Sunday, October 19, 2025

इंडीयन सेलर होम स्मारक ( पहिल्या आणि दुसर्‍या महायुध्दात हुतात्मा झालेल्या खलाशांचे स्मारक)


Indian Sailor Home, Mumbai

 मुंबईतील मस्जिद स्टेशन हे तिथे असलेल्या वेगवेगळ्या मार्केटसाठी प्रसिध्द आहे. या कायम गजबजलेल्या मस्जिद स्टेशन जवळ इसविसन १९३१ मध्ये इंग्रजानी खलाशांसाठी बांधलेली इंडियन सेलर होम ही वास्तू आजही वापरात आहे आणि त्यात असलेले पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या खलाशांचे स्मारक उत्तम स्थितीत ठेवलेले आहे. ब्रिटिश रॉयल नेव्हीने आशियात अशा प्रकारची दोन स्मारके बांधलेली आहेत. त्यापैकी एक हॉंगकॉंगला आहे. त्यात चायनीज खलाशांचे स्मारक आहे, तर दुसरे स्मारक आपल्या मुंबईत इंडीयन सेलर होम मध्ये आहे. त्यात हिंदुस्थानी, ब्रिटीश आणि अफ़्रिकन खलाशांचे स्मारक आहे. 

Indian Sailor Home Building since1931

Dome , Indian Sailor Home

अठराव्या शतकात इंग्रजानी मुंबईचा बंदर म्हणून विकास सुरु केला. त्यावेळी जहाजावर जाणाऱ्या आणि जहाजावरून येणाऱ्या खलाशांसाठी, सैनिकांना त्यांच्या पुढच्या प्रवासाला जाण्यापूर्वी राहण्यासाठी तात्पुरती सोय म्हणून  सेलर होम बांधण्यात आले होते. Royal alfred Sailors Home ही वास्तू (सध्याचे पोलिस मुख्यालय) बडोदा नरेशांनी बांधली होती. इसवीसन १९३१ मध्ये इंग्रजांनी सेलर होम आणि  पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या खलाशांची आणि सैनिकांची स्मृती कायम ठेवण्यासाठी मस्जिद बंदर याठिकाणी एक कायम स्वरुपी स्मारक बनवले. यालाच आता इंडीयन सेलर होम या नावाने ओळखले जाते.


गॅसच्या दिव्याचा खांब

मस्जिद स्टेशनला कल्याण दिशेला असलेला पूल चढूनवर गेल्यावर आपण वाहनांच्या पुलावर येतो. या पुलाच्या मुंबई पोर्ट ट्र्स्टच्या  बाजूच्या कोपऱ्यात इसविसन १८६७ मध्ये  पोलादात ओतलेले एक शिल्प आहे. इसवीसन १८४३ पासून मुंबईतल्या ठराविक ठिकाणी केरोसिनवर चालणारे दिवे होते. १८६२ मध्ये मुंबईत लालबाग येथे बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली.आजही लालबग मध्ये गॅस कंपनी लेन आहे. १८६५ मध्ये आर्थर क्रॉफ़र्ड या पहिल्या म्युनिसिपल कमिशनरने मुंबईत मस्जिद, भेंडीबाजार, चर्चगेट, एस्पलनेड इयादी अनेक ठिकाणी गॅसचे दिवे बसवले. हे दिवे पेटवण्यासाठी काम करणार्‍या लोकांना "लायटर" म्हणत. पुढिल काळात बेस्ट ( बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय आणि ट्रामवेज) या कंपनीने रस्त्यावर इलेक्ट्रिकचे दिवे बसवले. ते चालू बंद करणार्‍या लोकांना "लायटर"च म्हटले जात असे. आजही मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमामध्ये (BEST) लायटर विभाग आहे. 

गॅसच्या दिव्याचा खांब १८६७



मस्जिदच्या पुलावर असलेला गॅस लाईटचा पोलादात ओतलेला खांब एखादे शिल्प असावे असा सुंदर आहे. त्याच्या बाजूला एक मंदिर बांधल्यामुळे त्याला केशरी ऑइलपेन्ट लावून रंगवण्यात आलेले आहे. हे शिल्प पाहून पूल ओलांडून दुसऱ्या बाजूला असलेल्या पायऱ्या उतरल्यावर आपण वेगळ्याच भागात आल्याचा भास होतो. मस्जिद स्टेशन जवळ असलेली गर्दी त्यातून वाट काढणारी वाहन, सामानांनी भरलेल्या हातगाड्या या सगळ्यांचा संमिश्र गोंगाट यापासून पूर्ण वेगळा शांत असा हा भाग आहे. या भागात भांडूप स्ट्रीट, कुर्ला स्ट्रीट, ठाणा स्ट्रीट इत्यादी मुंबईच्या उपनगराच्या नावाने असलेले रस्ते आहेत. ब्रीजपासून ५ मिनिटे चालत गेल्यावर ठाणा स्ट्रीट आणि एमबीएस स्ट्रीट हे दोन रस्ते जेथे मिळतात त्या  कोपर्‍यावर एक गोल घुमट असलेली इमारत दिसते. या घुमटाच्या बाहेरच्या भिंतीवर खालच्या बाजूला, इसविसन १४ जानेवारी १९३१ रोजी "His excellency Sir Fedrick huge Skyes" यांनी बसवलेली या इमारतीची कोनशीला आहे. 



इंडीयन सेलर होम ही इमारत इंडीयन सेलर सोसायटीच्या अख्यातरीत असल्याने MSF ची सिक्युरिटी आहे. पण परवानगी घेऊन स्मारक पाहाता येते. इमारतीच्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर, इमारतीचा आकार जहाजाच्या नाकासारखा (टोका) सारखा बनवलेला पाहायला मिळतो. या दोन इमारती जेथे मिळतात त्याठिकाणी गोलाकार हॉल बांधलेला आहे. त्यावर घुमट बांधलेला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या खलाशांची आणि सैनिकांचे स्मारक या गोलाकर हॉल मध्ये आहे. 


जहाजाच्या नाकासारखा आकार
जहाज आणि लाटा, नक्षीदार चौकट 

या गोलाकार हॉलचे लाकडात कोरलेले दार आणि त्याची नक्षीदार चौकट पहाण्यासारखी आहे. त्यावरही समुद्राच्या लाटा आणि बोटीचा पुढचा भाग कोरलेला आहे. हॉलच्या जमिनीवर होकायंत्र (compass ) बनवलेल आहे. त्यात उत्तर दिशा सोनेरी रंगाने दाखवलेली आहे. घुमटावर सूर्य आणि त्यामध्ये तारा काढलेले आहेत. त्यावर " Heaven light our Guide" असे लिहिलेले आहे. होकायंत्र आणि सूर्य, तारे यांचा उपयोग खलाशांना दिशा समजण्यासाठी आजही होतो. या गोलाकार हॉलच्या घुमटामध्ये तीन खिडक्या आहेत. त्यांची रचना अशा प्रकारे केली आहे की, त्यातून येणारा सूर्यप्रकाश घुमटाच्या छतावर असलेल्या सूर्य आणि ताऱ्याच्या शिल्पावर पडेल. त्यामुळे ते शिल्प सूर्यप्रकाशाने उजळते. या गोलाकार हॉलच्या भिंतीवर पितळेच्या फलकावर (Bronze board ) पहिल्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या २२२३  खलाशांची आणि त्यांच्या जहाजांची नावे कोरलेली आहेत.


जमिनी वरिल होकायंत्र

छतावरील सूर्य आणि तारा


हॉलच्या मधोमध एक शिसवी टेबल आहे. त्या टेबलच्यावर काचेच्या कपाटात एक सोनेरी किनार असलेले रजिस्टर ठेवलेले आहेत. या रजिस्टर मध्ये दुसऱ्या महायुद्धात मरण पावलेल्या ६५३१ खलाशांची नाव लिहिलेली आहेत. त्यात वरच्या बाजूला जहाजाचे नाव व त्याखाली खलाशाचे नाव, पद आणि हुतात्मा झाल्याची तारीख लिहिलेली आहे. आपल्या पूर्वजांची नाव शोधत अनेक जण आजही इथे येतात. या टेबलाच्या ड्रॉवर खाली असलेल्या ब्रासच्या प्लेटवर "Sailor and Merchant seamen who died in the service of the motherland and have no grave but the sea." असे कोरलेले आहे. 

पहिल्या महयुध्दातील शहीद खलाशांची नाव

रजिस्टर आणि शहीद खलाशांची  नाव



या ठिकाणी अजून दोन पुस्तक पाहायला मिळतात. त्यातील एक पुस्तक The war Dead of Common wealth, Bombay (St. Thomas) Cathedral Memorial, Bombay Sewri Cemetry हे २१ फ़ेब्रुवारी २०१२ रोजी प्रकाशित झालेले पुस्तक आहे. यात Indiam Merchant Navy मध्ये काम करतांना पहिल्या आणि दुसर्‍या महायुध्दात  शहीद झालेल्या खलाशांची नाव आहेत. दुसर पुस्तक आहे.  The war Dead of Common wealth Bombay / Chitgong war Memorials दुसर्‍या महायुध्दात  शहीद झालेल्या भारतीय आणि बांगलादेशी खलाशांची नाव आहेत.   


या इमारतीत असलेल्या खोल्यांमध्ये आजही ३०० जणांची राहण्याची सोय आहे. रस्त्याच्या पलीकडे १९४६ साली बांधलेली अजून एक इमारत आहे त्यात ७०० खलाशांची रहाण्याची सोय आहे. या इमारतींमध्ये कॅन्टीन, जीम, दवाखाना,योग सभागृह, बैठे खेळ इत्यादी सोई आहेत. 


दरवर्षी ५ एप्रिल रोजी नॅशनल मेरीटाईम दिनानिमित्त याठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जातो.  ९४ वर्ष जुने असलेल मुंबईतले हे अपरिचित स्मारक नक्कीच पाहाण्यासारखे आहे.

Photos by :- Amit Samant  © Copy right

विशेष आभार :- प्रकाश सामंत


*  कोटातला बालाजी ( Balaji Temple in Fort,Mumbai) हा अपरिचित मुंबई वरिल ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा...




Saturday, June 21, 2025

नाझका लाईन्सचे गुढ (भाग- २) ( Unsolved Mystery of Nazca Lines - 2)

 

Parrot , Nazca lines

    नाझका रेषा आणि चित्र प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याची व्याप्ती आणि भव्यपणा आपल्याला भारुन टाकतो आणि मग साहजिकच प्रश्न पडतात. नाझका लाईन्स कोणी कोरल्या ? कशा कोरल्या ? आणि का कोरल्या ?  नाझका रेषा आणि चित्र सापडल्या पासून या प्रश्रांची उत्तर शोधण्याचा आणि नाझका रेषांचे गुढ उकलण्याचा प्रयत्न पूरातत्वशास्त्रज्ञ, जिओलॉजी तज्ञ, कॉस्मोलॉजी तज्ञ, जलतज्ञ इत्यादी विविध शाखांमधले तज्ञ करत आहेत.

इसवीसनाच्या सतराव्या शतकात पेरु मधील एका प्रवाशाला नाझका लाईन्स मधिल काही रेषा दिसल्याचा उल्लेख त्याने त्याच्या नोंदीत केलेला आहे. या रेषा म्हणजे इंका ट्रेलच्या काही खूणा असाव्यात असा तर्क त्याने मांडला. पंधराव्या शतकात इंका साम्राज्यांनी अनेक शहरे वसवली, पण आतापर्यंत सापडलेला अवशेषांमध्ये नाझका लाईन्सशी साधर्म्य असणारे कुठलेही अवशेष त्यात सापडलेले नाहीत. इसवीसन १९२६-३० च्या दरम्यान नाझका वाळवंटावरुन विमानांचे उड्डाण व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी वैमानिकांना जमिनीवर खोदलेली चित्र आणि रेषा पहिल्यांदा पूर्णपणे दिसायला लागल्या. त्यानंतर पेरुच्या हवाई दला तर्फे या भागात शोध मोहिमा घेण्यात आल्या. पण ही चित्रे आणि रेषा शोधण्याला खरी गती आली ती इसवीसन १९४१ साला नंतरच. जर्मन पूरातत्व शास्त्रज्ञ मरिया राश्चे (Maria Reiche) यांनी नाझका पंपाच्या वाळवंटात प्रत्यक्ष जाऊन ती चित्र आणि रेषा पाहिल्या आणि त्यांच्या भव्यतेने त्या भारुन गेल्या. त्या रेषां जवळच भर वाळवंटात घर बांधून त्या राहील्या आणि जवळपास १४ चित्र उजेडात आणली. त्यांना "लेडी ऑफ लाइन्स”  या नावाने ओळखले जाऊ लागले. पेरु सरकारने नाझका वाळवंटातील काही भाग लागवडी खाली आणण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. त्यामुळे नाझका रेषांना धोका उत्पन्न झाला होता. त्यावेळी मरिया राश्चे यांनी पेरु सरकारच्या या प्रकल्पाला विरोध करुन हा प्रकल्प थांबवला होता. त्यांच्या अथक प्रयत्नाने १९९४ मध्ये नाझका लाईन्सना युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाले.

Flower Nazca lines

    मरिया राश्चे यांनी नाझका लाईन्सचा अभ्यास केला तेंव्हा त्यांना यातील काही रेषा या सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण याच्याकडे निर्देश करत आहेत असे आढळून आले. त्यामुळे त्यांनी या रेषांच्या आणि चित्रांचा संबंध खगोलीय कॅलेंडरशी आहे असा तर्क मांडला. जगभरच्या खगोल शास्त्रज्ञांनी यावर अभ्यास केला, पण काही रेषा वगळता या नाझका लाईन्स आणि चित्रांचा खगोलीय कॅलेंडरशी काही संबंध आढळला नाही त्यामुळे ती थेअरी मागे पडली.

त्यानंतर काही तज्ञांनी असा दावा केला की, या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने पाणी साठवण्यासाठी या रेषा आणि चित्रे खोदली गेली. यावर भूगर्भ शास्त्रज्ञ आणि जलतज्ञांनी अभ्यास केला. नाझका लाईन्स या रुंदीला १२ इंच ते ७२ इंच रुंदीच्या आहेत. तर त्यांची खोली १० ते ३० सेंटीमीटर (४ ते १२ इंच) इतकीच आहे. नाझका वाळवंट हे जगातील सगळ्यात कोरडं वाळवंट आहे. इथे पाऊस जवळजवळ पडतच नाही . त्यामुळे इथे पाणी साठवण्यासाठी किंवा जमिनीत मुरण्यासाठी या लाईन खोदल्या असण्याची शक्यताच मोडीत निघते.  या थेअरी मध्ये काही तथ्य आढळले नाही. त्यामुळे ही थेअरी  मागे पडली.  

इसवीसन १९७० च्या दशकात परग्रहवासी , UFO इत्यादी गोष्टींची चलती होती. त्यातच Chariots of gods हे Erich von Daniken या लेखकाने पुस्तक प्रसिध्द केल. त्यात त्यांनी असा दावा केला की नाझका लाईन्स परग्रहवासी लोकांनी बनवलेल्या आहेत. त्यांना  ग्रहमालेतील पृथ्वीचा पत्ता सापडावा याकरिता या केवळ आकाशातून दिसणार्‍या रेषा त्यांनी बनवलेल्या आहेत.  दुसर्‍या दाव्यानुसार या लाईन्स म्हणजे परग्रहवासींची यान उतरण्यासाठी बनवलेल्या एअर स्ट्रीप्स असाव्यात. नाझका लाईन्स मध्ये डोंगर उतारावर एक हात वर केलेल्या माणसाचे चित्र कोरलेले आहे. त्याला स्पेस मॅन ( Astronaut ) म्हटले जाते. या थेअरी मध्येही काही तथ्य न मिळाल्याने ती मागे पडली.

Puquio, Nazca

पूरातत्वशास्त्रज्ञांना या भागात शोध घेतांना एका संस्कृतीचे अवशेष सापडले. त्याचे नामकरण त्यांनी "नाझका संस्कृती" असे केले. इसवीसन पूर्व (BC) १०० ते इसवीसन (AD) ६०० याकाळात नाझका वाळवंटात ही संस्कृती नांदत होती. अँडीज पर्वता मध्ये उगम पावणार्‍या काही नद्या या नाझका वाळवंटातून वहात होत्या. त्याकाठी ही संस्कृती बहरली होती. त्यांनी जमिनीतील पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पुकियोज (Puquio) बांधले. पुकीयोज म्हणजे गोल आकाराचे एका खाली एक बांधलेले खालच्या, बाजूला निमुळते होत जाणारे खड्डे. हे खड्डे दगडांनी बांधलेले आहेत आणि एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यांच्या निमुळत्या होत जाणार्‍या आकारामुळे जमिनी खालच्या भागात सूर्याचे उन (उष्णता) पोहोचत नाही. त्यामुळे वरच्या गोलातील तापमान आणि सर्वात खालच्या गोलातील तापमान यात ८ अंशाचा फ़रक असतो. त्यामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. नंतरच्या काळात इंकांनी पण या पुकीयोज सारख्या रचना मोराय येथे बांधलेल्या त्यांच्या शेतीच्या प्रयोगशाळेसाठी केलेल्या पाहायला मिळतात. 

Inca Structure , Moray

या पुकियोजचा वापर करुन नाझका संस्कृतीतील लोकांनी मका, बीन्स, बार्ली, कापूस इत्यादी पिके घेतली. या लोकांनी बनवलेली सिरॅमिकची उत्तम भांडी येथे केलेल्या उत्खननात सापडलेली आहेत. त्यावरही हमिंग बर्ड, माकड, कंडोर इत्यादी नाझका लाईन्स मध्ये दिसणारी चित्र पाहायला मिळतात. आजही हे पुकीयोज आणि त्यातील पाण्यावर केली जाणारी शेती नाझका वाळवंटात पाहायला मिळते.


Cyramic pots , Nazca Cul

नाझका पासून २५ किलोमीटर अंतरावर पूरातत्वशास्त्रज्ञांना १.५ स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेले कवाची (Cahuachi) हे गाव सापडले. या गावात वस्तीचे अवशेष सापडलेले नाहीत. पण याठिकाणी अनेक धार्मिक विधी पार पाडले जात असल्याचे पुरावे त्यांना इथे मिळाले आहेत. 

Cahuachi, Nazcz


काही पूरातत्वशास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, या नाझका लाईन्स आणि चित्रे याच नाझका संस्कृतीतल्या लोकांनी काढली असावीत. ती कशी काढली हे समजून घेण्यासाठी त्यांनी नाझका वाळवंटात काही प्रयोग केले . नाझका लाईन्स आणि चित्र जिथे बनवली आहेत तिथे जमीनीवर आर्यन ऑक्साईडचा थर पसरलेला आहे. त्या थराच्या खाली पांढऱ्या मातीचा थर पसरलेला आहे. आर्यन ऑकसाईडच्या थरात छोटे छोटे दगड आहेत. हे दगड हातानेही बाजूला करता येतात. दगड बाजूला करुन ठेवले की खालची पांढरी माती दिसायला लागते. अशा प्रकारे दगड बाजूला करत गेल्यास पांढर्‍या रेषा तयार होतात. पांढऱ्या मातीमुळेच ऑक्साईडने बनलेल्या जमिनीवर या रेषा उठून दिसतात. नाझका लाईन्स मध्ये खोदलेल्या आकृत्या, रेषा, चित्र अशा प्रकारेच बनवण्यात आलेली आहेत असा दावा करण्यात आला असला तरी अवाढव्य चित्र, भौमित्तीक रचना आणि मैलोंमैल जाणार्‍या सरळ रेषा  ज्या केवळ आकाशातूनच (५०० फ़ूट उंचीवरुन) दिसतील यापधद्तीने कशाप्रकारे काढल्या गेल्या असतील?  त्या योग्य प्रकारे काढल्या जात आहेत की नाहीत यावर कोणी आणि कुठून लक्ष ठेवले असेल. हे प्रश्न अनुत्तरीतच आहे. 




हे संशोधन चालू असतांनाच नाझकाच्या उत्तरेला ६० किलोमीटर अंतरावर काही चित्र डोंगर उतारावर सापडली. त्या चित्रांना पल्पा लाईन्स या नावाने ओळाखले जाते. त्यांच्या अभ्यास करतांना पूरातत्वशास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की, ही चित्र नाझका संस्कृतीच्या आधीच्या काळी इसवीसन पूर्व (BC) ८०० ते इसवीसन पूर्व (BC) १००  इथे नांदत असलेल्या पराकस संस्कृतीतील लोकांनी बनवलेली आहेत. पराकस संस्कृतीतील लोकांनी बनवलेल्या सिरॅमिकच्या भांड्यांवर हिच चित्र सापडली आहेत. पेरुची राजधानी लीमापासून २६० किलोमीटर अंतरावर पराकस शहर आहे. या शहराजवळ समुद्राला लागून असलेल्या डोंगरावर एक त्रिशुळाच्या आकाराची ७०० फ़ूट उंच आकृती कोरलेली आहे.  त्याला Candelabro de Paracas (Candelabra of Paracas) मेणबत्तीचा स्टॅंड किंवा Trident of Paracas (त्रिशुळ) या नावाने ओळखले जाते. डोंगरावर कोरलेल्या या चित्राचा उपयोग खलाशांना होत असावा असा अंदाज आहे.

Trident of Paracas

पराकस येथील डोंगरावर कोरलेले हे चिन्ह म्हणजे त्रिशुळ असून त्याचा संबंध थेट रामायणाशी आहे असाही दावा केला जातो. या पर्वताचे वर्णन किष्किंधा कांडात आढळते. किष्किंधा कांडात सीतेच्या शोधासाठी वानर चारही दिशांना जाणार होते तेंव्हा त्यांना मार्गदर्शन करताना सुग्रीवाने त्यांना वाटेत कोणत्या खाणाखूणा दिसतील याचे वर्णन केलेले आहे (हे संपूर्ण वर्णन वाचण्या सारखे आहे. यात भारतापासून पूर्वेला इंडोनेशिया - जावा - ऑस्ट्रेलिया ते पेरु (पराकासचे त्रिशुळ) या मार्गाचे त्यावरील खाणाखुणां सकट अचूक वर्णन केलेले आहे.) त्यात पूर्वेकडील (सध्याच्या पेरु देशातील) उदय अग्री (सुर्योदयाचा पर्वत) वर्णन करतांना सुग्रीव सांगतो.
  
त्रिशिराः काञ्चनः केतुस्तालस्तस्य महात्मनः स्थापितः पर्वतस्याग्रे विराजति सवेदिकः ॥५३॥

त्रिशिरधारी सुवर्ण ध्वज पर्वताच्या अग्रावर तळपत होता ज्याचा पाया भूतलावर होता.

यात पराकस किनार्‍यावरील डोंगरावर कोरलेल्या त्रिशुळाचा उल्लेख केलेला आहे.  पुढे वर्णन करतांना सुग्रीव म्हणतो, 

पूर्वस्यां दिशि निर्माणं कृतं तत् त्रिदशेश्वरैः । ततः परं हेममयः श्रीमानुदयपर्वतः ॥५४॥

पूर्व दिशा निर्देशित करण्यासाठी इंद्राने  ही रचना निर्माण केली होती. 

सध्या आपण पृथ्वीवर जपान मध्ये सर्वप्रथम सूर्याचा प्रकाश पडतो असे मानतो. रामायणात मात्र उदय अग्रीवर सर्व प्रथम सूर्य उगवतो असे मानले जाते. कारण वामन अवतारात (त्रिविक्रम) विष्णूने तिन्ही लोक पादाक्रांत करतांना पहिले पाऊल या उदय अग्री पर्वतावर ठेवले होते.  (अग्रीचा अपभ्रंश अँडीज असावा)

तत्र पूर्वं पदं कृत्वा पुरा विष्णुस्त्रिविक्रमे। द्वितीयं शिखरे मेरोश्चकार पुरुषोत्तमः ॥५८॥



पराकस येथे डोंगरावर कोरलेल्या या चित्राचा उपयोग खलाशांना दिशादर्शनासाठी होत असावा. मग नाझका लाईन्सचा उपयोग नक्की कशासाठी होत असावा असा प्रश्न पूरातत्वशास्त्रज्ञांना पडला होता . त्यासाठी त्यांनी एक प्रयोग करायचे ठरवले. नाझका लाईन्स आणि त्याच्या बाजूचा भाग यांचा “magnetometry survey" केला. या सर्व्हे मध्ये दोन्ही भागातले  "मॅग्नेटीक फ़िल्ड" मोजण्यात आले. त्यात असे आढळून आले की नाझका लाईन्सच्या आत आणि बाहेर मॅग्नेटिक फ़िल्ड मध्ये फ़रक आहे. लाईन्स आणि चित्रांमधल्या रेषांमध्ये अनेक वेळा दाब पडल्यामुळे त्याचे मॅग्नेटिक फ़िल्ड हे रेषे बाहेरच्या मॅग्नेटीक फ़िल्ड पेक्षा वेगळे आहे. रेषांमध्ये हा दाब कशाचा पडला असावा ? याचा अभ्यास करतांना असे लक्षात आले की या रेषांमधून लोकांनी अनेक वर्षे चालत / नाचत फ़िरल्यामुळे त्याचा जमिनीवर दाब पडून त्याचे Soil composition बदलले आहे. त्यामुळे त्याचे मॅग्नेटीक फ़िल्ड पण बदललेले आहे. 

Entry & Exit

नाझका येथिल चित्रांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, ही चित्रे ज्या रेषांनी काढलेली आहेत त्यांना सुरुवात आणि शेवट आहे. त्यामुळे एका रेषेवरुन चित्रात प्रवेश करुन दुसर्‍या बाजूने बाहेर पडता येते. तिथे असलेल्या वर्तुळाकार चिन्हा मध्येही अशीच रचना पाहायला मिळते. त्यामुळे त्याकाळातले लोक या रेषांवरुन फ़िरत असावेत . तो त्यांच्या उपासनेचा (Rituals) भाग असावा (जसे आपण देवळात प्रदक्षिणा घालतो तशा प्रकारचा) असे अनुमान पूरातत्वशास्त्रज्ञांनी काढलेले आहे . 

Entry-Exit

नाझका वाळवंटाचा सर्व्हे करुन पूरातत्वशास्त्रज्ञांनी त्याचे ३ डी मॉडेल बनवून AI च्या सहाय्याने त्याचा अभ्यास केल्यावर त्यांना असे आढळून आले की, या नाझका लाईन्स मध्ये जिथे जिथे समलंब चौकोन आहेत तिथे तिथे मातीचे दोन छोटे उंचवटे आहेत. त्याठिकाणी उत्खनन केल्यावर त्यांना मातीचे ओटे (चौथरे) आढळून आले . तेथे मका, बार्ली , कापडाचे तुकडे आणि शिंपले यांचे अवषेश मिळाले. इथे मिळालेले स्पॉन्डिलस (Spondylus) शिंपले हे अँडीज पर्वत रांगेत राहाणारे लोक त्यांच्या पूजेत वापरतात. हा शिंपला पाण्याचे आणि सृजनाचे प्रतिक आहेत. हे शिंपले इथून हजारो किलोमीटर दूर असलेल्या इक्वेडोर देशाच्या किनार्‍यावर सापडतात. या मातीच्या ओट्याचा उपयोग देवाला नैवेद्य (Offering) ठेवण्यासाठी केला जात होता . नाझका वाळवंटातील चित्रात काढलेले बहुतांश प्राणी आणि पक्षी हे पाण्याशी संबंधीत आहेत. त्यावरुन पूरातत्वशास्त्रज्ञांनी असे मत मांडले आहे की, वाळवंटात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी. या पाण्यासाठी देवांना आवाहन करण्याकरीता नाझका संस्कृतीतील लोकांनी या रेषा, चित्र कोरलेली आहेत. 

Spondylus Shell

आठव्या नवव्या शतकात आलेल्या लागोपाठच्या प्रचंड दुष्काळामुळे नाझका संस्कृती या भागातून् नष्ट झाली. पावसाचे प्रमाण या भागात आजही नगण्य असल्यामुळे नाझका लाईन्सची एवढी वर्ष होऊनही झीज झालेली नाही. त्यामुळे रेषा आणि चित्र आजही आपल्याला पाहायला मिळतात.

आत्तापर्यंत ८०० सरळ रेषा, ३०० भौमित्तिक रचना, ७० प्राणी, पक्षी , झाडे या नाझका लाईन्स मध्ये काढलेली सापडलेली आहेत. यातील अनेक प्राणी, पक्षी , किटक इथून अंदाजे  १००० किलोमीटर अंतरावर असेलेल्या ॲमेझॉनच्या जंगलातच आढळतात. ते नाझका वाळवंटात इतक्या बारकाईने कोणी आणि का कोरले ?  त्यामधिल भव्यता, प्रमाणबध्दता आणि गुंतागुंत पाहाता ही केवळ आकाशातूनच दिसतील अशी चित्र कोणी आणि का ? काढली असावित हे अजूनही न उलगडलेल कोडच आहे. 


२००४ ते २०२४ मध्ये जपानी संशोधकांच्या टिमने ड्रोन आणि AI च्या सहाय्याने नाझका वाळवंटाचा सर्व्हे केला. तेंव्हा त्यांना ३१८ नविन Geoglyps सापडली आहेत. त्यावरुन आता पुढील अभ्यास चालू आहे. नजिकच्या काळात कदाचित नाझकाचे रहस्य उलगडू शकेल.




नाझका लाईन्सचे गुढ (भाग- १) ( Unsolved Mystery of Nazca Lines ) वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ...


Paracas Geoglyphs

 

Photos by :- kaustubh, Asmita &  Amit Samant  © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Go Pro 13, Google pixle

References :- 1) Nazca : Decoding the riddle of the lines

2) Finger prints of the god  :- Graham Hankok

3) Magicians of the Gods :- Graham Hankok

4) Research Paper :- AI-accelerated Nazca survey nearly doubles the number of known figurative geoglyphs and sheds light on their purpose. September 2024.


Offbeat Kokan  गुढरम्य कातळशिल्प (Rock art near Malvan, Dist. Sindhudurg) वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ...


Tuesday, June 17, 2025

नाझका लाईन्सचे गुढ (भाग- १) ( Unsolved Mystery of Nazca Lines -1 )

 

Spider , Nazca Lines, Peru

पेरू या दक्षिण अमेरिकेत असलेल्या देशाला भेट देण्याचे मुख्य कारण म्हणजे इंका साम्राज्याचा एक भाग असलेली माचू पिचू ही वर्ल्ड हेरिटेज मध्ये ( आणि जगातल्या ७ आश्चर्यांपैकी एक ) असलेली  साईट पाहाणे हे होत. पूरातत्वशास्राच्या (Archaeology) अभ्यासक्रमात माचू पिचू बद्दल बरीच माहिती मिळाली होती. तेंव्हा पासून माचू पिचू आणि इंका साम्राज्यांतील इतर ठिकाण कधीतरी प्रत्यक्ष जाऊन पाहावीत असं ठरवलं होत. त्या अनुषंगाने पेरू वरील पुस्तकं, माहितीपट पाहून इतर कुठली ठिकाण पाहाता येतील हे ठरवत होतो. त्याच दरम्यान कौस्तुभने Finger prints of the god  :- Graham Hankok हे पुस्तकं दिल. हे पुस्तकं वाचल्यावर पाहाण्याच्या ठिकाणात नाझका लाईन्सची भर पडली. 

पेरूच्या दक्षिणेला पंपा नाझका नावाचे २००० स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेले जगातीत सर्वात शुष्क वाळवंट आहे. या वाळवंटात अतिशय भव्य आणि प्रमाणबद्ध अशा भौमितिक रचना, प्राणी, पक्षी, किटक, झाडे, फुले इत्यादी कोरलेली आहेत. त्याच बरोबर मैलोनमैल जाणाऱ्या अचूक सरळ रेषा कोरलेल्या येथे पाहायला मिळतात. ही चित्र आणि रेषा काढताना मध्ये चढ-उतार, शुष्क ओढे, नाले, नद्या इत्यादी गोष्टी आलेल्या आहेत तरीही त्या पार करत या रेषा आणि चित्र काढलेली पाहायला मिळतात.


Nazca Dessert, driest dresert

यात ८०० रेषा, ३०० भौमितिक रचना आणि ७० प्राणी, पक्षी, किटक, झाडे (ज्यांना biomorphs म्हणतात) कोरलेले आहेत. यातील काही रेषा या ३० मैल लांबीच्या आहेत. तर यातील चित्र ५० फ़ूट ते १२०० फ़ूट लांबीची म्हणजेच न्यूयॉर्क मधल्या एंपायर स्टेट बिल्डिंगहून जास्त आकाराची आहेत तर, काही चित्र फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराची आहेत. अशाप्रकारे जमिनीवर कोरलेल्या (खोदलेल्या) चित्रांना Geoglyphs म्हणतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही चित्र आणि रेषा इतक्या मोठ्या आहेत की विमानातूनच पाहाता येतात. १९२६ मध्ये नाझका वाळवंटावरुन विमान उडू लागल्या नंतर या चित्रांचा शोध लागला. ही भव्य चित्र आणि रेषा कोणी खोदल्या आणि कशासाठी खोदल्या हा आजही अनुत्तरित प्रश्न आहे. 

अशा प्रकारे भव्य कलाकृती निर्माण करताना, (आपल्या कडील उदाहरण घायचे तर लेणी खोदताना किंवा किल्ले, मंदिरे बांधताना) त्याच्या कामाची प्रगती आराखड्या प्रमाणे होते की नाही हे मुख्य स्थपतीला समोरून किंवा एखाद्या उंच भागातून पाहाता येते. त्यात काही चूक असल्यास ती निदर्शनास आणता येते. पण नाझका मधिल चित्र आणि रेषा जमिनीवर एवढ्या मोठ्या आकारात कोरलेल्या आहेत की, ती केवळ ५०० फूट उंचीवरुन (आकाशतूनच) दिसू शकतात. त्यामुळे ही चित्र आणि रेषा सापडल्या पासून ती कधी? कोणी? का? आणि कशी? काढली यावर विविध शाखेचे तज्ञ अभ्यास करत आहेत. त्यासंदर्भात अनेक थिएरीज मांडल्या गेल्या आहेत. त्यातील काही थिएरीज काळाच्या कसोटीवर टिकल्या आहेत. पण नाझका लाईन्सचे गूढ पूर्णपणे उकलणे अजून तरी शक्य झालेले नाही.



पेरूची राजधानी लीमा हे समुद्राकाठी वसलेले सुंदर शहर आहे. नाझका लाईन्स पाहाण्यासाठी पहाटेच निघायचे होते. हॉटेल मधून रस्त्यावर आलो तेंव्हा भरपूर लोक रस्त्यावर धावत होते. त्या दिवशी लीमा मध्ये मॅरेथॉन असल्याने पहाटेच सगळीकडे चहलपहल दिसत होती. मॅरेथॉनमुळे हॉटेल जवळचे सगळे रस्ते बंद करण्यात आले होते. बस स्टेशनला जाण्यासाठी टॅक्सी मिळणं शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही सुद्धा पळत पळत बस स्टेशन गाठलं. बरोबर ६.३० ला बस सुटली. लीमा शहर सोडल्यावर बस पॅन अमेरिकन हायवेला लागली. या रस्त्यावर मैलोनमैल एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला वाळवंट हेच दृश्य पाहायला मिळत होते. ४ तासात आम्ही पराकसला पोहोचलो. पराकस हे समुद्रावर वसलेले छोटे गाव आहे. या गावापासून जवळ समुद्रात असलेल्या बेटावर पेग्विन, सील आणि अनेक समुद्र पक्षी पाहायला मिळतात. येथे एका डोंगरावर ७५० फ़ूट उंचीची आकृती कोरलेली आहे. त्याला Candelabra of Paracas किंवा Trident of Paracas (त्रिशुळ) या नावाने ओळखले जाते. या सर्व गोष्टी पाहाण्यासाठी पराकसला बरेच पर्यटक येत असतात पण त्यातील थोडेच पर्यटक नाझका लाईन्स पाहायला जातात. 

बस स्टॅंण्डवरुन १० मिनिटात आम्ही "मरिया राश्चे" या विमानातळावर पोहोचलो. नाझका लाईन्स पाहाण्यासाठी  ४ सीटर आणि १२ सीटर छोटी विमानं येथूनच सुटतात. विमानतळावर प्रत्येकाचे वजन करून वजना प्रमाणे सीट दिल्या गेल्या. विमानात शिरलो तेंव्हा मला आणि लीनाला उजव्या बाजूच्या खिडक्या तर कौस्तुभला डाव्या बाजूची खिडकी मिळाली होती. वेगवेगळ्या दिशेच्या खिडक्या मिळाल्याने प्रत्येक चित्राचे छायाचित्र घेण्याचा दोनदा चान्स मिळणार होता. अशा ठिकाणी लेन्सच्या कॅमेर्‍यातून फोकस करेपर्यंत विमान पुढे गेलेले असते त्यामुळे मी सोनी P90 हा ऑटो फोकस कॅमेरा घेतला होता. कौस्तुभकडे गोप्रो हिरो १३ आणि तिघांकडेही मोबाईल होतेच. ज्याला जे मिळेल ते चित्र त्याने कशा प्रकारेही कॅमेराबद्ध करायचं असं आम्ही ठरवलं होते.

Pacific Ocean, Paracas

विमानात बसल्यावर वैमानिकांनी माहिती दिली की, "आपल्याला नाझका लाईन्स पर्यंत जायला ४० मिनिटे लागतील. त्यानंतर ३० मिनिटे नाझका लाईन्स वरील १६ चित्र दाखवण्यात येतील. ती चित्रे विमानाच्या दोन्ही बाजूने दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे ती सर्वांना दिसतील ". विमानाने उड्डाणं केल्यावर खाली पराकसचा समुद्र किनारा दिसायला लागला. पॅसिफिक महासागरावरून विमान नाझका वाळवंटात शिरले. जिकडे तिकडे वाळू पसरलेली दिसत होती. त्यात सुकलेल्या नद्या, नाल्यांच्या रेषा दिसत होत्या. या वाळवंटाला छेदून जाणारा पॅन अमेरिकन महामार्ग आणि त्यावरुन धावणारी वाहने हेच काय ते जिवंतपणाचे लक्षण दिसत होते. हे एकसूरी दृश्य पाहात असताना वैमानिकाने जाहीर केले की, "आपण नाझका लाईन्स जवळ पोहोचलो आहोत. आता एकामागून एक चित्र पाहायला तयार व्हा". आम्ही खिडकीला कॅमेरे आणि डोळे लावून तयार झालो. खाली शार्क माशाचे भले मोठे चित्र रेखाटलेले होते. समुद्रापासुन इतक्या दूर असलेल्या नाझकातील कलाकारांना शार्क मासा माहिती होता. खारवलेले, सुकवलेले मासे त्यांच्या अन्नाचा भाग असावेत. शार्कचे चित्र मनसोक्त पाहून झाल्यावर कॅमेरा सरसावला पण ते चित्र फोकस होत नव्हतं त्यामुळे मोबाईलने पटापट फोटो घेतले. तेव्हाच आमच्या विरुद्ध बाजूच्या लोकांना मासा दाखवण्यासाठी विमानाने एका बाजूला कलंडत गिरकी घेतली. हॉलिवुड मधल्या एखाद्या स्टंट चित्रपटातल्या विमानात बसल्या सारखे आम्हाला वाटू लागले.

Astronaugt, Nazca Lines, Peru


मासा दाखवून विमान पुढे निघाले एका डोंगर उतारावर १०५  फूट उंच माणूस कोरलेला होता. त्या माणसाने एक हात "टाटा, बाय - बाय" करतात तसा वर केलेला आहे. त्याच्या पायात जाड बूटासारखे काहीतरी घातलेले आहे. त्यामुळे या चित्राला "Astronaut" किंवा "स्पेसमॅन" या नावाने ओळखले जाते. ज्या परग्रहवासी लोकांनी या रेषा आणि चित्र काढली त्यांनीच आपले चित्र इथे कोरून ठेवले आहे, अस काही लोकांचे मत आहे. या चित्राची शैली नाझका चित्र शैली पेक्षा पराकस चित्र शैलीशी मिळती जुळती आहे. पराकस शैलीतील काही चित्र नाझकाच्या वाळवंटात सापडलेली आहेत.  


Astronaugt, Nazca Lines, Peru

Astronaut ला टाटा करुन वैमानिकाने परत एक गिराकी घेतली आणि विमान एका बाजूला झुकवलं. आता खाली माकडाचे चित्र दिसत होत. त्याची शेपटी गोलाकार (Spiral) गुंडाळलेली आहे. वाळवंटात माकड असण्याची शक्यता नाही. तरीही ते इथे ३३० फूट (१०० मीटर) लांब x १९० फूट (५८ मीटर) रुंद आकाराचे माकड रेखाटलं होते. याच माकडाचे चित्र नाझका संस्कृतीतील सिरॅमिकच्या भांड्यावर पण पाहायला मिळते. 

Monkey, Nazca Lines, Peru


खालच्या जमिनीवर कोरलेली पुढची आकृती कुत्र्याची होती. १६७ फ़ूट (५१ मीटर) लांब असलेल्या या कुत्र्याचे पाय आणि शेपटी ताठ झालेली आहे. एखादी विचित्र, भितीदायक गोष्ट बघितल्यावर कुत्र्याची जी प्रतिक्रिया असते ती इथे कोरलेली आहे. हा कुत्रा पेरुवियन हेअरलेस डॉग या आजच्या काळातही पेरुत आढळणार्‍या कुत्र्याचा पूर्वज असावा.

Dog, Nazca Lines


दोन्ही बाजूला विमान वळवून थरारक अनुभव देत, विमान पुढे झेपावलं. आता खालच्या जमिनीवर ३१८ फूट (९७ मीटर) लांब x २१६ फूट (६६ मीटर) रुंद पंख असलेला सुंदर हमिंग बर्ड (फ़ूल टोच्या) दिसु लागला. त्याची लांबलचक चोच, पसरलेले पंख, त्यावरील पीसं आकाशतूनही सुंदर दिसत होती. माकडा प्रमाणेच हमिंग बर्ड सुध्दा वाळवंटात आढळून येते नाही. नाझका संस्कृतीतील सिरॅमिकच्या भांड्यावर आणि त्यांच्या कपड्यावरील कशिदाकामात (एम्बॉयडरी) हमिंग बर्ड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. काही तज्ञांच्या मते नाझका संस्कृतीत हमिंगबर्ड हा समृध्दीचे प्रतिक आहे. 

Humming Bird , Nazca lines

आता जमिनीवर पॅन अमेरीकन हायवे जवळील पठार दिसायला लागले. या पठारावर एक सर्पिलाकार चक्र कोरलेले आहे. त्याचा आकार २३७ फ़ूट (७२ मीटर) लांब आणि ६५९ फ़ूट (२०१ मीटर) रुंद आहे. हे चक्र अशाप्रकारे कोरेलेले आहे की चक्रात एका बाजूने शिरुन फ़िरत दुसर्‍या बाजूने बाहेर येता येते. पूरातत्वशास्त्रज्ञांनी एक काठी आणि त्याला बांधलेला दोरखंड याच्या सहाय्याने अशा प्रकारे चक्र बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. काठी चक्राच्या मध्यभागी रोऊन त्याभोवती दोर बांधून गोलाकर फ़िरवल्यावर वर्तुळ तयार होते. दोर ढिला सोडत पुढे पुढे गेल्यास बाहेरील वर्तुळे तयार होतात. याप्रकारे ३४ मीटरचे चक्र बनवण्यास त्यांना २ तास लागले होते. 

Spiral, Nazca Lines

विमानाने पुन्हा वळण घेतल्यावर जमिनीवर समुद्र शैवालाचे (Sea weed) चित्र कोरलेले दिसत होते. त्याच्या बाजूला कंडोर पक्षाचे प्रचंड मोठ चित्र कोरलेले आहे. ४४० फूट (१३४ मीटर) लांब असलेले हे चित्र एका फुटबॉल मैदाना इतके मोठे आहे. पेरूच्या दक्षिण किनाऱ्यावर हा पक्षी आढळतो. स्थानिक भाषेत याला "Long tailed Mocking bird" या नावाने ओळखले जाते. इसवीसन १९८२ मध्ये केंचुकी युनिव्हर्सिटीच्या जो निकेल यांनी नाझका संस्कृतीच्या काळात वापरात असलेली हत्यारे वापरून या चित्राची प्रतिकृती शेतात कोरली होती. कंडोर पक्षाच्या बाजूला लांबलचक देठ असलेल फुल कोरलेल आहे.

Condor, Nazca Lines

Sea Weed, Nazca Lines

फुल पाहून पुढे गेल्यावर विमान पॅन अमेरिकन हायवेच्या वर आले. या ठिकाणी दोन चित्र आहेत. एका चित्रात दोन हात आहेत. त्यापैकी एका हाताला ४ बोट आणि अंगठा आहे, तर दुसर्‍या हाताला ३ बोट आणि अंगठा आहे. यातील पहिला हात मानवाचा आहे तर दुसरा हात कुणाचा आहे, हे एक कोड आहे. या हातांच्या बाजूला झाडाचे चित्र आहे. झाडाच्या बाजूला ५९० फ़ूट (१९० मीटर) लांबीची पाल आहे. या पालीची शेपटी पॅन अमेरिकन हायवे बनवतांना कापली गेलेली आहे.

Lizard ,Tree, Hands, Nazca lines

Hands, Nazca Lines

पालीच्या तोंडाच्या पुढे बगळा (हेरॉन) / Alcatraz चे भले मोठे चित्र आहे. त्याची लांबी ९३५ फूट (२८४ मीटर) आहे. आमचे विमान ज्या उंचीवरून उडत होते तेथूनही या पक्षाचे पूर्ण चित्र जेमतेम दिसत होते. त्यामुळे त्याचे पूर्ण छायाचित्र घेता आले नाही.

विमानाने पुन्हा एक वळण घेतले. दोन्ही बाजूला झुकून वळण घेण्यामुळे आणि सतत उंची कमी जास्त करण्यामुळे विमानातील अर्ध्या लोकांना उलट्या सुरु झाल्या होत्या. आमच्याही पोटात ढवळत होते. त्यात छायाचित्र काढण्यासाठी खालच्या चित्रावर नजर स्थिर करावी लागतं होती आणि विमान एखाद्या पक्षासारखे आकाशात सूर मारत होते, खाली येत होते, गिराक्या घेत होते. त्यामुळे मध्ये मध्ये आम्ही छायाचित्रण करण सोडून दिल होत आणि खालचं आणि दूरवरचे दृष्य नुसत्या डोळ्यांनी पाहायला सुरुवात केली.

विमानातं उलट्याचां हल्लकल्लोळ चालू असताना विमान पेलीकन पक्षाच्या चित्रावर आले होते. या पक्षाचे उड्डाणं करताना मागे ताणलेले पायही चित्रात स्पष्ट दिसत होते. या चित्राची लांबी ३२० फूट (९७ मीटर) लांब x २१६ फूट (६६ मीटर) रुंदी आहे.

Pelican, Nazca Lines

पेलीकन पाहून झाल्यावर विमानाने वळण घेतल्यावर पोपटाची चोच दिसायला लागली. या पोपटा जवळून अनेक रेषा जात असल्याने त्याची चोच आणि पोटाचा थोडाच भाग स्पष्ट दिसत होता. या संपूर्ण उड्डाणात  दूरवर पसरलेल्या अनेक रेषा आणि भौमितिक आकारही दिसत होते.  

विमानाने मोठ वळण घेतलं आणि परत एकदा पॅन अमेरिकन हायवे ओलांडून कोळ्याच्या प्रसिद्ध चित्रावर आले. १५० फूट (४५ मीटर) लांब असलेले हे कोळ्याचे चित्र इसवीसन १९३० मध्ये पॉल कोसॉक यांनी शोधले होते. किटक तज्ञांना असे आढळून आले आहे की, हे कोळ्याचे चित्र ॲमेझॉनच्या जंगलात आढळणार्‍या दुर्मिळ अशा "Ricinulei" जातीच्या कोळ्याचे आहे. या कोळ्याच्या पायावर पुनरुत्पादन करण्यासाठी एक अवयव असतो, जो केवळ भिंग वापरल्यास दिसू शकतो. तो अवयवही या चित्रात कोरलेला आहे. 

नाझकातील चित्र पाहून पुन्हा विमानतळावर पोहोचलो. नाझकातील कलाकारांनी काढलेली भव्य चित्र पाहून डोळे दिपलेले होते. डोक्यात अनेक प्रश्न घोळत होते. नाझकातील कलाकारांनी हजारो किलोमीटर दूर असणार्‍या ॲमेझॉनच्या जंगलात जाऊन प्राणी, पक्षी, किटकांचे बारकावे  टिपून त्याची चित्र, तीही इतकी भव्य प्रमाणावर ( जी केवळ विमानातून दिसतील ) या वाळवंटात का काढली असतील ? अशा प्रकारे भव्य रचना करण्यासाठी असलेले ज्ञान, हत्यारे, त्यासाठी लागणार मनुष्यबळ, त्यासाठी लागणार अन्न/ पैसा त्यांनी कुठून आणले असेल. जगभरातील मानवाने बनवलेल्या भव्य रचनांच्या मागे कुठली तरी प्रेरणा असते. या नाझका लाईन्स, चित्र आणि भौमितिक आकृत्या कोरण्या मागे नक्की काय प्रेरणा होती ?  

या नाझका लाईन्स पाहाताना या लाईन्स का? कोणी? कधी? आणि कशा? खोदल्या असे अनेक प्रश्न पडले होते. विमानतळावर नाझकावर लिहिलेली पुस्तक घेतली. ती वाचल्यावर काही गोष्टींचा उलगडा झाला, तर काही प्रश्न अजुनही अनुत्तरीतच राहीले आहेत. त्याबद्दल पुढच्या भागात.......  



नाझका लाईन्सचे गुढ (भाग- २) ( Unsolved Mystery of Nazca Lines ) वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ...



Photos by :- kaustubh, Asmita &  Amit Samant  © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Go Pro 13, Google pixle

Humming Bird of Nazca on 2 sloes coin


Offbeat Kokan  गुढरम्य कातळशिल्प (Rock art near Malvan, Dist. Sindhudurg) वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ...