Tuesday, November 13, 2018

Offbeat Odisha चिल्का सरोवराची अदभूत सफ़र (Chilka Lake)

Chilka Lake

कोणार्कचे सूर्य मंदिर पाहून पुरीला पोहोचलो तरी पावसाने पिच्छा सोडला नव्हता. ऐन नोव्हेंबर मध्ये पाउस पडत असल्याने बंगालच्या उपसागरातून उगवणारा सूर्य बघायचा चांस कोणार्कला मिळाला नव्हता. पश्चिम किनाऱ्यावर राहात असल्याने अरबी समुद्रात बुडणारा सूर्य बघायची सवय होती. फोटोग्राफी करायला लागलो तेंव्हा पासून समुद्रात बुडणार्‍या सूर्याची अनेक छायाचित्रे काढली होती. आज समुद्रातून उगवणाऱ्या सूर्याचा फोटो काढण्यासाठी पहाटेच पूरीच्या किनाऱ्यावर दाखल झालो. ढगाळ हवामानामुळे सूर्याने परत हुलकावणी दिली. पण सागर किनार्‍यावरील बागेत आलेल्या बुरख्या हळद्याच्या (Black hooded Oriol) जोडीमुळे सकाळी लवकर उठणे सार्थकी लागले. बुरख्या हळद्याच्या जोडीची भरपूर छायाचित्र घेउन गाडीने चिल्का सरोवरकडे निघालो. चिल्का लेकच्या काठावर असलेले सातपाडा हे गाव पूरी पासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणथळ जागाच दिसत होत्या. मधुनच एखादी १० -१२ घरांची वस्ती लागे. घरासमोरही छोटे तलाव होते. त्यात कमळ आणि इतर पाण वनस्पती वाढलेल्या दिसत होत्या. एके ठिकाणी रस्त्याच्या बाजूला चहाची टपरी होती. लुंगी गुंडाळलेले चार गावकरी तिथे चहा पित उभे होते. स्थानिकांशी संवाद साधण्याची योग्य संधी होती. त्यामुळे गाडी थांबवून मी चहा प्यायला उतरलो. पण भाषेच्या अडथळ्यामुळे संवाद फ़ारसा झालाच नाही. थोड्याच वेळात चिल्का तलावाच्या काठी पोहोचलो. 


Black hooded Oriol

Black hooded Oriol

चिल्का हे आशियातले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, तर जगातले दुसर्‍या क्रमांकाचे खार्‍या पाण्याचे सरोवर आहे. ११०० स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेले हे खार्‍या पाण्याचे सरोवर जमिनीच्या चिंचोळ्या पट्टीने समुद्राशी जोडलेले आहे. कधी काळी भूगर्भात झालेल्या उलथापालथीमुळे जमिनीचा भाग वर येउन समुद्रापासून हे खार्‍या पाण्याचे सरोवर तयार झाले. आजही या सरोवराचा एक भाग समुद्राशी सातपाडा या ठिकाणी जोडलेला आहे. त्याला मगरमुख म्हणतात. सातपाडा येथे चिल्का ऑथिरीटी डेव्हलपमेंट सेंटर आहे. इथे चिल्का सरोवर, त्या परिसरातील, प्राणी, पक्षी, जलचर, मनुष्य जीवन यावर आधारीत कायम स्वरुपी प्रदर्शन मांडलेले आहे. ते पाहून जेट्टीवर पोहोचलो. जेट्टीवर अनेक स्थानिक मच्छीमारांच्या होड्या आणि ओरीसा टुरीझमच्या काही होड्या उभ्या होत्या. सातपाडावरुन या होड्यांमधून आपण चिल्का सरोवराची सफ़र करु शकतो. त्यात चिल्का सरोवराच मुख (मगरमुख) समुद्र आणि चिल्का सरोवरामध्ये असलेला राजहंस बीच पाहाता येतो. चिल्का सरोवरातील डॉल्फ़ीन आणि पक्षी पाहाता येतात. नालबाना हे पक्ष्यांचे बेट पाहाता येते. बहूतेक सर्व पर्यटक सातपाडा ते मगरमुख या परिसरात फ़िरुन परत जातात. पण चिल्काचा सरोवराचा नकाशा पाहील्या पासून ते जास्तीत जास्त कसे फ़िरता येईल याचा मी शोध घेत होतो. पण ओडीसाच्या राजधानीतही जे स्थानिक लोक भेटले त्यांनीही चिल्का सरोवराचा सातपाडा जवळचा भागच पाहिला होता. सातपाडापासून चिल्कात आतवर जाता येते का हे शोधायचे होते.

Satpada, Chilka Lake

सातपाडा हे चिल्का सरोवराच्या उत्तरेला आहे. चिल्का सरोवराच्या दक्षिणेला बारकुल गावात ओरीसा टुरीझमचे पांथ निवास आहे. तेथून कालजाई या चिल्का मधील बेटावर जाण्यासाठी होड्या मिळतात. कालजाई देवी आजूबाजूच्या परिसरात प्रसिध्द असल्याने बारकुलहून दिवसभर मोठ्याप्रमाणावर होड्या काळजाई बेटावर जातात. सातपाडा ते बारकुल अंतर रस्त्याने ११० किलोमीटर आहे. हा वळसा टाळून शक्य असल्यास थेट बारकुल पर्यंत होडीने जावे म्हणून चौकशी चालू केली. एक होडीवाला तयार झाला. बारकुलला जाता जाता काळजाईलाही जाऊ असे त्याने सांगितले. बोट तयार करतो तुम्ही येथेच थांबा अस सांगून तो गेला.

      (शिंपल्यातून मोती काढतानाचा व्हिडीओ पाहण्यासाठी प्ले बटनावर क्लिक करा.)

इतक्यात एक माणूस मोठ्या शिंपल्यांनी भरलेली प्लास्टीकची बादली घेऊन आला. एक शिंपला १०/- रुपयाला होता. तुम्हाला हवे तेवढे शिंपले तुम्ही घेऊ शकता. ते शिंपले तो आपल्या समोर फ़ोडणार त्यातून मोती निघाला तर आपला. सौदा एकदम फ़ायद्याचा होता. त्याने बादलीतून दोन शिंपले काढले आणि एकमेकांवर जोरात आपटले. त्यातला एक शिंपला फ़ुटला त्यात बोट घालून त्याने पहिला मोती बाहेर काढला. हा मोती चांगला मोठा पण ओबडधोबड होता. मोती काढून झाल्यावर त्याने शिंपला बाजूच्या पाण्यात फ़ेकून दिला. आता एकामागून एक शिंपले बादलीतून बाहेर निघत होते. काहीत मोती मिळत, काही रिकामे होते. प्रत्येक नव्या शिंपल्या बरोबर उत्सुकता वाढत होती. एक बादली संपल्यावर दुसरी बादली तो घेऊन आला. बर्‍यापैकी मोती जमा झाल्यावर मोह टाळून बोटीत बसलो. मी, बायको आणि मुलगा असे आम्ही तिघेच त्याच्या बोटीतून ५ तासांचा प्रवास करणार असल्याने आम्हाला या अनोळखी ठिकाणी विश्वास वाटावा यासाठी नावाड्याने येतांना त्याच्या १२ वर्षाच्या मुलाला बरोबर आणले होते. पुन्हा भाषेचा मोठ्ठा प्रश्न आला त्यामुळे त्या मुलाशी गप्पा मारता आल्या नाहीत. 
   
White bellied sea eagle, Chilka Lake

सातपाडापासून मगरमुख पाहून समुद्र आणि चिल्का सरोवरामध्ये असलेल्या राजहंस बीचवर उतरलो. ३२ किलोमीटर लांबवर पसरलेली ही चिंचोळी किनारपट्टी चिल्का लेकला समुद्रापासून वेगळी करते. बीचवर थोडावेळ फ़िरुन बोटीत बसलो. बोट पुढच्या प्रवासाला बारकुलच्या दिशेने निघाली. चिल्का सरोवराची लांबी ६४.३ किलोमीटर आणि सरासरी रुंदी २०.१ किलोमीटर आहे. चिल्का सरोवरात बडाकुडा, ब्रेकफ़ास्ट, हनिमून, कालजाई, कंथापंथा, पारीकुडा, नालबाना (पक्षी अभयारण्य) नौपारा, सोमोलो, सानाकुडा इत्यादी अनेक बेट आहेत. त्यांनी २२३ वर्ग किलोमीटरचा भूभाग व्यापलेला आहे. भार्गवी, दया, माक्रा, मालागुनी या मुख्य नद्या आणि इतर अनेक जलस्त्रोतां मधून या सरोवराला गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. तर एका बाजूने बंगालच्या उपसागराचे पाणी सरोवरात शिरते. त्यामुळे पाण्याचा खारटपणा कमी होतो. उन्हाळ्यात जेंव्हा नद्यांचा प्रवाह आटतो तेंव्हा पाण्याचा खारटपणा वाढतो. तरीही तो समुद्राच्या पाण्याच्या खारटपणापेक्षा कमीच असतो. त्याची pH Value 7.1 – 9.6 आहे. गोडे पाणी मिसळलेल्या खार्‍या पाण्याला इंग्रजीत Backrish water म्हणतात. हे पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षा कमी खारट असते. १९८१ मध्ये चिल्का सरोवराला Indian wetland of international importance under the Ramsar Convention हा दर्जा मिळालेला आहे.


Chilka lake

Fisherman in Chilka Lake

सातपाडाच्या आसपास सरोवरचा तळ जास्त खोल नाही. चिल्का सरोवराची खोली किनार्‍या जवळ 0.९ फ़ूट (0.3 मीटर) ते २.६ फ़ूट (0.८ मीटर) आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचतो. त्यामुळे या भागात भरपूर पाणवनस्पती वाढलेल्या आहे. पाणी नितळ असल्यामुळे तळ स्पष्ट दिसतो. या पाण वनस्पतीच्या आधाराने अनेक जलचर राहातात. समुद्रातून मासेही या भागात अंडी देण्यासाठी येतात. त्यांना खाणारे भक्षक पक्षांचाही या भागात वावर असतो. या सगळ्यामुळे येथे एक सुंदर इको सिस्टीम तयार झालेली आहे. जसजसे पुढे जात होत होतो तसतसा पाण्याचा रंग गहीरा होत होता. अर्थात तळाची खोली वाढत होती. ठिकठिकाणी मच्छीमारानी जाळी लावलेली होती. काही ठिकाणी छाती एवढ्या पाण्यात उतरुन ते जाळ्या लावत होते. या भागातून होडी नेताना आडवी लावलेली जाळी आली की, आमचा नावाडी होडीचे इंजीन वर उचलून घ्यायचा जाळीवरुन बोट निघून गेली की, पुन्हा इंजिन खाली सोडायचा. बोटीच्या मागच्या टोकावर बसून हे काम अचूकरित्या करणे हे कसब होते. तलावाच्या या भागात भरपूर बोटी होत्या. चिल्का सरोवराच्या काठावरील लोकांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन मासेमारी आहे. तसेच या भागाचा भौगोलिक रचनेमुळे दैनंदिन व्यवहारासाठी आणि वाहातुकीसाठी सरोवर हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे  विविध सामानाने भरलेल्या बोटींची येथे ये जा चालू होती.  या सर्व गजबजाटात एका नांगरलेल्या बोटीवर छत्रीच्या सावलीत एकजण शांतपणे झोपला होता.



Fisherman resting in boat, Chilka Lake

बोट पुढे जात होती तशी मासे पकडण्यासाठी लावलेली जाळी आणि बोटी विरळ होत गेल्या. जाळ्यात पकडलेल्या माशांना खाण्यासाठी आकाशात इतर पक्षांबरोबर कावळेही फिरत होते .पाण्यात सूर मारणारे पक्षी, जाळी बांधलेल्या खांबावर दबा धरून बसलेले पक्षी, पायात पकडलेले मासे खाणारे पक्षी अशी अनेक दृश्ये  सरकत्या बोटीबरोबर पाहायला मिळत होती. एके ठिकाणी एका ब्राम्हणी घारीने (Brahminy kite) चोचीत पकडलेला मासा एक कावळा खेचत होता. त्याला कंटाळून घारीने जागा बदलल्यावरही कावळ्याने तिचा पिच्छा सोडला नाही. एका खांबावर White bellied sea eagle आरामात बसला होता. Little Bittern (छोटा तापस), रात बगळा (Night Heron), Marsh harriers इत्यादी अनेक पक्षी जवळून पाहायला मिळत होते. हिवाळ्यातया सरोवरात अनेक स्थलांतरीत पक्षी (Migrated Birds) दाखल होतात. Northern pintail, Gadwall, Northern shoveler इत्यादी बदक (Goose), flamingos आणि १५८ प्रकारचे स्थलांतरीत पक्षी या सरोवराच्या क्षेत्रात येतात. येथील नलबाना बेट यासाठी प्रसिध्द आहे. २०१७ या वर्षा मध्ये येथे ९ लाखाच्या वर स्थलांतरीत पक्षी आल्याची वनखात्याची नोंद आहे. दर दिवशी वनखात्याची परवानगी घेऊन फ़क्त ३० बोटी या नलबाना बेटावर जातात.


Brahminy kite

Brahminy kite & Indian Crow

Fisherman in Chilka Lake

आता सरोवराचा तळ अधिक खोल झाला त्यामुळे या भागात जाळी नव्हती. इतक्यात आमच्या नावाड्याने पाण्यात एके ठिकाणी लक्ष वेधले. पाण्याच्या पृष्ठभागावर दोन Irrawaddy dolphin इर्रावड्डी डॉल्फिनच्या दोन तपकीरी पाठी चमकत होत्या. पाण्या बाहेर लहानशी उडी मारुन ते पुन्हा पाण्यात गडप होत होते . पुढे गेल्यावर अजून चार Irrawaddy dolphin बोटीच्या आजूबाजूला दिसले. या डॉल्फ़ीनचे तोंड (Beak) इतर डॉल्फ़ीन पेक्षा छोटी असते. हे डॉल्फ़ीन नदीच्या मुखा जवळ असणार्‍या कमी खार्‍या पाण्यात (Backrish water) आढळातात. चिल्का सरोवराचे पाणी त्याच प्रकारचे असल्याने आणि Irrawaddy dolphin ही संरक्षित प्रजाती असल्याने सरोवरच्या मुखापासून ठराविक अंतरापर्यंत हे डॉल्फ़िन सहज दिसतात. 

निळे गगन, निळी धरा, निळे निळे पाणी.......

निळे गगन, निळी धरा, निळे निळे पाणी.......

सातपाडा सोडून आता दोन तास झाले होते. उन्हाचा चटका जाणवायला लागला . होडीच्या नाकावर बसून इतकावेळ चिल्का सरोवरातील अप्रूप न्याहाळत होतो. उन्हामुळे होडीतल्या ताडपत्रीच्या  सावलीत येऊन बसलो. आमचा नावाडी मात्र उन्हात उभा राहून बोट चालवत होता. नजर जाईल तिथे चहूबाजूंना निळशार पाणी पसरल होते. वर निळशार स्वच्छ आकाश आणि दूरवर दिसणारे निळे डोंगर सगळीकडे गुढ निळाई भरुन राहीली होती. निळे गगन, निळी धरा, निळे निळे पाणी........ 

Boat ride in chilka Lake


बोटीच्या इंजिनाचा तालबध्द आवाज सोडला तर कसलाच आवाज नव्हता. अशा भारलेल्या वातावरणात किती वेळ गेला माहिती नाही. डाव्या बाजूला दूरवर एक बेट दिसायला लागले. बेटाच्या बाजूला पाण्यात वॉच टॉवर उभारलेला होता. बेटा जवळच्या दलदलीत असंख्य बदक चरत होती.पक्ष्यांसाठी प्रसिध्द असलेले नालबाना बेट होते ते. या बेटावर जाण्याची परवानगी आमाच्याकडे नव्हती. ती दलदलीत बसलेली बदक जवळून पाहाता यावी यासाठी आमच्या नावाड्याला विनंती केली पण त्याने नकार दिला. कारण विनापरवाना बेटा जवळ बोट आढळली तर वनखाते ती बोट जप्त करते. मगाशी पण डॉल्फ़ीन पासून ठराविक अंतरावरुन नावडी बोट चालवत होता. कशामुळे माहिती नाही पण, दलदलीत बसलेली बदकं अचानक उडाली. तो हजारोंचा थवा उडत उडत बेटा मागे जातांनाचे दृष्य सुंदर दिसत होते.

Nalbana Island, Chilka Lake

Goose near Nalbana Island, Chilka Lake

नलबाना बेट मागे पडले आता पुन्हा सर्वत्र निळाई दाटली होती. चिल्का लेकची जास्तीत जास्त खोली १३ फ़ूट आहे ती याच भागात असावी. आमचा नावाडी कुठल्या रेफ़रन्सने बोट चालवत होता तोच जाणे. त्याच्या आता बोटीत असलेल्या मुलासारखेच त्याचेही बालपण चिल्का सरोवराच्या अंगाखांद्यावर खेळण्यात गेल असेल त्यामुळे त्याला सरोवरचा कोपरा न कोपरा माहिती असेल. थोड्या वेळात म्हणजे सातपाडाहून निघाल्या पासून ४ तासाने समोर कालजाई मंदिराचा कळस दिसायला लागला. इसवीसन १७१७ मध्ये राजा जगन्नाथ मानसिंगने हे मंदिर बांधले. कालजाई हे कालीमातेचे रुप आहे. एका दंतकथेनुसार नवीन लग्न झालेली जाई नावाची मुलगी आपल्या वडिलांबरोबर बोटीतून जात होती. तेंव्हा मोठे वादळ आले आणि बोट बुडाली. जाई सोडून सर्वजण वाचले. या जाईला कालजाईच्या रुपात येथे पुजले जाते. स्थानिक लोकांमध्ये ही देवी प्रसिध्द असल्याने आणि बारकुल पासून दिवसभर बोटसेवा सुरु असल्याने भरपूर लोक कालजाईच्या दर्शनाला येतात. आम्ही पण कालजाईचे दर्शन घेऊन बारकुलकडे निघालो. अर्ध्या तासत बारकुलला पोहोचलो आमच्या नावाड्याचा निरोप घेतला. बारकुलला चिल्का लेकला लागून ओटीडीसीचे पांथनिवास रेस्ट हाऊस आहे. तिथे सामान टाकून रेस्टॉरंट गाठले. चिल्का लेक मधला चविष्ट मासे, कोलंबी आणि खेकडे खाऊन रेस्ट हाऊस मागच्या नारळाच्या बागेत जाऊन बसलो. समोर चिल्का सरोवरातला दलदलीचा पट्टा होता. त्यात असंख्य छोटे मोठे पक्षी बागडत होते. त्यांचे निरीक्षण करण्यात संध्याकाळ कधी झाली कळलेच नाही.

Kaljai Temple, Kaljai Island, Chilka lake

जाण्यासाठी :- ओडीशाची राजधानी भूवनेश्वर ते भुवनेश्वर असा ५ दिवसांचा कार्यक्रम करता येतो. 
पहिला दिवस:- भुवनेश्वर, 
दुसरा दिवस:-  खांडगिरी-उदयगिरी लेणी पाहून कोणार्कचे सूर्य मंदिर, संध्याकाळचा लाईट आणि साऊंड शो. 
तिसरा दिवस:-  पुरी, जगन्नथाचे देऊळ, बीच,
चौथा दिवस:-  पुरी - सातपाडा तेथून बोटीने वर सांगितल्या प्रमाणे चिल्का लेक (शक्य असल्यास नालबाना करुन परत येणे किंवा बारकूलला मुक्काम). 
पाचवा दिवस:-  भूवनेशवर - कटक , बाराबती किल्ला.  

 Little Bitturn (छोटा तापस) Black wing stilt (शेकट्या)
    


#chilkalake#chilkalaketour#chilkalakebiodiversity#chilkalakeodisha#offbeatodisha#onedaytourfrombhuvaneshwar#onedaypicnicspotfrompuri#

26 comments:

  1. अत्यंत सुंदर माहिती आणि वर्णन.
    विषेश करुन छायाचित्रे अप्रतिम. गोल्डन ओरायल, निळेशार पाणी, गगन केवळ लाजवाब.. खुप खुप छान..

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण माहिती तसेच उत्तम फोटो

    ReplyDelete
  3. खूपच छान माहिती आहे आणि छायाचित्रे तर खूपच छान👌

    ReplyDelete
  4. सुंदर माहिती एक वेगला अनुभव

    ReplyDelete
  5. Mast lekh.photos khup chan.Moti shimpalyatun kadhatana 1st time pahila.thank you very much for sharing video..����

    ReplyDelete
  6. अमित..
    अत्यंत उत्तम आणि माहितीपूर्ण लिखाण तसंच अप्रतिम छायाचित्र ����
    जलचर, निसर्ग तसंच जीवसृष्टी विषयीचं तुझं ज्ञान कौतुकास्पदच ��

    ReplyDelete
  7. Samantsaheb... very nice information with photographed, really appreciable ...

    ReplyDelete
  8. अमित नेहमी प्रमाणे सुंदर आणी सुरेख प्रवाश वर्णन.आता सगळे ब्लोग एकत्र करून पुस्तक काढ

    ReplyDelete
  9. Sundar mahiti. Nisargacha adbhut avishkar. Thank u

    ReplyDelete
  10. फोटोज आणि माहिती दोन्हीही सुंदर. लेख माहितीपूर्ण

    ReplyDelete
  11. छान माहिती, वाचताना मजा आली

    सुधीर कोकाटे

    ReplyDelete
  12. Beautiful photos, excellent narrative, very informative.
    I had read about this place earlier also but learnt many new details from your blog.
    Keep it up

    ReplyDelete
  13. सुंदर माहिती.. माझं बसल्याजागी फिरणं झालं.. सर्व फोटो अप्रतीम.. शिंपल्यातील मोतीचा व्हिडिओ मस्त.. मेजवानीच आहे हा लेख म्हणजे..��

    आरती दुगल

    ReplyDelete
  14. घरी बसून तुमचा लेख वाचून आणि उत्कृष्ट फोटो पाहून स्वतः वेगळाच अनुभव आला,विशेषकरून शिंपल्यातून मोती काढण्याचा विडिओ खूपच आवडला.
    लेखक श्री.अमित सामंत आणि त्यांच्या टीम मेंबर्स चे खूप खूप आभार आणि धन्यवाद!
    अशीच ऐतिहासिक माहिती वेळोवेळी देत राहा.
    धन्यवाद!����������������

    ReplyDelete
  15. मस्त लेख छान फोटोग्रफी

    ReplyDelete
  16. Mast vatla lekh ..khupach mahiti milali .hya asha tours mumbaitun arrange hotat ka ?pl reply

    ReplyDelete
    Replies
    1. नाही . पण सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात ऑनलाईन बुकींग करुन आपण स्वतः आरामात जाऊ शकतो.

      Delete
  17. Very nicely formulated. Keep writing..!

    ReplyDelete