Showing posts with label offbeat trek. Show all posts
Showing posts with label offbeat trek. Show all posts

Monday, January 20, 2025

डन्स्टाईन कॅसल ,ऑस्ट्रिया (विदेशातले किल्ले भाग-३)

 

डन्स्टाईन कॅसल, गाव आणि डॅन्यूब नदी 

ऑस्ट्रियातील हॉलस्टट या नितांत सुंदर गावाहून वाचाऊ व्हॅलीत जाण्यासाठी जी गाडी ठरवली होती त्या गाडीचा चालक आणि मालक डेव्हिड हा स्लोव्हाकीयाचा तरुण मुलगा होता. टुरीस्ट सिझनच्या काळात स्लोव्हाकीयातले अनेक तरुण व्हिएन्ना मध्ये येतात. व्हिएन्ना शहर महागडे असल्यामुळे एखादी खोली भाड्याने घेऊन पाच सहा जण एकत्र राहातात. त्यातील कोणी हॉटेलात काम करतात, कोणी गाड्या चालवतात. सिझन संपला की सगळे आपापल्या गावी परत जातात. 

राजवाड्याचे अवशेष, डन्स्टाईन कॅसल

वाचाऊ व्हॅली फिरतांना शेवटच्या टप्प्यात डन्स्टाईन कॅसल बघायचे ठरवले होते. संध्याकाळी ५ च्या सुमारास धुवाधार पाऊस सुरु झाला. डन्स्टाईन गावात  वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे गावाबाहेर असलेल्या वाहनतळापाशी पोहोचलो तर तिथे शुकशुकाट होता. आमची एकमेव गाडी त्या वहानतळावर उभी होती. डेव्हिडने त्याच्या मोबाईल मधले "स्काय मेट" चालू करुन किल्ल्यावर ढग आहेत आणि पश्चिमेकडून ढग येत असल्यामुळे पाऊस थांबणार नाही असे सांगितले. त्यामुळे आपण किल्ला न पाहाता थेट व्हिएन्ना गाठुया असे तो आम्हाला सुचवत होता. पण आम्ही तयारीतच आलो होतो. आमच्या सॅक मधले पॉन्चो अंगावर चढवून आम्ही धुवाधार पावसात डन्स्टाईन गावाकडे कूच केली. या भागात ऑगस्ट महिन्यात रात्री ८ वाजल्या नंतर सुर्यास्त होतो. त्यानंतर अर्धा तास संधिप्रकाश असतो. त्यामुळे आम्ही निर्धास्तपणे किल्ल्याकडे निघालो होतो. 

डन्स्टाईन गाव

ऑस्ट्रीयाची राजधानी व्हिएन्ना पासून ८० किलोमीटरवर डॅन्यूब नदीच्या दोन्ही तीरावर वाचाऊ व्हॅली वसलेली आहे. हिरवेगार डोंगर त्यातून डोकावणारी लालचुटूक रंगाच्या छप्परांची घरे, त्या गर्दीतून मान उंच करून पाहाणारा एखादा चर्चचा टॉवर, नदी काठाने जाणारा वळणावळणाचा रस्ता, रस्त्यापासून थोड्या उंचावरून जाणारी रेल्वे असे स्वप्नवत दृश्य वाचाऊ व्हॅलीत फ़िरतांना दिसते. डॅन्यूब नदीच्या खोऱ्यात वसलेल्या वाचाऊ व्हॅलीला आणि डन्स्टाईन कॅसलला युनेस्कोच्या 'वर्ल्ड हेरीटेज साईट'चा दर्जा मिळालेला आहे.

प्रवेशव्दार, डन्स्टाईन गाव 

ऑस्ट्रीयाची राजधानी व्हिएन्ना ही एकेकाळी युरोपची वाईन कॅपिटल होती. वाईनचा उपयोग चलना प्रमाणे केला जात असे. इसवीसनाच्या आठव्या शतकापासून वाचाऊ व्हॅलीतही मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची लागवड होत होती. त्यामुळे हा भाग समृद्ध होता. युरोपात जाणारे व्यापारी मार्ग या वाचाऊ व्हॅलीच्या खोऱ्यातून जात होते. त्या मार्गावर अनेक ठिकाणी डॅन्यूब नदी चंद्रकोरीच्या आकाराचे वळण घेते, अशाच एका  वळणावर डन्स्टाईन नावाचे प्राचीन गाव वसलेले आहे. या गावाला संरक्षणासाठी तटबंदी बांधलेली होती.  इसवी सनाच्या बाराव्या शतकात या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी डन्स्टाईन गावाच्या मागे असलेल्या डोंगरावर पहिला हॅडमर याने किल्ला बांधला.

मध्ययुगीन डन्स्टाईन गाव 

डन्स्टाईन गावाभोवतीची तटबंदी आणि त्यातील प्रवेशद्वारे आजही शाबूत आहेत. काळानुरूप त्यात बदल झालेले आहेत. क्रेम्स (टॉर) गेट (पूर्वीचे नाव स्टेनर गेट) या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारातून आपला गावात प्रवेश होतो. या चौकोनी प्रवेशद्वारावर पंधराव्या शतकात दुमजली टॉवर बांधलेला आहे. प्रवेशद्वारापासून सुरू होणारी तटबंदी खालच्या बाजूला डॅन्यूब नदीच्या पात्रापर्यंत आणि वरच्या बाजूला थेट कॅसलच्या तटबंदीपर्यंत गेलेली आहे. प्रवेशद्वारातून गावात प्रवेश केल्यावर गावातील छोटे फरसबंदी रस्ते आणि त्याच्या दुतर्फा लालचुटूक रंगाच्या उतरत्या छपरांची सुंदर घरे, घरांच्या गॅलरीत फ़्लॉवर बेडमध्ये फुललेले रंगीबेरंगे फुलांचे ताटवे, दिव्याच्या खांबांवर  लावलेल्या कुंड्यांमधून फुललेली फुले असे रंगीबेरंगी आणि प्रसन्न वातावरण गावभर पसरलेले असते. गावात वहानांना प्रवेश नसल्यामुळे गावामधील गल्ल्यांमध्ये फ़िरतांना मध्ययुगीन युरोपातील गावात फिरल्याचा भास होतो.

प्रवेशव्दार, डन्स्टाईन कॅसल

पावसामुळे गावातही शुकशुकाट होता. गावातल्या भर वस्तीत असलेल्या दोन घरांच्या मध्ये असलेल्या अरुंद गल्लीतून डन्स्टाईन कॅसलला जाणारी पायऱ्यांची वाट आहे. दुतर्फा दाट झाडी असलेल्या या वाटेने अर्ध्या तासात किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ला चढतांना वेगवेगळ्या टप्प्यावरून गावाचा आणि डेन्यूब नदीच्या खोऱ्याचा सुंदर देखावा दिसतो. हा किल्ला प्रसिद्धीच्या झोतात आला तो इंग्लंडचा राजा पहिला रिचर्ड (Lion Heart) याला डिसेंबर ११९२ ते मार्च ११९३ या काळात या किल्ल्यात कैदेत ठेवल्यामुळे.



जेरुसलेमची पवित्र भूमी अय्युबीद राजघराण्याच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी तिसरे क्रुसेड युद्ध (Third Crusade (११८९-११९२)) सुलतान सल्लाउदीन आणि तीन राजसत्ता इंग्लंड, फ्रान्स, रोमन यांच्या एकत्रित फौजा यांच्यात झाले. या युद्धाहून परतताना युद्धातील मिळकती वरून ऑस्ट्रीयाचा सरदार (Duke) पाचवा लिओपोर्ड आणि इंग्लंडचा राजा पहिला रिचर्ड यांच्यात वाद झाला. त्यात राजाने ऑस्ट्रीयाचा झेंडा फाडून टाकला. त्यामुळे लिओपार्डीने राजा रिचर्डला डन्स्टाईन कॅसलमध्ये बंदीवान बनवले. त्यातूनच ब्लॉंडेल आणि राजा रिचर्डच्या दंतकथेचा उगम झाला. 

ब्लॉंडेल आणि राजा रिचर्ड


राजा रिचर्डला अटक झाल्यावर त्याला शोधण्यासाठी त्याचा गायक, संगीतकार मित्र ब्लॉंडेल वेगवेगळ्या किल्ल्याखाली जाऊन गाणे म्हणू लागला. असाच एकदा डन्स्टाईन कॅसलच्या खाली येऊन गाण्याचे पहिले कडवे गायल्यावर,  राजा रिचर्डने किल्ल्यातील बंदीगृहाच्या खिडकीत उभे राहून पुढचे कडवे गायले. त्यामुळे राजाचा ठावठिकाणा लागला. त्यानंतर खंडणी देऊन राजाची सुटका करण्यात आली. या कथेवर अनेक कादंबऱ्या, नाटक, संगीतिका इत्यादी लिहिल्या गेल्या आहेत. ब्लॉंडेलच्या नावावर २४ प्रसिद्ध  गाणी (courtly songs) आहेत. त्याचा पुतळा डन्स्टाईन गावात आहे. 

हि कथा ऐकल्यावर आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या एका ऐतिहासिक प्रसंगाची आठवण झाली. पेशव्यांचे सरदार त्रिंबकजी डेंगळे यांना इंग्रजांनी ठाण्याच्या किल्ल्यात बंदिवान करुन ठेवले होते. त्यांनी निसटून जाऊ नये म्हणून त्यांच्या भोवती एतद्देशिय सैनिक न ठेवता इंग्रजी सैनिक ठेवले होते. त्यावेळी त्यांच्या सुटकेची योजना किल्ल्या जवळच्या रस्त्यावर एका शाहिराने गाऊन त्रिंबकजी डेंगळे यांना सांगितली होती अशी दंतकथा आहे. दोन्ही दंतकथेतील साम्य जाणवले आणि गंमत वाटली.



किल्ल्यावर पोहोचल्यावर समोर पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार दिसते. त्या प्रवेशद्वारावर एके काळी छोटेखानी मनोरा होता त्याचे अवशेष आज पाहायला मिळतात. डोंगरावर जागा अरुंद असल्याने किल्ल्यातील इमारती वेगवगळ्या टप्प्यावर बांधलेल्या होत्या. आज त्यांचे भग्न अवशेष पाहायला मिळतात. यात प्रशासकीय इमारत, चॅपल आणि राजवाड्याची इमारत यांच्या कमानी आणि काही भिंती आजही तग धरून आहेत. किल्ल्यातील इमारतींच्या उरलेल्या भिंतींवर, किल्ला बांधला तेंव्हा त्या इमारती कशा दिसत होत्या त्याची चित्रे स्टीलच्या पत्र्यावर कोरून लावलेली आहेत. या अरुंद जागेतही इमारतींसमोर आवार /अंगण सोडलेले होते. दोन मजली राजवाड्याच्या उभ्या असलेल्या एकमेव भिंतींच्या खिडकीतून आकाशी आणि पांढऱ्या रंगात रंगवलेला गावातील कॅथेड्रलचा टॉवर सुंदर दिसतो. 

कॅथेड्रल, डन्स्टाईन 

किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर एक प्रचंड मोठा खडक आहे. या खडकात कोरून काढलेली गुहा आहे. गुहेच्या वर असलेल्या दगडावर थोड्याशा परिश्रमांनी चढून जाता येते. आम्ही याठिकाणी पोहोचलो आणि बदाबदा कोसळणारा पाऊस कोणीतरी नळ बंद करावा तसा बंद झाला. थोड्या वेळात ढगांच्या आडून सूर्य प्रकट झाला. पाऊस थांबला असला तरी दगडांवरुन पाणी वाहात होते. त्या निसरड्या दगडावरुन किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर असलेल्या खडकावर चढून गेलो. या खडकावरून प्रचंड मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. डॅन्यूब नदीचे चंद्रकोरीच्या आकाराचे वळण घेणारे प्रशस्त पात्र, त्याचा काठावर असलेले डन्स्टाईन गाव आणि नदीपात्राच्या दोन्ही काठावर असलेली द्राक्षाची हिरवीगार शेती हे सुंदर दृश्य पाहातांना तिथून पाय निघत नाही.

डन्स्टाईन किल्ल्याचा माथा 

गुहा 

युरोपात दिसणारे किल्ले सहसा एकदम चकचकीत आणि रंगरंगोटी करून व्यवस्थित जतन केलेले पाहायला मिळतात. डन्स्टाईन किल्ल्याचे वेगळेपण म्हणजे हा डोंगरी किल्ला आपल्या सह्याद्रीतल्या किल्ल्यांसारखाच परकीय सत्तेने उद्ध्वस्त केलेला आहे. तसे असले तरी तो सतराव्या शतकापासून आजतागायत आहे तसाच जतन करुन ठेवलेला आहे. किल्ल्यात ठिकठिकाणी माहिती फलक आणि उद्ध्वस्त वास्तूंची मूळ रचना दाखवणारी चित्रे लावलेली आहेत. या गोष्टी आपल्या सह्याद्रीतल्या किल्ल्यांवरही करणे सहज शक्य आहे. 

वास्तूंची मूळ रचना

किल्ल्यावरून खाली उतरताना आलेल्या वाटेने न उतरता पूर्वेकडील व्हिएन्ना दरवाजातून खाली उतरताना या वाटेवर अनेक रानफुले फुललेली दिसतात. या वाटेवरून डोंगरात जाणाऱ्या अनेक वाटा फुटलेल्या आहेत. ते छोटे छोटे ट्रेल आहेत. त्या वाटांवरून डोंगरात फिरता येते. डन्स्टाईन गावात पंधराव्या ते सतराव्या शतकातल्या अनेक इमारती आणि घरे आजही छान रंगरंगोटी करुन जतन केलेली आहेत. किल्ल्यावरून सतत डोळ्यांत भरणारा आकाशी रंगाचा कॅथेड्रलचा टॉवर, नदीकाठी असलेला न्यू कॅसल इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. वाचाऊ व्हॅलीत द्राक्षा खालोखाल पिकणारे जर्दाळू आणि त्यापासून बनणारे विविध पदार्थ या गावात मिळतात. ऑस्ट्रीयात फिरायला जाणाऱ्या दुर्गप्रेमींनी थोडी वाट वाकडी करून या रांगड्या गिरिदुर्गाला नक्की भेट द्यावी.


जाण्यासाठी : -
वाचाऊ व्हॅलीत मल्क, स्पिट्झ, डन्स्टाईन आणि क्रेम्स ही गावे पाहाण्यासारखी आहेत. व्हिएन्नाहून वाचाऊ व्हॅलीला जाण्यासाठी बोट, रेल्वे आणि बस असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. व्हिएन्नाहून बोटीने दोन तासात वाचाऊ व्हॅलीत जाता येते. डॅन्यूब नदीच्या दोन्ही तीरावर असलेली गावे; नदी किनाऱ्यावर, डोंगरात असलेली अप्रतिम घरे आणि वर्ल्ड हॅरीटेजचा दर्जा मिळालेली वाचाऊ व्हॅलीची अप्रतिम दृश्ये पाहत पाहत आपण क्रेम्सला पोहोचतो. 

ट्रेनने प्रवास करण्यासाठी व्हिएन्ना ते व्हिएन्ना तिकिट मिळते. यात व्हिएन्ना ते मल्क ट्रेनचा प्रवास, मल्क ते क्रेम्स बोटीचा प्रवास आणि क्रेम्स ते व्हिएन्ना ट्रेनचा प्रवास करता येतो. या बरोबरच मल्क ऍबी पाहाण्यासाठीचे तिकीट अंतर्भूत असते. ऑस्ट्रीयातील रेल्वे कंपनी OBB Rail च्या साईटवर (https://kombitickets.railtours.at/ wachau- ticket/austria/wachau/wachau-ticket.html) वाचावू व्हॅलीला जाण्यासाठी कॉम्बो तिकीट मिळते.

वाचाऊ व्हॅलीत जाण्यासाठी तिसरा पर्याय म्हणजे व्हिएन्नात असलेले टूर ऑपरेटर. व्हिएन्नातून खाजगी बसने आणि कारने वाचाऊ व्हॅलीत घेऊन जातात. तिथे फिरायला साधारणपणे सहा तासांचा वेळ मिळतो. याशिवाय वाईन टेस्टींग टूर, सायकलींग टूरही व्हिएन्नाहून जातात. आपापल्या आवडीप्रमाणे आपण टूर निवडू शकतो. 



छायाचित्रण:-  © कौस्तुभ आणि अमित सामंत  (©Copy Right)
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro -5


1) डाविन कॅसल (स्लोव्हाकीया) :- (विदेशातले किल्ले भाग -१) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

2) अलिंजा कॅसल, माचू पिचू ऑफ अझरबैजान Alinja Castle , Machu Pichu of Azerbaijan ( विदेशातले किल्ले भाग - २) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

3) परीकथेतील गाव, हॉलस्टॅट (Hallstatt, Austria) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.









Friday, November 8, 2024

अलिंजा कॅसल, माचू पिचू ऑफ अझरबैजान Alinja Castle , Machu Pichu of Azerbaijan ( विदेशातले किल्ले भाग - २)

 

माचू पिचू ऑफ अझरबैजान

अझरबैजान फिरायला जायचे प्लांनिंग करत असताना नेहमी प्रमाणे किल्ले शोधायला सुरुवात केली. एकेकाळी चीनवरुन युरोपला जाणारा रेशीम मार्ग ( silk route ) अझरबैजान मधून जातं असल्याने त्याचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधलेले होते. त्यातील " अलिंजा कॅसल " या किल्ल्याने लक्ष वेधून घेतले. त्याची छायाचित्र पाहूनच किल्ल्याच्या प्रेमात पडलो. कॉकेशियस डोंगररांगेत असलेल्या या किल्ल्याला भेट देण मात्र सोपं नव्हते. हा किल्ला अझरबैजान या देशात असला तरी, या देशातल्या नाखचिवान भागात होता. हा भाग इराण, तुर्कस्थान आणि आर्मेनिया या देशाच्या सीमांनी वेढालेला आहे.

इसवीसन १९९१ मध्ये मिखाईल गार्बोचेव्ह यांनी glasnost and perestroika या पॉलिसीज आणल्यावर सोव्हिएत युनियनची शकलं होऊन १५ नवीन देश निर्माण झाले. त्यातील आर्मेनिया ( ख्रिश्चन बहुल ) आणि अझरबैजान (मुस्लिम बहुल ) या देशाच्या सीमा ठरवताना धर्माच्या आधारावर ठरवल्यामुळे आर्मेनियाचा एक भाग पाचर मारल्यासारखा अझरबैजान देशात घुसला आहे, त्यामुळे अझरबैजानचे दोन भाग झाले. त्यातील एका भागात बाकू हे राजधानीचे शहर आणि देशाचा 80% भूभाग तर दुसऱ्या बाजूला नाखचिवान, अशी देशाची दोन शकलं झाली. त्यामुळे बाकूवरून रस्त्याने थेट नाखाचिवानला जाता येत नाही. इराण किंवा तुर्कस्थान देशात जाऊन तेथून नाखचिवानला जावे लागते.

आर्मेनियाची पाचर

त्यामुळे नाखचिवानला पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे विमानाने जाणे. बाकुहून सकाळी ५ वाजल्यापासुन रात्री १ वाजेपर्यंत नाखचिवानला दर तासाला विमान आहे. त्यामुळे नाखचिवानला जाण्याचा प्रश्न निकालात निघाला. पण अलिंजा किल्ला नाखचिवान पासून ३३ किलोमीटर अंतरावर होता तिथेपर्यंत पोहोचायचे कसे हा प्रश्न होता. हा किल्ला फार कमी पर्यटकांनी पाहिला असल्याने त्याबद्दल  त्रोटक माहिती उपलब्ध होती. किल्ल्याची उंची, लागणारा वेळ याबाबत कोणीही माहिती लिहिलेली नव्हती. किल्ल्यावर जाण्यासाठी दमसास ( endurance level ) जास्त हवा असे बऱ्याच जणांनी लिहिले होते.

अशा अडनीड्या ठिकाणी जायची आमची पहिलीच वेळ नव्हती. पण माहितीचं उपलब्ध नसल्याने आंतरजालावर शोधाशोध केल्यावर "नाखचिवान ट्रॅव्हल्स" हा स्थानिक टूर ऑपरेटरचा इमेल मिळाला. त्याच्याशी चर्चा केल्यावर त्याने गाडी अरेंज करून दिली.

५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी मी आणि लीना नाखाचिवानला उतरलो तेंव्हा तापमान ३ अंश सेल्सियस होते. "नाखचिवान टूर्सचा " इमिल आमच्यासाठी गाडी घेऊन आला होता. त्याच्या सांगण्यानुसार भारतातून नाखचिवानला येणारे पर्यटक जवळ जवळ नाहीतच. जे येतात ते बाकू पाहून परत जातात. अलिंजा किल्ल्यावर जाणारे माझ्या माहितीतले  तरी तुम्ही पहिलेच भारतीय आहात.

नोव्हाचे स्मारक नाखचिवान


नाखचिवान ते किल्ल्याचा पायथा अंतर ३३ किलोमीटर आहे. रस्त्याला लागलो आणि एका पर्वताने लक्ष वेधून घेतले. बर्फाच्छादीत पर्वतांच्या पार्श्वभूमीवर काळाकभिन्न पर्वत उठून दिसत होता. त्याचे नाव "इनान डाग" याचा  स्थानिक भाषेत शब्दश: अर्थ "खरा पर्वत"  असा होतो . या पर्वताची दंतकथा "नोव्हाशी" जोडलेली होती. तोच नोव्हा ज्याने जगबुडी आल्यावर बोट बनवून त्यात सर्व प्राण्यांना भरून नेले होते. ज्यावेळी हा पूर ओसरायला सुरवात झाली तेंव्हा नोव्हाची बोट याच पर्वताला जाऊन लागली. त्यावेळी नोव्हाने "इनान डाग" म्हणजेच "खरा पर्वत" असे त्या पर्वताला नाव दिले. बोटीतले काही लोक याठिकाणी उतरले. पूर पूर्ण ओसरल्यावर नोव्हाची बोट जमिनी वर लागली. त्याठिकाणी वसलेल्या गावाला नोव्हाच्या नावावरून (नावाचा अपभ्रंश होऊन) नाखचिवान हे नाव पडलेले आहे. नोव्हाचे सुंदर स्मारक नाखचिवान गावात किल्ल्या शेजारी आहे. अझरबैजानचा मूळ धर्म झोरास्ट्रीयन होता. मुस्लिम आक्रमणानंतर आता मुस्लिम धर्म झालेला आहे. त्यांच्या धर्मात नोव्हाला संताचे (profet) स्थान देण्यात आलेले आहे.

Inan dag (खरा पर्वत)  


किल्ल्याच्या अलीकडे अलिंजा या छोट्याश्या गावातल्या दुकानातून पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. किल्ल्यावर जाणारी वाट दोन डोंगरांच्या खिंडीतून जात होती. दोन्ही बाजूला गुलाबी रंगाचे कातळकडे आकाशाला भिडलेले होते. त्यातून पायाऱ्यांची वाट किल्ल्यावर जात होती.

खिंड

कुठल्याही ट्रेकरला सगळ्यात जास्त कंटाळवाणी वाटणारी गोष्ट म्हणजे पायाऱ्या, त्यामुळे त्या टाळून कुठे वाट आहे का हे शोधताना कधीकाळी बांधलेला डांबरी रस्ता दिसला. काळाच्या ओघात तो वाहून गेला होता. अझरबैजानला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारने लोकांची राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्यासाठी कम्युनिस्ट काळात नष्ट केलेली त्यांची राष्ट्रीय स्मारकं पुन्हा बांधायला सुरुवात केली. त्यावेळी किल्ल्याची डागडुजी करण्याचे सामान नेण्यासाठी हा रस्ता बांधलेला असावा.

पायर्‍याच पायर्‍या


वळणा वळणाच्या रस्त्याने १० मिनिटे चढल्यावर रस्ता संपला आणि शेवटी पायऱ्या आल्याच. पायऱ्यांना नमस्कार करून आम्ही दोघांनी महाराजांचा जयजयकार केला आणि खिंडीत शिरलो.  खिंडीत "नोझल" सारखी रचना झाल्याने वारा जोरात वाहात होता. त्यात भर म्हणजे उभ्या पहाडामुळे वाटेवर सावली पडलेली होती. या सगळ्यामुळे बाहेरच तापमान ४ अंश सेल्सियस असले तरी "फील्स लाईक" १ अंश सेल्सियस झाले असावे. त्यामुळे स्वेटर आणि जाकीट मध्येही थंडी वाजायला लागली. थंड पडणारे नाक आणि कान झाकून किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ल्याला तीन स्तरावर तटबंदी बांधून संरक्षित केलेल आहे. थोड्याच वेळात आम्ही किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. या ठिकाणी नवीन बांधलेल प्रवेशद्वार आणि  उजव्या बाजूला थोड खाली किल्ल्याचे जुने प्रवेशद्वार दिसत होते. त्याच्यासमोर दगडात कोरलेल्या काही ओबडढोबड आणि वेगवेगळ्या उंचीच्या पायऱ्या पाहायला मिळाल्या. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बुरुज होते.  प्रवेशद्वारापासून दोन्ही बाजूला तटबंदी खिंडीच्या टोकाला असलेल्या पहाडापर्यंत गेलेली होती . त्यामुळे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग पूर्णपणे संरक्षित झालेला होता.


नवे आणि जुने प्रवेशद्वार, तटबंदी,पायर्‍या

पहिले प्रवेशद्वार ओलांडून १० मिनिटे पायऱ्या चढून गेल्यावर दुसरे प्रवेशव्दार आणि तटबंदी लागली. हे प्रवेशव्दार पायाऱ्यांच्या काटकोनात बांधलेले आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला बुरुज पाहायला मिळतात. या बुरुजापासून दोन्ही बाजूला तटबंदी खिंडीच्या टोकाला असलेल्या पहाडापर्यंत गेलेली आहे. याठिकाणी पाण्याच एक बांधिव टाक आहे. डोंगरातून आलेलं पाणी या टाक्यात साठवले जाते. 

तिसरे प्रवेशद्वार आणि तटबंदी

किल्ल्याचा तिसरे प्रवेशद्वारही पायऱ्यांच्या काटाकोनात बांधलेले आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत. बुरुजापासून दोन्ही बाजूला तटबंदी गेलेली आहे. डाव्या बाजूची तटबंदी डाव्या बाजूच्या सुळाक्याला भिडलेली आहे.  तर उजव्या बाजूची तटबंदी L आकारात पूर्ण माचीला वेढा घालते. तिसऱ्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर आपला किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो. किल्ल्यावर असलेला सपाट भाग म्हणून याला माची म्हणायचे एवढंच. या माचीवर अनेक घरांचे अवशेष आहेत. त्यांच्या भिंती तटबंदीच्या भिंतीपेक्षा कमी उंचीच्या आहेत. जोरदार वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी अशाप्रकारे रचना केली असावी. या ठिकाणी दोन सोनेरी घुमट असलेल्या वास्तू आहेत. हे घुमट नव्याने बांधलेले आहेत. या माचीच्या टोकाला एक सुळका आहे. या सुळक्याचा आकार आणि माचीवरील अवशेष पाहिले असता त्याचे पेरू देशातील इंका साम्राज्याची राजधानी "माचु पिचूशी" साधर्म्य असल्यामुळे, अलिंजा किल्ल्याला "अझरबैजानचे माचू पिचू" म्हटले जाते. या सुळक्याला सध्या "हुतात्मा सुळका" म्हटले जाते. २०२० मध्ये आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्या मध्ये झालेल्या युद्धात २०० सैनिक हुतात्मा झाले होते त्यांच्या स्मरणार्थ या सुळक्याला हुतात्मा स्मारक म्हटले जाते.


किल्ल्याच्या इतिहासात डोकावल्यास, चीन मधुन युरोपात जाणार्‍या रेशीम मार्गावर असलेल्या अलिंजा किल्ल्यावर झालेल्या उत्खननात ९ व्या शतकातले खापराचे तुकडे आणि इतर अवशेष सापडले आहेत. किल्ल्याच्या इतिहासात अनेक घडामोडी झालेल्या पाहायला मिळतात. अर्मेनियम , इराणी, तुर्की येथील राजघराण्यांच्या ताब्यात हा किल्ला असल्याचे उल्लेख ९ व्या शतकापासून १४ व्या शतकापर्यंत कागदपत्रात सापडतात.

पाण्याचे टाके आणि कातळात कोरलेले चर

इसवीसन १३८७ ते १४०७ या २० वर्षाच्या काळात तैमुरलंग आणि त्याचा मुलगा मिरानशहा याने अलिंजा किल्ला जिंकून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अलिंजा किल्ल्यावर जिवंत पाण्याचे झरे नाहीत त्यामुळे डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी टाक्यात साठवले जाते. तैमुरच्या सैन्याने किल्ल्याला वेढा घातला असतांना एकदा किल्ल्यातील पाण्याचा साठा संपत आला होता. त्यामुळे किल्लेदाराने दुसर्‍या दिवशी किल्ला तैमुरच्या हवाली करण्याचे ठरवले होते. परंतू त्याच रात्री धुवाधार पाऊस पडल्याने त्यांच्या वरचे पाण्याचे संकट टळले.  इसवीसन १३९८-९९ मध्ये तैमुरच्या फौजा पहील्या तटबंदी पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाल्या होत्या.  ही बातमी समजताच अमीर अलतून या सरदाराच्या राखीव सैन्याने तैमुरच्या सैन्यावर बाहेरुन हल्ला केला आणि तैमुरच्या २०००० सैनिकांना कापून काढले.  इसवीसन १४०१ मध्ये तैमुरचा मुलगा मिरानशहा याने लढून किंवा फ़ितूरीने अलिंजा किल्ल्यावर ताबा मिळवला.


वास्तूंचे अवशेष 

इसवीसन १४०५ मध्ये तैमुरचा अंत झाला त्यानंतर किल्ला पुन्हा स्थानिक अझरबैजानी घराणे कारा कोयुनलू याने जिंकून घेतला. इसवीसन १४२० मध्ये तैमुरचा दुसरा मुलगा शाहारोख मिर्झा याने अलिंजा किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी कारा इस्कंदर याने त्याचा पराभव केला.

 

सुळका ( हुतात्मा स्मारक) आणि तटबंदीतील दरवाजे

किल्ल्याच्या माचीच्या तटबंदी मध्ये तीन दरवाजे आहेत. त्यातील हुतात्मा सुळक्या जवळील प्रवेशद्वारातून खाली उतरल्यावर एक सपाटी आहे, त्यावर काही वास्तूंचे अवशेष आहेत. इथे डोंगर कड्याला लागून पाण्याचे एक बांधिव टाक आहे. येथून खाली दूरवर अलिंजा गाव दिसते. इनान डाग आणि त्यामागाची पर्वतरांग असे सुंदर दृश्य पाहायला मिळते. हे पाहून पायऱ्या चढून परत माचीवर येऊन डाव्या बाजूच्या सुळक्या जवळील प्रवेशद्वारातून बाहेर पडून थोडे चालत गेल्यावर पाण्याचे अजून एक बांधिव टाक आहे. त्यात पाणी आणण्यासाठी सुळक्याच्या उतारावर खोदलेला चर पाहायला मिळतो. माचीवर एक ध्वज स्तंभ आहे. त्यावर अझरबैजानचा झेंडा फडकत असतो.

माचीच्या खालच्या सपाटीवरील वास्तू

माचीवरून कातळात खोदलेल्या पायाऱ्यांची वाट डाव्या बाजूला असलेल्या सुळक्याकडे जाते. या वाटेने वर चढल्यावर उजव्या बाजूला तटबंदी आणि दरवाजा आहे. दरवाजाच्या बाजूला या ठिकाणी दोन खोल्या आहेत. या ठिकाणी दरवाजाचे प्रयोजन काय असावे हे कळत नाही. कारण दरवाजाच्या पुढे खोल दरी आहे. कॉकेशस पर्वतराजीचे दृश्य इथून खूप छान दिसते त्यामुळे किल्ल्याचे नूतनीकरण करताना हा दरवाजा बांधला असावा. दरवाजातून दिसणाऱ्या निसर्गरम्य दृश्याचा आस्वाद घेऊन  पुढे पायऱ्या चढत गेल्यावर सुळक्या जवळ दोन खोल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी असलेल्या खोल्या या किल्ल्याच्या माचीवर आणि किल्ल्यावर येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवणाऱ्या (टेहळणी) करणाऱ्यांचे ऊन, वारा पाऊस आणि बर्फ यापासून संरक्षण होण्यासाठी बांधलेल्या होत्या. याठिकाणी पायऱ्या संपल्या होत्या. डाव्या बाजूचा सुळका अजूनही आकाशाला गवसणी घालत होता. त्याच्या खडबडीत गुलाबी दगडावरून हात फिरवून परतीचा प्रवास चालू केला. 

तसं पाहिले तर, किल्ल्याचे पहिले प्रवेशव्दार त्याखालील पायर्‍या, टाक्यात पाणी आणण्यासाठी कातळात कोरलेले चर अशा काही पूरातन गोष्टी सोडल्यास किल्ल्यावरील इतर बांधकाम अझरबैजान सरकारने नव्याने केलेले आहे. ते बांधकाम मूळ किल्ल्याच्या बांधकामा बरहुकूम नसेलही, पण त्या बांधकामामुळे किल्ल्याच्या संरक्षणासाठी केलेल्या रचनेचा, वास्तूंचा अंदाज येतो आणि किल्ल्याला जिवंतपणाही येतो.

Caucasus Mountain range

किल्ला चढायला सुरुवात केल्यापासून गेले दोन तास आम्ही दोघच फ़क्त किल्ल्यावर होतो. किल्ला चढायच्या आणि पाहाण्याच्या नादात इतका वेळ विसरलेली भूक आता जागी झाली होती. लीनाने दिवाळीत बनवलेले बेसनचे लाडू सोबत आणले होते पायाऱ्यांवर बसून "माचू पिचूच्या" दृश्याचा आस्वाद घेत फ़स्त केले.


तहानलाडू भूकलाडू खाऊन झाल्यावर किल्ला उतरताना बँडचे सुर ऐकू आले. किल्ल्याखाली बरीच लोकही जमलेली दिसत होती. त्यात सैनिकही होते. किल्ल्याच्या पायथ्याशी कार्यक्रम चालू होता. इतक्यात एक तरुण मुलगा खांद्यावर अझरबैजानचा झेंडा घेऊन किल्ला चढताना दिसला. ते पाहून भगवा ध्वज घेऊन किल्ला चढणारी आपली लोक आठवली. "खाली कसला कार्यक्रम चालू आहे", हे विचारल्यावर त्याने युद्धात कामी आलेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आम्ही आज जमलो आहोत आणि मी ध्वज घेऊन किल्ल्यावरच्या हुतात्मा स्मारकवर लावायला जातं आहे असे सांगितले. भारतातून खास आमचा किल्ला बघायला आलात म्हणून त्याने आमचे आभार मानले.



झेंडा घेऊन पायाऱ्या चढणाऱ्या त्या तरुणाकडे पाहाताना मनात विचार चमकून गेला, किल्ला मग तो सह्याद्रीतला असो किंवा तेथून ७००० किलोमीटर दूरवरच्या  अझरबैजान मधला किल्ला असो, ते सारखेच प्रेरणादायी असतात. त्यांच्या भेटीने प्रखर राष्ट्रभक्ती जागृत होते. त्यासाठीच हे प्रेरणा देणारे स्त्रोत जपायचे असतात आणि त्यांना वारंवार भेटी देऊन उर्जा मिळवायची असते.

*************************************

जाण्यासाठी :-  मुबंई - बाकू (४ तास ) आणि बाकू ते नाखचिवान (१ तास २० मिनिटे) विमान प्रवास, (दोन्ही अझरबैजान एअर लाईन्स)  

नाखचिवान विमानतळ ते अलिंजा किल्ला पायथा ३३ किलोमीटर.


किल्ल्याची उंची १८०९ मीटर्स

किल्ला चढण्यासाठी ४५ मिनिटे

पर्वत रांग :- कॉकेशियस पर्वतरांग 

डिसेंबर ते मार्च किल्ल्यावर बर्फ असल्याने जाता येत नाही.

नाखचिवानला दोन दिवस मुक्काम करुन अनेक ऐतिहासिक आणि प्रेक्षणिय ठिकाण पाहाता येतात.

Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon P900 , Gopro Hero 5 


1) डाविन कॅसल (स्लोव्हाकीया) :- (विदेशातले किल्ले भाग -१) हा ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा



२) डन्स्टाईन कॅसल ,ऑस्ट्रिया (विदेशातले किल्ले भाग-३) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा..

Wednesday, October 30, 2024

डाविन कॅसल (स्लोव्हाकीया) :- (विदेशातले किल्ले भाग -१)

 

डाविन कॅसल (स्लोव्हाकीया)

१९९० नंतर खऱ्या अर्थाने ट्रेकिंग चालू झाले. त्यावेळी किल्ल्या जवळ पोहोचण्यासाठी एसटी शिवाय दुसरा पर्याय नव्हता. कल्याण, नाशिक, नगर, पुणे, सातारा इत्यादी मुख्य शहराच्या एस्टी डेपोतून किल्ल्याच्या गावाच्या पायथ्याशी पोहोचणाऱ्या बसेस निघत. त्यामुळे पहाटे पहाटे या डेपोत उतरून एसटी कॅन्टीन मध्ये पोहे किंवा मिसळ (तेव्हा हे दोनच पर्याय होते) यावर ताव मारून पुढचा प्रवास चालू करावा लागे. ट्रेकच्या किश्श्यां एवढेच एसटी कशी मिळवली, ती मध्येच कशी बंद पडली, टायर पंक्चर झाल्यावरही मुंबईला जाणारी परतीची एसटी कशी पकडली याचे रंजक किस्से आम्ही एकमेकांना सांगत असू.

त्यानंतर एस्टीला पर्याय म्हणून "माणसांपरीस मेंढर बरी " अशा प्रकारे माणसं कोंबून नेणाऱ्या वडाप आल्या, त्याकाळी टपावर, बोनेटवर बसूनही प्रवास करावे लागले. २०१० नंतर प्रायव्हेट गाड्या घेऊन किल्ल्याच्या थेट पायाथ्याशी जायची सोय झाली. त्यामुळे एसटीचा प्रवास कमी झाला. पण अजूनही मधून मधून खुमखुमी येते.  ट्रेकला ठराविक कोरम जमत नव्हता आणि परीक्षा संपल्याने कौस्तुभला किल्ल्यावर जायचे होते मग आम्ही दोघेच  नगर जवळच्या मांजरसुभा किल्ला पाहायला एसटीने निघालो. जाऊन येऊन एस्टीचा प्रवास १२ तास आणि किल्ला बघायला लागले २ तास असा सुखद प्रवास झाला.

हे सगळं आठवण्याचे कारण म्हणजे स्लोव्हाकिया राजधानी ब्राटिस्लाव्हा बघायला जाणार होतो त्याच्या आजुबाजूला किल्ले आहेत का शोधत असताना डाविन कॅसल किल्ला सापडला. मग किल्ला पाहायला जाण्यासाठी स्वस्त पर्याय शोधायला सुरुवात केली तेंव्हा कळलं की किल्ल्याच्या पायाथ्यापर्यंत तिथली स्थानिक एसटी जाते. मग तोच पर्याय निवडला. आमचा मुक्काम ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना मध्ये होता. सकाळी ६ वाजता व्हिएन्नाच्या रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बस टर्मिनलवर पोहोचलो. 

ऑस्ट्रीयाची राजधानी व्हिएन्नापासून ब्राटिस्लाव्हा ७५ किलोमीटरवर आहे. ब्राटिस्लाव्हात दोन मोठी बस टर्मिनल आहेत. त्यापैकी Most SNP हे बस टर्मिनल ब्राटिस्लाव्हातील सुप्रसिद्ध UFO ब्रीज खाली आहे. या बस स्थानकावरून दर वीस मिनिटांनी २९ नंबरची बस "डाविन कॅसलला" जाते. आम्ही व्हिएन्नाहून सकाळी लवकर निघून Most SNP स्थानकाल पोहोचलो. तिथे ९.३० ची Opletalova VWD बस इंडीकेटरवर लावली होती. बस स्थानकातल्या तिकिट व्हेंडींग मशीनवर ०.९० युरोचे तिकिट काढून बस थांब्यावर उभे राहील्यावर बरोब्बर ९.३० वाजता बस आली. बसमध्ये तिकिट व्हॅलिडेटींग मशीन होते. त्यावर तिकीट व्हॅलिडेट केले. दोन थांब्यांनंतर बस महामार्ग सोडून छोट्या रस्त्याला लागली. आता चित्रातली वाटावी अशी छोटी गावे, जंगल, ओहळ दिसायला लागले. बसच्या इंडीकेटरवर पुढील स्थानक डाविन कॅसल असे झळकल्यावर उतरायची तयारी केली. दुतर्फा सुंदर घरे असलेल्या गावात बस थांबली आम्ही बसमधून उतरल्यावर बस निघून गेली. 


 आता नक्की कुठल्या दिशेला जायचे हा प्रश्न होता. युरोपमधील इतर गावांसारखे या गावातही रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. गावात शिरतांना बसने एक वळण घेतलेले त्यावेळी नदी ओझरती दिसली होती. डाविन कॅसल नद्यांच्या संगमावर असल्यामुळे नदीच्या दिशेने निघालो. मुख्य रस्ता सोडल्यावर उजव्या बाजूला नदीकडे जाणारी आखीव रेखीव पायवाट होती. त्या वाटेने चालायला सुरुवात केल्यावर पाच मिनिटात नदीजवळ पोहोचलो. डॅन्यूब नदीच्या विस्तीर्ण पात्राने एक मोठे वळण या ठिकाणी घेतले होते. थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला झाडीतून किल्ल्याच्या तटबंदी आणि बुरुजाचे प्रथम दर्शन झाले. येथे एक बोटीचा धक्का होता आणि त्या ठिकाणी असलेल्या फलकावर दिवसातून दोनदा ब्राटिस्लावा ते डेव्हीन कॅसल बोटसेवा आहे असे कळले. याच्या बाजूला डेव्हीन कॅसलचा नकाशा असलेला एक फलक होता पण त्यावरील माहिती स्थानिक भाषेत होती. डॅन्यूब नदी डाव्या हाताला आणि किल्ला उजव्या हाताला ठेवत पायवाटेवरून पुढे चालायला सुरुवात केली. डाव्या बाजूला एका खांबावर कुंपणासाठी वापरल्या जाणाऱ्या काटेरी तारेची मोठी भेंडोळी ठेवलेली होती. हे एक स्मारक होते. दुसऱ्या महायुद्धानंतर कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पडद्याआड झेकोस्लाव्हेकीयाच्या नागरिकांवर अत्याचार सुरू होते. त्यांना मूलभूत स्वातंत्र्यापासूनही वंचित ठेवण्यात आले होते. १० डिसेंबर १९८९ रोजी एक लाख लोकांचा जमाव या ठिकाणी जमला आणि त्यांनी या ठिकाणचे तारेचे कुंपण तोडून टाकले. या आंदोलनाला hoj Europ (Hello Europe) Fall of Iron Curtain या नावाने ओळखले जाते. 



पुढे गेल्यावर किल्ल्याच्या डोंगरात थोड्या उंचीवर खोदलेल्या दोन गुहा दिसल्या. एका माणसाला व्यवस्थित बसता येईल अशा मानवनिर्मित गुहा टेहळणीसाठी बसणाऱ्या माणसांचे ऊन पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी खोदलेल्या होत्या. याठिकाणी किल्ल्याच्या डोंगरापासून सुट्या असलेल्या दोन सुळक्यांवर टेहळणीसाठी बांधलेले बुरुज परीकथेतल्या किल्ल्याच्या बुरुजांसारखे दिसत होते. 

 

The Gate of Freedom

पुढच्या वळणावर उजव्या बाजूने येणारी मोरावा नदी डॅन्यूब नदीला मिळत होती. या संगमावर एक Brona Slobody The Gate of Freedom हे स्मारक उभारलेले आहे. पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलेली दरवाजाची एक भव्य चौकट त्यावर बंदुकीच्या गोळ्या मारल्यामुळे पडलेले खड्डे असे या स्मारकाचे स्वरूप आहे. कम्युनिस्ट राजवटीच्या काळात अनेक जणांनी डॅन्यूब नदी पार करून ऑस्ट्रीयात (युरोपात) पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. सीमेवर असलेल्या सैन्याने त्यांना गोळ्या घालून ठार केले होते. या ठिकाणी बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आलेले आहे. आजूबाजूचा नयनरम्य परिसर,  नद्यांची दुथडी भरून वाहाणारी पात्र अशी सगळी सुखद दृश्ये आज पाहतांना काही दशकांपूर्वी याच ठिकाणी रक्तरंजित घटना ही नित्याची गोष्ट होती हे खरे ही वाटत नव्हते. या स्मारकाजवळ एक आणि थोडा पुढे एक असे दोन तलाव होते मोरावा नदीला येणाऱ्या पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी या ठिकाणी तलावांची निर्मिती करण्यात आली. पूर परिस्थितीत नदी पात्रातले जादा पाणी या तलावात साठवले जाते. बाजूलाच परिसरात आढळणारे कीटक, सरपटणारे प्राणी, पक्षी, प्राणी बल्ल्याच्या आणि इथली नैसर्गिक परिसंस्था यांच्याबद्दल माहिती देणारा फलक लावलेला होता. हे सर्व पाहून पुन्हा पायवाटेवर आलो.

 

टेहळणी गुहा

टेहळणी मनोरे

थोडे अंतर चालून गेल्यावर डोंगरावरून आलेली तटबंदी थेट नदी पात्रापर्यंत बांधलेली होती. या तटबंदीतील दरवाजा (South Gate) ओलांडल्यावर समोर मोठा वाहनतळ आणि काही रेस्टॉरंट दिसली. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायला इतका वेळ का लागला ते आत्ता लक्षात आले. बस जिथे थांबली तेथून नदीच्या दिशेला जाता बस गेली त्या दिशेला चालत गेलो तर पाच मिनिटात या वाहनतळाशी पोहोचलो असतो. पण किल्ल्याला मागच्या बाजूने वळसा घालून मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचायला आम्हाला अर्धा तास लागला असला तरी तो वेळ वाया मात्र गेला नव्हता. किल्ल्याची मागची बाजू, नद्यांचा संगम आणि दोन स्मारके पाहता आली. वाट चुकलो नसतो तर किल्ला पाहिल्यावर या बाजूला आम्ही फिरकलोही नसतो.

 


                                     डाविन कॅसलचा टाईम लॅप्स पाहाण्याकरिता  प्ले बटन दाबा

जर्मनीत उगम पावणारी डॅन्यूब आणि चेक रिपब्लिक येथे उगम पावणाऱ्या मोरावा नदीच्या संगमावर स्लोव्हाकीया देशात डाविन कॅसल उभा आहे. डॅन्यूब ही युरोपातली दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. जर्मनीत उगम पावून २८५० किलोमीटरचा प्रवास करून ही नदी काळ्या समुद्राला जाऊन मिळते. आजपर्यंत अनेक संस्कृती या नदीच्या काठी उदयास आल्या, नांदल्या आणि काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्यातलीच एक आपल्या सर्वांना सुपरिचित असलेली रोमन संस्कृतीही या नदीच्या काठाने फोफावली. आजच्या घडीला व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), ब्राटीस्लावा(स्लोव्हाकिया),  बुडापेस्ट (हंगेरी), बेलग्रेड (सर्बिया) या चार देशांच्या राजधान्या या नदीच्या काठी वसलेल्या आहेत. अशा या पूर्व युरोपच्या जिवनदायी नदीच्या काठी अनेक किल्ले आहेत.

 


डॅन्यूब आणि मोरावा नदीचा संगम

स्लोव्हाकियाची (पूर्वीचे झेकोस्लावेकिया) राजधानी ब्राटीस्लावापासून १३ किलोमीटरवर डॅन्यूब आणि मोरावा नदीचा संगम आहे. या संगमावर डाविन कॅसल उभा आहे. प्राचीन काळापासून या नद्यांचा उपयोग व्यापारासाठी आणि वाहतुकीसाठी केला जात असे. तसेच उत्तर युरोपातून (आजच्या रशियातून) दक्षिण युरोपातील इटलीपर्यंत जाणारा "अंबर" व्यापारी मार्गही याच नद्यांच्या खोऱ्यातून जात होता. नवाश्मयुगापासून या मार्गावर अंबर या दागिन्यात वापरल्या जाणाऱ्या पिवळ्या रंगाच्या खड्याचा व्यापार होत असे. उत्तरेत सापाडणाऱ्या या अंबरला उत्तरेचे सोने म्हणून ओळखले जात असे. याशिवाय या सागरी किनारा नसलेल्या देशांचा मिठाचा व्यापार याच मार्गावरून होत होता. व्यापारी मार्गामुळे या नद्यांच्या खोऱ्यांची भरभराट झाली आणि या मार्गांच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या काळात किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.

 

किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार


 किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार (West Gate) सुस्थितीत होते. माचीपासून (डोंगरावरून) आलेली तटबंदी खाली उतरून थेट गावापर्यंत गेलेली होती. तटबंदीत पंचकोनी, चौकोनी आणि अर्धगोल बुरुज होते, याच तटबंदीत गावाजवळ किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार (North Gate) आहे. किल्ला तीन भागात वसलेला आहे. गावाजवळील उत्तर प्रवेशद्वारापासून (North Gate) मुख्य प्रवेशद्वारा (West Gate) पर्यंतच्या भागाला Lower castle म्हणतात (ज्याला आपण घेरा म्हणतो). मधल्या भागाला Middle castle म्हणतात (ज्याला आपण माची म्हणतो) आणि सर्वांत वरच्या भागाला Upper castle म्हणतात. (ज्याला आपण बालेकिल्ला म्हणतो). मुख्य प्रवेशद्वारावर माणशी पाच युरोचे तिकीट काढून किल्ल्यात प्रवेश केला. प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला डोंगरावर माची आणि बालेकिल्ला दिसत होता. माचीवरच्या एका मोठ्या बुरुजात एक खिडकी अशाप्रकारे बनवली होती की तेथे बसून मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष ठेवता येईल. प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूला रोमन साम्राज्याच्या काळातल्या वास्तूचे अवशेष आहेत. इसवी सन १९९८ मध्ये येथे केलेल्या उत्खननात एका मातीच्या भांड्यात रोमनकालीन ७० चांदीची नाणी सापडली होती. थोडे पुढे गेल्यावर काही वास्तूंचे चौथरे आहेत. या ठिकाणी उत्खनन केल्यावर अकराव्या शतकातली खापरे आणि नाणी सापडली. त्यावरून या ठिकाणी अकराव्या ते तेराव्या शतकात वस्ती असावी असा अनुमान काढण्यात आले.

 


उत्तर प्रवेशद्वारापासून किल्ल्याच्या या भागातून दोन वाटा फुटतात. एक वाट माची आणि बालेकिल्ल्याकडे आणि दुसरी वाट किल्ल्याच्या गावाकडील भागात जात होती. आम्ही प्रथम किल्ल्याच्या माचीकडे निघालो. पायवाटेच्या दुतर्फा वेगवेगळ्या रंगाची रानफुले फुलली होती. तुतीने लगडलेली झाडे पायवाटेच्या बाजूला होती. लोक जाता येता फळ काढून तोंडात टाकत होते. पायवाटेने चढून वर आल्यावर एक खंदक लागला. त्या खंदकावर आता लाकडी पूल टाकलेला आहे. पूल ओलांडल्यावर आपण माचीच्या प्रवेशद्वारापाशी येतो.

 

माची (Middle Castle)

माचीच्या (Middle Castle) प्रवेशद्वाराच्या बाजूला दोन बुरुज आहेत. प्रवेशद्वारापासून सुरू झालेली तटबंदी पूर्ण माचीला आपल्या कवेत घेते. प्रवेशद्वारातून माचीवर प्रवेश केल्यावर समोर गॉथिक शैलीतील एक विहीर दिसते. पंधराव्या शतकात बांधलेली ही विहीर ५५ मीटर खोल आहे. विहिरीचा व्यास २.४ मीटर आहे. या विहिरीला डॅन्यूब आणि मोरवे या दोन नद्यांचे पाणी मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे. पण किल्ल्याच्या डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी झिरपून विहिरीत येते. विहिरीत येणाऱ्या पाण्याबरोबर गाळ येऊ नये यासाठी डॅन्यूब नदीत मिळणारी खडी विहिरीच्या भोवती पसरलेली आहे. विहीर बांधण्यासाठी वापरलेल्या दगडांवर पाथरवटांनी वेगवेगळ्या खुणा केलेल्या आहेत, अशा २४ प्रकारच्या खुणा या दगडांवर सापडलेल्या आहेत. त्या विहिरीच्या बाजूला लावलेल्या फलकावर दर्शवण्यात आल्या आहेत. 

 

रेनिसांस महाल

विहिरीच्या समोर असलेल्या 'रेनिसांस महाल दोन मजली असावा. त्याचा तळमजला आज शाबूत आहे. त्यात डाविन कॅसलचा इतिहास सांगणारे प्रदर्शन कायम स्वरूपी मांडून ठेवलेले आहे. प्रदर्शन पाहून माचीच्या टोकावर गरे महालाकडे निघालो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात गरे सम्राटाने बांधलेल्या या दुमजली महालाची एक भिंत उभी आहे. या भिंतीत असलेल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर एक मोठी अर्धवर्तुळाकार बाल्कनी आहे. या बाल्कनीतून डॅन्युबचे भव्य पात्र, संगम, बालेकिल्ल्याचा काही भाग आणि सुळक्यांवर असलेले वॉच टॉवर दिसतात. नदीवरून येणारा गार वारा आणि समोर दिसणारे अप्रतिम दृश्य यामुळे इथून पटकन पाय निघत नाही. 

टेहळणी मनोरा


गरे महाल

गरे महाल पाहून परत विहिरीपाशी येऊन बालेकिल्ल्याकडे निघालो. माची आणि बालेकिल्ल्यामध्ये खंदक आहे. त्यावर आता कायमस्वरूपी पूल बांधलेला आहे. हा पूल पार केल्यावर चढण चालू होते. दगडात बांधलेल्या पायऱ्या आणि लोखंडी शिडीने आपण थोड्याच वेळात चांगलीच उंची गाठतो आणि बालेकिल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचतो. या ठिकाणी कातळात खोदलेल्या गुहा आहेत. त्यात किल्ल्यावर सापडलेल्या वस्तूंचे,  नाण्यांचे, शस्त्रास्त्रांचे अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण प्रदर्शन मांडलेले आहे. यात किल्ल्यावर लोहाराच्या घरात सापडलेली दुधारी तलवार येथे ठेवलेली आहे. याशिवाय काही राजचिन्हे ठेवलेली आहेत. यातील गैरे घराण्याचे राजचिन्ह (Coat of Arms) हे आपल्याकडे आढळणाऱ्या सर्पशिल्पासारखे आहे. महालातील नक्षीदार दगड,  किल्ल्यात पाणी खेळवण्यासाठी वापरण्यात आलेल्या मातीच्या नळ्यांचे अवशेष, विटा, किल्ल्याची प्रतिकृती अशा बऱ्याच गोष्टी प्रदर्शनात पाहता येतात. 


 

विहिर

किल्ल्याच्या इतिहासात डोकावल्यास आत्ता असलेल्या माचीच्या भागात ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकापासून वसाहती असल्याचे पुरावे सापडतात. ताम्रयुगाच्या सुरुवातीच्या काळातील किल्ल्याचे अवशेष येथे सापडलेले आहेत. लाकडाचे ओंडके, चिखल आणि दगडांचा वापर करून हा किल्ला बांधलेला होता. सत्तेचे केंद्र म्हणून किल्ल्याची कीर्ती वाढायला लागल्यावर येथील वस्ती वाढतच गेली. व्हेलाटाईस (Velatice), पोडोली (Podoli), सेल्टीक (Celtic) इत्यादी संस्कृती येथे नांदल्या. सेल्टीक संस्कृतीने येथे शंभर वर्षे राज्य केले. जर्मन टोळ्यांनी त्यांच्यावर हल्ला करून किल्ला ताब्यात घेतला. इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या शेवटी हा किल्ला रोमन साम्राज्याचा भाग झाला. रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर नवव्या शतकापर्यंत किल्ल्याचा इतिहास अज्ञात आहे.

 

युरोपातील व्यापारी केंद्र

त्यानंतर आलेल्या मोराविया (मोरावा नदीवरून या घराण्याचे नाव मोराविया पडले) घराण्याने (इसवी सन ८३३ - ९०७) डाविन कॅसलला गतवैभव प्राप्त करुन दिले. त्यानंतर गरे घराण्याने (इसवी सन १४१९-१४६०) किल्ला नव्याने बांधून काढला. त्यात गरे महाल आणि माची त्याखालील भागातली बांधकामे करण्यात आली. त्या काळात बालेकिल्ल्यावर फारशी बांधकामे नव्हती. इसवी सन १४६० मध्ये मोरविया घराण्याचा पाडाव करून सेंट जॉर्ज आणि बोसिंग घराण्याने हा किल्ला ताब्यात घेतला. .. १५२१ मध्ये त्यांनी किल्ला हंगेरीचा राजा लुईस दुसरा याच्या हवाली केला. . . १५२७ ते १६०५ हा किल्ला बॅथोरी घराण्याकडे होता. . . १६३५ मध्ये पॅल्फी घराण्याकडे हा किल्ला गेला. . . १८०९ मध्ये नेपोलियनच्या सैन्याने किल्ल्यावर हल्ला केला. त्यांनी किल्ला ताब्यात घेता जाळपोळ आणि विध्वंस केला. त्यानंतरही किल्ला पॅल्फी घराण्याकडे होता;  पण त्यांनी त्याची डागडुजी केली नाही. दिनांक २५ मे १९३२ रोजी त्यांनी झेकोस्लाव्हेकीया रिपब्लिकला हा किल्ला विकून टाकला.

 

गुहेतले प्रदर्शन

गैरे घराण्याचे राजचिन्ह

दुधारी तलवार 

गुहेतले प्रदर्शन पाहून किल्ल्याचा सर्वोच्च माथा गाठला. डॅन्यूब आणि मोरावा नदीचे खोरे, डाविन गाव त्या मागील डोंगर असा दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येत होता. बालेकिल्ल्यावरून उतरून माचीचा दरवाजा गाठला आणि किल्ला चढलो त्याच्या विरुद्ध दिशेला चालायला सुरुवात केली. एक छोटी पायवाट एका उंचवट्यावर जात होती. त्या पायवाटेने टेकाडावर चढल्यावर एका चॅपलचे अवशेष पाहायला मिळतात. चॅपल पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर डाव्या हाताला दारूखान्याची लांबलचक इमारत आहे. दारूखाना पाहून पुढे चालत गेल्यावर वाट दाट झाडीतून जाते, वाटेत लागणारा लाकडी पूल ओलांडल्यावर समोर किल्ल्याचे डेन्यूब नदीच्या दिशेला असलेले प्रवशेद्वार आहे. किल्ल्याच्या टोकाला असलेले प्रवेशद्वार पाहून किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे येतांना डाव्या बाजूला उद्ध्वस्त घराचे चौथरे दिसतात. या ठिकाणी पुरातत्त्व खात्याने उत्खनन केल्यावर त्यांना चुन्यात बांधलेली भट्टी मिळाली जवळच लाकडे साठवण्याची जागाही होती. या ठिकाणी एक दुधारी तलवार मिळाली. ती किल्ल्यावरील गुहेतल्या प्रदर्शनात पाहायला मिळते. उत्खननात मिळालेल्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढण्यात आला की, या ठिकाणी लोहाराचे घर होते. किल्ल्याचा घेऱ्याचा भाग बघण्यासाठी पायवाटेने अजून खाली उतरलो. या भागात फारसे अवशेष नाहीत. किल्ल्याचा गावच्या दिशेचा उत्तरेचा दरवाजा पाहून पुन्हा मुख्य दरवाजापाशी आल्यावर आमची गडफेरी पूर्ण झाली. डेव्हीन कॅसल आणि परिसर तीन तासात व्यवस्थित पाहून होतो. व्हिएन्ना, बुडापेस्ट इथे हल्ली बरेच भारतीय पर्यटक जातात. त्यांच्या कार्यक्रमात एक दिवस ब्राटीस्लाव्हाची सहल असते. या ब्राटिस्लाव्हापासून जवळच असलेला हा सुंदर किल्ला आणि परिसर एकदा तरी जाऊन पाहावा असा आहे.

  

बालेकिल्ला Upper Castle


जाण्यासाठी  :- डाविन कॅसलला जाण्यासाठी प्रथम ब्राटीस्लावा या स्लोव्हाकियाच्या राजधानीत पोहोचावे लागते. ब्राटीस्लावा रेल्वेने आणि रस्त्याने युरोप मधील सर्व शहरांशी जोडलेले आहे. Most SNP हे बस टर्मिनल ब्राटिस्लाव्हातील सुप्रसिद्ध UFO ब्रीज खाली आहे. या बस स्थानकावरून दर वीस मिनिटांनी २९ नंबरची बस "डाविन कॅसलला" जाते.

 

डाविन कॅसल गाव

Photos by :- Amit Samant & Kaustubh Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon P900 , Gopro Hero 5 


१) डॅन्यूब संथ वाहातेच आहे ..... “Shoes on the Danube” Budapest हा ब्लॉग वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ..

https://samantfort.blogspot.com/2019/07/blog-post.html

२) स्वस्तात मस्त सफ़र बुडापेस्टची  भाग- १ (Budapest in two days) हा ब्लॉग वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ..

https://samantfort.blogspot.com/2019/09/what-where-to-eat-buy-in-budapest.html

३) स्वस्तात मस्त बुडापेस्ट (भाग - २ ) What & where to eat & buy in Budapest हा ब्लॉग वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ..


https://samantfort.blogspot.com/2019/09/what-where-to-eat-buy-in-budapest.html

४) डन्स्टाईन कॅसल ,ऑस्ट्रिया (विदेशातले किल्ले भाग-३) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा..


५) अलिंजा कॅसल, माचू पिचू ऑफ अझरबैजान Alinja Castle , Machu Pichu of Azerbaijan ( विदेशातले किल्ले भाग - २) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा. हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा..