Saturday, September 25, 2021

रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी, कर्जत (Rambaug Point , Matheran to Pokharwadi, Karjat)

              कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेनंतर ट्रेकिंगला सुरुवात करायची होती. अनेक महिने ट्रेक न केल्यामुळे  सगळ्यांची कॉन्फिडन्स लेव्हल एकदम "हाय" होती. ट्रेकसाठी विचारल्यावर लोकांनी जी कारण सांगितली त्यावर "ट्रेकला न येण्याची १०१ कारणे" हे पुस्तकं लिहिता येईल. त्यामुळे जे उरले होते, त्यांच्याशी चर्चा करून त्यातल्या त्यात सोपा ट्रेक ठरवला. रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी, कर्जत.

 


माथेरानला जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. त्यातल्या कर्जत बाजूकडून येणाऱ्या वाटांपैकी खाटवणं ते अलेक्झांडर पॉईंट आणि बुरुजवाडी / दांडवाडी ते रामाबाग पॉईंट या वाटा गावाकऱ्यांच्या रोजच्या वापरातल्या असल्याने मळलेल्या आहेत. या गावातील लोकांची रोजंदारीसाठी रोज माथेरनला जा - ये चालू असते. यापैकी खाटवणं ते अलेक्झांडर पॉईंट ही वाट शेवटच्या टप्प्यात तीव्र चढाईची आहे, तर बुरुजवाडी / दांडवाडी ते रामाबाग पॉईंट ही वाट मध्यम चढाईची आणि फ़िरत फ़िरत जाणारी आहे. त्यामुळे भर पावसात रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी, कर्जत ही वाट उतरायची असे ठरवून आम्ही सकाळीच माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर पोहोचलो.

 


दस्तुरीपासून रामबाग पॉईंट ४ किलोमीटर अंतरावर आहे. माथेरानचा माथा पावसाळ्यात ढगात गुरफ़टलेला असतो. धुक्यात गुरफ़टलेल्या जंगलातील वाटेने पावसाळी कुंद वातावरणात लाल मातीची वाट तुडवत बाजारपेठ गाठली. नाश्त्यासाठी एकच केतकर हॉटेल उघडलेले होते. पर्यटकां ऐवजी स्थानिक लोकांचीच हॉटेलात वर्दळ होती. अशा ठिकाणी नेहमीच चांगले चविष्ट पदार्थ मिळतात. भरपेट नाश्ता करुन अलेक्झांडर पॉईंटकडे निघालो. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण शोधणार्‍या मॅलेटच्या जावयाचे (भाचीच्या नवर्‍याचे) नाव या पॉईंटला दिलेले आहे. मुख्य रस्ता सोडून आतल्या रस्त्यावर आल्यावर झाडांची दाटी अधिकच वाढली. सततच्या पावसामुळे झाडावर आलेले शेवाळं (मॉस) आणि बांडगुळ त्यांच्या रंगामुळे उठून दिसत होती. रस्त्याच्या कडेला असलेली वारुळं पावसात "पॅक बंद" केलेली दिसत होती. पॉईंट जवळ आल्यावर धुक्यातून एक कुटुंब समोर आले. त्यांच्या वेषावरुन ते खालच्या गावातून आलेले वाटत होते. थांबून त्यांच्याशी गप्पा मारल्या, ते सर्वजण खाटवण गावात राहातात आणि हॉटेलात काम करण्यासाठी रोज माथेरानला डोंगर चढून येतात. आम्ही रामबागेतून उतरणार आहे असे सांगितल्यावर त्यांच्यातल्या एकाने आम्हाला, "खाटवण पर्यंत वाट दाखवतो तुम्हाला जसे वाटतील तेवढे पैसे द्या असे सांगितले". पण आम्हाला त्या वाटेने उतरायचे नसल्याने आम्ही रामबाग पॉईंटकडे निघालो.

 



माथेरानच्या बहुतेक पॉइंटसना तो शोधणार्‍या साहेबांची, त्याच्या नातेवाईकांची किंवा खाली असणार्‍या गावांची नाव दिली आहेत. अलेक्झांडर पॉईंट पासून माथेरानच्या दक्षिण टोकावर असलेल्या चौक पॉईंट पर्यंत असलेल्या कड्या खाली सुंदर जंगल आहे. हे जंगल रामबाग किंवा रामाची बाग या स्थानिक नावाने ओळखले जाते. त्यावरुन या पॉइंट "रामबाग" हे नाव मिळाले. गॅझेटीअर मध्ये या पॉइंट्चा उल्लेख नाही. त्यामुळे हा नंतरच्या काळातला असावा. रामबाग पॉइंटच्या रेलिंगपाशी पोहोचलो . अजूनही आम्ही ढगात असल्याने आजूबाजूचा परिसर दिसणे शक्यच नव्हते. रेलिंगच्या उजवीकडून एक फ़रसबंदी वाट खालच्या जंगलात उतरत होती. त्या वाटेवरुन डोक्यावर हिरव्या गवताचा भारा घेउन दोघे जण चढून येत होते. आम्हाला बघून ते थांबले. बुरुजवाडीतून चारा घेउन ते माथेरानच्या घोडेवाल्यांना विकायला चालले होते. त्यांना वाट विचारुन घेतली. वाट ठळक आणि मळलेली आहे कुठेही चुकायची शक्यता नाही असे सांगून त्यांने आम्हाला वाटेला लावले.

 

फ़रसबंदी वाट

                                                                

उजव्या हाताला माथेरानच्या डोंगराचा कातळकडा आणि डाव्या हाताला दरी अशी ती वाट उतरत होती. वाटेवर दोन छोटे धबधबे लागले, पण पाऊस नसल्याने पाणी कातळाला चिकटून वहात होते. वाट वरच्या कड्याला समांतर पुढे जात होती. या वाटेने अंदाजे पंधरा मिनिटे उतरल्यावर लिटील चौक पॉइंटच्या खाली आलो. आता वाट कड्यापासून डावीकडे वळून दाट जंगलात शिरली. उंच वृक्षांच्या दाटीतून वळणा वळणाने जाणार्‍या वाटेवर छोटे छोटे ओढे लागत होते. आता आम्ही ढगांच्या बाहेर आलो असलो तरी झाडांचे माथे अजूनही ढगात होते. त्यातून झिरपणार्‍या हिरव्या ओल्या प्रकाशामुळे वातावरण गुढ झाले होते. या वातावरणाने भारल्या सारखे सर्वजण निशब्दपणे उतरत होतो. वृक्षांच्या पायथ्याशी मोकळ्या जागेत झुडपं वाढली होती. त्यावर सुंदर फ़ुलं उमलली होती. सुर्यप्रकाश अजून जंगलात न शिरल्यामुळे फ़ुलपाखरं मात्र दिसत नव्हती. अशा गुढरम्य वातावरणातून अर्धातास चालून जंगलाच्या बाहेर आल्यावर समोर एक छोट पठार पसरलेल होते. पठारावरुन समोर सोंडाई किल्ल्याचा डोंगर, डावीकडे माथेरानच्या गारबेट पॉईंटचा डोंगर दिसत होता. मागे वळून पाहिल्यावर आम्ही चालून आलो ते जंगल पठाराच्या सीमेवर उभे होते आणि त्यामागे माथेरानचा माथा ढगात लपलेला दिसत होता.                 

 

 


थोडी विश्रांती आणि छायाचित्रण करून पठरावरून उतरायला सुरुवात केली. आता उतार तीव्र झाला होता अशा वेळी सोबतीला असणारी कारवीची झुडुपं दोन्ही बाजूला होती. त्यातून चालत १० मिनिटात  कड्याच्या  टोकापाशी पोहोचलो. इथून दिसणारे दृश्य अप्रतिम होते. कड्याच्या बाजूने डोंगराची एक सोंड दरीत झेपावत होती. खाली दुरवर मोरबे धरणाचा जलाशय दिसत होता. त्यावर राखाडी करडे ढग ओथंबून आले होते. समोरच्या बाजूला सोंडाई किल्ल्याचा डोंगर आणि डावीकडे गारबेटचा डोंगर असा मस्त "पॅनोरमा व्हू" इथून  दिसत होता .

चौकी पॉईंट वरुन मोरबे धरण

कारवीतून वाट

पावसामुळे सगळीकडे हिरव्या रंगाची उधळण झाली  होती. त्यातही पोपटी ते गर्द हिरवा, अशा हिरव्या रंगाच्या अनेक छटा दिसत होत्या. इथे गावकऱ्यांनी दगड, वीटा आणि टाईल्सचे तुकडे वापरून बसण्याकरीता "L" आकारात ओटे बांधलेले आहेत. त्यावर "चौकी पॉईंट" माथेरान अशी अक्षरे कोरलेली आहेत. या वाटेवरून रोज प्रवास करणारे या जागी थोडा वेळ थांबून आपला शीण नक्कीच घालावत असतील, ही जागाच तशी होती . इथून खाली बुरुजवाडी, दांडवाडीतील घर, शेतं आणि त्यामधून धरणाच्या जलशयापर्यंत जाणारा डांबरी रस्ता दिसत होता. माथेरान कडून येणारा एक मोठा ओढा या जलाशयाला मिळत होता. ओढ्यावरच्या पुलाच्या पलीकडे पोखरवाडी गाव दिसत होते.

पठारावरुन सोंडाई किल्ला 


पोखरवाडी पर्यंत अजून मोठा टप्पा गाठायचा होता. त्यामुळे जागेचा मोह सोडून उतारायला सुरुवात  केली. तीव्र उताराचा टप्पा पार करून लांबलचक पठारावर आलो. आता माथेरानच्या  डोंगराच्या पाठून इरशाळ गड दिसायला लागला. पठार संपल्यावर पुन्हा उतरण सुरु झाली. समोरून गावातला एक तरुण  पिकावर फवारणी करण्यासाठी वापरतात तो स्प्रे पंप पाठीवर  घेऊन  चढत  होता. ऑक्टोबर महिन्यात पायवाटेच्या बाजूचे गवत उंच वाढते, त्यामुळे वाटेने जायला त्रास होतो. त्यासाठी गावकरी वर्गणी काढून ही फ़वारणी करतात. त्यामुळे पायवाटेच्या बाजूचे गवत जळून जाते. 

गावाच्या अलिकडे असलेल्या पठारावर एक नितळ पाण्याचा ओढा आडवा आला. त्यात डुंबून पुढे निघालो. बुरुजवाडी आणि दांडवाडी मधून पायवाट डांबरी रस्त्याला लागली. (पायवाटेची सुरुवात लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे रस्त्याच्या कडेला ट्रान्सफ़ॉर्मर आहे. त्याच्या बाजूने पायवाट सुरु होते.) इथे डांबरी रस्ता असूनही रिक्षावाल्याने पोखरवाडीच्या पुलापाशी का बोलवले हा प्रश्न आम्हाला पडला. दांडवाडी ओलांडल्यावर डांबरी रस्त्याच्या दुतर्फ़ा भात शेती होती. मागे माथेरानचा माथा अजूनही ढगात गुरफ़टलेला होता. रस्त्याने ५ मिनिटे चालल्यावर उतार सुरु झाला. या उतारावरचा रस्ता पूर्ण उखडलेला होता. हा रस्त्याचा उतार सुरु होतो तेथेच उजव्या बाजूला एक पायवाट खाली उतरत होती त्या पायवाटेने १० मिनिटात पोखरवाडीच्या पुला जवळ पोहोचलो आणि आमचा अर्ध्या दिवसाचा सुंदर ट्रेक संपला.



दांडवाडीतून माथेरान

दांडवाडी ते पोखरवाडी रस्ता

कर्जत - पेण रस्त्यावर  सोंडाई  किल्ल्याकडे जाणारा फाटा आहे. हा रस्ता मोरबे धरणाच्या काठाकाठाने जातो. या रस्त्यावर पोखरवाडी हे गाव आहे. कर्जतहून पोखरवाडीत जाण्यासाठी रिक्षा आणि मारुती व्हॅन मिळतात. पोखरवाडी गावातून सरळ जाणारा रस्ता सोंडाई वाडीकडे जातो तर डाव्या बाजूचा रस्ता दांड वाडी, बुरुजवाडी मार्गे खाटवण पर्यंत जातो. या रस्त्यावर धरणाचे बॅक वॉटर जिथे संपते तिथे माथेरानच्या डोंगरागेतून येणारा एक मोठा ओढा धरणाला मिळतो. या ओढ्यावर असलेला पूल ओलांडल्यावर लगेच उजव्या बाजूला एक पायावाट डोंगरावर जाते. या वाटेने आपण अर्ध्या तासात दांडवाडीत पोहोचतो. दांडवाडी आणि बुरुजवाडीच्या मध्ये डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला ट्रान्सफ़ॉर्मर आहे. त्याच्या बाजूने जाणारी पायवाट माथेरान पर्यंत जाते.

ओढा, पोखरवाडी

रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी हे अंतर उतरुन पार करायला आम्हाला २.३० तास लागले. पोखरवाडी ते रामबाग पॉईंट हे अंतर चढून जाण्यासाठी ३ ते ३.३० तास लागू शकतात. आम्ही केला तो ट्रेक अर्ध्या दिवसाचा होता. हा ट्रेक पूर्ण दिवसाचाही करता येतो. त्यासाठी बुरुजवाडीचा पुढे असलेले खाटवण गाव गाठून तेथून अलेक्झांडर पॉईंट पर्यंत चढाई करावी आणि उतरताना वर सांगितले त्याप्रमाणे रामबाग पॉईंट वरुन खाली उतरावे. 



बळवंतगडाचा वेढा हा लेख वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
                              https://samantfort.blogspot.com/2016/07/blog-post.html


Photos by :- Amit Samant  © Copy right

Thursday, March 25, 2021

शुकाचार्य (शुकाचारी) ते कोळदुर्ग ( माणदेशातील भटकंती ) Shukacharya (Shukachari Temple) Temple

Shukacharya Temple
Shukacharya Temple

" यु रिच्ड टू युवर डेस्टीनेशन" अस गूगल मॅपवाल्या बाईने सांगितले पण  आम्ही अशा जागी पोहोचलो होतो की, तिन्ही बाजूने डोंगर होते आणि रस्त्याचा "द एंड" झालेला. कोळादुर्ग, शुकाचार्य आणि बाणूरगड करुन दुपारी गोंदवल्याला प्रसादासाठी पोहोचायचे हा मुळ प्लान होता. त्यामुळे आज ट्रेक न करता थेट किल्ल्यावर गाडीने  जाऊन किल्ला पाहायचा असा आरामाचा प्लान बनवलेला होता. भर मार्च मध्ये या दुष्काळी भागात ट्रेक करण तसही सुखावह नव्हते. पण आपण ठरवतो एक आणि गूगलच्या मनात वेगळच असते याची प्रचिती आली.


रस्ता संपला तेथे डाव्या बाजूला एक गोशाळा होती. सकाळी सकाळी आमची गाडी बघून गोशाळेतून भगवी वस्त्र परिधान केलेले साधू बाहेर आले. कोळदुर्गाबद्दल त्यांना विचारल्यावर समोरच्या डोंगराकडे त्यांनी बोट दाखवले. तिथून गडावर जायला पायवाट होती पण माझ्या बरोबर बायको आणि मुलाला पाहून तुम्हाला जमणार नाही असे सांगून त्यांनी जवळ असलेल्या शुकाचार्याचे दर्शन घेऊन मग गाडीने पूर्ण वळसा मारुन कोळदुर्गावर जा असा त्यांनी सल्ला दिला. इतकी भटकंती करतांना मी सहसा स्थानिकांनी दिलेला सल्ला धुडकावत नाही. एक तर त्या भागात आपण नविन असतो. तिथल्या खाचाखोचा त्यांना माहिती असतात आणि कधी मदतीची गरज पडली तर हिच  लोक मदतीला येतात.

पायर्‍यांचा मार्ग ,शुकाचार्य

गोशाळे  जवळून सिमेंट मध्ये बांधलेल्या पायर्‍यांनी १० मिनिटात थेट शुकाचार्य समाधी मंदिरापाशी पोहोचलो. मंदिराचा परिसर दोन डोंगरांमधील घळीत  गर्द झाडीत आहे .(या भागातील बरीच मंदिरे डोंगर माथ्यावर आहेत.) मंदिरा जवळ बारमाही वाहाणारा झरा आहे. या झर्‍याच्या पाण्याची संततधार गोमुखातून कुंडात जमा होते. शुकाचार्यांचे समाधी मंदिर दगडी बांधणीचे आहे. मंदिरात शंकराची पिंड आहे. हे शुकाचार्यांचे तपस्थान आहे. व्यास ऋषींचे पुत्र शुकाचार्य यांची ही तपोभुमी आहे. कार्तिकेय, मारुती, भिष्माचार्य आणि शुकाचार्य हे चार ब्रम्हवेत्ते मानले जातात. शुकाचार्यांनी याठिकाणी पांडवांचे पणतू राजा परिक्षित याला सदगती मिळावी याकरिता सात दिवसात श्रीमद भागवत सांगितले होते . 

गुहा, शुकाचार्य

मंदिराचे अवशेष , शुकाचार्य 

गोमुख आणि कुंड , शुकाचार्य 








शुकाचार्य या ठिकाणी तपाला बसलेले असताना त्यांचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने अप्सरेला पाठवले. त्यावेळी शुकाचार्य या मंदिरात अंतर्धान पावले ,अशी आख्यायिका आहे. या मंदिराच्या डोंगराकडील बाजूच्या भिंतीत शुकाचार्यांची पाठमोरी प्रतिमा (आकॄती) दिसते. अशी भाविकांची श्रध्दा आहे. त्याची पूजा केली जाते.  या मंदिराच्या बाजूला एका खडकात गुहा कोरलेली आहे. या गुहेतही एक पिंड आहे.  गुहे समोर एक समाधी आहे, त्यावर पिंड कोरलेली आहे. मंदिराच्या समोरील पारावर जून्या देवळाचे अवशेष आणि तुटलेल्या मुर्ती  ठेवलेल्या आहेत.  त्यात गणपती, विष्णु, व्याल, सर्पशिल्प, मंदिराच्या कळसाचा भाग इत्यादी गोष्टी आहेत. पारासाठी वापरलेल्या एका दगडावर " श्री शुकदेव देवस्थान" अशी अक्षर कोरलेली आहेत.  

अठराव्या शतकात नारायणगिरी व किसनगिरी यांचे याठिकाणी वास्तव्य होते. जंगलात सापडणार्‍या वन औषधींपासून त्यांनी विंचू दंशावर उतारा देणारे औषध शोधले. या भागातील स्थानिक आजही ते औषध वापरतात.   






येथील गर्द झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट, गोमुखातून कुंडात पडणार्‍या पाण्याचा नाद यामुळे आपण हळूहळू अंतर्मुख होत जातो. या शांत आणि रम्य परिसरातून आमचा पाय निघत नव्हता.  पण  कोळदुर्ग गाठायचा असल्याने थोड्या वेळाने वरच्या बाजूला असलेल्या रस्त्याकडे जाणार्‍या पायर्‍या चढायला  सुरुवात केली. १० पायर्‍या चढल्यावर दोन गावकरी भेटले. त्यांना कोळदुर्गावर जाण्याचा जवळाचा रस्ता विचारल्यावर त्यांनी पायर्‍यांजवळ  असलेली पायवाट दाखवली . त्यांची आणि आमची योग्य जागी भेट झाली होती. पायवाटेने  गर्द झाडीतून ५ मिनिटे चालल्यावर घळीच्या बाजूला असलेल्या डोंगरापाशी पोहोचलो. थोडे चढून गेल्यावर एक ६ फ़ूटी कातळटप्पा लागला. तो जपून चढून गेल्यावर मागे नजर टाकली. खाली गर्द झाडी आणि त्यातून डोकावणारे शुकाचार्याचे मंदिर सुंदर दिसत होते. आम्हाला वाट दाखवणारे गावकरी आम्ही कातळटप्पा चढून जाईपर्यंत आमच्यावर लक्ष ठेऊन पायर्‍यांवर उभे होते, त्यांचा हात हालवून निरोप घेतला आणि पाच मिनिटाची चढाई करुन पठारावर आलो. समोर दुरवर एक सिमेंट मध्ये बांधलेले मंदिर दिसत होते. मंदिरातील दत्त मुर्तीचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागिल पायवाटेने पुढे चालायला सुरुवात  केल्यावर दोन पायवाटा लागल्या. सरळ जाणारी वाट कुसबावडे गावात जाते. तर उजव्या बाजूला जाणारी वाट कोळदुर्गकडे जाते.

कातळटप्पा, कोळदुर्ग 

पठारावरुन शुकाचार्य परिसर

पठारावरील दत्तमंदिर 

उजव्या दिशेला चालायला सुरुवात केली . माण - खटाव तालुक्याचे व्यवच्छेदक लक्षण असलेला उघडा बोडका माळ आणि  त्यावर पसरलेली खुरटी झुडप यातून वाट काढत निघालो. वाटेत अनेक मोरपिसं पडलेली मिळाली. याभागात मोरांचा वावर असावा. मगाशी भेटलेल्या गावकर्‍यांनी याभागात रात्रीच्या वेळी तरस फ़िरतात असे सांगितले. साधारणपणे १० मिनिटे चालल्यावर पठाराच्या टोकावर आलो. समोर किल्ल्याचे पठार दिसत होते. या दोन पठारांमध्ये २०० - ३०० फ़ूट लांबीचा  दरी सारखा  खोलगट भाग होता. त्यात शेती केलेली होती. खोलगट भागात उतरुन शेताच्या बांधावरुन तो पार केला. समोरचा चढ चढून गेल्यावर मोठ मोठाल्या खडकांची रचीव तटबंदी दिसली. तटबंदीच्या बाजूने गडावर प्रवेश केला.

पठारावरुन दिसणारा कोळदुर्ग 

दरी, कोळदुर्ग 

तटबंदी ,कोळदुर्ग 

गडावर दूरवर पसरलेले पठार आणि त्यावर दोन घरे  दिसत होती.  घराजवळ पोहोचे पर्यंत कुत्र्यांनी भुंकून भूंकून वात आणला होता.  किल्ल्यावरची दोन्ही घर चव्हाणांची आहेत. या घरांच्या मागच्या बाजूला म्हणजेच कोळदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेले पठार पळशी - बाणूरगड रस्त्याला जोडलेले आहे. कोळदुर्गाच्या इतर तीन बाजूना मात्र कडे आहेत.  रस्त्यापासून किल्ल्यापर्यंत चालत जायला १५ मिनिटे लागतात.  या मार्गानेच गाडीने थेट किल्ल्यावर यायचा आमचा प्लान होता पण मधेच नेटवर्क गेल्याने गुगल गंडले आणि भिवघाट गावातून भिवगड - पळशी - कोळदुर्ग या राज रस्त्याने थेट गडावर जाण्याची वाट सोडून रिरुट करुन नेलकरंजी - गोमेवाडी मार्गे हिवतड गावातील गोशाळे जवळ म्हणजे कोळदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील पायथ्याशी आणून सोडले होते.

अवशेष ,कोळदुर्ग 

पळशी - बाणूरगड  मार्गाने आल्यास किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला गडावर प्रवेश होतो. याठिकाणी दोन बुरुजांचे व तटबंदीचे अवशेष आहेत. तेथून थेट चव्हाणांच्या वस्ती पर्यंत पोहोचता येते.  या घरच्या समोरच्या बाजूला थोडे चालत गेल्यावर किल्ल्यावरील देवळाचे काही अवशेष, पिंड, तुटलेला नंदी, दोन वीरगळ आणि एक सतीगळ पाहायला मिळते. येथील इतर अवशेष, मुर्ती आणि वीरगळ ग्रामस्थांनी परळी येथील सिध्देशवर मंदिराच्या गाभार्‍याच्या भिंतीत बसवलेल्या आहेत.  हे पुरातन अवशेष पाहून पुढे गेल्यावर खालच्या बाजूला तलाव आहे.  तलावाचा बांध फ़ोडून तलावाच्या खोलगट जागी आता शेती केली जाते. या किल्ल्याच्या उत्तरेला कड्या लगत तुरळक तटबंदी आहे. किल्ल्याचा घेर फ़ार मोठा आहे पण किल्ल्यावर इतर काही अवशेष दृष्टीस पडत नाहीत. किल्ल्यावरुन उत्तरेला बाणूरगडावरील मंदिर दिसते.

कोळदुर्ग ते हिवतड वाट

किल्ला पाहून झाल्यावर पुन्हा चव्हाणांच्या घरापाशी आलो. आमची गाडी गोशाळेपाशी आहे हे कळल्यावर त्यांच्यापैकी एकजण जवळची पायवाट दाखवायला आला. चव्हाणांच्या घरासमोर असलेल्या किल्ल्याच्या पूर्व टोकावरून एक ठळक पायवाट खालच्या हिवतड गावात उतरते. या वाटेने १० मिनिटात गोशाळेपाशी पोहोचलो.  अशा प्रकारे शुकाचार्य मंदिर ते कोळदुर्ग ते गोशाळा असा १ तासाचा सोपा ट्रेक गूगल आणि साधू महाराजांच्या कृपेने झाला.

हिवतड गावातून कोळदुर्ग

जाण्यासाठी :-

कोळदुर्ग - शुकाचार्य आणि  बाणूरगड ही तिन्ही ठिकाणे एका दिवसात पाहाता येतात. कोळदुर्गावर जाण्यासाठी प्रथम कराड गाठावे. कराड - पंढरपूर रस्त्याने (४२ किमी वरील) विटा गाव गाठावे विटा गावातून थेट बाणूर गडावर जाण्यासाठी एसटी बसेस आहेत. या बसने शुकाचार्यला उतरावे. खाजगी वहान असल्यास विटा गावाच्या पुढे २२ किमीवरील खानापूर हे तालुक्याचे गाव गाठावे. खानापूरच्या पुढे भिवघाट गाव आहे त्यापूढे शुकाचार्य, पळशी आणि बाणूरगडाचा फ़ाटा १० किमीवर आहे. पळशीच्या सिध्देशवर मंदिराच्या गाभार्‍याच्या भिंतीत कोळदुर्ग वरुन आणलेल्या मुर्ती आणि वीरगळी बसवलेल्या आहेत. त्या पाहून ४ किमी अंतरावरील शुकाचार्य गाठावे. शुकाचार्यच्या बाजूच्या डोंगरावर कोळदुर्ग आहे. खाजगी वहानाने थेट बाणूर गडावर जाता येते. 

(माणदेशातील किल्ले भाग - १ हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा )

https://samantfort.blogspot.com/2018/10/vardhangad-mahimangad-bhushangad.html




सिध्देश्वर मंदिर परळी येथील भिंतीतील वीरगळ आणि मुर्ती

Photos by :- kaustubh & Amit Samant  © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 

विशेष आभार :- संग्राम बारावकर, आटपाडी



Sunday, February 7, 2021

चोंढ्या घाट ते उंबरदरा (घाटघर परिसरातली भटकंती) One day trek near Mumbai, Nashik

उंबरदरा

अहमदनगर जिल्ह्यातील घाटघर हे घाटमाथ्यावरचे प्राचीन गाव. सध्याच्या ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले हे गाव प्राचीन व्यापारी मार्गावर आहे. या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या अलंग - मदन - कुलंग या दुर्ग त्रिकुटापैकी अलंगच्या कुशीत वसलेले मुळ गाव धरणामुळे आता विस्थापित झालेले आहे. पूर्वीच्या काळी व्यापा‍र्‍यांचे तांडे सह्याद्रीची डोंगररांग पार करुन घाटघर गावात विश्रांतीसाठी थांबत असत. त्यासाठी प्राचीन काळापासून आजपर्यंत चोंढ्या घाट (पायथ्याचे गाव :- चोंढ्या), घाटनदेवी घाट (पायथ्याचे गाव :- मेट), निसणीची वाट, नळीची वाट (पायथ्याचे गाव :- चोंढ्या), ऊंबरदरा (पायथ्याचे गाव :- चोंढ्या) या चार घाटवाटा अस्तित्वात आहेत. 

चोंढ्या घाट

आसनगाव मार्गे शहापूरहून देहेणे गाठले . देहेणे गावाच्या पुढे रस्त्याला दोन फाटे फुटतात. एक आजोबा डोंगराकडे जातो, तर दुसरा चोंढ्या धरणाकडे जातो. चोंढ्या गाव पार केले की घाट सुरु होतो. या रस्त्यालाही दोन फाटे फुटतात. एक धरणाच्या भिंतीकडे जातो, तर दुसरा रस्ता वर चढत स्वीच यार्डकडे जातो. नळीची वाट आणि उंबरदऱ्याची वाट या घाटघरला जाणार्‍या वाटा या स्वीच यार्डच्या आसपास उतरतात. देहेणे गावापासून धरणा पर्यंतचे अंतर ७ किलोमीटर आहे तर चोंढ्या गावापासून ५ किलोमीटर आहे. आम्ही आमची चढाई चोंढ्या घाटातून करणार होतो. त्याची नक्की सुरुवात कुठे होते हे आम्हाला माहिती नव्हते . धरणाच्या वरच्या बाजूला आल्यावर रस्त्याच्या बाजूला पार्कींगसाठी भरपूर मोकळी जागा ठेवलेली दिसली. येथून खाली धरणाची भिंत, त्या मागचा जलाशय आणि मागे आकाशात अंगठा उंचावलेले शिपनूर शिखर दिसत होते. शिपनूरपासून सुरु झालेल्या डोंगरांगेने जलाशयाला वेढा घातला होता. जलाशयाच्या स्तब्ध पाण्यावर या सगळ्याचे पडलेले प्रतिबिंब सकाळच्या कोवळ्या उन्हात एखाद्या सुंदर चित्रासारखेच दिसत होते .  आम्ही उभे असलेल्या या "डॅम व्ह्यू पॉईंट " (स्थानिक लोक याला एम (M) पॉईंट म्हणतात) पासून एक पायवाट धरणाच्या भिंतीपर्यंत गेली होती. या भिंतीपर्यंत जाऊन तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांना वाट विचारावी म्हणून खाली उतरुन गेलो. पण तेथे कोणी नव्हते. पुन्हा गाडी पाशी येउन डोंगराच्या दिशेला थोडी शोधाशोध केल्यावर एक पायऱ्याची वाट दिसली. हीच चोंढ्या घाटाची वाट होती. रितसर वाटेला लागलो. घाटवाटेच्या पहील्या १०० एक पायऱ्या व्यवस्थित सिमेंट मध्ये बांधून काढलेल्या आहेत. या भागात दोन धरण आहेत. घाट माथ्यावर घाटघर धरण आणि कोकणात चोंढ्या धरण. घाटघर धरणात साठलेले पाणी दिवसा पाईपां मार्फत चोंढ्या धरणात आणले जाते . त्यावर टर्बाईन्स फिरवून वीज निर्मिती केली जाते. रात्रीच्या वेळी वीजेची मागणी घटल्यावर, हिच तयार होणारी वीज वापरुन चोंढ्या धरणातील पाणी पंपाव्दारे पुन्हा घाटघर धरणात भरले जाते. अशाप्रकारे पाण्याचे एका धरणातून दुसऱ्या धरणात दिवस रात्र चक्र चालू असल्याने दोन्ही धरणांच्या पाणी साठ्याच्या पातळीत दिवसा व रात्री फरक पडतो .


भातखळा

पायऱ्या संपल्यानंतर आम्ही एका मोठ्या वीजेच्या टॉवर खाली आलो. धरणाच्या पाण्यावर तयार झालेली वीज ग्रीडशी जोडण्यासाठी हे टॉवर्स उभारलेले आहेत. टॉवरच्या पुढे पायवाट एका मोकळ्या पठारावर आली. समोरुन घाटवाट उतरुन एक गावकरी येत होता. त्याच्याकडून ही वाट बरोबर असल्याची खात्री केली. गावकरी या वाटेने तासभरात घाटघरला पोहोचतात असे त्याने सांगितले. आम्ही उभे होतो. त्या पठाराला  "भातखळा" म्हणतात असेही त्याने सांगितले . अशा घाटवाटांवर गावकऱ्यांचे नेहमीचे विश्रांतीचे टप्पे असतात आणि त्यांना स्थानिक नावही असतात. जिथे दम खाण्यासाठी, थोडा विसावा घेण्यासाठी थांबतात. अशा ठिकाणी बऱ्याचदा एखादा डेरेदार वृक्ष आणि बसण्याजोगा एखादा खडक तरी नक्कीच असतो.  चोंढ्या धरणाच्या जागी गाव असताना या भागात भात शेती केली जात होती म्हणून हा "भाताचा खळा" . याचा पुढचा स्टॉप "आंब्याचा मोढा" आणि त्यानंतरचा "म्हसोबा" हेही त्याच्याकडून कळले. तिथे फोनची रेंज होती. त्यामुळे घाटघर मधल्या एकनाथला फोन केला . दुपारचे जेवण त्याच्याकडे सांगितले होते आणि उंबरदर्‍याच्या वाटेने तोच आम्हाला खाली घेउन येणार होता. एकनाथ म्हसोबा जवळ भेटतो बोलला . 

Shipnur , Ajoba from Chondya ghaat
शिपनुर-आजोबा-चोंढ्या धरण

पठार पार करुन दाट झाडीत शिरलो. वाट मळलेली होती. गप्पा मारत, रमतगमत चढत होतो. आता शिपनूरच्या मागे आजोबाचे शिखर दिसत होते. तासाभरात म्हसोबापाशी पोहोचलो . येथे एका अनघड दगडाला शेंदूर लावलेला. त्या ठिकाणी उदबत्यांची पाकीटे. दिवे, माचीसचे बॉक्स पडलेले होते. म्हसोबाच्या मागच्या बाजूला असलेल्या खड्कावर एका झाडाच्या मनगट एवढ्या मुळाने वेटोळा घातलेला होता . त्यावर या उघड्या आभाळा खालच्या देवळाची घंटा बांधलेली होती. घाटवाटांवर प्रवास सुखकर आणि निर्धोक व्हावा यासाठी अशाप्रकारचे अनघड दगडांचे देवी देवता स्थापन केलेले पाहायला मिळतात. आधुनिक घाट रस्त्यांवरही छोटी देवळं पाहायला मिळतात.    

म्हसोबा 

एकनाथने म्हसोबासमोर अगरबत्ती लावली. म्हसोबा पासून तीन वाटा फ़ुटतात.  सरळ जाणारी वाट घाटघर गावात जात होती. उजवीकडे जाणारी वाट कोकणकड्याकडे जात होती आणि डावीकडे जाणारी वाट म्हसोबाच्या बाजूने पाण्याकडे जात होती. डावीकडच्या वाटेने थोडे उतरुन गेल्यावर समोर डोंगराचा कातळकडा उभा ठाकला होता. याठिकाणी कातळात चर खोदून एक छोटासा खड्डा बनवलेला होता. कातळातून झिरपणारे पाणी चरातून या खड्ड्यात जमा होईल अशी योजना होती. पण जानेवारीतही  याठिकाणी पाणी नव्हते, पण ठिकाण सुंदर होते.  


पुन्हा म्हसोबापाशी येऊन उजवीकडील प्रशस्त वाट पकडली या वाटेवर कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. आता धरणात बुडालेल्या मुळ घाटघर गावाकडे जाणारी ही प्राचीन वाट होती. यावाटेने पाच मिनिटे चढून गेल्यावर पठारावर पोहोचलो. याठिकाणी पाण्याची दोन टाकी आहेत. एक कड्या लगत आहे. दुसरे त्याच्या थोडे वऱच्या बाजूला आहे. याठिकाणाहून मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येत होता. पाठीवरच्या सॅक उतरवून सर्वजण समोरचा नजारा पाहात बसलो. कड्यावर काही गावकरी बायका आणि पुरुषही विखरुन बसले होते. त्यांनाही भर उन्हात हा नजारा बघत बसलेले बघून आश्चर्य वाटले. कारण डोंगर, दर्‍या, निसर्ग या त्यांच्या नेहमीच्या जगण्यातल्या गोष्टी असल्यामुळे त्यांना आपल्या शहरी लोकांसारखे अप्रुप नसते. या लोकांचे एकनाथकडे कौतुक केल्यावर तो बोलला काही नेटवर्कची रेंज इथेच मिळते त्यामुळे मोबाईलवर बोलायला गावातले लोक इथपर्यंत येतात.    

पाण्याची दोन टाकी 



पठारावरुन गावची वाट धरली. वाटेत सुंदर जांभळ्या, गुलाबी रंगांच्या छोट्या फ़ुलांच्या गुच्छांनी लगडलेली झाडं दिसत होती. त्या फ़ुलांचा सडा खालच्या कातळावर पडून तोही जांभळा झाला होता. गावकरी या झाडाला करप या नावाने ओळखतात. हे अंजनाचे (Memecylon umbellatum) झाडं होते. त्याची सुंदर फ़ुलं बघुन गोविंदाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवल्या.


अंजन 

ऱाकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा

नाजुक देशा, कोमल देशा , फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा

बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा !!


अंजनाच्या कळ्या 

Memecylon umbellatum


एक उंचवटा चढून झाडीतून बाहेर आलो. गावातल्या घरांच्या पार्श्वभूमीवर समोर अलंग - मदन - कुलंगचे दुर्ग त्रिकुट उठून दिसत होते. 

अलंग - मदन - कुलंग

एकनाथच्या सारवलेल्या अंगणात "सॅका" टाकून थेट जेवायला बसलो . भाकरी पिठले , चटणी , कांदा अशा गावरान मेन्यूवर यथेच्छ आडवा हात मारुन अंगणात आडवे झालो . अशा वेळी निघणाऱ्या जुन्या ट्रेकच्या आठवणी , पुढच्या अनेक ट्रेकचे हवेतल प्लानिंग त्यावर चर्चा झाली . भर दुपारी डांबरी सडकेवर येउन कोकणकड्याच्या दिशेने वाटचाल चालू केली . 


घाटघर धरणाच्या जलायशयाच्या बाजूने जाताना एकनाथने मुळ गावाची जागा दाखवली . रात्री पंपिंग करुन खालच्या धरणातले पाणी वरच्या धरणात कुठपर्यंत चढते तेही दाखवले. मुख्य रस्ता सोडून दाट झाडीतल्या पायवाटेने इरीगेशन डिपार्टमेंटच्या इमारतीना वळसा घालून कोकणकड्यावर पोहोचलो . तेथे कड्यावर सुरक्षेसाठी लांबच्या लांब उंच लोखंडी ग्रील बसवलेले आहे . त्यामुळे तेथून लगेच काढता पाय घेतला आणि पुढे उंबरदरा पॉइंटच्या दिशेने निघालो . वाट दाट झाडीतून होती . उंबरदरा पॉईंटच्या अगोदर वाट खाली एका छोट्याश्या घळीत उतरली.  तेथे एका खाचेत पाण्याचा झरा अचानक प्रकट झाला होता. त्या वाहात्या थंडगार पाण्याने  बाटल्या भरुन घेतल्या . 

झरा

एक चढ चढून गेल्यावर उंबरदरा पॉईंट पाशी पोहोचले येथे  लोखंडी पाईपांचे रेलिंग बसवलेले होते . तेथून डोंगराच्या बेलाग कड्यामधील घळीतून खालचे धरण दिसत होते. ऱेलींग ओलांडून पायवाटेला लागलो . उंबराच्या दाट झाडीतून बाहेर आलो आणि दोन्ही बाजूला सरसरुन आकाशाला भिडलेले सरळसोट कातळकडे . त्यावरुन वर्षानुवर्षे निखळलेल्या खडकांची खालपर्यंत परसलेली रास त्यातून खळखळाट करत वहाणारे पाणी आणि कड्यांच्या या रचनेमुळे वहाणारा भणाणणारा वारा . सगळच अचंबित करणार होते . कितीतरी वेळ आम्ही सह्याद्रीचे हे रुप अनुभवत तिथेच थांबलो होतो. सांदण, हरिशचंद्र गडाच्या नळीच्या वाटे  सोबत अशा अनेक वाटा फिरुन झाल्या होत्या, पण सह्याद्री प्रत्येक वेळी वेगळच पण विलोभनीय रुप दाखवत असतो . माझ्या मते तरी एका वाटेची तिथल्या रचनेची , तिथून दिसणाऱ्या दृश्याशी, तिथल्या हवेतल्या गंधाशी दुसऱ्या ठिकाणाशी तुलना करु नये . प्रत्येकाचा बाज वेगळाच असतो.

उंबरदरा 



आमची पावलं खिळली असली तरी एकनाथ पार खाली जाऊन आमची वाट बघत उभा होता . आम्हीही निघालो .दृश्य कितीही मोहक असले तरी या दगडातून उतरताना शेवटी शेवटी जीव मेटाकुटीला येतो हे अनुभवाने माहिती होते . उंबर दऱ्याच्या घळीतून उतरायला सुरुवात केल्यावर १० मिनिटात मोकळ्यावर आलो . कातळभिंती थोड्या दूर गेल्या . हलणारे दगड , त्या दगडातून वहाणारे पाणी , दगडांवर साठलेले शेवाळे या सगळ्यांना सांभाळत खाली उतरत होतो . आधाराला मधे मधे उगवलेली आणि तग धरून असलेली उंबराची झाड होती . या उंबरांच्या झाडांमुळे या ठिकाणाला उंबरदरा नाव मिळाले आहे .  खरतर ही  घाटवाट नसून ओढ्याची वाट होती.  त्यात २६ जुलै २००६ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे या वाटेवर अनेक दरडी कोसळल्या आणि गावातल्या लोकांनी ही वाट वापरणे बंद केले.
 
बिकट वाट

उतरायला सुरुवात केल्यावर साधारणपणे अर्ध्या तासात आम्ही अशाच एका मोठ्या खडकापाशी आलो . वरुन पडलेल्या या शिलाखंडाने पुढे जाणारी वाट अडवलेली होती . त्यावर चढून जाऊन विरुध्द बाजूने उतरणे जवळ जवळ अशक्य होते . पण या ठिकाणी खडकाच्या खाली जेमतेम एक माणूस उतरु शकेल एवढीच जागा होती . त्यातून पाणी वाहात होते . एकनाथने त्यावर पडलेले दगड बाजूला केले आणि त्याने त्या चिंचोळ्या तोंडाच्या छिद्रात उतरुन आम्हाला कुठे पाय ठेवायचा कसे उतरायचे याचे प्रात्येक्षिक दाखवले. वाहाते पाणी , शेवाळलेले दगड आणि जेमतेम एक माणूस जाऊ शकेल एवढी जागा यामुळे प्रत्येकाला कोणाचा आधार न घेता उतरायचे होते . साधारणपणे दिड पुरुष उंचीच्या या छिद्रात उतरुन आम्ही एक एक करुन दुसऱ्या बाजूने बाहेर आलो . 

छिद्राचे तोंड


दुसरी बाजू


व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणवर टिचकी मारा.

या थरारक अनुभवा नंतर  पुन्हा दगडांची वाट उतरायला सुरुवात केली . एके ठिकाणी  ओढ्याने उंचावरून उडी मारली होती . त्यामुळे पुन्हा पुढची वाट बंद झाली होती . मग ओढ्याच्या बाजूने जंगलातून जाणाऱ्या घसार्‍याच्या वाटेने उतरायला सुरुवात केली . काही वेळाने पुन्हा ओढ्यात उतरुन दगडगोट्यातून चालायला सुरुवात केली . उतरायला सुरुवात केल्यापासून साधारणपणे दिड तासाने ओढ्याची वाट सोडून उजव्या बाजूच्या डोंगरावर चढायला सुरुवात केली . उंबरदरा पासून येणारा हा ओढा पुढे चोंढ्या धरणाच्या जलाशयाला जाऊन मिळतो.

चोंढे धरण

डोंगरावर जाणारी पायवाट पकडून १०  मिनिटात स्वीच यार्ड पाशी पोहोचलो . येथे डोंगरात इरीगेशन डिपार्टमेंटने एक मोठा बोगदा खोदलेला आहे . हा बोगदा ग्रील लावून बंद केलेला असतो . तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी परवानगी दिली तरच बोगद्यातून जाता येते . अन्यथा बोगदा असलेला डोंगर चढून रस्त्यावर उतरावे लागते . बोगद्याच्या पुढे  डांबरी रस्त्याने १५ मिनिटे चालल्यावर आम्ही ट्रेक चालू केला त्या ठिकाणी  M पॉईंटवर पोहोचलो .  उंबरदरा उतरायला आम्हाला दोन तास लागले होते . एकनाथचा निरोप घेतला तो चोंढ्या घाटाने घाटघरला निघाला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो .


चोंढ्या घाट - उंबरदरा हा ट्रेक एक दिवसाचा ट्रेक आहे . चोंढ्या घाट ट्रेक वर्षभरात केंव्हाही करता येइल . उंबरदरा मात्र पाणी ओसरल्यावर डिसेंबर नंतर मे महिन्यापर्यंत करता येइल . उंबरदरा उतरण्यासाठी गाईडची आवश्यकता आहे .


चोंढ्या धरण - चोंढ्या घाट - घाटघर :- १ ते १.५ तास


घाटघर - उंबरदरा पॉइंट :- अर्धा तास


उंबरदरा पॉइंट - उबंरदरा घाट - चोंढ्या धरण :- २ ते २.५ तास

 

GPS ने रेकॉर्ड केलेली चोंढ्या घाट - घाटघर- उंबरदरा भटकंती, नकाशा  :- महेंद्र गोवेकर



शिपनुर

Photos by :- kaustubh & Amit Samant  © Copy right

Video by :- Pallavi 

Map :- Mahendra Govekar © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 


रडतोंडी घाट - पार घाट - प्रतापगड - मधुमकरंदगड - हातलोट घाट, जावळीच्या खोर्‍यातील भटकंती हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

https://samantfort.blogspot.com/2020/01/blog-post.html