Monday, October 22, 2012

मृगाचा (मखमली) किडा ( Red Velvet Mite)


Red Velvet Mite

पावसाळा सुरू झाला की तर्‍हेतर्‍हेचे किडे दिसायला लागतात. ट्रेकर्सचही काहीस असचं आहे. पाऊस सुरु झाला की, धुक्याने वेढलेले हिरवे डोंगर त्यांना साद घालायला लागतात. मग शनिवार-रविवार गडांच्या वार्‍या सुरु होतात. अशाच एका पावसाळ्यात मंगळगडाचा ट्रेक करत होतो. चढाईचा पहीला टप्पा ओलांडून सर्व जण विश्रांतीसाठी पसरले होते. इतक्यात बाजूच्या पाचोळ्यातून फिरणारे लाल भडक रंगाचे मखमली किडे सर्वांच्या नजरेस पडले. असं काही विचित्र/ वेगळं दिसल की, ती गोष्ट पाहण्यापेक्षा कॅमेर्‍यात पकडण्यासाठी सर्वजण धडपडत होते. मग हे फोटो पिकासा/ फेसबुकवर टाकून "लाईक्स" मिळवले की फोटो काढणारा धन्य होतो. आताही सर्वांनी किड्याच्या मागे - पुढे सरपटत चुंबन फोटोग्राफी (मॅक्रो मोड मध्ये फोटो काढण्याला आम्ही दिलेले हे नाव आहे.) सुरु केली. मी पण माझ्या वाट्याला आलेल्या किड्याचे मनसोक्त फोटो काढले. त्यानंतर जवळच्या वाळलेल्या काटकीने त्याच्या पाठीवर हलकेच दाब दिला त्याबरोबर किड्याने आपले पाय पोटाखाली घेतले. निपचित पडून स्वतःचे संरक्षण करण्याचा त्याचा हा प्रकार असावा. त्याच काडीने त्या किड्याला उलटे केल्यावर त्याच्या पोटावर व पायांवरही  तांबडी मखमल पसरलेली दिसली.

घरी आल्यावर संगणकावर फोटो टाकून गुगल भाऊंना साद घातली. त्यांनी नेहमी प्रमाणे ज्ञानाचा खजिना रीता केला. मृग नक्षत्रातच हा किडा दिसतो म्हणून याला "मृगाचा किडा" म्हणतात. यावरूनच त्याला तेलगुत "आरुद्रा (नक्षत्र) पुरुगू" म्हणतात. संस्कृत मधे " बिरबाहूती ", तर उर्दूत "राणी किडा", म्हणतात. मराठीत मखमली किडा, गोसावी किडा (त्याच्या शरीरावरील भगवी झाकं असलेल्या मखमलीमुळे) या नावाने ओळखतात. इंग्रजीत "Red Velvet Mite" आणि शास्त्रिय भाषेत " Holostric" या नावने हा ओळखला जातो. 

जव्हार तलासरी भागातील आदिवासी या किड्याला "देवगाय" म्हणतात.  हा किडा पकडून पापण्यांवरुन फ़िरवतात अशी महिती या भागात फ़िरतांना कळली. 

वाल्मिकी रामायणात सुध्दा मृगाच्या किटकाचा उल्लेख आलेला आहे.

*वर्षावर्णनम्*

बालेन्द्रगोपान्तरचित्रितेन विभाति भूमिर्नवशाद्वलेन।
गात्रानुपृक्तेन शुकप्रभेण नारीव लाक्षोक्षितकम्बलेन।।
                             
                                                      - वाल्मीकिरामायणे।

 इन्द्रगोपः- मृगाचे किडे (लाल रंगाचे)

भावार्थ :- पावसामुळे नुकत्याच उगवलेल्या हिरव्यागार कोवळ्या गवतावर "मृगाचे किडे" शोभून दिसत आहेत. जसे हिरव्या (पोपटी) रंगाचे वस्त्र धारण केलेल्या स्त्रीने लाखेच्या रंगाचे (लाल) कांबळे (शाल) पांघरली आहे.

मृगाचा किडा हा गोचिडीचा भाऊबंध असल्याचे वाचून त्याला हात लावला नाही याचा मला आनंद झाला. मात्र हा किडा गोचिडीसारखा प्राण्यांचे रक्त पित नाही तर, त्याची पिल्ले गोचिडीसारखी माश्या, नागतोडे व इतर किटकांना चिकटतात व आपले पोषण करतात. पूर्ण वाढ झालेले मृगाचे किडे पालापाचोळ्यावर वाढण्यार्‍या बुरुशी भक्षकांची अंडी खातात व अप्रत्यक्ष्यपणे पालापाचोळा कुजविण्याच्या क्रियेला मदत करतात.  मृगाच्या किड्याला निसर्गतः जास्त शत्रू नसले तरी, मानव हा आता त्याचा मुख्य शत्रू झाला आहे.  वंशपरंपरेने आदिवसींना ज्ञात असलेले त्याचे औषधी गुणधर्म आता बहूराष्ट्रीय कंपन्यांनाही माहित झाले आहेत. त्यामुळे किडे गोळा करणे हे आदिवासींच्या अर्थाजनाचे साधन झाले आहे. पूर्वांपार या किड्याचा उपयोग अतिसारा वरील औषधात होतो. या किड्याचे तेल अर्धांगवायूत (paralysis) रामबाण उपाय म्हणून वापरतात. त्याचा उपयोग लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी देखिल होतो. याच कारणासाठी छत्तीसगड मधील आदिवासी नवपरीणीत दांपत्याला मृगाचा किडा भेट म्हणून दे्ण्याची परंपरा आहे. 

Harishchandragad


यावरून एक किस्सा आठवला, मध्यंतरी हरीशचंद्रगड उतरतांना काही गावकरी एका रानफूलाच्या बिया ओरबाडून पोत्यात भरत होते. विशिष्ट उंचीवरच दिसणार्‍या या रानफूलांची मोजकीच झुडपं या परीसरात आहेत. आमचं कुतूहल चाळवल्यामुळे आम्ही गावकर्‍यांकडे चौकशी केली. त्यांनी दिलेली माहिती रंजक होती. या रानफूलाच्या बिया लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीच्या औषधात वापरतात. व्यापरी १ किलोला १००/- रुपये भाव देतात. त्यामुळे या दिवसात गावातील सर्व लोक या बिया गोळा करण्याच काम करतात. त्यांनी पोत्यातून काढून थोड्या- थोड्या बिया सर्वांच्या हातावर ठेवल्या आणि म्हणाले खाऊन बघा, काही होत नाही. अख्खा गड उतरायचा असल्याने आम्ही काही बिया खाल्या नाहीत. थोड्या  तरी बिया झुडपांवर ठेवा म्हणजे पुढच्या वर्षी सुध्दा झाडे येतील असा (फूकटचा) सल्ला देऊन आम्ही निघालो. पण त्यांच्या पाचवीला पुजलेलं अठराविश्व दारीद्र्य व या झुडपांपासून मिळणारे पैसे याचा विचार केला तर काही वर्षांनी ही वनस्पती सह्याद्रीत नक्कीच दुर्मिळ होत जाणार आहे.  


Red Velvet Mite

खरतर पावसाळ्यात एकदाच दर्शन देऊन सुप्तावस्थेत जाणार्‍या या राजबिंड्या मृगाच्या किड्याचं दुर्मिळ होत, नष्ट होत जाण आपल्याला कळणारही नाही.  त्याच्या नसण्याने काय फरक पडणार आहे ? असा विचार कदाचित मनात येऊ शकतो . इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, निसर्गचक्रात प्रत्येकाला कामे वाटून दिले्ली आहेत. यातून परस्परावलंबनाचे एक चक्र निसर्गाने तयार करुन दिले आहे. त्यातील एक जरी सांधा निखळला तर हे  निसर्गचक्र फिरणार कसे ?  आता आपला मृगाचा किडाच बघा त्याच काम पालापाचोळ्यावर वाढण्यार्‍या बुरुशीच्या भक्ष्यांची अंडी खाणं. उद्या हाच जर नष्ट झाला तर, बुरुशी भक्षकांची संख्या वाढेल, बुरशी कमी होईल आणि पानांच कुजण मंदावेल. पान कुजली नाहीत तर माती तयार होणार नाही, झाडांच पडलेल बी रुजणार नाही आणि या सगळ्याचा शेवट एक चांगल्या जंगलाच्या मृत्यूने होईल. कदाचित हे वाचतांना अतिशयोक्ती वाटेल पण निसर्गचक्रातील ढवळाढवळीचे दूरगामी परिणाम भयंकरच असतील.   

या बहुगुणी मृगाच्या किड्याला वाचवायच असेल तर रेशीम किड्या सारखी याची जोपासना/ शेती करण्याच तंत्र विकसित कराव लागेल . हे तंत्र आदिवासींना शिकवून त्यातून त्यांच्या उत्पन्नाची सोय झाली तरच हा किडा वाचू शकेल. 
    


"अदृश्य किटकांच्या जगात"  ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा ....


Saturday, November 27, 2010

स्लाइड शो

२० नोव्हेंबर २०१० ला आमच्या "ट्रेक क्षितिज" संस्थेचा कोठिम्ब्याच्या वनवासी कल्याण आश्रमात स्लाइड शो होता . मी आणि श्रीकृष्णने पाठ पिशवीत प्रोजेक्टर , camera, पाण्याची बाटली  भरून कर्जत लोकल पकडली . नेरळला उतरून टमटमचा १२ कि.मी .चा खडतर प्रवास करुन कशेले गावात पोहोचलो . तिथें दूसरी टमटम पकडून कोठीम्बा गावाच्या पुढील फाट्यावर उतरालो . त्यानंतर  अर्धा  कि.मी. चालल्यावर आम्ही एकदाचे   वनवासी कल्याण आश्रमात पोहोचलो .
      

 
    नोव्हेंबर महिना असून सुध्धा  उन "मी म्हणत "होते. आम्ही दोघे घामाने चिंम्ब झालो होतो. पण आश्रमात पोहोचल्यावर तेथील  दाट झाडी व नीटनेटकपणा पाहून   डोळ्याना  थंडावा मिळाला. आश्रमात आमचे छान स्वागत झाले. आम्ही गेलो तेंव्हा मुलांचे  जेवण चालु होते. सार काही शिस्तीत , कुठेही गोंधळ गड़बड़ दिसत नव्हती . आश्रमातील कार्यकर्त्यां बरोबर गप्पा मारल्यावर वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याची माहिती मिळाली. देशभर आदिवासी वस्तीत असे  अनेक वनवासी कल्याण आश्रम आहेत. तेथे आदिवासी मुलांची राहाण्या - खाण्याची सोय केली जाते. आदिवासी मुलांवर संस्कार केले जातात. कोठिम्ब्याच्या आश्रमात ३५ मुले आहेत . आता शिबिर चालू असल्यामुळे ठाणे व रायगड जिल्ह्यामधून निवडक मुले व मुली येथे आल्या आहेत अशी माहिती मिळाली.

आश्रमाच्या रुचकर व सात्विक जेवणाचा आस्वाद घेउन आम्ही आश्रमा मागील जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेलो . तेथे अनेक प्रकारची फुलपाखरे व फुले होती त्यांची छायाचित्रे घेतली . थोड्या अंतरावर एका  ओढ्यावर आश्रमाने बांध घालून छोटेसे धरण केले  होते , त्यावरुन पडणारया पाण्याचा  नाद ऐकत आम्ही बराच वेळ बसलो. जर स्लाइड शो करायचा नसता तर आम्ही फुलपाखरा सोबत तिथेच बसलो असतो .






































बरोबर २.३० वाजता सह्याद्रितील किल्ले या स्लाइड शो ला आम्ही सुरुवात केली. मुले  व कार्यकर्त्यां बरोबर संवाद साधत केलेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला . कार्यक्रम संपल्यावर उपस्थितांबरोबर पावसानेही आम्हाला दाद दिली . नंतर  धो - धो पाउस तासभर पडला .पाउस कमी झाल्यावर आश्रमाताल्या कार्यकर्त्यांनी कशेले गावापर्यंत आम्हाला सोडले. पडणारया  पावसाने वातवरणात सुखद बदल घडवून आणला होता .त्यामुले सकाळी रखरखीत आणि कंटाळवाणा  वाटणारा प्रवास आता सुंदर वाटत होता . कदाचित  "ट्रेक क्षितिज" संस्थेने अजुन एक छान स्लाइड शो केल्याचा हा परिणाम असावा .