Thursday, May 31, 2018

सुरमयी ट्रेक (Musical Trek)

सह्याद्रीत भटकंती करतांना नित्य नविन अनुभव येत असतात. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अजमेरा हा तसा अपरीचित किल्ला आहे. सकाळीच पायथ्याच्या पहाडेश्वर मंदिरा जवळून गड चढायला सुरुवात केली पण, गडावर जाणारी पायवाट अशी नव्हतीच. गडाच्या वाटेवर दूरपर्यंत तुरळक झुडप वाढलेली होती. माती पकडून ठेवणारी झाडेच नसल्याने माती सैल झालेली होती. त्यामुळे जीव मुठीत घेऊन घसार्‍यावरून खाली सरकत - सरकत वर चढत होतो. 


गडाच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या पठाराजवळ आल्यावर वेगळेच सुंदर सूर ऐकू येउ लागले. त्या सुरांनी आमची उत्सुकता वाढली आणि झपाझप पावले टाकत आम्ही पटकन पठार गाठले. तिथे एक माणूस वेगळेच वाद्य वाजवत होता. हे वाद्य आदिवासी तारपा वाद्या सारखे दिसत असले तरी वेगळेच होते. त्या वादकाच नाव होत युवराज वाघ, महादेव कोळी समाजाचा हा तरुण मुळचा देवळाणे गावचा पण खंडाने शेती कसण्यासाठी तो पहाडेश्वरला राहायला आला होता. त्याच्या हातात जे वाद्य होते, ते वाद्य त्याने स्वत: बनवले होते त्याच नाव त्याने "पावरा" असे सांगितले. पावराचा पहिला फ़ुगिर भाग भोपळा कोरुन त्यापासून बनवलेला होता. त्या भोपळ्याला पुढे साधारण ६ इंचाच्या बांबूच्या दोन नळ्या बसवलेल्या होत्या. त्याला बासरीवर असतात तशी तीन भोक होती. त्या बांबूच्या नळ्यांच्या दुसर्‍या टोकाला बैलाच शिंग जोडलेल होते. त्या शिंगाच्या वर ॲल्युमिनियमचा (Aluminium) दोन इंचभर पत्रा गुंडाळलेला होता. हे वेगवेगळे भाग जोडण्यासाठी त्याने मधमाशांच्या पोळ्यातून मिळालेले मेण वापरलेले होते. भोपळ्याच्या जवळ अजून एक कमानदार भोपळा जोडलेल त्यावर झालर असलेले रंगीत कापड आणि गोंडे लावून वाद्य सजवण्यात आले होते. 




या वाद्याच्या जोरावर तो आजूबाजूच्या परिसरात लग्न, धार्मिक विधीत वाजवण्याच्या सुपार्‍या घेतो, असे त्याने सांगितले. वेगवेगळ्या कार्यात वाजवल्या जाणार्‍या सुरावटी त्याने आम्हाला ऐकवल्या. पावरा वाजवतांना त्या भोपळ्यात तोंड घालून पूर्ण ताकदीने फ़ूंकावे लागते. अशाप्रकारे फ़ुंकताना त्याचे गाल फ़ुगिर होत. जबड्याच्या नसा ताणल्या जात. त्याचवेळी त्याची बोट सराईतपणे बांबूच्या नळीवरील भोकावरुन फ़िरत होती आणि त्या वाद्यातून ती मधूर सुरावट निघत होती. एकूण काम ताकदीच होते. आम्ही त्यांना विनंती केल्यावर पुढची वाट दाखवायला ते तयार झाले. आपला पावरा वाजवत त्यांनी किल्ला चढायला सुरुवात केली. त्या सुरावटींवर पावल टाकत आमचा सुरमयी प्रवास चालू झाला.    


     ( युवराजने केलेले पावरा वादन ऐकण्यासाठी खालील व्हिडीओवर टिचकी मारा )





जो डोंगर आम्ही धापा टाकत चढत होतो, तोच डोंगर युवराज पावरा वाजवत आरामात चढत होते. किल्ला पाहून झाल्यावर किल्ल्याच्या विस्मृतीत गेलेल्या खिंडीतल्या मुळ वाटेने त्यांनी आम्हाला पायथ्याशी आणले. त्याच ठिकाणी त्याच खंडाने घेतलेल शेत आणि त्याच्या बाजूला त्याच खोपट होते. निरोप घेतांना त्याला पुन्हा पावरा वाजवायचा आग्रह केला, कुठलेही आढेवेढे न घेता त्याने सुंदर धुन आम्हाला ऐकवली. अजमेराचा सुरमयी ट्रेक  मनावर कायमचा कोरला गेलेला आहे.

अजमेरा किल्ल्या खालील रक्त कांचन       



आडवाटेवरचे किल्ले ( Offbeat forts & temples in Nasik. Aad, Dubera, Bajirao Peshwa Birth place,Siddheshwar Temple ,Gangadhareshwar Mandir, Akole) हा ब्लॉग वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा...




#MusicalTrek #offbeattrek #treksinmaharashtra 

18 comments:

  1. मस्त ~खूप energy लागत असणार वाज़वायाला

    ReplyDelete
  2. As usual like other blogs -its really good.. .

    ReplyDelete
  3. प्रसाद कुलकर्णीJune 1, 2018 at 4:37 AM

    वाह् छान

    ReplyDelete
  4. हे पावरा वादन अजून चालु असतं का?

    ReplyDelete
  5. सामंत साहेब खूप छान संगीत ऐकवल्या बद्धल धन्यवाद

    ReplyDelete
  6. नेहमी प्रमाणे खूपच छान
    पावरा वादन मस्त

    ReplyDelete
  7. खूपच वेगळ आहे मस्त वाटते ऐकायला

    ReplyDelete
  8. संतोष कदम.June 1, 2018 at 8:43 PM

    सुंदर सुरमयी ट्रेक.

    ReplyDelete
  9. धन्यवाद अमित, एका सुंदर ठिकाणाची सफर घडवून आणल्याबद्दल

    ReplyDelete
  10. वाद्याचे नाव समजले... अप्रतिम लेख

    ReplyDelete
  11. अनवट गड, अनवट वाद्य. वेगळीच माहिती मिळाली तुमच्यामुळे!

    ReplyDelete