डाविन कॅसल (स्लोव्हाकीया) |
आता नक्की कुठल्या दिशेला जायचे हा प्रश्न होता. युरोपमधील इतर गावांसारखे या गावातही रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. गावात शिरतांना बसने एक वळण घेतलेले त्यावेळी नदी ओझरती दिसली होती. डाविन कॅसल नद्यांच्या संगमावर असल्यामुळे नदीच्या दिशेने निघालो. मुख्य रस्ता सोडल्यावर उजव्या बाजूला नदीकडे जाणारी आखीव रेखीव पायवाट होती. त्या वाटेने चालायला सुरुवात केल्यावर पाच मिनिटात नदीजवळ पोहोचलो. डॅन्यूब नदीच्या विस्तीर्ण पात्राने एक मोठे वळण या ठिकाणी घेतले होते. थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला झाडीतून किल्ल्याच्या तटबंदी आणि बुरुजाचे प्रथम दर्शन झाले. येथे एक बोटीचा धक्का होता आणि त्या ठिकाणी असलेल्या फलकावर दिवसातून दोनदा ब्राटिस्लावा ते डेव्हीन कॅसल बोटसेवा आहे असे कळले. याच्या बाजूला डेव्हीन कॅसलचा नकाशा असलेला एक फलक होता पण त्यावरील माहिती स्थानिक भाषेत होती. डॅन्यूब नदी डाव्या हाताला आणि किल्ला उजव्या हाताला ठेवत पायवाटेवरून पुढे चालायला सुरुवात केली. डाव्या बाजूला एका खांबावर कुंपणासाठी वापरल्या जाणाऱ्या काटेरी तारेची मोठी भेंडोळी ठेवलेली होती. हे एक स्मारक होते. दुसऱ्या महायुद्धानंतर कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पडद्याआड झेकोस्लाव्हेकीयाच्या नागरिकांवर अत्याचार सुरू होते. त्यांना मूलभूत स्वातंत्र्यापासूनही वंचित ठेवण्यात आले होते. १० डिसेंबर १९८९ रोजी एक लाख लोकांचा जमाव या ठिकाणी जमला आणि त्यांनी या ठिकाणचे तारेचे कुंपण तोडून टाकले. या आंदोलनाला hoj Europ (Hello Europe) Fall of Iron Curtain या नावाने ओळखले जाते.
पुढे गेल्यावर किल्ल्याच्या डोंगरात थोड्या उंचीवर खोदलेल्या दोन गुहा दिसल्या. एका माणसाला व्यवस्थित बसता येईल अशा मानवनिर्मित गुहा टेहळणीसाठी बसणाऱ्या माणसांचे ऊन पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी खोदलेल्या होत्या. याठिकाणी किल्ल्याच्या डोंगरापासून सुट्या असलेल्या दोन सुळक्यांवर टेहळणीसाठी बांधलेले बुरुज परीकथेतल्या किल्ल्याच्या बुरुजांसारखे दिसत होते.
The Gate of Freedom |
पुढच्या वळणावर उजव्या बाजूने येणारी मोरावा नदी डॅन्यूब नदीला मिळत होती. या संगमावर एक Brona Slobody The Gate
of Freedom हे स्मारक उभारलेले आहे. पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलेली दरवाजाची एक भव्य चौकट व त्यावर बंदुकीच्या गोळ्या मारल्यामुळे पडलेले खड्डे असे या स्मारकाचे स्वरूप आहे. कम्युनिस्ट राजवटीच्या काळात अनेक जणांनी डॅन्यूब नदी पार करून ऑस्ट्रीयात (युरोपात) पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. सीमेवर असलेल्या सैन्याने त्यांना गोळ्या घालून ठार केले होते. या ठिकाणी बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आलेले आहे. आजूबाजूचा नयनरम्य परिसर, नद्यांची दुथडी भरून वाहाणारी पात्र अशी सगळी सुखद दृश्ये आज पाहतांना काही दशकांपूर्वी याच ठिकाणी रक्तरंजित घटना ही नित्याची गोष्ट होती हे खरे ही वाटत नव्हते. या स्मारकाजवळ एक आणि थोडा पुढे एक असे दोन तलाव होते मोरावा नदीला येणाऱ्या पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी या ठिकाणी तलावांची निर्मिती करण्यात आली. पूर परिस्थितीत नदी पात्रातले जादा पाणी या तलावात साठवले जाते. बाजूलाच परिसरात आढळणारे कीटक, सरपटणारे प्राणी, पक्षी, प्राणी बल्ल्याच्या आणि इथली नैसर्गिक परिसंस्था यांच्याबद्दल माहिती देणारा फलक लावलेला होता. हे सर्व पाहून पुन्हा पायवाटेवर आलो.
टेहळणी गुहा |
टेहळणी मनोरे |
थोडे अंतर चालून गेल्यावर डोंगरावरून आलेली तटबंदी थेट नदी पात्रापर्यंत बांधलेली होती. या तटबंदीतील दरवाजा (South Gate) ओलांडल्यावर समोर मोठा वाहनतळ आणि काही रेस्टॉरंट दिसली. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायला इतका वेळ का लागला ते आत्ता लक्षात आले. बस जिथे थांबली तेथून नदीच्या दिशेला न जाता बस गेली त्या दिशेला चालत गेलो तर पाच मिनिटात या वाहनतळाशी पोहोचलो असतो. पण किल्ल्याला मागच्या बाजूने वळसा घालून मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचायला आम्हाला अर्धा तास लागला असला तरी तो वेळ वाया मात्र गेला नव्हता. किल्ल्याची मागची बाजू, नद्यांचा संगम आणि दोन स्मारके पाहता आली. वाट चुकलो नसतो तर किल्ला पाहिल्यावर या बाजूला आम्ही फिरकलोही नसतो.
जर्मनीत उगम पावणारी डॅन्यूब आणि चेक रिपब्लिक येथे उगम पावणाऱ्या मोरावा नदीच्या संगमावर स्लोव्हाकीया देशात डाविन कॅसल उभा आहे. डॅन्यूब ही युरोपातली दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. जर्मनीत उगम पावून २८५० किलोमीटरचा प्रवास करून ही नदी काळ्या समुद्राला जाऊन मिळते. आजपर्यंत अनेक संस्कृती या नदीच्या काठी उदयास आल्या, नांदल्या आणि काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्यातलीच एक आपल्या सर्वांना सुपरिचित असलेली रोमन संस्कृतीही या नदीच्या काठाने फोफावली. आजच्या घडीला व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), ब्राटीस्लावा(स्लोव्हाकिया), बुडापेस्ट (हंगेरी), बेलग्रेड (सर्बिया) या चार देशांच्या राजधान्या या नदीच्या काठी वसलेल्या आहेत. अशा या पूर्व युरोपच्या जिवनदायी नदीच्या काठी अनेक किल्ले आहेत.
डॅन्यूब आणि मोरावा नदीचा संगम |
स्लोव्हाकियाची (पूर्वीचे झेकोस्लावेकिया) राजधानी ब्राटीस्लावापासून १३ किलोमीटरवर डॅन्यूब आणि मोरावा नदीचा संगम आहे. या संगमावर डाविन कॅसल उभा आहे. प्राचीन काळापासून या नद्यांचा उपयोग व्यापारासाठी आणि वाहतुकीसाठी केला जात असे. तसेच उत्तर युरोपातून (आजच्या रशियातून) दक्षिण युरोपातील इटलीपर्यंत जाणारा "अंबर" व्यापारी मार्गही याच नद्यांच्या खोऱ्यातून जात होता. नवाश्मयुगापासून या मार्गावर अंबर या दागिन्यात वापरल्या जाणाऱ्या पिवळ्या रंगाच्या खड्याचा व्यापार होत असे. उत्तरेत सापाडणाऱ्या या अंबरला उत्तरेचे सोने म्हणून ओळखले जात असे. याशिवाय या सागरी किनारा नसलेल्या देशांचा मिठाचा व्यापार याच मार्गावरून होत होता. व्यापारी मार्गामुळे या नद्यांच्या खोऱ्यांची भरभराट झाली आणि या मार्गांच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या काळात किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.
किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार |
उत्तर प्रवेशद्वारापासून किल्ल्याच्या या भागातून दोन वाटा फुटतात. एक वाट माची आणि बालेकिल्ल्याकडे आणि दुसरी वाट किल्ल्याच्या गावाकडील भागात जात होती. आम्ही प्रथम किल्ल्याच्या माचीकडे निघालो. पायवाटेच्या दुतर्फा वेगवेगळ्या रंगाची रानफुले फुलली होती. तुतीने लगडलेली झाडे पायवाटेच्या बाजूला होती. लोक जाता येता फळ काढून तोंडात टाकत होते. पायवाटेने चढून वर आल्यावर एक खंदक लागला. त्या खंदकावर आता लाकडी पूल टाकलेला आहे. पूल ओलांडल्यावर आपण माचीच्या प्रवेशद्वारापाशी येतो.
माची (Middle Castle) |
माचीच्या (Middle Castle) प्रवेशद्वाराच्या बाजूला दोन बुरुज आहेत. प्रवेशद्वारापासून सुरू झालेली तटबंदी पूर्ण माचीला आपल्या कवेत घेते. प्रवेशद्वारातून माचीवर प्रवेश केल्यावर समोर गॉथिक शैलीतील एक विहीर दिसते. पंधराव्या शतकात बांधलेली ही विहीर ५५ मीटर खोल आहे. विहिरीचा व्यास २.४ मीटर आहे. या विहिरीला डॅन्यूब आणि मोरवे या दोन नद्यांचे पाणी मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे. पण किल्ल्याच्या डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी झिरपून विहिरीत येते. विहिरीत येणाऱ्या पाण्याबरोबर गाळ येऊ नये यासाठी डॅन्यूब नदीत मिळणारी खडी विहिरीच्या भोवती पसरलेली आहे. विहीर बांधण्यासाठी वापरलेल्या दगडांवर पाथरवटांनी वेगवेगळ्या खुणा केलेल्या आहेत, अशा २४ प्रकारच्या खुणा या दगडांवर सापडलेल्या आहेत. त्या विहिरीच्या बाजूला लावलेल्या फलकावर दर्शवण्यात आल्या आहेत.
रेनिसांस महाल |
विहिरीच्या समोर असलेल्या 'रेनिसांस” महाल दोन मजली असावा. त्याचा तळमजला आज शाबूत आहे. त्यात डाविन कॅसलचा इतिहास सांगणारे प्रदर्शन कायम स्वरूपी मांडून ठेवलेले आहे. प्रदर्शन पाहून माचीच्या टोकावर गरे महालाकडे निघालो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात गरे सम्राटाने बांधलेल्या या दुमजली महालाची एक भिंत उभी आहे. या भिंतीत असलेल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर एक मोठी अर्धवर्तुळाकार बाल्कनी आहे. या बाल्कनीतून डॅन्युबचे भव्य पात्र, संगम, बालेकिल्ल्याचा काही भाग आणि सुळक्यांवर असलेले वॉच टॉवर दिसतात. नदीवरून येणारा गार वारा आणि समोर दिसणारे अप्रतिम दृश्य यामुळे इथून पटकन पाय निघत नाही.
टेहळणी मनोरा |
गरे महाल |
गरे महाल पाहून परत विहिरीपाशी येऊन बालेकिल्ल्याकडे निघालो. माची आणि बालेकिल्ल्यामध्ये खंदक आहे. त्यावर आता कायमस्वरूपी पूल बांधलेला आहे. हा पूल पार केल्यावर चढण चालू होते. दगडात बांधलेल्या पायऱ्या आणि लोखंडी शिडीने आपण थोड्याच वेळात चांगलीच उंची गाठतो आणि बालेकिल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचतो. या ठिकाणी कातळात खोदलेल्या गुहा आहेत. त्यात किल्ल्यावर सापडलेल्या वस्तूंचे, नाण्यांचे, शस्त्रास्त्रांचे अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण प्रदर्शन मांडलेले आहे. यात किल्ल्यावर लोहाराच्या घरात सापडलेली दुधारी तलवार येथे ठेवलेली आहे. याशिवाय काही राजचिन्हे ठेवलेली आहेत. यातील गैरे घराण्याचे राजचिन्ह (Coat of Arms) हे आपल्याकडे आढळणाऱ्या सर्पशिल्पासारखे आहे. महालातील नक्षीदार दगड, किल्ल्यात पाणी खेळवण्यासाठी वापरण्यात आलेल्या मातीच्या नळ्यांचे अवशेष, विटा, किल्ल्याची प्रतिकृती अशा बऱ्याच गोष्टी प्रदर्शनात पाहता येतात.
विहिर |
किल्ल्याच्या इतिहासात डोकावल्यास आत्ता असलेल्या माचीच्या भागात ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकापासून वसाहती असल्याचे पुरावे सापडतात. ताम्रयुगाच्या सुरुवातीच्या काळातील किल्ल्याचे अवशेष येथे सापडलेले आहेत. लाकडाचे ओंडके, चिखल आणि दगडांचा वापर करून हा किल्ला बांधलेला होता. सत्तेचे केंद्र म्हणून किल्ल्याची कीर्ती वाढायला लागल्यावर येथील वस्ती वाढतच गेली. व्हेलाटाईस (Velatice), पोडोली (Podoli), सेल्टीक (Celtic) इत्यादी संस्कृती येथे नांदल्या. सेल्टीक संस्कृतीने येथे शंभर वर्षे राज्य केले. जर्मन टोळ्यांनी त्यांच्यावर हल्ला करून किल्ला ताब्यात घेतला. इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या शेवटी हा किल्ला रोमन साम्राज्याचा भाग झाला. रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर नवव्या शतकापर्यंत किल्ल्याचा इतिहास अज्ञात आहे.
युरोपातील व्यापारी केंद्र |
त्यानंतर आलेल्या मोराविया (मोरावा नदीवरून या घराण्याचे नाव मोराविया पडले) घराण्याने (इसवी सन ८३३ - ९०७) डाविन कॅसलला गतवैभव प्राप्त करुन दिले. त्यानंतर गरे घराण्याने (इसवी सन १४१९-१४६०) किल्ला नव्याने बांधून काढला. त्यात गरे महाल आणि माची व त्याखालील भागातली बांधकामे करण्यात आली. त्या काळात बालेकिल्ल्यावर फारशी बांधकामे नव्हती. इसवी सन १४६० मध्ये मोरविया घराण्याचा पाडाव करून सेंट जॉर्ज आणि बोसिंग घराण्याने हा किल्ला ताब्यात घेतला. इ.स. १५२१ मध्ये त्यांनी किल्ला हंगेरीचा राजा लुईस दुसरा याच्या हवाली केला. इ. स. १५२७ ते १६०५ हा किल्ला बॅथोरी घराण्याकडे होता. इ. स. १६३५ मध्ये पॅल्फी घराण्याकडे हा किल्ला गेला. इ. स. १८०९ मध्ये नेपोलियनच्या सैन्याने किल्ल्यावर हल्ला केला. त्यांनी किल्ला ताब्यात न घेता जाळपोळ आणि विध्वंस केला. त्यानंतरही किल्ला पॅल्फी घराण्याकडे होता; पण त्यांनी त्याची डागडुजी केली नाही. दिनांक २५ मे १९३२ रोजी त्यांनी झेकोस्लाव्हेकीया रिपब्लिकला हा किल्ला विकून टाकला.
गुहेतले प्रदर्शन |
गैरे घराण्याचे राजचिन्ह |
दुधारी तलवार |
गुहेतले प्रदर्शन पाहून किल्ल्याचा सर्वोच्च माथा गाठला. डॅन्यूब आणि मोरावा नदीचे खोरे, डाविन गाव त्या मागील डोंगर असा दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येत होता. बालेकिल्ल्यावरून उतरून माचीचा दरवाजा गाठला आणि किल्ला चढलो त्याच्या विरुद्ध दिशेला चालायला सुरुवात केली. एक छोटी पायवाट एका उंचवट्यावर जात होती. त्या पायवाटेने टेकाडावर चढल्यावर एका चॅपलचे अवशेष पाहायला मिळतात. चॅपल पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर डाव्या हाताला दारूखान्याची लांबलचक इमारत आहे. दारूखाना पाहून पुढे चालत गेल्यावर वाट दाट झाडीतून जाते, वाटेत लागणारा लाकडी पूल ओलांडल्यावर समोर किल्ल्याचे डेन्यूब नदीच्या दिशेला असलेले प्रवशेद्वार आहे. किल्ल्याच्या टोकाला असलेले प्रवेशद्वार पाहून किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे येतांना डाव्या बाजूला उद्ध्वस्त घराचे चौथरे दिसतात. या ठिकाणी पुरातत्त्व खात्याने उत्खनन केल्यावर त्यांना चुन्यात बांधलेली भट्टी मिळाली जवळच लाकडे साठवण्याची जागाही होती. या ठिकाणी एक दुधारी तलवार मिळाली. ती किल्ल्यावरील गुहेतल्या प्रदर्शनात पाहायला मिळते. उत्खननात मिळालेल्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढण्यात आला की, या ठिकाणी लोहाराचे घर होते. किल्ल्याचा घेऱ्याचा भाग बघण्यासाठी पायवाटेने अजून खाली उतरलो. या भागात फारसे अवशेष नाहीत. किल्ल्याचा गावच्या दिशेचा उत्तरेचा दरवाजा पाहून पुन्हा मुख्य दरवाजापाशी आल्यावर आमची गडफेरी पूर्ण झाली. डेव्हीन कॅसल आणि परिसर तीन तासात व्यवस्थित पाहून होतो. व्हिएन्ना, बुडापेस्ट इथे हल्ली बरेच भारतीय पर्यटक जातात. त्यांच्या कार्यक्रमात एक दिवस ब्राटीस्लाव्हाची सहल असते. या ब्राटिस्लाव्हापासून जवळच असलेला हा सुंदर किल्ला आणि परिसर एकदा तरी जाऊन पाहावा असा आहे.
बालेकिल्ला Upper Castle |
जाण्यासाठी :- डाविन कॅसलला जाण्यासाठी प्रथम ब्राटीस्लावा या स्लोव्हाकियाच्या राजधानीत पोहोचावे लागते. ब्राटीस्लावा रेल्वेने आणि रस्त्याने युरोप मधील सर्व शहरांशी जोडलेले आहे. Most
SNP हे बस टर्मिनल ब्राटिस्लाव्हातील सुप्रसिद्ध UFO
ब्रीज खाली आहे. या बस स्थानकावरून दर वीस मिनिटांनी २९ नंबरची बस "डाविन कॅसलला" जाते.
डाविन कॅसल गाव |
Photos by :- Amit Samant & Kaustubh Samant © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5
१) डॅन्यूब संथ वाहातेच आहे ..... “Shoes on the Danube” Budapest हा ब्लॉग वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ..
https://samantfort.blogspot.com/2019/07/blog-post.html
२) स्वस्तात मस्त सफ़र बुडापेस्टची भाग- १ (Budapest in two days) हा ब्लॉग वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ..
https://samantfort.blogspot.com/2019/09/what-where-to-eat-buy-in-budapest.html
३) स्वस्तात मस्त बुडापेस्ट (भाग - २ ) What & where to eat & buy in Budapest हा ब्लॉग वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ..