Thursday, May 31, 2018

सुरमयी ट्रेक (Musical Trek)

सह्याद्रीत भटकंती करतांना नित्य नविन अनुभव येत असतात. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अजमेरा हा तसा अपरीचित किल्ला आहे. सकाळीच पायथ्याच्या पहाडेश्वर मंदिरा जवळून गड चढायला सुरुवात केली पण, गडावर जाणारी पायवाट अशी नव्हतीच. गडाच्या वाटेवर दूरपर्यंत तुरळक झुडप वाढलेली होती. माती पकडून ठेवणारी झाडेच नसल्याने माती सैल झालेली होती. त्यामुळे जीव मुठीत घेऊन घसार्‍यावरून खाली सरकत - सरकत वर चढत होतो. 


गडाच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या पठाराजवळ आल्यावर वेगळेच सुंदर सूर ऐकू येउ लागले. त्या सुरांनी आमची उत्सुकता वाढली आणि झपाझप पावले टाकत आम्ही पटकन पठार गाठले. तिथे एक माणूस वेगळेच वाद्य वाजवत होता. हे वाद्य आदिवासी तारपा वाद्या सारखे दिसत असले तरी वेगळेच होते. त्या वादकाच नाव होत युवराज वाघ, महादेव कोळी समाजाचा हा तरुण मुळचा देवळाणे गावचा पण खंडाने शेती कसण्यासाठी तो पहाडेश्वरला राहायला आला होता. त्याच्या हातात जे वाद्य होते, ते वाद्य त्याने स्वत: बनवले होते त्याच नाव त्याने "पावरा" असे सांगितले. पावराचा पहिला फ़ुगिर भाग भोपळा कोरुन त्यापासून बनवलेला होता. त्या भोपळ्याला पुढे साधारण ६ इंचाच्या बांबूच्या दोन नळ्या बसवलेल्या होत्या. त्याला बासरीवर असतात तशी तीन भोक होती. त्या बांबूच्या नळ्यांच्या दुसर्‍या टोकाला बैलाच शिंग जोडलेल होते. त्या शिंगाच्या वर ॲल्युमिनियमचा (Aluminium) दोन इंचभर पत्रा गुंडाळलेला होता. हे वेगवेगळे भाग जोडण्यासाठी त्याने मधमाशांच्या पोळ्यातून मिळालेले मेण वापरलेले होते. भोपळ्याच्या जवळ अजून एक कमानदार भोपळा जोडलेल त्यावर झालर असलेले रंगीत कापड आणि गोंडे लावून वाद्य सजवण्यात आले होते. 




या वाद्याच्या जोरावर तो आजूबाजूच्या परिसरात लग्न, धार्मिक विधीत वाजवण्याच्या सुपार्‍या घेतो, असे त्याने सांगितले. वेगवेगळ्या कार्यात वाजवल्या जाणार्‍या सुरावटी त्याने आम्हाला ऐकवल्या. पावरा वाजवतांना त्या भोपळ्यात तोंड घालून पूर्ण ताकदीने फ़ूंकावे लागते. अशाप्रकारे फ़ुंकताना त्याचे गाल फ़ुगिर होत. जबड्याच्या नसा ताणल्या जात. त्याचवेळी त्याची बोट सराईतपणे बांबूच्या नळीवरील भोकावरुन फ़िरत होती आणि त्या वाद्यातून ती मधूर सुरावट निघत होती. एकूण काम ताकदीच होते. आम्ही त्यांना विनंती केल्यावर पुढची वाट दाखवायला ते तयार झाले. आपला पावरा वाजवत त्यांनी किल्ला चढायला सुरुवात केली. त्या सुरावटींवर पावल टाकत आमचा सुरमयी प्रवास चालू झाला.    


     ( युवराजने केलेले पावरा वादन ऐकण्यासाठी खालील व्हिडीओवर टिचकी मारा )





जो डोंगर आम्ही धापा टाकत चढत होतो, तोच डोंगर युवराज पावरा वाजवत आरामात चढत होते. किल्ला पाहून झाल्यावर किल्ल्याच्या विस्मृतीत गेलेल्या खिंडीतल्या मुळ वाटेने त्यांनी आम्हाला पायथ्याशी आणले. त्याच ठिकाणी त्याच खंडाने घेतलेल शेत आणि त्याच्या बाजूला त्याच खोपट होते. निरोप घेतांना त्याला पुन्हा पावरा वाजवायचा आग्रह केला, कुठलेही आढेवेढे न घेता त्याने सुंदर धुन आम्हाला ऐकवली. अजमेराचा सुरमयी ट्रेक  मनावर कायमचा कोरला गेलेला आहे.

अजमेरा किल्ल्या खालील रक्त कांचन       



आडवाटेवरचे किल्ले ( Offbeat forts & temples in Nasik. Aad, Dubera, Bajirao Peshwa Birth place,Siddheshwar Temple ,Gangadhareshwar Mandir, Akole) हा ब्लॉग वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा...




#MusicalTrek #offbeattrek #treksinmaharashtra 

Wednesday, May 9, 2018

कोकणातील निसर्ग चमत्कार :- बोंबडेश्वर मंदिर (Offbeat Kokan)

         



एकेकाळी मानवाला निसर्गातील अनेक आश्चर्यांचा उलगडा झाला नव्हता. त्यामागील विज्ञानही त्याला कळले नव्हते. त्यामुळे अशा ठिकाणांना दैवी चमत्कार समजून त्याठिकाणी त्याने मंदिरे उभारली. हिमाचल प्रदेशातील ज्वालाजी मंदिर, गरम पाण्याच्या कुंडांभोवती भारतभर बांधलेली मंदिरे, लोणार सारख्या विवरात आणि आजूबाजूला बांधलेली मंदिरे अशी अनेक उदाहरणे आपल्याला भारतात पाहाता येतात. 

         


मालवण पासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मठ गावात बोंबडेश्वर मंदिर आहे. कोकणी पध्दतीच्या साध्या कौलारू मंदिरा समोर चिर्‍याने बांधलेले दोन कुंड आहेत. या दोन्ही कुंडातील पाणी समपातळीत राहावे यासाठी मधल्या भिंतीत काही छिद्र ठेवलेली आहेत. यातील उजव्या बाजूच्या कुंडाता पाण्याचे झरे आहेत. या कुंडातील पाणी मधल्या भिंतीत केलेल्या छिद्रातून बाजूच्या कुंडात जाते आणि पुढे पाणी पाटामार्गे बागायतीत वळवलेले आहे. दोन तलावांपैकी उजवीकडील झरे असलेल्या कुंडातील पाण्यात अधूनमधून बुडबुडे येत असतात. " बोंबडेश्वर "अशी साद मोठ्या आवाजात घातल्यावर तळ्यातून येणाऱ्या बुडबुड्यांची संख्या वाढते. अर्थात बोंबडेश्वर हा उच्चार न करताही केवळ मोठ्या आवाजात उच्चारलेल्या शब्दांच्या कंपनानीही तलावातून बुडबुडे येतात. आम्ही तिथे असताना गावातल्या दोन बायका बाजूच्या कुंडात पाणी भरायला आल्या होत्या. त्यांच्या बोलण्यामुळेही कुंडातून बुडबुडे येण्यास सुरुवात झाली होती. मालवणी भाषेत बोंबाडे म्हणजे बुडबुडे तळ्यातून येणाऱ्या या बुडबुड्यांच्या चमत्कारावरुन याठिकाणी स्थापन झालेल्या पिंडीला (शंकराला) बोंबडेश्वर हे नाव प्राप्त झाले आहे.


यावरुन २००२ साली  उत्तरांचल मधील केदारेश्वरला पाहिलेल्या पुरातन शंकर मंदिराची आठवण आली. केदारेश्वर मंदिराजवळ असलेले मंदाकिनी नदीचे पात्र ओलांडल्यावर एक पडके मंदिर होते . त्या मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग पाण्यात पूर्णपणे बुडालेले होते . त्या ठिकाणीही "बम बोले" असे म्हटल्यावर पाण्यात बुडबुडे येत असत. २०१३ साली केदारनाथला झालेल्या उत्पाता नंतर ते मंदिर अस्तित्वात आहे की नाही याची कल्पना नाही . मुंबई गोवा मार्गावरील तरळा गावावरून वैभववाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर नाधवडे गावाच्या पुढे 'उमाड्याचा महादेव' मंदिर आहे. या मंदिरासमोर असलेल्या नदीच्या शांत प्रवाहात पाण्यातून सतत बुडबुडे येत असतात. 


(आवाज  केल्यावर  पाण्यातून निघणाऱ्या बुडाबुड्याचा व्हिडीओ पहाण्याकरीता प्ले बटण  दाबा )

गंधकामुळे अशा प्रकारचे बुडबुडे पाण्यातून येतात असे ऐकले होते. पण गंधकाचा येणारा विशिष्ट वासही या दोन्हीही ठिकाणी येत नव्हता . मग हे बुडबुडे कशामुळे येत होते . याचा उलगडा होण्यासाठी भूशास्त्राची थोडीशी माहिती करुन घेणे आवश्यक आहे. भूस्तराखाली जे अनेक दगड असतात त्यात सच्छिद्र दगडही असतात. या सच्छिद्र दगडात असलेल्या पोकळीत हवा असते. कोकण होणाऱ्या प्रचंड पावसामुळे बेसॉल्ट खडकातील क्षार वाहून जातात त्यामुळे जांभा दगडाची निर्मिती झालेली आहे . क्षार वाहून गेल्यामुळे हा दगड सच्छीद्र बनलेला असतो. या सच्छिद्र दगडातून वाहात येणार्‍या पाण्या बरोबर हवा दगडातील पोकळ्यांमध्ये अडकून राहाते.  मोठ्या आवाजामुळे पाण्यात कंपने निर्माण होतात. या कंपनांमुळे सच्छिद्र दगडातील पोकळीत अडकलेली हवा बाहेर येते आणि आपल्याला बुडबुड्यांच्या स्वरुपात पाहायला मिळते. 



बोंबडेश्वर मंदिर परिसरात काही सुंदर विरगळ ठेवलेल्या आहेत.  विरागळी बद्दल वाचण्याकरता खालील लिंक वर टिचकी मारा

निसर्गातील हा चमत्कार पाहाण्यासाठी बंबार्डेश्वर मंदिराला एकदा तरी जायला पाहीजे. या बरोबरच कुडोपी गावातील कातळशिल्प पाहाता येतील. (यावर "गुढरम्य कातळशिल्प" हा ब्लॉग लिहिलेला आहे.वाचण्याकरता खालील लिंक वर टिचकी मारा


जाण्यासाठी :- मालवणहून आचर्‍यामार्गे कणकवलीला जाणाऱ्या रस्त्यावर मालवण पासून २८ किलोमीटर अंतरावर बुधावळे गावाला जाणारा फाटा आहे. या रस्त्याने बुधावळेला जाताना ५ किलोमीटर अंतरावर मठ नावाचे गाव आहे. गावात रस्त्याला लागून बोंबडेश्वर मंदिर आहे. मठ ते कणकवली अंतर २० किलोमीटर आहे. मठ ते देवगड अंतर ३६ किलोमीटर आहे.



#Offbeatkokan

Tuesday, April 17, 2018

आडवाटेवरचे किल्ले ( Offbeat forts & temples in Nasik. Aad, Dubera, Bajirao Peshwa Birth place,Siddheshwar Temple ,Gangadhareshwar Mandir, Akole)


मार्च महिन्याच्या अखेरीस जोडून सुट्टया आल्यामुळॆ आड, डुबेरगड, सिध्देश्वर मंदिर आणि गंगाधरेश्वर मंदिर अकोले, पेमगिरी किल्ला आणि पेमगिरीचा महा वटवृक्ष पाहाण्याचा प्लान बनवलेला. पण अचानक उष्णतेचा पारा ४० अंशाच्या पुढे पोहोचल्यामुळे ज्याला विचारतोय तो वेगवेगळी कारण सांगून ट्रेकला नाही म्हणायला लागला. मुंबईतच ४० अंश सेल्सियस तापमान, तर नाशिक नगरच्या सीमेवर असलेल्या या वैराण किल्ल्यांवर काय होईल हा खरच प्रश्न होता. पण इतक्या वर्षाची भटकंती आणि त्यातून मिळालेला अनुभव यामुळॆ एकदा जायच नक्की केल्यामुळे आता माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता.


हि सगळी ठिकाण एका दिवसात पाहायची होती. त्यामुळे गाडी घेऊन रात्री ११ च्या सुमारस डोंबिवलीहून निघालो. कसारा घाट पार केल्यावर हवा थंड झाली, मुंबईची उकाड्यातून आल्यामुळे एकदम फ़्रेश वाटायला लागल. पहाटे ३.३० ला आड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आडवाडीत पोहोचलो. झुंजूमुंजू झाल्यावर वर जायचे होते. पण त्यासाठी अजून दोन तास बाकी होते. त्यामुळे पाठ टेकायला जागा शोधण भाग होते. गावातील शाळा, मंदिर, घरांच्या पडव्या, अंगण ही आमची नेहमीची झोपायची ठिकाण, त्या दृष्टीने शोध चालू केला. इतक्यात येवढ्या रात्रीही एक माणूस गावात फ़िरताना दिसला. त्याला विचारल्यावर त्याने जवळाच असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात जायला सांगितले. श्रीकृष्णाचे मंदिर ऐसपैस होते. इथल्या पध्दतीप्रमाणे गावातले काही लोक मंदिरात झोपायला होते. आमची चाहूल लागताच काही लोक उठले आणि चौकशी चालू केली. सकाळी किल्ल्याची वाट दाखवायच एकाने मान्य केल्यावर मी आणि कौस्तुभने स्लिपिंग बॅग अंथरल्या, वैभव आणि उमेशने स्लिपिंग बॅग आणली नसल्याने त्यांनी सॅक मधून वर्तमानपत्र काढली. तितक्यात एका माणसाने त्यांना हाक मारून  उशाशी घेतलेली गोधडी दिली. या भागात दिवसा तापमान ४० अंशाच्या पुढे असले तरी रात्री मात्र व्यवस्थित थंडी असते. १२ महिने वारे वाहात असतात. त्यामुळे या भागात पवनचक्क्यांची संख्याही जास्त आहे. आम्ही झोपलेलो त्या मंदिरातही थंडगार वारा लागत होताच. पहाटेचा गजर लावून स्लिपिंग बॅगमध्ये शिरलो. दिवसभराच्या धावपळीने कधी झोप लागली कळलच नाही. अचानक नगार्याच्या आवाजाने जाग आली. काकड आरती चालू झाली होती. मागे एकदा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याच्या मंदिरात झोपलो असताना सकाळी इलेक्ट्रीकवर चालणारा ढोल आणि झांजने झोपमोड केली होती. पण आज नगारा अतिशय तालात वाजत होता आणि आरतीच्या चाली प्रमाणे त्याचा ताल बदलत होता. कुतूहलामुळे उठून बसलो. एक आजोबा समरसून नगारा वाजवत होते. आरती म्हणणाऱ्या माणसाचा आवाजही चांगला होता. पण आरतीचे शब्द मात्र मला तरी अपरिचित होते.  आमच्यातला वैभव उठून आरतीला आधीच  उभा राहीला होता. मीही गाभाऱ्या समोर जाऊन उभा राहिलो. तेंव्हा लक्षात आले की हे देउळ महानुभाव पंथांच्या लोकांचे आहे . 

Aad  Fort

आरती संपल्यावर झोपण शक्य नव्हते. मग गाववाल्यांशी गप्पा मारायला सुरुवात केली अशा गप्पांमध्ये  दंतकथा, गावचे प्रश्न, राजकारण इत्यादी अनेक गोष्टी कळतात. फक्त आपण आपला शहरी शहाणपणा आणि आगाऊपणा सोडून नम्र श्रोत्याची भुमिका घ्यायची असते आणि संवाद यज्ञ चालू ठेवण्यासाठी प्रश्नांच्या समिधा मधून मधून टाकत राहायच्या असतात. गावातली ३०० घर महानुभाव पंथाची आहेत . त्यांनीच हे श्रीकृष्णाचे मंदिर बांधले आहे .गावात दुधदुभत भरपूर आहे. एकेकाळी गावातून मोठ्या प्रमाणावर खवा सिन्नरच्या बाजारात जायचा. या भागतले उघडे बोडके डोंगर दिसतात त्याच कारण हा खवा आहे. खवा बनवण्यासाठी भरपूर सरपण लागायच त्यामुळे जंगलतोड झाली. नंतरच्या काळात पवनचक्क्या आल्या त्याबरोबर रस्ते आले, एसटी आली. आज गावात खवा बनवणार एकच घर आहे.(त्याच नाव मी गुगल मॅपवर पाहीले होते. ते त्यांना सांगितल्यावर आश्चर्य वाटले ) गावातील बाकी सर्व लोक आता दिवसातून दोनदा दुध सिन्नरच्या बाजारात घेउन जातात. त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन जीप सिन्नरला जातात. गप्पा चालू असतानाच पूर्वेकडे फटफटायला लागल . त्याबरोबर आकाशाच्या पार्श्वभूमीवर पनचक्क्या फिरताना दिसायला लागल्या. गाववाल्यांकडून आम्हाला चहाचा आग्रह होत होता पण उन्हाच्या आधी आड किल्ला पाहून पुढे जायचे होते. त्यामुळे आम्ही सामान आवरून निघालो. एक गाववाला आम्हाला थोड्या अंतरापर्यंत वाट दाखवायला आला . गावाच्या बाहेर एक मातीच धरण होते . मार्च महिन्यातच त्यातला पाणीसाठा आटला होता. धरणाच्या पुढे वाट शेतातून जात होती . समोर आड किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला होता. किल्ल्याच्या उत्तर दिशेकडील डोंगरधारेच्या खाली मारुती मंदिर आहे . गावातून मंदिरापर्यंत २० मिनिटात पोहोचलो . कौलारू मंदिरात हनुमानची मुर्ती आणि काही वीरगळी ठेवलेल्या आहेत . या मंदिरापासून किल्ल्याच्या मध्यावर असलेल्या गुहेपर्यंत जाण्यासाठी पाउलवाट आहे असे आम्हाला वाटाड्याने सांगितले. त्याप्रमाणे पाउलवाटेला लागल्यावर १० मिनिटे चढ चढल्यावर  एका आंब्याच्या झाडाखाली आलो. येथून दोन ठळक पाउल वाटा फुटत होत्या एक उत्तर डोंगरधारेकडे तर दुसरी दक्षिण डोंगरधारेकडे जात होती . आम्ही उत्तरेकडे जाण्याऱ्या पायवाटेने निघालो. ती वाट हळूहळू चढत जात होती. पण १० मिनिटात लक्षात आले की ही वाट किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालून मागे जातेय . मग परत फिरलो आणि आंब्याच्या झाडापासून दक्षिणेस जाणाऱ्या वाटेने पुढे गेलो पण ती वाट सरळच जात होती आम्ही गुहेच्या खालून पुढे गेल्यावरही वाट वर चढेना तेंव्हा लक्षात आल की ही पण किल्ल्यावर जाण्याची वाट नाही . मग गुहेच्या खाली येउन एक छोटासा कातळटप्पा चढून  गुहेपाशी आलो. हि किल्ल्यावर जाण्याची वाट नव्हती . पण दिवसभराचा कार्यक्रम पार पाडायाचा असल्याने आमच्या पुढे पर्याय नव्हता. 

Tank on Aad Fort

आडु बाईची गुहा ही एक डोंगराच्या कातळटोपी खाली असलेली भलीमोठी नैसर्गिक गुहा आहे. या गुहेत कातळात कोरलेला बसण्यासाठी केलेला ओटा आणि एक टाक याच मानवनिर्मित गोष्टी होत्या . गुहेपर्यंत येण्यासाठी वाट चुकल्यामुळे अर्धा तास जास्त खर्ची पडला होता . सकाळी नाश्ता न केल्याने भुकपण लागली होती . त्यामुळे गुहेत बसून नाश्ता केला आणि पाणी पिउन किल्ल्याच्या उत्तरधारेकडे निघालो. या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या होत्या त्या जपून चढून गेल्यावर किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. किल्ल्याचा माथा विस्तीर्ण पसरलेला आहे. माथ्यावर पाण्याची १५ टाकी , एक तलाव आहे म्हणजे  किल्ला नांदता असेल त्याकाळी किल्ल्यावर भरपूर वस्ती असणार त्याचे अवशेष किल्ल्याच्या माथ्यावर दिसत होते. किल्ल्याचे प्रवेशद्वार सध्या उध्वस्त स्थितीत आहे . किल्ला व्यवस्थित पाहाण्यात एक तास कसा गेला ते कळलच नाही. किल्ला उतरताना प्रथम त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या . किल्ला चढताना दरीकडे पाठ असल्याने त्याची भयानकता जाणवली नव्हती. पण उतरताना तिन्ही बाजूला दरी असल्याने कातळाकडे तोंड करुन उतरायला सुरुवात केली.  पाय खालच्या पायरीवर टेकेपर्यंत हाताची पकड सोडायची नाही हा नियम पाळून जपून उतरताना तापलेल्या कातळाचे चटकेही बसायला लागले होते . किल्ला उजाडल्या उजाडल्या चढायला सुरुवात करायची हा निर्णय योग्यच होता. जपून पायऱ्या उतरून सपाटीला आलो. किल्ला चढताना हरवलेली पायवाट यावेळी अचूक सापडली . १० मिनिटात किल्ला उतरुन गावाकडे मोर्चा वळवला. पुन्हा श्रीकृष्ण मंदिरात पोहोचल्यावर चहाचा आग्रह झाला पण थांबलो नाही . त्यांनी दिलेले विहिरीतील थंडगार पाणी पिउन निघालो. गाडी काढणार तर समोरुन पाण्याची पिंप भरुन ट्रॅक्टर आला . उन्हाळ्याला सुरुवात झाली होती पण आत्ताच गावात पाणी टंचाई होती. गाडीने थेट ठाणगाव गाठले. मध्ये एके ठिकाणी रस्ता एका डाईक वरुन गेला . दोन्ही बाजूला दरी आणि कातळाच्या भिंतीवर बनवलेला रस्ता .



ठाणगावात मिसळ पाव आणि चहा घेउन ७ किलोमीटरवरचे डुबेरा गाठले. डुबेरा हे पहिल्या बाजीरावांचे आजोळ, त्यांचा जन्म याच डुबेरा गावातील बर्वेवाड्यात झाला होता. डुबेरा किल्ला गावा बाहेरील टेकडीवर आहे . टेकडीच्या पायथ्याशी आश्रम आहे तिथपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आहे . किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एकमेव वडाच्या झाडाखाली गाडी लावली . उन मी म्हणत होते . सर्व अंग, तोंड कपड्यानी झाकून घेतले . समोर किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या दिसत होत्या . कडक उन आणि पायऱ्या म्हणजे भयानक कॉंबिनेशन होते . नेहमी ट्रेकला जाणारे कितीही चालतील , चढतील पण पायऱ्या असल्या की जाम कंटाळा येतो हा सार्वत्रिक अनुभव आहे . पण कंटाळून चालणार नव्हते . त्यामुळे मनाचा हिय्या करुन पहिल्या पायरीवर पाय  ठेवला आणि एका दमात पाव किल्ला चढून गेलो. मध्ये कुठेच सावली नसल्याने तिथे असलेल्या कातळाच्या एका खोबणीत आम्ही सर्वजण शिरलो. सावलीत आल्यावर थोड बर वाटल. बाहेरच्या उन्हाकडे बघवत नव्हत . पाणी पिउन पुन्हा चढायला सुरुवात केली . आता पायऱ्या सोडून प्रत्येक जण वेगळ्या वाटेने गड चढायला लागला. १० मिनिटात धापा टाकत गड माथ्यावर पोहोचलो . माथ्याच्या एका टोकाला मंदिर आहे मध्ये तुरळक बाभळीची झाड आहेत . माध्यान्हीच्या टळटळीत दुपारी तेवढ अंतर चालण पण जीवावर आल होते पण पर्याय नव्हता. सावलीसाठी एका बाभळीच्या झाडाखाली थांबलो. त्याच्या जाळीदार पानां मधून उन अंगावर पडत होतच. उन्हापासून बचाव होण्यासाठी  बाभळीच्या  झाडाखाली उभ्या असलेल्या हरणांच्या कळपाचा फोटो सध्या सोशल मिडीयावर फिरतोय त्याची आठवण झाली आणि त्या परिस्थितीतही हसू आल . देवळाच्या मागच्या कट्यावर देवळाचीच सावली पडली होती त्या सावलीत येउन बसलो. उन्हाच्या तडाख्यामुळे सगळेच बराच वेळ गप्प बसून राहीलो . इतक्यात सिन्नर दिशेच्या दरीतून प्लास्टीकची एक पिशवी वाऱ्यावर तरंगत आली . हळूहळू वर चढत आमच्या डोक्यावरुन साधारणपणे १५ ते २० फुटावरुन ती पिशवी तरंगत आड किल्ल्याच्या दिशेने निघून गेली . बराच वेळ त्या तरंगत जाणाऱ्या पिशवीकडे पाहात बसलो. प्लास्टीकचा भस्मासुर अशा मार्गानेही डोंगरदऱ्यात पसरतोय ही गोष्ट कधी लक्षातच आली नव्हती.  सावलीत बसल्याने जीवाला थोडा थंडावा मिळाला मग घशाला थंडावा देण्यासाठी बरोबर आणलेली द्राक्ष खाल्ली, पाणी पिउन देवळात गेलो. देवळात सप्तशृंगी मातेची मुर्ती होती . नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच किल्ल्यावर सप्तशृंगीदेवीच्या मुर्ती आढळतात. देवीचे दर्शन घेउन आल्या मार्गाने परत जाताना पाण्याची कातळात खोदलेली टाकी दिसली. सप्तशृंगी मातेच्या देवळाच्या विरुध्द बाजूस असलेल्या पठारावर एक कोरडा पडलेला तलाव आहे तो पाहून किल्ला उतरायला सुरुवात केली. १० मिनिटात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. 

Dubera (Dubergad)


उन्हात न संपणारी पायर्‍यांची वाट
गाडी घेउन बाजीराव पेशव्यांचे जन्मस्थान असलेला बर्वेवाडा गाठला. वाड्याला चार बुरुज तटबंदी आणि प्रवेशव्दार आहे . वाड्याची सध्याची अवस्था दयनीय आहे . प्रवेशव्दाराच्या आत पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. तटबंदीच्या आत चौसोपी दुमजली वाडा आहे . वाड्याच्या लाकडी खांबावर आणि हस्तांवर सुंदर नक्षीकाम आहे . पण वाड्याची निगा न राखल्याने त्याची रया गेलेली आहे . दिल्ली पर्यंत धडक मारणाऱ्या बाजीराव पेशव्यांच्या जन्मस्थानाची अवस्था पाहून मन विषण्ण झाले .

Bajirao Peshwa Birth place, Barve Wada , Dubera


Entrance of Barve Wada

पुढचा टप्पा होता २७ किलोमीटर वरील अकोले गाव प्रवरा नदीकाठी गाव वसलेले आहे या ठिकाणी एकेकाळी अगस्ती मुनींचा आश्रम होता आणि वनवासात असताना राम लक्ष्मण सीता या आश्रमात येउन गेले होते अशी दंतकथा आणि गावकऱ्यांची श्रध्दा आहे. अगस्ती ऋषींचे मंदिर गावात आहे. पण आम्हाला पाहायची होती ती सिध्देश्वर आणि गंगेश्वर मंदिरे . भंडारदरा धरणातून पाणी सोडल्याने प्रवरा नदीला पाणी होते. एवढ्या उन्हात ते पाणी नुसते पाहूनही नजरेला थंडावा मिळत होता. प्रवरा नदीवरील पुल ओलांडल्यावर डाव्या बाजूला सिध्देश्वर मंदिर आहे .

Mukh Mandap, Siddheshwar Temple , Akole

सिन्नर ही यादवांची पहिली राजधानी होती . त्यामुळे त्यांनी या परिसरात अनेक सुंदर कोरीवकाम असलेली मंदिरे बांधली किल्ले बांधले . सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर , एकतेश्वर मंदिर, टाहाकरीचे महालक्ष्मी मंदिर , रतनवाडीतले रत्नेश्वर मंदिर, अकोलेचे सिध्देश्वर मंदिर इत्यादी मंदिरे पाहायला मिळतात. ऱाजधानीच्या, बाजारपेठांच्या गावात किंवा व्यापारी मार्गावर ही मंदिर बांधलेली आढळतात आणि व्यापारी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी किल्ले बांधलेले दिसतात.

Siddheshwar Temple , Akole
महाराष्ट्रातील सर्व मंदिराना सरसकट हेमाडपंथी मंदिरे म्हणायची पध्दत पडलेली आहे. हेमाद्री (हेमाडपंत) हा यादवांचा कर्णाधीप (प्रधान् होता. यादवांच्या सत्तेला स्थैर्य मिळाल्यावर त्यांनी कला साहित्य निर्मितीला प्रोत्साहन् दिले. त्यामुळे या मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे या नावाने ओळखले जाते. पण त्यापूर्वीही वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, होयसाळ यांनी एकापेक्षा एक सुंदर मंदिरे महाराष्ट्रात बांधलेली आहेत. यादवांच्या उत्तरकाळात मंदिरांवरील नक्षीकाम कमी कमी होत गेले. व्दारशाखा, सभामंडप, बाह्यभिंती त्यावरील मुर्ती, शिल्प, नक्षी जाऊन मोठमोठ्या सपाट दगडांनी बांधलेली मंदिरे सर्वत्र दिसायला लागली.

Ardha mandap with Sur sundari panel

उत्तर भारतात नागर शैलीची मंदिरे पाहायला मिळतात तर दक्षिण भारतात द्रविड पध्दतीची मंदिरे पाहायला मिळतात. या दोन्ही शैलीपेक्षा वेगळ्या शैलीतील मंदिरे महाराष्ट्रात पाहायला मिळतात त्यांना भुमिज शैलीतील मंदिरे म्हणतात. या मंदिरांसाठी चतुरस्त्र आणि तारकाकृती या दोन प्रकारचे आराखडे वापरले जातात. अकोल्याचे सिध्देश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंदिराला मुखमंडप, दोन अर्ध मंडप, अंतराळ आणि असे मंदिराचे भाग आहेत. मुखमंडप ६ पूर्णस्तंभ आणि २ अर्ध स्तंभांवर तोललेला आहे. सर्व स्तंभावर सुंदर कोरीवकाम आहे. या स्तंभासाठी सलग दगड वापरलेला आहे. जवळपास सापडणार्‍या सलग दगडाच्या लांबी वरुन मंदिराची उंची ठरवली जात असे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणे मंदिरांची उंची वेगवेगळी आढळते. या मंदिरातील खांब खालच्या बाजूला चौकोनी आहेत. हा खांबाचा पाया असल्याने तो रुंद आहे. एक फ़ुट उंच खांबाच्या पायाच्या चारही बाजूस मधोमध छोट्या मुर्ती कोरलेल्या आहेत.त्यावरील २ फ़ुटाचा भाग चौकोनी आहे. त्यावर शंकराच्या सुंदर मुर्ती कोरलेल्या आहेत. त्यावरचा भाग अष्टकोनी आहे. यात तीन पट्ट्या कोरलेल्या आहेत. यात खालील पट्टीवर मुर्ती कोरलेल्या आहेत. वरच्या पट्टीवर युध्द करणारे योध्दे आहेत. त्यावरील छोट्या शिल्पपट्टीवर हंस कोरलेले आहेत. त्यावरचा छत तोलून धरणारा भाग फ़ुगीर गोलाकार आहे. त्यावर छत तोलून धरणारे किचक कोरलेले आहेत. छातासाठी खांबांच्यावर चौकोनी दगडी तुळया आहेत. त्यावर षटकोनी आकारात दगडी पट्ट्या बसवलेल्या आहेत. चौकोनावर षटकोन बसवल्यामुळे तयार झालेल्या रिकाम्या कोपर्‍यात किर्तीमुख कोरलेली आहेत. षटकोनाच्या वर एका आत एक वर्तुळ असून त्यात खाली लोंबणारे दगडी फ़ुल कोरलेले आहे. चौकोनाच्या आणि षटकोनाच्या प्रत्येक पट्तीवर शिल्प कोरलेली आहेत. मुखमंडपात मध्यभागी नंदी आहे. मुखमंडपातून मुख्यमंडपात जाण्यासाठी दार आहे. व्दारशाखेवर वेलबुट्टीचे सुंदर नक्षीकाम आहे. ललाटबिंबावर गणपती आहे. ललाटपट्टीच्यावर पाच छोटी देवकोष्ठ आहेत. त्यात मुर्ती कोरलेल्या आहेत. देवकोष्ठांमधिल जागेत व्याल आणि गजमुख् कोरलेले आहे. व्दारशाखांच्या बाजूला तळाशी शैव व्दारपालांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या उंबरठ्या खाली किर्तीमुख कोरलेली आहेत.

Mukhya Mandap, Siddheshwar Temple, Akole



Kirti Mukh


मुख्य मंडप ८ खांबावर तोललेला आहे. त्यातील चार नक्षीदार खांब आधी वर्णन केल्याप्रमाणे आहेत. तर उरलेले चार खांब साधे आहेत त्यावर थोडेच अलंकरण आहे. मुख्य मंडपाच्या बाजूला दोन अर्ध मंडप आहेत . या अर्धमंडपांना अर्धभिंती असल्याने त्यातून येणारा प्रकाश खांबावर पडून छाया प्रकाशाच्या खेळात खांबावरील मुर्ती उठून दिसतात. मुखमंडपाच्या पुढे अंतराळ व त्यापुढे गर्भगृह आहे. गर्भगृहात पिंड आहे. मंदिराच्या बाह्यभिंतींवर दोन देवकोष्ठ आहेत. त्यातील मुर्ती भंगलेल्या आहेत. अर्ध मंडपांच्या भिंतींवर सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतीवर सर्वात खाली फ़ुलांची पट्टी व सर्वात वर किर्तीमुखांची पट्टी आहे. मंदिराचे मुळ कळस अस्तित्वात नाहीत. मंदिरा जवळ काही वीरगळ पडलेले आहेत.

Gangadhareshwar Mandir, Akole



सिध्देश्वर मंदिर पाहून पुन्हा मुख्य रस्त्यावर येऊन रस्ता ओलांडल्यावर भर वस्तीत गंगाधरेश्वर मंदिर आहे. आम्ही पोहोचलो तेंव्हा मंदिराच्या आवारात जाण्यासाठी असलेल्या दिंडी दरवाजाला कुलूप होते. श्री पोतनीस (संत) यांचे खाजगी मंदिर, सर्वांना मुक्त प्रवेश अस त्यावर रंगवले होते. तिथे खेळणार्‍या मुलांनी पोतनीसांच घर दाखवले. त्यांच्या कडून चावी आणून मंदिराच्या आवारात प्रवेश केला. मंदिराच्या धाटणी वरुन ते पेशवेकाळात बांधलेले असावे. त्यावर फ़ारसे कोरीव काम नाही, पण मंदिराच्या बाह्यभिंतींवर कोरलेली फ़ुले, कमळे आणि किर्तीमुख हे कोरीवकामाचा उत्तम नमुना आहे. मंदिराचे सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे तीन भाग आहेत. मंदिराचा सभामंडप १२ खांबांवर तोललेला असून, छताचा भार तोलण्यासाठी दोन खांबांच्या मध्ये कमानी आहेत. सभामंडप ३ बाजूंनी उघडाच आहे. त्याला भिंती नाहीत. सभामंडपाचे छत कमी कमी होत जाणार्‍या गोलाकार पट्ट्यां एकमेकांवर रचून बनवलेले आहे. मध्यभागी उलटे लटकणारे दगडी फ़ुल कोरलेले आहे. मंडपाच्यावर छोटा कळस आहे. गर्भगृहाच्या वर असलेला कळस छोट्या छोट्या कळसांचा मिळून बनलेला आहे. या कळसाच्या तिन्ही बाजूला शंकराच्या सुंदर मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिर पाहून शेवटचा टप्पा म्हणजे पेमगिरी किल्ला गाठायचा होता. अकोले ते पेमगिरी किल्ला अंतर १७ किलोमीटर आहे. पेमगीरी किल्ला आडवाटेवर येतो. त्यामुळे बघायचा राहून गेला होता.



 पेमगिरी उर्फ शहागड उर्फ़ भीमगड हा नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात येणारा किल्ला आडबाजूला असल्यामुळे फारसा परिचित नाही. पण मराठ्यांच्या इतिहासातला एक महत्वाचा प्रसंग या किल्ल्यावर घडला होता.इ.स. १६३२ च्या अखेरीस मोगल सरदार महाबतखानाने निजामाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा घातला आणि जिंकुन घेतला. त्याने खुद्द हुसेन निजामशहा आणि त्याचा वजिर फत्तेखान याना तुरुंगात टाकल. निजामशाहीची अखेर झाली. त्यावेळी शहाजी राजे निजामाकडे सरदार होते. त्यानी पेमगिरी किल्ल्यावर अटकेत असलेल्या निजामाच्या अल्पवयीन मुलाला मुर्तिजा निजामशहाला सोडवल आणि त्याला गादीवर बसवुन शहाजी राजानी स्वत:ला निजामाचा वकील जाहीर करुन राज्य चालवायला सुरुवात केली. मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैनाशी शहाजी राजानी ६ मे १६३६ रोजी तह केल्यावर निजामशाहीची अखेर झाली.

किल्ल्यावर जाण्यासाठी वनखात्याने डांबरी रस्ता बांधलेला आहे. त्यामुळे आपण थेट किल्ल्यावर पोहोचतो. बाळेश्वर या मुख्य डोंगररांगेपासून वेगळ्या झालेल्या डोंगरावर पेमगिरी हा पुरातन किल्ला वसलेला आहे. वनखात्याने किल्ल्यावर जाण्यासाठी गाडी मार्ग बांधल्यामुळे खाजगी वाहानाने थेट किल्ल्यावर जाता येत. किल्ल्यावर पेमादेवीची दोन मंदिर आहेत. जुन्या छोट्या मंदिरा समोर ४ सातवहान कालिन टाकी आहेत. त्यात मधली दोन खांबटाकी आहेत. टाकी पाहुन डाव्या बाजुंने पुढे गेल्यावर खालच्या बाजुस एक लांबलचक टाक आहे त्याला "बाळंतीणीच टाक" म्हणतात. ते टाक पाहुन किल्ल्याच्या दक्षिण टोकापर्यंत जाता येते. या ठिकाणी कुठलेही अवशेष नाहीत. पण किल्ल्याच नैसर्गिक संरक्षण करणारी किल्ल्या मागची बाळेश्वर डोंगररांग इथुन पाहायला मिळते. टोकावरुन परत फिरुन किल्ल्यावर नविन बांधलेल्या पेमादेवी मंदिराकडे जाताना डाव्या बाजुला दोन कोरडी टाक आहेत. पेमादेवी मंदिरात देवीची नविन मुर्ती बसवलेली आहे. या मंदिराचा कळस दुरवरुनही सहज दृष्टीस पडतो. देवीच दर्शन घेउन किल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या टेहळणी बुरुजाकडे जावे. येथे बुरुज आज अस्तित्वात नाही पण येथुन दुरवरचा परीसर दृष्टीस पडतो. याठिकाणी वनखात्याने लोखंडी शिडी बसवलेली आहे. पायथ्या पासून चालत आल्यास या मार्गानेच आपला प्रवेश होतो. टेहळणी बुरुज पाहुन झाल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. गडावर वनखात्याने सुशोभित करायला सुरुवात केलेली आहे. रस्ता बनवण्यात आला आहे त्यातही गडाचे बुरुज आणि तटबंदीचे अवशेष दिसतात.


पेमगिरी गावात किल्ल्या पासुन २.५ किमीवर एक प्राचिन वडाचे झाड आहे. या झाडाने एक एकरहुन अधिक परीसरात व्यापलेला आहे. ग्रामस्थानी हा परीसर सुशोभित आणि स्वच्छ ठेवलेला आहे. मुळ वट वृक्षाखाली काही वीरगळी आहेत. त्यावर खंडोबा आणि त्याच्या दोन पत्नींच शिल्प कोरलेल आहे. पेमगिरीच्या भेटीत हा वटवृक्ष आवर्जुन पाहावा असाच आहे.


पेमगिरी पाहून बामनवाडा - ओतुर - माळशेज कल्याणमार्गे डोंबिवलीला पोहोचायला रात्रीचे ९ वाजले.

ट्रेकला मिसळ हवीच 

डुबेरगड, आडगड, पट्टा, अवंधा आणि बितनगड हे पाच किल्ले २ दिवसात सहज पाहाता येतात. डुबेरगड, बर्वेवाडा, आड आणि पट्टा पाहून पट्ट्यावर मुक्काम करावा. दुसर्‍या दिवशी अवंधा आणि बितनगड किल्ले पाहाता येतात. (यातील आड आणि अवंधा या किल्ल्यावर कातळटप्पे (रॉक पॅच) चढावे लागतात) सोबत टाहाकारीचे मंदिर आणि टाकेदचे जटायु मंदिरही या सोबत पाहाता येईल. त्यासाठी खाजगी वहान असणे आवश्यक आहे. जुलै ते फ़ेब्रुवारी हा काळ या ट्रेकसाठी योग्य काळ आहे.    (यावर वेगळा ब्लॉग लिहिलेला आहे. वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा... )


   



Sunday, February 25, 2018

स्वराज्याची तिसरी राजधानी :- जिंजी Ginjee Fort (Rajagiri, Krishnagiri, Chandrayan Durg)



Rajagiri Fort (Ginjee Fort)


राजगड, रायगड या किल्ल्यांनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी तामिळनाडुतील जिंजी होती हेच बर्याच जणांना माहिती नसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीमेत इसवीसन १६७७ मध्ये जिंजी किल्ला जिंकून घेतला. . संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर मोघलांनी रायगडाला वेढा घातला. एप्रिल १६८९ ला रायगडावरुन निघालेले . राजाराम महाराज मोगल सैन्याला हुलकावणी देत तर कधी दोन हात करत नोव्हेंबर १६८९ ला जिंजीला पोहोचले. जिंजी या भक्कम बेलाग किल्ल्याला आपली राजधानी बनवून त्यांनी २६ डिसेंबर १६९८ पर्यंत वर्षे राज्यकारभार पाहीला. अशा या आपल्या तिसर्या राजधानालीला म्हणजेच जिंजी किल्ल्याला भेट देण्यासाठी चेनै गाठावे लागते.


शिलाखंडांवर बांधलेली दगडांची तटबंदी आणि त्यावरील वीटांनी बांधलेल्या चर्या 
जिंजीला जायचे ठरल्यावर जिंजी संबंधीची माहिती मिळेल तेथून वाचायला सुरुवात केली. त्यावरुन लक्षात आले की, जिंजीचा आवाका खूपच मोठा आहे आणि त्याची व्यवस्थित भटकंती करायची तर किमान दोन दिवस आवश्यक आहेत. त्याप्रमाणे भटकंतीची आखणी केली आणि तिकीट बुक केली. जिंजी हे बर्यापैकी मोठ गाव असले तरी तिथे राहाण्यासाठी हॉटेल्स दोन तीनच आहेत. त्यातील एकच हॉटेलशिवन”, "Makemytrip" वर सापडल. रेट जरा जास्त होते पण मोठा प्रवास आणि दिवसभरची किल्ल्याची भटकंती केल्यावर अनोळखी प्रदेशात पाठ टेकायला निवांत जागा पाहिजे. त्यामुळे नेहमीचा डायरेक्ट जाऊन धडकण्याचा शिरस्ता सोडून ऑनलाईन हॉटेल बुक केल. Makemytrip कडून कन्फ़र्मेशनचा ईमेल आला. त्या पाठोपाठ हॉटेलच्या मालकाकडून मला मेल आला. हा ईमेल अर्थात Makemytrip केलेला पण मला सी सी केलेला. त्यात त्याने म्ह्टल होते की, बुकींग हॉटेलकडून कन्फ़र्म नाही, कारण Makemytrip ने त्यांच्या साईट्वर दाखवलेल्या रेट पेक्षा आमचे रेट जास्त आहेत आणि ते आम्हाला मिळाले तरच बुकींग कन्फ़र्म होईल. अशा वेळी त्रागा करण्यात काही अर्थ नसतो. मी हॉटेलच्या मालकाला रिप्लाय लिहिला, मी महाराष्ट्रातून तुमच्या गावातला सुंदर किल्ला पाहायला येतोय, तरी तुमच्यातला वाद मिटवून माझी गैरसोय होणार नाही अस बघा. दुसर्या दिवशी त्याचा मला रिप्लाय आला. तुम्ही निश्चिंतपणाने जिंजीला या तुमच स्वागत आहे. तुम्हाला आमच्या किल्ल्याची माहिती किठून मिळाली? मला तुम्हाला भेटायला आवडेल. चला एक प्रॉब्लेम सुटला म्हणता म्हणता इंटरनेटवर शोधताना एक गोष्ट कळली, की किल्ला पाहाण्याची वेळ ते असली तरी वाजल्या नंतर किल्ल्यावरुन परत खाली पाठवतात. हे कळल्यावर चैनैहून बसने जायचा विचार रद्द करुन कार बुक केली आणि आमची वेळे बरोबर शर्यत सुरु झाली. चेनैला सकाळी पोहोचलो. गाडीवाल्याला थेट नाश्त्यासाठी न्यायला सांगितले. चेनै बाहेरच्या हायवे वरच्या एका हॉटेलात त्याने नेले. आज दिवसभर किल्ला पाहायचा असल्याने जेवणाला सुट्टी होती त्यामुळे दाबून नाश्ता केला. हॉटेल मध्ये वेगवेगळ्या डोशांचे मोठ्ठे फ़ोटो लावलेले भाषा कळत नसल्याने त्या फ़ोटोंकडे बोट दाखवून ते सगळे मागवून खाल्ले. त्यावर काफ़ी प्यायलो. आमचा खाण्याचा आवाका पाहून काफ़ी प्यायल्यावरही अजून काही हवय का ? अस वेटरने नम्रतेने विचारल.(महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला आहे, अस तो त्यानंतर सर्वांना सांगत सुटला असावा.) . जिंजीला तासभरात पोहोचलो हॉटेलात सामान टाकून थेट किल्ला गाठला.       


३ नंतर किल्ल्यावर प्रवेश नाही.

किल्ला प्रवेशाच्या वेळा 


चेनै पासून १६० किलोमीटरवर जिंजी गाव आहे. गावाच्या बाहेर साधारणपणे एक किलोमीटवर तीन किल्ले आहेत, राजगिरी (राजाचा किल्ला), कृष्णगिरी (राणीचा किल्ला) आणि चंद्रायनदुर्ग ( चक्कीली दुर्ग) या तीन किल्ल्यांचा मार्गात येणार्‍या काही टेकड्यांचा मिळुन जिंजीचा किल्ला बनलेला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याची तटबंदी काही टेकड्यांना कवेत घेऊनच पुढे जाते. त्यामुळे काही कागदपत्रात जिंजीचा किल्ला ६ किल्ल्यांचा मिळून बनलेला आहे असे उल्लेख आहेत. छ. शिवाजी महाराजांनी जिंजीचा किल्ला जिंकल्या नंतर त्या प्रदेशातील इतर चौक्या, ठाणी तोडून फ़क्त किल्ल्याला बळकट करायचे ठरवले. त्यासाठी त्यांना किल्ल्याची तटबंदी तोडण्यासाठी सुरंग लावण्यात वाकबदार असणारे लोक हवे होते. मराठ्यांकडे असे लोक नसल्याने त्यांनी इंग्रजांकडे मागितले. इंग्रजांनी चालढकल केली पण सुरुंग लावणारी माणसे दिली नाहीत. महाराजांनी आपल्या माणसांकरवी किल्ला त्यांना हवा तसा बांधून घेतला. या संदर्भात पॉंडेचरीच्या गव्हर्नरने लिहिलेल्या वृतांतात तो म्हणतो, " शिवाजीने जुन्या किल्ल्याची तटबंदी पाडून , नविन तटबंदी आणि बुरुज बांधून घेतले. नैसर्गिकपणे बेलाग असलेला हा किल्ला त्यामुळे युध्दातही जिंकणे कठीण जाईल ". 

कृष्णगिरी किल्ला ते राजगिरी आणि चंद्रायन दुर्गा पर्यंत जाणारी तटबंदी आणि खंदक 
जिंजी गाव सोडल्यावर रस्त्याच्या बाजूला सर्वप्रथम राजागिरी पासून कृष्णगिरी किल्ल्यापर्यंत जाणारी तटबंदी आणि खंदक दिसतो. ही तटबंदी फ़ोडूनच NH-77 जिंजी-तिरुवन्नमलाई हा महामार्ग बनवलेला आहे. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला कृष्णगिरी किल्ला दिसतो. थोडे अंतर पुढे गेल्यावर राजागिरीचा किल्ला रस्त्याच्या डाव्या बाजूला दिसतो. या तिनही किल्ल्यांना दुहेरी तटबंदी आहे. एक तटबंदी तीनही किल्ल्यांना वेढते, तिची लांबी १३ किलोमीटर आहे. या तटबंदीने एकूण ११ स्क्वेअर किलोमीटर भूभाग व्यापलेला आहे. त्याशिवाय प्रत्येक किल्ल्या भोवती स्वत:ची वेगळी तटबंदी आहे. या तटबंदीला लागून ८० फ़ूट रुंद खंद्क आहे. किल्ल्याचे तटबंदीची उंची १५ ते २० फ़ूट असून ती दगडांनी बांधलेली आहे. त्यावर फ़ूट उंचीच्या वीटांनी बांधलेल्या चर्या आहेत. तटबंदी , बुरुज आणि चर्यांमध्ये जागोजागी जंग्या ठेवलेल्या आहेत

राजगिरी

   राजागिरी किल्ल्याचा डोंगर दुरवरुन बसलेल्या हत्ती सारखा दिसतो. राजगिरी किल्ल्याला स्थानिक लोक "राजाचा किल्ला" म्हणुन ओळखतात. या किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत. पुरातत्व खात्याने हा किल्ला आणि परिसर व्यवस्थित राखलेला आहे. जिंजीच्या राजागिरी, कृष्णगिरी, चंद्रायनदुर्ग (चक्कीली दुर्ग) आणि इतर छोट्या मोठ्या टेकड्याना कवेत घेणाऱ्या तटबंदीत वेल्लोर आणि पॉंडिचेरी ही दोन प्रवेशद्वार आहेत. त्यातील वेल्लोर प्रवेशव्दार NH-77 जिंजी-तिरुवन्नमलाई महामार्गावर आहे. पण तेथून किल्ल्यात  प्रवेश करता येत नाही . तसेच पॉंडिचेरी गेट मधूनही किल्ल्यात प्रवेश करता येत नाही. किल्ल्यात जाण्यासाठी तटबंदी फोडून रस्ता बनवलेला आहे. किल्ल्याची बाहेरील तटबंदी आतील तटबंदी यांच्या मधून हा रस्ता थेट किल्ल्याच्या दुसर्या प्रवेशव्दारापर्यंत जातो. या रस्त्यावर डाव्या बाजूला एक पुरातन शिव मंदिर आहे . त्या मंदिरा भोवती हिरवळ आणि झाडे राखून बगिचा बनवलेला आहे. मंदिर पाहून रस्त्यावरुन किल्ल्याच्या प्रवेशव्दाराकडे जातांना उजव्या बाजूला आतील तटबंदीला लागून असलेला खंदक दिसतो. जिंजी गावा जवळुन वाहाणार्‍या संकरपरानी नदीचे पाणी एकेकाळी या खंदकात खेळवलेले होते.
 
किल्ल्याच्या आतील तटबंदीत ठराविक अंतरावर बुरुज आहेत. याच बरोबर तटबंदीवर जागोजागी असलेले कॅप्सुल बुरुज आपले लक्ष वेधून घेतात. फ़्रेंचांच्या ताब्यात हा किल्ला असताना त्यांनी हे बुरुज बांधले असावेत. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला तटबंदीत किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. सध्या या दरवाजातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. या दरवाजा समोर  "साद अल उल्लाखान मशिद आहे". मशिदीच्या बाजूलाच पार्कींग एरिया आहे. तिथून पुढे जाणारा रस्ता पॉंडिचेरी प्रवेशव्दाराकडे आणि व्यंकटरामण मंदिराकडे जाते. पण तिकडे जाता आधी आपला मोर्चा किल्ल्याकडे वळवावा. खंदकावर बांधलेल्या पक्क्या पुलावरुन आपला किल्ल्यात प्रवेश होतो. याठिकाणी पुरातत्त्व खात्याची चौकी आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी १५/- रुपये प्रवेश शुल्क भरावे लागते. याच तिकिटात राजागिरी आणि कृष्णगिरी हे दोन किल्ले एका दिवसात पाहाता येतात. ऱाजागिरी किल्ल्याची प्रवेशव्दारे सकाळी वाजता उघडतात आणि संध्याकाळी वाजता बंद होतात, पण दुपारी वाजल्यानंतर किल्ल्यावर जाता येत नाही. ( किल्ल्याचा परिसर खुप मोठा आहे, तसेच किल्ल्याचा काही भाग वनक्षेत्रात येतो. त्यामुळे हा नियम करण्यात आलेला आहे.)

किल्ल्यावरील सर्व दरवाजे आयताकृती आहेत

प्रवेशव्दाराच्या आत पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत.
किल्ल्यावरील सर्व दरवाजे आयताकृती आहेत. कमान असलेला एकही दरवाजा येथे नाही. दुसऱ्या दरवाजातून आत शिरल्यावर काटकोनात तिसरा दरवाजा आहे. याठिकाणी पुरातत्त्व खात्याने किल्ल्याच्या परिसरात मिळालेल्या मुर्तींचे प्रदर्शन उघड्यावरच भरवलेले आहे. ते पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक कोरडी विहीर आहे. विहिरीच्या मागील बाजूस उंचावर एक सुटा गोल बुरूज आहे. उंचावरील स्थानामुळे तिन्ही दरवाजांवर टेहळणीसाठी या बुरुजाचा उपयोग होतो. किल्ल्याचा तिसरा दरवाजा ओलांडून किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा आवाका आपल्या ध्यानात येतो. राजागिरी किल्ला टप्प्यात पसरलेला आहे. पहिल्या टप्प्यात मैदानी भाग असून त्यावर सात मजली मंगल महाल, धान्य कोठारे, दारु कोठार, अश्वशाळा, सदर इत्यादी महत्वाच्या वास्तू आहेत. या सर्व वास्तू भव्य आहेत. याशिवाय या भागात दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्याच्या दुसरा टप्पा डोंगराचा आहे. हा डोंगर म्हणजे प्रचंड आकाराच्या खडकांची उतरंड आहे. एकमेकांवर रचून ठेवल्या सारख्या दिसणार्या या खडकांमधील माती पावसामुळे कधीकाळी वाहून गेलेली आहे. त्यामुळे या टप्प्यात तुरळक झाडे आहेत. तामिळनाडूच्या गरम आणि दम वातावरणात हा टप्पा चढून जाणे म्हणजे आव्हान आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते फ़ेब्रुवारी हा काळ किल्ला पाहाण्यासाठी उत्तम आहे. अर्थात याकाळातही उन्हाचा तडाखा जाणवतोच. किल्ल्याच्या दुसर्या टप्प्यात खडक फ़ोडून केलेली वाट खडकांच्या आधाराने बांधलेली तटबंदी आणि त्यातील दरवाजे आहेत. हा टप्पा चढून गेल्यावर माची सारखा सपाट भाग लागतो. या ठिकाणी भरपूर झाडी आहे. या सपाटीचा उपयोग करुन या ठिकाणी मंदिरे, वाडे आणि तलाव बांधलेले आहेत. किल्ल्याचा शेवटचा टप्पा म्हणजे बालेकिल्ला हा एका मोठ्या नैसर्गिक खंदकाने किल्ल्यापासून वेगळा झालेला आहे. त्यावर पक्का पुल बनवलेला आहे. या पुलावरुन बालेकिल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशव्दारे आहेत. अशाप्रकारे पायथ्यापासून बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी एकूण १३ प्रवेशव्दारे पार करावी लागतात.

किल्ल्याचा चौथा दरवाजा आणि त्यामागिल चौकोनी सुटा बुरुज
किल्ल्याचा चौथा दरवाजा पार केल्यावर उजव्या बाजूला सुटा चौकोनी बुरूज आहे. या बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. बुरुजावर चढून गेल्यावर मध्यभागी तोफ गोल फिरवण्यासाठी जो लोखंडी रुळ (रॉड)बसवतात त्यासाठी बनवलेला खड्डा दिसतो. या ठिकाणी एकेकाळी तोफ असावी. चौथ्या दरवाजातून आत आल्यावर समोरच मंदिरासारखा कळस असलेला सात मजली कल्याण महाल आपले लक्ष वेधून घेतो. कल्याण महाल ही किल्ल्यातील सर्वात सुंदर वास्तू आहे. या वास्तूत प्रवेश करण्यासाठी छोटे प्रवेशव्दार आहे. आत गेल्यावर चहूबाजूंनी कमानदार ओवऱ्या आहेत. मधल्या भागात मोठ्या पुष्कर्णी सारखी रचना केलेली आहे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यावर ठरावीक अंतरावर पाणी येण्यासाठी बसवलेले पाईप दिसतात. जवळच्या तलावातून या पुष्कर्णीत पाणी आणले जात असावे. पुष्कर्णीच्या मध्यभागी एक चौथरा बांधलेला आहे. सुदैवाने मंगल महालाचे सातही मजले चढून जाता येतात. प्रत्येक मजल्यावर कमानदार हवेशीर खोल्या आहेत. महालाच्या गच्चीवरून दुरवरचा प्रदेश दिसतो. समोरच राजागिरी किल्ल्याचा डोंगर दिसतो. डाव्या बाजूला चक्कीली दुर्ग तर मागच्या बाजूला दुरवर कृष्णगिरी किल्ला दिसतोमंगल महालाच्या मागच्या बाजूला महाबतखानाची मशीद आहे. मोगलांच्या काळात ही मशिद बांधली गेली. मशिदीच्या पुढील बाजूस हत्ती खाना आणि घोड्यांचा पागा (तबेला) असलेली इमारत आहे. या इमारतीच्या काटकोनात कचेरीची आणि त्याला लागुन महालाची दोन मजली इमारत आहे. या (L) एल आकारात असलेल्या इमारतीं मधील प्रशस्त भागात सदर असावी. याठिकाणी महाला समोर एक उंच चौथरा आहे . त्या चौथऱ्यावर एक मोठा दगडी लोड ठेवलेला आहे. या चौथर्यावर चढण्यासाठी पायर्या आहेत. राजा या चौथर्यावर बसत असावा. या चौथर्या समोर काही अंतर सोडून पायर्यांसारखी रचना केलेली आहे. ही इतर दरबारी व्यक्तींना बसण्यासाठी केलेली सोय असावीहा सर्व भाग पाहून किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला दिसणाऱ्या इमारतींकडे जावे. या भागात मोठे वृक्ष आहेत. त्या भोवती पार बांधून बसायची सोय केलेली आहे. या परीसरात हिरवळ राखलेली आहे. याठिकाणी पाण्याचा नळ आहे. किल्ल्यावर सध्या असलेली पिण्याच्या पाण्याची ही एकमेव सोय असल्याने इथे पिण्याचे पाणी भरून घ्यावे. स्थानिक पर्यटक किल्ल्याच्या या भागापर्यंतच येतात. प्रत्यक्ष किल्ल्यावर फारच थोडे लोक जातात.

कल्याण मंगल महाल

कल्याण मंगल महाल

कमानदार ओवऱ्या कल्याण मंगल महाल

पुष्कर्णी, कल्याण मंगल महाल

हत्ती खाना आणि घोड्यांचा पागा (तबेला)

           
सदर आणि दगडी लोड

किल्ल्याच्या या भागात गजपृष्ठाकार छत असलेल्या धान्य कोठारांच्या इमारती आहेत. भव्य आणि प्रशस्त असलेल्या या कोठारात धान्य साठवण्यासाठी वेगवेगळी दालने आहेत. धान्यकोठारांच्या समोरच्या दारुकोठार आहे. त्याच्या बाजूला व्यायामशाळा आहे. या वास्तूच्या मागे एक सुंदर तलाव आहे. या तलावाला "हत्ती तलाव" या नावाने ओळखले जाते. तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आणि छोटेखानी प्रवेशद्वार आहे. तलाव पाहून पुढे गेल्यावर तटबंदी डोंगराला भिडते त्याठिकाणी तटबंदीच्या बाहेर 2 तलाव आहेत. डोंगरावरून वहात येणारे पाणी अडवून हे तलाव तयार केलेले आहेत. या तलावांकाठी अंजनेयाचे (मारुती) मंदिर आणि काली अम्मन मंदिर आहे. हे तलाव आणि मंदिर पाहाण्यासाठी किल्ल्याच्या बाहेर पडून व्यंकटरामण मंदिराच्या पुधे जाणार्‍या रस्त्याने जावे लागते. त्यामुळे संपूर्ण किल्ला पाहून झाल्यावर सर्वात शेवटी हा भाग पाहावा.

धान्य कोठार

धान्यकोठार आतील एक दालन 
          
हत्ती तलाव


   
धान्य कोठार आणि इतर इमारतींजवळ किल्ल्याचा सपाटीवरचा भाग संपतो. समोर किल्ल्याचा डोंगर उभा असतो. प्रचंड मोठे शिलाखंड एकमेकांवर रचून बनवल्या सारखा दिसणाऱ्या या डोंगरावर शिलाखंड फोडून किल्ला बनवावा ही अचाट कल्पना ज्या कोणाला सुचली त्याला मानायलाच हवेहे मोठे मोठे शिलाखंड फोडण्यासाठी कोणतेही आधुनिक अवजारे आणि तंत्र त्याकाळी उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आपल्या पारंपारिक ज्ञानाचा वापर करुन हे शिलाखंड फोडून किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता तयार केला त्याचबरोबर किल्ल्याची तटबंदी , बुरुज , महाल , कोठारे , मंदिरे बांधून काढलेली आहेतमोठमोठे दगड सरळ रेषेत / काटकोनात तोडण्यासाठी त्या दगडावर छिन्नीने अंदाजे  सेंटीमीटर रुंद  x सेंटीमीटर लांब आणि सेंटीमीटर खोल खाचा तयार केल्या जात असत. दोन बाजूबाजूच्या खाचा मधले अंतर साधारणपणे सेंटीमीटर  ठेवलेले असते. या खाचाममध्ये लाकडाची पाचर घट्ट बसवली जात असे. या पाचरीवर पाणी ओतले जाई. पाण्यामुळे लाकडाची पाचर फ़ुगत असे (प्रसरण पावत असे) आणि त्याच्या दबावामुळे दगड तुटून पडे. अशा प्रकारे तोडलेले दगड आपल्याला किल्ल्यावर जागोजागी पाहायला मिळतात. त्याच बरोबर अपूर्ण राहीलेले दगडही पाहायला मिळतात.


प्रचंड मोठे शिलाखंड एकमेकांवर रचून बनवल्या सारखा दिसणारा डोंगर

पाचवा दरवाजा 

दगड फ़ोडण्यासाठी दगडावर छिन्नीने केलेल्या खाचा 


         


   किल्ल्याचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर २५ पायऱ्यानंतर किल्ल्याचा पाचवा दरवाजा आहे. दरवाजाच्या बाजूला चौकोनी बुरुज आहेत . दरवाजाच्या आत पाहारेकर्यांसाठी देवड्या आहेत . थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर पाचव्या दरवाजाच्या काटकोनात सहावा दरवाजा आहे. या दरवाजा नंतर खडा चढ आहे. तो चढून गेल्यावर किल्ल्याचा सातवा दरवाजा आहे. सातवा दरवाजा पार केला की उजव्या बाजूला तोफ आहे. या ठिकाणाहून किल्ल्याचा परिसर सुंदर दिसतो. खालच्या बाजूला कल्याण महाल आणि इतर इमारती, डावीकडे कृष्णगिरी आणि राजगिरीपासून कृष्णगिरी पर्यंत गेलेली दुहेरी तटबंदी आणि खंदक पाहायला मिळतो. याठिकाणी थोडा विसावा घेऊन पुढे जावे कारण आपण आता किल्ल्याच्या विरूध्द बाजूला जाणार असतो. तोफेच्या मागेच किल्ल्याचा आठवा दरवाजा आहे . हा दरवाजा पार करून पायऱ्या चढून पुढे गेल्यावर सपाटी चालू होते. याठिकाणी उजव्या बाजूला कड्याखाली कमलाकन्नी अम्मन मंदिर आहे. मंदिर पाहून परत पायवाटेवर येउन पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक छोटे मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेर गणपतीच्या दोन मुर्ती आहेत. त्यांना दक्षिण भारतीय पध्दतीने पांढरे आणि रंगीत काठ असलेले धोतर नेसवलेले आहे. मंदिराच्या मागे असलेल्या कातळभिंतीवर देवीचे सुंदर चित्र काढलेले आहे. मंदिरा समोर एक आडवा दगड आहे. कुंकवाने माखलेल्या या दगडावर मध्यभागी रेड्याचे तोंड आणि दोन्ही त्रिशुळ, बाजूला धनुष्य आणि बाण कोरलेले आहेतहा रेड्याला बळी देण्याचा दगड असावा. या मंदिराच्या बाजूला झाडीत उघड्यावर शंकराची पिंड आहे.

      या मंदिरासमोर पायवाटेवर वनखात्याचा बंदुकधारी गार्ड बसलेला असतो. कारण येथून एक पायवाट चक्कीली दुर्गावर जाते. तो सध्या अभयारण्याचा भाग असल्याने तेथे जाण्यास मनाई आहे. हाच गार्ड वाजायला आले की किल्ल्यावर गेलेल्या सर्वाना शोधून खाली पाठवतो.

 
बांधीव तलाव

रेड्याला बळी देण्याचा दगड

    
पायवाटेवरुन पुढे जाताना डाव्या बाजूला एक बांधीव तलाव आहे. झाडीत लपल्यामुळे तो पटकन दिसत नाही. तलावाच्या पुढे वाडे आहेत. या भागात जंगल माजलेले असल्याने जास्त पुढे जाता येत नाही. वाडे पाहून परत पायवाटेवर यावे. आता सपाटी संपून पुन्हा चढ चालू होतो. पायऱ्याचा रस्ता एक यु (U) टर्न घेउन पुढे चढत जातो. याठिकाणी किल्ल्याचे नऊवे प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या वरचा भाग विटानी बनवलेला आहे. त्याला चुन्याने गिलावा करुन त्यावर नक्षी बनवलेली आहे . त्यामुळे इतर दरवाजामध्ये हा दरवाजा उठून दिसतो. या दरवाजाच्या कडे तोंड करुन उभे राहील्यावर उजव्या बाजूला बाजूला जो कातळकडा आहे त्याचा आकार आम्हाला हनुमंताच्या तोंडासारखा दिसला. नववा दरवाजा पार केल्यावर एका मोठ्या दगडावर हनुमंताची मुर्ती कोरलेली आहे.

नऊवे प्रवेशव्दार वरच्या बाजूला हनुमंताच्या तोंडा सारखा आकार असलेला खडक
  
नऊव्या प्रवेशव्दारावरील नक्षी


दगडावर कोरलेला हनुमान


पायऱ्याच्या वाटेने यु (U) टर्न घेउन पुढे चढत गेल्यावर किल्ल्याचा दहावा दरवाजा लागतो. सपाटी नंतरचा सलग चढ चढून दमल्याने इथे थोडा वेळ विश्रांती घ्यावी . हा दरवाजा ओलांडला की वाट खाली उतरायला लागते . या ठिकाणी तिहेरी तटबंदी आहे . पायऱ्यांच्या डाव्या बाजूला म्हणजेच दरीच्या बाजूला, पायऱ्यांच्या उजव्या बाजूला आणि त्यापुढे असलेल्या शिलाखंडावर अशी तीन टप्प्यांवर तटबंदी बांधलेली आहे. शिलाखंड आणि पायऱ्यांच्या बाजूला असलेली तटबंदी यामध्ये एक कोरडा बांधिव तलाव आहेवाटेचा उतार थांबल्यावर परत वाट वळते आणि चढायला सुरुवात करते. साधारणपणे ५० पायऱ्या चढल्यावर आपण किल्ल्याच्या अकराव्या प्रवेशव्दारापाशी येतो. या ठिकाणी प्रवेशव्दारालगत तटबंदीवर कॅप्सुल बुरुज आहे. या बुरुजाकडे जाणारी वाट एका कमानीतून जाते. दरवाजा पार केल्यावर वाट पुन्हा वळते आता आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूला आलेलो असतो .या ठिकाणी एक सुटा बुरुज आहे. टेहळणीसाठी या बुरुजाचा उपयोग होत असावाखाली दुरवर NH-77 जिंजी-तिरुवन्नमलाई महामार्ग दिसतो. येथून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी एक जीना बांधलेला आहे . खड्या चढणीचा हा जीना चढल्यावर समोर एक पुल दिसतो. बालेकिल्ला आणि किल्ल्याचा इतर भाग यामध्ये याठिकाणी नैसर्गिक खोल खाच आहे. बालेकिल्ल्याचा भाग सरळसोट कातळकड्यानी बनवलेला असल्याने पुल ओलांडल्या शिवाय बालेकिल्ल्यावर प्रवेश मिळणे शक्य नाही. कदाचित पूर्वीच्या काळी येथे उचलता येणारा पुल असावा. पुल पार केल्यावर समोरच किल्ल्याचा बारावा  दरवाजा आहे . काही पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याचा तेरावा दरवाजा लागतोहा दरवाजा पार केला की आपला किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर प्रवेश होतो. किल्ल्याचा माथ्यावर अनेक वास्तू आहेत. धान्यकोठार, जवाहिरखाना, दारु कोठार, मजली महाल, रंगनाथ मंदिर, तोफ़ आणि इतर वास्तू गड माथ्यावर आहेत. ऱंगनाथ मंदिरात कोणतीही मुर्ती नाही. राजागिरी हा या भागातील सर्वोच्च डोंगर असल्याने त्यावरुन दूरवरचा प्रदेश, कृष्णगिरी आणि चंद्रायन दुर्ग हे किल्ले दिसतात.

अकरावे प्रवेशव्दार 

बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बांधलेला जीना 

बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी नैसर्गिक खाचेवर बांधलेला पुल

रंगनाथ मंदिर

 मजली महाल



            पायथ्यापासून सर्व वास्तू, प्रवेशद्वारे व्यवस्थित पाहात गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी ते तास लागतात. किल्ला पाहून आल्या मार्गाने खाली उतरावे. किल्ला उतरताना चंद्रायन (चक्कीली) दुर्गाच्या पायथ्याशी दक्षिणी पध्दतीचे गोपूर असलेले व्यंकटरामण मंदिर आपल्याला खुणावत असते. त्या मंदिरात जाण्यासाठी किल्ल्याच्या दुसर्या प्रवेशव्दारातून बाहेर पडावे लागते. व्यंकटरमणा मंदिराला भेट द्यावी, तेथून पुढे गेल्यावर पॉंडिचेरी दरवाजा  आहे. तो पाहील्यावर किल्ला पाहून होतो. किल्ल्याचा वेल्लोर दरवाजा पहाण्यासारखी पुन्हा NH-77 जिंजी-तिरुवन्नमलाई महामार्गावर यावे लागते. महामार्गावरुन  वेल्लोरच्या दिशेने चालत गेल्यावर साधारणपणे १५ मिनिटांनी डाव्या बाजूला एक पायवाट वेल्लोर दरवाजापाशी जाते.

व्यंकटरामण मंदिर
चंद्रायन दुर्गाच्या पायथ्याशी असलेला तलाव 

चंद्रायन दुर्गावरील अवशेष

चंद्रायन दुर्ग खरतर राजागिरीला खेटून आहे. राजागिरी चढतांना त्यावरील वास्तू स्पष्ट दिसतात. पण हा किल्ला वनखात्याच्या अख्यातरीत असल्याने त्यावर प्रवेशबंदी आहे. त्यामुळे हा किल्ला आपल्याला पाहाता येत नाही. या किल्ल्यावर स्थानिक तांत्रिकपंथाच्या लोकांचे देऊळ असल्याने जाण्यास बंदी आहे, अशी माहितीही कळली. तिकिट खिडकी वरच्या पूरातत्व खात्याच्या माणसाला विचारले पण त्यालाही काही सांगत आले नाही. 

दिवसभर किल्ला पाहून घामाने आंघोळ झाली होती आणि अंगावर धुळीची पुट चढली होती . हॉटेलवर जाऊन स्वच्छ आंघोळ केली. त्यानंतर भुकेची जाणीव तीव्रतेने व्हायला लागली . जेवणाला अजून वेळ होता. त्यामुळे हलका नाश्ता करायचा विचार केला. हॉटेलच्या थोड पुढे बस स्थानक होते. बस स्थानका जवळ एखाद वाहात हॉटेल असतच. लोकांची कायम ये जा असल्याने अशा ठिकाणी ताजे गरम पदार्थ पण मिळतात. या व्याख्येत बसणारे "हॉटेल वसंत" जिंजी बस स्थानका समोर आहे. इडली, वडे, डोसे काफी आणि अनलिमिटेड सांबार चटणी इथे मिळते . याशिवाय उत्तम साउथ इंडीयन आणि बंगाली मिठाई इथे मिळते. त्याचा यथेच्छ आस्वाद घेउन गावात फेरफटका मारला . किल्ल्याबद्दची पुस्तक मिळतात का पाहीले . बऱ्याच ठिकाणी स्थानिक लेखकानी लिहीलेली किल्ल्यांवरची पुस्तके असतात. त्यात वेगळी माहिती मिळते . इथे भाषेचा खुप मोठा प्रॉब्लेम होता. तरी दोन दुकान मिळाली पण त्यातली पुस्तक तामिळमध्ये असल्याने काही कळण्याची शक्यता नव्हती . किल्ल्याचा नकाशा असता तरी पुस्तक घेतल असत पण तोही नव्हता.

         

चिकन चेट्टीनाड बरोबर भला मोठा डोसा.
रात्री हॉटेलला लागूनच असलेल्या अन्नपूर्णा रेस्टॉरंट मध्ये गेलो . तिथे सकाळी बिर्याणीचा बोर्ड पाहीला होता . पण टेबलावर बसल्यावर कळल बिर्याणी सकाळीच मिळते. मग चिकन चेट्टीनाड विथ डोसा मागवला. वेटरने टेबलावर डायरेक्ट केळीच आडव पान पसरल. त्यावर चिकन चेट्टीनाड बरोबर राक्षसी तव्यावर बनवलेला भला मोठा डोसा. एका डोशातच गार झालो. अप्रतिम चवीच चिकन आणि सोबत डोसा आनि अनलिमिटेड चटणी आणि सांबार, मग काय विचारता आडवा हात मारला ..... दिवसाचा शेवट रसपूर्ण झाला .



कृष्णगिरी किल्ला


कृष्णगिरी किल्ला

कृष्णगिरी किल्ला पायथ्याचा तलाव




किल्ल्यावरील सर्व दरवाजे आयताकृती आहेत




सकाळी उठल्यावर कृष्णगिरीचा पायथा गाठला. किल्ल्याचे तिकिट काउंटर अजून उघडले नव्हते. तिथे असलेल्या रखवालदाराशी गप्पा मारल्या . तो मिल्ट्रीतून निवृत्त झाल्याने त्याला बऱ्यापैकी हिंदी येत होते. कृष्णगिरीचा डोंगरही मोठ मोठे शिलाखंड एकमेंकांवर रचून तयार केल्यासारखा आहे. त्यातूनच पायऱ्या काढलेल्या आहेत. किल्ल्यावर दगडांची रासच असल्याने झाड जवळजवळ नाहीतच. किल्ल्याच्या पायथ्याशी एक तळ आहे . ते पाहून किल्ला चढायला सुरुवात केली मिनिटात पहिल्या प्रवेशद्वारापाशी आलो. या प्रवेशव्दारा अगोदर एका उंच खडकावर सुटा गोल बुरुज आहे . या बुरुजावर तोफ फिरवण्यासाठी असलेल्या रॉडसाठी केलेली केलेली खाच पाहायला मिळते. या बुरुजाच्या पुढे किल्ल्याच्या उजव्या बाजूने तटबंदी बालेकिल्ल्यापर्यंत नेलेली आहे. ही तटबंदी थेट राजागिरी किल्ल्यापासून सुरु होते आणि पूर्ण फिरुन तिन्ही किल्ल्याना कवेत घेते. या तटबंदीच्या बाजूने किल्ल्याच्या पायथ्या पासून वर पर्यंत पायऱ्या आहेत. तटबंदीची डागडूजी करण्यासाठी, टेहळ्यांसाठी  आणि पर्यायी मार्ग म्हणून या पायऱ्या बांधल्या असाव्यात. या पायऱ्या जागोजागी तुटल्यामुळे सध्या तेथून जाता येत नाही. पहील्या प्रवेशव्दारापाशी विश्रांती घेउन पुढे चढाई चालू केल्यावर दहा मिनिटात दुसरे प्रवेशद्वार येते. या किल्ल्याची प्रवेशव्दार आयताकृती आहेत. त्याना कमानी नाहीत आणि बाजूला बुरूजही नाहीत. पण दरवाजांच्या आतल्या बाजूस देवड्या आहेत. दुसरा दरवाजा पार केला की खडा चढ चालू होतो. १० मिनिटात आपण तिसऱ्या दरवाजापाशी पोहोचतो. या प्रवेशव्दारावरच एक कॅप्सुल बुरूज आहे. तिसरे प्रवेशद्वार पार केले की पुन्हा खडा चढ चढून आपण किल्ल्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दरवाजात दाखल होतो. याठिकाणी देवड्यांच्या खांबावर कोरीवकाम केलेले आहे. त्यात एक हनुमंताची मुर्ती कोरलेली आहे

श्रीकृष्ण मंदिर

श्रीकृष्ण मंदिर

कृष्णगिरी चौथे प्रवेशव्दार आणि बालेकिल्ल्यावरील इमारती





चौथा दरवाजा पार केल्यावर आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो. याठिकाणी बऱ्याच वास्तू आहेत.  समोरच धान्यकोठार आहे. त्याच्या वरच्या बाजूस रंगनाथ मंदिर आहे . मंदिराच्या खांबावर सुंदर मूर्ती आणि नक्षी  कोरलेली  आहे. पण नेहमी असतात तशा उठावदार मुर्ती येथे पाहायला मिळत नाहीत. मंदिराच्या गाभाऱ्यात कोणतीही मुर्ती नाही . मंदिरात असलेल्या जिन्याने वर चढून जातांना काही भित्ती चित्रे काढलेली पाहायला मिळतात. वरच्या बाजूला कृष्ण मंदिर आहे. मध्यभागी मंदिर आणि चारही बाजूने अनेक खांब असलेल्या ओवऱ्या अशी रचना येथे केलेली आहे . श्रीकृष्ण मंदिरातही मुर्ती नाही . मंदिरातून बाहेर पडल्यावर समोरच एक सुंदर महाल दिसतो त्याला मंगल महाल या नावाने ओळखातात. किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर हा हवा महाल उभारलेला आहे . यातील सर्वात वरच्या मजल्याला सर्व बाजूनी छोट्या मोठ्या कमानदार खिडक्या आहेत. खिडक्यांना पडदे लावण्यासाठी दोन्ही बाजूला लोखंडी कड्या बसवलेल्या आहेत . हवा महालाच्या मध्यभागी गोल दगडी मंचक आहे . हवा महालातून एका बाजूला जिंजी शहर आणि दुसऱ्या बाजूला राजागिरी किल्ला आहे. हवामहालाच्या खालच्या मजल्यावर छताला झोपाळे लावण्यासाठी बसवलेल्या लोखंडी  कड्या आहेत. हवा महालाच्या बाजूला एक बांधिव हौद आहे. पुढे गेल्यावर दरबार हॉलची वास्तू आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पाहाण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत .

हवा महाल





कृष्णगिरी किल्ला पूर्ण पाहाण्यासाठी तास पुरतात. तिसरा किल्ला चंद्रायन दुर्ग हा किल्ला अभयारण्य क्षेत्रात असल्याने किल्ल्यावर जाण्याची परवानगी मिळत नाही. आपल्याकडे दुसरा दिवसाचा बराच वेळ शिल्लक राहीलेला असतो. त्याचा सदुपयोग करायचा असल्यास चेनैला परत जाता ९० किमी वरील वेल्लुर गाठावे. जिंजी बस स्थानकातून २१६ क्रमांकाची बस तसेच प्रायव्हेट बस वेल्लोरला जातात. वेल्लूरला भुईकोट किल्ला आहे. इसवीसन १६७७ मध्येच . शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला होता. किल्ल्याचा बराचसा भाग पोलिस खात्याच्या ताब्यात आहे. परंतु तटबंदीवरुन किल्ला व्यवस्थित फ़िरुन पाहाता येतो. किल्ल्यातील पुराण वस्तू संग्रहालय, जलकंदेश्वर मंदिर पाहाण्यासारखे आहे. पण त्याआधी पोटपूजा करुन घेणे आवश्यक होते. किल्ला पाहून पुन्हा हॉटेलवर परतलो. घामाने डबडबलेल्या आणि उन्हाने तापलेल्या शरीराला थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे आराम मिळाला आणि सपाटून भूक लागली. अन्नपूर्णा हॉटेल गाठले. काल बिर्याणी खायची राहीली होती. चिकन बिर्याणीची ऑर्डर दिल्यावर. वेटरने टेबलावर केळीचे आडवे पान अंथरले. चिकन बिर्याणी , दहीकांदा , टॅमोटो चटणी आणि पायसम आणून दिल्यावर जीव केळीच्या पानात पडला ...अजून काय हव आडवा हात मारला. तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने जिंजीचा निरोप घेतला.

चिकन बिर्याणी , दहीकांदा , टॅमोटो चटणी आणि पायसम


इतिहास :- इसवीसनाच्या नवव्या शतकात चोला राजघराण्याने याठिकाणी छोटासा किल्ला बांधला. तेराव्या शतकात हा किल्ला विजयनगर साम्राज्याच्या ताब्यात गेला. त्यांनी या किल्ल्याचा विस्तार केला. विजयनगर साम्राज्याची शकले झाल्यावर जिंजीच्या नायकाच्या ताब्यात हा किल्ला होता. पंधराव्या शतकात हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहाकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीमेत इसवीसन १६७७ मध्ये जिंजी किल्ला जिंकून घेतला. छ. संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे महाडीक यांच्याकडे कर्नाटक प्रांताची सुभेदारी होती. जिंजीच्या किल्ल्याच्या आश्रयाने त्यांनी म्हैसूर आणि मदुराईचा नायक यांच्याशी दोन हात केले. यांनी स्वराजाच्या सीमा थोड्याफ़ार वाढवल्या . त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मुघल महाराष्ट्रात धुमांकुळ घालत होते तेंव्हा त्यांनी हा प्रदेश मराठ्यांकडेच राहील याची काळजे घेतली. छ. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर मोघलांनी रायगडाला वेढा घातला. ५ एप्रिल १६८९ ला रायगडावरुन निघालेले छ. राजाराम महाराज मोगल सैन्याला हुलकावणी देत, तर कधी दोन हात करत २ नोव्हेंबर १६८९ ला जिंजीला पोहोचले. जिंजी या भक्कम बेलाग किल्ल्याला आपली राजधानी बनवून त्यांनी २६ डिसेंबर १६९८ पर्यंत ९ वर्षे राज्यकारभार पाहीला.

सप्टेंबर १६९० मध्ये झुल्फ़िकार खानाने जिंजीच्या किल्ल्याला वेढा घातला. त्यानंतर मराठ्यांचे मुघल सैन्यावर छापे घालणे, रसद तोडणे हे प्रकार सुरु झाले. धान्य टंचाईने हैराण झालेल्या झुल्फ़िकारखानाने डिसेंबर १६९४ मध्ये जिंजीचा वेढा उठवला आणि तो वांदिवॉश येथे गेले. मराठ्यांचा ससेमिरा त्याच्या मागे चालूच होता त्यामुळे १६९६ मध्ये झुल्फ़िकारखान अर्काट येथे आला.  ९ जून १६९६ रोजी छ. राजारम महाराज आणि तारराणी यांना जिंजी किल्ल्यावर मुलगा झाला त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. ८ नोव्हेंबर १६९७ रोजी  झुल्फ़िकारखानाने जिंजीला वेढा घातला. २६ डिसेंबर १६९७ रोजी छ.राजाराम महाराजांनी गुप्तपणे जिंजीचा किल्ला सोडला आणि वेल्लोरकडे गेले. जानेवारी - फ़ेब्रुवारी १६९८ मध्ये झुल्फ़िकारखानाने जिंजीचा किल्ला जिंकुन घेतला. औरंगजेबाने जिंजीचे नाव बदलून नुसरतगड ठेवले.  मुघलांकडून हा किल्ला कर्नाटकाच्या नवाबांकडे (अर्काटच्या नवाबांकडे) गेला. इसवीसन १७५० मध्ये जिंजीचा किल्ला फ़्रेंचांनी जिंकून घेतला. इसवीसम १७६१ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला फ़्रेंचाकडून जिंकून घेतला. त्यानंतर हा किल्ला हैदर अलीच्या ताब्यातही काही काळ होता. इसवीसनाच्या अठराव्या शतकात जिंजीचा किल्ला राजा स्वरुपसिंग बुंदेला याच्य ताब्यात होता. त्यानंतर त्याचा मुलगा तेजसिंग बुंदेला ( तो देसिंगु या नावाने प्रसिध्द होता) याच्या ताब्यात जिंजीचा किल्ला होता.



जिंजीचा किल्ला पाहाताना …..

ऱाजगिरी किल्ल्याची दारे सकाळी  वाजता उघडतात आणि संध्याकाळी  वाजता बंद होतात.किल्ल्यावर  वाजल्यानंतर प्रवेश दिला जात नाहीत्यामुळे सकाळीच किल्ला पाहायला सुरुवात  करावी. कृष्णगिरीचे प्रवेशव्दार सकाळी ९ वाजता उघडते आणि संध्याकाळी ५ वाजता बंद होते.  

या भागातील उन आणि आर्द्रता (ह्युमिडीटीयामुळे प्रचंड घाम येतोकिल्ल्याची प्रवेशद्वारे  लाउघडत असल्याने उन्हातच किल्ला चढावा लागतोत्यामुळे किल्ल्यात प्रवेश केल्यावर पायथ्याची ठिकाणे  पाहाता थेट किल्ला चढायला सुरुवात करावीत्यामुळे वेळ आणि स्टॅमिना दोन्ही वाचतोयेताना ही सर्व ठिकाणे आरामात पाहाता येतात.

किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नाहीकिल्ल्याच्या खाली असलेल्या धान्यकोठारा जवळ पाण्याचा  एकमेव नळ आहेतेथे पिण्याचे पाणी भरुन घेता येइलकिमान  लीटर पाणी सोबत बाळगावे.

ऱाजगिरी आणि कृष्णगिरी दोन्ही किल्ल्यावर माकडांचा त्रास आहेत्यामुळे खाण्याचे पदार्थ सॅक  मध्येच ठेवावेत . उघड्यावर खायला बसले की माकडे त्रास देतातमाथ्यावरील कोठारात किंवा  वाड्यात बसून निवांत खाता येते.

जुलै ते सप्टेंबर आणि नोव्हेंबर ते जानेवारी किल्ला पाहाण्यासाठी योग्य काळ आहेअर्थात   पावसाळ्यात फोटोग्राफी वर मर्यादा येते

राजगिरी किल्ला आणि परिसर व्यवस्थित पाहाण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो.

कृष्णगिरी किल्ला छोटा आहे तो पाहाण्यासाठी  तास पुरतात .

ऱाजगिरी आणि कृष्णगिरी हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहाण्यासाठी एकच १५/- रुपयाचे तिकिट काढावे लागतेपण दोन वेगवेगळ्या दिवशी किल्ले पाहील्यास दोनदा तिकीट काढावे लागते.

दोन्ही किल्ले एका दिवसात पाहाणे शक्य आहेपण त्यात दोन्ही किल्ल्यांवर अन्याय होतोधावत धावत किल्ले बघावे लागतात.

१०जिंजी गावात राहाण्याची, नाश्त्याची आणि जेवणाची चांगली सोय आहे . हॉटेल शिवन हे एकमेव हॉटेल ऑनलाईन बुकींगसाठी उपलब्ध आहेहे हॉटेल मध्यवर्ती ठिकाणी असल्याने खाण्याची आणि  जेवणाची सोय उत्तम होतेशिवमला लागूनच असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा मध्ये नॉनव्हेज आणि  बिर्याणी उत्तम मिळतेबस स्थानका समोर असलेले हॉटेल वसंत नाश्त्यासाठी उत्तम आहेयाशिवाय गावात  लॉज आहेत.


चेनै ते चेनै असा चार दिवसाचा कार्यक्रम आखल्यास बरीच ठिकाणे पाहून होतातपहिल्या दिवशी  चेनै फ़िरुन घ्यावेदुसर्या दिवशी थेट जिंजी गाठावेजिंजीला मुक्काम करुन दिड दिवसात राजागिरी आणि कृष्णगिरी हे दोन किल्ले पाहावेततेथून थेट वेल्लोर गाठावे. (जिंजीहून वेल्लोरला जाण्यासाठी २१६ क्रमांकाची बस आहे.)
वेल्लोरचा किल्ला पाहून कांचीपूरम गाठावेतिसर्या दिवशी कांचीपुरमला मुक्काम करावाचौथ्या  दिवशी सकाळी कांचीपुरमची मंदिरे पाहून महाबलीपुरम गाठावेमहाबलीपुरम पाहून चेनैला येऊन  परतीचा प्रवास करावाहा सर्व प्रवास बसने करणे शक्य आहे कारण या भागात पब्लिक आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट मोठ्या प्रमाणावर आहे. पण भाषेचा आणि लिपीचा प्रॉब्लेम आहे. बस वरील पाट्या वाचता येत नाहीत. चेनै ते चेनै प्रवासाठी गाडी केल्यास कमी त्रासात ही सर्व ठिकाणे पाहून होतात. 


NH-77 जिंजी-तिरुवन्नमलाई महामार्गा वरुन राजगिरी किल्ल्याची मागिल बाजू