Wednesday, July 27, 2016

बळवंतगडाचा वेढा (Balwantgad)

कसार्‍या जवळचा बळवंतगड हा छोटेखानी किल्ला. गेली अनेक वर्ष किल्ल्यांवर फिरतोय,  पण का कोण जाणे हा किल्ला पाहायचा राहुन गेला होता. जुन महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाली. शनिवारी धो धो पाउस कोसळायला लागला, किल्ल्यावर जाण्याचे वेध लागले आणि बळवंतगडाच नाव आठवल . नेहमीच्या वेबसाईट, पुस्तक चाळली पण बळवंतगड माझ्यासारखाच त्यानी पण ऑप्शनला टाकला होता. मग काही ब्लॉग वाचले त्यात किल्ल्यावर कस जायच याची माहिती फारच त्रोटक होती . नशिबाने किल्ला गुगल मॅपवर मार्क केलेला होता. त्याच्या आधाराने जायच ठरल.  नेहमीच्या सवंगड्याना फोन केले. मी आणि महेंद्र गेली ९ वर्ष किल्ल्यावर फिरतोय.  किल्ल्यांचे नकाशे बनवणे आणि जीपीएस मॅपिंग करण हे त्याच काम तर किल्ल्याची माहिती गोळा करण माझ काम हे ठरलेल आहे. त्यामुळे किल्ल्यावर जायच म्हटल्यावर तो तयार झाला. माझा मुलगा कौस्तुभ लहानपणापासूनच माझ्याबरोबर किल्ल्यांवर हिंडतोय, तोही होताच. विराज , उमेश , सचिन आणि अभिषेक तयार झाले. सकाळी डोंबिवलीहून पहिली कसारा पकडली. उमेशला बर नसल्याने आलाच नाही. टिटवाळ्याच्या पुढे उजाडायला लागल. पाउस नव्हता, पण धुक होत. कसार्‍याला पोहोचलो तेंव्हा कळल माल या गावात जाणार्‍या जीप्स सकाळी ८ नंतर सुरु होतात. किल्ल्याच्या पायथ्याच्या विहिगावात जाणारी बस पण निघून गेली होती. मग प्रथम पेटपूजा करुन घेतली. ट्रेन जाउन बराच वेळ झालेला. नाशिकला जाणारेही बस , टॅक्सीने निघून गेले होते. त्यामुळे टॅक्सीवाल्यांशी घासाघिस करण्याची योग्य वेळ होती. पाउस नसला तरी धुक असल्याने बळवंतगडाची माहिती असलेला टॅक्सीवाला आम्ही शोधत होतो. अनेकांना बळवंतगडच माहिती नव्हता..... शेवटी बळवंतगड माहिती असलेला एक टॅक्सीवाला मिळाला आणि थोडी घासाघिस करुन प्रवासाला सुरुवात केली.

बळवंतगडाच्या पायथ्याचे विहिगाव कसारा रेल्वे स्टेशनपासून १३ किलोमीटर अंतरावर आहे. या गावातून बळवंतगडाच्या बाजूबाजूने माल गावात एक घाट रस्ता जातो. या ऱस्त्याने दिड किलोमीटर गेल्यावर डाव्या बाजूला किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे.
बस किंवा जीपने विहीगावच्या माल फाट्यावर उतरून अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या पाउल वाटेपाशी पोहोचू शकतो.


धुक्यात  हरवलेली  वाट 

      आमच्या ड्रायव्हरला किल्ल्यावर जाण्याची वाट कुठून सुरु होते हे माहिती असल्याने त्याने माल फाट्यावर न उतरवता तुम्हाला थेट किल्ल्याच्या वाटेवर सोडतो सांगून गाडी थेट माल रोडवर घेतली. घाट चढायला लागलो तसंतसं धुके दाट व्हायला लागल . समोरच धुकं आणि काचेवर जमलेल धुकं यामुळे ड्रायव्हर खिडकीतून डोक बाहेर काढुन गाडी चालवत होता . शेवटी एके ठिकाणी त्याने गाडी थांबवली आणि सांगितले डाव्या बाजूला जी पायवाट जाते ती थेट किल्ल्यावर जाते. पैसे घेउन ड्रायव्हर निघून गेल्यावर त्या दाट धुक्यात आम्ही ५ जणच राहीलो. किल्ल्या संबंधी माहिती लिहिताना नक्की कसली खुण सांगायची (लिहायची) ते आजूबाजूला शोधत होतो. थोड्या अंतरावर एक मैलाचा दगड दिसला. त्यावर ३.४ हा आकडा लिहिला होता बाकी नाव गाव काही नव्हत. खुणेची नोंद डायरीत करुन धुक्यात हरवलेल्या पाउलवाटेवर पाउल ठेवल आणि आम्हीही धुक्यात विरुन गेलो. पाच फुटा पलिकडचा माणूसही दिसेना. त्यामुळे सर्वाना एकत्र चालायच्या सूचना दिल्या. दरवर्षी उन्हाळ्यात जी फळ खातो किंवा ज्या बिया पडलेल्या मिळतात त्या सुकवून साठवायची सवय लागली आहे. पावसाळ्यात ट्रेक चालू झाले की ह्या बिया त्या ठिकाणी पेरतो. यावेळीही आंबा, जांभूळ, बहावा, इत्यादी  झाडांच्या अंदाजे ४० बिया बरोबर घेतल्या होत्या. चालता चालता योग्य जागा बघून व्यवस्थित खड्डा खणून बिया लावायला सुरुवात केली. त्यामुळे अर्थात चालण्याचा वेग मंदावला. किल्ला १५ मिनिटात चढून होणार हे माहिती असल्याने सगळे वातावरणाचा आनंद घेत चालत होते. (निसर्ग सौंदर्याचा म्हणू शकत नाही कारण धुक्यामुळे काहीच दिसत नव्हत.) अर्धा तास झाला तरी किल्ल्याची चढण येत नाही हे पाहिल्यावर आम्ही अस्वस्थ झालो. एका पठारावर पोहोचलो तर ठळक पायवाट खाली उतरत होती. ती पायवाट बरोबर आहे का ते पाहाण्यासाठी मी आणि सचिन पायवाटेने खाली उतरायला लागलो. पाच मिनिटात आम्ही दुसर्‍या पठारावर पोहोचलो. इथून मुंबई - नाशिक हायवे वरच्या गाड्यांचे आवाज खालच्या बाजूने एकदम जवळ येत होते. अस वाटत होते की, थोड खाली उतरलो तर थेट हायवेवरच उतरु .धुक्यामुळे अंतराचा अंदाज येत नव्हता. खरतर हायवे म्हणजेच थळ घाटातून जाणारा रस्ता आम्ही उभे असलेल्या डोंगराच्या उंचीवरुन समोरच्या डोंगरातून जात होता. भौगोलिक अंतर जास्त असले तरी शांत वातावरणामुळे वहानांचा आवाज जवळून येत असल्यासारखा वाटत होते. रस्ता चुकलाय हे लक्षात आल्यावर आम्ही परत पहिल्या पठारावर आलो. कौस्तुभने तो पर्यंत वेळेचा सदुपयोग करत खड्डे खोदुन बिया पेरायला सुरुवात केली होती.


बळवंतगड  परिसरात  बिया  लावतांना


आता महेंद्र आणि विराजच्या दुसर्‍या टिमने पठारावरुन सरळ जाणार्‍या वाटेने वर चढत जायचे आणि वाट सापडली नाही तर १० मिनिटात परत याच ठिकाणी यायचे असे ठरले. त्याप्रमाणे महेंद्र आणि विराज धुक्यात शिरले. आम्ही आमचे प्लास्टिक पिशव्यात गुंडाळून ठेवलेले मोबाईल काढले आणि गुगल मॅप चालू केला . नशिबाने नेटवर्क होते. त्यामुळे आम्ही उभे होतो त्याच्या डाव्या बाजूला बळवंतगड आहे हे नक्की झाले. पुढे जाण्याची वाट संपल्याने १० मिनिटात महेंद्र आणि विराज परत आले. आता गूगल मॅप ऑन करुन आम्ही चालायला सुरुवात केली तर त्याने आम्हाला मी आणि सचिन गेलेल्या वाटेने खाली नेल. पुढे तो अजून अजून खाली नेउ लागला डोंगर चढायच्या ऐवजी आम्ही उतरायला लागलोय हे कळत होत. त्यामुळे गुगल मॅपवरचा टेरेन हा ऑप्शन ओपन केला. या ऑप्शन मध्ये जमिनीचे, डोंगराचे वेगवेगळे स्तर (पातळ्या) दाखवलेले असतात. या मॅपवर ज्या कोणी बळवंतगड मार्क केलेला होता तो अंदाजे मार्क केल्यामुळे खुप खालच्या स्तरावर मार्क केलेला त्यामुळे गुगल मॅप आम्हाला तिकडे घेउन जात होता. मोबाईल बंद करुन आता आम्ही खाली न उतरता सरळ डोंगराला भिडायच ठरवल. वाट अशी नव्हतीच करवंदीच्या जाळ्या , खुरटी झुडप यातून वाट काढत अंगावर येणारा चढ चढायला सुरुवात केली . पाच सात मिनिटातच पायाखाली एखाद दुसरा घडीव दगड दिसू लागला. किल्ल्याच्या तटबंदीसाठी वापरले जाणारे घडीव दगड कालौघात ढासळून खाली येतात. ही किल्ला असल्याची खुण पाहून आमचा उत्साह वाढला आणि आम्ही जोमाने डोंगर चढू लागलो. १० मिनिटात विराज डोंगर माथ्यावर पोहोचला. धुक्यात थोडी शोधाशोध केल्यावर त्याला भवानी मंदिराकडे आणि पाण्याच्या टाक्याकडे अशी दिशा दर्शवणारा बाण दिसला. त्याने ओरडून आम्हाला ही आनंदाची गोष्ट कळवली. आम्ही एकामागोमाग एक गडमाथ्यावर पोहोचलो. दिशादर्शक बाणाच्या समोर बसून भरपूर पाणी प्यायलो. किल्ला चढायला सुरुवात केली तेंव्हापासून आत्तापर्यंत सव्वातास निघून गेला होता आणि आम्ही शोधाशोध करतांना पाणी प्यायचे विसरुन गेलो होतो. पावसाळी आणि हिवाळी ट्रेक मध्ये वातावरणामुळे आपल्याला घाम येत असल्याची जाणीव होत नाही तसेच तहान पण लागत नाही, पण त्यावेळीही ठरावीक वेळानंतर थोडे थोडे पाणी पित रहाणे आवश्यक असते . कारण शरीरातली पाण्याची पातळी श्रमामुळे हळूहळू कमी होत असते आणि पायात गोळे येणे थकवा जाणवणे या गोष्टी व्हायला लागतात.


वेताळ , बळवंतगड

हनुमान, बळवंतगड


थोडी विश्रांती झाल्यावर आम्ही भवानी मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. उजव्या बाजूला एका खोलगट भागात उन पावसाने झिजलेली एक मुर्ती होती. त्या मुर्तीच्या उजव्या हातात तलवार तर पायाखाली आडवी पडलेली एक मानवाकृती होती. झिज झाल्याने तिचे कांगोरे नष्ट झाले होते.  मुर्तीशास्त्र हा खुप मोठा विषय आहे. वेद,रामायण, महाभारत, पुराण इत्यादीतून आलेल्या वर्णनानुसार ,कथेनुसार मुर्ती बनवल्या जात. पण या गोष्टींचा अभ्यास न करता सरसकट काही पण ठोकून द्यायची सवय अनेकांना असते. या ठिकाणी जी मुर्ती आहे ती भवानीची नसून हनुमानाची आहे आणि त्याच्या पायाखाली पनवती आहे .


पाण्याचे टाकं , बळवंतगड 


हनुमानाला नमस्कार करुन आम्ही खालच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाक्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. ५ मिनिटात कड्यावर कातळात खोदलेल्या भल्यामोठ्या टाक्यापाशी पोहोचलो. टाक पाहून पुन्हा वर चढून किल्ल्याच्या पूर्व टोकापाशी पोहोचलो. सकाळपासून पिच्छा पुरवणार धुक विरायला सुरुवात झाली आणि धुक्याचा पडदा सरकायला लागला तसतसे आजूबाजूचे हिरवेगार डोंगर त्यामधून जाणारा रेल्वेमार्ग, बाजूचा थळ घाट, दुरवरचे कसारा गाव असा प्रचंड मोठा परिसर दृष्टीक्षेपात येत होता. बळवंतगड हा टेहळणीचा किल्ला का याच उत्तरही मिळल होते. कसारा स्टेशनातून सुटलेल्या ट्रेनचा मागोवा घेत ती बळवंतगडाच्या डोंगराच्या बाजूने बोगद्यात जाताना बघताना आम्ही सगळेच लहान होउन गेलो. त्याचवेळी नाशिकहून कसार्‍याच्या दिशेने जाणारी ट्रेन बाहेर आली तीच्या मागून आमची नजर ही कसार्‍याकडे जायला लागली. मुकपणे हा खेळ खेळत आम्ही कितीही वेळ बसू शकलो असतो. पण  भुकेची जाणीव झाली आणि आम्ही आमचे डबे त्याच ठिकाणी उघडून खायला सुरुवात केली .



डबे खाउन झाल्यावर किल्ल्याच्या पश्चिम टोकाला चालायला सुरुवात केली वाटेत उध्वस्त वास्तूंचे दोन चौथरे, वेताळ आणि त्यामागे दगड एकावर एक रचून केलेली तटबंदी होती. या तटबंदीच्या कोसळलेल्या भागातूनच किल्ल्यावर येण्याचा सध्याचा मार्ग होता. या मार्गाने किल्ला उतरायला सुरुवात केली आणि दहाव्या मिनिटाला आम्ही किल्ल्या खालील रस्त्यावर पोहोचलो. किल्ल्यावर जाण्याच्या मार्गाची नोंद करण्यासाठी थोडी आजूबाजूला शोधाशोध केल्यावर मैलाचा दगड सापडला त्यावर लिहिले होते १.४. सकाळी आम्हाला जीपवाल्याने ३.४ जवळ सोडले होते. आता सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. जीपवाल्याने आम्हाला किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाला म्हणजेच पूर्व टोकाला सोडले होते. तिथून किल्ल्यावर जाण्याची वाटच नव्हती. किल्ल्याचा डोंगर पूर्व पश्चिम पसरलेला आहे. आम्ही किल्ल्याला पूर्ण वेढा घालून आग्नेय दिशेकडून नसलेल्या वाटेने गडावर चढलो होतो. जीपवाल्याच्या कृपेने एक सोपा ट्रेक मस्त कठीण झाला होता.


जी.पी. एस. ने नोंदवलेली  बळवंतगडा वरील पायपीट  


बळवंतगडावर जाण्यासाठी :-
१) रेल्वेने :- कसारा लोकलने किंवा मेल एक्सप्रेस गाडीने कसारा गाठावे. कसारा स्थानका बाहेरुन विहीगावला जाण्यासाठी एसटी बसेस व जीप्स मिळतात. त्याने मालफाट्यावर उतरावे. विहीगावातून माल गावात जाणारा रस्ता इथूनच सुरु होतो. या घाट रस्त्याने १.५०० किमी चढल्यावर डाव्या बाजुस एक पायवाट डोंगरात शिरते. (या ठिकाणी खास अशी खुण नाही रस्त्यावर जे मैलाचे दगड असतात त्यावरील १/४०० आणि १/६०० च्या मध्ये किल्ल्यावर जाणारी पायवाट डाव्या बाजुस आहे.) या पायवाटेने माल गावाच्या दिशेने चढत गेल्यावर १० मिनिटात किल्ल्याच्या उध्वस्त तटबंदीतून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो.
कसार्‍याहून माल गावासाठी थेट जाणार्‍या जीप्स मिळाल्यास त्यांना बळवंतगड फाट्यावर उतरवायला सांगावे.

२) खाजगी वाहानाने :- मुंबई - आग्रा महामार्गावरील कसार्‍याच्या पुढे थळ घाट सुरु होतो. घाटात ३ किमी अंतर कापल्यावर एक रस्ता डावीकडे खोडाळ्याकडे जातो. या रस्त्यावर विहीगाव आहे. विहीगावातून माल गावात एक रस्ता जातो. या रस्त्यावर १/४०० ते १/६०० मैलाच्या दगडा दरम्यान डाव्या बाजूला किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे .


नकाशातून दुर्गभ्रमंती या पुस्तकाचे लेखक महेंद्र गोवेकर यांनी बनवलेला नकाशा


सूचना:-
पावसाळ्यात किल्ल्यावर जाताना बर्‍याचदा आपण धुक्यात हरवतो. अशा वेळी होकायंत्र , किल्ल्याचा नकाशा जवळ बाळगावा . किल्ल्यावर जाण्यापूर्वी किल्ल्याची माहिती जमा करावी . गुगल मॅप वरुन किल्ल्याचा भूगोल जाणून घ्यावा . गावातील स्थानिकांशी संवाद साधावा त्याना माहिती विचारावी.

धुक्यात वाट चुकल्यास घाबरुन न जाता शांतपणे निर्णय घ्यावे. एकावेळी एका टिमनेच रस्ता शोधण्यासाठी जावे. एकाच वेळी सर्वांनी वेगवेगळ्या दिशेला जाउ नये. ठरलेल्या ठिकाणी वेळेवर परत यावे. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी शिट्टी जवळ बाळगावी . वारा, पावसाळ्यात झाडावर पडणार्‍या पाण्याच्या, ओढ्या, धबधब्यांच्या आवाजामुळे आपले आवाज विरुन जातात अशावेळी शिट्टीचा उपयोग होतो.

रस्ता शोधण्याच्या नादात वेडी साहस करु नयेत. रस्ता न मिळाल्यास गावात सुखरुप परत जाउन वाटाड्या बरोबर घ्यावा . 



9 comments:

  1. मस्त महिती अमित
    आणि फोटो पण मस्तच आहेत
    भरभरुन धुकं ठरला प्लॅन चुकवतं कधी कधी पण तो अनुभव तुफान असतो.
    आवडली महिती.

    ReplyDelete
  2. अमित, मस्त माहिती !तुझ्या आगामी मोहिमे करीता आगाऊ शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  3. अमित (डोंगर भाऊ) मस्त. छान वाटल हा ब्लॉग वाचून. बलवंत गडा बद्दल वाचले देखिल होते. परंतु आपला ब्लॉग वर वचताना मजा आली. आपण दिलेली माहिती खरोकरच इंफोर्मेटिव आहे. आमच्या सारख्या डोंगर भटक्यां साठि ब्लॉग पर्वणी.

    ReplyDelete
  4. अमित अतिशय आभ्यासपुर्ण व उपयुक्त माहिती मार्गदर्शक लेख व सोबत नवीन लोकांसाठी मार्गदर्शक तत्वा.

    ReplyDelete
  5. प्रसाद कुलकर्णीMay 25, 2018 at 6:42 PM

    छान माहीती

    ReplyDelete
  6. फारच छान कार्य .. अप्रतिम माहिती

    ReplyDelete
  7. लेख नेहमीप्रमाणेच छान! पण लेखाच्या शेवटी दिलेल्या सुचना खुप महत्वाच्या, ट्रेकिंगच्या प्रदीर्घ अनुभवातून आलेल्या आणि प्रसंगी उपयोगी पडतील अश्या.

    ReplyDelete