Friday, May 20, 2016

बारा मोटांची विहिर (Bara Motachi Vihir, Satara)


मुंबई - बंगलोर महामार्गावर मुंबई पासुन १४९ किमी वर महामार्गा लगत लिंब नावाचे गाव आहे.  या गावात बारा मोटांची एक सुंदर विहिर आहे. गुजरात -राजस्थान भागात बांधल्या जाणार्‍या भव्य विहिरींसारखी या विहिरीची रचना आणि बांधणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात तरी अशा प्रकारची ही एकमेव विहिर आहे.



औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यावर शाहु महाराजांच वास्तव्य सातार्‍या मधे होत. सातार्‍या पासून १६ किमीवर असलेल्या शेरी लिंब गावात शाहु महाराजानी देशभरातून गोळा करुन आणलेल्या ३००० जातींच्या आंब्याची आमराई तयार केली होती. या आमराईला पाणी पुरवठा करण्यासाठी त्यानी या ठिकाणी एका सुंदर आणि भव्य विहिरीची निर्मिती केली. इसवी सन १७१९ ते १७२४ अशी तब्बल पाच वर्षं या विहिरीचं बांधकाम सुरू होतं. या विहिरीवर बसवलेल्या १२ मोटानी विहिरीच्या पाण्याचा उपसा करुन ते पाणी आमराईला पाटाने पुरवले जात असे. एकाच वेळी १२ मोटा या विहिरीवर चालवण्याची सोय होती म्हणुन ही विहिर "बारा मोटांची विहिर" या नावाने प्रसिध्द आहे.





बारा मोटांची विहिर गावामध्ये भर वस्तीत आहे. प्रथम दर्शनी विहिरीचा आकार पिंडी सारखा दिसतो. विहिर तीन भागात विभागलेली आहे. पहिल्या भागात विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या, प्रवेशव्दार व 3 अतिरीक्त मोटा आहेत. दुसर्‍या भागात छोटेखानी महाल आहे. तर तिसर्‍या भागात अष्टकोनी विहिर आहे.



पायर्‍या उतरुन विहिरीकडे जाताना प्रथम एक भव्य प्रवेशव्दार लागते. या प्रवेशव्दारावर दोन शिलालेख आहेत त्यावर या विहिरीची निर्मिती ,"शके १६४१ ते १६४६ (इसवी सन १७१९ ते १७२४) याकाळात केल्याचा उल्लेख आहे. प्रवेशव्दारावर दोन बाजुला फुल कोरलेली आहेत. कमानीवर पोपट कोरलेले आहेत. प्रवेशव्दार ओलांडून पलिकडे गेल्यावर दोन कमानींच्या मधे दगडी पुल बनवलेला आहे. पुलाच्या दोन बाजुला पाणी असते. या ठिकाणी विहिरीच्या वरच्या बाजुला मोटा लावण्यासाठी 3  दगडी खोबण्या बनवण्यात आल्या आहेत. विहिर जरी बारा मोटांची विहिर म्हणुन प्रसिध्द असली तरी याठिकाणी प्रत्यक्षात १५ मोटांसाठी दगडी खोबण्या बनवण्यात आल्या आहेत. त्यातील १२ खोबण्या मुख्य विहिरीवर बसवलेल्या आहेत तर 3 खोबण्या पहिले प्रवेशव्दार व महाल या दरम्यान बसवल्या आहेत. विहिरीवरील एखादी मोट काही कारणाने (दुरुस्ती इ. ) बंद असल्यास या ३ अतिरीक्त (Stand by) मोटांचा वापर केला जात असे.


विहिर बांधली त्याकाळी चामड्याच्या मोटा वापरुन बैलांच्या सहाय्याने विहिरीतील पाणी बाहेर काढले जात असे. त्यासाठी विहिरीवर बसवलेल्या खोबण्यांमधे कप्पी बसवुन त्यावरुन दोर सोडला जाई. या दोराला चामड्याची मोट बांधलेली असे. विहिरीच्या वरच्या बाजुला बैलजोडी बांधलेली असे त्यांच्या सहाय्याने मोट खेचली जाई.  बैलाना कमी श्रम व्हावेत यासाठी याठिकाणी उतार (slope) बनवलेला आहे. विहिर बनवताना किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे हे इथे पाहायला मिळते. 



 

या विहिरी संदर्भात एक दंतकथा सांगितली जाते. संभाजी महाराजांच्या हत्त्येनंतर औरंगजेबाने त्यांच्या पत्नी येसूबाई आणि पुत्र शाहू यांना कैद केलं. कैदेत असताना शाहू महाराजांचा विवाह झाला. औरंगजेबाने शाहूंच्या वधूचा चेहरा पाहाण्याची इच्छा व्यक्त केली. काही दगाफ़टका होऊ नये म्हणुन शाहुच्या पत्नी ऐवजी वीरूबाई या दासीला शाहूंची पत्नी म्हणून औरंगजेबासमोर हजर करण्यात आलं. औरंगजेबाच्या कैदेतून शाहूची सुटका झाल्यावर त्यांनी सातार्‍याहुन राज्यकारभार पाहायला सुरुवात केली. सातार्‍य़ा जवळील शेरी लिंब गावात या वीरूबाईंसाठी शाहूंनी वाडा बांधला आणि आमराई तयार केली. राज्यकारभारातून फ़ुरसत मिळाल्यावर शाहू महाराज याठिकाणी विश्रांतीसाठी येत. वीरुबाईचा वाडा विहिरीच्या मागच्या बाजूला होता. आता तिथे उध्वस्त वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.


विहिरीच्या दुसर्‍या भागात जाण्यासाठी जी प्रवेशव्दाराची कमान आहे त्यावर महाल बांधलेला आहे. या प्रवेशव्दारावर दोन बाजुला शरभ कोरलेले आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर महालात जाण्यासाठी २ बाजुला २ जीने आहेत. महालात खाशा व्यक्तींचा वावर असल्यामुळे संरक्षणाच्या दुष्टीने जिन्यांची रचना केलेली आहे. जिने अंधारे व चिंचोळे असून एकावेळी एकच माणुस जाऊ शकेल इतकी जागा आहे. जिना काटकोनात वळलेला असून ज्याठिकाणी तो वळला आहे तेथील पायरीची उंची आणि आकार इतर पायर्‍यांपेक्षा वेगळा आहे. या रचनेमुळे शत्रुने घातपात करण्याच्या हेतूने महाला पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्यास एकावेळी एकच माणुस जिन्याने वर जाऊ शकतो. नविन माणुस जिन्याच्या अंधारामुळे बावचळुन जातो. तसेच काटकोनात वळलेला जिना आणि वेगवेगळ्या उंचीच्या पायर्‍या आणि कामगिरीच मानसिक दडपण यामुळे तो अडखळतो. महालात खाशांच्या संरक्षणासाठी असलेल्या रक्षकांना सावध होण्यासाठी एवढा आवाज पुरेसा असतो. महालाला दोनही बाजुला (विहिरीच्या व प्रवेशव्दाराच्या) तीन कमानी असलेले सज्जे आहेत. महाल चार खांबांवर तोललेला असुन त्यावर फ़ुल, गणपती, मारुती, घोडेस्वार इत्यादी शिल्प कोरलेली आहेत. हा महाल जमिनीच्या खाली विहिरीच्या पाण्याच्या सानिध्यात असल्यामुळे येथे कायम गारवा असतो. महालात पूर्वी पडदे लावले जात. पडदे लावण्यासाठी असलेल्या लोखंडी रींगा अजूनही पाहायला मिळतात. या महालात छत्रपती शाहू महाराज आणि पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या गाठी भेटी झाल्या असाव्यात.


 महालातून वर (जमिनीवर) जाण्यासाठी एक जीना आहे. या जिन्याने वर गेल्यावर चार पायर्‍या असलेला प्रशस्त चौथरा आहे. या चौथर्‍यावर बसुन शाहू महाराज स्थानिकांची गार्‍हाणी ऐकत, न्यायनिवाडा करीत असावेत. 



बारामोटांची मुख्य विहिर अष्टकोनी आहे. विहिरीचा अंदाजे घेर ५० फ़ूट असून खोली ११० फूट आहे. विहिरीच्या प्रत्येक कोनाड्यात शरभ शिल्प आणि नागाच शिल्प बसवलेल आहे. विहिरीवर जनिमीच्या पातळीवर मोटा खाली सोडण्यासाठी १२ ठिकाणी खोबण्या केलेल्या आहेत. मोटांव्दारे वर आलेल पाणी वाहून नेण्यासाठी दगडाने बांधलेले पाट आहेत. पाटाच्या शेवटी छोटे (१ मीटर x  १ मीटर ) हौद बांधलेले आहेत. जेणेकरून उतारावर बांधलेल्या दगडी पाटातून येणारे पाणी हौदात आल्यावर त्याचा वेग कमी होईल व हौदातून बाहेर पडणारे पाणी पुढे असलेल्या मातीच्या पाटाचे नुकसान करणार नाही.


 शाहु महाराजांची आमराई आता राहिली नसली, तरी त्यावेळचा एक डेरेदार पिंपरी वृक्ष आजही विहिरी समोर रस्त्यापलिकडे पांथस्थांना सावली देत उभा आहे. या विहिरीच्या बांधकामातून उरलेल्या दगड चुन्यातून पिंपरी भोवती पार आणि पारवर कळस नसलेल शंभू महादेवाचं लहानसं मंदिर बांधण्यात आलेल आहे. 
महात्मा गांधींच्या हत्त्येबद्दल फाशी झालेले नारायण आपटे याच गावाचे. त्यामुळे गांधीहत्त्येनंतर या गावातील ब्राह्मण वस्तीवर हल्ले झाल्यामुळे ब्राह्मण समाज इथून परागंदा झाल्याचं सांगितलं जातं. 
लिंब गावात पाहाण्यासारख अजून एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे कृष्णा नदीच्या पात्रात असलेल्या उंचवट्यावर बांधलेले कोटेश्वर मंदिर.


जाण्यासाठी :- शेरी लिंब गाव मुंबई - बंगलोर महामार्गावर मुंबई पासुन २४० किमी अंतरावर लिंब गाव आहे. सातार्‍याच्या अलिकडचा टोल नाका ओलांडल्यावर (उजव्या बाजूला गौरीशंकर कॉलेजच्या इमारती दिसतात) पुढे साधारणपणे एक किमीवर नागेवाडीला जाणारा फ़ाटा आहे.  या फ़ाट्यावरून २ किमी आत गेल्यावर उजव्या बाजूला जाणारा रस्ता लिंब शेरी गावातील बारा मोटांच्या विहिरीकडे जातो. तर डाव्या बाजूचा रस्ता कोटेश्वर मंदिराकडे जातो. या दोनही ठिकाणी वाहानाने जाता येते. त्यामुळे एका तासात दोनही ठिकाणे पाहाता येतात.
सातारा - शेरी लिंब अंतर १६ किमी आहे.
सातार्‍याहुन सज्जनगड, बारा मोटांची विहिर आणि कोटेश्वर मंदिर एका दिवसात पाहाता येते.
किंवा
सातार्‍याहुन कासचे पठार, बारा मोटांची विहिर आणि कोटेश्वर मंदिर एका दिवसात पाहाता येते.
आजुबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- सज्जनगड, कासच पठार, पाटेश्वर, कल्याणगड (नांदगिरी)

अमित सामंत

Sunday, May 15, 2016

मालवणची खाद्य भटकंती (What & where to eat in Malvan & Tarkarli)

सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort), तारकर्ली बीच (Tarkarli), देवबाग बीच (Devbaug beach) यांच्यामुळे मालवण हे शांत गाव पर्यटनाच्या नकाशावर आलय. मालवण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग किल्ला, समुद्र, बीचेस आणि मासे असा अनेकांचा समज असतो. पण मालवणची भटकंती म्हणजे केवळ एवढच नसून एक सुंदर खाद्य भटकंती सुध्दा आहे.


Sindhudurg Fort


मालवण परिसर फिरायचे म्हणजे सामान्य पर्यटकसाठी कोकण रेल्वे हा सर्वात सोईस्कर पर्याय आहे. कोकण रेल्वेने कुडाळ स्थानकात उतरुन रिक्षा, जीप, एसटी ने २६ किलोमीटर वरील मालवणला तासाभरात पोहोचता येत. कोकण रेल्वेच्या "मांडवी आणि कोकणकन्या" ह्या दोन गाड्या त्यातली कॅटरींगसाठी प्रसिध्द आहेत. भारतातल्या काही मोजक्याच गाड्यांमधे असे विविध आणि दर्जेदार पदार्थ मिळतात. त्यामुळे आपली कोकणातल्या खाद्य भ्रमंतीची सुरुवात कोकण रेल्वे पासूनच होते. कोकण रेल्वेत सकाळच्या नाश्त्यात शिरा - उपमा, ब्रेड आम्लेट, इडली-वडा, कटलेट इत्यादी पासुन दुपारच्या/रात्रीच्या जेवणात सुप्स, चिकन लॉलिपॉप, फ्राइड राइस, बिर्याणी  ते आइस्क्रीम, गुलाबजाम पर्यंतचे ४५ वेगवेगळे पदार्थ मिळतात. हे लक्षात राहाण्याच कारण म्हणजे एकदा मालवणला जाताना दरड कोसळल्याने आम्ही तब्बल १९ तास प्रवास करत होतो. त्यावेळी मेन्युकार्ड मधल्या ४५ पदार्थातले ३२ पदार्थ आम्ही खाल्ले होते. तुम्ही जर "जनशताब्दीने" जात असाल तर मात्र तुमची खाण्याच्या बाबतीत हेळसांड होइल. कारण या गाडीला पॅंट्रीकार नाही आहे. पण निराश व्हायच काहीच कारण नाही. कुडाळला ही गाडी दुपारी साधारण १ वाजण्याच्या सुमारास पोहोचते. रेल्वेतून उतरल्यावर तुमच्या गाडीवाल्याला गाडी थेट "भावोजींच्या खानावळीत" घ्यायला सांगायची. कुडाळ स्टेशन पासुन १ किमी अंतरावर असलेल्या या घरगुती खानावळीत अस्सल मालवणी शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळत. खानावळीत जेवणावर आडवा हात मारला की तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने गाडीत बसायच. गाडीवाल्याला गाडी आरामात चालवायला सांगायच. याचे दोन फायदे आहेत. एक तर खिडकी बाहेर दिसणार्‍या कोकणाच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येइल आणि दुसरा म्हणजे कोकणातल्या वळणदार रस्त्यांचा पोटाला त्रास होणार नाही. कुडाळ -मालवण रस्त्यावर धामापूरचा तलाव हा प्राचिन तलाव आहे. तेथे थोडावेळ थांबुन मगच मालवणच्या दिशेने पुढे जावे.

मालवणला जाण्यासाठी आता मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) विमानाचा पर्यायही उपलब्ध आहे. सिंधुदुर्ग विमानतळ ते मालवण हे अंतर २१ किलोमीटर आहे. विमानतळा पासून मालवणला जाण्यासाठी वाहानाची आगाऊ सोय करणे आवश्यक आहे. 



मालवणात पोहोचल्यावर आपल्याकडे दोन पर्याय असतात. एक तर तारकर्लीला (Tarkarli) जाउन राहायच किंवा मालवण गावात मुक्काम करायचा. मालवण ते तारकर्ली अंतर ७ किमी आहे. जाण्या येण्यासाठी रिक्षा,एसटी असे पर्यायही आहेत. त्यामुळे कुठेही राहीलात तरी फारसा फरक पडत नाही. पण तारकर्लीत राहीलात तर खाण्याचे पर्याय मर्यादित आहेत. तुम्ही ज्या हॉटेलात राहाल तिथलच आणि जस मिळेल तेच खाव लागेल. पण मालवणात राहाल तर तुमच्याकडे खाण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतील.मालवण सिंधुदुर्ग , तारकर्ली , देवबाग परिसर पाहायचा असेल तर दोन दिवसांचा वेळ काढण आवश्यक आहे. मालवण - कुडाळ - वेंगुर्ला - सावंतवाडी - आंबोली घाट ही ठिकाण पाहायची असल्यास चार ते पाच दिवसांचा वेळ काढावा लागेल.


Shivaji Maharaj , Sindhudurg Fort
Shivrajeshwar Mandir, Sindhudurg Fort
मालवणच सगळ्यात मोठ आकर्षण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘‘कुरटे‘‘ बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी किल्ला बांधण्याची आज्ञा केली. दिनांक २५ नोव्हेंबर १६६४ रोजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी शिवाजी महाराज स्वत: हजर होते. गेली ३५0 वर्षे उन वारा पाउस आणि लाटांचे तडाखे झेलत उभ्या असलेला सिंधुदुर्ग किल्ला पाहाण्यासाठी मालवणला पोहोचल्यावर  दुपारी ३ वाजताच्या सुमारास निघावे. सिंधुदुर्ग किल्ला भर समुद्रातील बेटावर बांधलेला आहे. त्यामुळे तिथे आद्रता (ह्युमिडीटी) प्रचंड असते. सकाळच्या चढत्या उन्हात किल्ला पाहायला गेल्यास घामाने आणि तहानेने हैराण होण्याची शक्यता असते त्यामुळे संध्याकाळी कलत्या उन्हात किल्ला पाहाणे उत्तम . मालवण धक्क्यावरून बोटीने १० मिनिटात किल्ल्यावर जाता येते. किल्ला पाहाण्यासाठी एक तास मिळतो. किल्ल्याचा गोमुखी दरवाजा , महाराजांच्या हाताचा आणि पावलाचा ठसा, शिवराजेश्वर मंदिर, राणीची वेळा, भवानी मंदिर या महत्वाच्या गोष्टी पाहाण्यात एक तास पटकन निघुन जातो. सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरुन आलेला थकवा घालवण्यासाठी किल्ल्यातच मिळणार कोकम सरबत किंवा शहाळ प्यायल्या नंतर मिळणार सुख अनुभवण्यात मजा आहे. भर समुद्रात असलेल्या किल्ल्यातील दुधबाव, दहीबाव, साखरबाव या विहिरींच पाणी वापरल्यामुळे कदाचित या सरबताला  एक वेगळीच चव येत असावी.

Suvarn Ganesh (Golden Ganesh) ,Malvan
सिंधुदुर्ग किल्ला पाहुन झाल्यावर थेट "सुवर्ण गणेश" मंदिराकडे मोर्चा वळवावा. मालवण धक्क्यापासून चालत १५ ते २० मिनिटात मंदिरात पोहोचता येते. या साध्याश्या मंदिरातील स्वच्छता, प्रसन्न वातावरण आणि गणपतीची सोन्याची सुंदर मुर्ती आपल्या मनातील भक्तीभाव जागृत करते. आपले हात आपोआप जोडले जातात. 

राजकोट किल्ला


सुवर्ण गणेश मंदिरा पासुन दोन रस्ते फुटतात त्यातील एक रस्ता राजकोट किल्ल्याकडे जातो. सिंधुदुर्गावर लक्ष ठेवण्यासाठी मालवण समुद्रात राजकोट आणि पद्मगड हे दोन किल्ले बांधाण्यात आले होते. सुवर्ण मंदिरापासून ५ मिनिटात आपाण राजकोट किल्ल्यावर पोहोचतो. समुद्रात शिरलेल्या एका भूशिरावर हा किला बांधलेला होता. २०२३ मध्ये नौदल दिनाचे औचित्य साधून किल्ल्यात छ. शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. त्याच्या बाजूला बुरुज, तटबंदी, प्रवेशव्दार बांधून किल्ल्यासारखी रचना केलेली आहे. राजकोट जवळच  छ. शिवाजी महाराजांचे गुरु मौनी महाराजांचे मंदिर आहे.




राजकोट किल्ला पाहून जवळच असलेल्या "रॉक गार्डन" ला जावे.  या ठिकाणी खडकाळ किनार्‍यावर फुटणार्‍या लाटांची गाज ऐकत, अंगावर तुषार झेलत सूर्यास्त पाहाणे हा खुप सुंदर अनुभव आहे. आकाशात अनोख्या रंगांची उधळण पाहाताना तिथे मिळणार्‍या भेळपुरीला वेगळाच स्वाद येतो. लहान मुलांसाठी इथे टॉय ट्रेन आणि इतर खेळण्याचे साहित्य आहे. सूर्यास्ता नंतर रॉक गार्डनहुन निघुन मालवण बाजारात फेरफटका मारण्यासाठी दाखल व्हाव. बाजारातल्या "भाग्यश्री (पूर्वीच क्षुधाशांती)" तले गरमागरम बटाटेवडे खाणे आणि राणे कोल्ड्रींग मधे जाउन लिंबु सोडा, फालुदा आइस्क्रीम खाण ही  चाकरमान्यांची "पॅशन" आहे. गणपतीत किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत मालवण बाजारात खरेदीला आल्यावर इथले वडे खाल्ल्या शिवाय आणि घरच्यांसाठी बांधुन नेल्याशिवाय त्याची खरेदी पूर्ण होत नाही. त्यामुळे इथे कायम ताजे, गरमागरम वडे मिळतात आणि पटापट संपतातही. गरमागरम वडे खाउन झाल्यावर आईस्क्रीम खाण आलच.भाग्यश्री हॉटेलच्या समोरच आणि मच्छीमार्केट जवळ "राणे कोल्ड्रींग: आहे. येथे मिळणारे विविध प्रकारचे "फालुदा विथ आईस्क्रीम" चवीला अप्रतिम आहेत. याशिवाय टायटॅनिक, इत्यादी आईस्क्रीमही खाउन पाहायला हरकत नाही.

Faluda Ice cream


Titanic Ice Cream , Rane Cold drink Malvan

मालवणी खाद्यपदार्थ म्हणजेच आले युक्त गुळाचे खाजे , शेंगदाणा लाडु, शेवाचे लाडु (खटखटे लाडु) , कुळथाच पिठ, मालवणी मसाले, कोलंबीच लोणच, काजु आणि त्याचे विविध पदार्थ, फणसपोळी, आंब्याचे विविध पदार्थ इत्यादी एकाच ठिकाणी मिळणारी सिंधुदुर्गातली एकमेव बाजारपेठ मालवणात आहे. त्यामुळे मनसोक्त खरेदी करावी. त्यानंतर भूक लागण अपरीहार्यच आहे. रात्रीच्या जेवणसाठी मालवण बाजारातल "चैतन्य " किंवा " अतिथी बांबू " हे दोन चांगले पर्याय आहेत. मालवणात विविध प्रकारचे मासे उत्तम मिळतातच. पण मालवणत आल्यावर खायचा खास पदार्थ म्हणजे "मोरी मटण" आणि वडे किंवा भाकरी. मोरी म्हणजे शार्कची पिल्ल. येवढ्या खतरनाक माशाच नाव "मोरी" ठेवण फक्त मालवणी माणसालाच जमु शकत. तर या "मोरी माशाला" काटे नसतात. त्यामुळे नवखा माणुसही आरामात खाउ शकतो. याबरोबर तिसर्‍या मसाला (शिंपले), कर्ली फ़्राय (हा प्रचंड काटे असलेला पण खुप चविष्ट मासा असतो) , कोलंबी मसाला, आणि मालवण समुद्रात मिळणारा ताजा बांगडा यांची चव आवर्जुन घ्यावी. त्याच बरोबर जेवण झाल्यावर प्रत्येकाने आपापल्या वकुबा नुसार ताज्या सोलकढीचे ग्लास रिचवणे आवश्यक आहे. 




Scuba Diving , Malvan

दुसर्‍या दिवशी सकाळी तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत. देवबागला जाउन डॉल्फिन सफारी करायची आणि स्नॉर्केलींग, वॉटर स्पॉर्टची धमाल अनुभवायची किंवा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागे स्क्युबा डायव्हींग करायचे. कौटुंबिक सहलीला आलेल्यानी पहिला पर्याय निवडावा आणि साहासी पर्यटकानी दुसरा पर्याय.डॉल्फिन सफारीसाठी सकाळी लवकर देवबागला पोहोचाव लागत. एवढ्या सकाळी मालवण मधली हॉटेल उघडलेली नसतात. पण मालवण किनार्‍यावर सिंधु बाजार समोर असलेल "भगवान हॉटेल" उघलेल असत. समुद्रावर मासे पकडणारे कोळी बांधव, बोटवाले आदी मस्य व्यवसायातल्या लोकांचा इथे राबता असतो. इथली आसन व्यवस्था आणि स्वच्छता यथातथाच असली तरी इथे मिळणारी मिसळ, वडा उसळ , जिलबी आणि बंगाली खाज रांगड्या चवीच आहे. खाउन झाल्यावर काउंटरवर विकायला ठेवलेली चिवड्याची पाकीट बरोबर घ्यावित. हा स्वादिष्ट चिवडा पुढच्या दिवसात अधुन मधुन तोंडात टाकायला मस्त आहे.सकाळी ९ वाजल्या नंतर मालवणच बाजारातली हॉटेल्स उघडतात. मालवणची खासियत असलेली गरमागरम आंबोळी आणि चटणी खाण्यासाठी भंडारी हायस्कुल जवळच हॉटेल गाठाव. त्यानंतर "विजया बेकरीत" मिळणारा स्पॉंज केक आणि शुबेरी बिस्किट बरोबर घेउन भटकंतीसाठी बाहेर पडाव. तारकर्ली - देवबागला जातांना थोडीशी वाकडी वाट करुन न चुकता "मोरयाचा धोंडा" पाहावा. मालवण किनार्‍यावरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला होता. आजही कोळी लोक याची पुजा करतात.

Kunkeshwar Temple

सकाळचा वेळ समुद्राच्या सानिध्यात घातल्यावर तुमच्या समोर संध्याकाळसाठी दोन पर्याय उरतात. एक म्हणजे मालवण पासून १६ किमीवरील आंगणेवाडीच मंदिर पाहुन संध्याकाळी तारकर्ली बीचवर जाउन आराम करणे. दुसरा म्हणजे मालवणपासून ३५ किमीवरच प्राचिन कुणकेश्वर मंदिर पाहुन परत येण. कुणकेश्वर मंदिराला जाणारा रस्ता समुद्राच्या किनार्‍याने, खाड्यांवरचे छोटे मोठे पुल ओलांडत कुणकेश्वरला पोहोचतो. कुणकेश्वरला जातांना वाटेत मालवण पासुन ४ किमी अंतरावर रस्त्या लगत असणार्‍या ओझर येथिल नैसर्गिक गुहा आणि पाण्याची टाकी पाहाता येतात. कुणकेश्वर हे समुद्र किनार्‍याला लागून असलेले निवांत आणि सुंदर गाव आहे. या गावात इसवीसनाच्या अकराव्या शतकात यादवांनी कुणकेश्वरचे प्राचीन शिवमंदिर बांधले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी व संभाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला. मंदिर पाहुन येताना आचरा तिठ्यावर थांबाव. आजुबाजूच्या गावातून रोजंदारीवर, खरेदीसाठी आलेले लोक संध्याकाळी एसटीची वाट बघत तिठ्यावर थांबलेले असतात. त्यांच्यासाठी इथल्या हॉटेलात गरमागरम कांदाभजी काढल्या जातात. या हॉटेलात बनवलेली खमंग कांदाभजी खाउन मगच उरलेला प्रवास करावा. कांदाभजी आणि चहा देणारी टपरी वजा हॉटेल आणि खाडी यांच नात आहे. पूर्वीच्या काळी पूल नव्हते तेंव्हा   खाडी ओलांडण्यासाठी होड्या असायच्या. या होड्या पलिकडच्या किनार्‍या पासून अलिकडे येईपर्यंतचा वेळ या हॉटेलात कांदाभजी, चहा आणि गजाली (गप्पा) यात वेळ निघुन जात असे. पुल झाले आणि कांदाभजी देणारी अनेक हॉटेल्स काळा बरोबर नामशेष झाली. पण दोन तीन गावच्या तिठ्यांवर असलेली कांदाभजींची हॉटेल्स आजही एसटीमुळे टिकुन आहेत. तिथे  कांदाभजी मिळण्याची वेळ मात्र सकाळी आणि संध्याकाळी. कुणकेश्वरहुन येताना मालवणात शिरल्यावर त्याच रस्त्यावर लागणार्‍या "अतिथी बांबू" या हॉटेलात माशांचा यथेच्छ समाचार घेउन दिवस संपवावा.


माझा एक शाहाकारी मित्र बरीच वर्ष मालवणला जायला कचरत होता. मालवण म्हणजे सगळीकडे माशाचा वास, समिष आहार अस त्याना वाटत होत. त्याच्या मातोश्रीनीही हीच चिंता व्यक्त केली. मी त्याना म्हटल निर्धास्त जा. मालवण सर्वाना आपलस करत. (येवा मालवण आपलाच आसा) मालवण बाजारात "वझे खानावळ" ही अस्सल शाकाहारी खानावळ आहे आणि तिथे वरण,भात, भाजी, चटण्या, कोशिंबिर आणि तुपाची धार अस साग्रसंगित जेवण मिळत. याशिवाय बर्‍याच हॉटेलात समिष आहारा बरोबर मालवणची खासियत असलेल आंबोळी  आणि काळया वाटाण्याच सांबार (उसळ) मिळतेच. त्यामुळे शाकाहारी माणसांची कुठेही अडचण होत नाही.

दोन दिवस मालवण परिसर फिरुन झाल्यावर मालवणचा निरोप घेउन निघाल्यावर कुडाळ, सावंतवाडी मार्गे आंबोली गाठता येते आणि आंबोलीला मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी परतीचा प्रवास चालू करता येतो. मालवणहुन सकाळी निघाल्यावर मालवण - कसाल - मुंबई रस्त्याने मालवणपासून ५ किमी वरील कुंभारमाठला गाठावे. येथे कुंभारमाठ सबस्टेशन समोरुन घुमडे गावात जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने  १.५ किमी अंतर गेल्यावर दाट जंगलात लपलेल्या घुमडे गावातील अप्रतिम घुमडाईदेवी मंदिरापाशी आपण पोहोचतो. (मालवणहून केवळ १० मिनिटात आपण मंदिरापर्यंत पोहोचतो.) शांत, सुंदर मंदिर पाहून मन एकदम प्रसन्न होऊन जाते. याठिकाणी असलेली शांतता, पक्ष्यांचे मंजूळ आवाज आणि बाजूने वाहाणारा व्हाळ त्यावरील साकव अस परिपूर्ण कोकणी निसर्गचित्र येथे पाहायला मिळते. इथे भरपूर छायाचित्रण केल्या शिवाय इथली भेट पूर्णच होत नाही.

Ghumdai Devi Mandir
Ghumdai Devi
Casue nut fruit


सागरी महामार्गाने कुडाळकडे जाताना रस्त्यात कर्ली नदिवरचा प्रशस्त पुल लागतो. गाडी पुलाच्या दुसर्‍या टोकाला पाठवून वाहानांची तुरळक वर्दळ असलेल्या या पूलावरुन रमत गमत चालत, आजुबाजूचे निसर्ग सौंदर्य पाहात पुल ओलांडण्यात खरी मजा आहे. पुल ओलांडल्यावर चिपी विमानतळाच्या बाजुने रस्ता परुळे गावात उतरतो. या पुरातन गावात प्रथम आदिनारायण मंदिर आणि पुढे गेल्यावर वेतोबा मंदिर संकुल लागते. या दोनही मंदिरातील मुर्ती पाहाण्यासारख्या आहेत. वेतोबा मंदिर परिसरात अनेक विरगळी पडलेल्या आहेत.वेतोबा मंदिराच्या समोरचा रस्ता वालावल गावात जातो. या गावातील प्राचिन लक्ष्मी नारायण मंदिर आणि त्या मागचा जलाशय प्रसिध्द आहे. मंदिर पाहुन कुडाळ गावात शिराव. जेवणाची वेळ झाली असेल तर "कोचरेकरांच सन्मान हॉटेल" गाठाव. अन्यथा मुंबई गोवा महामार्गाने सावंतवाडी गाठावी. सावंतवाडी हे गाव तेथील लाकडी खेळण्यांसाठी प्रसिध्द आहे. तसच मोती तलाव, राजवाडा ही ठिकाण पाहुन घ्यावित. एव्हाना पोटात कावळे ओरडायला सुरुवात झालेली असते. मासे आणि कोंबडी वड्यांसाठी सावंतवाडी एसटी स्टॅंडच्या बाजुची गल्ली गाठावी. तेथील हॉटेलात अप्रतिम चवीच जेवण मिळत. शाकाहारींसाठी सावंतवाडीतली "साधले खानावळ" मस्त आहे. जेवणावर ताव मारुन झाल्यावर ३० किलोमीटरवरील आंबोली गाठावे. आंबोली हे थंड हवेच ठिकाण आहे. तसच सह्याद्रीतील जैव विविधतेने श्रीमंत असलेल जंगल येथे आहे. आंबोलीतील महादेव पॉइंट, कावळेसाद पॉईंट, नागरतास धबधबा, हिरण्यकेशी नदिचा उगम इत्यादी  फ़िरण्याच्या जागा त्या दिवशी संध्याकाळी आणि दुसर्‍या दिवशी पाहुन संध्याकाळी आंबोलीहुन सावंतवाडी स्टेशन गाठावे आणि कोकण रेल्वेने अथवा बसने परतीचा प्रवास चालु करावा.

Karli Creek

मालवण भागातला एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीच्या घरी राहाणार असाल तर तुमची खायची चंगळ होउ शकते. नाश्त्याला आंबोळी चटणी किंवा तांदळाच घावण आणि चटणी हे स्पेशल मालवणी पदार्थ खायला मिळतील. नारळ दुधाच्या गुळ घालुन केलेल्या रसात बुडवलेल्या शेवया हा खास प्रसंगी केला जाणारा पदार्थ तुम्ही खाऊ शकता. उकड्या तांदळाची पेज आणि नारळाची चटणी किंवा उसळ हे मालवणी माणसाच्या रोजच्या नाश्त्यातील पदार्थ आहे. तो ही ट्राय करायला हरकत नाही. "रेडी टू कुक" पदार्थांचा जमाना येण्यापूर्वी अनेक वर्षापासून मालवणी जेवणात दोन "रेडी टू कूक /सर्व्ह" पदार्थ आहेत. एक म्हणजे कुळथाची पिठी आणि दुसरी सोलकडी. कुळथाच्या पिठाच मिश्रण, हळकुंड, धणे, मिरची यांच्या बरोबर योग्य प्रमाणत करून कुळथाची पिठी बनवली जाते. कुळथाच्या पिठात लसणाच्या दोन तीन पाकळ्या ठेचून पाणी घालून उकळल की कुळथाची पिठी तयार होते. कुळथाची पिठी आणि गरमगरम भात आणि जोडीला चुलीत भाजलेला सुका मासा असला की इतर कशाची गरज लागत नाही. (तसच कुळथाची पिठी जाडसर केली तर तोंडी लावायलाही होते.) चुलीत भाजलेल्या सुक्या माशाचा वास नविन माणसाला सहन होणार नाही. पण निखार्‍यावर भाजलेल्या सुक्या माशाचे तुकडे घालून बनवलेली खोबर्‍याची चटणी आणि जोडीला नाचणीची भाकरी चवीला अप्रतिम लागते. मालवण परिसरात होणार्‍या मोठ्या काकडीला तवस म्हणतात. त्या तवसापासून बनविलेला धोंडास हा केकसारखा गोड पदार्थ बनवायला त्रासदायक असला तरी खायला मस्त लागतो. याशिवाय हळदीच्या पानात बनवलेल्या पातोळ्या, ओल्या खोबर्‍याची गुळ घालुन केलेली काप (वड्या) हे गोड पदार्थ घराघरात उत्तम बनतात. मालवणी माणुस फ़ार कमी वेळा हलवा, पापलेट, सुरमई या मोठ्या माशांच्या वाटेला जातो. मच्छी बाजारात तारली, मोदक, खवळी, पेडवे, बांगुर्ले इ.छोटे मासे मिळतात. या माश्यांच आमसुल आणि मालवणी मसाला घालुन केलेल तिखल (आंबट तिखट घट्ट कालवण) नाचणीच्या / तांदळाच्या भाकरी बरोबर खाण्याची मजा काही औरच. दुसर्‍या दिवशी हे तिखल उरल असेल तर आटवून पेजे बरोबरही खायला चांगल लागत. मालवणी माणसाच्या परसात होणार्‍या भाज्याही जेवणात आगळीच चव आणतात. शेवग्याच्या कोवळ्या पाल्याची ओल खोबर घालून केलेली भाजी, केळफ़ुलाची मोड आलेले वाटाणे घालुन केलेली भाजी, शेवर्‍याची छोटी कोलंबी घालून केलेली भाजी, अळंबीची भाजी, उन्हाळ्याच्या दिवसात गेलात तर फ़णसाची, विलायती फ़णसाची भाजी, विलायती फ़णसाची तेलावर परतलेली काप अशा विविध प्रकारच्या भाज्या खायला मिळतात.  


सुचना :- १) मालवण व आसपासचा परिसर फ़िरण्यासाठी जीप बुक केल्यास फ़िरणे सोईचे पडते. जीप कुडाळ स्थानकात बोलवून घ्यावी.
 २) स्क्युबा डायव्हींग आणि स्नोर्कलिंगसाठी उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फ़ेब्रुवारी त्यानंतर समुद्राच्या पाण्याची पारदर्शकता कमी कमी होत जाते.
 ३) स्क्युबा डायव्हींग केल्यावर त्याच बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येते.
   ४) मालवण समुद्र किनारा, कुणकेश्वरचा किनारा, निवतीचा समुद्र किनारा धोकादायक आहेत. त्यात पोहणे टाळावे.

Nivati Beach


अमित सामंत 




कोकणातील इतर अपरिचित स्थळांबद्दल लिहिलेले ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा 

1) सिंधुदुर्गावरील चिन्हाचा मागोवा (अपरिचित सिंधुदुर्ग भाग -२)

2) Undiscovered Sindhudurg Fort अपरिचित किल्ले सिंधुदुर्ग

3) Offbeat Kokan गुढरम्य कातळशिल्प (Rock art near Malvan, Dist. Sindhudurg)

4) कोकणातील निसर्ग चमत्कार :- बोंबडेश्वर मंदिर (Offbeat Kokan)




Sunday, April 24, 2016

South Indian Food in Mumbai (जीवाचे साऊथ इंडीयन) What & where to eat south Indian food in Mumbai

मुंबईकरांच्या सुपरफास्ट जीवनात इडली, वडा, डोसा या पदार्थानी अढळपद प्राप्त केलेल आहे. मुंबईकरांची ही गरज ओळखुन मुंबईत अनेक साउथ इंडीयन हॉटेल्स उभी राहीली.  मुंबईभर पसरलेली उडपी हॉटेल्स इडली डोसे खिलवता-खिलवता काळानुरुप बदलत गेली. त्यात पंजाबी, चायनीज इत्यादी पदार्थ ही राजरोसपणे दिसू लागले आणि त्यांच्या सांबर चटणीची अस्सल चव हरवली. तरी आजही मुंबईत काही अस्सल साउथ इंडीयन रेस्टॉरंट अजुनही टिकून आहेत.




अस्सल साऊथ इंडीयन हॉटेलच व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्याच्या काउंटरवर पांढरी लुंगी (हल्ली पॅंट) आणि शर्ट घालून, कपाळावर भस्माचा आडवा पट्टा किंवा टिळा लावलेला आणि तोंडात पानाचा तोबारा भरून बसलेला मॅनेजर, हॉटेलमधे न मागता सढळ हस्ते मिळणारी सांबार, चटणी आणि तिथे मिळणारे साऊथ इंडीयन पदार्थ. (आजकाल गल्लोगल्ली उभ राहून इडली- वड्याची प्रेत चटणी सांबाराच्या चिखलात बुडवून पेपरावर देणार्‍यांना आपल्या या यादीत स्थान नाहीये.) असे अस्सल साऊथ इंडीयन पदार्थ खाण्यासाठी माटुंगा गाठण्या शिवाय पर्याय नाही. ब्रिटीश काळात मुंबई शहराची वाढ होताना वेगवेगळी पॉकेट्स तयार झाली. त्यातील माटुंगा परीसरावर दाक्षिणात्यांचा प्रभाव राहिला. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक अशा विविध भागातून आलेल्या लोकांनी इथे वस्ती केली. त्यांच्या सांस्कृतिक आणि खाद्य परंपरेची छाप या परीसरावर पडण अटळ होत. दक्षिणात्य शैलीतील मंदिरे, मठ, शंकरमठम सारखी वेदपाठशाळा, तेलंग रोडच्या कोपर्‍यावरचा फ़ुलबाजार त्यात मिळणारे दाक्षिणात्य पध्दतीचे हार, गजरे. रामा नायक ते मणीज, मद्रास कॅफ़े इत्यादी हॉटेल्स असा छोटासा दक्षिण भारतच माटुंग्यात वसलाय.   

माटुंगा स्थानकात पूर्वेकडे उतरल्यावर स्टेशनच्या बाजुलाच डाव्या हाताला रामा नायक यांचे "श्रीकृष्ण बोर्डींग" आहे. येथे दक्षिण भारतीय पध्दतीचे उत्तम जेवण मिळते. सांबार, रस्सम, भात, चटणी, भाजी, पापड, लोणच आणि स्वीट डीश अस जेवण अनेक पिढ्याना माफक दरात खाउ घालत रामा नायक अनेक वर्ष आपला आब राखत उभ आहे. हौशी माणसांसाठी केळीच्या आडव्या पानावरही याच जेवणाचा आस्वाद घेता येतो.


रामा नायक पासुन पुढे जाउन रस्ता ओलांडल्यावर "शारदा भुवन" आपल स्वागत करत. इथले काही वेटर्स आजही पांढर्‍या शुभ्र लुंगीत आपल्या सेवेला हजर असतात. इडली, वडा, विविध प्रकारचे डोसे, केळा भजी असे असंख्य प्रकार इथे खायला मिळतात. पण इथली खासियत म्हणजे अडाई, पाणपोळी आणि उलुंदु डोसा. शारदा भुवनवरुन पोदार कॉलेज ओलांडुन पुढे गेल्यावर रुईया कॉलेजच्या बाजुला "मणीज" नावाच छोटस हॉटेल आहे. आपल्या कॉलेज जीवनात अनेकानी पहिल्या वहिल्या अस्सल साउथ इंडीयन चवीचा आस्वाद याच ठिकाणी घेतला आहे. इथे बसायला कमी जागा असल्यामुळे हॉटेलच्या बाहेर कट्ट्यावर बसुन किंवा गाडीत बसुन खावे लागते तरीही इथे कायम गर्दी असते. इथे मिळणारी इडली चटणी, वडा चटणी आणि त्याबरोबर कॉलेज जीवनातल्या आठवणी एकदम लाजवाब कॉम्बिनेशन आहे.


माटुंग्याला उतरुन रुईया कॉलेजकडे न जाता विरुध्द बाजुस गेल्यावर भांडारकर रोडच्या कॉर्नरवर राम आश्रय आहे. इथे मिळणारा म्हैसुर मसाला डोसा आणि त्याबरोबर मिळणार्‍या विविध प्रकारच्या चटण्या मस्तच. या ठिकाणी रस्सम वडाही चांगला मिळतो. राम आश्रय वरुन पुढे गेल्यावर डाव्या हाताला फुलांचे सुंदर हार बनवणारी दुकान दिसतात. त्याचा मंद सुगंध वातावरणात पसरलेला असतो. येथे डावीकडे जाणारा रस्ता शंकर मठम या वेदपाठशाळेकडे जातो. येथे "मणीस" आहे. वडा सांबार चटणी; डोसे, दुपारी आणि रात्री मिळणार साउथ इंडीयन पध्दतीच जेवण आणि स्टीलच्या ग्लास वाटीतून येणारी कॉफ़ी (उच्चार काफ़ी) इथली खासियत आहे. आमच्या रोजच्या ट्रेन मधला खवय्या गृप एखाद्या शनिवारी दादरला उतरुन इथे टॅक्सीने इथे थडकतो. मग शिरा, उपमा, पोंगल, इडली, वडा, चटणी - सांबार , डोसे आणि याबरोबर मिळणार अमर्यादित सांबार चटणी खाउन झाल्यावर इथे मिळणारा तुपाळ मउ म्हैसुरपाक खाउन जडावलेल्या पोटाने आणि डोळ्यानी नाईलाजाने परत आपापल्या ऑफिसकडे निघतो. खरतर उलट्या बाजूची गाडी पकडून घरी जाऊन ताणून द्यावी असा मोह झालेला असतो. या मणीजच्या वर त्यांचच एक लॉज आहे. एकदा मणीस मधे आडवा हात मारुन वर लॉजमधे जाउन मस्त ताणुन द्यायची ऑफीसला जायचच नाही अस आम्ही ठरवलय पण अजुन ही कल्पना प्रत्यक्षात उतरवता आलेली नाहीये, २०१६ साली मणीज चेंबुरला शिफ़्ट झाले. (मणीज मधे पुरी आणि बटाटा भाजी हा प्रकारही मिळतो. कोणी हा पदार्थ खाताना दिसला की आम्ही त्याला फाउल समजतो. पुरी भाजी खायला अनेक हॉटेल्स आहेत. मणीज मधे येउन सांबार चटणी नाही खाल्ली तर आयुष्याला अर्थ नाही.) 



मणीज वरुन भाउ दाजी रस्त्यावर गेल्यावर मद्रास कॅफे आहे. इथली इडली चटणी अप्रतिमच. पुढे किंग्ज सर्कलला म्हणजे आजच्या महेश्वरी उद्यानला रामा नायक यांच "उडपी विहार" हे एसी रेस्टॉरंट आहे. एसी असल्याने माटुंग्यातील इतर साऊथ इंडीयन रेस्टॉरंटच्या मानाने महाग आहे. गम्मत म्हणजे हे रेस्टॉरंट इथल्या सँडविचसाठी प्रसिध्द आहे. उडपीच्या बाजूला शारदा भुवन आहे. तर समोरच्या फ़ुटपाथला रामा नायक यांच इडली हाउस आहे. इडली हाउस मध्ये फ़क्त इडलीचेच अनेक प्रकार खायला मिळतात सोबत सांबार चटणी अनलिमिटेड मिळते, फ़क्त अट एकच सांबार आणि चटणी टाकायची नाही अन्यथा पैसे घेतले जातात. इथे मिळणारी कांजीवरम इडली, पेपर इडली, मुढ्ढो (फ़णसाच्या पानात शिजवलेली इडली) , फ़ोनसा मुढ्ढो (फ़णसाचे गरे घालून केलेली गोड इडली, हि इडली फ़क्त फ़णसाच्या मौसमातच मिळाते) आणि सोबत लाल तिखट चटणी अशा विविध प्रकारच्या इडल्या मिळतात.

Mudho , Anand Bhuvan 

Phonsa Mudhho (Sweet Idali) Butter Jack fruit idali 

Kanjivaram Idali, Idali house , Matunga

याशिवाय भांडारकर रोडवरच अंबा भुवनही आपली चव राखुन आहे. तिथे मिळणारा कढीवडा लाजवाब. त्याच बरोबर इथे मिळणारा नीर डोसा आणि पायनॅपल शिराही उत्तम असतो. येथे दुपारी आणि रात्री केवळ बिसिबिळ्ळे (आपल्या भाताच्या खिचिडीचा भाऊबंध) खाण्यासाठी लोक येतात.

  माटुंग्याच्या पुढे सायनला एकमेव साउथ इंडीयन हॉटेल आहे. सायन स्टेशनकडून पूर्व महामार्गाकडे चालत जातांना उजव्या बाजूला "मणीज लंच होम" आहे. फ़क्त जेवणाच्या वेळातच उघड्या असणार्‍या या हॉटेलात अस्सल साउथ इंडीयन जेवण मिळत.

माटुंग्यानंतर अस्सल साउथ इंडीयन खाण्याकरता मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नाही. मुंबई सीएसटी स्थानकात उतरुन मिंट रोडने चालायला सुरुवात केल्यावर आनंद भुवन नावाची तीन हॉटेल्स एकापाठोपाठ एक लागतात, जाणकारानाच त्यातील फरक कळतो. पहिल "न्यु आनंद भुवन" हे रोटी, पंजाबी, चायनीज इत्यादीमुळे आपल्या कॅटॅगरीत बसत नाही. त्याच्या बाजूच "न्यू स्पेशल स्पेशल आनंद भुवन" नावाच हॉटेल आहे. आत्ता आत्ता पर्य़ंत केवळ साउथ इंडीयन पदार्थ देणार हे हॉटेलही आता बाटलय. तरी पण आजही इथे दररोज एक अस्सल साउथ इंडीयन पदार्थ मिळतो. निअप्पम, पानपोळी, सुगियम, पायसम इत्यादी पदार्थ खाण्यासाठी इथे जायला हरकत नाही. तिसर म्हणजे बॅलार्ड पिअर जवळच "न्यू स्पेशल आनंद भुवन" हे अजून साउथ इंडीयन चव राखुन आहे. इथे प्रथेप्रमाणे सांबार, चटणी आग्रहाने वाढतात. या हॉटेलच्या बाजूलाच "उडपी बोर्डींग" नावाच साऊथ इंडीयन जेवण देणार केवळ आणि केवळ जेवणाच्या वेळेतच उघड असणार हॉटेल आहे. 
 

सिएसटीला आलोच आहोत तर, दोन टपर्‍यांचा उल्लेख टाळता येणार नाही. सिएसटी स्टेशनसमोर कॅनन पावभाजीच्या लाईनीत "साऊथ कॉर्नर" नावाची टपरी आहे. इथली खासियत म्हणजे इथे डोसे कोळश्याच्या शेगडीवर बनवले जातात. इथली इडली आणि म्हैसुर मसाला डोसा खासच. मुंबईतल्या इतर टपर्‍यांप्रमाणे इथेही सांबार, चटणीची परीस्थिती चिंतनीय आहे. इथे रस्त्यात उभ राहून लोकांचे धक्के चुकवत खाव लागत. दुसरी टपरी म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर समोरच्या फ़ुटपाथवरची. इथे बटर डोसा, मसाला उत्तप्पा आणि डाल वडा उत्तम मिळतो. इथे चक्क चटणीही चांगली असते. 

मुंबईच्या इतर उपनगरात अस्सल साऊथ इंडीयन हॉटेल्स जवळजवळ नाहीतच. दोन वर्षापूर्वी घाटकोपर पूर्वेला आयनॉक्स थेटरच्या खाली "बालाजी" नावाच हॉटेल होत. इथे फ़क्त इडली आणि डोश्याचे सतराशे साठ प्रकार मिळायचे. इथे मिळणारा इडली प्लॅटर प्रकार एकदम हटके होता. यात वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या वेगवेगळ्या चटणी सांबार आणि टॉपिंगज सहित एकामागोमाग एक यायच्या. चार जणांना पोटभर मिळणारा हा प्रकार हॉटेल अचानक बंद झाल्यामुळे मिळेनासा झाला आणि घाटकोपरला उतरण्याच कारणच राहील नाही.

माटुंग्या नंतर साऊथ इंडीयन लोकांची वस्ती असणार ठिकाण म्हणजे डोंबिवली. राजाजी पथ, डोंबिवली पश्चिम आणि गोग्रासवाडी या भागात यांची वस्ती आणि देवळ आहेत. पण आज दुर्दैवाने खाण्याची ठिकाण मात्र नाहीत. इथे दक्षिणात्य खाद्य संस्कृती रुजली, पण फ़ुलली नाही. काही वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्वेला बाजीप्रभू चौकात "अन्नपूर्णा" नावाच अस्सल साउथ इंडीयन हॉटेल होत. डोंबिवलीतील एक खाणारी पिढी या हॉटेलने घडवली. रविवारी सकाळी अण्णुकडे (हे डोंबिवलीकरांनी त्याला ठेवलेल प्रेमाच नाव) जाऊन अप्पम, इडली, डोसे खाल्ल्या शिवाय डोंबिवलीकरांचा रविवार सुरु होत नसे. कालांतराने हे हॉटेल बंद पडले. पण आज डोंबिवलीत जागोजागी मिळणारे अप्पम ही याच हॉटेल्सची देणगी आहे.


खरतर खाण्यात अस्सल आणि नक्कल अस काही नसत. कधीकधी आई किंवा बायकोने बनवलेली सांबार चटणी अगदी  साऊथ इंडीयन हॉटेलच्या तोडीची होते. पण या हॉटेलात दरवळणारे सांबार, रस्सम, कॉफ़ीचे संमिश्र वास तिथल वातावरण तिथे वारंवार जाऊन खायला मजबूर करत .

अमित सामंत




Thursday, April 21, 2016

हरिश्चंद्रगडाचे साथिदार ( Bhairavgad(kothale), Bhairavgad (Shirpunje), Kalalgad, Kunjargad treks around Harishchandragad)


Bhairavgad (kothale) from base village kothale 


हरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. या उभ्या आडव्या पसरलेल्या गडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. दुर्ग भटक्यांनी या वाटा कधी ना कधी तरी तुडवलेल्या असतात. त्यामानाने हरीशचंद्रगडाच्या प्रभावळीत असलेल्या कुंजरगड (कोंबडगड) , भैरवगड (कोथळे) , कलाडगड , भैरवगड (शिरपुंजे) या किल्ल्यांवर फ़ारच कमी दुर्ग भटके जातात. हरीशचंद्रगडकडे जाणार्‍या विविध मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीनकाळी हे किल्ले बांधले गेले. हे किल्ले  पाहाण्याचा बर्याच दिवसापासुन मानस होता. दोन दिवसात चार किल्ले पाहायचे, त्यांचे GPS Mapping करायच या उद्देशाने शुक्रवारी रात्री निघालो. नगर जिल्ह्यातल्या या भागात मुंबईहुन जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.  मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे  ओतुर -बामणवाडा - कोतुळ किंवा  मुंबई - इगतपुरी - घोटी - भंडारदरा - मार्गे राजुर या दोनही मार्गाने अंतर जवळ जवळ सारखच होत.

पहिल्या दिवशी कुंजरगड आणि भैरवगड (कोथळे) करुन पाचनईत मुक्काम करायचा असल्यामुळे आम्ही माळशेज घाट मार्गे विहिर हे कुंजर (कोंबड) गडाच्या पायथ्याचे गाव गाठले. कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट चढून आल्यावर अजून एक डोंगररांग आडवी येते तीला बालाघाट रांग म्हणतात. हरीशचंद्र गडाच्या मागच्या बाजूस येणार्‍या या डोंगररांगेवर कलाल, कुंजर, भैरवगड इत्यादी किल्ले येतात. "कुंज" या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे. याचाच अपभ्रंश होऊन "कुजंरगड" असे पडले असावे. विहिर या पायथ्याच्या गावातून हा गड हत्ती सारखा प्रचंड भासतो.हा किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो. पावसाळ्यात या भागात तूफान पाऊस पडतो. कधी कधी अनेक दिवस सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामूळे पावसाळा ऎन भरात असतांना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडा सारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत.

विहिर गाव म्हणजे २०-३० घरांची छोटी वस्ती आहे. गावाच्या बाजूने डोंगर उतारावर थोडीशी भातशेती दिसत होती. त्यामागे कुंजरगड एखाद्या महाकाय हत्ती सारखा पसरलेला दिसत होता. किल्ला चढण्यासाठी १ तास , किल्ला फिरायला १ तास व उतरायला १ तास असा तीन तासांचा अवधी मनात धरुन किल्ला चढायला सुरुवात केली. विहिर गावातून कुंजर गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत. त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या मधून जाणार्‍या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो आणि गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात. या वाटेने गडावर चढतांना साधारणत: गडाच्या पाऊण उंचीवर एक वाट डावीकडे वळते. या वाटेने गडाला वळसा घालून जातांना वाटेत दाट झाडीत उघड्यावर ठेवलेल्या दोन मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून दुसर्‍या मुर्तीला काळोबा म्हणतात. या मुर्ती येथून हलवून गावात नेऊन मंदिर बांधण्याचा गावकर्‍यांचा मानस होता, परंतु त्यांना हलवणे आज पर्यंत शक्य झाले नाही, अशी कथा गावकरी सांगतात.





या मुर्ती पाहून मागे न जाता कड्याला लागून असलेल्या वाटेवरुन कारवीच्या दाट झाडीतून किल्ल्यावर जाता येते किंवा परत मागे फिरुन आलेल्या वाटेने दोन डोंगरामधील खिंडीतून गडावर जाता येते. पहिल्या मार्गाने डोंगराला पूर्ण वळसा घालून आपण विहिर गावाच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. या बाजूला फोफसंडी गावाकडून येणारी वाट येऊन मिळते. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत. अर्ध्या पायर्‍या चढल्यावर एक गुहा आहे, या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगराच्या आरपार खोदलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी विहिर गावच्या दिशेला व फोफसंडी गावाच्या बाजूस लक्ष ठेवणे शक्य होत असे. पावसाळ्यात व कडाक्याच्या थंडीत / उन्हात या गुहेचा चांगला उपयोग होत असावा. आज या गुहेतून आरपार जाण कठीण आहे. श्री. बेंडखळें सरांच्या भूयार या पुस्तकात या गुहेतून त्यांनी केलेल्या प्रवासावर एक रोमहर्षक प्रकरण लिहीलेल आहे.  गुहा पाहुन पायर्‍यांच्या मार्गाने उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला गडावर प्रवेश केल्यावर उध्वस्त वास्तुचे अवषेश दिसतात. उजव्या बाजूला पाण्याची सुकलेली २ टाकी दिसतात. या बाजूला किल्लाच्या माथ्यावरील पठार अरुंद होत जाते, टोकावरून दुरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. इथुन पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन विरुध्द (डाव्या बाजूच्या) टोकाकडे जातांना वाटेत पाण्याची ३ सुकलेली टाकी दिसतात. पुढे एका मोठ्या वाड्याचे अवषेश दिसतात.या वाड्यामागे (पिण्याच्या पाण्याच्या) दगडात कोरलेल्या टाक्यांचा समुह आहे. येथून प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.  

GPS Mapping साठी गडावर चढुन आलेल्या वाटेने परत न जाता गडाच्या उजव्या बाजुला लागुन असणार्‍या डोंगरावरुन खाली उतरताना कपारीतल्या ३ नैसर्गिक गुहा पाहायला मिळतात. गावकरी या गुहांचा उपयोग आपली गुरे बांधण्यासाठी करतात. कुंजर गावात उतरून बरोबर आणलेला तहानलाडू भुक लाडू खाऊन १० किमी वरील कोथळे हे भैरवगडाच्या पायथ्याचे गाव गाठले. हरीश्चंद्रगडावर जाण्यासाठी जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी मुख्य मार्ग हा टोलारखिंडीतून जातो. पुणे जिल्ह्यातील खिरेश्वर आणि नगर जिल्ह्यातील कोथळे गावातून टोलारखिंडीत जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भैरवगडाची निर्मिती करण्यात आली होती. गडाचा आकार आणि रचना पाहाता या किल्ल्याची निर्मिती हरिश्चंद्रगडाच्या काळातच झाली असावी. कोथळे या पायथ्याच्या गावाजवळ डोंगररांग चालु होते. यात सर्वात प्रथम एक पिंडीच्या आकाराचा डोंगर आहे. या डोंगराला "कोळथा" नावाने ओळखतात. त्यापुढे अजुन एक शिखर आहे. या शिखरापुढे  थोडी सपाटी असलेला "भैरवगड" आणि त्यापुढे उंच "गाढवाचा डोंगर" अशी शिखरांची सुंदर माळ कोळथे गावातून दिसते. भैरवगडावरील भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत आहे. स्थानिक लोक गडावर जाणार्‍या दुसर्‍या शिडी खाली आपली पादत्राणे काढुन अनवाणी पायाने गडमाथ्यावर जातात. दरवर्षी चैत्रात भैरोबाची यात्रा भरते.


Water Tank at Bhairavgad (Kothale)

    कोतुळ किंवा विहिर गावातून कोळथे गावाकडे जाताना गावाच्या अर्धा किमी अलिकडे (राजुरच्या बाजुने येताना कोळथे गावाच्या पुढे) एक कच्चा रस्ता टोलार खिंडीकडे जातो. इथे हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य असा मोठा फलक लावलेला आहे. तसच टोलारखिंडीकडे असा बाण दाखवलेला फलकही बसवलेला आहे. या रस्त्याने २ मिनिटे  चालल्यावर डाव्या बाजुला एक पायवाट जाते. यावाटेवर एका झुडुपाखाली "गवळ देवाची" मुर्ती आहे. ती पाहुन मळलेल्या वाटेने शेतांमधुन जात पुढे  गेल्यावर वाट जंगलात शिरते. जंगलात  शिरल्यावर खडा चढ चालु होतो. साधारण २० मिनिटात आपण गडाच्या कातळकोरीव पायर्‍यांपाशी पोहोचतो. या पायर्‍यांच्या पुढे डाव्या बाजूला कातळकड्या खाली एक पाण्याच टाक आहे. ते पाहुन परत पायवाटेवर येऊन एक वळसा मारल्यावर वनखात्याने बसवलेली पहीली शिडी आहे. शिडी चढुन वर गेल्यावर एक वळसा मारल्यावर पायवाटेच्या डाव्या बाजुला कातळाखाली खोदलेल पाण्याच टाक आहे. ते पाहुन पायवाटेने ५ मिनिट चढुन गेल्यावर कातळात खोदलेल खांब टाक दिसत. त्याच्या बाजुला एक बुजलेल टाक आहे. वनखात्याने त्यावर बसण्यासाठी दोन लोखंडी बाकडी ठेवलेली आहेत. टाक्या जवळच दुसरी मोठी शिडी आहे. ४० पायर्‍यांची शिडी चढुन गेल्यावर एक छोटी आडवी शिडी आहे. ती शिडी चढुन गेल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो. वनखात्याने बसवलेल्या या शिड्यांमुळे आज आपण सहजपणे गडावर पोहोचु शकतो.


Ladder at Bhairavgad (kothale)-

गडमाथ्याचा विस्तार छोटा आहे. गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला (उत्तरेला) भैरवाच ठाण आहे. त्याच्या बाजुला काही मुर्ती आणि वीरगळी ठेवलेल्या आहेत. समोरच्या बाजुला कातळात कोरलेली पाण्याची २ टाक आहेत. टाक्यांच्या मागे दोन दिपमाळा आहेत. भैरवाच्या मागच्या बाजुला कड्यावर रेलिंग लावलेले आहे. तिथुन समोर पसरलेला हरिश्चंद्रगड, त्यावरील तारमाती शिखर आणि हरीश्चंद्रगडाची "वेताळधार" स्पष्टपणे दिसते. भैरवाच दर्शन घेउन विरुध्द दिशेला ( दक्षिणेला) चालायला सुरुवात केल्यावर समोर भैरवगडापेक्षा उंच डोंगर दिसतो. त्याला "गाढवाचा डोंगर" म्हणतात. भैरवगड म्हणजे देवाचा रथ आणि त्याच्या पुढचा डोंगर म्हणजे रथ ओढणार गाढव अशी कल्पना करुन स्थानिक लोकानी या डोंगराला गाढव नाव दिलेल आहे. या डोंगराच्या दिशेने जाताना ५ टाक्यांचा एक समुह पाहायला मिळतो. पुढे गाढवाचा डोंगर आणि भैरवगड यांच्या मधिल गडाच्या टोकावर तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. भैरवगडावरुन पश्चिमेला हरिश्चंद्रगड, उत्तरेला शिरपुंज्याचा भैरवगड, पूर्वेला कुंजरगड दिसतात.



भैरवगड पाहुन खाली उतरल्यावर टोलारखिंडी मार्गे हरिश्चंद्रगडावर ४ ते ५ तासात पोहोचता येते. आम्हाला दुसर्‍या दिवशी कलालगड आणि शिरपुंज्याचा भैरवगड पाहायचा असल्याने आम्ही मुक्कामाला पाचनईत गेलो. जोडून सुट्टी असल्याने पाचनई गाव दुचाकी, चारचाकी गाड्यांनी भरुन गेल होत. त्यावरुन हरीश्चंद्रगडावर किती हौशा नवशांची गर्दी असेल याचा अंदाज येत होता. गावात नेहमीच्या वाट्याड्याकडे जेवणाची आणि झोपण्याची सोय केलेली होती. पण आमचा वाटाड्या घरी नव्हता, त्याने आम्ही येणार याचीही कल्पना घरी दिली नव्हती. फ़ोनही लागत नव्हते. पण पर्यटकांच्या सततच्या वावरामुळे हल्ली "प्रोफ़ेशनल" झालेल्या या गावातल्या गृहीणीनी आमची जेवणाची आणि राहाण्याची सोय करुन दिली.  भाकरी-पिठल, डाळ-भात खाऊन आदल्या रात्रीच जागरण आणि आजच्या दोन किल्ल्यांच्या भेटीने थकलेल शरीर लगेच झोपेच्या अधीन झाले.


सकाळी नाश्ता करुन कलाडगडाच्या दिशेने कुच केल. पाचनई गावाच्या मागच्या बाजूला हरीश्चंद्रगड आहे, तर समोरच्या बाजूला मुख्य डोंगररांगेपसुन सुटललेला डोंगर दिसतो. तोच कलाडगड. हा किल्ला एका बाजुला असल्यामुळे आणि त्यावर जाण्याच्या मार्ग कठीण असल्यामुळे फारसे ट्रेकर्स या किल्ल्याला भेट देत नाहीत. परंतू एकदा वाट वाकडी करुन पाहावा असा हा किल्ला आहे. कलाडगड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव पेठेवाडी, हे गाव पाचनई पासुन ७ किमीवर आहे. पण किल्ल्यावर जाणारी वाट पाचनई पासुन ५ किमीवर आहे. वनखात्याने इथे सिमेंटचा निवारा बांधल्याने ही जागा शोधणे सोपे झालेले आहे.पाचनईहुन खाजगी वाहानाने किंवा चालत या निवार्‍यापर्यंत येउन उत्तर - दक्षिण पसरलेल्या कलाडगडाच्या धारेवरुन चढायला सुरुवात करुन १० मिनिटे दाट झाडीतून चालल्यावर आपण उघड्या जागी येतो. येथे काही दगडाना शेंदुर फासुन ठेवलेला आहे. त्यामधुनच कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. येथुन साधारण अर्ध्या तासाचा खडा चढ चढल्यावर आपण कातळात खोदलेल्या खोबण्यांच्या टप्प्यापाशी येतो. या जेमतेम पाय मावतील अशा खोबण्या कातळात तिरक्या कोरलेल्या आहेत. या खोबण्यात पाय रोवुन आणि हाताची मजबुत पकड घेउन सावधगिरीने हा टप्पा पार केल्यावर आपण भैरोबाच्या गुहेपाशी येतो. जमिनीच्या पातळीच्या खाली कातळात खोदलेल्या गुहेत भैरोबाचा शेंदुर फासलेला दगड आहे. बाहेरच्या मोकळ्या भागात झिजलेली २ सर्प शिल्प ठेवलेली आहेत. भैरोबाचे दर्शन घेउन किल्ल्याच्या मधला डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजुला ठेवत अरुंद पायवाटेवरुन दक्षिणेकडे चालत गेल्यावर कातळात खोदलेल्या दोन टाक्यांपाशी पोहोचतो. टाक्यांमधे दगड कोसळुन टाकी बुजलेली आहेत. टाकी पाहुन दक्षिण टोकाकडे चालत गेल्यावर उजव्या बाजुला दोन मोठे गोल दगड आणि एक देवळी आहे. याला वेताळाचा चाळा म्हणतात. हे ठिकाण पाहुन आल्या वाटेने टाक्यापर्यंत जाउन गडाच्या सर्वोच्च माथ्यावर  जाणार्‍या वाटेने ५ मिनिटात आपण माथ्यावर पोहोचतो. दक्षिणेकडे अरुंद असलेला गड माथा उत्तरेकडे रुंद आहे. याच भागात काही घरांची जोती आहेत. किल्ला पाहून परत येण्यासाठी ३ तास लागतात. किल्ल्याच्या ज्या धारेवरुन आपण चढाई करतो ती पूर्वेला असल्याने सकाळी लवकर चढाई करावी. त्यावेळी दगड तापलेला नसेल आणि चढता उतरताना त्याचा त्रास होत नाही.


Kalalgad

   कलालगड पाहून पाचनई मार्गे भैरवगड शिरपुंजेला जाताना सर्वत्र डोंगर कारवी मोठ्या प्रमाणत फुललेली दिसत होती. सह्याद्रीच्या डोंगर उतारावर येणार्‍या या झाडाला ७ वर्षातून एकदाच फुल येतात. तेंव्हा जंगल या फुलाच्या निळाईने न्हाउन जात. झाडतर फुलानी गच्च बहरलेली असतात. पण गळुन गेलेल्या फुलांची निळी चादरही ही पायवाटांवर पसरलेली दिसते. .....निळ आकाश , निळ जंगल....निळ्या पायवाटा....अवघी निळाई सर्वत्र भरुन राहील्याचा भास होतो. सह्याद्रीत कारवीचे दोन प्रकार आढळतात डोंगर कारवी (Hill Cone head) आणि टोपली कारवी. डोंगर कारवी ट्रेकर्स लोकांच्या खास परीचयाची अवघड वाटा, उतार, या कारवीच्या आधारानेच पार कराव्या लागतात.


Steps ,Bhairavgad (Shirpunje)

  
 कोतुळ - राजुरला रस्त्यावर माणिकओझर गाव आहे. गावातून आंबितला जाणार्‍या रस्त्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. या गावाच्या आधी नदीवरील पुल लागतो. पुल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजुस एक रस्ता वर चढताना दिसतो. येथे "कळसुबाई हरीशचंद्र अभायारण्य" अशी पाटीही लावली आहे. हा रस्ता थेट भैरवगडाच्या पायथ्या पर्यंत जातो. जीप सारखे वाहान पायथ्यापर्यंत जाते. शिरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते. त्यामुळे भैरवगडावर जायची वाट व्यवस्थित मळलेली आहे. या वाटेवर अनेक ठिकाणी कातळकोरीव पायर्‍या आणि काही ठिकाणी रेलिंग्ज लावलेले आहेत. या वाटेने १ तासात आपण भैरवगड आणि त्याच्या बाजुचा डोंगर यामधील खिंडीत येउन पोहोचतो. येथे वरच्या अंगाला एक टाक आहे. पुढे कातळात कोरलेल्या सुंदर पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढुन वर आल्यावर गडाची तटबंदी आणि उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशव्दार दिसते. प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला  कातळात कोरलेली ४ टाकी आहेत. त्याच्या पुढे एक कोरड टाक आहे. ते पाहुन गुहेकडे (दक्षिणेकडे) जाण्यार्‍या पायवाटेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला मोठ खांब टाक आहे. टाक्यापर्यंत जाण्यासाठी असलेला मार्गही कातळ कोरुन बनवलेला आहे. या टाक्याच्या बाजुला एक रांजण खळगा कोरलेला आहे. तर टाक्याच्या वरच्या बाजूला तीन रांजण खळगे खोदलेले आहेत.टाक आणि त्यावरील रांजण खळगे पाहुन परत पायवाटेवर येउन  गुहेच्या दिशेने जाताना उजव्या बाजुला कातळात कोरलेली ४ टाकी आहेत. त्याच्या वरच्या बाजुला अजुन ४ पाण्याची टाकी आहेत.  टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेली १०x१० ची गुहा आहे. या गुहेला कमान असलेल प्रवेशव्दारही आहे.

Cave at Bhairavgad (Shirpunje)

गुहा पाहुन परत पायवाटेवर येउन एक साडेचार फुट उंच वीरगळ आहे.  पुढे डाव्या बाजुला, गुहेच्या वरच्या बाजूला एक वीरगळ. या वीरगळीच्या चारही बाजू कोरलेल्या आहेत. विरगळी जवळ गणपतीच्या झिजलेल्या मुर्ती शेंदुर फासुन ठेवलेल्या आहेत. त्या पाहुन कातळात खोदलेल्या पायर्‍या उतरुन कड्याच्या टोकावर कोरलेल्या भैरोबाच्या गुहेत जाताना बाहेरच्या बाजुला एक वीरगळ ठेवलेली आहे. गुहेत भैरोबाची अश्वारुढ मुर्ती आहे. भैरोबाच्या गुहेच्या बाजुला इंग्रजी " L "  आकाराची गुहा आहे. या गुहेत १० जण राहु शकतात. गुहेच्या कड्याकडील बाजुला रेलिंग लावलेले आहे. येथुन शिरपुंजे गाव आणि आजुबाजूचा परीसर दिसतो. या रेलिंगच्या एका बाजुला फाटक बसवलेले आहे. तेथुन खाली उतरण्याचा मार्ग आहे. खालच्या बाजुस एक गुहा आहे. तिचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.या गुहा पाहुन गुहेच्या वरच्या बाजुला येउन डाव्या बाजुला वर चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल एक टाक पाहायला मिळत. हे टाक पाहुन गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत. मोठी गुहा १०x १२ फूट आहे. दोन खांबावर तोललेल्या या गुहेत आता मात्र पाणी साठल्यामुळे ती एखाद्या टाक्यासारखी दिसते. मोठ्या गुहेच्या उजव्या बाजुला छोटी गुहा आहे. ती सुध्दा पाण्याने भरलेली आहे. गुहा पाहुन किल्ल्याच्या माथ्यावर जाणार्‍या पायवाटेने ५ मिनिटात आपण गड माथ्यावर पोहोचतो. इथे कातळात कोरलेली पाण्याची ३ टाकी आहेत. गडमाथ्यावरुन दक्षिणेला हरीश्चंद्रगड, पाबरगड हे किल्ले दिसतात.गडमाथ्यावरुन गुहेच्या दिशेने न उतरता प्रवेशव्दाराच्या दिशेने उतरायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला दोन लांबलचक पाण्याची टाकी पाहायला मिळतात. ती पाहुन प्रवेशव्दारा जवळ आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गडफेरीस एक तास लागतो. ठरल्याप्रमाणे दोन दिवसात ४ किल्ले बघुन झाले होते. आता परतीच्या प्रवासाची ओढ लागली होती. राजुर इगतपुरीमार्गे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

Veergal at Bhairavgad (Shirpunje)


सहसा भेट न दिले जाणारे आडबाजूचे किल्ले पाहायला जातांना फ़ार काही पाहायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. GPS Mapping करायच, नकाशे बनवायचे किल्ल्यावरील अवशेषांची  नोंद करायची , माहिती जमा करायची या उद्देशाने गेलेल्या आम्हाला या गडांनी समृध्द करुन टाकल.





जाण्यासाठी:- मुंबईहुन दोन मार्गाने कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड(कोळथे), कलाडगड, भैरवगड(शिरपुंजे) हे चार किल्ले दोन दिवसात पुढील प्रमाणे पाहाता येतात..
 मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे  ओतुर गाठावे (अंतर १५९ किमी). ओतुर एसटी स्टॅंडच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा - कोतुळ (अंतर ३० किमी) - विहिर (कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव) मार्गे कोळथे (अंतर २५ किमी)  (भैरवगडाच्या पायथ्याचे गाव) - ७ किमीवर पाचनई त्यापुढे ५ किमीवर कलालगड आणि पुन्हा पाचनईत येऊन खडकी गाव गाठावे.(खडकीतून एक रस्ता आंबित मार्गे शिरपुंज्याला जातो. हा जवळचा रस्ता आहे पण खराब आहे.) खडकी पासुन १० किमी अंतरावर माणिकओझर गाव आहे. (इथुन ४ किमीवर राजुर आहे.) माणिक ओझर गावातुन डावीकडे आंबितला जाणार्‍या रस्त्याने १६ किमी गेल्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. पोहोचतो. ( एकुण अंतर २६४ किमी ) . याशिवाय  मुंबई - इगतपुरी - घोटी - भंडारदरा - मार्गे राजुर ( अंतर १५५ किमी ) यामार्गेही जाता येते.


१) मुंबई - पुण्याहून शुक्रवारी रात्री निघुन स्वत:चे वाहान (या भागात एसटी आणि जीप्स (वडाप)ची फ़्रीक्वेन्सी चांगली नसल्यामुळे) असल्यास कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड(कोळथे), कलाडगड, भैरवगड(शिरपुंजे) हे चार किल्ले दोन दिवसात पुढील प्रमाणे पाहाता येतात. शनिवारी सकाळी लवकर कुंजरगडाच्या पायथ्याला पोहोचुन कुंजरगड पाहुन घ्यावा. दुपारी कोथळे गावातील मंदिरात जेवण, आराम करुन भैरवगड पाहावा. कुंजरगड - भैरवगड (कोळथे) हे दोन किल्ले एका दिवसात पाहून पाचनईला मुक्कामाला जावे. पाचनईला जेवणाची आणि मुक्कामाची सोय होते. दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी उन तापण्या अगोदर कलाडगड पाहावा. (कलालगड हा कठीण श्रेणीचा किल्ला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने रोप बरोबर ध्यावा.) दुपारी शिरपुंज्याचा भैरवगड पाहून परतीचा प्रवास करावा.

२) मुंबई - पुण्याहून शुक्रवारी रात्री निघुन कोळथेचा भैरवगड पाहावा. भैरवगडाला वळसा घालून टोलारखिंड मार्गे ५ ते ६ तासात हरिश्चंद्रगडावर जाता येते. रविवारी हरिश्चंद्रगड पाहून परतीचा प्रवास करावा

#harishchandragad#bhairavgadkolthe#bhairavgadshirpunge#kalalgad#kombadgad#kunhargad#