Saturday, June 21, 2025

नाझका लाईन्सचे गुढ (भाग- २) ( Unsolved Mystery of Nazca Lines - 2)

 

Parrot , Nazca lines

    नाझका रेषा आणि चित्र प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याची व्याप्ती आणि भव्यपणा आपल्याला भारुन टाकतो आणि मग साहजिकच प्रश्न पडतात. नाझका लाईन्स कोणी कोरल्या ? कशा कोरल्या ? आणि का कोरल्या ?  नाझका रेषा आणि चित्र सापडल्या पासून या प्रश्रांची उत्तर शोधण्याचा आणि नाझका रेषांचे गुढ उकलण्याचा प्रयत्न पूरातत्वशास्त्रज्ञ, जिओलॉजी तज्ञ, कॉस्मोलॉजी तज्ञ, जलतज्ञ इत्यादी विविध शाखांमधले तज्ञ करत आहेत.

इसवीसनाच्या सतराव्या शतकात पेरु मधील एका प्रवाशाला नाझका लाईन्स मधिल काही रेषा दिसल्याचा उल्लेख त्याने त्याच्या नोंदीत केलेला आहे. या रेषा म्हणजे इंका ट्रेलच्या काही खूणा असाव्यात असा तर्क त्याने मांडला. पंधराव्या शतकात इंका साम्राज्यांनी अनेक शहरे वसवली, पण आतापर्यंत सापडलेला अवशेषांमध्ये नाझका लाईन्सशी साधर्म्य असणारे कुठलेही अवशेष त्यात सापडलेले नाहीत. इसवीसन १९२६-३० च्या दरम्यान नाझका वाळवंटावरुन विमानांचे उड्डाण व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी वैमानिकांना जमिनीवर खोदलेली चित्र आणि रेषा पहिल्यांदा पूर्णपणे दिसायला लागल्या. त्यानंतर पेरुच्या हवाई दला तर्फे या भागात शोध मोहिमा घेण्यात आल्या. पण ही चित्रे आणि रेषा शोधण्याला खरी गती आली ती इसवीसन १९४१ साला नंतरच. जर्मन पूरातत्व शास्त्रज्ञ मरिया राश्चे (Maria Reiche) यांनी नाझका पंपाच्या वाळवंटात प्रत्यक्ष जाऊन ती चित्र आणि रेषा पाहिल्या आणि त्यांच्या भव्यतेने त्या भारुन गेल्या. त्या रेषां जवळच भर वाळवंटात घर बांधून त्या राहील्या आणि जवळपास १४ चित्र उजेडात आणली. त्यांना "लेडी ऑफ लाइन्स”  या नावाने ओळखले जाऊ लागले. पेरु सरकारने नाझका वाळवंटातील काही भाग लागवडी खाली आणण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. त्यामुळे नाझका रेषांना धोका उत्पन्न झाला होता. त्यावेळी मरिया राश्चे यांनी पेरु सरकारच्या या प्रकल्पाला विरोध करुन हा प्रकल्प थांबवला होता. त्यांच्या अथक प्रयत्नाने १९९४ मध्ये नाझका लाईन्सना युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाले.

Flower Nazca lines

    मरिया राश्चे यांनी नाझका लाईन्सचा अभ्यास केला तेंव्हा त्यांना यातील काही रेषा या सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण याच्याकडे निर्देश करत आहेत असे आढळून आले. त्यामुळे त्यांनी या रेषांच्या आणि चित्रांचा संबंध खगोलीय कॅलेंडरशी आहे असा तर्क मांडला. जगभरच्या खगोल शास्त्रज्ञांनी यावर अभ्यास केला, पण काही रेषा वगळता या नाझका लाईन्स आणि चित्रांचा खगोलीय कॅलेंडरशी काही संबंध आढळला नाही त्यामुळे ती थेअरी मागे पडली.

त्यानंतर काही तज्ञांनी असा दावा केला की, या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने पाणी साठवण्यासाठी या रेषा आणि चित्रे खोदली गेली. यावर भूगर्भ शास्त्रज्ञ आणि जलतज्ञांनी अभ्यास केला. नाझका लाईन्स या रुंदीला १२ इंच ते ७२ इंच रुंदीच्या आहेत. तर त्यांची खोली १० ते ३० सेंटीमीटर (४ ते १२ इंच) इतकीच आहे. नाझका वाळवंट हे जगातील सगळ्यात कोरडं वाळवंट आहे. इथे पाऊस जवळजवळ पडतच नाही . त्यामुळे इथे पाणी साठवण्यासाठी किंवा जमिनीत मुरण्यासाठी या लाईन खोदल्या असण्याची शक्यताच मोडीत निघते.  या थेअरी मध्ये काही तथ्य आढळले नाही. त्यामुळे ही थेअरी  मागे पडली.  

इसवीसन १९७० च्या दशकात परग्रहवासी , UFO इत्यादी गोष्टींची चलती होती. त्यातच Chariots of gods हे Erich von Daniken या लेखकाने पुस्तक प्रसिध्द केल. त्यात त्यांनी असा दावा केला की नाझका लाईन्स परग्रहवासी लोकांनी बनवलेल्या आहेत. त्यांना  ग्रहमालेतील पृथ्वीचा पत्ता सापडावा याकरिता या केवळ आकाशातून दिसणार्‍या रेषा त्यांनी बनवलेल्या आहेत.  दुसर्‍या दाव्यानुसार या लाईन्स म्हणजे परग्रहवासींची यान उतरण्यासाठी बनवलेल्या एअर स्ट्रीप्स असाव्यात. नाझका लाईन्स मध्ये डोंगर उतारावर एक हात वर केलेल्या माणसाचे चित्र कोरलेले आहे. त्याला स्पेस मॅन ( Astronaut ) म्हटले जाते. या थेअरी मध्येही काही तथ्य न मिळाल्याने ती मागे पडली.

Puquio, Nazca

पूरातत्वशास्त्रज्ञांना या भागात शोध घेतांना एका संस्कृतीचे अवशेष सापडले. त्याचे नामकरण त्यांनी "नाझका संस्कृती" असे केले. इसवीसन पूर्व (BC) १०० ते इसवीसन (AD) ६०० याकाळात नाझका वाळवंटात ही संस्कृती नांदत होती. अँडीज पर्वता मध्ये उगम पावणार्‍या काही नद्या या नाझका वाळवंटातून वहात होत्या. त्याकाठी ही संस्कृती बहरली होती. त्यांनी जमिनीतील पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पुकियोज (Puquio) बांधले. पुकीयोज म्हणजे गोल आकाराचे एका खाली एक बांधलेले खालच्या, बाजूला निमुळते होत जाणारे खड्डे. हे खड्डे दगडांनी बांधलेले आहेत आणि एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यांच्या निमुळत्या होत जाणार्‍या आकारामुळे जमिनी खालच्या भागात सूर्याचे उन (उष्णता) पोहोचत नाही. त्यामुळे वरच्या गोलातील तापमान आणि सर्वात खालच्या गोलातील तापमान यात ८ अंशाचा फ़रक असतो. त्यामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. नंतरच्या काळात इंकांनी पण या पुकीयोज सारख्या रचना मोराय येथे बांधलेल्या त्यांच्या शेतीच्या प्रयोगशाळेसाठी केलेल्या पाहायला मिळतात. 

Inca Structure , Moray

या पुकियोजचा वापर करुन नाझका संस्कृतीतील लोकांनी मका, बीन्स, बार्ली, कापूस इत्यादी पिके घेतली. या लोकांनी बनवलेली सिरॅमिकची उत्तम भांडी येथे केलेल्या उत्खननात सापडलेली आहेत. त्यावरही हमिंग बर्ड, माकड, कंडोर इत्यादी नाझका लाईन्स मध्ये दिसणारी चित्र पाहायला मिळतात. आजही हे पुकीयोज आणि त्यातील पाण्यावर केली जाणारी शेती नाझका वाळवंटात पाहायला मिळते.


Cyramic pots , Nazca Cul

नाझका पासून २५ किलोमीटर अंतरावर पूरातत्वशास्त्रज्ञांना १.५ स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेले कवाची (Cahuachi) हे गाव सापडले. या गावात वस्तीचे अवशेष सापडलेले नाहीत. पण याठिकाणी अनेक धार्मिक विधी पार पाडले जात असल्याचे पुरावे त्यांना इथे मिळाले आहेत. 

Cahuachi, Nazcz


काही पूरातत्वशास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, या नाझका लाईन्स आणि चित्रे याच नाझका संस्कृतीतल्या लोकांनी काढली असावीत. ती कशी काढली हे समजून घेण्यासाठी त्यांनी नाझका वाळवंटात काही प्रयोग केले . नाझका लाईन्स आणि चित्र जिथे बनवली आहेत तिथे जमीनीवर आर्यन ऑक्साईडचा थर पसरलेला आहे. त्या थराच्या खाली पांढऱ्या मातीचा थर पसरलेला आहे. आर्यन ऑकसाईडच्या थरात छोटे छोटे दगड आहेत. हे दगड हातानेही बाजूला करता येतात. दगड बाजूला करुन ठेवले की खालची पांढरी माती दिसायला लागते. अशा प्रकारे दगड बाजूला करत गेल्यास पांढर्‍या रेषा तयार होतात. पांढऱ्या मातीमुळेच ऑक्साईडने बनलेल्या जमिनीवर या रेषा उठून दिसतात. नाझका लाईन्स मध्ये खोदलेल्या आकृत्या, रेषा, चित्र अशा प्रकारेच बनवण्यात आलेली आहेत असा दावा करण्यात आला असला तरी अवाढव्य चित्र, भौमित्तीक रचना आणि मैलोंमैल जाणार्‍या सरळ रेषा  ज्या केवळ आकाशातूनच (५०० फ़ूट उंचीवरुन) दिसतील यापधद्तीने कशाप्रकारे काढल्या गेल्या असतील?  त्या योग्य प्रकारे काढल्या जात आहेत की नाहीत यावर कोणी आणि कुठून लक्ष ठेवले असेल. हे प्रश्न अनुत्तरीतच आहे. 




हे संशोधन चालू असतांनाच नाझकाच्या उत्तरेला ६० किलोमीटर अंतरावर काही चित्र डोंगर उतारावर सापडली. त्या चित्रांना पल्पा लाईन्स या नावाने ओळाखले जाते. त्यांच्या अभ्यास करतांना पूरातत्वशास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की, ही चित्र नाझका संस्कृतीच्या आधीच्या काळी इसवीसन पूर्व (BC) ८०० ते इसवीसन पूर्व (BC) १००  इथे नांदत असलेल्या पराकस संस्कृतीतील लोकांनी बनवलेली आहेत. पराकस संस्कृतीतील लोकांनी बनवलेल्या सिरॅमिकच्या भांड्यांवर हिच चित्र सापडली आहेत. पेरुची राजधानी लीमापासून २६० किलोमीटर अंतरावर पराकस शहर आहे. या शहराजवळ समुद्राला लागून असलेल्या डोंगरावर एक त्रिशुळाच्या आकाराची ७०० फ़ूट उंच आकृती कोरलेली आहे.  त्याला Candelabro de Paracas (Candelabra of Paracas) मेणबत्तीचा स्टॅंड किंवा Trident of Paracas (त्रिशुळ) या नावाने ओळखले जाते. डोंगरावर कोरलेल्या या चित्राचा उपयोग खलाशांना होत असावा असा अंदाज आहे.

Trident of Paracas

पराकस येथील डोंगरावर कोरलेले हे चिन्ह म्हणजे त्रिशुळ असून त्याचा संबंध थेट रामायणाशी आहे असाही दावा केला जातो. या पर्वताचे वर्णन किष्किंधा कांडात आढळते. किष्किंधा कांडात सीतेच्या शोधासाठी वानर चारही दिशांना जाणार होते तेंव्हा त्यांना मार्गदर्शन करताना सुग्रीवाने त्यांना वाटेत कोणत्या खाणाखूणा दिसतील याचे वर्णन केलेले आहे (हे संपूर्ण वर्णन वाचण्या सारखे आहे. यात भारतापासून पूर्वेला इंडोनेशिया - जावा - ऑस्ट्रेलिया ते पेरु (पराकासचे त्रिशुळ) या मार्गाचे त्यावरील खाणाखुणां सकट अचूक वर्णन केलेले आहे.) त्यात पूर्वेकडील (सध्याच्या पेरु देशातील) उदय अग्री (सुर्योदयाचा पर्वत) वर्णन करतांना सुग्रीव सांगतो.
  
त्रिशिराः काञ्चनः केतुस्तालस्तस्य महात्मनः स्थापितः पर्वतस्याग्रे विराजति सवेदिकः ॥५३॥

त्रिशिरधारी सुवर्ण ध्वज पर्वताच्या अग्रावर तळपत होता ज्याचा पाया भूतलावर होता.

यात पराकस किनार्‍यावरील डोंगरावर कोरलेल्या त्रिशुळाचा उल्लेख केलेला आहे.  पुढे वर्णन करतांना सुग्रीव म्हणतो, 

पूर्वस्यां दिशि निर्माणं कृतं तत् त्रिदशेश्वरैः । ततः परं हेममयः श्रीमानुदयपर्वतः ॥५४॥

पूर्व दिशा निर्देशित करण्यासाठी इंद्राने  ही रचना निर्माण केली होती. 

सध्या आपण पृथ्वीवर जपान मध्ये सर्वप्रथम सूर्याचा प्रकाश पडतो असे मानतो. रामायणात मात्र उदय अग्रीवर सर्व प्रथम सूर्य उगवतो असे मानले जाते. कारण वामन अवतारात (त्रिविक्रम) विष्णूने तिन्ही लोक पादाक्रांत करतांना पहिले पाऊल या उदय अग्री पर्वतावर ठेवले होते.  (अग्रीचा अपभ्रंश अँडीज असावा)

तत्र पूर्वं पदं कृत्वा पुरा विष्णुस्त्रिविक्रमे। द्वितीयं शिखरे मेरोश्चकार पुरुषोत्तमः ॥५८॥



पराकस येथे डोंगरावर कोरलेल्या या चित्राचा उपयोग खलाशांना दिशादर्शनासाठी होत असावा. मग नाझका लाईन्सचा उपयोग नक्की कशासाठी होत असावा असा प्रश्न पूरातत्वशास्त्रज्ञांना पडला होता . त्यासाठी त्यांनी एक प्रयोग करायचे ठरवले. नाझका लाईन्स आणि त्याच्या बाजूचा भाग यांचा “magnetometry survey" केला. या सर्व्हे मध्ये दोन्ही भागातले  "मॅग्नेटीक फ़िल्ड" मोजण्यात आले. त्यात असे आढळून आले की नाझका लाईन्सच्या आत आणि बाहेर मॅग्नेटिक फ़िल्ड मध्ये फ़रक आहे. लाईन्स आणि चित्रांमधल्या रेषांमध्ये अनेक वेळा दाब पडल्यामुळे त्याचे मॅग्नेटिक फ़िल्ड हे रेषे बाहेरच्या मॅग्नेटीक फ़िल्ड पेक्षा वेगळे आहे. रेषांमध्ये हा दाब कशाचा पडला असावा ? याचा अभ्यास करतांना असे लक्षात आले की या रेषांमधून लोकांनी अनेक वर्षे चालत / नाचत फ़िरल्यामुळे त्याचा जमिनीवर दाब पडून त्याचे Soil composition बदलले आहे. त्यामुळे त्याचे मॅग्नेटीक फ़िल्ड पण बदललेले आहे. 

Entry & Exit

नाझका येथिल चित्रांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, ही चित्रे ज्या रेषांनी काढलेली आहेत त्यांना सुरुवात आणि शेवट आहे. त्यामुळे एका रेषेवरुन चित्रात प्रवेश करुन दुसर्‍या बाजूने बाहेर पडता येते. तिथे असलेल्या वर्तुळाकार चिन्हा मध्येही अशीच रचना पाहायला मिळते. त्यामुळे त्याकाळातले लोक या रेषांवरुन फ़िरत असावेत . तो त्यांच्या उपासनेचा (Rituals) भाग असावा (जसे आपण देवळात प्रदक्षिणा घालतो तशा प्रकारचा) असे अनुमान पूरातत्वशास्त्रज्ञांनी काढलेले आहे . 

Entry-Exit

नाझका वाळवंटाचा सर्व्हे करुन पूरातत्वशास्त्रज्ञांनी त्याचे ३ डी मॉडेल बनवून AI च्या सहाय्याने त्याचा अभ्यास केल्यावर त्यांना असे आढळून आले की, या नाझका लाईन्स मध्ये जिथे जिथे समलंब चौकोन आहेत तिथे तिथे मातीचे दोन छोटे उंचवटे आहेत. त्याठिकाणी उत्खनन केल्यावर त्यांना मातीचे ओटे (चौथरे) आढळून आले . तेथे मका, बार्ली , कापडाचे तुकडे आणि शिंपले यांचे अवषेश मिळाले. इथे मिळालेले स्पॉन्डिलस (Spondylus) शिंपले हे अँडीज पर्वत रांगेत राहाणारे लोक त्यांच्या पूजेत वापरतात. हा शिंपला पाण्याचे आणि सृजनाचे प्रतिक आहेत. हे शिंपले इथून हजारो किलोमीटर दूर असलेल्या इक्वेडोर देशाच्या किनार्‍यावर सापडतात. या मातीच्या ओट्याचा उपयोग देवाला नैवेद्य (Offering) ठेवण्यासाठी केला जात होता . नाझका वाळवंटातील चित्रात काढलेले बहुतांश प्राणी आणि पक्षी हे पाण्याशी संबंधीत आहेत. त्यावरुन पूरातत्वशास्त्रज्ञांनी असे मत मांडले आहे की, वाळवंटात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी. या पाण्यासाठी देवांना आवाहन करण्याकरीता नाझका संस्कृतीतील लोकांनी या रेषा, चित्र कोरलेली आहेत. 

Spondylus Shell

आठव्या नवव्या शतकात आलेल्या लागोपाठच्या प्रचंड दुष्काळामुळे नाझका संस्कृती या भागातून् नष्ट झाली. पावसाचे प्रमाण या भागात आजही नगण्य असल्यामुळे नाझका लाईन्सची एवढी वर्ष होऊनही झीज झालेली नाही. त्यामुळे रेषा आणि चित्र आजही आपल्याला पाहायला मिळतात.

आत्तापर्यंत ८०० सरळ रेषा, ३०० भौमित्तिक रचना, ७० प्राणी, पक्षी , झाडे या नाझका लाईन्स मध्ये काढलेली सापडलेली आहेत. यातील अनेक प्राणी, पक्षी , किटक इथून अंदाजे  १००० किलोमीटर अंतरावर असेलेल्या ॲमेझॉनच्या जंगलातच आढळतात. ते नाझका वाळवंटात इतक्या बारकाईने कोणी आणि का कोरले ?  त्यामधिल भव्यता, प्रमाणबध्दता आणि गुंतागुंत पाहाता ही केवळ आकाशातूनच दिसतील अशी चित्र कोणी आणि का ? काढली असावित हे अजूनही न उलगडलेल कोडच आहे. 


२००४ ते २०२४ मध्ये जपानी संशोधकांच्या टिमने ड्रोन आणि AI च्या सहाय्याने नाझका वाळवंटाचा सर्व्हे केला. तेंव्हा त्यांना ३१८ नविन Geoglyps सापडली आहेत. त्यावरुन आता पुढील अभ्यास चालू आहे. नजिकच्या काळात कदाचित नाझकाचे रहस्य उलगडू शकेल.




नाझका लाईन्सचे गुढ (भाग- १) ( Unsolved Mystery of Nazca Lines ) वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ...


Paracas Geoglyphs

 

Photos by :- kaustubh, Asmita &  Amit Samant  © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Go Pro 13, Google pixle

References :- 1) Nazca : Decoding the riddle of the lines

2) Finger prints of the god  :- Graham Hankok

3) Magicians of the Gods :- Graham Hankok

4) Research Paper :- AI-accelerated Nazca survey nearly doubles the number of known figurative geoglyphs and sheds light on their purpose. September 2024.


Offbeat Kokan  गुढरम्य कातळशिल्प (Rock art near Malvan, Dist. Sindhudurg) वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ...


Tuesday, June 17, 2025

नाझका लाईन्सचे गुढ (भाग- १) ( Unsolved Mystery of Nazca Lines -1 )

 

Spider , Nazca Lines, Peru

पेरू या दक्षिण अमेरिकेत असलेल्या देशाला भेट देण्याचे मुख्य कारण म्हणजे इंका साम्राज्याचा एक भाग असलेली माचू पिचू ही वर्ल्ड हेरिटेज मध्ये ( आणि जगातल्या 7 आश्चऱ्यांपैकी एक ) असलेली  साईट पाहाणे हे होत. पूरातत्वशास्राच्या (Archaeology) अभ्यासक्रमात माचू पिचू बद्दल बरीच माहिती मिळाली होती. तेंव्हा पासून माचू पिचू आणि इंका साम्राज्यांतील इतर ठिकाण कधीतरी प्रत्यक्ष जाऊन पाहावीत असं ठरवलं होत. त्या अनुषंगाने पेरू वरील पुस्तकं, माहितीपट पाहून इतर कुठली ठिकाण पाहाता येतील हे ठरवत होतो. त्याच दरम्यान कौस्तुभने Finger prints of the god  :- Graham Hankok हे पुस्तकं दिल. हे पुस्तकं वाचल्यावर पाहाण्याच्या ठिकाणात नाझका लाईन्सची भर पडली. 

पेरूच्या दक्षिणेला पंपा नाझका नावाचे २००० स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेले जगातीत सर्वात शुष्क वाळवंट आहे. या वाळवंटात अतिशय भव्य आणि प्रमाणबद्ध अशा भौमितिक रचना, प्राणी, पक्षी, किटक, झाडे, फुले इत्यादी कोरलेली आहेत. त्याच बरोबर मैलोनमैल जाणाऱ्या अचूक सरळ रेषा कोरलेल्या येथे पाहायला मिळतात. ही चित्र आणि रेषा काढताना मध्ये चढ-उतार, शुष्क ओढे, नाले, नद्या इत्यादी गोष्टी आलेल्या आहेत तरीही त्या पार करत या रेषा आणि चित्र काढलेली पाहायला मिळतात.


Nazca Dessert, driest dresert

यात ८०० रेषा, ३०० भौमितिक रचना आणि ७० प्राणी, पक्षी, किटक, झाडे (ज्यांना biomorphs म्हणतात) कोरलेले आहेत. यातील काही रेषा या ३० मैल लांबीच्या आहेत. तर यातील चित्र ५० फ़ूट ते १२०० फ़ूट लांबीची म्हणजेच न्यूयॉर्क मधल्या एंपायर स्टेट बिल्डिंगहून जास्त आकाराची आहेत तर, काही चित्र फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराची आहेत. अशाप्रकारे जमिनीवर कोरलेल्या (खोदलेल्या) चित्रांना Geoglyphs म्हणतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही चित्र आणि रेषा इतक्या मोठ्या आहेत की विमानातूनच पाहाता येतात. १९२६ मध्ये नाझका वाळवंटावरुन विमान उडू लागल्या नंतर या चित्रांचा शोध लागला. ही भव्य चित्र आणि रेषा कोणी खोदल्या आणि कशासाठी खोदल्या हा आजही अनुत्तरित प्रश्न आहे. 

अशा प्रकारे भव्य कलाकृती निर्माण करताना, (आपल्या कडील उदाहरण घायचे तर लेणी खोदताना किंवा किल्ले, मंदिरे बांधताना) त्याच्या कामाची प्रगती आराखड्या प्रमाणे होते की नाही हे मुख्य स्थपतीला समोरून किंवा एखाद्या उंच भागातून पाहाता येते. त्यात काही चूक असल्यास ती निदर्शनास आणता येते. पण नाझका मधिल चित्र आणि रेषा जमिनीवर एवढ्या मोठ्या आकारात कोरलेल्या आहेत की, ती केवळ ५०० फूट उंचीवरुन (आकाशतूनच) दिसू शकतात. त्यामुळे ही चित्र आणि रेषा सापडल्या पासून ती कधी? कोणी? का? आणि कशी? काढली यावर विविध शाखेचे तज्ञ अभ्यास करत आहेत. त्यासंदर्भात अनेक थिएरीज मांडल्या गेल्या आहेत. त्यातील काही थिएरीज काळाच्या कसोटीवर टिकल्या आहेत. पण नाझका लाईन्सचे गूढ पूर्णपणे उकलणे अजून तरी शक्य झालेले नाही.



पेरूची राजधानी लीमा हे समुद्राकाठी वसलेले सुंदर शहर आहे. नाझका लाईन्स पाहाण्यासाठी पहाटेच निघायचे होते. हॉटेल मधून रस्त्यावर आलो तेंव्हा भरपूर लोक रस्त्यावर धावत होते. त्या दिवशी लीमा मध्ये मॅरेथॉन असल्याने पहाटेच सगळीकडे चहलपहल दिसत होती. मॅरेथॉनमुळे हॉटेल जवळचे सगळे रस्ते बंद करण्यात आले होते. बस स्टेशनला जाण्यासाठी टॅक्सी मिळणं शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही सुद्धा पळत पळत बस स्टेशन गाठलं. बरोबर ६.३० ला बस सुटली. लीमा शहर सोडल्यावर बस पॅन अमेरिकन हायवेला लागली. या रस्त्यावर मैलोनमैल एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला वाळवंट हेच दृश्य पाहायला मिळत होते. ४ तासात आम्ही पराकसला पोहोचलो. पराकस हे समुद्रावर वसलेले छोटे गाव आहे. या गावापासून जवळ समुद्रात असलेल्या बेटावर पेग्विन, सील आणि अनेक समुद्र पक्षी पाहायला मिळतात. येथे एका डोंगरावर ७५० फ़ूट उंचीची आकृती कोरलेली आहे. त्याला Candelabra of Paracas किंवा Trident of Paracas (त्रिशुळ) या नावाने ओळखले जाते. या सर्व गोष्टी पाहाण्यासाठी पराकसला बरेच पर्यटक येत असतात पण त्यातील थोडेच पर्यटक नाझका लाईन्स पाहायला जातात. 

बस स्टॅंण्डवरुन १० मिनिटात आम्ही "मरिया राश्चे" या विमानातळावर पोहोचलो. नाझका लाईन्स पाहाण्यासाठी  ४ सीटर आणि १२ सीटर छोटी विमानं येथूनच सुटतात. विमानतळावर प्रत्येकाचे वजन करून वजना प्रमाणे सीट दिल्या गेल्या. विमानात शिरलो तेंव्हा मला आणि लीनाला उजव्या बाजूच्या खिडक्या तर कौस्तुभला डाव्या बाजूची खिडकी मिळाली होती. वेगवेगळ्या दिशेच्या खिडक्या मिळाल्याने प्रत्येक चित्राचे छायाचित्र घेण्याचा दोनदा चान्स मिळणार होता. अशा ठिकाणी लेन्सच्या कॅमेर्‍यातून फोकस करेपर्यंत विमान पुढे गेलेले असते त्यामुळे मी सोनी P90 हा ऑटो फोकस कॅमेरा घेतला होता. कौस्तुभकडे गोप्रो हिरो १३ आणि तिघांकडेही मोबाईल होतेच. ज्याला जे मिळेल ते चित्र त्याने कशा प्रकारेही कॅमेराबद्ध करायचं असं आम्ही ठरवलं होते.

Pacific Ocean, Paracas

विमानात बसल्यावर वैमानिकांनी माहिती दिली की, "आपल्याला नाझका लाईन्स पर्यंत जायला ४० मिनिटे लागतील. त्यानंतर ३० मिनिटे नाझका लाईन्स वरील १६ चित्र दाखवण्यात येतील. ती चित्रे विमानाच्या दोन्ही बाजूने दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे ती सर्वांना दिसतील ". विमानाने उड्डाणं केल्यावर खाली पराकसचा समुद्र किनारा दिसायला लागला. पॅसिफिक महासागरावरून विमान नाझका वाळवंटात शिरले. जिकडे तिकडे वाळू पसरलेली दिसत होती. त्यात सुकलेल्या नद्या, नाल्यांच्या रेषा दिसत होत्या. या वाळवंटाला छेदून जाणारा पॅन अमेरिकन महामार्ग आणि त्यावरुन धावणारी वाहने हेच काय ते जिवंतपणाचे लक्षण दिसत होते. हे एकसूरी दृश्य पाहात असताना वैमानिकाने जाहीर केले की, "आपण नाझका लाईन्स जवळ पोहोचलो आहोत. आता एकामागून एक चित्र पाहायला तयार व्हा". आम्ही खिडकीला कॅमेरे आणि डोळे लावून तयार झालो. खाली शार्क माशाचे भले मोठे चित्र रेखाटलेले होते. समुद्रापासुन इतक्या दूर असलेल्या नाझकातील कलाकारांना शार्क मासा माहिती होता. खारवलेले, सुकवलेले मासे त्यांच्या अन्नाचा भाग असावेत. शार्कचे चित्र मनसोक्त पाहून झाल्यावर कॅमेरा सरसावला पण ते चित्र फोकस होत नव्हतं त्यामुळे मोबाईलने पटापट फोटो घेतले. तेव्हाच आमच्या विरुद्ध बाजूच्या लोकांना मासा दाखवण्यासाठी विमानाने एका बाजूला कलंडत गिरकी घेतली. हॉलिवुड मधल्या एखाद्या स्टंट चित्रपटातल्या विमानात बसल्या सारखे आम्हाला वाटू लागले.

Astronaugt, Nazca Lines, Peru


मासा दाखवून विमान पुढे निघाले एका डोंगर उतारावर १०५  फूट उंच माणूस कोरलेला होता. त्या माणसाने एक हात "टाटा, बाय - बाय" करतात तसा वर केलेला आहे. त्याच्या पायात जाड बूटासारखे काहीतरी घातलेले आहे. त्यामुळे या चित्राला "Astronaut" किंवा "स्पेसमॅन" या नावाने ओळखले जाते. ज्या परग्रहवासी लोकांनी या रेषा आणि चित्र काढली त्यांनीच आपले चित्र इथे कोरून ठेवले आहे, अस काही लोकांचे मत आहे. या चित्राची शैली नाझका चित्र शैली पेक्षा पराकस चित्र शैलीशी मिळती जुळती आहे. पराकस शैलीतील काही चित्र नाझकाच्या वाळवंटात सापडलेली आहेत.  


Astronaugt, Nazca Lines, Peru

Astronaut ला टाटा करुन वैमानिकाने परत एक गिराकी घेतली आणि विमान एका बाजूला झुकवलं. आता खाली माकडाचे चित्र दिसत होत. त्याची शेपटी गोलाकार (Spiral) गुंडाळलेली आहे. वाळवंटात माकड असण्याची शक्यता नाही. तरीही ते इथे ३३० फूट (१०० मीटर) लांब x १९० फूट (५८ मीटर) रुंद आकाराचे माकड रेखाटलं होते. याच माकडाचे चित्र नाझका संस्कृतीतील सिरॅमिकच्या भांड्यावर पण पाहायला मिळते. 

Monkey, Nazca Lines, Peru


खालच्या जमिनीवर कोरलेली पुढची आकृती कुत्र्याची होती. १६७ फ़ूट (५१ मीटर) लांब असलेल्या या कुत्र्याचे पाय आणि शेपटी ताठ झालेली आहे. एखादी विचित्र, भितीदायक गोष्ट बघितल्यावर कुत्र्याची जी प्रतिक्रिया असते ती इथे कोरलेली आहे. हा कुत्रा पेरुवियन हेअरलेस डॉग या आजच्या काळातही पेरुत आढळणार्‍या कुत्र्याचा पूर्वज असावा.

Dog, Nazca Lines


दोन्ही बाजूला विमान वळवून थरारक अनुभव देत, विमान पुढे झेपावलं. आता खालच्या जमिनीवर ३१८ फूट (९७ मीटर) लांब x २१६ फूट (६६ मीटर) रुंद पंख असलेला सुंदर हमिंग बर्ड (फ़ूल टोच्या) दिसु लागला. त्याची लांबलचक चोच, पसरलेले पंख, त्यावरील पीसं आकाशतूनही सुंदर दिसत होती. माकडा प्रमाणेच हमिंग बर्ड सुध्दा वाळवंटात आढळून येते नाही. नाझका संस्कृतीतील सिरॅमिकच्या भांड्यावर आणि त्यांच्या कपड्यावरील कशिदाकामात (एम्बॉयडरी) हमिंग बर्ड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. काही तज्ञांच्या मते नाझका संस्कृतीत हमिंगबर्ड हा समृध्दीचे प्रतिक आहे. 

Humming Bird , Nazca lines

आता जमिनीवर पॅन अमेरीकन हायवे जवळील पठार दिसायला लागले. या पठारावर एक सर्पिलाकार चक्र कोरलेले आहे. त्याचा आकार २३७ फ़ूट (७२ मीटर) लांब आणि ६५९ फ़ूट (२०१ मीटर) रुंद आहे. हे चक्र अशाप्रकारे कोरेलेले आहे की चक्रात एका बाजूने शिरुन फ़िरत दुसर्‍या बाजूने बाहेर येता येते. पूरातत्वशास्त्रज्ञांनी एक काठी आणि त्याला बांधलेला दोरखंड याच्या सहाय्याने अशा प्रकारे चक्र बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. काठी चक्राच्या मध्यभागी रोऊन त्याभोवती दोर बांधून गोलाकर फ़िरवल्यावर वर्तुळ तयार होते. दोर ढिला सोडत पुढे पुढे गेल्यास बाहेरील वर्तुळे तयार होतात. याप्रकारे ३४ मीटरचे चक्र बनवण्यास त्यांना २ तास लागले होते. 

Spiral, Nazca Lines

विमानाने पुन्हा वळण घेतल्यावर जमिनीवर समुद्र शैवालाचे (Sea weed) चित्र कोरलेले दिसत होते. त्याच्या बाजूला कंडोर पक्षाचे प्रचंड मोठ चित्र कोरलेले आहे. ४४० फूट (१३४ मीटर) लांब असलेले हे चित्र एका फुटबॉल मैदाना इतके मोठे आहे. पेरूच्या दक्षिण किनाऱ्यावर हा पक्षी आढळतो. स्थानिक भाषेत याला "Long tailed Mocking bird" या नावाने ओळखले जाते. इसवीसन १९८२ मध्ये केंचुकी युनिव्हर्सिटीच्या जो निकेल यांनी नाझका संस्कृतीच्या काळात वापरात असलेली हत्यारे वापरून या चित्राची प्रतिकृती शेतात कोरली होती. कंडोर पक्षाच्या बाजूला लांबलचक देठ असलेल फुल कोरलेल आहे.

Condor, Nazca Lines

Sea Weed, Nazca Lines

फुल पाहून पुढे गेल्यावर विमान पॅन अमेरिकन हायवेच्या वर आले. या ठिकाणी दोन चित्र आहेत. एका चित्रात दोन हात आहेत. त्यापैकी एका हाताला ४ बोट आणि अंगठा आहे, तर दुसर्‍या हाताला ३ बोट आणि अंगठा आहे. यातील पहिला हात मानवाचा आहे तर दुसरा हात कुणाचा आहे, हे एक कोड आहे. या हातांच्या बाजूला झाडाचे चित्र आहे. झाडाच्या बाजूला ५९० फ़ूट (१९० मीटर) लांबीची पाल आहे. या पालीची शेपटी पॅन अमेरिकन हायवे बनवतांना कापली गेलेली आहे.

Lizard ,Tree, Hands, Nazca lines

Hands, Nazca Lines

पालीच्या तोंडाच्या पुढे बगळा (हेरॉन) / Alcatraz चे भले मोठे चित्र आहे. त्याची लांबी ९३५ फूट (२८४ मीटर) आहे. आमचे विमान ज्या उंचीवरून उडत होते तेथूनही या पक्षाचे पूर्ण चित्र जेमतेम दिसत होते. त्यामुळे त्याचे पूर्ण छायाचित्र घेता आले नाही.

विमानाने पुन्हा एक वळण घेतले. दोन्ही बाजूला झुकून वळण घेण्यामुळे आणि सतत उंची कमी जास्त करण्यामुळे विमानातील अर्ध्या लोकांना उलट्या सुरु झाल्या होत्या. आमच्याही पोटात ढवळत होते. त्यात छायाचित्र काढण्यासाठी खालच्या चित्रावर नजर स्थिर करावी लागतं होती आणि विमान एखाद्या पक्षासारखे आकाशात सूर मारत होते, खाली येत होते, गिराक्या घेत होते. त्यामुळे मध्ये मध्ये आम्ही छायाचित्रण करण सोडून दिल होत आणि खालचं आणि दूरवरचे दृष्य नुसत्या डोळ्यांनी पाहायला सुरुवात केली.

विमानातं उलट्याचां हल्लकल्लोळ चालू असताना विमान पेलीकन पक्षाच्या चित्रावर आले होते. या पक्षाचे उड्डाणं करताना मागे ताणलेले पायही चित्रात स्पष्ट दिसत होते. या चित्राची लांबी ३२० फूट (९७ मीटर) लांब x २१६ फूट (६६ मीटर) रुंदी आहे.

Pelican, Nazca Lines

पेलीकन पाहून झाल्यावर विमानाने वळण घेतल्यावर पोपटाची चोच दिसायला लागली. या पोपटा जवळून अनेक रेषा जात असल्याने त्याची चोच आणि पोटाचा थोडाच भाग स्पष्ट दिसत होता. या संपूर्ण उड्डाणात  दूरवर पसरलेल्या अनेक रेषा आणि भौमितिक आकारही दिसत होते.  

विमानाने मोठ वळण घेतलं आणि परत एकदा पॅन अमेरिकन हायवे ओलांडून कोळ्याच्या प्रसिद्ध चित्रावर आले. १५० फूट (४५ मीटर) लांब असलेले हे कोळ्याचे चित्र इसवीसन १९३० मध्ये पॉल कोसॉक यांनी शोधले होते. किटक तज्ञांना असे आढळून आले आहे की, हे कोळ्याचे चित्र ॲमेझॉनच्या जंगलात आढळणार्‍या दुर्मिळ अशा "Ricinulei" जातीच्या कोळ्याचे आहे. या कोळ्याच्या पायावर पुनरुत्पादन करण्यासाठी एक अवयव असतो, जो केवळ भिंग वापरल्यास दिसू शकतो. तो अवयवही या चित्रात कोरलेला आहे. 

नाझकातील चित्र पाहून पुन्हा विमानतळावर पोहोचलो. नाझकातील कलाकारांनी काढलेली भव्य चित्र पाहून डोळे दिपलेले होते. डोक्यात अनेक प्रश्न घोळत होते. नाझकातील कलाकारांनी हजारो किलोमीटर दूर असणार्‍या ॲमेझॉनच्या जंगलात जाऊन प्राणी, पक्षी, किटकांचे बारकावे  टिपून त्याची चित्र, तीही इतकी भव्य प्रमाणावर ( जी केवळ विमानातून दिसतील ) या वाळवंटात का काढली असतील ? अशा प्रकारे भव्य रचना करण्यासाठी असलेले ज्ञान, हत्यारे, त्यासाठी लागणार मनुष्यबळ, त्यासाठी लागणार अन्न/ पैसा त्यांनी कुठून आणले असेल. जगभरातील मानवाने बनवलेल्या भव्य रचनांच्या मागे कुठली तरी प्रेरणा असते. या नाझका लाईन्स, चित्र आणि भौमितिक आकृत्या कोरण्या मागे नक्की काय प्रेरणा होती ?  

या नाझका लाईन्स पाहाताना या लाईन्स का? कोणी? कधी? आणि कशा? खोदल्या असे अनेक प्रश्न पडले होते. विमानतळावर नाझकावर लिहिलेली पुस्तक घेतली. ती वाचल्यावर काही गोष्टींचा उलगडा झाला, तर काही प्रश्न अजुनही अनुत्तरीतच राहीले आहेत. त्याबद्दल पुढच्या भागात.......  



नाझका लाईन्सचे गुढ (भाग- २) ( Unsolved Mystery of Nazca Lines ) वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ...



Photos by :- kaustubh, Asmita &  Amit Samant  © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Go Pro 13, Google pixle

Humming Bird of Nazca on 2 sloes coin


Offbeat Kokan  गुढरम्य कातळशिल्प (Rock art near Malvan, Dist. Sindhudurg) वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ...


Monday, January 20, 2025

डन्स्टाईन कॅसल ,ऑस्ट्रिया (विदेशातले किल्ले भाग-३)

 

डन्स्टाईन कॅसल, गाव आणि डॅन्यूब नदी 

ऑस्ट्रियातील हॉलस्टट या नितांत सुंदर गावाहून वाचाऊ व्हॅलीत जाण्यासाठी जी गाडी ठरवली होती त्या गाडीचा चालक आणि मालक डेव्हिड हा स्लोव्हाकीयाचा तरुण मुलगा होता. टुरीस्ट सिझनच्या काळात स्लोव्हाकीयातले अनेक तरुण व्हिएन्ना मध्ये येतात. व्हिएन्ना शहर महागडे असल्यामुळे एखादी खोली भाड्याने घेऊन पाच सहा जण एकत्र राहातात. त्यातील कोणी हॉटेलात काम करतात, कोणी गाड्या चालवतात. सिझन संपला की सगळे आपापल्या गावी परत जातात. 

राजवाड्याचे अवशेष, डन्स्टाईन कॅसल

वाचाऊ व्हॅली फिरतांना शेवटच्या टप्प्यात डन्स्टाईन कॅसल बघायचे ठरवले होते. संध्याकाळी ५ च्या सुमारास धुवाधार पाऊस सुरु झाला. डन्स्टाईन गावात  वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे गावाबाहेर असलेल्या वाहनतळापाशी पोहोचलो तर तिथे शुकशुकाट होता. आमची एकमेव गाडी त्या वहानतळावर उभी होती. डेव्हिडने त्याच्या मोबाईल मधले "स्काय मेट" चालू करुन किल्ल्यावर ढग आहेत आणि पश्चिमेकडून ढग येत असल्यामुळे पाऊस थांबणार नाही असे सांगितले. त्यामुळे आपण किल्ला न पाहाता थेट व्हिएन्ना गाठुया असे तो आम्हाला सुचवत होता. पण आम्ही तयारीतच आलो होतो. आमच्या सॅक मधले पॉन्चो अंगावर चढवून आम्ही धुवाधार पावसात डन्स्टाईन गावाकडे कूच केली. या भागात ऑगस्ट महिन्यात रात्री ८ वाजल्या नंतर सुर्यास्त होतो. त्यानंतर अर्धा तास संधिप्रकाश असतो. त्यामुळे आम्ही निर्धास्तपणे किल्ल्याकडे निघालो होतो. 

डन्स्टाईन गाव

ऑस्ट्रीयाची राजधानी व्हिएन्ना पासून ८० किलोमीटरवर डॅन्यूब नदीच्या दोन्ही तीरावर वाचाऊ व्हॅली वसलेली आहे. हिरवेगार डोंगर त्यातून डोकावणारी लालचुटूक रंगाच्या छप्परांची घरे, त्या गर्दीतून मान उंच करून पाहाणारा एखादा चर्चचा टॉवर, नदी काठाने जाणारा वळणावळणाचा रस्ता, रस्त्यापासून थोड्या उंचावरून जाणारी रेल्वे असे स्वप्नवत दृश्य वाचाऊ व्हॅलीत फ़िरतांना दिसते. डॅन्यूब नदीच्या खोऱ्यात वसलेल्या वाचाऊ व्हॅलीला आणि डन्स्टाईन कॅसलला युनेस्कोच्या 'वर्ल्ड हेरीटेज साईट'चा दर्जा मिळालेला आहे.

प्रवेशव्दार, डन्स्टाईन गाव 

ऑस्ट्रीयाची राजधानी व्हिएन्ना ही एकेकाळी युरोपची वाईन कॅपिटल होती. वाईनचा उपयोग चलना प्रमाणे केला जात असे. इसवीसनाच्या आठव्या शतकापासून वाचाऊ व्हॅलीतही मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची लागवड होत होती. त्यामुळे हा भाग समृद्ध होता. युरोपात जाणारे व्यापारी मार्ग या वाचाऊ व्हॅलीच्या खोऱ्यातून जात होते. त्या मार्गावर अनेक ठिकाणी डॅन्यूब नदी चंद्रकोरीच्या आकाराचे वळण घेते, अशाच एका  वळणावर डन्स्टाईन नावाचे प्राचीन गाव वसलेले आहे. या गावाला संरक्षणासाठी तटबंदी बांधलेली होती.  इसवी सनाच्या बाराव्या शतकात या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी डन्स्टाईन गावाच्या मागे असलेल्या डोंगरावर पहिला हॅडमर याने किल्ला बांधला.

मध्ययुगीन डन्स्टाईन गाव 

डन्स्टाईन गावाभोवतीची तटबंदी आणि त्यातील प्रवेशद्वारे आजही शाबूत आहेत. काळानुरूप त्यात बदल झालेले आहेत. क्रेम्स (टॉर) गेट (पूर्वीचे नाव स्टेनर गेट) या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारातून आपला गावात प्रवेश होतो. या चौकोनी प्रवेशद्वारावर पंधराव्या शतकात दुमजली टॉवर बांधलेला आहे. प्रवेशद्वारापासून सुरू होणारी तटबंदी खालच्या बाजूला डॅन्यूब नदीच्या पात्रापर्यंत आणि वरच्या बाजूला थेट कॅसलच्या तटबंदीपर्यंत गेलेली आहे. प्रवेशद्वारातून गावात प्रवेश केल्यावर गावातील छोटे फरसबंदी रस्ते आणि त्याच्या दुतर्फा लालचुटूक रंगाच्या उतरत्या छपरांची सुंदर घरे, घरांच्या गॅलरीत फ़्लॉवर बेडमध्ये फुललेले रंगीबेरंगे फुलांचे ताटवे, दिव्याच्या खांबांवर  लावलेल्या कुंड्यांमधून फुललेली फुले असे रंगीबेरंगी आणि प्रसन्न वातावरण गावभर पसरलेले असते. गावात वहानांना प्रवेश नसल्यामुळे गावामधील गल्ल्यांमध्ये फ़िरतांना मध्ययुगीन युरोपातील गावात फिरल्याचा भास होतो.

प्रवेशव्दार, डन्स्टाईन कॅसल

पावसामुळे गावातही शुकशुकाट होता. गावातल्या भर वस्तीत असलेल्या दोन घरांच्या मध्ये असलेल्या अरुंद गल्लीतून डन्स्टाईन कॅसलला जाणारी पायऱ्यांची वाट आहे. दुतर्फा दाट झाडी असलेल्या या वाटेने अर्ध्या तासात किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ला चढतांना वेगवेगळ्या टप्प्यावरून गावाचा आणि डेन्यूब नदीच्या खोऱ्याचा सुंदर देखावा दिसतो. हा किल्ला प्रसिद्धीच्या झोतात आला तो इंग्लंडचा राजा पहिला रिचर्ड (Lion Heart) याला डिसेंबर ११९२ ते मार्च ११९३ या काळात या किल्ल्यात कैदेत ठेवल्यामुळे.



जेरुसलेमची पवित्र भूमी अय्युबीद राजघराण्याच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी तिसरे क्रुसेड युद्ध (Third Crusade (११८९-११९२)) सुलतान सल्लाउदीन आणि तीन राजसत्ता इंग्लंड, फ्रान्स, रोमन यांच्या एकत्रित फौजा यांच्यात झाले. या युद्धाहून परतताना युद्धातील मिळकती वरून ऑस्ट्रीयाचा सरदार (Duke) पाचवा लिओपोर्ड आणि इंग्लंडचा राजा पहिला रिचर्ड यांच्यात वाद झाला. त्यात राजाने ऑस्ट्रीयाचा झेंडा फाडून टाकला. त्यामुळे लिओपार्डीने राजा रिचर्डला डन्स्टाईन कॅसलमध्ये बंदीवान बनवले. त्यातूनच ब्लॉंडेल आणि राजा रिचर्डच्या दंतकथेचा उगम झाला. 

ब्लॉंडेल आणि राजा रिचर्ड


राजा रिचर्डला अटक झाल्यावर त्याला शोधण्यासाठी त्याचा गायक, संगीतकार मित्र ब्लॉंडेल वेगवेगळ्या किल्ल्याखाली जाऊन गाणे म्हणू लागला. असाच एकदा डन्स्टाईन कॅसलच्या खाली येऊन गाण्याचे पहिले कडवे गायल्यावर,  राजा रिचर्डने किल्ल्यातील बंदीगृहाच्या खिडकीत उभे राहून पुढचे कडवे गायले. त्यामुळे राजाचा ठावठिकाणा लागला. त्यानंतर खंडणी देऊन राजाची सुटका करण्यात आली. या कथेवर अनेक कादंबऱ्या, नाटक, संगीतिका इत्यादी लिहिल्या गेल्या आहेत. ब्लॉंडेलच्या नावावर २४ प्रसिद्ध  गाणी (courtly songs) आहेत. त्याचा पुतळा डन्स्टाईन गावात आहे. 

हि कथा ऐकल्यावर आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या एका ऐतिहासिक प्रसंगाची आठवण झाली. पेशव्यांचे सरदार त्रिंबकजी डेंगळे यांना इंग्रजांनी ठाण्याच्या किल्ल्यात बंदिवान करुन ठेवले होते. त्यांनी निसटून जाऊ नये म्हणून त्यांच्या भोवती एतद्देशिय सैनिक न ठेवता इंग्रजी सैनिक ठेवले होते. त्यावेळी त्यांच्या सुटकेची योजना किल्ल्या जवळच्या रस्त्यावर एका शाहिराने गाऊन त्रिंबकजी डेंगळे यांना सांगितली होती अशी दंतकथा आहे. दोन्ही दंतकथेतील साम्य जाणवले आणि गंमत वाटली.



किल्ल्यावर पोहोचल्यावर समोर पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार दिसते. त्या प्रवेशद्वारावर एके काळी छोटेखानी मनोरा होता त्याचे अवशेष आज पाहायला मिळतात. डोंगरावर जागा अरुंद असल्याने किल्ल्यातील इमारती वेगवगळ्या टप्प्यावर बांधलेल्या होत्या. आज त्यांचे भग्न अवशेष पाहायला मिळतात. यात प्रशासकीय इमारत, चॅपल आणि राजवाड्याची इमारत यांच्या कमानी आणि काही भिंती आजही तग धरून आहेत. किल्ल्यातील इमारतींच्या उरलेल्या भिंतींवर, किल्ला बांधला तेंव्हा त्या इमारती कशा दिसत होत्या त्याची चित्रे स्टीलच्या पत्र्यावर कोरून लावलेली आहेत. या अरुंद जागेतही इमारतींसमोर आवार /अंगण सोडलेले होते. दोन मजली राजवाड्याच्या उभ्या असलेल्या एकमेव भिंतींच्या खिडकीतून आकाशी आणि पांढऱ्या रंगात रंगवलेला गावातील कॅथेड्रलचा टॉवर सुंदर दिसतो. 

कॅथेड्रल, डन्स्टाईन 

किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर एक प्रचंड मोठा खडक आहे. या खडकात कोरून काढलेली गुहा आहे. गुहेच्या वर असलेल्या दगडावर थोड्याशा परिश्रमांनी चढून जाता येते. आम्ही याठिकाणी पोहोचलो आणि बदाबदा कोसळणारा पाऊस कोणीतरी नळ बंद करावा तसा बंद झाला. थोड्या वेळात ढगांच्या आडून सूर्य प्रकट झाला. पाऊस थांबला असला तरी दगडांवरुन पाणी वाहात होते. त्या निसरड्या दगडावरुन किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर असलेल्या खडकावर चढून गेलो. या खडकावरून प्रचंड मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. डॅन्यूब नदीचे चंद्रकोरीच्या आकाराचे वळण घेणारे प्रशस्त पात्र, त्याचा काठावर असलेले डन्स्टाईन गाव आणि नदीपात्राच्या दोन्ही काठावर असलेली द्राक्षाची हिरवीगार शेती हे सुंदर दृश्य पाहातांना तिथून पाय निघत नाही.

डन्स्टाईन किल्ल्याचा माथा 

गुहा 

युरोपात दिसणारे किल्ले सहसा एकदम चकचकीत आणि रंगरंगोटी करून व्यवस्थित जतन केलेले पाहायला मिळतात. डन्स्टाईन किल्ल्याचे वेगळेपण म्हणजे हा डोंगरी किल्ला आपल्या सह्याद्रीतल्या किल्ल्यांसारखाच परकीय सत्तेने उद्ध्वस्त केलेला आहे. तसे असले तरी तो सतराव्या शतकापासून आजतागायत आहे तसाच जतन करुन ठेवलेला आहे. किल्ल्यात ठिकठिकाणी माहिती फलक आणि उद्ध्वस्त वास्तूंची मूळ रचना दाखवणारी चित्रे लावलेली आहेत. या गोष्टी आपल्या सह्याद्रीतल्या किल्ल्यांवरही करणे सहज शक्य आहे. 

वास्तूंची मूळ रचना

किल्ल्यावरून खाली उतरताना आलेल्या वाटेने न उतरता पूर्वेकडील व्हिएन्ना दरवाजातून खाली उतरताना या वाटेवर अनेक रानफुले फुललेली दिसतात. या वाटेवरून डोंगरात जाणाऱ्या अनेक वाटा फुटलेल्या आहेत. ते छोटे छोटे ट्रेल आहेत. त्या वाटांवरून डोंगरात फिरता येते. डन्स्टाईन गावात पंधराव्या ते सतराव्या शतकातल्या अनेक इमारती आणि घरे आजही छान रंगरंगोटी करुन जतन केलेली आहेत. किल्ल्यावरून सतत डोळ्यांत भरणारा आकाशी रंगाचा कॅथेड्रलचा टॉवर, नदीकाठी असलेला न्यू कॅसल इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. वाचाऊ व्हॅलीत द्राक्षा खालोखाल पिकणारे जर्दाळू आणि त्यापासून बनणारे विविध पदार्थ या गावात मिळतात. ऑस्ट्रीयात फिरायला जाणाऱ्या दुर्गप्रेमींनी थोडी वाट वाकडी करून या रांगड्या गिरिदुर्गाला नक्की भेट द्यावी.


जाण्यासाठी : -
वाचाऊ व्हॅलीत मल्क, स्पिट्झ, डन्स्टाईन आणि क्रेम्स ही गावे पाहाण्यासारखी आहेत. व्हिएन्नाहून वाचाऊ व्हॅलीला जाण्यासाठी बोट, रेल्वे आणि बस असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. व्हिएन्नाहून बोटीने दोन तासात वाचाऊ व्हॅलीत जाता येते. डॅन्यूब नदीच्या दोन्ही तीरावर असलेली गावे; नदी किनाऱ्यावर, डोंगरात असलेली अप्रतिम घरे आणि वर्ल्ड हॅरीटेजचा दर्जा मिळालेली वाचाऊ व्हॅलीची अप्रतिम दृश्ये पाहत पाहत आपण क्रेम्सला पोहोचतो. 

ट्रेनने प्रवास करण्यासाठी व्हिएन्ना ते व्हिएन्ना तिकिट मिळते. यात व्हिएन्ना ते मल्क ट्रेनचा प्रवास, मल्क ते क्रेम्स बोटीचा प्रवास आणि क्रेम्स ते व्हिएन्ना ट्रेनचा प्रवास करता येतो. या बरोबरच मल्क ऍबी पाहाण्यासाठीचे तिकीट अंतर्भूत असते. ऑस्ट्रीयातील रेल्वे कंपनी OBB Rail च्या साईटवर (https://kombitickets.railtours.at/ wachau- ticket/austria/wachau/wachau-ticket.html) वाचावू व्हॅलीला जाण्यासाठी कॉम्बो तिकीट मिळते.

वाचाऊ व्हॅलीत जाण्यासाठी तिसरा पर्याय म्हणजे व्हिएन्नात असलेले टूर ऑपरेटर. व्हिएन्नातून खाजगी बसने आणि कारने वाचाऊ व्हॅलीत घेऊन जातात. तिथे फिरायला साधारणपणे सहा तासांचा वेळ मिळतो. याशिवाय वाईन टेस्टींग टूर, सायकलींग टूरही व्हिएन्नाहून जातात. आपापल्या आवडीप्रमाणे आपण टूर निवडू शकतो. 



छायाचित्रण:-  © कौस्तुभ आणि अमित सामंत  (©Copy Right)
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro -5


1) डाविन कॅसल (स्लोव्हाकीया) :- (विदेशातले किल्ले भाग -१) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

2) अलिंजा कॅसल, माचू पिचू ऑफ अझरबैजान Alinja Castle , Machu Pichu of Azerbaijan ( विदेशातले किल्ले भाग - २) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

3) परीकथेतील गाव, हॉलस्टॅट (Hallstatt, Austria) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.









Monday, December 2, 2024

"लँड ऑफ फायर" (Land of Fire )

 

लँड ऑफ फायर

अझरबैजान या देशाला "लँड ऑफ फायर" या नावाने ओळखलं जाते. तिथे असलेल्या नैसर्गिक वायुच्या आणि तेलाच्या साठ्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीतून बाहेर पडणाऱ्या ज्वाळा पाहायला मिळतात.  तसेच भूगर्भशास्त्रातील (Geology) अनेक आश्चर्य इथे पाहायला मिळतात. भूगर्भशास्त्र शिकताना यातील अनेक गोष्टी शिकल्या होत्या, पण प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या नव्हत्या. अझरबैजान मध्ये फिरायला जाण्याचे हे पण एक कारण होते.

अझरबैजानची राजधानी बाकू शहराच्या बाहेर पडले की मोकळा भाग सुरु होतो. याभागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमिनीतून तेल काढण्यासाठी करकोच्या सारख्या दिसणाऱ्या मशिन्स आणि क्रेन्स दिसायला लागतात. अगदी गावातल्या घरांच्या कुंपणाला लागून पण तेल काढणाऱ्या मशिन्स दिसत होत्या. त्यातून निघणार्‍या पाईप लाईन्स सर्वत्र दिसत होत्या. या भागात जमिनी खाली तेल आणि नैसर्गिक वायुचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. या भूगर्भातील साठ्यांमुळे याभागात अनेक नैसर्गिक आश्चर्य (Geological wonders) पाहायला मिळतात. 

Mud Volcano, Gobustan

जगभरात ९०० च्या वर चिखलाचे ज्वालामुखी (Mud Volcano) आहेत. त्यातील निम्मे ज्वालामुखी एकट्या अझरबैजान मध्ये आहेत.  बाकू पासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या  गोबूस्थानला आपल्या गाडीने पोहोचल्यावर पुढे ज्वालामुखी पर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. त्यावरून जाण्यासाठी १९६०-७० च्या जमान्यात बनवलेल्या जुन्या रशियन कार मधून प्रवास करावा लागतो. पूर्णपणे खिळखिळ्या झालेल्या गाड्यां मधून जीव मुठीत बसून प्रवास करावा लागतो. आमच्या  गाडीच्या चालकाला त्यांची स्थानिक भाषा सोडून इतर भाषाचा गंधही नव्हता त्यामुळे आम्ही त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावर त्याने गाडीतल्या गाण्याचा आवाज वाढवला आणि त्या उंच सखल कच्च्या रस्त्यावरुन गाडी बेफ़ाम वेगात चालवायला सुरुवात केली. समोरुन येणार्‍या गाड्याही त्याच वेगात येत होत्या. असा १० मिनिटाचा थरारक प्रवास संपवून आम्ही मढ व्हॉलकॅनोंच्या परिसरात पोहोचलो. 

Mud Volcano, Azerbaijan

लाव्हारस बाहेर पडणार्‍या ज्वालामुखीचे विवर आपण अनेकदा चित्रात, डॉक्युमेंट्रीज मध्ये पाहिलेले असतें, तसेच चिखलाच्या ज्वालामुखीचे विवर असते, विवराला गोलाकार तोंड असते, फक्त त्यातून लाव्हारसा ऐवजी पाणी, चिखल आणि नैसर्गिक वायू बाहेर पडत असतो. या विवारातून बाहेर पडणाऱ्या चिखलामुळे शंकूच्या आकारच्या ज्वालामुखीच्या टेकड्या तयार होतात. अशाच एका टेकडीवर चढताना चिखलाचे ताजे ओघळ टेकडीच्या उतारावर दिसत होते. टेकडी चढून गेल्यावर ज्वालामुखीच्या तोंडाजवळ चिखल मिश्रीत राखाडी रंगाचे पाणी दिसत होते. ठराविक काळाने त्यात हवेचे मोठे बुडबुडे येऊन फ़ुटत होते. त्या बुडबुड्यांच्या फ़ुटण्यामुळे चिखल खाली ओघळत होता. हे बुडबुडे फ़ुटल्यावर नैसर्गिक वायू बाहेर पडत होता. तिथे असलेल्या स्थानिक माणसाने आम्हाला तो त्याच्याकडील लायटरने पेटवून दाखवला. गेली २५००० वर्ष याभागात हे चिखलाचे ज्वालामुखी आहेत. 



चिखलाचे ज्वालामुखी (Mud Volcano) तयार होण्यासाठी जमिनीखाली नैसर्गिक वायूचे साठे, पाण्याचा स्त्रोत आणि अवसादी गाळाचा खडक (Sedimentory rock) हे मुख्य घटक असावे लागतात.  गाळाचा खडक पाण्यात विरघळून चिखल तयार होतो. त्या खाली असलेल्या नैसर्गिक वायूच्या दाबाने तो चिखल वरच्या दिशेला ढकलला जातो आणि जमिनीतून बाहेर पडतो. याठिकाणी जमिनीतून बाहेर पडणारा चिखल साठत जाऊन शंकूच्या आकाराच्या टेकड्या तयार होतात. चिखलाच्या ज्वालामुखीच्या परिसरात फ़िरताना अनेक छोट्या मोठ्या टेकड्या दिसत होता. काही ठिकाणी एकाच टेकडीवर वेगवेगळ्या ऊंचीवर ज्वालामुखीच्या विवराची तोंडे होती. ज्वालामुखीतून येणारा चिखल औषधी असून त्यात आंघोळ केल्यास (लोळल्यास) अनेक व्याधी बर्‍या होतात असा दावा काही ठिकाणी केला जातो, पण त्याला शास्त्रीय आधार नाही.

चिखलाचा ज्वालामुखीचा (Mud Volcano) व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणावर टिचकी मारा


चिखलाचे ज्वालामुखी (Mud Volcano) पाहून आम्ही पुढचे ठिकाण "यानार डाग" (Yanar Dag) गाठले. बाकूच्या उतरेला १६ किलोमीटरवर यानार डाग आहे. यानार डाग या शब्दाचा अर्थ "जळता पर्वत" (Burning Mountain) असा आहे. येथे एका टेकडीच्या पायथ्याशी अनेक ठिकाणाहून जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडतांना पाहायला मिळतात. याठिकाणी जमिनीखाली असलेला नैसर्गिक वायू गाळाच्या सच्छीद्र दगडातून बाहेर पडतो. अनेक वर्षापासून हा वायू पेटतो आहे. पाऊस , बर्फ़, वारा या नैसर्गिक गोष्टींनी ही आग विझत नाही. या आगीच्या ज्वाळा १ मीटर ते १० मीटर उंची पर्यंत जातात. अझरबैजान देशात अशा प्रकारे जमिनीतून येणारा नैसर्गिक वायू पेटल्यामुळे निर्माण झालेल्या आगी पूर्वी अनेक ठिकाणी होत्या. 

यानार डाग" (Yanar Dag)

तेराव्या शतकात सिल्क रुटवरुन प्रवास करणार्‍या मार्कोपोलोने अझरबैजान मध्ये अशा प्रकारे जमिनीतून पेटलेल्या आगी पाहील्याची नोंद केलेली आहे,  पण त्यामुळे नैसर्गिक वायूच्या साठ्याचे नुकसान होत असल्याने सरकारने त्या विझवल्या आता फ़क्त "यानर डाग" येथेच अशा प्रकारे पेटलेली आग पाहायला मिळते.  मुस्लिम धर्माचे आक्रमण होण्यापूर्वी झोराष्ट्रीयन धर्म हा अझरबैजानी लोकांचा मुळ धर्म होता. आजही नवरोज हा अझरबैजान मधला प्रमुख सण आहे. 


झोराष्ट्रीयन धर्मात आगीला शुध्द आणि पवित्र मानलेले आहे. झोराष्ट्रीयन अग्निपूजक आहेत. या प्रदेशात अशा नैसर्गिकरित्या पेटलेल्या आगी त्यांच्यासाठी पवित्र होत्या. त्या मागचे शास्त्रिय कारण त्यांना त्याकाळी माहिती नव्हते, पण या भागात सापडलेल्या दगडावर या आगीचे शिल्पांकन केलेले पाहायला मिळते. यानार डाग इथे पेटलेल्या आगीत अनेक नाणी टाकलेली पाहायला मिळतात. याचा पण धागा जून्या झोराष्ट्रीयन धर्मापर्यंत जातो. 


यानार डाग "जळता पर्वत" (Burning Mountain) चा व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणावर टिचकी मारा

 
बाकूच्या पासून ९० किलोमीटर अंतरावर खिजी जिल्ह्यात "कॅंडी केन माऊंटन" आहेत.  या डोंगरांवर असलेल्या पांढ‍र्‍या , गुलाबी आणि लाल मातीच्या पट्ट्यांमुळे हे डोंगर दुरुन "कॅंडी" सारखे दिसतात म्हणून यांना कॅंडी केन माऊंटन म्हटल जाते. या भागात शिरल्यावर अशा प्रकारचे अनेक डोंगर दिसतात. अशाच एका डोंगराच्या पायथ्याशी आमच्या चालकाने गाडी थांबवली. समोर लाल आणि पांढरे पट्टे असलेली निष्पर्ण डोंगररांग पसरलेली होती. आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली.

कॅंडी केन माऊंटन 

ही डोंगररांग शेल या एक प्रकारच्या गाळाच्या खडकापासून तयार झालेला आहे. या खडकात चिकणमाती आणि विविध प्रकारची खनिजे असतात. अशा प्रकारचा गाळाचा खडक अतिशय संथ गतीने तयार होतो. नद्यांनी आणलेला गाळ समुद्रतळाशी किंवा सरोवराच्या तळाशी संथ पाण्यात जमा होत जातो. या गाळात अनेक जीवश्मांचे अवशेषही असतात. या गाळाचे एकावर एक थर जमा होऊन गाळाचा खडक तयार होतो. कालांतराने जमिनीच्या हालचालीमुळे हा दगड जमिनीच्या वर येतो. या दगडात असलेल्या लोहाचा पाण्याशी संयोग होऊन तो ऑक्सिडाईज होते आणि डोंगरावर लाल आणि गुलाबी रंगाचे पट्टे दिसायला लागतात. तर उरलेल्या चिकणमातीचे पांढरे पट्टे तयार होतात.


डोंगरावर चढतांना पाया खालची जमिन भुसभुशीत लागत होती. अनेक ठिकाणी पाण्यामुळे वाहून गेलेल्या मातीमुळे विवर निर्माण झालेली होती. त्यांच्या जवळील भुसभुशीत मातीवरुन जपून चढत होतो. डोंगरावरचे लाल आणि पांढरे पट्टे ओलांडत एका अरुंद जागेवर पोहोचलो, दोन्ही बाजूला दरी होती. याठिकाणी भुसभुशीत जमिनीवर जेमतेम पाऊल मावेल एवढ्याच पायाऱ्या खोदलेल्या होत्या. त्या पार करून पठारावर आलो. इथून दिसणारे दृश्य नजरबंदी करणारे होते. पायाखाली आणि सभोंवर लाल - गुलाबी आणि पांढरे पट्टे असलेले, गवताचे एकही पाते नसलेले डोंगर  आणि समोरच्या बाजूला हिरव्या गवताच्या पात्याने आच्छादलेले करडे डोंगर दिसत होते. एखाद्या परीकथेतल्या डोंगरावर आल्यासारखा भास होत होता. पठारावर फिरून डोंगरमाथ्याकडे चढाई करायचा प्रयत्न केला पण भुसभुशीत माती आणि तीव्र चढ यामुळे गणित जमले नाही. त्यामुळे पुन्हा पठारावर येऊन समोर दिसणारे दृश्य मनात साठवत बसून राहिलो.

Candy cane mountain , Azerbaijan

रेशीम मार्गावरचे हिंदू मंदिर 


भारतापासून अंदाजे ४००० किलोमीटर दूर एक हिंदू मंदिर आहे आणि त्यात १४ संस्कृत (देवनागरी ) आणि २ गुरुमुखी लिपीतील शिलालेख आहेत हे मला कोणी सांगितले असतें तर मी विश्वास ठेवला नसता. याशिवाय एक शिलालेख पर्शियन (फारसी) लिपीत आहे. 

संस्कृत (देवनागरी) शिलालेख

या हिंदू मंदिराला अतेशगाह  या नावाने ओळखले जाते. स्थानिक भाषेत अतेश म्हणजे “आग”आणि “गाह” म्हणजे जागा, "आगीची जागा" या अर्थी “अतेशगाह” हा शब्द वापरला जातो. बाकू पासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरखानी या शहरात अतेशगाह हे हिंदू मंदिर आहे. या ठिकाणी जमिनीखाली असलेल्या नैसर्गिक वायुच्या स्रोतांमुळे एकेकाळी ७ ठिकाणी जमिनीवर आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्या ठिकाणी हे मंदिर आणि सराई (धर्मशाळा ) बांधलेली आहे. या ज्वाळांचा स्त्रोत शोधण्यासाठी इसवीसन १९६९ मध्ये सोव्हीएत सरकारने केलेल्या उत्खननामुळे या ज्वाळा विझल्या. त्यानंतरच्या काळात बाहेरुन पाईप व्दारे नैसर्गिक वायू आणून येथील मुख्य मंदिरातील ज्वाळा पेटत्या ठेवण्यात आलेल्या आहेत.


अतेशगाह Fire Temple

इसवीसनाच्या सुरुवाती पासून भारताचा युरोपाशी व्यापार होत असे.  माल घेऊन  भारतीय व्यापारी खुष्कीच्या (जमिनीच्या) आणि सागरी मार्गाने जात असत. हा एकच ठराविक रस्ता नव्हता, तर पूर्व आशियाला युरोपशी जोडणारे अनेक मार्ग त्यात अंतर्भूत होते. त्यात जमिनी मार्गे, तसेच जमिन आणि समुद्र मार्गे जाणारे अनेक रस्ते होते. या रस्त्यांनी मुख्यत्वे करुन रेशीम, नीळ, कापड,मसाले इत्यादी अनेक वस्तू युरोपात जात असत. साधारणपणे इसवीसनाच्या सहाव्या शतकापासून प्राचीन चिनच्या राजधानीचे शहर चांगआन (आताचे शिआन) येथून युरोपात मोठ्या प्रमाणावर रेशीम पाठवायला सुरुवात झाली. या व्यापारी मार्गांना रेशीम मार्ग (Silk Road)  हे नाव मात्र इसवीसनाच्या अठराव्या शतकातल्या इतिहासकारांनी दिले.

Natraj, Ateshgah Hindu Temple

भारतातून जमिनीवरुन आणि समुद्रातून जाणारे असे अनेक रेशीम मार्ग होते. त्यापैकी एक आपल्या मुंबई जवळील कान्हेरी (कृष्णगिरी) लेणी, शुर्पारक (सोपारा) बंदर हा मार्गही होता. या मार्गावर असलेल्या कान्हेरी लेण्यातील लेणी क्रमांक २ च्या बाहेरील भिंतीवर दोन वाशिंड असलेला उंट कोरलेला आहे. हा उंट तिबेट परिसरात आढळतो. तेथून भारतात प्रवास करणार्‍या व्यापार्‍यांनी/ कारागिरांनी तो प्रत्यक्ष पाहिला असल्याने कान्हेरीत कोरला आहे.

याशिवाय वायव्य भारतातून आजच्या काबूल (अफ़गाणिस्थान), तेहरान (इराण) मार्गे अझरबैजानला जाणारा रेशिम मार्ग होता. याच मार्गाने वायव्य भारतीय हिंदू, शिख व्यापारी अझरबैजानला जात असत. हिंदुकुश पर्वतातील टोळीवाले, तेथिल अतीथंड तापमान, इराणचे वाळवंट अशा विपरीत परिस्थितीला तोंड देत अंदाजे ४००० किलोमीटरचे अंतर कापून ते अझरबैजानला पोहोचत असत.

रेशीम मार्ग (Silk Road)

अतेशगाह अग्नि मंदिर आणि सराई परिसराला वेढणार्‍या दोन तटबंदी बांधलेल्या आहेत. बाहेरील तटबंदीत असलेल्या प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यावर "L" आकारात बांधलेली मोठी सराई पाहायला मिळते. या सराईत व्यापार्‍यांना राहाण्यासाठी तसेच सामान (माल) साठवून ठेवण्यासाठी अनेक दालन आहेत. त्याच बरोबर अनेक धर्माची प्रार्थना स्थळ सुध्दा याठिकाणी होती. त्या दालनांना जोडणारी लांबलचक आणि प्रशस्त ओवरी आहे. सध्या या दालनात तिकीटघर आणि स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू विकण्याची काही दुकान आहेत. या सराई समोर मोठे मोकळे आवार आहे. त्याकाळी व्यापारी माल जनावरांच्या पाठीवरुन घेऊन जात. त्या जनावरांना बांधण्यासाठी, गाडे उभे करण्यासाठी हे मोठे आवार बांधलेले होते. हे आवार ओलांडून मंदिराच्या दिशेने जातांना दुसरी तटबंदी लागते. या तटबंदीतही प्रवेशव्दार आहे. त्याच्या कमानीवर संस्कृत शिलालेख आहे. त्याच्या छायाचित्रावरुन त्याचे वाचन केले, काही शब्द अस्पष्ट असल्यामुळे त्यांचा अर्थ लागत नाही. 

Sarai, Ateshgah hindu temple

श्री गणेशाय नम: श्रीरामजी सतश्री
ज्वालाजी सहाय संवत १८०२ ॥ मतक
षवदी ७ बी रवार सा त नसानो जीजति
घातात पकोग्या नम: वसना गच्छतात च
त सफरधामत गनबना यप्म प्रपात:

या शिलालेखाची सुरुवात "श्री गणेशाय नम: श्रीरामजी सतश्री ज्वालाजी " .... अशा प्रकारे श्री गजाननाला , श्रीरामाला आणि ज्वालाजीला नमन करुन होते. या शिलालेखात सहाय संवत १८०२ म्हणजेच इसवीसन १७४५ मध्ये हे मंदिर व सराई बांधली असाही उल्लेख आहे. काही संस्कृत शिलालेखा शिवाला (शंकराला ) वंदन केलेले आहे.

Shilalekh (Inscription)


प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर तटबंदी युक्त पंचकोनी रचना दिसते. याच्या मध्यभागी अग्निमंदिर आहे. चार खांबांवर घुमटाकार छत तोललेले आहे.  मध्यभागी असलेल्या वेदीवर अग्नि प्रज्वलित केलेला पाहायला मिळतो. हे मंदिर चारही बाजूने उघडे आहे, त्याला भिंती नाहीत.  या मंदिराचे चारही खांब पोकळ असून त्यातून नैसर्गिक वायू वर नेऊन घुमटाच्या बाजूला चार ज्वाळा पेटत असत असे येथे सांगितले जाते. ते दर्शवणारी चित्रेही इथे आहेत, पण ती काल्पनिक असावित. या मुख्य ज्वाला मंदिराच्या आजूबजूला काही चौथरे आहेत. त्यांचा वापर धार्मिक विधी तसेच बळी देण्याकरीता केला जात असे. या परीसरात एक विहिर आहे. येथे केलेल्या उत्खननात दगडात कोरलेले पाईप सापडले आहेत. या पाईप मधून नैसर्गिक वायू दालनांमध्ये आणण्यात आला होता. त्याच्यावर पेटणार्‍या आगीचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी, उजेडासाठी आणि दालन गरम राखण्यासाठी केला जात होता. उत्खनन केलेल्या काही जागा काचेने बंद करुन ठेवलेल्या आहेत. 

येथे तटबंदीत असलेल्या दालनांच्या दरवाजावर संस्कृत (देवनागरी) आणि गुरुमुखी लिपीतील शिलालेख आहेत . या दालनांमध्ये कायमस्वरुपी प्रदर्शन आहे. त्यात या जागेचा इतिहास, इथे उत्खननात सापडलेल्या वस्तू , भांडी, शिल्प इत्यादी मांडून ठेवण्यात आलेल्या आहेत. यातील एका दालनात गणपतीची मुर्ती आणि दुसर्‍या दालनात नटराजाची मुर्ती ठेवलेली आहे. येथे झालेल्या उत्खननात पंधराव्या शतकातील गणपतीच्या मुर्तीचा काही भाग मिळालेला आहे. सध्याचे हिंदू मंदिर आणि सराईच्या यांच्या बांधकामावर इस्लामी स्थापत्यकलेचा प्रभाव दिसून येतो.  इथे झालेल्या उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरुन याठिकाणी पूर्वी झोरोस्ट्रियन धर्माचे मंदिर असावे.


अझरबैजानी इतिहासकार काझिम अझीमोव्ह यांच्या मते, येथे झोरोस्ट्रियन धर्म रुजला याची अनेक कारणे आहेत. अझरबैजान सिल्क रुटवर मोक्याच्या जागी असल्यामुळे झोरोस्ट्रियन व्यापाऱ्यांचा या भागात मोठ्या प्रमाणावर वावर होता. अझरबैजान मध्ये असलेल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यामुळे येथे अनेक ठिकाणी पेटलेल्या ज्वाळा पाहून झोरोस्ट्रियन धर्माच्या लोकांनी या पवित्र ज्वाळांभोवती मंदिरे बांधली. या ज्वाळांना नैसर्गिक वायूचा अखंडीत पुरवठा होत असल्यामुळे आग कायम प्रज्वलित ठेवण्यासाठी वेगळी सोय करण्याची आवश्यकता उरली नव्हती. हळूहळु या देशात झोरोस्ट्रियन लोक मोठ्या प्रमाणात राहू लागले. इसवीसनाच्या सहाव्या शतकात झोरोस्ट्रियन धर्माला अधिकृत राज्य धर्म म्हणुन याभागात मान्यता मिळली . सातव्या शतकात ससानियन साम्राज्याच्या अस्त होईपर्यंत पवित्र ज्वाळांचे संरक्षण करण्यासाठी हजारो अग्नि मंदिरे बांधली गेली. इसवी सनाच्या सातव्या शतकात इस्लामने या भागात जोर धरल्यावर त्यातील अनेक मंदिरे नष्ट झाली.  

अतेशगाह अग्नि मंदिराला १९९८ साली युनेस्कोचा वर्ल्ड हेरीटेज साईटचा दर्जा मिळाला. त्यानंतर सरकारनेही मंदिर परिसराचा विकास केला.

जाण्यासाठी :- अझरबैजानला भेट द्याल तेंव्हा चिखलाचे ज्वालामुखी (Mud volcano), यानार डाग (जळता पर्वत ) आणि अतेशगाह (अग्नी मंदिर) ही बाकूच्या जवळची ठिकाण एका दिवसात पाहाता येतात. त्यासाठी एका दिवसाच्या गाइडेड टूर्स आहेत.

कँडी केन माऊन्टेन्स वेगळ्या बाजूला असल्याने ते पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो. यासाठी सुध्दा गाइडेड टूर्स आहेत.


Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right
कॅमेरा :- Nikon P900 , Gopro Hero 5 , Google pixal 6A

Flame Towers , Baku


अलिंजा कॅसल, माचू पिचू ऑफ अझरबैजान Alinja Castle , Machu Pichu of Azerbaijan हा ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा