Thursday, April 4, 2019

वीरगळ , सतीशिळा , गध्देगळ , धेनुगळ (Hero Stone, Sati Stone, Gadhhegal, Dhenu (Cow) Stone)

Veergal (Hero Stone) at Bhairavgad (Shirpunje)

प्रत्यक्ष किल्ल्या बरोबर, किल्ल्या खालचे गाव, किल्ल्या पर्यंत जाणारे रस्ते यावर अनेक ऐतिहासिक खुणा, अवशेष विखुरलेले असतात . किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात देवळात किंवा पारावर अनेकदा वीरगळ, समाध्या, सतीचे हात, तुळशी वृंदावन, छत्री इतिहासाचे साक्षिदार इत्यादी पाहायला मिळतात. युध्दात कामी आलेल्या वीरांसाठी, गोरक्षण करतांना धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारके म्हणुन वीरगळ उभारले जात असत. या स्मारकांमुळे पुढील पिढीला प्रेरणा मिळत असे. त्या वीरांबरोबर सती गेलेल्या स्त्रीयांसाठी सतीचा हात उभारला जात असे. तर मातब्बर सरदार, राज घराण्यातील लोक यांच्या समाध्या व स्त्रीयांसाठी तुळशी वृंदावन उभारले जाई.

देवळाच्या आवारात दिसणारे वीरगळ

शेंदुर / रंग लावून विद्रुप केलेले वीरगळ 

वीरगळ :-

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गावात आढळ्णारे वीरगळ हा खरतर आपला ऐतिहासिक ठेवा आहे पण अती परिचयामुळे एकतर त्याचा शेंदुर फासून देव बनवलेला असतो किंवा दुसरे टोक म्हणजे पायरीचा, कपडे धुण्याचा दगड म्हणूनही वापर केलेला पाहायला मिळतो.  पूरातत्व खात्याने केलेल्या औसा, परांडा इत्यादी किल्ल्याच्या डागडूजीमध्ये वीरगळीचे तुकडे तटबंदीत वापरलेले पाहायला मिळतात. शिलाहार काळापासून साधारणपणे सतराव्या शतकापर्यंत वीरगळ बनवण्याची प्रथा चालू होती.  वीरगळ ही स्मृती शिळा आहे. युध्दात, गोधनाचे रक्षण करताना, एखाद्या पवित्र कार्यासाठी बलिदान करतांना जर एखाद्याला वीर मरण आले, तर त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ वीरगळ उभारला जात असे. त्यापासून पुढच्या पिढीलाही आपल्या धर्मासाठी, राजासाठी लढण्याची, बलिदान करण्याची प्रेरणा मिळत असे. 


Veergal (Hero stone), Eksar, Borivali

वीरगळ हा आयताकृती दगडावर कोरलेला असतो. या दगडावर १,२,३ किंवा ४ चित्र (शिल्प) चौकटी कोरलेल्या असतात. सर्वात खालच्या चौकटीत ज्या कारणामुळे योध्याला वीर मरण आले ते शिल्पांकीत केलेले असते. यात वीर युध्द करतांना, गोधनाचे रक्षण करतांना, हिंस्त्र प्राण्याशी लढतांना, शिकार करताना दाखवलेला असतो. दुसऱ्या चौकटीत तो अप्सरांबरोबर दाखवलेला असतो. याचा अर्थ अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत तो स्वर्गसुख उपभोगत आहे असा होतो. त्यापुढील तिसर्‍या चौकटीत ब्राम्हण/ साधू पूजा सांगत आहे आणि वीर एकटा किंवा सपत्नी शंकराच्या पिंडीची पूजा करतांना पाहायला मिळतो. याचा अर्थ त्याने केलेल्या पूण्य कर्मामुळे तो देवाशी एकरुप झालेला आहे. त्याला मोक्ष मिळालेला आहे. या चौकटीच्यावर पिंड, मंगल कलश आणि त्याच्या एका बाजूला चंद्र आणि दुसर्‍या बाजूला सूर्य कोरलेला असतो. याचा अर्थ सूर्य आणि चंद्र असे पर्यंत या वीराची किर्ती आसमंतात राहील. पण सत्य परीस्थिती अशी आहे की, वीरगळावर फ़ार कमी प्रमाणात शिलालेख आहेत. त्यामुळे वीरगळ पाहून त्यातील वीर कोण आहे, कुठल्या युध्दात तो कामी आला आणि वीरगळाचा निर्माता कोण आहे हे सांगता येत नाही. अर्थात याला काही अपवाद आहेत. बोरीवलीतील एकसार भागात असलेल्या वीरगळीवर शिलाहार राजा सोमेश्वर आणि यादव राजा महादेव यांच्यात झालेले नौकायुध्द कोरलेले आहे. अशाप्रकारे नौका युध्द कोरलेली महाराष्ट्रातील ही एकमेव वीरगळ आहे. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर असलेल्या मठ गावात असलेल्या सावंतांच्या वीरगळी आहेत त्यावर शिलालेखही कोरलेले आहेत. या शिलालेखात वीरगळींचा उल्लेख भडखांब म्हणून केलेला आहे.

नौकायुध्द, एकसार , बोरीवली

एकसार , बोरीवली

वीरगळी, मठ, सिंधुदुर्ग

Veergal with inscription at Math, Dist. Sindhudurg

वीरगळींच्या चित्र चौकटींच्या वरच्या भागात कलशा व्यतिरीक्त इतर अनेक गोष्टी पाहायला मिळतात. वीर कोणत्या धर्माचा (हिंदू, जैन बौध्द), कोणत्या पंथाचा (शैव, वैष्णव इत्यादी) उपपंथाचा असेल त्याप्रमाणे शिल्पांकन बदलत जाते.  वीर वैष्णव पंथी असल्यास विष्णू, गाणपत्य पंथीय असल्यास गणपती, बौध्द असल्यास स्तुप पाहायला मिळतो. वीरगळां सारख्याच काही ठिकाणी साधूशिळा पाहायला मिळतात. त्यात पहिल्या चौकटीत साधू ध्यान करत असलेला किंवा आडवा पडलेला दाखवलेला असतो. त्यावरील चौकटीत तो शिवलिंगाची पूजा करतांना दाखवलेला असतो. बहुतेक वीरगळी आयताकृती दगडाच्या एका बाजूला कोरलेल्या असतात. तशाच काही वीरगळी चारही बाजूला कोरलेल्या पाहायला मिळतात. चारी बाजूने कोरीवकाम करण्यासाठी नक्कीच जास्त खर्च येत असणार. त्यामुळे वीराच्या हुद्द्याप्रमाणे ऐपती प्रमाणे (वीर किती सधन आणि मातबर होता) त्याचे वंशज खर्च करुन वीरगळ तयार करत असणार. त्यामुळे काही वीरगळ एकाच बाजूला कोरलेल्या तर काही  चारही बाजूंनी कोरलेल्या पाहायला मिळतात. वीरगळीसाठी वापरला जाणारा दगड, त्यावरील कलाकुसर या गोष्टीही खर्चिक असल्याने जवळपास उपलब्ध होणारा दगड वापरुन कमीत कमी कलाकुसर केलेल्या वीरगळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याउलट एकसारच्या वीरगळी राजाने त्याच्या विजया निमित्त उभारल्यामुळे त्यासाठी बाहेरुन आणलेला उत्कृष्ट दगड, त्यावरील सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. 

Paliya Stone near Hatgad

Paliya Stone near Hatgad

किल्ले, डोंगर दर्‍या फ़िरतांना आदिवासी / वनवासी वस्ती, पाड्याजवळ एखाद्या उभ्या लाकडी फ़ळीवर कोरलेले चक्र/फ़ूल त्या खाली कोरलेल्या सुर्य - चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली कोरलेली घोड्यावर बसलेल्या किंवा युध्द करणार्‍या वीराची प्रतिमा पाहायला मिळते. या असतात आदिवासी वीरांच्या वीरगळी. याशिवाय दगडात कोरलेल्या वीरगळीत घोड्यावर बसलेला योध्दा दाखवलेला असतो. वरच्या बाजूला सूर्य चंद्र कोरलेले असतात. ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या सेगवा किल्ल्यावर अशी वीरगळ आपल्याला पाहायला मिळते. गंमतीचा भाग म्हणजे त्यावीराचा पोषाख काठेवाडी पध्दतीचा आहे. नगर जिल्ह्यातील भैरवगड (शिरपुंजे) किल्ल्यावर घोड्यावर बसलेल्या वीराची प्रतिमा कोरलेली आहे. नाशिक जिल्ह्याच्या गुजरात सीमेला लागून असलेल्या भागात आपल्याला ४ ते ५ फ़ूट उंच वीरगळी पाहायला मिळतात. गुजरातमध्ये अशा प्रकारच्या वीरगळी आहेत. त्यांना पलिया (paliya stone) नावाने ओळखतात. त्याच शैलीचा प्रभाव या नाशिक जिल्ह्याच्या गुजरात सीमेला लागून असलेल्या भागात असलेल्या वीरगळींवर दिसून येतो.

Hero stone Ballalgad Fort

बौध्द (स्तुप कोरलेली) वीरगळ, नालासोपारा

साधूची वीरगळ, नालासोपारा

वाघदेव :-

डोंगरवाटा धुंडाळतांना काही लाकडी फ़ळ्यांवर सुर्य - चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली कोरलेली वाघाची प्रतिमा पाहायला मिळते. याला आदिवासी लोक "वाघदेव" म्हणतात. लाल, पिवळा, केशरी या नैसर्गिक रंगात वाघदेवाची प्रतिमा रंगवलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी वाघाच्या खाली सापाची प्रतिमाही कोरलेली आढळते. जंगलातील हिंस्त्र श्वापदांपासून आदिवासींचे त्यांच्या गाईगुरांचे रक्षण वाघदेव करतो अशी आदिवासींची श्रध्दा आहे. जंगलाशी नेहमीच संबंध येणार्‍या आदिवासींना वाघ, बिबटे इत्यादी मार्जारवंशीय प्राण्यांकडुन होणार्‍या प्राणघातक हल्ल्याची भिती मनात ठेउनच जंगलात जावे लागते. या भितीतूनच " वाघदेव " या कल्पनेचा जन्म झाला असावा.लाकडी फ़ळीवर कोरलेली वाघदेवाची प्रतिमा असलेले काष्ठशिल्प आदिवासी आदिम काळापासून बनवत असावेत. जंगलात सहजपणे उपलब्ध होण्यार्‍या लाकडावर कोरीवकाम करुन त्याला नैसर्गिक रंगात रंगवून "वाघदेव" तयार केला जातो. त्यानतंरच्या काळात दगडात कोरलेल वाघाच शिल्प (हरिशचंद्र गडावर जातांना टोलार खिंडीत वाघाच शिल्प पाहायला मिळत.) . याशिवाय नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात असलेल्या न्हावीगडावर चढताना, ठाणे जिल्ह्यातील अशेरीगडावर वाघदेव पाहायला मिळतात.

Waghdev Asheri Fort

Waghdev , Nhavigad

Old wooden panels & new cement concrete idol

लाकडावर कोरले जाणारे हे वाघदेव उन पावसाच्या मार्‍याने खराब होत. त्यावर उपाय म्हणुन आताच्या आधुनिक काळात वाघदेवाची सिमेंटची बेढभ आणि भडक रंगात रंगवलेली मुर्ती पाहायला मिळते. काही ठिकाणी अशी वाघ देवांची मंदिरेही पाहायला मिळतात. काळाबरोबर होणार्‍या सिमेंटच्या या आक्रमणामुळे लाकडावर वाघदेव कोरण्याची ही कला आणि पध्दत लुप्त होईल. भारतभर पसरलेल्या जंगलात असलेल्या वाघदेवांची पूजा दरवर्षी "वाघबारसीला" म्हणजेच अश्विन वद्य व्दादशीला होते.

सतीशिळा :-

सतीचा हात Sati Stone
सतीगळ Sati Stone

वीर-सतीगळ
वीर-सतीगळ

वीरांबरोबर सती जाणार्‍या स्त्रियांच्या स्मरणार्थ सतीशिळा बनवल्या जात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळ्णार्‍या सतीशिळांमध्ये स्त्रीचा खांद्यापासून हात चित्रीत केलेला असतो. हा हात कोपरात काटकोनात वळलेला असतो. हातात बांगड्या असतात. हाताखाली दोन प्रतिमा कोरलेल्या असतात. त्या स्त्रीच्या मुलांच्या प्रतिमा असाव्यात. या हाताची रचना आशिर्वाद देणार्‍या हाताप्रमाणे असते. तसेच सतीशिळा देवळाच्या परिसरात उभारल्या जात असत . त्यामुळे सतीशिळेची शेंदुर लाऊन पूजा केल्याचे बर्‍याच ठिकाणी पाहायला मिळते. वीरगळी प्रमाणे एक, दोन किंवा तीन शिल्प चौकटीत सतीशिळा कोरलेली असते. त्यात खालच्या चौकटीत चितेवर बसलेली स्त्री, चितेच्या बाजूला उभी असलेली स्त्री किंवा नवर्‍याच डोक मांडीवर ठेऊन चितेवर बसलेली स्त्री, वाघावर , घोड्यावर बसलेली स्त्री कोरलेली असते. दुसर्‍या चौकटीत नवरा बायको हातात हात घालून उभे राहीलेले दाखवलेले असतात. पहिल्या किंवा दुसर्‍या चौकटीत उजव्या बाजूला सतीचा कोपरापासूनचा हात दाखवलेला असतो. तिसर्‍या चौकटीत नवरा बायको पिंडीची पूजा करतांना दाखवलेले असतात. त्यावर सूर्य चंद्र कोरलेले असतात. वीराबरोबर त्याच्या दोन किंवा तीन पत्नी सती जात असत. त्यांचे प्रतिक म्हणून कोपरात वाकवलेले दोन किंवा तीन हात दाखवलेले असतात. काही वीरगळामध्ये वीराची पत्नी आणि सतीचा हातही दाखवलेला असतो. त्याला वीरसतीगळ असे म्हणतात. ही वीराची आणि सती या दोघांची एकच स्मृतीशिळा असते. 

धेनूगळ :-


धेनूगळ, जि.नांदेड

धेनूगळ, दुंधा किल्ला, जि.नाशिक

धेनूगळ म्हणजे गाय वासरु दगड हे एक दानपत्र आहे. दान दिलेल्या गावाची, जमिनीची सीमा दाखवण्यासाठी धेनूगळ वापरला जात असे. या आयताकृती उभ्या दगडावर गाय आणि वासरू कोरलेले असते. वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात. गाय हे राजाचे प्रतिक असून वासरू हे प्रजेचे प्रतिक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो. या गाय वासरू दगडांवर काही ठिकाणी शिलालेखही कोरलेले पाहायला मिळतात.

गध्देगळ :-

Gadhegal, Karneshwar Temple, Sangmeshwar

Gadhegal, Paranda Fort

प्रजेचा प्रतिपाळ करणार्‍या राजाची आज्ञा प्रजेने मोडली, तर गय केली जाणार नाही हे दर्शविण्यासाठी गध्देगळ कोरले जात असत. गध्देगळ हे दानपत्र होते. शिलाहार राजांच्या काळात चालू झालेली ही गध्देगळावर दानपत्र कोरण्याची प्रथा पुढे यादवांची राजवट ते इस्लामी राजवटी पर्यंत चालू होती. ( साधारणपणे इसवीसन ९०० ते  इसवीसन १६००). महाराष्ट्रात आढळणार्‍या गध्देगळांवरील शिलालेख (दानपत्र) संस्कृत आणि मराठी भाषेत कोरलेले आढळतात.  विजापूर येथिल गध्देगळावरील  शिलालेख फ़ारसी लिपीत आहे.

गध्देगळ हा दगड आयताकृती असून त्याचे ढोबळमानाने तीन भाग होतात.  सर्वात वरच्या बाजूस सूर्य - चंद्र आणि त्यामध्ये कलश कोरलेला असतो.  हि चिन्ह दान देणार्‍या राजाची किर्ती आसमंतात सूर्य - चंद्र असेपर्यंत कायम राहील हे दर्शवणारी असतात.  मधल्या भागात दानपत्र व धमकी कोरलेली असते. दानपत्रात जमिन कोणाला दान केली, कधी दान केली, कोणाच्या उपस्थितीत दान केली, कोणत्या राजाच्या कारर्किर्दीत दान केली आणि दान केल्याला जमिनींच्या सीमा यांचा उल्लेख असतो.  सर्वात खालच्या बाजूला गाढव किंवा घोडा स्त्रीशी संभोग करतांना दाखवलेले असते. दिलेल्या दानाचा दुरुपयोग केल्यास, नियम मोडल्यास काय शिक्षा होईल हे सांगणारी ही शिल्पांकीत केलेली धमकी / शिवी असते. एखाद्या व्यक्तीनं जर, गध्देगळावर लिहिलेल्या मजकुराचं पालन केलं नाही अथवा त्याला विरोध केला तर त्याच्या घरातील स्त्रीसोबत अशारीतीने बळजबरी केली जाईल असा या शिल्पाचा अर्थ आहे. एखाद्याच्या घरातील महिलेसोबत असा प्रकार झाल्यास त्या व्यक्तीचं समाजातील स्थानही डळमळीत होईल. त्यामुळे घाबरून कोणीही राजाज्ञा मोडणार नाही. अशी यामागील कल्पना असावी.  काही गध्देगाळांवर शिलालेख कोरलेले नसतात. केवळ वरची सूर्य - चंद्र पट्टी आणि खालच्या बाजूला गाढव किंवा घोडा स्त्रीशी संभोग करतांना दाखवलेले असते. 

डोंबिवलीतील गावदेवी मंदिराजवळ शिलालेख असलेला गध्देगाळ पाहायला मिळतो. कल्याण जवळ असलेल्या लोणाड (बापगाव) , खराड या गावात, बदलापूर, भांडूप, गोराई इत्यादी ठिकाणी गध्देगाळ सापडलेले आहेत. परांडा किल्ल्यातील हमामखान्यातही एक गध्देगळ ठेवलेला आहे. याशिवाय मंदिर परिसरातही गध्देगाळ पाहायला मिळतात. संगमेश्वर जवळील कर्णेश्वर मंदिर, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले पूरचे नारायणेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळ्याचे वेतोबा मंदिर इत्यादी अनेक ठिकाणी गध्देगळ आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत १०० च्या  वर गध्देगळ सापडलेले आहेत.

गावात सापडलेले वीरगळ, मुर्ती देवळाच्या परीसरात आणून ठेवलेल्या असतात. तसेच हे शेतात, बांधावर सापडलेले वीरगळ मंदिरात आणून ठेवलेले आहेत. या दगडांचे ऐतिहासिक महत्व माहिती नसल्यामुळे काही ठिकाणी त्याची पूजा केली जाते . डोंबिवलीतील गावदेवी मंदिरा बाहेर असणार्‍या गध्देगळावर शनी म्हणून तेलाचा अभिषेक करणा‍र्‍यांची रांग लागलेली असे, सततच्या तेलाच्या अभिषेकामुळे त्यावरील शिलालेख अस्पष्ट झालेला आहे. हा प्रकार  थांबवण्यासाठी शेवटी हा गध्देगळ लोखंडी पिंजर्‍यामध्ये बंद करुन ठेवावा लागला. भांडूप, गोराई येथील गध्देगळाला शेंदूर फ़ासून त्याची पूजा केली जाते. गध्देगळावर अश्लील शिल्प आहे, या कारणास्तव गध्देगाळ नष्ट केला जातो. सध्या पूरचा गध्देगाळ जमिनीत पुरला आहे, तर परुळ्याचा विहिरीत फ़ेकलेला आहे. अशाप्रकारे अजूनही काही ठिकाणचे गध्देगळ नष्ट झाले असण्याची शक्यता आहे.
विहिरीत फ़ेकलेला गध्देगळ 


समाधी :-

किल्ल्यांवर आणि गावांमध्ये आपल्याला अनेक समाध्या पाहायला मिळतात. सुधागड किल्ल्यावर भोराई देवी मंदिराच्या बाजूला असलेल्या माळावर अनेक समाध्या विखुरलेल्या पाहायला मिळतात. समाध्या साधारणपणे आयताकृती किंवा चौरस असतात. ज्याची समाधी आहे त्याच्या हुद्द्याप्रमाणे ऐपती प्रमाणे त्यावर नक्षीकाम केलेले असते किंवा स्थानिक दगडापेक्षा वेगळा दगड वापरलेला असतो. समाधीच्यावर पावले किंवा शिवलिंग कोरलेले असते .राजघराणातल्या व्यक्तींच्या समाध्या सहसा एकाच ठिकाणी कलात्मक पध्दतीने बांधलेल्या पाहायला मिळतात. इस्लामी स्थापत्य शैलीत खाशांच्या कबरींवर घुमट बांधले जात. धुळे  जिल्ह्यातील थाळनेर गावात फारुकी घराण्यातील राजांच्या व महत्त्वाच्या व्यक्तींच्या कबरी आहेत. त्या कबरीवर बांधलेले घुमट, कोरलेले शिलालेख पाहायला मिळतात. या घुमटावरुनच राजस्थानी शैलीतील छत्रीचा उगम झाला. महाराष्ट्रातही छत्री समाध्यांसाठी स्विकारली गेली. त्यामुळे पंधराव्या शतकानंतर बांधलेल्या समाध्यांवर याची छाप दिसते. फ़लटण येथील निंबाळकरांच्या समाध्या, शेगाव जवळच्या बाळापूर गावात जसवंतसिंहाने बांधलेली समाधी यावर राजस्थानी शैलीतील प्रभाव दिसून येतो.





वीरगळ , सतीशिळा , गध्देगाळ , गायवासरु दगड (धेनुगळ) हे काही अपवाद वगळले तर मुकं दगड आहेत. कारण त्यावर कुठलेही लिखाण नसल्यामुळे ते कुठल्या काळातले आहेत, कशा बद्दलचे आहेत हे कळत नाही . शिलालेखामुळे ही उणीव भरुन निघाली आणि दगड बोलके झाले. मौर्य सम्राट अशोकच्या काळात इसवीसन पूर्व तिसर्‍या शतकात शिलालेख कोरण्यास सुरुवात झाली.  आजमितीला महाराष्ट्रात लेण्यामध्ये, किल्ल्यात, मंदिरात, तोफ़ांवर संस्कृत, मराठी, उर्दु, फारसी, पोर्तुगीज, इंग्रजी भाषेतील तसेच ब्राम्ही, देवनागरी इत्यादी लिपीतील  शिलालेख पाहायला मिळतात.

शिलालेख:-


तीन लिपीं मधील शिलालेख, धारुर

Inscription on gate of Narnala Fort

Inscription, Kandhar Fort

शिलालेख

धारुर किल्ल्यावर एकच शिलालेख संस्कृत, उर्दू आणि फारसी लिपींत कोरलेला आहे. शिलालेख विजय संपादन केल्यावर, किल्ला मंदिर, मंदिर, मस्जिद इत्यादींची बांधणी, पूर्न्बांधणीधणीदानपत्र म्हणून जो शिलालेख लिहीलेला असतो. त्यात ५ गोष्टींचा उल्लेख असतो . हे दानपत्र कोणी दिल , कोणाला दिल , कधी दिल , दानात काय दिल आणि त्यावेळी कोणकोण उपस्थित होते याची माहिती कोरलेली असते . किल्ल्याची बांधणी , पूनर्बांधणी केल्यावर करणाऱ्याचे नाव , तारीख , त्या बुरुजाचे, दरवाजाचे नाव कोरलेले असते.  इस्लामी काळात महालामध्ये, मशीदीत कुराणातील वचन, आयता कोरलेल्या पाहायला मिळतात. मंदिरातही अनेक शिलालेख पाहायला मिळतात. त्यात मंदिर बांधणार्‍याचा, त्याचा जिर्णोध्दार करणार्‍याचा उल्लेख केलेला असतो. लेण्यातही दान देणार्‍यांचा नावाचा शिलालेख कोरलेला असतो.

अंतुर किल्ल्या जवळील दिशादर्शक शिळा

याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील अंतुर किल्ल्यापासून नागापूरला जातांना रस्त्याच्या बाजूस डावीकडे एक पूरातन मैलाचा दगड पाहायला मिळतो. त्यावर फ़ारसी भाषेत चार शहरांना जाणारे मार्ग चार बाजूंना कोरलेले आहेत. वीरगळ , सतीशिळा , गध्देगाळ , धेनुगळ, शिलालेख यावर लिहीलेली माहिती बर्‍याचदा त्रोटक असते. त्याकाळाच्या संदर्भात त्यांचा अभ्यास केल्यास बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो, नविन संदर्भही मिळू शकतात.  इतिहासाचे असे अनेक मुक, बोलके साक्षिदार आपल्या आजूबाजूला विखुरलेले आहेत. त्यांच्याकडे डोळसपणे पाहिल तर काळाच्या ओघात इतिहासातील हरवलेले दुवे आपल्याला नक्कीच सापडू शकतात.

गाईंसाठी धारातीर्थी पडलेला वीर, टाकळी ढोकेश्वर

#Herostone#satistone#gadhhegal#dhenustone#

Monday, December 24, 2018

दक्षिण गुजरात मधील किल्ले (Forts in South Gujrat)


दक्षिण गुजरात मधल्या वापी - दमण भागात ६ किल्ले आहेत. मुंबईहून एका दिवसात हे सहा किल्ले पाहून परत येता येते. दक्षिण गुजरात प्रांत महाराष्ट्रातील ठाणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्याने वेढलेला आहे. डांग जिल्ह्यातील घनदाट अरण्यांचा पर्वतीय प्रदेश ते पश्चिम किनार्‍यावरील सुरत, दमण सारखी बंदरे या टापूत दक्षिण गुजरात वसलेला आहे. प्राचिन काळापासून अनेक व्यापारी मार्ग महाराष्ट्रातील बाजारपेठांपासून दक्षिण गुजरात मधील बंदरापर्यंत जात होते. प्राचीन काळी (इसवीसन ९६० ते १२४३) चालुक्यांच्या राजवटीत गुजरातचा परदेशांशी व्यापार भरभराटीला आला होता. इसवीसन १५०९ मध्ये दिव येथे झालेल्या लढाईतील विजया नंतर पोर्तूगिजांनी दमण, सिल्व्हासा या दक्षिण गुजरात मधील भागात आपले बस्तान बसवले. मध्ययुगात सुरत बंदर भरभराटीला आले होते. पोर्तुगिज, इंग्रज ,डच, फ़्रेंच इत्यादी व्यापार्‍यांनी याठिकाणी आपल्या वखारी टाकल्या होत्या. अशा प्राचीन काळापासून गजबजलेल्या या व्यापारी मार्गाच्या आणि बंदरांच्या टेहळणीसाठी तसेच संरक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत किल्ले बांधले गेले. 

यातलेच सहा किल्ले पाहण्यासाठी सकाळीच मुंबईहून ट्रेनने वापी गाठावे. वापीहून खाजगी गाडी केल्यास हे सहा किल्ले व्यवस्थित पाहाता येतात. मुंबईहून खाजगी गाडीनेही हे सर्व किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
     
Entrance Gate of  Parnera Fort

पारनेरा किल्ला (Parnera Fort) :- वापी - सुरत रेल्वेमार्गावर अतुल नावचे स्टेशन आहे. वापीहुन पॅसेंजर ट्रेनने अतुलला जाता येते. अतुल स्थानकातून किल्ल्याचा डोंगर दिसतो. अतुल स्थानक ते किल्ला अंतर २.५ किलोमीटर आहे. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रिक्षाने किंवा चालत जाता येते. रस्त्याने गेल्यास मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वापीपासून २५ किलोमीटरवर पारनेरा किल्ल्याचा पायथा आहे. अतुल या कंपनीची खाजगी मालमत्ता असल्याचा बोर्ड किल्ल्याच्या पायथ्याशी लावलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. तसेच किल्ल्याच्या उतारावर झाडी जोपासलेली आहे. किल्ल्यावर तीन मंदिरे असल्याने येथे भाविकांची कायम वर्दळ असते. किल्ल्याची उंची ४०० फ़ूट आहे. पायथ्यापासून साधारणपणे अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या माथ्यावरील तटबंदी जवळ पोहोचतो. तटबंदी फ़ोडून किल्ल्यात जाण्याचा मार्ग केलेला आहे. त्या मार्गाने किल्ल्यात न जाता उजवीकडे जाणार्‍या पायवाटेने तटबंदीला वळसा घातल्यावर आपण ६ फ़ूट उंच प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दार बुरुजांमध्ये लपवलेले आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर साधारणपणे १० पायर्‍या चढल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. समोरच गडची रुंदी व्यापणारे कालिकामातेचे मंदिर बांधलेले आहे. जवळच हार, फ़ुले, प्रसाद विकणारी काही दुकाने आहेत. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला आहे. माची आणि बालेकिल्ला असे किल्ल्याचे दोन भाग आहेत. दोन्ही भाग तटबंदी आणि बुरुजांनी संरक्षित केलेले आहेत.


Bastion & fortification of Parnera Fort

कालिकामाता मंदिराच्या गाभार्‍याच्या बाजूने गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. बालेकिल्ल्याचा दरवाजा अस्तित्वात नाही. बालेकिल्ल्यावर अनेक उध्वस्त वास्तू पाहायला मिळतात. बालेकिल्ल्यावरुन आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश दिसतो. किल्ल्याच्या जवळून वाहाणार्‍या पार नदीचे पात्रही दूरपर्यंत दिसते. या भागात हा एकमेव डोंगर असल्यामुळे टेहळणीच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्याचे स्थान किती महत्वाचे होते ते लक्षात येते.     

Water Tank on Parnera Fort

या डोंगरावर नक्की किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. पण किल्ल्यावरील टाक्यांची रचना पाहाता चालूक्यांच्या काळात या किल्लाची उभारणी झाली असावी. त्यानंतर पंधराव्या शतकात हा किल्ला रामनगरच्या राजाच्या ताब्यात होता. मोहमद बेगाडाने हा किल्ला जिंकून घेतला. बेगाडाच्या अंतिम काळात या किल्ल्याचा ताबा पेंढारींकडे गेला. त्यावेळी १५५१ मध्ये दोनदा दमणच्या पोर्तुगिजांनी या किल्ल्यावर हल्ला केला. त्यानंतर हा किल्ला ओस पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये हा किल्ला नव्याने बांधून काढला. त्यानंतर हा किला १७८० पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर वेल्सने हा किल्ला जिंकून घेतला.


Chandika Mata Mandir, Parnera Fort

बालेकिल्ल्या वरील वास्तू पाहात आपण चंडीका माता मंदिरापाशी खाली उतरतो. याठिकाणी चंडीका मातेचे आणि हनुमानाचे मंदिर आहे. सर्वत्र संगमरवर आणि पेव्हर ब्लॉक बसवलेले आहेत. मंदिराच्या पुढे गेल्यावर डाव्या बाजूस चांदपीर बाबाचा दर्गा आहे. इथे किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार आणि तिथून खाली उतरणारी पायवाट आहे. दर्गा पाहून पुढे गेल्यावर रामेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी जेथे पायर्‍या आहेत त्या ठिकाणी तीन मोठ्या तोफ़ा बेवारस पडलेल्या आहेत. या किल्ल्याचे अतुल कंपनी आणि मंदिराच्या ट्रस्टने कॉंक्रीटीकरण करुन टाकले आहे. एवढा खर्च केला आहे त्यात ३ चौथरे बांधून हा तोफ़ांचा ऐतिहासिक ठेवा व्यवस्थित ठेवता आला असता. रामेश्वर मंदिर हे किल्ल्याचे उत्तर टोक आहे. ते पाहून पुन्हा माघारी फ़िरुन चंडीकामाता मंदिराच्या बाजूने चालत निघाल्यावर डाव्या बाजूला कातळात खोदलेली ५ पाण्याची टाक आहेत. या टाक्यांच्या बाजूला कॉंक्रीटचे खांब उभारुन पूल बांधलेला आहे. या पुलावरुन आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. किल्ला पाहायला अर्धा तास पुरतो.


Cannons on Parnera Fort

पारनेरा किल्ला उतरुन १ किलोमीटर चालत मुंबई - अहमदाबाद महामार्गावर गेल्यावर पारडी गावासाठी रिक्षा मिळतात. खाजगी वहानाने थेट पारडी गावातील किल्ल्यापर्यंत जाता येते. पारनेरा ते पारडी अंतर ७ किलोमीटर आहे.


Chhatrapati Shivaji Maharaj Statue at Pardi Fort, Gujrat

पारडी किल्ला (Pardi Fort) :- पारडी गावातील भरवस्तीत पोस्ट ऑफ़ीसच्या इमारती मागे एका छोट्या टेकडा वरती पारडी किल्ला आहे. या टेकडीच्या खालून वहाणार्‍या पार नदीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. किल्ल्यापाशी पोहोचलो आणि आश्चर्याचा धक्का बसला. किल्ल्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवलेला होता.


Bastion on Pardi Fort, Gujrat

इसवीसन १६६४ मध्ये छ.शिवाजी महाराजांनी प्रथम सुरत लुटली. मोगलांच्या संपन्न बंदराची पार रया गेली. त्यानंतर छ. शिवाजी महाराजांच्या हल्ल्याच्या अफ़वा उठतच होत्या. इसवीसन १६७० मध्ये छ.शिवाजी महाराजांनी सुरत दुसर्‍यांदा लुटली. त्यानंतर सुरतची होती नव्हती ती पत पण गेली. सुरतेचा व्यापार खालावला. छ.शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत सुरतेवर हल्ला होणार अशा अफ़वा अधूनमधून उठत होत्या. त्यामुळे अनेक व्यापार्‍यांनी स्थलांतर केले. सुरत बंदरातून होणारा व्यापार थंडावला होता. सुरतेवरच्या हल्ल्याने छ.शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली मोगल साम्राज्याची आर्थिक नाकेबंदी झाली होती.


Pardi Fort Gujrat
Pardi Fort Gujrat

पारडी किल्ल्यात काळानुरुप अनेक बदल झाले आहेत. किल्ल्यात शिरताना प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला भव्य अष्टकोनी बुरुज आहे. किल्ल्याचे प्रवेशव्दार नव्याने बांधलेले आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर बुरुज पाहून पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या बाजूला पीर आहे. अजून थोड्या पायर्‍या चढल्यावर डाव्या बाजूला कैद्यांसाठी असलेल्या बॅरॅक्स दिसतात. इंग्रजांच्या काळात किल्ल्याचे रुपांतर जेल मध्ये झाले होते. तर उजव्या बाजूला उध्वस्त वास्तू आहेत. हे पाहून पुढे गेल्यावर किल्ल्यावर असलेल्या पाण्यांच्या टाक्यांपाशी पोहोचतो. पारडी गावाला पाणी पुरवण्यासाठी ह्या टाक्या बांधलेल्या आहेत. हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग आहे. किल्ला पाहून परत हायवे पर्यंत चालत येऊन बागवाडा गावातला अर्जूनगड गाठावा. पारडी ते अर्जूनगड अंतर १२ किलोमीटर आहे. मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील टोल नाका ओलांडल्या रेल्वे लाईन क्रॉस करुन बागवाडा गावात पोहोचता येत. गावाच्या मागे एक झाडांनी झाकलेली टेकडी दिसते. तोच अर्जूनगड आहे.

Bastion on Arjungad, Gujrat

अर्जुनगड (Arjungad) :- एका दंतकथे नुसार अर्जुनाने या ठिकाणीहून सुभद्राहरण केले म्हणून या किल्ल्याचे नाव अर्जूनगड पडले. चिमाजी आप्पांनी हा किल्ला बांधला असे म्हणतात. काही काळ हा किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. अर्जूनगडावर महालक्ष्मीचे देऊळ आहे. त्यामुळे गडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍यांच्या मार्गाने एक मोठ्या बुरुजाला वळासा घालून १० मिनिटात आपण प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. किल्ल्याचे प्रवेशव्दार पूर्वाभिमुख आहे. प्रवेशव्दार, तटबंदी आणि किल्ल्याचे बुरुज बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत. प्रवेशव्दाराच्या आत पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा छोटा घेर दिसतो. किल्ल्याच्या मधोमध महालक्ष्मीचे मंदिर आहे. त्याच्या बाजूला पाण्याचे मोठे टाक आहे. किल्ल्याच्या तटबंदीत ६ बुरुज आहेत. तटबंदी वरुन फ़िरताना दक्षिणेकडे कोलाक नदी दिसते. किल्ला फ़िरायला १० मिनिटे पुरतात.

Temple On Arjungad, Gujrat

Water Tank on Arjungad, Gujrat

Kolak River From Arjungad, Gujrat

अर्जूनगड पाहून झाल्यावर इंद्रगडाकडे मोर्चा वळवावा. अर्जुनगड ते इंद्रगडच्या पायथ्याचे पाली करंबेली गावाचे अंतर २३ किलोमीटर आहे. या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर आहे. मंदिरा पासून एक कच्चा रस्ता इंद्रगडावर जातो. या रस्त्याने इंद्रगडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.

Fortification & Water tank on Indragad

Indragad, Gujrat

इंद्रगड (Indragad):-  गडाच्या डोंगरावर भरपूर झाडे असल्याने गड चढतांना उन्हाचा त्रास होत नाही. गडाच्या तटबंदीला लागून चेडू मातेचे मंदिर बांधलेले आहे. त्यात एक साधू राहातो. या गडाचे प्रवेशव्दार एका अर्धवर्तुळाकार भिंतीमागे लपवलेले आहे. प्रवेशव्दारावर थेट हल्ला करता येऊ नये यासाठी अशाप्रकारे भिंतीची रचना केलेली आहे. या भिंतीत जंग्या आहेत. किल्ल्याचे प्रवेशव्दार शाबूत आहे. पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. प्रवेशव्दाराच्या आत पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. किल्ल्याच्या आत अनेक इमारतींचे अवशेष आहेत. तटबंदीत आणि बुरुजा खाली खोल्या आहेत. एक पाण्याची टाकी आहे. किल्ल्याच्या उत्तरेला एक दरवाजा आहे. या प्रवेशव्दारासमोर सुध्दा संरक्षणासाठी भिंत बांधलेली आहे. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत. त्यावरुन किल्ल्याला प्रदिक्षिणा मारता येते. किल्ल्यावरुन दरोथा आणि दमणगंगा या नद्यांची खोरी दिसतात. या परिसरातला हा सर्वात उंच डोंगर असल्याने खूप मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.

Entrance Gate , Indragad
African Baobab (गोरखचिंच)

इंद्रगड पाहून झाल्यावर दमणगंगा नदीच्या मुखावर असलेले दोन किल्ले मोटी दमण किल्ला आणि नानी दमण (सेंट जेरोम फ़ोर्ट) हे दोन किल्ले पाहाण्यासाठी पाली करंबेली ते मोटी दमन किल्ला हे ६ किलोमीटरचे अंतर कापावे लागते.

Entrance gate of Moti Daman Fort

Trench around Moti Daman Fort

मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort):- दमणगंगा नदीच्या दक्षिण तीरावर मोटी दमण किल्ला आहे. नानी दमण आणि मोटी दमन या दोन किल्ल्यामध्ये मोटी दमण किल्ला आकाराने मोठा आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला. भारत स्वतंत्र झाल्यावर इसवीसन १९६१ मध्ये हा किल्ला भारताच्या ताब्यात आला. सध्या या किल्ल्यात दमण मधली सर्व सरकारी ऑफ़ीसेस आहेत. किल्ल्यात एक लाईट हाऊस आहे. किल्ल्याची प्रवेशव्दारे, तटबंदी, बुरुज आणि किल्ल्याच्या बाहेरील खंदक सुस्थितीत ठेवण्यात आलेला आहे. किल्ल्याला पोर्तुगिज शैलीतील १० पंचकोनी बुरुज आहेत. बुरुजांवर आणि तटबंदीवर पोर्तुगिज बांधणीची खासियत असलेले कॅप्सुल बुरुज आहेत. किल्ल्याला उतरेला आणि दक्षिणेला अशी दोन प्रवेशव्दारे आहेत. प्रवेशव्दारांवर शिलालेख आणि कोट ऑफ़ आर्म कोरलेले आहेत. किल्ल्यात बॉम जिजस चर्च नावाचे चर्च आहे या चर्च मधील लाकडावर केलेले कोरीवकाम पाहाण्यासारखे आहे. मोटी दमण किल्ल्याच्या समोरील किनार्‍यावर नानी दमण किल्ला आहे. मोटी दमण किल्ल्यातून बाहेर पडून दमणगंगा नदीवरील पूल ओलांडून नानी दमण किल्ल्यात जाता येते.

Carving on wood, Church of Bom Jejus

Carving on wood, Church of Bom Jejus

नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) :- दमणगंगा नदीच्या उत्तर तीरावर नानी दमण किल्ला आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला. सध्या या किल्ल्यात शाळा आणि चर्च  आहे. किल्ल्याच्या दमण गंगा नदीकडील दरवाजाने आपला किल्ल्यात प्रवेश होतो. प्रवेशव्दारांवर शिलालेख आणि कोट ऑफ़ आर्म कोरलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला तटबंदीला लागून असलेल्या फ़ांजीवर चढून जावे. फ़ांजीवरुन संपूर्ण किल्ला फ़िरता येतो. किल्ल्याला ३ बाणांच्या आकाराचे बुरुज आहेत. किल्ल्याला पूर्वेला मुख्य प्रवेशव्दार आहे. फ़ांजीवरुन प्रवेशव्दारा पर्यंत उतरण्यासाठी जीना आहे. किल्ल्याच्या या प्रवेशव्दाराच्या बाजूला एक छोटे प्रवेशव्दार आहे. त्याच्या बाजूला किल्ल्या वरची शाळा आणि चर्च आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावर झेंडा लावण्यासाठी असलेला लाकडी खांब आहे. किल्ला पाहाण्यासाठी अर्धा तास पुरतो.

Entrance gate, Nani Daman Fort

St. Jerom Fort (Nani Daman Fort)

Fortification, Nani Daman Fort

दमण मधले हे दोन्ही किल्ले पाहून झाल्यावर १३ किलोमीटरवरील वापी रेल्वे स्टेशन गाठल्यावर आपली ६ किल्ल्यांची भटकंती पूर्ण होते. वापी - पारनेरा किल्ला - पारडी किल्ला - अर्जुनगड - इंद्रगड - मोटी दमण किल्ला - नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) हे अंतर ८५ किलोमीटर आहे. वापीमध्ये ८ तासासाठी , ८० किलोमीटर अंतरासाठी खाजगी गाडी मिळते. या गाडीने सर्व किल्ले एका दिवसात आरामात पाहून होतात. जर मुंबईहून खाजगी गाडी घेऊन येणार असल्यास महाराष्ट्रातला शेवटचा किल्ला बल्लाळगडही पाहून होतो.     

Nani Daman Fort


#fortsinsouthgujrath#onedaytreknearmumbai#indragad#arjungad#pardifort#motidamanfort#nanidamanfort#

Monday, December 3, 2018

नदी पात्रातला थरारक प्रवास (ol njorowa gorge,Hell's Gate National Park., Kenya) Offbeat Kenya


Cycling in Hell's Gate National Park, Kenya

आपण कच्च्या रस्त्यावरुन सायकल चालवतो आहोत. रस्त्याच्या बाजूला पसरलेल्या हिरवळीवर झेब्रे, विविध प्रकारची हरणे , रानडुकर आरामात चरत आहेत. एखाद्या झाडामागून जिराफ़ांचा कळप डोकावून बघतोय अशा स्वप्नवत वातावरणाचा अनुभव हेल्स गेट नॅशनल पार्क मध्ये घेता येतो.

ol njorowa gorge, Hells Gate National Park, Kenya

केनियाची राजधानी असलेल्या नैरोबीपासून ९० किलोमीटरवर नैवाशा तलाव आहे. या तलावा जवळ हेल्स गेट नॅशनल पार्क आहे. ओल्कारीया आणि हॉब्लेज (Olkaria and Hobley's) या दोन जागृत ज्वालामुखींमुळे बनलेल्या विवरात हे अभयारण्य वसलेले आहे. ज्वालामुखीच्या विवरांच्या भिंतीच्या आत वसल्यामुळे अफ़्रिकेतल्या इतर अभयारण्यांच्या मानाने हे खूपच छोटे म्हणजे ६८ स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेले आहे. विवराच्या आत झेब्रे, जिराफ़, विविध प्रकारची हरणे, रान म्हैस, रान डुक्कर, बिबट्या इत्यादी प्राणी आणि असंख्य पक्ष्यांचा वावर आहे.


या अभयारण्यात फ़िरण्यासाठी अनेक रस्ते बनवलेले आहेत. गाडीने अथवा सायकलने या रस्त्यावरुन आपल्याला फ़िरता येते. या अभयारण्याच्या टोकाला "ओल्जोवारा गॉर्ज" (Olnjorowa Gorge) ही एका नदीने खोदून काढलेली दरी आहे. अभयारण्याच्या प्रवेशव्दारापासून साडेपाच किलोमीटरवर या दरीचे प्रवेशव्दार आहे. त्याला हेल्स गेट या नावाने ओळखले जाते. अभयारण्याच्या प्रवेशव्दारावर सायकली भाड्याने मिळतात, आपल्या सोबत एक वाटाड्याही असतो. प्रवेशव्दारापासून हेल्स गेट ते परत असे ११ किलोमीटरचे अंतर सायकलीने पार करावे लागते . तर ओल्जोवारा गॉर्जचा ट्रेक साधारणपणे ३ किलोमीटरचा आहे.

Fischer's Tower (volcanic plug),  Hell,s Gate National Park
volcanic plugs formation

प्रवेशव्दारातून अभयारण्यात शिरल्यावर थोड्या अंतरावर फ़िशर्स टॉवर (Fischer's Tower) नावाचा सुळका दिसतो. हा सुळका म्हणजे ज्वालामुखीच्या विवराच्या तोंडावरचे बुच (volcanic plugs) आहे. जिवंत ज्वालामुखीच्या विवराच्या मुखातील लाव्हारस थंड होऊन घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यावेळी आतील दाब वाढल्यामुळे स्फ़ोट होवून लाव्हारस बाहेर येतो परत थंड होतो. या प्रक्रीयेने विवरच्या तोंडावर या थंड झालेल्या लाव्हारसाचे बूच तयार होते. पावसाने आणि वार्‍याने त्याची झीज होवून वेगवेगळे आकार तयार होतात. फ़िशर्स टॉवर हा सुळका प्रस्तरारोहणाचे तंत्र आणि साहित्य वापरुन चढता येतो. याच बरोबर सेंट्रल टॉवर (Central Tower) नावाचा दंडगोल आकाराचा सुळका (volcanic plugs) या अभयारण्याच्या मध्यावर आहे. "ओल्जोवारा गॉर्ज" मधून सेंट्रल टॉवरच्या पायथ्या पर्यंत जाता येते. 
  
Entry in the ol njorowa gorge,  Kenya

ol njorowa gorge, Hell,s Gate National Park, Kenya
फ़िशर्स टॉवर पासून पुढे गेल्यावर आपण ज्वालामुखीच्या विवरात शिरतो. चारही बाजूला विवराच्या उंचावलेल्या कडा आणि त्यामध्ये पसरलेला गवताळ प्रदेश आणि झाड झुडप दिसायला लागतात. रस्त्या लगतच्या हिरवळीवर अनेक वन्यप्राणी आरामात चरत असतात. अफ़्रिकेतल्या इतर अभयारण्यात फ़िरतांना हेच प्राणी आपल्याला गाडीतून पाहावे लागतात. पण हेल्स गेट नॅशनल पार्क या एकमेव अभयारण्यात आपण त्यांच्या मधून सायकल वरुन फ़िरु शकतो. थांबून फ़ोटोग्राफ़ी करु शकतो. फ़क्त रस्ता सोडून बाहेर जाण्याची परवानगी नाही. प्राण्यांच्या नंदनवनातून आरामात सायकल चालवत, थांबत आम्ही अडीच किलोमीटरचा टप्पा पार केला. त्यानंतर एकदम तीव्र उतार चालू झाला सायकलचा वेग आवरणे मुश्किल होत होते. उतार संपल्यावर विवराच्या भिंती रस्त्याच्या जवळ आल्या. लाव्हा रसामुळे तयार झालेले विविध आकार पाहात पुढचा दोन किलोमीटरचा रस्ता कापला. पुढे एक वळण घेऊन हेल्स गेटपाशी पोहोचलो. या ठिकाणी सायकली ठेऊन पुढचा प्रवास पायी करायचा होता.


ol njorowa gorge, Hell,s Gate National Park, Kenya

ol njorowa gorge, Hell,s Gate National Park, Kenya
इसवीसन १८८३ मध्ये फ़िशर आणि थॉमसन यांनी "ओल्जोवारा गॉर्ज" (Olnjorowa Gorge) ही एका नदीने खोदून काढलेली दरी शोधून काढली. या खोल दरीत उतरणारा चिंचोळा मार्ग आहे त्याला हेल्स गेट असे नाव दिले आहे. या मार्गाने खाली उतरणे थोडे जिकरीचे आहे. खाली उतरल्यावर आपला थेट नदीपात्रात प्रवेश होतो. पायाखाली वाळू आणि त्यातून पाणी वाहात असते. पाऊस पडत असल्यास नदीपात्रात उतरु नका असे फ़लक जागोजागी लावलेले होते. काही ठिकाणी आप्तकालिन बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून कड्यांवरुन गाठी मारलेले मजबूत दोर खाली सोडलेले होते. बर्‍याचदा इथे पाऊस पडला नाही तरी दुसर्‍या भागात पडलेल्या पावसाच्या पाण्याचा लोंढा या चिंचोळ्या जागेत शिरतो असे आमच्या बरोबरच्या वाटाड्याने सांगितले. पुढे गेल्यावर नदी पात्र रुंद होत गेले. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने दोन्ही बाजूच्या भिंतींना दिलेले आकार आणि त्यावर चितारलेली नक्षी पाहात आम्ही पुढे चाललो होतो.  दरवर्षी पाण्याच्या प्रवाहामुळे माती मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे दरी अधिकाधिक खोल होतेय.  

Tough route, ol njorowa gorge, Kenya

साधारणपणे एक किलोमीटर चालल्यावर नदीच्या पात्राला डाव्या बाजूला एक फ़ाटा फ़ुटला होता. या भागाला डेव्हिल्स थ्रोट (Devil's Throat) म्हणतात. या ठिकाणी बाजूच्या भिंतीतून गरम पाणी पाझरत होते. गंधक मिश्रीत गरम पाण्यात पाय बुडवून आम्ही पुढे डेव्हिल्स बेडरुमकडे (Devil's Bedroom) निघालो. समोरुन एक अमेरीकन कुटूंब येतांना दिसले. पुढचा रस्ता कठीण असल्याने ते परत फ़िरले होते. थोडे अंतर चालून गेल्यावर रस्ता बंद झाला होता. डाव्या बाजूच्या भिंतीवर चढण्यासाठी एक मधे-मधे गाठी मारलेला मजबूत दोर लावलेला होता. त्या दोराला पकडून साधारणपणे १२ फ़ुटाचा टप्पा चढून गेलो. सह्याद्रीतील भटकंतीचा अनुभव या ठिकाणी कामी आला. वर चढून गेल्यावर एक जण कसाबसा चालू शकेल अशी चिंचोळी वाट होती. उजव्या बाजूला भिंत आणि डाव्या बाजूला दरी त्यामुळे जपून हा टप्पा पार केला. पुढे नदीचे पात्र अरुंद असले तरी चालायला व्यवस्थित जागा होती. नदीच्या दोन्ही काठाच्या भिंती आता एक फ़ूट अंतरावर आल्या होत्या. प्रवाहाने घेतलेल्या अवघड वळणानुसार दरी तयार झाली होती. वरच्या बाजूला असलेल्या जंगलातून झिरपणार्‍या प्रकाश दरीच्या शेवाळ्यामुळे हिरव्या झालेल्या भिंतींवरुन परावर्तीत झाल्याने गुढ वातावरण तयार झाले होते. थोडे अंतर चालल्यावर आम्ही सेंट्रल टॉवर (Central Tower) खाली आलो. याठिकाणीही आप्तकालिन मार्गासाठी एक दोर लावलेला होता.  सेंट्रल टॉवर हा हेल्स गेट नॅशनल पार्कच्या लोगोवर आहे. तो पार्कच्या सर्व भागातून दिसतो. या सेंट्रल टॉवर जवळ ओल्कारीया जिओ थर्मल पॉवर स्टेशन आहे. ज्वालामुखीतून बाहेर येणार्‍या वाफ़ेवर इथे १०५ मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते.
 
Central Tower from ol njorowa gorge, 

Devil's Bedroom, 

सेंट्रल टॉवरच्या पुढे चालत गेल्यावर आपण डेव्हिल्स बेडरुम मध्ये पोहोचतो. याठिकाणी १०० फ़ुटावरुन एक धबधबा खाली कोसळतो. पाणी खाली कोसळल्या नंतर पुढे जाण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा भोवरा तयार होतो. या भोवर्‍याने गेल्या अनेक शतकात या ठिकाणाचा मोठा भाग कोरुन काढलेला आहे. त्या भागाला डेव्हील्स बेडरुम म्हणतात. येथून पुढे जाण्याचा मार्ग नसल्याने आल्या वाटेने परत डेव्हिल्स थ्रोट या फ़ाट्यापर्यंत आलो. पुढे नदीचे पात्र चांगलेच रुंद होते. इथे पायाखाली थंड पाणी आणि बाजूच्या भिंतीतून पाझरणारे गरम पाणी असा गमतीशीर प्रकार होता. ज्वालामुखीमुळे तयार झालेले विविध दगड गोळा करत अर्धा किलोमीटर चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक्झिटची पाटी होती. 2०० फ़ुट वर चढून त्या सुंदर दरीच्या बाहेर आलो. एक आगळवेगळ ठिकाण पाहिल्याचा आनंद झाला.

ol njorowa gorge, Hell's Gate National Park, Kenya

ol njorowa gorge, Hell's Gate National Park, Kenya

Exit point , ol njorowa gorge

Central Tower,ol njorowa gorge, Hell's Gate National Park

केनियाला फ़िरायला जाणारे मसाई मारा आणि नकुशा लेक पाहातात. नकुशा लेक पासून नैरोबीला जातांना वाटेत नैवाशा लेक आहे. या ठिकाणी तलावाला लागून अनेक हॉटेल्स आणि कॅम्प साईट्स आहेत. नैवाशा लेक परिसरातही अभयारण्य असून अनेक प्राणी आणि पाणपक्षी तलावा काठच्या हॉटेलांमध्येही दिसतात. तलावात बोटीने सैरही करता येते. या नैवाशा लेक जवळच हेल्स गेट नॅशनल पार्क आहे, त्यामुळे मसाई मारा, नकुशा लेक पाहून एक दिवस नैवाशा लेकला मुक्काम करुन हेल्सगेट नॅशनल पार्क मधील सायकलींग आणि ओल्जोवारा गॉर्जचा ट्रेक करता येतो.

Hells Gate National Park, Kenya
Different Volcanic  rocks 

#OffbeatKenya#olnjorowagorge#Hell'sGateNationalPark#Kenya#cyclinginkenya#volcanicrocks#volcanicplug#cyclinginnationalpark#