मुंबईकरांच्या सुपरफास्ट जीवनात इडली, वडा, डोसा या पदार्थानी अढळपद प्राप्त केलेल आहे. मुंबईकरांची ही गरज ओळखुन मुंबईत अनेक साउथ इंडीयन हॉटेल्स उभी राहीली. मुंबईभर पसरलेली उडपी हॉटेल्स इडली डोसे खिलवता-खिलवता काळानुरुप बदलत गेली. त्यात पंजाबी, चायनीज इत्यादी पदार्थ ही राजरोसपणे दिसू लागले आणि त्यांच्या सांबर चटणीची अस्सल चव हरवली. तरी आजही मुंबईत काही अस्सल साउथ इंडीयन रेस्टॉरंट अजुनही टिकून आहेत.
अस्सल साऊथ इंडीयन हॉटेलच व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्याच्या काउंटरवर पांढरी लुंगी (हल्ली पॅंट) आणि शर्ट घालून, कपाळावर भस्माचा आडवा पट्टा किंवा टिळा लावलेला आणि तोंडात पानाचा तोबारा भरून बसलेला मॅनेजर, हॉटेलमधे न मागता सढळ हस्ते मिळणारी सांबार, चटणी आणि तिथे मिळणारे साऊथ इंडीयन पदार्थ. (आजकाल गल्लोगल्ली उभ राहून इडली- वड्याची प्रेत चटणी सांबाराच्या चिखलात बुडवून पेपरावर देणार्यांना आपल्या या यादीत स्थान नाहीये.) असे अस्सल साऊथ इंडीयन पदार्थ खाण्यासाठी माटुंगा गाठण्या शिवाय पर्याय नाही. ब्रिटीश काळात मुंबई शहराची वाढ होताना वेगवेगळी पॉकेट्स तयार झाली. त्यातील माटुंगा परीसरावर दाक्षिणात्यांचा प्रभाव राहिला. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक अशा विविध भागातून आलेल्या लोकांनी इथे वस्ती केली. त्यांच्या सांस्कृतिक आणि खाद्य परंपरेची छाप या परीसरावर पडण अटळ होत. दक्षिणात्य शैलीतील मंदिरे, मठ, शंकरमठम सारखी वेदपाठशाळा, तेलंग रोडच्या कोपर्यावरचा फ़ुलबाजार त्यात मिळणारे दाक्षिणात्य पध्दतीचे हार, गजरे. रामा नायक ते मणीज, मद्रास कॅफ़े इत्यादी हॉटेल्स असा छोटासा दक्षिण भारतच माटुंग्यात वसलाय.
माटुंगा स्थानकात पूर्वेकडे उतरल्यावर स्टेशनच्या बाजुलाच डाव्या हाताला रामा नायक यांचे "श्रीकृष्ण बोर्डींग" आहे. येथे दक्षिण भारतीय पध्दतीचे उत्तम जेवण मिळते. सांबार, रस्सम, भात, चटणी, भाजी, पापड, लोणच आणि स्वीट डीश अस जेवण अनेक पिढ्याना माफक दरात खाउ घालत रामा नायक अनेक वर्ष आपला आब राखत उभ आहे. हौशी माणसांसाठी केळीच्या आडव्या पानावरही याच जेवणाचा आस्वाद घेता येतो.
रामा नायक पासुन पुढे जाउन रस्ता ओलांडल्यावर "शारदा भुवन" आपल स्वागत करत. इथले काही वेटर्स आजही पांढर्या शुभ्र लुंगीत आपल्या सेवेला हजर असतात. इडली, वडा, विविध प्रकारचे डोसे, केळा भजी असे असंख्य प्रकार इथे खायला मिळतात. पण इथली खासियत म्हणजे अडाई, पाणपोळी आणि उलुंदु डोसा. शारदा भुवनवरुन पोदार कॉलेज ओलांडुन पुढे गेल्यावर रुईया कॉलेजच्या बाजुला "मणीज" नावाच छोटस हॉटेल आहे. आपल्या कॉलेज जीवनात अनेकानी पहिल्या वहिल्या अस्सल साउथ इंडीयन चवीचा आस्वाद याच ठिकाणी घेतला आहे. इथे बसायला कमी जागा असल्यामुळे हॉटेलच्या बाहेर कट्ट्यावर बसुन किंवा गाडीत बसुन खावे लागते तरीही इथे कायम गर्दी असते. इथे मिळणारी इडली चटणी, वडा चटणी आणि त्याबरोबर कॉलेज जीवनातल्या आठवणी एकदम लाजवाब कॉम्बिनेशन आहे.
माटुंग्याला उतरुन रुईया कॉलेजकडे न जाता विरुध्द बाजुस गेल्यावर भांडारकर रोडच्या कॉर्नरवर राम आश्रय आहे. इथे मिळणारा म्हैसुर मसाला डोसा आणि त्याबरोबर मिळणार्या विविध प्रकारच्या चटण्या मस्तच. या ठिकाणी रस्सम वडाही चांगला मिळतो. राम आश्रय वरुन पुढे गेल्यावर डाव्या हाताला फुलांचे सुंदर हार बनवणारी दुकान दिसतात. त्याचा मंद सुगंध वातावरणात पसरलेला असतो. येथे डावीकडे जाणारा रस्ता शंकर मठम या वेदपाठशाळेकडे जातो. येथे "मणीस" आहे. वडा सांबार चटणी; डोसे, दुपारी आणि रात्री मिळणार साउथ इंडीयन पध्दतीच जेवण आणि स्टीलच्या ग्लास वाटीतून येणारी कॉफ़ी (उच्चार काफ़ी) इथली खासियत आहे. आमच्या रोजच्या ट्रेन मधला खवय्या गृप एखाद्या शनिवारी दादरला उतरुन इथे टॅक्सीने इथे थडकतो. मग शिरा, उपमा, पोंगल, इडली, वडा, चटणी - सांबार , डोसे आणि याबरोबर मिळणार अमर्यादित सांबार चटणी खाउन झाल्यावर इथे मिळणारा तुपाळ मउ म्हैसुरपाक खाउन जडावलेल्या पोटाने आणि डोळ्यानी नाईलाजाने परत आपापल्या ऑफिसकडे निघतो. खरतर उलट्या बाजूची गाडी पकडून घरी जाऊन ताणून द्यावी असा मोह झालेला असतो. या मणीजच्या वर त्यांचच एक लॉज आहे. एकदा मणीस मधे आडवा हात मारुन वर लॉजमधे जाउन मस्त ताणुन द्यायची ऑफीसला जायचच नाही अस आम्ही ठरवलय पण अजुन ही कल्पना प्रत्यक्षात उतरवता आलेली नाहीये, २०१६ साली मणीज चेंबुरला शिफ़्ट झाले. (मणीज मधे पुरी आणि बटाटा भाजी हा प्रकारही मिळतो. कोणी हा पदार्थ खाताना दिसला की आम्ही त्याला फाउल समजतो. पुरी भाजी खायला अनेक हॉटेल्स आहेत. मणीज मधे येउन सांबार चटणी नाही खाल्ली तर आयुष्याला अर्थ नाही.)
मणीज वरुन भाउ दाजी रस्त्यावर गेल्यावर मद्रास कॅफे आहे. इथली इडली चटणी अप्रतिमच. पुढे किंग्ज सर्कलला म्हणजे आजच्या महेश्वरी उद्यानला रामा नायक यांच "उडपी विहार" हे एसी रेस्टॉरंट आहे. एसी असल्याने माटुंग्यातील इतर साऊथ इंडीयन रेस्टॉरंटच्या मानाने महाग आहे. गम्मत म्हणजे हे रेस्टॉरंट इथल्या सँडविचसाठी प्रसिध्द आहे. उडपीच्या बाजूला शारदा भुवन आहे. तर समोरच्या फ़ुटपाथला रामा नायक यांच इडली हाउस आहे. इडली हाउस मध्ये फ़क्त इडलीचेच अनेक प्रकार खायला मिळतात सोबत सांबार चटणी अनलिमिटेड मिळते, फ़क्त अट एकच सांबार आणि चटणी टाकायची नाही अन्यथा पैसे घेतले जातात. इथे मिळणारी कांजीवरम इडली, पेपर इडली, मुढ्ढो (फ़णसाच्या पानात शिजवलेली इडली) , फ़ोनसा मुढ्ढो (फ़णसाचे गरे घालून केलेली गोड इडली, हि इडली फ़क्त फ़णसाच्या मौसमातच मिळाते) आणि सोबत लाल तिखट चटणी अशा विविध प्रकारच्या इडल्या मिळतात.
याशिवाय भांडारकर रोडवरच अंबा भुवनही आपली चव राखुन आहे. तिथे मिळणारा कढीवडा लाजवाब. त्याच बरोबर इथे मिळणारा नीर डोसा आणि पायनॅपल शिराही उत्तम असतो. येथे दुपारी आणि रात्री केवळ बिसिबिळ्ळे (आपल्या भाताच्या खिचिडीचा भाऊबंध) खाण्यासाठी लोक येतात.
Mudho , Anand Bhuvan |
Phonsa Mudhho (Sweet Idali) Butter Jack fruit idali |
Kanjivaram Idali, Idali house , Matunga |
याशिवाय भांडारकर रोडवरच अंबा भुवनही आपली चव राखुन आहे. तिथे मिळणारा कढीवडा लाजवाब. त्याच बरोबर इथे मिळणारा नीर डोसा आणि पायनॅपल शिराही उत्तम असतो. येथे दुपारी आणि रात्री केवळ बिसिबिळ्ळे (आपल्या भाताच्या खिचिडीचा भाऊबंध) खाण्यासाठी लोक येतात.
माटुंग्याच्या पुढे सायनला एकमेव साउथ इंडीयन हॉटेल आहे. सायन स्टेशनकडून पूर्व महामार्गाकडे चालत जातांना उजव्या बाजूला "मणीज लंच होम" आहे. फ़क्त जेवणाच्या वेळातच उघड्या असणार्या या हॉटेलात अस्सल साउथ इंडीयन जेवण मिळत.
माटुंग्यानंतर अस्सल साउथ इंडीयन खाण्याकरता मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नाही. मुंबई सीएसटी स्थानकात उतरुन मिंट रोडने चालायला सुरुवात केल्यावर आनंद भुवन नावाची तीन हॉटेल्स एकापाठोपाठ एक लागतात, जाणकारानाच त्यातील फरक कळतो. पहिल "न्यु आनंद भुवन" हे रोटी, पंजाबी, चायनीज इत्यादीमुळे आपल्या कॅटॅगरीत बसत नाही. त्याच्या बाजूच "न्यू स्पेशल स्पेशल आनंद भुवन" नावाच हॉटेल आहे. आत्ता आत्ता पर्य़ंत केवळ साउथ इंडीयन पदार्थ देणार हे हॉटेलही आता बाटलय. तरी पण आजही इथे दररोज एक अस्सल साउथ इंडीयन पदार्थ मिळतो. निअप्पम, पानपोळी, सुगियम, पायसम इत्यादी पदार्थ खाण्यासाठी इथे जायला हरकत नाही. तिसर म्हणजे बॅलार्ड पिअर जवळच "न्यू स्पेशल आनंद भुवन" हे अजून साउथ इंडीयन चव राखुन आहे. इथे प्रथेप्रमाणे सांबार, चटणी आग्रहाने वाढतात. या हॉटेलच्या बाजूलाच "उडपी बोर्डींग" नावाच साऊथ इंडीयन जेवण देणार केवळ आणि केवळ जेवणाच्या वेळेतच उघड असणार हॉटेल आहे.
सिएसटीला आलोच आहोत तर, दोन टपर्यांचा उल्लेख टाळता येणार नाही. सिएसटी स्टेशनसमोर कॅनन पावभाजीच्या लाईनीत "साऊथ कॉर्नर" नावाची टपरी आहे. इथली खासियत म्हणजे इथे डोसे कोळश्याच्या शेगडीवर बनवले जातात. इथली इडली आणि म्हैसुर मसाला डोसा खासच. मुंबईतल्या इतर टपर्यांप्रमाणे इथेही सांबार, चटणीची परीस्थिती चिंतनीय आहे. इथे रस्त्यात उभ राहून लोकांचे धक्के चुकवत खाव लागत. दुसरी टपरी म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर समोरच्या फ़ुटपाथवरची. इथे बटर डोसा, मसाला उत्तप्पा आणि डाल वडा उत्तम मिळतो. इथे चक्क चटणीही चांगली असते.
मुंबईच्या इतर उपनगरात अस्सल साऊथ इंडीयन हॉटेल्स जवळजवळ नाहीतच. दोन वर्षापूर्वी घाटकोपर पूर्वेला आयनॉक्स थेटरच्या खाली "बालाजी" नावाच हॉटेल होत. इथे फ़क्त इडली आणि डोश्याचे सतराशे साठ प्रकार मिळायचे. इथे मिळणारा इडली प्लॅटर प्रकार एकदम हटके होता. यात वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या वेगवेगळ्या चटणी सांबार आणि टॉपिंगज सहित एकामागोमाग एक यायच्या. चार जणांना पोटभर मिळणारा हा प्रकार हॉटेल अचानक बंद झाल्यामुळे मिळेनासा झाला आणि घाटकोपरला उतरण्याच कारणच राहील नाही.
माटुंग्या नंतर साऊथ इंडीयन लोकांची वस्ती असणार ठिकाण म्हणजे डोंबिवली. राजाजी पथ, डोंबिवली पश्चिम आणि गोग्रासवाडी या भागात यांची वस्ती आणि देवळ आहेत. पण आज दुर्दैवाने खाण्याची ठिकाण मात्र नाहीत. इथे दक्षिणात्य खाद्य संस्कृती रुजली, पण फ़ुलली नाही. काही वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्वेला बाजीप्रभू चौकात "अन्नपूर्णा" नावाच अस्सल साउथ इंडीयन हॉटेल होत. डोंबिवलीतील एक खाणारी पिढी या हॉटेलने घडवली. रविवारी सकाळी अण्णुकडे (हे डोंबिवलीकरांनी त्याला ठेवलेल प्रेमाच नाव) जाऊन अप्पम, इडली, डोसे खाल्ल्या शिवाय डोंबिवलीकरांचा रविवार सुरु होत नसे. कालांतराने हे हॉटेल बंद पडले. पण आज डोंबिवलीत जागोजागी मिळणारे अप्पम ही याच हॉटेल्सची देणगी आहे.
खरतर खाण्यात अस्सल आणि नक्कल अस काही नसत. कधीकधी आई किंवा बायकोने बनवलेली सांबार चटणी अगदी साऊथ इंडीयन हॉटेलच्या तोडीची होते. पण या हॉटेलात दरवळणारे सांबार, रस्सम, कॉफ़ीचे संमिश्र वास तिथल वातावरण तिथे वारंवार जाऊन खायला मजबूर करत .
अमित सामंत
kharchache Budget pan sangat ja Mhanje try karta yeel
ReplyDeleteअमित, सुंदर आणि माहितीपूर्ण ब्लॉग.तुझे ऐकून अंबा भुवन ,राम आश्रय आणि शारदा भुवन येथील डोसे इडली याचा आस्वाद घेतला.मजा आली.धन्यवाद
ReplyDeleteपुढच्या भारत वारीत ही खाद्य वारी करायचीच -इति सौभाग्यवती
ReplyDelete