|
रडतोंडी घाट |
अफजलखानाचा वध हे शिवचरित्रातले एक रोमहर्षक प्रकरण आहे . लहानपणापासून विविध पुस्तकात , व्याख्यानातून ऐकून हे प्रकरण पक्के डोक्यात बसले होते. प्रतापगडच्या खाली जावळी खोर्यात लढलेली लढाई म्हणजे छ. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या भूगोलाचा केलेला उत्तम उपयोग आहे. या लढाईचा भूगोल रडतोंडीचा घाट, पारघाट आणि प्रतापगड या तीन ठिकाणां भोवती फ़िरतो. त्यामुळे ही त्रिस्थळी भटकंती आणि सोबत मधुमकरंदगड आणि हातलोट घाट भटकंती करायचे पक्के केले.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही ६ जण रात्रभर प्रवास करुन पहाटे महाबळेश्वर - पोलादपूर रस्त्यावर महाबळेश्वर पासून ६ किलोमीटरवर असलेल्या मेटतळे या गावी पोहोचलो . अजून अंधार होता . प्रवासाने अंग आंबले होते . आजचा पूर्ण दिवस धावपळीचा असणार होता त्यामुळे थोडावेळ झोप काढणे आवश्यक होते. मेटतळ्यातल्या कुंभळजाई मंदिराच्या ओसरीत पथार्या पसरल्या आणि स्लीपिंग बॅग मध्ये घुसलो . पण पहाटेची थंडी आणि स्लिपींग बॅग मध्ये शिरणारा वारा यामुळे सगळे जण झोपण्याचा प्रयत्न करत होतो तोवर झुंजूमुंजू झाले . सगळ्यांना उठवून रस्त्यावरच्या एका हॉटेलात चहा नाश्ता करुन रस्त्याने पोलादपूरच्या दिशेने चालत निघालो.
|
कुंभळजाई मंदिर, मेटतळे |
गाव संपते तेथे सध्या ओंकार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या पुढे रस्ता एक मोठे वळण घेतो . या वळणावरच डाव्या बाजूला रडतोंडी घाटाचे सध्याचे तोंड आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीच्या मध्ये असलेल्या चिंचोळ्या जागेतून आपण रडतोंडी घाटात पाउल ठेवतो . दोन तीन मिनिटे दाट झाडी आणि अरुंद पायवाटेवरुन उतरल्यावर आम्ही एका पठारावर पोहोचलो. येथून समोर प्रतापगड किल्ला आणि डाव्या बाजूला मधु मकरंदगड किल्ला दिसत होता. आज हे दोन्ही किल्ले पाहायचे होते .
|
रडतोंडी घाटाचे तोंड |
गजाननाचे दर्शन घेऊन डांबरी सडकेने २ किलोमीटरवरील पार गाव गाठले. अफजलखाना बरोबर जावळीत उतरलेले १५,००० सैन्य या गावाच्या आजूबाजूला कोयना नदीच्या काठाने पसरलेले होते . तेथेच त्यांच्या छावण्या पडल्या होत्या. पार गावात जिर्णोध्दार केलेले पूरातन रामवरदायिनी मंदिर आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे. मंदिरात देवीची नवीन मुर्ती बसवलेली आहे. जुन्या झिजलेल्या मुर्ती, वीरगळ मंदिराच्या आवारात पाहायला मिळतात. मंदिरातून आणि गावातून प्रतापगड दिसतो. कोकणातून घाटावर जाणार्या प्राचीन पार घाटावर लक्ष ठेवण्यासाठी छ. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्याची निर्मिती केली होती.
|
पार घाट मागे प्रतापगड |
रामवरदायिनीचे दर्शन घेउन आम्ही मंदिरा समोरील टेकडीवर जाणारी वाट पकडली. गावातील घरांमधून जाणारा रस्ता टेकडीच्या पायथ्यापर्यंत जात होता. टेकडीच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आहे. त्या टाकीतील पाणी पाईपातून प्रतापगडावर नेलेले आहे. पार घाटाच्या वाटनेच हे पाईप टाकलेले आहेत. त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता नाही. टेकडीचा खडा चढ चढून १० मिनिटात माळरानावर आलो. दुपारच उन चांगलेच तापलेले होते. पटापट पाय उचलत झाडीत शिरलो. वाट अजूनही खड्या चढाईचीच होती, पण सावलीमुळे सुसह्य झाली. साधारण अर्ध्या तासात पायवाट एका कड्या जवळ आली तेथून प्रतापगडचे दर्शन झाले. वाट संपली त्या ठिकाणी एक विहिर आहे . विहिरीच्या वरच्या बाजूला एकेकाळी बांधलेल्या सरकारी रेस्ट हाउसचे अवशेष आहेत. हे अवशेष पार केल्यावर अफझलखानाच्या कबरीपाशी पोहोचलो. अफ़जलखानाची कबर जेथे आहे त्याला जनीची टेंब किंवा छावणीचे टेंब म्हणतात. ही जागा एका बाजूने प्रतापगडाच्या डोंगराला जोडलेली आहे आणि इतर तीन बाजूंना दरी आहे. छावणीची जागा पार गावातून दिसत नाही, पण प्रतापगडावरुन त्यावर बारीक लक्ष ठेवता येते. अफ़जलखानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी त्यांच्या सैन्याची जी व्यूहरचना केली होती त्यासाठी या भागातल्या डोंगरसोंडा, घळी, घाटवाटा जंगले यांचा व्यवस्थित उपयोग केला होता. छावणीच्या टेंबेच्या खालच्या बाजूला असलेल्या डोंगरसोंडाच्या घळीत, जेधे, शिमळकर, पासलकर, बांदल यांचे सैन्य लपून बसले होते. प्रतापगडावर हल्ला झालाच तर त्याचा प्रतिकार हे सैन्य करणार होते. पारघाटात कोकणाच्या बाजूला मोरोपंत पिंगळे पायदळासह लपून बसले होते. घाटवाट रोखणे आणि तोफ़ेची इशारत होताच खानाच्या पार गावात कोयनेकाठी असलेल्या सैन्यावर चालून जाणे ही जबाबदारी त्यांच्यावर होती. आंबेनळी घाटात नेताजी पालकर आपल्या घोडदळासह लपून बसले होते. खानाच्या पार मधील घोडदळावर हल्ला करुन मग थेट वाईच्या छावणीवर हल्ला करायची जबाबदारी त्यांच्याकडे होती. रडतोंडी घाटात बाबाजी भोसले घोडदळासह लपून बसले होते. खानाच्या सैन्याने वाईकडे पळायचा प्रयत्न केल्यास त्यांना अडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. आज रडतोंडी घाट उतरुन पार घाटाने अफ़जलखानाच्या कबरी पर्यंत आल्यावर महाराजांनी केलेल्या या व्युहाची बर्यापैकी कल्पना आली. महाराजांच्या सैन्याने जावळीतून जाणार्या सर्व घाटवाटा ताब्यात घेतलेल्या होत्या. खानाच्या सैन्याची जावळीतून सुटका होण्याची शक्यताच नव्हती.
|
अफ़जलची कबर, प्रतापगड |
अफ़जलच्या कबरी जवळ पोलिस बंदोबस्त असल्याने कबरीच्या खालच्या बाजूने वळसा घालून प्रतापगडाकडे गेलो. पार गावातून प्रतापगडावर पोहोचण्यास आम्हाला १ तास लागला. प्रतापगडावर अनेक वेळा येउन गेल्याने फक्त थंडगार ताक पिउन परतीचा मार्ग धरला . आल्या मार्गाने पारघाट उतरून पार गावात पोहोचलो .
|
प्रतापगड, पारघाटातून |
रामवरदायिनी मंदिरात येउन मंदिराच्या परीसरातील एका झाडाखाली बसून आमच्या शिदोर्या सोडल्या . पोट भरल्यावर तिथेच मस्त ताणून द्यायचा मोह होत होता . पण आजचा पुढचा टप्पा मधुमकरंदगड अजून गाठायचा होता. चांगली झोप मिळाल्याने आमच्या गाडीचा चालक ताजातवाना झाला होता.
|
GPS ने रेकॉर्ड केलेली रडतोंडी घाट - शिवकालीन पूल - पारघाट भटकंती, नकाशा :- महेंद्र गोवेकर |
गाडीने तासभरात मधुमकरंदगडाच्या पायथ्याच्या चतुरबेट गावात पोहोचलो. गावाच्या पुढे एक कच्चा रस्ता गडाच्या माचीवरील घोणसपूर गावात जातो. दिड तासात घोणसपूर गाठले. मधु गडावर जाण्यासाठी वाटाड्या हवा होता, पण कोणी सापडले नाही .
|
मधुमकरंदगड |
गावाच्या वरच्या अंगाला मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिरात सामान टाकून गडाच्या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट पकडली . किल्ल्याचा चढ खडा आहे. त्यातही हा भाग उघडा बोडका असल्याने उन्हाचा ताप जाणवत होता. प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो तेंव्हा सगळेच घामाने न्हाऊन निघालो होतो . येथे दगड फोडून किल्ल्याचे प्रवेशद्वार बनवलेले होते. त्यामुळे या प्रवेशव्दाराला नैसर्गिक संरक्षण मिळालेले होते. प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर एक वाट किल्ल्याच्या माथ्यावर जाते तर उजवीकडे जाणारी वाट किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालून किल्ल्याच्या मागच्या बाजूला जाते . चढाई करुन सगळे थकले होते त्यामुळे प्रथम सपाटीने सावलीतून जाणारी वाट पकडली. या वाटेने १० मिनिटे चालत गेल्यावर किल्ल्याच्या पिछाडीला असलेल्या मोठ्या खांब टाक्यापाशी पोहोचलो . या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही आहे. खांबटाके पाहून आलो त्या मार्गाने परत फ़िरलो, खांबटाक्या जवळच गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. या पायऱ्या ठिकठिकाणी मोडलेल्या आहेत त्यावरुन जपून चढत गडमाथ्यावर पोहोचलो. गडमाथ्यावर मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिरा बाहेर उघड्यावर नंदी आहे . मंदिराच्या समोरच्या बाजूला एक उध्वस्त वास्तूचा चौथरा आहे . त्या चौथऱ्यावर वास्तूचे दगड वापरुन एक समाधी बनवलेली आहे . मंदिराच्या मागच्या बाजूला कोणतेही अवशेष नाहीत .मकरंदगडावरुन महाबळेश्वरचा डोंगर, चकदेव, पर्वत, मधुगड , रसाळ, सुमार आणि महिपतगड हे किल्ले दिसतात .
|
मल्लिकार्जुन मंदिर, मधुमकरंदगड |
|
खांबटाके, मधुमकरंदगड |
|
दगडातला बोगदा , मधुमकरंदगड |
मकरंदगडाच्या माथ्यावरुन उतरण्यासाठी मळलेली वाट आहे. या वाटेने उतरताना मध्ये एक वेगळाच दगड पाहायला मिळला. पाणी आणि वाऱ्यामुळे या दगडाची झीज होवून त्यातून आरपार बोगदा तयार झालेला आहे. येथून खाली उतरल्यावर गडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचलो. या ठिकाणी डावीकडे वळून डोंगराच्या कडेने जाणाऱ्या वाटेने चालत जाताना उजव्या बाजूला एक सुकलेले टाके दिसले. पायवाटेने पुढे निघालो. वाटेवर गवत फार माजले होते. सूर्यास्ताची वेळ पण झाली होती. आज मधु गडावर पोहोचता येणार नाही याची जाणीव झाली. त्यामुळे परत फिरलो. मल्लिकार्जुन मंदिराच्या आसपास पाणी नाही. त्यामुळे सर्व सामान घेउन गावात गेलो. गड चढताना जंगमकाका भेटले होते. त्यांच्या घरी गेलो मस्त स्वच्छ सारवलेले अंगण होते. बाजूलाच शेतात काळा घेवडा लावलेला होता . शेताच्या कडेला उघड्यावर बाथरुम आणि चोवीस तास पाणी असलेला नळ होता. अंधार पडल्याने थंडीही वाजायला लागली होती. पण दिवसभरचा थकवा घालवण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करायची मनाची तयारी केली. हे पाहील्यावर जंगमकाकांनी चुलीवर गरम करुन पाणी आणून दिले. जेवणासाठीही त्यांची चूल वापरण्याची परवानगी दिली. गरमागरम खिचडी खाऊन त्यांच्या अंगणातच झोपायचे ठरवले होते भरल्या पोटी पुन्हा सर्व सामान घेउन मल्लिकार्जुन मंदिराकडे जायचा कंटाळा आला होता. आम्ही अंगणात झोपतोय बघून जंगमकाकानी आम्हाला ओसरीत झोपायला सांगितले. रात्री दव पडत असल्याने अंगणात झोपू नका अस त्यांचे म्हणणे होते. आम्ही सुध्दा आयत्या मिळालेल्या ओसरीत हातपाय पसरले.
जंगमकाकां बरोबर ओसरीवर गप्पांचा फड जमवला. घोणसपूर गावात जंगम लोकांची वस्ती आहे. हे जंगम लोक जावळी परीसरातील अनेक घराण्यांचे पिढीजात पुजारी आहेत . त्यामुळे गाव पूर्णपणे शाकाहारी आहे . गावात गायी गुरे आहेत पण कोंबड्या पाळत नाही . गावात आणि देवळात मांसाहार करण्यास बंदी आहे . तसा फलक मल्लिकार्जुन मंदिराजवळ लावलेला आहे . गावाची लोकसंख्या ४०० आहे पण गावात सध्या ४० लोकच राहातात . बाकीचे शिक्षण, नोकरी धंद्या निमित्ताने मुंबई पुण्याला असतात . गावात राहाणार्यांचे जीवन कष्टमय आहे. गावात चौथीपर्यंत शाळा आहे. पुढच्या शिक्षणासाठी मुलांना रोज अडीच तास चालत डोंगर उतरुन जावे लागते. कुठलीही वस्तू, डॉक्टरसाठी महाबळेश्वर गाठावे लागते. पण गावातली लोक मेहनती आणि आनंदी आहेत. चतुरबेट ते घोणसपूर हा रस्ता गावातल्या लोकांनीच श्रमदानातून बनवलेला आहे. त्यातला काही भाग वनजमिनीतून जात असल्याने पक्का रस्ता होत नाही. गावात १२ महिने २४ तास झऱ्यांचे पाणी आहे. तेच पाईपातून सर्व घरात खेळवलेले आहे .
|
मधुमकरंदगड ते हातलोट गाव |
|
मधुमकरंदगड ते हातलोट गाव |
दुसर्या दिवशी सकाळी मधुगडावर आमच्या सोबत येण्याचा काकांना आग्रह केला. पण गवत खूप माजले आहे आणि वाट मोडल्यामुळे रोपची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मधुगडावर न जाता थेट हातलोट गावात उतरण्याचे ठरवले. दिवसभरच्या पायपीटीमुळे स्लीपिंग बॅग मध्ये शिरल्या शिरल्या डोळा लागला . सकाळी ४ वाजण्याच्या आसपास थंडीने जाग आली . सगळेच चुळबुळ करत होते . घराच्या बंदिस्त ओसरीवर थंडीने ही हालत केल्याने मल्लिकार्जुन मंदिरात न जाण्याचा निर्णय योग्य होता याची खात्री पटली. सकाळी सहाचा गजर वाजला पण कोणी स्लीपिंग बॅगेच्या बाहेर पडायला बघत नव्हते. शेवटी नाईलाजाने एकेकजण उठला. मॅगी आणि चहा पिउन ८ वाजता वाटेला लागलो. मल्लिकार्जुन मंदिरा मागून जाणारी ठळक पायवाट हातलोट गावात जाते. वाटेवर दाट जंगल आहे. त्यामुळे सकाळच्या प्रसन्न वातावरणात सगळे जण झपाझप चालत तासभरात हातलोट गावात उतरलो . गावाच्या मधून जाणाऱ्या ओढ्यावर पक्का पूल आहे तो ओलांडून पलीकडे आल्यावर तेथे आमचा चक्रधारी गाडी घेउन उभा होता. गाडीत सामान टाकले. पाठपिशव्या आवश्यक सामानाने आणि पाण्याने भरुन घेतल्या . हातलोट घाटाने आम्ही कोकणातील खेड पासून ३५ किलोमीटरवर असणाऱ्या बिरमणी गावात उतरणार होतो . आमच्या चक्रधारीला तिथे कसे पोहोचायचे ते समजवून सांगितले. त्याला हातलोट - पोलादपूर - कशेडी घाट - भऱणा नाका - बिरमणी या मार्गे वळसा घालून यायचे होते . तर आम्ही घाटावरुन थेट बिरमणी गावात उतरणार होतो. या भागात अजून एक बिरमणी गाव आहे. गुगल मॅपवर बिरमणी टाकल्यावर हेच गाव दिसते. पण हे बिरमणी गाव सातारा जिल्ह्यात हातलोटच्या जवळ आहे. त्याला स्थानिक लोक "वरची बिरमणी" आणि "कोकणातल्या बिरमणीला "खालची बिरमणी’ म्हणतात.
|
हातलोट गाव ते घाटमाथा, हातलोट घाट |
गावातील सर्व लोक कामावर गेल्यामुळे गावातून रस्ता दाखवायला कोणी मिळत नव्हते . शेवटी श्री अंबरे घाटमाथ्यापर्यंत यायला तयार झाले. ओढ्याच्या काठाने घाटमाथ्यापर्यंत रस्ता बनवायचे काम मायबाप सरकारने कधीकाळी चालू केलेले. ते बंद पडून आता त्यावर रान माजलय. या रस्त्याने चालायला सुरुवात केली. अर्ध्या तासाने एक ओढा ओलांडला. पुढे दुसरा ओढा ओलांडल्यावर पाण्याची टाकी दिसली. त्यातून गावाला पाणीपुरवठा होतो . पुढे रस्त्याने चालत गेल्यावर मराविमचा ट्रांसफॉर्मर आहे. तेथे डाव्या बाजूला झाडीत समाधीचा दगड आहे. त्यावर सूर्य चंद्र कोरलेले आहेत. बाकीचे कोरीवकाम अस्पष्ट झालेले आहे. या ठिकाणी कच्चा रस्ता सोडून पायवाटेने ओढा ओलांडून डाव्या बाजूच्या खिंडीच्या दिशेने चालत निघालो. हातलोट गावापासून खिंडीत पोहोचायला एक तास लागला. या खिंडीत एक पाण्याचे टाक आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या जवळ काही कोरलेल्या पायऱ्या आहेत . येथून दोन डोंगरा मधील नाळेतून उतरायचे होते. आंब्रेकाका इथून आमचा निरोप घेणार होते त्यामुळे पुढची वाट दाखवण्यासाठी त्यांनी आम्हाला बाजूच्या डोंगरावर नेले. तिथून खाली घनदाट जंगल दिसत होते. नाळेतून उतरुन खाली आल्यावर डावीकडे जायचे होते. चूकूनही उजवीकडे जाऊ नका नाहीतर जंगलात हरवाल असे काकांनी दोनदा बजावून सांगितले. चालताना आवाज करत /गप्पा मारत जा कारण या भागात जंगली जनावरांचा वावर आहे.
|
समाधी, हातलोट घाट |
|
टाकं, हातलोट घाट |
आंब्रेकाकांचा निरोप घेऊन हातलोट घाट उतरायला सुरुवात केली. मधुमकरंदगडा मागच्या डोंगररांगेत उगम पावणारी जगबुडी नदी खेड या व्यापारी मार्गावर असणार्या प्राचीन गावाजवळून वाहाते आणि पुढे वाशिष्टी नदीला मिळते. वाशिष्टी नदी दाभोळ जवळ समुद्राला मिळते. दाभोळ हे प्राचीन बंदर आहे. तसेच वाशिष्टी नदीला मिळाणार्या कोडजाई नदीवर पन्हाळेकाजी हे प्राचीन बंदर आहे. या दोन्ही बंदरात उतरणारा माल व्यापारी मार्गाने खेड - हातलोट घाट मार्गे घाटमाथ्यावर जात असे. पन्हाळेकाजी आणि खेड जवळील लेणी तसेच जगबुडी नदीच्या खोर्यावर नजर ठेऊन असलेले रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे किल्ले आणि घाट माथ्यावरील मधुमकरंदगड प्राचीन व्यापारी मार्ग अधोरेखित करतात. आजही हातलोट घाट थोड्याफ़ार प्रमाणात वापरात आहे. घाटावरचे धनगर आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन याच घाटमार्गाने कोकणात उतरतात.
|
दगड आणि दगडच, हातलोट घाट |
हातलोट घाटाच्या सुरवातीला असलेल्या नाळेच्या दोन्ही बाजुला उंच डोंगर आहेत. या डोंगरावरुन दरवर्षी पडणार्या दगडांनी नाळेतील वाट बिकट केलेली आहे. आम्ही दगड धोंड्यातून उतरायला सुरुवात केली . ही वाट फारशी वापरात नसल्याने प्रत्येक हलणार्या दगडावर जपून पाय ठेवत चाचपून पुढे जाव लागत होते . त्यामुळे सर्वांचा वेग कमी झाला होता . समाधानाची गोष्ट म्हणजे पूर्ण वाटेवर दाट जंगल आहे त्यामुळे उन्हाचा त्रास होत नव्हता. उतरताना दिड तास होवून गेला तरी उतार आणि दगड संपायला तयार नव्हते . पण बऱ्यापैकी खाली उतरलो होतो कारण आता एक ओढा आमची सोबत करत होता. हा ओढा दोनदा ओलांडावा लागला . ओढा ओलांडल्यावर वाट हरवायची त्या ठिकाणी कोणीतरी दगडांची लगोरी रचून ठेवलेली असे. ती शोधतच आम्ही पुढे जात होतो . साधारणपणे २ तासाने सपाटीवर पोहोचलो . याठिकाणी डावीकडची वाट पकडायची होती . पण दाट झाडी आणि उंच गवतामुळे डावीकडे वळणारी वाट दिसेना. त्यामुळे ठळक पायवाट पकडून पुढे निघालो पण ती पायवाट जंगलात शिरली. आपण वाट चुकून भलतीकडेच जातोय हे आम्हाला थोड्या वेळात लक्षात आले. त्यामुळे मागे फ़िरुन एका आंब्याच्या झाडाखाली सर्वजण थांबलो. सगळ्यांनी फ़िरुन शक्ती वाया घालवण्यापेक्षा दोन जणांनी उजवीकडे आणि दोन जणांनी डावीकडे १५ मिनिटे वाट शोधून परत याच ठिकाणी यावे असे ठरवले. उजवीकडे जाणारी वाट जंगलात चालली होती. डावीकडच्या वाटेवर १० मिनिटात शेतासाठी बांधलेले बांध दिसायला लागले. बर्याच वर्षापूर्वी इथे शेती करणे सोडून दिले होते. पण गाव जवळ असल्याची ही खूण होती. त्यामुळे सर्वांनी डोंगर उतारावर असलेल्या शेतांमधून खाली उतरायचे ठरवले. अर्ध अंतर उतरुन गेल्यावर समोरच्या झाडीत दोन घरे दिसली त्यामुळे हुरुप आला आणि ५ मिनिटात आम्ही जगबुडी नदीवरील पुला समोर उभे होतो. पूल ओलांडून आम्ही बिरमणी गावात पोहोचलो. घाटमाथा ते बिरमणी गाव अंतर कापायला आम्हाला अडीच तास लागले होते (चुकल्यामुळे अर्धा तास गेला). मधुमकरंदगडा वरुन बिरमाणी पर्यंत चार साडेचार तासात आम्ही ४००० फ़ूट उतरुन आलो होतो.
|
जंगलात हरवलेली वाट, हातलोट घाट |
दोन दिवसात जावळीच्या खोर्यात मस्त तंगडतोड भटकंती झाली. दिवसा उन्हामुळे घामाघूम आणि रात्री कडाक्याची थंडी असा दोन टोकाचा अनुभव घेतला. जावळीच्या खोर्याची विविध रुप पाहायला मिळाली.
|
जगबुडी नदीवरील पुल, बिरमणी |
|
GPS ने रेकॉर्ड केलेली चतुरबेट - मधुमकरंदगड - हातलोट घाट - बिरमणी भटकंती, नकाशा :- महेंद्र गोवेकर |
रडतोंडी घाट - पारचा शिवकालिन पूल - पार घाट - प्रतापगड हा अर्ध्या दिवसाचा सुंदर ट्रेक आहे. यासाठी वाटाड्याची आवश्यकता नाही.
चतुरबेट - मधुमकरंदगड - हातलोट गाव हा ट्रेकही सोपा आहे. यासाठी वाटाड्याची आवश्यकता नाही.
हातलोट गाव - हातलोट घाट - बिरमणी हा ट्रेक मध्यम स्वरुपाचा आहे. यात वाट चुकण्याची शक्यता असल्याने वाटाड्या सोबत घ्यावा. पावसाळ्यात या भागात जळवा असतात.
बिरमणीहून खेड करीता एसटी बस सकाळी ११.०० आणि संध्याकाळी ६.०० (मुक्कामी) आहे. बिरमणीहून ५ किलोमीटर चालत आल्यावर आपण खेड - वडगाव रस्त्यावर पोहोचतो. याठिकाणी खेड - वडगाव मार्गावर धावणार्या बस मिळतात. खेड ते बिरमणी अंतर ३५ किलोमीटर आहे.
चोंढ्या घाट ते उंबरदरा (घाटघर परिसरातली भटकंती, One day trek near Mumbai, Nashik) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.
#madhumakrandgad#pratapgad#radtondighat#parghat#shivkalinpul#par#pratapgad#hatlotghat#