरून एक ठळक पायवाट खालच्या हिवतड गावात उतरते. या वाटेने १० मिनिटात गोशाळेपाशी पोहोचलो. अशा प्रकारे शुकाचार्य मंदिर ते कोळदुर्ग ते गोशाळा असा १ तासाचा सोपा ट्रेक गूगल आणि साधू महाराजांच्या कृपेने झाला.
![]() |
| हिवतड गावातून कोळदुर्ग |
जाण्यासाठी :-
कोळदुर्ग - शुकाचार्य आणि बाणूरगड ही तिन्ही ठिकाणे एका दिवसात पाहाता येतात. कोळदुर्गावर जाण्यासाठी प्रथम कराड गाठावे. कराड - पंढरपूर रस्त्याने (४२ किमी वरील) विटा गाव गाठावे विटा गावातून थेट बाणूर गडावर जाण्यासाठी एसटी बसेस आहेत. या बसने शुकाचार्यला उतरावे. खाजगी वहान असल्यास विटा गावाच्या पुढे २२ किमीवरील खानापूर हे तालुक्याचे गाव गाठावे. खानापूरच्या पुढे भिवघाट गाव आहे त्यापूढे शुकाचार्य, पळशी आणि बाणूरगडाचा फ़ाटा १० किमीवर आहे. पळशीच्या सिध्देशवर मंदिराच्या गाभार्याच्या भिंतीत कोळदुर्ग वरुन आणलेल्या मुर्ती आणि वीरगळी बसवलेल्या आहेत. त्या पाहून ४ किमी अंतरावरील शुकाचार्य गाठावे. शुकाचार्यच्या बाजूच्या डोंगरावर कोळदुर्ग आहे. खाजगी वहानाने थेट बाणूर गडावर जाता येते.
(माणदेशातील किल्ले भाग - १ हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा )
https://samantfort.blogspot.com/2018/10/vardhangad-mahimangad-bhushangad.html
![]() |
| सिध्देश्वर मंदिर परळी येथील भिंतीतील वीरगळ आणि मुर्ती |
Photos by :- kaustubh & Amit Samant © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900
विशेष आभार :- संग्राम बारावकर, आटपाडी


































